▼

Tuesday, 13 October 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १३ ऑक्‍टोबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 13 October 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ ऑक्‍टोबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

शारदीय नवरात्रोत्सवात आज तिसरी माळ असून, देवी दुर्गेच्या तृतीय स्वरूप असलेल्या चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. देवीचं हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी मानलं जातं. मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र धारण केल्यामुळे देवीला चंद्रघंटा असं नाव पडलं. साहस, शांती आणि शौर्याचं प्रतीक असलेल्या चंद्रघंटा मातेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदन केलं आहे. देवीच्या आशीर्वादानं देशवासीयांच्या यश आणि कीर्तीत निरंतर वृद्धी होत राहो, अशी कामना त्यांनी व्यक्त केली.

****

महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं एका आठवडाभरात आता उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान तसंच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल दिल्लीत दोन्ही राज्यांतील उस उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यानंतर ही घोषणा कऱण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारांचे प्रतिनिधी, शेतकरी संघटना, साखर कारखान्याचे प्रतिनिधी आणि संबंधित विषय तज्ज्ञ यांचा या समितीत समावेश असेल.

****

 

पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गुणवत्ताधारित करण्यासाठी सर्व प्रवेश केंद्रीकृत ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी नव्या नियमांची माहिती घेऊन त्यानुसार प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावं, असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. नव्या नियमांनुसार प्रवेश प्रक्रियेतील संस्थास्तरीय फेरी बंद करण्यात आली आहे. यापुढे संस्थात्मक कोटा आणि अनिवासी भारतीय कोट्यातील जागांसह सर्व प्रवेश राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत केंद्रीकृत ऑनलाइन प्रक्रियेद्वारे केले जातील. रिक्त जागांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या अतिरिक्त प्रवेश फेऱ्याही ऑनलाइन पद्धतीनेच पार पडतील, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.

****

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यातल्या तीन लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्याची थकबाकी तपासून नजीकच्या आपले सेवा केंद्रात आधार प्रमाणीकरण करून घ्यावं आणि योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, त्यासाठी महाआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेच्या पोर्टलवर बँकांनी ३१ लाखाहून अधिक थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. 

****

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतल्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं, तसंच मतदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केलं. उमेदवारांच्या बैठकीत ते काल बोलत होते. या मतदारसंघात एकूण तीन लाख २६ हजार ७०१ मतदार असून, मतदानासाठी ८४२ केंद्रे निश्चित करण्यात आली आहे यासाठी ३५० अधिकारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती जी. श्रीकांत यांनी यावेळी दिली.

दरम्यान, या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यात प्रचाराला वेग आला आहे. मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सुशील घोटे पाटील मतदारांच्या गाठी भेटी घेत प्रचार करत आहेत. प्रस्थापितांविरोधात ही लढाई असून मराठवाड्यातल्या पदवीधरांच्या प्रश्नांसाठी आपण निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने नाशिक जिल्ह्यात वणी इथल्या श्री सप्तशृंगी देवीच्या गडावर विशेष तपासणी मोहीम राबवत १  हजार ४०८ किलो पाम तेलयुक्त मावा सदृश्य मिठाई नष्ट करण्यात आली. या नष्ट केलेल्या मिठाईची किंमत पाच लाख रुपये इतकी आहे. या कारवाईत १३ आस्थापनांमधले १८ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. पेढा प्रसाद विक्री केंद्र तसंच इतर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या या आस्थापनवर ही कारवाई करण्यात आली.

****

 

 

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची लातूर महानगर शाखा आणि नाम फाउंडेशनच्या वतीने काल ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नाट्यकर्मी, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतले मान्यवर उपस्थित होते.

****

हिंगोली इथल्या सार्वजनिक दसरा महोत्सव समिती आणि पत्रकार क्रिकेट संघाच्या वतीने आयोजित दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते काल झालं.

****

बीड इथं जन शिक्षण संस्थान आणि मानस गुरुकुल यांच्यावतीनं काल भारतरत्न नानाजी देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली. ग्रामीण विकास आणि शिक्षण क्षेत्रासाठी नानाजी देशमुख यांनी केलेलं कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं मत संस्थानचे संचालक गंगाधर देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.

****

No comments:

Post a Comment