▼

Thursday, 8 October 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 08 October 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ ऑक्टोबर २०२६ दुपारी १.०० वा.

****

डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवांना मोठी ऊर्जा मिळाली असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत आज दहाव्या भारतीय मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारतीय मोबाईल काँग्रेस या मंचाने देशातलं दूरसंवाद क्षेत्र आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीचा झालेला विकास जवळून पाहिला आहे. भारताच्या दूरसंवाद क्षेत्रातल्या प्रगतीमध्ये या मंचाने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं पंतप्रधान म्हणाले. संपूर्ण भारतात 5G सेवा सुरळीत चालवण्यासाठी आता साडेपाच लाखांहून अधिक बेस स्टेशन कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं.

भारत मोबाइल काँग्रेसमध्ये यंदाच्या चर्चेची ‘स्केल विदाऊट बाउंडरीज’ ही संकल्पना असून, प्रत्येक मर्यादेपलीकडे विस्तार करण्यावर भर देण्यात आला आहे. भारतानं ही संकल्पना प्रत्यक्षात कशी साकारली, याचा अनुभव पंतप्रधान मोदी यांनी मांडला. दूरसंचार क्षेत्राचा विचार करताना नेटवर्क, स्पेक्ट्रम, टॉवर, पोहोच आणि वेग यावर चर्चा होते. मात्र, गेल्या १० ते १२ वर्षांत मोबाईल फोन केवळ संवादाचं माध्यम न राहता सुशासनाचं महत्त्वाचं साधन बनला आहे. हेच डिजिटल इंडियाच्या संकल्पनेचं केंद्र असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

भारतीय हवाई दलाचा ९४ वा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. ‘अभेद्य, अचूक आणि सटीक’ ही यंदाची स्थापना दिनाची संकल्पना आहे. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी दिलेल्या संदेशात, भारतीय हवाई दल संपूर्ण सजगतेनं आणि दृढनिश्चयानं राष्ट्राच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असल्याचं म्हटलं आहे.

****

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता पुण्यातल्या डोंजे इथल्या त्यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. नाना पाटेकर यांचं आज पहाटे गोव्यातल्या त्यांच्या घरी हृदयविकाराच्या तीव्र  झटक्यानं निधन झालं, ते ७५ वर्षांचे होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. आपल्या सशक्त आणि भावपूर्ण अभिनयाने नाना पाटेकर यांनी मानवी अनुभवांना जिवंत केल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.

उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करताना, भारतीय चित्रपटसृष्टीतलं त्यांचं अमूल्य योगदान आणि दमदार अभिनय कायम स्मरणात राहील, असं म्हटलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतलं नाना पाटेकर यांचं योगदान मोठं असून, त्यांच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाल्याचं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करताना, त्यांच्या अभिनय आणि सामाजिक क्षेत्रातल्या कार्याला उजाळा दिला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

राज्यात दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं ११ सदस्यीय आंतरमंत्रालयीन पथक आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे. हे पथक दुष्काळग्रस्त भागातली परिस्थिती, पिकांचं नुकसान, पाणीटंचाई आणि संबंधित बाबींचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन करणार आहे. पथकाचं नेतृत्व कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल करत आहेत. मराठवाड्यात पाहणीसाठी हे पथक आज रात्री छत्रपती संभाजीनगर इथं दाखल होईल. विभागीय आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर हे पथक उद्या सकाळी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात तर दुपारनंतर तसंच परवा सकाळी बीड जिल्ह्याच्या विविध गावांमध्ये पाहणी करेल.

****

राज्यातल्या अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांची सुनावणी जलदगतीने व्हावी आणि अशा प्रकरणांचा वेळेत निपटारा व्हावा, यासाठी पुण्यात विशेष नामनिर्देशित न्यायालय स्थापन करण्यात आलं आहे. या न्यायालयामुळे प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा, पुरावे आणि साक्षीदारांशी संबंधित प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं, तसंच दोषींविरुद्ध प्रभावी न्यायालयीन कार्यवाही करणं सुलभ होणार आहे. 

****

बीड जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदा गर्भपाताच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पीसीपीएनडीटी आणि वैद्यकीय गर्भपात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. बीड जिल्हा रुग्णालयात संबंधित यंत्रणेच्या आढावा बैठकीत त्या आज बोलत होत्या. जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी करावी, केंद्रांच्या कामकाजावर प्रभावी देखरेख ठेवावी आणि संशयास्पद बाबी आढळल्यास तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

****

No comments:

Post a Comment