Thursday, 1 October 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 01 October 2026

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०१ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      रबी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

·      पाण्याच्या काटेकोर नियोजनाचे पाणीपुरवठा मंत्र्यांचे निर्देश-जलसंपदा मंत्र्यांचीही आढावा बैठक

·      राज्य लोकसेवा आयोगाच्या उमेदवार विद्यार्थ्यांचं उद्याचं प्रस्तावित आंदोलन स्थगित

·      ४६ वं मराठवाडा साहित्य संमेलन बीड जिल्ह्यात बनसारोळा इथं जाहीर

·      आशियाई क्रीडा स्पर्धेत आणखी चार सुवर्णपदकांसह भारताची आठव्या क्रमांकावर झेप

आणि

·      वेस्ट इंडिजवर आठ गडी राखून मात करत भारताची एकदिवसीय क्रिकेट मालिकेत विजयी आघाडी

****

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने रबी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे देशभरातल्या लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. करडईच्या किमान आधारभूत मूल्यात प्रति क्विंटल ६७५ रुपयांची सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. मोहरी आणि खसखशीच्या किमान आधारभूत मूल्यात प्रति क्विंटल ४१३ रुपये, मसूरसाठी प्रतिक्विंटल ३९० रुपये, बार्ली १३६ रुपये, हरभरा ८३ रुपये आणि गव्हासाठी प्रतिक्विंटल २५ रुपये इतकी किमान आधारभूत मूल्यातील वाढ करण्यात आल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलतांना वैष्णव म्हणाले...

बाईट -  माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

 

केंद्रीय मंत्रिमंडळाने कालच्या बैठकीत 'ग्रीन एनर्जी कॉरिडॉर' हरित ऊर्जा मार्गिकेच्या तिसऱ्या टप्प्यालाही मंजुरी दिली. यामुळे आंतरराज्य पारेषण यंत्रणा बळकट होईल आणि विविध राज्ये तसंच केंद्रशासित प्रदेशांदरम्यान १३५ गिगावॅटपर्यंतच्या अक्षय ऊर्जेचे पारेषण करणं शक्य होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

केंद्र सरकारने प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट ऍव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच CAFE मानकांची अधिसूचना जारी केली आहे. या मानकांनुसार हलक्या वजनी वाहनांपेक्षा अवजड वाहनांना इंधन कार्यक्षमतेच्या अधिक काटेकोर अटी लागू होतील. ही नवी मानकं एप्रिल-२०२७ पासून ३१ मार्च २०३२ पर्यंत लागू असतील.

****

संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे विभागात संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने काल मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.  सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून अनधिकृत पाणी उपसा तातडीने रोखण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

**

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची आढावा बैठक घेतली. विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेऊन, कामातले अडथळे तातडीने दूर करून प्रकल्पांच्या कामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ज्या-ज्या धरणात पिण्याचं मुबलक पाणी असेल अशा धरणातल्या पाण्याच्या नियोजनाचा निर्णय घेणार असल्याचं, विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

****

 

 

सर्व प्रकारच्या दस्त नोंदणीसाठी आधार ओळखपत्र महसूल विभागाने अनिवार्य केलं आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. मालमत्ता खरेदी विक्रीतली फसवणूक टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, आजपासून याची अंमलबजावणी होणार आहे.

****

तरुणांचं संशोधन राज्याला जगाचं 'इनोव्हेशन हब' करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत ‘द गव्हर्नन्स चॅलेंज’ स्पर्धेच्या विजेत्यांना काल पारितोषिकं प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ही स्पर्धा म्हणजे देशाच्या भावी प्रशासकीय रचनेला आकार देणाऱ्या प्रतिभा आणि कल्पना शोधण्याचा उपक्रम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

