▼

Monday, 12 October 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 12 October 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ ऑक्‍टोबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

शारदीय नवरात्रोत्सवाचा आज दुसरा दिवस असून, या दिवशी देवी दुर्गेच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते. देवी ब्रह्मचारिणला तपस्या, त्याग आणि संयमाचं प्रतीक मानलं जातं. देशभरातल्या मंदिरांमध्ये सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माँ ब्रह्मचारिणीला समर्पित भक्तिगीत शेअर केलं आहे. धैर्य, आत्मसंयम आणि दृढनिश्चयाचा आशीर्वाद मिळावा, अशी प्रार्थना त्यांनी या गीताच्या माध्यमातून केली आहे.

****

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विरोधी पक्षांनी आज सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर करण्यासाठी सरन्यायाधीश सूर्यकांत यांची भेट घेण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांनी ही विनंती नाकारली. संबंधित बाबी सर्वोच्च न्यायालयात आधीच न्यायप्रविष्ट असल्याचं त्यांनी ईमेलद्वारे स्पष्ट केलं असून, राहुल गांधी यांना न्यायालयीन प्रक्रियेद्वारे याचिका दाखल करण्याचा पर्याय दिला आहे.

दरम्यान, दिल्लीत प्रस्तावित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. संवेदनशील भागांत मोठ्या संख्येनं निमलष्करी दल तैनात करण्यात आलं आहे.

****

मुंबईसह महाराष्ट्राच्या विकासासाठी ब्लूमबर्गसोबतची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईत ब्लूमबर्गचे संस्थापक माईक ब्लूमबर्ग यांची भेट घेतली. त्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी या सहकार्याचं महत्त्व अधोरेखित केलं. मुंबई आणि न्यूयॉर्क या शहरांमध्ये अनेक समान वैशिष्ट्यं आहेत. ब्लूमबर्गसोबतच्या सहकार्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल. ही भागीदारी परिवर्तन घडवून आणणारी आणि ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात ब्लूमबर्गच्या योगदानाचंही कौतुक केलं. 

****

शेतकऱ्यांच्या कृषी कर्जाचं पुनर्गठन तसंच शेतीसंबंधित गरजांसाठी नवीन किंवा अतिरिक्त कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्यस्तरीय बँकर्स समितीनं बँकांना दिले आहेत. राज्य सरकारचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, राज्यस्तरीय बँकर्स समितीचे अध्यक्ष प्रभात किरण यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली काल पुण्यात झालेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले.

****

बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प यशस्वी सुरू करण्यात आला आहे. हे शेगाव मॉडेल आता राज्यातल्या इतर नगरपालिकांसाठी आदर्श ठरत आहे. शेगाव नगरपरिषदेनं घनकचरा व्यवस्थापनासाठी त्रिसूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे.  उगमस्थानीच शंभर टक्के वर्गीकरण, घंटागाड्यांचं काटेकोर नियोजन, ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करणं  यांचा यात समावेश आहे. या संपूर्ण प्रक्रियेत स्थानिक महिला बचत गटांना जोडण्यात आलं आहे. कचरा वर्गीकरण आणि खत निर्मितीच्या कामातून शेकडो  शाश्वत रोजगार मिळाला असून, आर्थिक स्वावलंबनाचं मॉडेल तयार झालं आहे.

****

वाढवण बंदर प्रकल्पातल्या भूसंपादन बाधित लाभार्थ्यांना भरपाईचं वितरण अधिक जलद, पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासनाने डिजिटल प्रणालीचा अवलंब केला आहे. कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते युनियन बँक ऑफ इंडियाच्या UniPayPlus प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. या प्रणालीद्वारे २८० लाभार्थ्यांच्या २३ कोटी ८० लाख रुपयांच्या भरपाई वितरण प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. या प्रणालीमुळे मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना भरपाईची रक्कम वितरित करणं अधिक सुलभ होणार आहे. तसचं व्यवहारांची अचूक नोंद, पारदर्शकता आणि सुरक्षितता राखण्यास मदत होणार असून, प्रशासकीय कामकाजावरील ताणही कमी होवू शकेल.

****

 

अहिराणी साहित्याच्या पुस्तकांच्या छपाईसाठी अडीच लाख रुपये आणि जिल्हा साहित्य संमेलनासाठी दरवर्षी पाच लाख रुपयांचं अतिरिक्त अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे पणन तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केली. धुळ्यात अहिराणी भाषा आणि साहित्य संवर्धन केंद्र उभारण्याचाही मानस त्यांनी व्यक्त केला. सहाव्या धुळे जिल्हा मराठी साहित्य संमेलन आणि अहिराणी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात वाचन, चिंतन आणि स्वतंत्र विचार जपण्याची गरज रावल यांनी व्यक्त केली.

****

जलजीवन अभियानाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या तीन गावांमध्ये नळपाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघांकडे देण्यात आली आहे. देशातला हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. तो यशस्वी झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली.

****

इजिप्तमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिधू यानं पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. अंतिम सामन्यात त्यानं २४० पूर्णांक ६ गुणांची कमाई केली.

****

No comments:

Post a Comment