Thursday, 14 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 14 May 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ मे २०२ सकाळी .०० वाजता

****

ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची दोन दिवसीय बैठक आज नवी दिल्लीत सुरू झाली. या बैठकीचं अध्यक्षस्थान परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर भूषवत आहेत. ब्रिक्स सदस्य देश तसंच भागीदार देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधीमंडळ प्रमुख या बैठकीत सहभागी झाले आहेत. या बैठकीदरम्यान जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण होणार आहे.

दरम्यान, या परिषदेसाठी भारतात दाखल झालेल्या विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी संवाद साधला.

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी, बाह्य स्पर्धा असूनही रशिया भारतासोबतचा ऊर्जा करार पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री माउरो व्हिएरा यांचीही जयशंकर यांनी भेट घेतली. यावेळी द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेचे अर्थमंत्री रोनाल्ड लमोला यांनी देखील जयशंकर यांची भेट घेतली. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील सामरिक भागीदारीच्या विविध पैलूंचा आढावा घेण्यात आला, तसंच परस्पर हिताच्या बहुपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आलेल्या मालदीवच्या अर्थमंत्री इरुथिशाम ऍडम यांच्यासोबतच्या बैठकीत जयशंकर यांनी, भारताच्या ‘शेजारी प्रथम’ धोरणावर भर देत द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याच्या आणि मर्यादित संसाधनांच्या कार्यक्षम वापरास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या आहेत. गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांना पाठवलेल्या पत्रात राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राज्यपालांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन ऊर्जा बचतीच्या अनुषंगाने वाहनांची संख्या निर्धारित करण्याच्या राज्यपालांच्या सूचना कळवल्या आहेत.

****

महाराष्ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे निवडून आलेल्या १० नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी होत आहे. शपथ घेणाऱ्या सदस्यांमध्ये डॉ. नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, अंबादास दानवे, डॉ. प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, झीशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे.

****

अमूल आणि मदर डेअरी यांनी दुधाच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दुधाचे नवे दर आजपासून लागू झाले. कंपन्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दरवाढीतून मिळणाऱ्या अतिरिक्त रकमेचा मोठा हिस्सा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन मिळेल तसंच दूध उत्पादन वाढीस मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

****

राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर संयंत्र बसवण्याचं काम प्राधान्यानं पूर्ण करावं, तसंच प्रलंबित सौर प्रकल्प जलद गतीनं पूर्ण करावेत असे निर्देश अपारंपरिक उर्जा मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण नियामक मंडळाच्या वार्षिक बैठकीत ते काल पुण्यात बोलत होते. सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे सौर प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा असंही त्यांनी या बैठकीत सांगितलं.

****

नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातल्या श्री जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत ३२ बनावट खाती उघडून सुमारे ५८ लाखांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात भोंदू अशोक खरातला सिन्नर न्यायालयाने १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात पतसंस्थेचे संस्थापक आणि सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष आणि खरातच्या श्री शिवनिका संस्थानचे माजी सरचिटणीस नामकर्ण आवारे यालाही सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे.

****

बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदम्बी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या अशिथ, अमृता आणि ध्रुव, तनिशा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

****

गुजरातमध्ये गांधीनगर इथं सुरू असलेल्या वरीष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्यपद भारत्तोलन स्पर्धेत काल भारताच्या ज्ञानेश्वरी यादवनं दोन पदकं मिळवली. ५३ किलो वजनी गटात तिनं स्नॅच प्रकारात रौप्य पदक पटकावलं. तर एकंदर १९४ किलो वजन उचलून तिनं स्पर्धेच्या दुसऱ्या एका प्रकारात कास्य पदक मिळवलं.

****

इंडियन प्रिमियर लीग – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. धरमशाला इथं संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

लातूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा अवकाळी पाऊस झाला. उदगीर तालुक्यासह परिसरात तसंच लातूर शहरातही पावसाच्या हकल्या सरी कोसळल्या. या पावसामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली असली, तरी या अवकाळी पावसाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. फळबागांमधले तयार आंबे वाऱ्यामुळे झाडावरून खाली पडल्याने नुकसान झाल्याची माहिती आमच्या वार्ताहराने दिली आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 May 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...