****

राज्य लोकसेवा आयोगाच्या उमेदवार विद्यार्थ्यांनी उद्याचं प्रस्तावित आंदोलन स्थगित केलं आहे. काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर विद्यार्थ्यांनी हा निर्णय जाहीर केला. आयोगाच्या अध्यक्षांना हटवण्याचा अधिकार राज्य सरकार किंवा राज्यपालांना नाही, याबाबत तीन महिन्यात न्यायालयीन चौकशी करून त्या निष्कर्षाच्या आधारावर कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. याशिवाय आयोगाच्या सचिवांची बदली करण्याचं, तसंच परीक्षा पद्धतीत विद्यार्थी घटकांशी चर्चा केल्याशिवाय निर्णय न घेण्याचं आश्वासनही देत, आयोगामार्फत विक्रमी पदभरतीची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

****

मराठवाडा साहित्य परिषदेचं ४६ वं मराठवाडा साहित्य संमेलन बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात बनसारोळा इथं श्री बनेश्वर शिक्षण संस्थेत होणार आहे. तर दुसऱ्या बालकुमार साहित्य संमेलनासाठी गेवराई इथल्या बालग्राम परिवाराच्या निमंत्रणाचा कार्यकारिणीने स्वीकार केला आहे. परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी काल ही घोषणा केली. दोन्ही संमेलनाच्या तारखा लवकरच निश्चित करण्यात येणार आहेत.

****

सेवा संकल्प अभियानांतर्गत काल जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयात योग आणि ध्यान शिबिर घेण्यात आलं. योगसाधक प्रल्हाद हरबक यांनी योग, प्राणायाम आणि ध्यानाचं शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेलं महत्त्व सांगितलं. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचं प्रात्यक्षिक केलं.

**

सेवा संकल्प अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या भीमनगर आरोग्य केंद्रात काल रक्तदान शिबीर घेण्यात आलं. यात २२ जणांनी रक्तदान केलं.

****

३३ वर्षांपूर्वी झालेल्या किल्लारी भूकंपात दगावलेल्या नागरिकांना काल लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. किल्लारी इथं स्मृतीवनातल्या स्मृतीस्तंभाला जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी पुष्पचक्र अर्पण केलं. यावेळी पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून अभिवादन करण्यात आलं. किल्लारीसह भूकंपग्रस्त गावांमध्ये काल काळा दिवस पाळण्यात आला.

****

जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने काल चार सुवर्ण पदकांची कमाई केली. तीरंदाजीत ज्योती सुरेखा वेण्णम, चिकिता तनिपार्थी आणि प्रथिका प्रदीप यांच्या संघाने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. साहिल जाधव-चिकिता तनिपार्थी यांच्या मिश्र कंपाउंड जोडीनेही सुवर्ण पदक पटकावलं. तिरंदाजीत पुरुषांच्या कंपाउंड संघाने देखील सुवर्ण पदक पटकावलं. नेमबाजीत ट्रॅप मिश्र प्रकारात नीरु धांडा आणि चिनान केनाई यांच्या जोडीने सुवर्ण पदक जिंकलं.

मुष्टियुद्धात प्रिया घंघास, नरेंद्र बेरवाल आणि कपिल पोखरिया यांनी कांस्य पदकांची कमाई केली. कुस्तीमध्ये पुरुषांच्या ८७ किलो वजनी गटात सुनिल कुमारने कांस्य पदक जिंकलं. स्क्वॅशमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे.

भारत आता या स्पर्धेत दहा सुवर्ण, २१ रौप्य आणि २९ कांस्य पदकांसह ६० पदकं जिंकून आठव्या स्थानावर पोहोचला आहे. 

****

गुवाहाटी इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर आठ गडी राखून विजय मिळवला. या विजयासोबतच भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. कालच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाने प्रथम फलंदाजी करत ४०६ धावांचं आव्हान दिलं. भारतीय संघाने कर्णधार शुभमन गीलच्या द्विशतकी आणि रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या बळावर ४४व्या षटकात हे लक्ष्य साध्य केलं. १३३ चेंडूत नाबाद २२३ धावा करणारा शुभमन सामनावीर ठरला. मालिकेत तिसरा आणि अखेरचा सामना शनिवारी चंदीगड इथं खेळवला जाणार आहे

****

आगामी काळात चाराटंचाईची शक्यता पाहता, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाने जनावरं आणि उपलब्ध चारा साठ्याचं सर्वेक्षण सुरू केलं आहे. लातूर जिल्ह्यातही चारा वाहतुकीला जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. इतर उपाययोजनांचंही सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ निवारण कक्ष अर्थात ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात आली आहे.

