Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 May 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ मे २०२६ सायंकाळी
६.१०
****
· नीट पेपरफुटी प्रकरणातील चुकांसाठी जबाबदारी निश्चित करावी-सर्वोच्च
न्यायालयाचं निरीक्षण
· आगामी काळात महाराष्ट्र जगात एआयचं नेतृत्व करेल-मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त
· एनडीएच्या १५० व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ
दिमाखदारपणे साजरा
· इंधन भाववाढी विरोधात काँग्रेसच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी
आंदोलन
आणि
· एल निनोमुळे यंदा ९० टक्के पावसाचा हवामान विभागाचा
अंदाज
****
नीट पेपरफुटी प्रकरणात झालेल्या
चुकांसाठी जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. या प्रकरणी दाखल केलेल्या
याचिकांवर न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर
आज सुनावणी झाली. यापैकी एका याचिकेत राष्ट्रीय चाचणी संस्था -NTA चं पुनर्गठन करणं किंवा तिच्या जागी वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी एक सशक्त
आणि स्वायत्त संस्था स्थापन करण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने याबाबत केंद्राला
प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलै महिन्याच्या
दुसऱ्या आठवड्यात होणार आहे.
दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून
आता २१ जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी
असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते नवी
दिल्ली इथं वार्ताहराशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत
एकही चूक होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे, असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले.
हे पेपरफुटी प्रकरण सीबीआयकडे
सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे या
प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी
यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं प्रधान
म्हणाले.
****
देशभरातल्या उच्च न्यायालयांनी
प्रलंबित खटल्यांवरचे आदेश, राखून ठेवल्याच्या
तारखेपासून तीन महिन्यांच्या आत जाहीर करावेत, असे निर्देश
सर्वोच्च न्यायालयानं दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं
होणारं नुकसान लक्षात घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती
जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं हा निर्णय दिला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या
खटल्यांमध्ये जलदगतीनं निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं
अधोरेखित केलं.
****
ऑपरेशन सिंदूर हे एक अभूतपूर्व यश
होतं, असं संरक्षण
मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ऑपरेशन सिंदूरवरच्या एका स्मृती अंकाचं
सामाजिक माध्यमावरुन प्रकाशन झालं, त्यावेळी ते बोलत होते.
हे प्रकाशन केवळ ऐतिहासिक नोंदींपुरतं मर्यादित नसून, यामध्ये वीर सैनिकांच्या वैयक्तिक अनुभवांनाही स्थान देण्यात आलं आहे,
असं सिंह यांनी सांगितलं. देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्व टिकवून
ठेवण्यासाठी, तसंच देशासाठी सर्वोच्च त्याग करण्यास सक्षम
नागरिक घडवण्यासाठी या प्रकाशनातून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, असं आवाहन संरक्षण मंत्र्यांनी यावेळी केलं.
****
आगामी काळात महाराष्ट्र केवळ
भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत
वांद्रे कुर्ला संकुलात मुंबई टेक विक २०२६ चं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
महाराष्ट्र एआय क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे, मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, बळकट स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी या
मुद्यांकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं. सलग तीन वर्षे महाराष्ट्र हा गुंतवणूक आणि
स्टार्टअप संख्येनुसार देशातील अग्रगण्य राज्य ठरलं आहे, असं
फडणवीस यांनी सांगितलं.
****
विधान परिषदेसाठीच्या १७ पैकी १५
जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन
सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. तर दोन जागांवर अद्याप चर्चा
सुरू असून येत्या दोन दिवसात याबद्दल निर्णय घेऊ, असं सपकाळ म्हणाले.
चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया,
धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर,
अमरावती, बीड- लातूर या आठ जागांवर तर
पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर इथे काँग्रेस उमेदवार देणार आहे. रायगड रत्नागिरी,
जळगाव, परभणी-हिंगोली, संभाजीनगर,
या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्षाचे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुणे,
ठाणे, सांगली-सातारा इथून उभे राहणार आहेत.
****
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी -
एनडीएच्या १५० व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ आज खडकवासला येथील हबीबुल्ला
सभागृहात दिमाखदारपणे पार पडला. पुद्दुचेरीच्या माजी नायब राज्यपाल तथा निवृत्त
आयपीएस अधिकारी डॉ. किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या.
यावेळी २३६ कॅडेट्सना जवाहरलाल
नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये विज्ञान शाखेचे ६५, संगणक शास्त्र शाखेचे ११२ आणि कला शाखेचे
५९ कॅडेट्स समाविष्ट आहेत. तसेच मैत्रीपूर्ण परदेशी राष्ट्रांतील २१ कॅडेट्सनाही
पदवी बहाल करण्यात आली. दरम्यान, एनडीएची पासिंग आऊट परेड उद्या
होणार असून, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी या परेडचं
निरीक्षण करणार असल्याची माहिती संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण
यांनी दिली आहे.
