▼

Wednesday, 14 October 2026

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 14 October 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १४ ऑक्टोबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनेला पुढील पाच वर्षांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी-रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय

·      राज्यात आणखी ४० तालुक्यात दुष्ळाळ जाहीर - मराठवाड्यातल्या सर्व तालुक्यांचा समावेश

·      दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अग्रीम पाच हजार रुपये मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

·      प्रदेश काँग्रेस कमिटीचा छत्रपती संभाजीनगर इथं जनआक्रोश दुष्काळ मोर्चा

आणि

·      छत्रपती संभाजीनगर एफडीआयकडून १३ हजार ७११ किलो तेलाचा साठा जप्त

****

राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनेला पुढील पाच वर्षांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. या कार्यक्रमासाठी ५३ हजार ४२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. देशातील सर्व ३६ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांतल्या सुमारे तीन कोटी २० लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

आयडीबीआय बँकेच्या पुनर्रचनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. पुनर्रचित बँकेत भारत सरकार आणि ‘लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया -LIC’ यांचा ३४ टक्के हिस्सा कायम राहील.

 

रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा कार्याधारित बोनस देण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ११ लाख ४० हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असल्याचं, वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले –

बाईट - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी कुमार वैष्णव

****

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाच हजार रूपयांची अग्रीम मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. राज्यातल्या आणखी ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, नव्यानं दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड आणि मुदखेड या दोन तालुक्यांचाही समाचेश करण्यात आला आहे, त्यामुळे मराठवाड्यातल्या सर्व तालुक्यांसह राज्यातल्या एकूण ३०४ तालुक्यात १२ दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले –

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पिण्याच्या पाण्यासाठी गरजेनुसार टँकरचा पुरवठा करण्यात येत असून टँकरवर जीपीएस ट्रॅकर लावण्यात आले आहेत. चाऱ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात येत असून जास्तीत जास्त चारा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. रबी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चारापिकं घेतल्यास सगळा चारा शासन हमीभावाने विकत घेईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये, अशी सक्त ताकीद संबंधित सोसायट्या, जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो-फायनान्स कंपन्यांना दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, राज्यातल्या छोट्या, चिंचोळ्या आकाराच्या, पोहोचण्याचा मार्ग नसलेल्या शासकीय भूखंड वितरणाच्या धोरणात सुधारणा करायला तसंच बुलडाणा जिल्ह्यात शेगाव इथं संत गजानन महाराज संस्थानाला मौजे गिरडा इथल्या जमिनीवर यात्रास्थळ विकासित करायला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून २५ वर्षं पूर्ण केल्यानिमित्त राज्य सरकारने त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही बैठकीत मंजूर केला.

****

राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीपूर्वी शासनाकडून भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज ही माहिती दिली. यासाठी ४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यात एक लाख आठ हजार ६२७ अंगणवाडी सेविका आणि एक लाख पाच हजार ४७० अंगणवाडी मदतनीस कार्यरत आहेत.

****

प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर इथं जनआक्रोश दुष्काळ मोर्चा काढण्यात आला. क्रांतीचौक परिसरातून निघालेला हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर जाहीर सभेत विसर्जित झाला. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी डॉक्टर सिरीवल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, यांच्यासह विभागातले लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच शेतकरी आणि महिला या मोर्चात सहभागी झाले होते. सरसकट शंभर टक्के  कर्जमाफी, जीवनावश्यक वस्तूंच्या भावात स्थैर्य, पेयजल, चारा, रोजगार, आदी मागण्या त्वरित पूर्ण झाल्या पाहिजे अशी अपेक्षा खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी यावेळी व्यक्त केली.

****

दिल्लीच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयानं आज कॉक्रोच जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली, तर अजिंक्य शिंदे यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली. आंदोलनस्थळ म्हणून जंतर मंतरचा दर्जा काढून घेतल्यानंतरही हे सर्व जण तिथे जाण्याचा प्रयत्न करत होते, या कारणावरून त्यांना अटक करण्यात आली होती.

****

नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज शेषराव ऊर्फ राज सूर्यवंशी याच्या विरोधात दिल्ली न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केलं. नांदेडचा रहिवासी असलेला शेषराव हा नीट पेपरफुटी प्रकरणात सह-आरोपी शुभम खैरनार याचा सहकारी असल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. शेषराव याच्यावर नीटची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या पालकांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे.

****

बाललैंगिक शोषणाच्या चित्रफिती सामाजिक संपर्क माध्यमांवर व्हायरल प्रकरणी, राज्याच्या सायबर सुरक्षा विभागाच्या सूचनेनुसार नाशिक पोलिसांनी २३ आयडीधारक, प्रोफाइलधारक आणि मोबाइलधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ११ नोव्हेंबर २०२४ ते १३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हे व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

****

भारतीय कापूस महामंडळ-सीसीआयच्या वतीनं खरीप हंगाम २०२६-२७ साठी किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत उद्या १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे. यासाठी अकोला जिल्ह्यातील जिनिंग-प्रेसिंग केंद्रांचे  पॅनेल निश्चित करण्यात आले असून, खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी करण्याच्या सूचना सीसीआयने दिल्या आहेत. नोंदणी पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ आहे. यंदा सीसीआयकडून शेतकऱ्यांचा कापूस थेट खरेदी केला जाणार आहे.

****

राज्यातल्या कंत्राटदारांनी, थकीत देयकांसाठी, येत्या १९ तारखेला आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर या दिवशी मोर्चे काढले जाणार आहेत. राज्य सरकारनं कंत्राटदारांची सुमारे ९६ हजार कोटी रुपयांची देणी थकवली असल्याचा आरोप राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी इथं एका ऑईल कंपनीवर काल अन्न आणि औषध प्रशासनानं धडक कारवाई करत १३ हजार ७११ किलो तेलाचा साठा जप्त केला. याची बाजारातील अंदाजे किंमत २६ लाख ७८ हजार आहे. अन्न आणि औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी पी. एस. कुचेकर यांच्या पथकानं ही कारवाई केली.

****

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महिलांनी खचून न जाता सक्षमपणे कुटुंब व्यवस्था सांभाळावी आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य आणि महिला बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं आहे. तुळजापूर शक्तीपीठ ते माहूर भक्तीपीठ यादरम्यान सेवा संकल्प अभियानांतर्गत धाराशिव इथं नारीशक्ती संवाद कार्यक्रमात त्या आज बोलत होत्या. महिला आणि मुलींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसंच मुलींचे शिक्षण या काळात बंद पडू नये यासाठी आपलं सरकार काळजी घेणार असल्याचं मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाई निवारणार्थ ग्रामपंचायतनिहाय सूक्ष्म नियोजन करून कृती आराखडा तातडीने सादर करावा, असे निर्देश छत्रपती संभाजीनगर चे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबतच्या आढावा बैठकीते त्यांनी हे निर्देश दिले.

****

औरंगाबाद पदवीधर निवडणूकीत भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचं पालन करावं असं  आवाहन निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केलं आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमविषयक निर्देशांनुसार प्रचारासाठी चित्रफिती तयार करण्याबाबत छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते.

****

No comments:

Post a Comment