दरम्यान, लातूर शहरात आता सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. मांजरा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा नसल्याने, उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

काँग्रेसच्या नॅशनल स्टूडेंट्स युनियन ऑफ इंडियाच्या वतीने काल छत्रपती संभाजीनगर इथं कथित मतचोरी, तसंच निवडणूक प्रक्रियेतल्या पारदर्शकतेच्या मुद्द्यांवर मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाईसह विविध मागण्यांसाठी डाव्या आघाडीच्या वतीने काल छत्रपती संभाजीनगर इथं निदर्शनं करण्यात आली.

****

Wednesday, 30 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.09.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 September 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० सप्टेंबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      रबी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

·      प्रवासी वाहनांसाठी केंद्राकडून नवीन कॉर्पोरेट ऍव्हरेज फ्युएल इकॉनॉमी अधिसूचना जारी

·      पाण्याच्या काटेकोर नियोजनाचे पाणीपुरवठा मंत्र्यांचे निर्देश-जलसंपदा मंत्र्यांचीही आढावा बैठक

·      दुष्काळी तालुक्यात १०वी तसंच १२वीच्या विद्यार्थ्यांचं आगामी परीक्षांचं शुल्क माफ

·      किल्लारी भूकंपात दगावलेल्या नागरिकांना लातूर जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन

आणि

·      आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची आज चार सुवर्ण पदकांची कमाई

****

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने रबी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मंजुरी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर नवी दिल्ली इथं बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. करडईच्या किमान आधारभूत मूल्यात प्रति क्विंटल ६७५ रुपयांची सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. मोहरी आणि खसखशीच्या किमान आधारभूत मूल्यात प्रति क्विंटल ४१३ रुपये, मसूरसाठी प्रतिक्विंटल ३९० रुपये, बार्ली १३६ रुपये, हरभरा ८३ रुपये आणि गव्हासाठी प्रतिक्विंटल २५ रुपये इतकी किमान आधारभूत मूल्यातील वाढ करण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले –

बाईट - माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

 

केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘ग्रीन एनर्जी कॉरिडॉर’ हरित ऊर्जा मार्गिकेच्या तिसऱ्या टप्प्यालाही मंजुरी दिली. यामुळे आंतरराज्य पारेषण यंत्रणा बळकट होईल आणि विविध राज्ये तसंच केंद्रशासित प्रदेशांदरम्यान १३५ गिगावॅटपर्यंतच्या अक्षय ऊर्जेचे पारेषण करणं शक्य होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

केंद्र सरकारने प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट ऍव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच C A F E मानकांची अधिसूचना जारी केली आहे. देशातंर्गत उत्पादित प्रवासी वाहनं तसंच विक्रीसाठी आयात केलेल्या वाहनांनासुद्धा ही मानकं लागू असतील. या मानकांनुसार हलक्या वजनी वाहनांपेक्षा अवजड वाहनांना इंधन कार्यक्षमतेच्या अधिक काटेकोर अटी लागू होतील. ही नवी मानकं एप्रिल-२०२७ पासून आताच्या मानकांची जागा घेतील आणि ती ३१ मार्च २०३२ पर्यंत लागू असतील.

****

एसआयआर अर्थात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित अनियमिततेसंदर्भात आज इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष इत्यादी पक्षांचे नेते उपस्थित होते.

