▼

Sunday, 11 October 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 11 October 2026

Time 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळावी यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याची केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाची सूचना

·      दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

·      येत्या १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान राज्यव्यापी ‘आरोग्य संवाद यात्रेचं’ आयोजन

·      शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात

आणि

·      राज्यातल्या काही भागांत उद्यापर्यंत उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा इशारा

****

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी भरपाई दिवाळीपूर्वी मिळावी, यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून नुकसानीची अचूक नोंद घेण्याची सूचना, केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाचे प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी केली आहे. काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयात पीकस्थिती, पाणीटंचाई, भूजल पातळी, चारा उपलब्धता आणि शेतकरी मदत वितरणाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी यावेळी जिल्ह्यातल्या परिस्थितीचं सादरीकरण केलं. जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका आणि बाजरी या पिकांवर पावसाच्या खंडाचा मोठा परिणाम झाला असून, एकूण सात लाख ४२ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती केंद्रीय पथकाला देण्यात आली.

दरम्यान, या पथकानं काल बीड शहरालगत पाली इथल्या बिंदुसरा तलावाची पाहणी केली आणि उपलब्ध पाणीसाठा तसंच शहरासह परिसरातल्या पाणीपुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेतला. बिंदुसरा तलावात ३० जून २०२६ रोजी १७ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. सध्याच्या स्थितीत तो केवळ पाच टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षी याच धरणात १०० टक्के पाणीसाठा होता, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या पथकानं पालीच्या स्वयंचलित हवामान केंद्राला भेट देऊन यंत्रणेच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली.

बीड तालुक्यात मोरगाव परिसरात पाणीटंचाई, जलसंधारणाची कामं आणि शेतपिकांच्या नुकसानीची या पथकानं काल पाहणी केली. यावेळी मोरगाव इथल्या दराडे वस्तीवरील पाझर तलावाची तसंच परिसरातल्या विहिरींची पाहणी करून पाणी उपलब्धतेची स्थिती जाणून घेतली.

****

राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं, नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान लवकर सुरू होत असून, या पार्श्वभूमीवर काल मुंबईत झालेल्या जलसंधारण विषयक बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पाणी फाउंडेशनकडून अभिनेते आमीर खान तसंच सत्यजित भटकळ, यांच्यासह प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

****

पिकांच्या नुकसानीसाठी शासनाकडून थेट भरीव मदत देण्यासोबतच, पीक विमा कंपनीकडूनही जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. लातूर जिल्ह्यात काल दुष्काळ आणि पीक नुकसानाच्या पाहणी दौऱ्यात ते बोलत होते. एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. या दौऱ्यात पालकमंत्री भोसले यांनी अहमदपूर तालुक्यातल्या महादेववाडी, चाकूर तालुक्यातल्या आष्टा मोड, उदगीर तालुक्यातल्या शेकापूर तसंच जळकोट तालुक्यातल्या बेळसांगवी इथं पिकाच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

****

राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात सरकार चालढकल करत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसनं केला आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केला मात्र केंद्रीय पथकाची पाहणी, सर्वेक्षणं, पंचनामे इत्यादीमध्ये वेळकाढूपणा करत असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. काल जळगाव आणि धुळे जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. कुंभमेळ्यासाठीचे ३६ हजार कोटी रुपये, आणि शक्तीपीठ महामार्गासाठीचे ८० हजार कोटी रुपये हा निधी शेतकऱ्यांसाठी वापरावा आणि दसऱ्यापर्यंत दुष्काळग्रस्तांच्या खात्यात प्रत्येकी एक लाख रुपये जमा करावे अशी मागणी सपकाळ यांनी केली.

****

राज्यातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून येत्या एक नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत राज्यव्यापी ‘आरोग्य संवाद यात्रा’ आयोजित करण्यात येणार आहे. या अभियानात लोकसहभाग वाढवण्यासाठी जिल्हा, तालुका, महापालिका आणि ग्रामपातळीवरील आरोग्य समित्यांच्या बैठका स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार असून, सरकारच्या विविध योजना आणि सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा २५ वर्षांचा प्रवास ‘जनसेवा से देशसेवा’ या मंत्राने प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. तीन तलाक कायदा रद्दबातल ठरवणं, हा देखील याच प्रयत्नांचा भाग आहे. आज याविषयी जाणून घेऊ,

