Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 October 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ ऑक्टोबर २०२६
सायंकाळी ६.१०
****
· छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी दहा हजार कोटी रुपयांच्या ग्रोथ
फंडला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
· दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय समिती याच आठवड्यात राज्याच्या दौऱ्यावर
येणार-मुख्यमंत्र्यांची माहिती
· पोलिसांच्या साहसी कामगिरीसाठी “मुख्यमंत्री शौर्य पदक” देण्याचा
राज्य सरकारचा निर्णय
· हिंगोली फटाका दुर्घटनेतल्या जखमींवर सर्वोत्तम उपचाराच्या प्रशासनाला
सूचना
· स्वाराती विद्यापीठाकडून दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या विद्यार्थ्यांचं
परीक्षा शुल्क माफ
आणि
· भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा हरमनप्रीत कौरचा
राजीनामा
****
छोट्या आणि मध्यम उद्योगांमध्ये समभाग अर्थात इक्विटी गुंतवणुकीसाठी
दहा हजार कोटी रुपयांचा स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस ग्रोथ फंड स्थापन करायला केंद्रीय
मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी
मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.या निधीचा मोठा हिस्सा उत्पादन
क्षेत्रातल्या छोट्या आणि मध्यम उद्योगांमध्ये गुंतवला जाईल, असंही वैष्णव यांनी सांगितलं.
एकीकृत परिवहन आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करण्यालाही आज
केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या बाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री
अश्विनी वैष्णव यांनी महिती दिली. ते म्हणाले -
बाईट - केंद्रीय माहिती आणि प्रसारण
मंत्री अश्विनी वैष्णव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारचे प्रमुख म्हणून पंचवीस
वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव आज केंद्रीय
मंत्रिमंडळानं पारित केला. मोदी यांनी सात ऑक्टोबर २००२ रोजी पहिल्यांदा गुजरातच्या
मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला आणि २०१४ मध्ये ते देशाचे पंतप्रधान झाले. सरकारचे
प्रमुख म्हणून ते उद्या पंचवीस वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत.
****
दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारची समिती
याच आठवड्यात सात ते आठ तारखेपर्यंत राज्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलतांना ही माहिती दिली. दुष्काळी भागातलं सर्वेक्षण
गतीने पूर्ण केलं जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले -
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
दरम्यान, दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ
उपसमितीची आज बैठक झाली. समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली
झालेल्या या बैठकीत शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देणाऱ्या बँकांवर कारवाई करणं, चाऱ्याची टंचाई दूर करणं आणि दिवाळीपूर्वी मदत वाटपाचं नियोजन करण्यासह अनेक महत्त्वपूर्ण
निर्णय घेण्यात आले.
****
पोलीस दलातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना साहसी कामगिरीसाठी
“मुख्यमंत्री शौर्य पदक” देण्याचा निर्णय आज सरकारनं घेतला. आज झालेल्या मंत्रिमंडळ
बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पन्नास हजार रुपये, पदक
तसंच प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असून, दरवर्षी
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे.
शैक्षणिक संस्थांमध्ये, उच्च
आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, संशोधनासाठी
सी.एम. सृष्टी अर्थात Scheme for Research, Innovations and
Technological Hubs in Higher Education Institutions ही
योजना राबवण्यास मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्यातली सर्व सार्वजनिक विद्यापीठं, शासकीय उच्च आणि तंत्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्रनिकेतनं
यासारख्या संस्थांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे.
पोलीस कोठडीतल्या मृत्युप्रकरणी नुकसानभरपाई देण्याबाबतच्या
धोरणाला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. वडार समाजाला पारंपरिक दगडफोडी आणि उत्खननातल्या
गौण खनिज स्वामित्व धनासाठी वाढीव सवलत देणं, महाराष्ट्र
जमीन महसूल नियम १९६८ मध्ये सुधारणा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजनेच्या भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं
मान्यता दिली.
****
एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना हटवणं
हे राज्य सरकारच्या अधिकारात नसल्याचा, मुख्यमंत्र्यांनी आज
पुनरुच्चार केला. ते आज मुंबई महापालिका मुख्यालयात ‘पार्टिसिपेट
मुंबई’च्या लोगोच्या अनावरणानंतर पत्रकारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांच्या रास्त मुद्यांबाबत
सरकार सकारात्मक आहे, मात्र या मुद्यावरून राजकारण केलं जात असल्याचं
मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
****
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा
राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार
यांनी केली आहे. ते नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान, एसआयआर प्रक्रियेतल्या कथित
त्रुटी आणि कथित मतचोरी विरोधात विरोधी पक्षांनी आज दिल्लीत मोर्चा काढला. या मोर्चाला
दिल्लीत आकाशवाणी भवनाजवळ सुरक्षा रक्षकांनी अडवलं. यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन
खरगे,
लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह अन्य विरोधी
पक्षांच्या खासदारांनी आकाशवाणी परिसरात प्रवेश केला. दरम्यान, गांधी यांच्यासह विरोधकांच्या या कृतीवर भारतीय जनता पक्षाकडून टीका करण्यात आली.
