Tuesday, 19 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 19 May 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १९ मे २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे चार कंपन्यांसोबत सामंजस्य करार

·      नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचे विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे;मोटेगावकर यांच्या अल्पवयीन मुलाचीही चौकशी

·      ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा धुळे सायबर पोलीसांकडून पर्दाफाश;चार संशयितांना अटक

·      बीड जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांत दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

आणि

·      उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या

****

महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं चार कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड, या चार कंपन्यांसोबत सुमारे साडेसहा लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून, यातून २५ हजार ४०० मेगावॅट अणुऊर्जा तसंच १ लाख २३ हजार ५०० रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी पारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

****

नीट पेपरफुटी प्रकरणात आज केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात तीन विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाईदरम्यान महत्त्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का, याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान एक हजार विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.

****

नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं कालपासून लातूर इथे आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या आरसीसी कोचिंग क्लासमधल्या कागदपत्रं आणि शैक्षणिक साहित्याची तपासणी सुरू केली आहे. मोटेगावकर याच्या बारावीत शिक्षण घेणाऱ्या आणि यंदा नीट परीक्षा दिलेल्या अल्पवयीन मुलाचीही चौकशी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज लातूर इथे RCC क्लासेससमोर निदर्शनं केली. मोटेगावकर संचालित RCC क्लासच्या हजारो विद्यार्थ्यांची फी परत करण्यात यावी आणि त्यांच्या शिक्षणाचं नुकसान होणार नाही याची शासनानं दक्षता घ्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये, हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायलयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रमनाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले.

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्राणी जन्मनियंत्रण केंद्र स्थापन करावीत, रेबीज प्रतिबंधक लसींची उपलब्धता वाढवावी, तसंच रेबीजग्रस्त किंवा धोकादायक कुत्र्यांबाबत कायद्याच्या कक्षेत असलेल्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही न्यायालयानं दिले. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त असलेल्या श्वानांना दयामरण देण्याची परवानगीदेखील न्यायालयानं आज दिली.

****

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते निवृत्त मेजर जनरल भुवनचंद्र खंडुरी यांचं आज निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खंडुरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

****

पुणे विमानतळावरून तीन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. ते पुणे विमानतळावरून आसामच्या गुवाहाटी इथे जाण्याच्या प्रयत्नात होते. मागच्या दहा महिन्यांमध्ये पुण्यातून सत्त्याण्णव बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

****

अधिक परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवून आर्थिक फसवणूक प्रकरणी धुळे पोलीस दलाच्या सायबर पोलीसांनी एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करीत चार संशयितांना अटक केली आहे. सायबर पोलीसांनी तांत्रिक विश्लेषण करुन थेट वसई इथं सुरु असलेले बनावट कॉल सेंटर देखील उघडकीस आणलं. वेगवेगळ्या बँक खात्यांमधील तब्बल १ कोटी १९ लाख रुपये गोठवून ते फसवणूक झालेल्या तरुणाला परत मिळवून देण्यात पोलीसांना यश आलं आहे. या अभियंत्याची तब्बल तीन कोटी १४ लाख ९९ हजार ८९१ रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.

****

७० कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या पीएमएलए न्यायालयानं आज सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक तसंच खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

****

अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भूलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर अभिमन्यू तरकसे यांचा काळवटी साठवण तलावात पोहताना बुडून मृत्यू झाला. आज पहाटे ही घटना उघडकीस आली. सहा महिन्यांपूर्वी याच तलावात निष्णात जलतरणपटू विश्वनाथ बुरांडे यांचा मृत्यू झाला होता.

****

बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या पुरुषोत्तमपुरी इथे अधिक मासानिमित्त दर्शनासाठी आलेल्या एका बारा वर्षाच्या मुलाचा आज गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्यात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या जाणवत असल्यामुळे शासनानं राज्यातल्या १५ जिल्ह्यांमधल्या ६३३ गावं आणि एक हजार सहाशे बावन्न वाड्यांमध्ये सातशे सहा टँकर्समधून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक, म्हणजे २४४ टँकर्स छत्रपती संभाजीनगर विभागासाठी वापरले जात आहेत.

****

राज्यात आज अकोला इथं सर्वाधिक ४६ पूर्णांक पाच दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ४४ पूर्णांक एक, बीड ४३ पूर्णांक तीन, छत्रपती संभाजीनगर इथं ४३ पूर्णांक चार, तर धाराशिव इथं ४२ पूर्णांक एक दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

 

येत्या दोन दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात वर्धा, अमरावती आणि अकोल्यात आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट तर नागपूर आणि यवतमाळसह मराठवाड्यात हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना आज उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

दरम्यान, अनुकूल वातावरणात कोणतीही अडचण न आल्यास साधारणतः ८ ते ९ जून दरम्यान मराठवाड्यात मोसमी पावसाच्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीची पूर्वमशागतीची आवश्यक कामे तातडीने उरकून घ्यावीत, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी आणि हवामान तज्ज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी केले आहे.

****

शासनाच्या विविध योजनांच्या अनुदानाला कथितरीत्या होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ आज बीड इथे पंचायत समिती कार्यालयाला टाळे लावून डफ वाजवत आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

औषध विक्रेता संघटनेच्या वतीनं, उद्या २० मे रोजी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातल्या रुग्णांची संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी औषध आणि अन्न प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयानं नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक औषधे आधीच खरेदी करून ठेवावीत, तसंच गरज भासल्यास, सदर विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात, महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातल्या युवकांसाठी विनामूल्य ड्रोन पायलट प्रशिक्षण राबवण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्यांना ड्रोन पायलट परवानाही मिळणार आहे. इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज करावा, असं आवाहन जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी केलं आहे.

****

बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठावरच्या गावांतली पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेत, शासनानं जायकवाडी धरणातून या गावांसाठी पाणी सोडण्याला मान्यता दिली आहे. आमदार विजयसिंह पंडित यांनी याबाबत पाठपुरावा केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 May 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...