****
राज्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेश
प्रक्रियेसाठीची पहिली यादी आज जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ
महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश
प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून १२ लाख ५१ हजार
विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
****
शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे
निघालेल्या ‘निसोस केरॉस’
या तेलवाहू जहाजाने होर्मूझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून
ते ३ जून रोजी विशाखापट्टण बंदरात पोहोचेल. दरम्यान, होर्मूझच्या
सामुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व जहाजांवर वाहतूक शुल्क आकारण्याचा इराणचा प्रस्ताव
आहे, तर आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरच्या वाहतुकीवर असं
शुल्क आकारणं बेकायदेशीर असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे.
****
पेट्रोल, डिझेल, गॅस
सिलेंडरच्या भाववाढी विरोधात आज काँग्रेसच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी आंदोलन
करण्यात आलं.
नांदेड इथं आयटीआय परिसरातल्या
महात्मा फुले पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी बैलगाडीवर दुचाकी आणून
आणि रस्त्यावरच चूल मांडून भाकरी थापटल्या. जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे आणि
महानगराध्यक्ष अब्दुल गफार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.
बीड इथं जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे
यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. इंधनाचा तुटवडा कमी करून दरकपात न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
सोनवणे यांनी दिला. पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना
निवेदन देण्यात आलं.
धुळे तसंच भंडारा इथंही काँग्रेस
पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं.
****
सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित
प्रकरणे निकाली काढण्यासाठी २१, २२ आणि २३ ऑगस्ट रोजी विशेष लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं असून, पक्षकारांनी आपली सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे
सामोपचाराने निकाली काढण्यासाठी ३१ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. या विशेष लोकअदालतीत सहभाग घेण्याचं आवाहन
छत्रपती संभाजीनगरचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश
गिरीश अग्रवाल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली
फडणीस यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा आढावा घेतला.
न्यायमूर्ती शिंदे समितीने केलेलं काम समाधानकारक असल्याचं मत त्यांनी माध्यम
प्रतिनिधींशी बोलतांना नमूद केलं. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे
यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांचं समाधान होईल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.
****
जायकवाडी धरणाचं पाणी मिळावं, या मागणीसाठी आज बीड जिल्हाधिकारी
कार्यालयावर शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढला. शेतीला हक्काचं पाणी मिळावं,
यासाठी लोकलढा आंदोलनच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून सतत लोकशाही
मार्गाने संघर्ष सुरू आहे. गोदावरी-सिंदफणा नदीजोड प्रकल्प गतीने व्हावा, यासाठी सर्वेक्षण करावं आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. ज्येष्ठ
सामाजिक कार्यकर्त्या सुशीला मोराळे, राजेंद्र आमटे
यांच्यासह अनेकांनी या मोर्चात सहभाग घेतला.
****
एल निनोमुळे यंदा नैऋत्य मोसमी
पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९० टक्के असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ.
मृत्यूंजय मोहापात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन
यांनी आज नवी दिल्ली इथं मान्सून २०२६ च्या दुसऱ्या टप्प्यातला दीर्घकालीन अंदाज
जाहिर करताना ही माहिती दिली. एल निनोचा प्रभाव जूनपासून वाढण्याची शक्यता असून,
जुलै-ऑगस्टमध्येही त्याचा परिणाम जाणवू शकतो. ईशान्य आणि पूर्व
भारतात तुलनेने चांगला पाऊस अपेक्षित असला तरी मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण
कमी राहील, असं मोहापात्रा यांनी सांगितलं.
****
इंडियन प्रिमियर लीग – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दुसरा क्वालिफायर
सामना आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघात होणार आहे. आजच्या
सामन्यातला विजेता संघ परवा रविवारी अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
विरुद्ध खेळणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक
वसाहत शेंद्रा इथं कौशल्य विकास केंद्रात उद्या भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन
करण्यात आलं आहे. २०२६ कौशल्याला रोजगाराची दिशा, या उपक्रमांतर्गत कौशल्य विकास मार्गदर्शन शिबिरही घेण्यात
येणार आहे. या मेळाव्यात विविध पदांसाठी पाचशेहून अधिक रिक्त जागांसाठी थेट
मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
****
राज्यात आज वर्धा इथं सर्वाधिक ४६
पूर्णांक आठ दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ४२ पूर्णांक चार दशांश सेल्सियस, नांदेड ४२ पूर्णांक सहा, छत्रपती संभाजीनगर इथं ४१ पूर्णांक
चार, बीड ४१ पूर्णांक आठ तर धाराशिव इथं ३९ पूर्णांक एक दशांश
सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.
****