Saturday, 30 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      नीट पेपरफुटी प्रकरणातील चुकांसाठी जबाबदारी निश्चित करावी-सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण

·      आगामी काळात महाराष्ट्र जगात एआयचं नेतृत्व करेल-मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त

·      विधान परिषदेसाठीच्या १७ पैकी १५ जागांवर महाविकास आघाडीचा निर्णय

·      इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचं राज्यभर आंदोलन

·      जालना जिल्ह्यात भिंत कोसळून दोन मुलांचा मृत्यू; परभणी जिल्ह्यात रस्ते अपघातात चार युवक ठार

आणि

·      आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्सची अंतिम फेरीत धडक

****

नीट पेपरफुटी प्रकरणात झालेल्या चुकांसाठी जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर काल सुनावणी झाली. यापैकी एका याचिकेत राष्ट्रीय चाचणी संस्था -NTA चं पुनर्गठन करणं किंवा तिच्या जागी वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी एक सशक्त आणि स्वायत्त संस्था स्थापन करण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने याबाबत केंद्राला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे.

दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता २१ जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे, असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

हे पेपरफुटी प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं प्रधान यांनी सांगितलं.

****

देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश, राखून ठेवल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत जाहीर करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलदगतीनं निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं.

****

आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगभरात एआयचं नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात मुंबई टेक विक २०२६ चं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्र एआय क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे, मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, बळकट स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी या मुद्यांकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं. सलग तीन वर्षे महाराष्ट्र हा गुंतवणूक आणि स्टार्टअप संख्येनुसार देशातील अग्रगण्य राज्य ठरलं आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.

****

विधान परिषदेसाठीच्या १७ पैकी १५ जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली.

चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, बीड- लातूर या आठ जागांवर तर पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर इथे काँग्रेस उमेदवार देणार आहे. रायगड रत्नागिरी, जळगाव, परभणी-हिंगोली, संभाजीनगर, या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुणे, ठाणे, सांगली-सातारा इथून उभे राहणार आहेत. इतर दोन जागांवर अद्याप चर्चा सुरू असून येत्या दोन दिवसात याबद्दल निर्णय घेऊ, अशी माहिती सपकाळ यांनी दिली.

दरम्यान, उस्मानाबाद - लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत ३२ व्यक्तींनी ६० कोरे नामनिर्देशनपत्रे प्राप्त केली आहेत. तर दोन उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. अर्ज दाखल करण्यासाठी आता दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.

****

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी - एनडीएच्या १५० व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ काल पुण्यात खडकवासला इथं दिमाखदारपणे पार पडला. पुद्दुचेरीच्या माजी नायब राज्यपाल तथा निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. यावेळी २३६ कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली.

****

राज्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी काल जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून १२ लाख ५१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

****

शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या ‘निसोस केरॉस’ या तेलवाहू जहाजाने होर्मूझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून, हे जहाज ३ जून रोजी विशाखापट्टणबंदरात पोहोचेल. दरम्यान, आखाती देशातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एलपीजी कंपन्यांना ३० दिवसांचा साठा आरक्षित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

****

पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या भाववाढी विरोधात काल काँग्रेसच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं.

नांदेड इथं आयटीआय परिसरातल्या महात्मा फुले पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी बैलगाडीवर दुचाकी आणून आणि रस्त्यावरच चूल मांडून भाकरी थापल्या. जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे आणि महानगराध्यक्ष अब्दुल गफार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

बीड इथं जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. इंधनाचा तुटवडा कमी करून दरकपात न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सोनवणे यांनी दिला. पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं.

धाराशिव इथं जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. इंधन दरवाढ रद्द करण्यासह इतर मागण्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

****

जालना जिल्ह्यात एका जुन्या घराची भिंत कोसळून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. अंबड तालुक्यातल्या घुंगर्डे हादगाव इथं काल ही घटना घडली. काल दुपारी दोन्ही मुले शेळ्यांसाठी शेवरीचा पाला तोडत असताना जीर्ण घराची भिंत अचानक कोसळून या दोघे ठार झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात कल्याण-निर्मल राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. काल रात्री हा अपघात झाला. अपघातात ठार झालेले चारही तरुण मानवत इथले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ने काल देशभरात १२ ठिकाणी छापे टाकून अनेकांची चौकशी केली. या कारवाईत, छत्रपती संभाजीनगर इथं वाळूज परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेत, चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.

****

मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी उपोषणावर ठाम असल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी स्पष्ट केली आहे. अंतरवाली सराटी इथं काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासोबतच्या चर्चेत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने बैठक निष्फळ ठरली. मात्र, लेखी आश्वासन आणि शासन आदेश प्राप्त झाल्यास आज सकाळी उपोषबाबत निर्णय घेतला जाईल, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

****

जायकवाडी धरणाचं पाणी मिळावं, या मागणीसाठी काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढला. शेतीला हक्काचं पाणी मिळावं, यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

****

एल निनोमुळे यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९० टक्के असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय मोहापात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी काल नवी दिल्ली इथं मान्सून २०२६ च्या दुसऱ्या टप्प्यातला दीर्घकालीन अंदाज जाहीर करताना ही माहिती दिली. एल निनोचा प्रभाव जूनपासून वाढण्याची शक्यता असून, मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण कमी राहील, असं त्यांनी सांगितलं.

****

कर्णधार शुभमन गिलच्या झंझावाती शतकी खेळीच्या बळावर गुजरात टायटन्सने आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल न्यू चंदीगड इथं झालेल्या सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्स संघाचा सात गडी राखून पराभव केला. राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी करत, वैभव सूर्यवंशीच्या ९६ धावांच्या बळावर २१४ धावा केल्या, मात्र गुजरात संघाने हे आव्हान १९ व्या षटकांतच पार केलं. ५३ चेंडूत १०४ धावा करणारा शुभमन सामनावीर ठरला. उद्या स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू या दोन संघात होणार आहे.

****

सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी जोडीने पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी १९-२१, २१-१७, २१-१३ असा विजय मिळवला.

****

छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहत शेंद्रा इथं कौशल्य विकास केंद्रात आज भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. २०२६ कौशल्याला रोजगाराची दिशा, या उपक्रमांतर्गत कौशल्य विकास मार्गदर्शन शिबिरही घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात विविध पदांसाठी पाचशेहून अधिक रिक्त जागांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

****

राज्यात काल वर्धा इथं सर्वाधिक ४६ पूर्णांक आठ दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ४२ पूर्णांक चार दशांश सेल्सियस, नांदेड ४२ पूर्णांक सहा, छत्रपती संभाजीनगर इथं ४१ पूर्णांक चार, बीड ४१ पूर्णांक आठ तर धाराशिव इथं ३९ पूर्णांक एक दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 30 مئی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 30 May 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ت...