▼

Wednesday, 7 October 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 07 October 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ ऑक्टोबर २०२६ दुपारी १.०० वा.

****

जनतेचा विश्वास आणि लाखो कार्यकर्त्यांची मेहनत हीच आपली सर्वात मोठी शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आज २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज नवी दिल्लीत आयोजित ‘विकसित भारत संकल्प सभा’ आणि ‘सेवा ज्योती यात्रा’ कार्यक्रमात ते बोलत होते. २५ वर्षांत कमावलेला विश्वास आणि या प्रवासाचा अनुभव ही केवळ आपल्यासाठीच नव्हे तर राष्ट्रासाठी आणि भारतातील प्रत्येक नागरिकासाठी एक अनमोल संपत्ती असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

आपण सर्वजण मिळून २०४७ पर्यंत विकसित भारत घडवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. योग्य धोरणं आणि दिशेमुळे गेल्या १२ वर्षांत भारताच्या अर्थव्यवस्थेत दोन ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक भर पडली असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले –

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात देशात झालेल्या सकारात्मक बदलांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. पूर्वी प्रत्येक संकटाचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत असे; आज जग भारताच्या लवचिकता आणि सामर्थ्याची चर्चा करतं. धोरणात्मक निष्क्रियतेच्या काळाची जागा वेगवान अंमलबजावणीने घेतली, आयातीऐवजी विक्रमात्मक निर्यात होत आहे आणि मोबाइल फोन आयात करणाऱ्या भारतानं आता ‘मेड इन इंडिया’ उपकरणांच्या निर्मितीचं केंद्र म्हणून वाटचाल केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

सरकारप्रमुख म्हणून सलग २५ वर्षांच्या या प्रवासासाठी जनतेच्या सातत्यपूर्ण आशीर्वादाबद्दल मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसंच भाजप, राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व राजकीय सहकाऱ्यांचे आभार मानून त्यांनी देशातल्या जनतेसमोर नतमस्तक होत कृतज्ञता व्यक्त केली.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात शून्य पूर्णांक २५ टक्क्यांची वाढ केली असून, रेपो दर आता साडे पाच टक्के इतका झाला आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. फेब्रुवारी २०२३ नंतर आरबीआयने धोरणात्मक दरात वाढ करण्याची ही पहिलीच वेळ आहे. २०२५ मध्ये एकूण १२५ बेसिस पॉइंट्सची कपात केल्यानंतर, बँकेने मागील चार पतधोरण आढाव्यांमध्ये रेपो दर सव्वा पाच टक्क्यांवर कायम ठेवला होता. वाढती किरकोळ महागाई आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे.

****

अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी विभागीय आढावा बैठका घेऊन जिल्हास्तरावरच्या यंत्रणा सक्षम करण्यात येतील, असं आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या राज्यस्तरीय कृती दलाच्या पहिल्या बैठकीत ते काल बोलत होते. वारंवार आणि संघटित स्वरूपात अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात करणारे डॉक्टर आणि गुन्ह्यांमध्ये सहभागी इतर व्यक्तींवर कायदेशीर निकषांनुसार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का लागू करण्याबाबत कायदेशीर पर्यायांचा अभ्यास सुरू करण्यासाठी आरोग्यमंत्री सकारात्मक असल्याचं कृती दलाच्या अध्यक्षा नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.

****

निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी वित्त विभागाने सुरू केलेल्या ‘महाउपलब्धी’ मोबाईल ॲपबाबत लातूर जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मुंबई लेखा आणि कोषागारे विभागाच्या पथकाने दूरदृश्य प्रणालीद्वारे ॲपचा वापर, कार्यान्वित करण्याची प्रक्रिया आणि उपलब्ध सुविधांची माहिती दिली. ॲप वापरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचं निरसनही यावेळी करण्यात आलं.

****

अन्न आणि औषध प्रशासनाने धुळे जिल्ह्यातल्या नरडाणा औद्यगिक वसाहतीत एका गोदामात कारवाई करत संशयित कमी दर्जाच्या पिण्याच्या पाण्याच्या पाकिटबंद ८० हजार २०८ बाटल्या जप्त केल्या. या पाण्याच्या बाटलीवर बनावट छाप असल्याचा तसंच पाणी कमी दर्जाचं असल्याचा संशय असल्याने ही कारवाई करण्यात आली. पाण्याचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

****

नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीच्या एकूण डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही जिल्ह्याने देशात अव्वल स्थान पटकावलं आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी-जलसंपदा, आर्थिक समावेशन आणि कौशल्य विकास तसंच मूलभूत पायाभूत सुविधा या पाच क्षेत्रांतल्या ४८ निर्देशांकांमध्ये झालेल्या सुधारणांच्या आधारे हे मानांकन निश्चित करण्यात आलं आहे.

****

No comments:

Post a Comment