****

दरम्यान, शुद्ध मतदार यादी हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं, केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या विरोधात असलेल्या विरोधकांच्या भूमिकेसंदर्भात आज नवीदिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मतदार यादीचं शुद्धीकरण करण्यास आक्षेप घेण्याचं कारण काय, असा प्रश्न चौहान यांनी विचारला –

बाईट - केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान

****

संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे विभागातील संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने आज मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून अनधिकृत पाणी उपसा तातडीने रोखण्याचे निर्देशही मंत्र्यांनी दिले.

 

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची आढावा बैठक घेतली. विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेऊन, कामातले अडथळे तातडीने दूर करून प्रकल्पांच्या कामांना गती देण्याच्या सूचना विखे पाटील यांनी दिल्या. ज्या ज्या धरणात पिण्याचे मुबलक पाणी असेल अशा धरणातील पाण्याच्या नियोजनाचा निर्णय घेणार असल्याचं, विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

****

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा अशी मागणी काँग्रेसचे नाना पटोले यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते. दुष्काळी परिस्थिती, ढासळलेली कायदा-सुव्यवस्था, निवडणूक आयोगाची भूमिका आणि सचिन वाझे यांच्या जामीन प्रकरणावरून पटोले यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

****

दरम्यान, अँटिलीया बॉम्ब प्रकरणात सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता स्थगित केला आहे. विशेष न्यायालयानं वाझे याला जमीन मंजूर केला होता, परंतु राष्ट्रीय तपास संस्थेच्या वतीनं या जामिनाला आव्हान दिलं होतं.

****

तरुणांचं संशोधन राज्याला जगाचं ‘इनोव्हेशन हब’ करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत ‘द गव्हर्नन्स चॅलेंज’ स्पर्धेच्या विजेत्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ही स्पर्धा म्हणजे राज्यासह देशाच्या भावी प्रशासकीय रचनेला आकार देणाऱ्या प्रतिभा आणि कल्पना शोधण्याचा उपक्रम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

****

राज्यातल्या दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांमधल्या १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांचं आगामी फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या परीक्षांचं शुल्क माफ करण्यात आलं आहे. या विद्यार्थ्यांकडून शुल्क न घेता परीक्षा अर्ज भरून घेण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळाने सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत. सर्व विभागीय मंडळांनी आपापल्या कार्यक्षेत्रात दुष्काळग्रस्त तालुक्यांतल्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तत्काळ सूचना द्याव्या, आणि कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे तातडीने सादर करावा असे निर्देशही देण्यात आले आहेत.

****

किल्लारी भूकंपात दगावलेल्या नागरिकांना आज लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या या प्रलयकारी भूकंपाला आज ३३ वर्षे झाली. किल्लारी इथं स्मृतीवनातल्या स्मृतीस्तंभाला जिल्हाधिकारी डॉ.भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी पुष्पचक्र अर्पण केलं. यावेळी पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून अभिवादन करण्यात आलं. किल्लारीसह भूकंपग्रस्त गावांमध्ये आज काळा दिवस पाळण्यात आला.

****

जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आज चार सुवर्ण पदकांची कमाई केली. तीरंदाजीत ज्योती सुरेखा वेण्णम, चिकिता तनिपार्थी आणि प्रथिका प्रदीप यांच्या संघाने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. साहिल जाधव-चिकिता तनिपार्थी यांच्या मिश्र कंपाउंड जोडीनेही सुवर्ण पदक पटकावलं. तिरंदाजीत पुरुषांच्या कंपाउंड संघाने देखील सुवर्ण पदक पटकावलं. नेमबाजीत ट्रॅप मिश्र प्रकारात नीरु धांडा आणि चिनान केनाई यांच्या जोडीने सुवर्ण पदक जिंकलं.

मुष्टियुद्धात महिलांच्या ६० किलो वजनी गटात प्रिया घंघासने कांस्य पदक जिंकलं. ७५ किलो वजनी गटात लव्हलिना बोर्गोहेन हिने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

स्क्वॅशमध्ये महिला संघाने सिंगापूरचा दोन - शून्य असा पराभव करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला. कुस्तीमध्ये पुरुषांच्या ८७ किलो वजनी गटात सुनील कुमारने कांस्यपदक जिंकलं. शंभर मीटर रिले स्पर्धेतही भारताच्या मिश्र संघाने कांस्यपदक पटकावलं.

