Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 30 May
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ३० मे
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
परभणी तालुक्यातील ९ मंडळ अधिकारी
आणि ५२ ग्राम महसूल अधिकाऱ्यांना अत्याधुनिक लॅपटॉप आणि प्रिंटरचे वितरण करण्यात आलं.
उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या हस्ते हा वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
नव्याने मिळालेल्या संगणकीय सुविधांमुळे महसूल विभागाचे कामकाज अधिक वेगवान, पारदर्शक आणि कार्यक्षम होईल, विशेषतः ई-फेरफार, ई-चावडी, ई-पीक पाहणी आदी सुविधा नागरिकांनी सुलभपणे उपलब्ध करून देता येतील.
****
कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच
तृतीयपंथीयांच्या एका पथकाला आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं जात आहे. जिल्हाधिकारी
डॉ. विजय राठोड आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली
राष्ट्रीय स्तरावरचा हा अशा प्रकारचा पहिलाच नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. फक्त भिक्षा
मागणं किंवा शरीर विक्रय करणं ह्या दोनच गोष्टी तृतीय पंथी करत आले आहेत, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या उपक्रमामुळे हातभार लागेल असं
संकपाळ यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं.
****
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या
प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कृती दल
गठीत करण्यात आलं असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा
पाटील यांनी दिली आहे. या दलामार्फत पदवी अभ्यासक्रमातील चौथ्या वर्षाची रचना, OJT/Internship संदर्भातील कार्यपद्धती, विद्यार्थ्यांच्या अडचणींसाठी मदत कक्ष, तसेच शिक्षक प्रशिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर धोरणात्मक मार्गदर्शन
करण्यात येणार आहे. याशिवाय, राज्यातील सर्व विद्यापीठे
आणि स्वायत्त महाविद्यालयांमधील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचा नियमित
आढावा घेऊन आवश्यक त्या शिफारसी हे दल शासनास सादर करेल. ही समिती दर तीन महिन्यांनी प्रगती अहवाल सादर करणार
आहे. राज्यातील उच्च शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित, संशोधनाभिमुख आणि विद्यार्थी-केंद्रित करण्याच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण निर्णय
घेण्यात आल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या
नाशिक शाखेतर्फे देण्यात येणारा वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार नाट्य लेखक अभिराम
भडकमकर यांना तर वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार महेश मांजरेकर यांना देण्यात येणार
आहे. सन्मानपत्र आणि ३१ हजार रुपये असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे, यंदाचा बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार नाशिकचे सुनील देशपांडे यांना जाहीर
करण्यात आला. सन्मानपत्र आणि १५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. जून अखेरीस
हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
****
पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील
दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही, असं उपमुख्यमंत्री
सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे
आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या
प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह ८ जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे
याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या काठावर पवनी आणि अड्याळ पोलिसांनी कारवाई करत
अवैध हातभट्टी दारू अड्डा उध्वस्त केला, या अड्ड्यावरुन
जवळपास १ लाख ७० हजार रुपये किमतीचा मोहफुल सडवा नष्ट केल्याचं आमच्या वार्ताहरानं
सांगितलं.
****
यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत
होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90 टक्केच पडेल, असा अंदाज भारतीय
हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदाच्या मान्सूनच्या दीर्घकालीन अंदाजाविषयी विभागाचे
संचालक डॉ. मृत्यूंजय मोहपात्रा यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना ही माहिती दिली.
एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची
शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल, तर देशाच्या मध्य आणि वायव्य भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं
त्यांनी सांगितलं. जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं
वर्तवली आहे.
****
भारतीय महिला क्रिकेट संघाचा
टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज इंग्लंडमध्ये ब्रिस्टॉल इथं खेळवला जाणार आहे. भारतीय
वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या
सामन्यात भारताने चेम्सफर्ड इथं इंग्लंडचा ३८ धावांनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी
घेतली आहे. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना 2 जून रोजी टॉंटन इथं खेळवला जाणार
आहे. दरम्यान, 12 जूनपासून इंग्लंडमध्ये ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारताचा विश्वचषकातील
पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार
आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ८ जून रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध आणि १० जून रोजी इंग्लंडविरुद्ध
कार्डिफ येथे सराव सामने खेळणार आहे.
****
कर्णधार शुभमन गिलच्या झंझावाती
शतकी खेळीच्या बळावर गुजरात टायटन्सने आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक
मारली आहे. काल न्यू चंदीगड इथं झालेल्या सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्स संघाचा
सात गडी राखून पराभव केला.
****