****
जागतिक बँकेनं चालू आर्थिक वर्षासाठीच्या, भारताच्या सकल घरगुती उत्पादन-जीडीपीच्या वृद्धिदराच्या अनुमानात वाढ करत, तो सात पूर्णांक एक टक्के राहील, असं म्हटलं आहे. हा दर
सहा पूर्णांक सहा टक्के राहील, असा अंदाज जागतिक बँकेनं याआधी एप्रिल महिन्यात वर्तवला होता. अपेक्षेहून अधिक
चांगली आर्थिक वाढ दिसल्यानंतर अनुमानात हा बदल करण्यात आला आहे.
****
हिंगोली फटाका दुर्घटनेतल्या जखमींना तातडीनं आवश्यक ते सर्वोत्तम
उपचार मिळावेत,
अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी ही माहिती दिली. या दुर्घटनेच्या चौकशीचे
तसंच निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाईचे निर्देशही झिरवाळ यांनी दिल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्याच्या परिवहन विभागानं बाईक टॅक्सी कंपन्या आणि चालकांना
त्यांच्या ताफ्यात पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यासाठी नऊ महिन्यांची मुदतवाढ
दिली आहे. यासंदर्भात सर्व आरटीओ आणि कंपन्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या
आहेत. दरम्यान,
अमराठी चालकांनी मराठी भाषा शिकण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी संवाद भाषा अभियानात’ सहभागी व्हावं, असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं दुष्काळग्रस्त
तालुक्यांतल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हिवाळी-२०२६ परीक्षेच्या परीक्षा शुल्कातून
सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. पात्र विद्यार्थ्यांनी विहित हमीपत्र सादर केल्यानंतर
त्यांना ही शुल्क माफीची सवलत मिळेल. दरम्यान, हिवाळी-२०२६
परीक्षेचे अर्ज येत्या १० ऑक्टोबरपर्यंत भरता येणार आहेत.
****
३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत बीड जिल्ह्याचा गावनिहाय पाणीटंचाई आराखडा
तयार करण्याच्या सूचना बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिल्या आहेत. दुष्काळ
आणि टंचाईच्या पार्श्वभूमीवर जॉन्सन यांनी आज विविध यंत्रणांची बैठक घेऊन परिस्थितीचा
आढावा घेतला,
त्यावेळी ते बोलत होते. तलावांमधला अनधिकृत पाणीउपसा रोखण्यासाठी
मोटारी हटवण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
****
जनता सहकारी बँकेच्या धाराशिव इथल्या शाखेने मुख्यमंत्री सहायता
निधीला पंचवीस लाख रुपयांचा निधी दिला आहे. यासोबतच कर्नाटक मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाही
या बँकेनं अकरा लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे.
दरम्यान, सेवा संकल्प अभियानांतर्गत धाराशिव
जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या निपाणी इथे पशुपालकांना आज विविध शासकीय योजनांची
माहिती देण्यात आली. चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्याचं प्रात्यक्षिकही पशुपालकांना दाखवण्यात
आलं.
****
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने तिन्ही
प्रकारांतल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. गुवाहाटी इथं झालेल्या बीसीसीआयच्या
आढावा बैठकीनंतर हरमनप्रीतने हा निर्णय जाहीर केला. कर्णधारपद सोडलं असलं तरी, हरमनप्रीत यापुढेही खेळाडू म्हणून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत देशाचं प्रतिनिधित्व
करणार आहे.
****
पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या
टी-२० क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज लखनौ इथं होणार आहे. संध्याकाळी
सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
बल्लारशाह स्थानकावरच्या काही कामांमुळे येत्या २५ ऑक्टोबर ते
२ नोव्हेंबर या कालावधीत मुंबई बल्लारशाह नंदिग्राम एक्सप्रेस ही रेल्वेगाडी मुंबई
ते अदिलाबाद आणि अदिलाबाद ते मुंबई अशी धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं
आहे.
****
No comments:
Post a Comment