भारत आता या स्पर्धेत दहा सुवर्ण, २१ रौप्य आणि २९ कांस्य पदकांसह ६० पदकं जिंकून आठव्या स्थानावर पोहोचला आहे. 

****

मराठवाडा साहित्य परिषदेचं ४६वं मराठवाडा साहित्य संमेलन बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात बनसारोळा इथे श्री बनेश्वर शिक्षण संस्थेत होणार आहे. तर दुसऱ्या बालकुमार साहित्य संमेलनासाठी गेवराई इथल्या बालग्राम परिवाराच्या निमंत्रणाचा कार्यकारिणीने स्वीकार केला आहे. परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी आज या दोन्ही संमेलनाची घोषणा केली. दोन्ही संमेलनाच्या तारखा लवकरच निश्चित करण्यात येणार आहेत.

****

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले इथं मोर्चा काढण्यात आला, राज्यात या मागणीसाठी सर्वत्र आंदोलन करण्यात आल्याची माहिती डॉ अजित नवले यांनी दिली.

****

लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यात वलांडी इथं अवैध सावकारीविरोधात सहकार विभाग आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई केली. पांडुरंग पांचाळ हे अवैध सावकारी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तीन ठिकाणी धाडी टाकत कारवाई केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

****

सेवा संकल्प अभियानांतर्गत आज जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयात योग आणि ध्यान शिबिर घेण्यात आलं. योगसाधक प्रल्हाद हरबक यांनी योग, प्राणायाम आणि ध्यानाचं शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेलं महत्त्व सांगितलं. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचे प्रात्यक्षिक केलं.

****

‘सेवा संकल्प अभियान-२०२६’ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या भीमनगर आरोग्य केंद्रात आज रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या शिबीरात २२ जणांनी रक्तदान केलं.

****

हवामान

कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उद्याही या भागात  सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.09.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 30 September 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.

****

जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आज चार सुवर्ण पदकांची कमाई केली. तिरंदाजीत ज्योती सुरेखा वेण्णम, चिकिता तनिपार्थी आणि प्रथिका प्रदीप यांच्या संघाने चीनचा २३८-२३४ असा पराभव करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तसंच साहिल जाधव-चिकिता तनिपार्थी यांच्या मिश्र कंपाउंप जोडीनेही दक्षिण कोरियाचा पराभव करत सुवर्ण पदक पटकावलं. तिरंदाजीतच पुरुषांच्या कंपाउंड संघाने देखील सुवर्ण पदक पटकावलं. साहिल, गणेश मनिरत्नम आणि कुशल दलाल यांच्या संघाने चीन चा पराभव करत ही कामगिरी केली.

नेमबाजीत ट्रॅप मिश्र प्रकारात नीरु धांडा आणि चिनान केनाई यांच्या जोडीने कतारचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकलं.

मुष्टियुद्धात महिलांच्या ६० किलो वजनी गटात प्रिया घंघासने कांस्य पदक जिंकलं. ७५ किलो वजनी गटात लव्हलिना बोर्गोहेन हिने अंतिम फेरीत धडक मारली. उपांन्त्य फेरीत तिने कझाकिस्तानच्या खेळाडुचा पराभव केला.

स्क्वॅशमध्ये महिला संघाने सिंगापूरचा दोन - शून्य असा पराभव करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला. कुस्तीमध्ये पुरुषांच्या ८७ किलो वजनी गटात सुनील कुमारनेही उपान्त्य फेरी गाठली.

भारत आता या स्पर्धेत दहा सुवर्ण, २१ रौप्य आणि २७ कांस्य पदकांसह ५८ पदकं जिंकून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. 