मुस्लिम महिलांच्या विवाहातील अधिकारांचे संरक्षण आणि तत्काळ तीन तलाकच्या प्रथेला कायदेशीर प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारनं मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण अधिनियम, २०१९’ लागू केला. ‘तलाक-ए-बिद्दत’ म्हणजे पतीने एकाच वेळी तीन वेळा तलाक उच्चारून तत्काळ आणि अपरिवर्तनीय घटस्फोट देण्याची पद्धत अवैध आणि बेकायदेशीर ठरविण्यात आली.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

या कायद्यात तीन तलाक देणाऱ्या पतीला कमाल तीन वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसंच, संबंधित मुस्लिम महिलेला स्वतःसाठी आणि तिच्या अवलंबित मुलांसाठी निर्वाह भत्ता मिळण्याचा आणि अल्पवयीन मुलांच्या ताब्याबाबत न्यायालयाकडून आदेश मिळण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या कायद्यामुळे मुस्लिम महिलांच्या जिवनात झालेल्या सकारात्मक बदलाबाबत विधिज्ञ गीता देशपांडे यांनी माहित दिली.

बाईट - विधिज्ञ गीता देशपांडे

****

शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. मराठवाड्यात तुळजापूर, माहूर, अंबाजोगाईसह आदिशक्तीच्या विविध मंदिरांमध्ये नवरात्राची तयारी पूर्ण झाली आहे. मंदिरांची रंगरंगोटी आणि सुशोभीकरणासह येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनरांगा, पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा आणि इतर व्यवस्थांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.

तुळजापूर इथं पहाटे देवी तुळजाभवानी मंचकी निद्रा पूर्ण करून सिंहासनारूढ झाली. नवरात्रोत्सवात तुळजाभवानी देवीची विविध अलंकार महापूजा बांधण्यात येते. माहूर इथं रेणुका माता मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन, गायन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आज पहाटे देवीची पूजा, अर्चा, अभिषेक करून घटस्थापना करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर इथं ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा परिसरातल्या तुळजाभवानी देवी मंदिरात देवीचे पुजारी तथा शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात येत आहे. जिल्ह्यात लासूर इथली दाक्षायणी देवी, महेशमाळ इथली गिरीजादेवी, जालना जिल्ह्यात अंबड इथली मत्स्योदरी देवी, आदी ठिकाणीही नवरात्राची तयारी पूर्ण झाली आहे.

****

बीड जिल्ह्यात शिरूर-कासार, पाटोदा आणि गेवराई तालुक्यांतल्या १०५ गावांचा पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात काल बैठक घेण्यात आली. पैठण इथल्या नाथसागर धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात योजनेचं सर्वेक्षण तर दुसऱ्या टप्प्यात कुटेवाडीमार्गे पाटोद्यापर्यंत पाणी आणून टँकर भरण्याची सुविधा उभारण्याचं या प्रस्तावात नियोजित आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत काल मराठवाडा विभागीय वक्तृत्व स्पर्धा पार पडली. स्पर्धेतल्या विजेत्यांना, ११ हजार रुपयांचं प्रथम पारितोषिक, सात हजार रुपयांचं द्वितीय, पाच हजार रुपयांचं तृतीय तर उत्तेजनार्थ २ हजार रुपये पारितोषिक देण्यात आलं.

****

जागतिक मानसिक आरोग्य दिन काल पाळण्यात आला. धाराशिव इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उप अधिष्ठाता डॉ. स्वाती पांढरे यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याचं कौतुक करून, शाळा महाविद्यालयं, कार्यालयं अशा ठिकाणी व्यापक प्रमाणात मानसिक आजाराविषयी जनजागृती करण्याचं आवाहन केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात करमाड इथल्या राज्यस्तरीय औषधी भांडार तसंच प्रशिक्षण केंद्राला, प्रभारी उपसंचालक डॉ. दयानंद मोतीपवळे यांनी काल भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रातल्या पायाभूत सुविधा आणि सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. केंद्राच्या इमारतीची सद्यस्थिती, उपलब्ध मूलभूत सुविधा, तसंच प्रभावी कार्यान्वयनासाठी आवश्यक बाबींची यावेळी त्यांनी पाहणी करत आवश्यक सूचना केल्या.

****

मुंबईसह कोकण, तसंच विदर्भासह राज्यातल्या काही भागांत उद्या १२ ऑक्टोबरपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अनेक शहरांमधलं तापमान ३७ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, ऑक्टोबर हिटमुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

****

No comments:

Post a Comment