****

दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी तिरंदाजीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. संघाच्या उत्कृष्ट कामगिरीने जगाला भारताचं ध्येयावरील अचूक लक्ष आणि दबावाखाली जिंकण्याचा दृढनिश्चय दाखवून दिला आहे असं शाह यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनीही पदक विजेत्या खेळाडुंचं अभिनंदन केलं आहे.

****

अचूक आणि अद्ययावत मतदार यादी हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. मतदार यादीत चुकीची किंवा अपात्र नावे समाविष्ट झाल्यास निवडणूक प्रक्रियेच्या अखंडतेवर परिणाम होऊ शकतो. मतदार यादीतील अनियमिततेच्या विरोधकांच्या आरोपांवर चौहान यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत दिवंगत व्यक्तींची नावे मतदार यादीतून वगळण्यास कोणताही आक्षेप नसावा असं स्पष्ट केलं.

****

महाज्योतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि पीएच.डी. फेलोशिपचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळावा, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश महसूल मंत्री आणि ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. मुंबईत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ‘महाज्योती’मार्फत आतापर्यंत सुमारे ९ हजार ८०० विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षण देण्यात आलं आहे. चालू वर्षात सुमारे २ हजार विद्यार्थ्यांना यूपीएससी आणि एमपीएससी प्रशिक्षण, तर ८ हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. प्रलंबित असलेल्या सुमारे १२६ कोटी रुपयांच्या देयकांसह प्रशिक्षण आणि फेलोशिपसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याबाबत संबंधित विभागांनी परस्पर समन्वयानं कार्यवाही करावी, असे निर्देश बावनकुळे यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण आणि शैक्षणिक योजनांमध्ये निधीअभावी अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी आवश्यक नियोजन करण्यावर त्यांनी भर दिला.

****

भारतीय तटरक्षक दलाने गुजरात एटीएसच्या समन्वयाने लक्षद्वीपच्या पश्चिमेकडील अरबी समुद्रात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई केली. या कारवाईत सुमारे ५२६ किलो हेरॉईन आणि मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत तीन हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. याप्रकरणी नौकेवरील पाच पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं.

****

परभणी पोलिसांनी आंतरराज्यीय साखळी चोरांचा पर्दाफाश केला आहे. चोरांनी साखळी ओढून नेल्याच्या एका प्रकरणाचा तपास करत असतांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उत्तर प्रदेशातल्या अंतरराज्यीय आरोपीचा माग लागला. दोन आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून जवळपास १ लाख ६० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. एक आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.

****

आगामी सण उत्सवांच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत दक्षिण मध्य रेल्वे काही विशेष गाड्या चालवणार आहे. यामध्ये नांदेड-दिल्ली-नांदेड, जालना-छपरा-जालना आणि नांदेड-उधना-नांदेड या गाड्यांचा समावेश आहे.

दरम्यान, हडपसर-घोरपडी दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामामुळे बीडहून पुणे जंक्शनला जाणारी आणि पुणे जंक्शनहून बीडला येणारी रेल्वेसेवा तीन ऑक्टोबरला रद्द करण्यात आली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळच्या श्री घृष्णेश्वर मंदिर वेरूळ विकास आराखड्यांतर्गत मंदिरासमोरच्या खुलताबाद जंक्शन ते वेरुळ या मार्गावर भुयारी मार्गाचं बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी या मार्गावरची सर्व जड वाहतूक येत्या २९ मार्च २०२७ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्रभारी पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी दिले आहेत.

****


आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.09.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 30 September 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० सप्टेंबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आज तीरंदाजीत दोन सुवर्ण पदकांची कमाई केली. महिला कंपाउंड सांघिक प्रकारात ज्योती सुरेखा वेण्णम, चिकिता तनिपार्थी आणि प्रथिका प्रदीप यांच्या संघाने चीनचा २३८-२३४ असा पराभव करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तसंच साहिल जाधव-चिकिता तनिपार्थी यांच्या मिश्र कंपाउंप जोडीनेही दक्षिण कोरियाचा पराभव करत सुवर्ण पदक पटकावलं.

स्क्वॅशमध्ये महिला संघाने सिंगापूरचा दो - शून्य असा पराभव करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला. कुस्तीमध्ये पुरुषांच्या ८७ किलो वजनी गटात सुनील कुमारनेही उपान्त्य फेरी गाठली.

भारत आता या स्पर्धेत आठ सुवर्ण, २१ रौप्य आणि २६ कांस्य पदकांसह ५५ पदकं जिंकून दहाव्या स्थानावर आहे. 

****

विकसित भारताच्या जडणघडणीत आशय निर्मिती क्षेत्र आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका महत्त्वाची असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ‘यूट्यूब इम्पॅक्ट समिट २०२६’ला संबोधित करताना ते काल बोलत होते. देशाच्या आर्थिक विकासाला, रोजगाराला आणि जागतिक स्तरावर सांस्कृतिक प्रसाराला चालना देण्यात भारताच्या डिजिटल आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेची भूमिका वाढत असल्याचं मुरुगन यांनी अधोरेखित केलं. युवा आशय निर्मात्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग नवोन्मेष आणि सक्षमीकरणाचं साधन म्हणून करावा, असं आवाहन त्यांनी केलं.

****

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या उद्दिष्टात सर्वांगीण आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांची निर्मिती करावी, असं प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केलं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं अभियंता दिन २०२६ निमित्त गेल्या दोन वर्षांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांचा काल मुंबईत गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्याच्या आर्थिक विकासासाठी सक्षम पायाभूत सुविधांची आवश्यकता असून, सार्वजनिक बांधकाम विभागानं दर्जा, वेळ आणि कार्यक्षमता यांना प्राधान्य देत काम करावं, असंही त्यांनी नमूद केलं.

****

विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या नागरिकांना आवश्यक ओळखपत्रं तसंच प्रमाणपत्रं सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता विशेष  अभियानांतर्गत ‘भटके-विमुक्त हक्क आणि प्रमाणपत्र अभियान’ राबवण्यात आलं. याशिवाय ‘सेवा संकल्प अभियानात आतापर्यंत राज्यभर चार हजार ५८९ प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांचं वितरण करण्यात आल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. राज्यभरात याअंतर्गत ९८ ठिकाणी विशेष शिबिरं घेण्यात आली.

****

नाशिकमध्ये कांदा खरेदीतल्या अनियमिततेच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयामार्फत किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ या केंद्रीय नोडल संस्थांच्या माध्यमातून २०२६-२७ साठी कांदा खरेदी प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रक्रियेदरम्यान अनियमितता अथवा गैरव्यवस्थापन झाल्याबाबत लोकप्रतिनिधी, कांदा उत्पादक शेतकरी तसंच शेतकरी उत्पादक संघटनांकडून शासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही चौकशी करण्यात येणार आहे.

****

नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथल्या तीर्थराज कुशावर्त भाविकांसाठी आजपासून महिनाभरासाठी बंद राहणार आहे. पुरातत्व विभागाकडून ऐतिहासिक वारसा, जतन-संवर्धनासाठी विविध नूतनीकरण आणि देखभाल दुरुस्तीची कामं हाती घेतली जाणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

****

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी लातूर जिल्ह्यात ८३ प्रारूप मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांबाबत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक काल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या प्रारूप मतदान केंद्रांबाबत हरकती किंवा सूचना असल्यास त्या विहित मुदतीत सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

आगामी सण उत्सवांच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत दक्षिण मध्य रेल्वे काही विशेष गाड्या चालवणार आहे. यामध्ये नांदेड-दिल्ली-नांदेड, जालना-छपरा-जालना आणि नांदेड-उधना-नांदेड या गाड्यांचा समावेश आहे.

दरम्यान, हडपसर-घोरपडी दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामामुळे बीडहून पुणे जंक्शनला जाणारी आणि पुणे जंक्शनहून बीडला येणारी रेल्वेसेवा तीन ऑक्टोबरला रद्द करण्यात आली आहे.

****

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...