आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Sunday, 31 March 2024
Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.03.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 31 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
· भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना प्रदान.
· इंडीया आघाडीची दिल्लीमध्ये तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेरठमध्ये प्रचार सभा.
· महाविकास आघाडीत वंचित समुहांना उमेदवारी देण्याबाबत कुठलाही निर्णय होत नव्हता- विधिज्ज्ञ प्रकाश आंबेडकर.
आणि
· आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्ससमोर १६३ धावांचं लक्ष्य.
****
भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान, माजी उपपंतप्रधान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना आज त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या हस्ते काल चार मान्यवरांना भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आले. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, पी व्ही नरसिंहराव, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि कृषी क्रांतीचे प्रणेते एम एस स्वामीनाथन यांना यावेळी भारत रत्न पुरस्कारानं मरणोत्तर सन्मानित करण्यात आलं.
****
देशात यंत्रणांचा गैरवापर सुरु असून, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र `इव्हीएम` नसेल तर भारतीय जनता पक्ष लोकसभेच्या १८० जागाही जिंकू शकणार नाही, असं काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते दिल्ली इथं आज रामलीला मैदानावर झालेल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या सभेत बोलत होते. ही निवडणूक देश, घटना वाचवण्यासाठी, आणि प्रत्येकाचा हक्क वाचवण्यासाठी आहे, असं ते म्हणाले. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे तसंच अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांच्या पत्नी यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रमुख नेते या सभेत सहभागी झाले होते. आपला देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत असल्याची शंका वाटत होती पण आता ही शंका वास्तवात उतरली असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले.
****
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या मेरठ इथं पक्षाच्या लोकसभा प्रचाराला सुरुवात केली. ही निवडणूक केवळ सरकार स्थापण्यासाठी नाही तर भारताला विकसित राष्ट्र तसंच भारतीय अर्थव्यस्थेला जागतिक तिसऱ्या क्रमाकांची आर्थिक महासत्ता बनवण्यासाठीची आहे. देशाला भ्रष्टाचारापासून वाचवण्यासाठीचा लढा आपण देत आहोत, असं मोदी म्हणाले. गेल्या दहा वर्षात सरकारनं घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती यावेळी मोदी यांनी दिली.
****
लातूर जिल्ह्यात सुरु असलेल्या जल जीवन मिशनच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी दिले आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक घराला पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन योजना राबवण्यात येत आहे. जवळपास दोनशे ७४ योजनांची कामे ठरवून दिलेल्या टप्प्यामध्ये होत नसल्यानं ही कामं ठरलेल्या मुदतीत पूर्ण होणार नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं शासकीय नियमानुसार संबंधित कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सागर यांनी दिले आहेत.
****
लातूर शहराला धनेगाव धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून अवैधरित्या पाणी उपसा करणाऱ्या २१ ठिकाणच्या अवैध जोडण्या महसूल विभाग आणि लातूर शहर महापालिका प्रशासनातर्फे तोडण्यात आल्या. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात आली. पहिल्या टप्प्यात लातूर ते कळंब तालुक्यातल्या रांझणी गावापर्यंत ही मोहीम राबवण्यात आली असून यापुढंही ही मोहीम राबविली जाणार असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.
****
कोकण रेल्वेचे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून संतोष कुमार झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या नवी मुंबईतल्या बेलापूर इथल्या मुख्यालयात ते पदभार स्वीकारतील अशी माहिती कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.
****
महाविकास आघाडीत वंचित समूहांना उमेदवारी देण्याबाबत कुठलाही निर्णय होत नव्हता, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये उमेदवारीच्या मुद्द्यांवर भांडण सुरू असल्याचंही ते यावेळी म्हणाले. वंचित बहुजन आघाडीकडून कॉँग्रेसला सात जागांवर पाठींबा देण्यात येणार असून, कोल्हापूर आणि नागपूर इथल्या उमेदवारांना आम्ही पाठींबा जाहीर केल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षाच्या राजकारणावरही आंबेडकर यांनी यावेळी टीका केली. ज्या मतदार संघात महायुतीचं प्राबल्य नाही तिथं उमेदवार पळवणं, पक्षांमध्ये फोडाफोडी करणं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी हात मिळवणी करणं, असे प्रकार सुरु आहेत, असं ते म्हणाले.
****
मराठवाड्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत परभणीचा विकास का झाला नाही असा प्रश्न, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते तसंच महायुतीचे परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांनी उपस्थित केला आहे. ते परभणी इथं आज वार्ताहरांशी बोलत होते. गेल्या अनेक वर्षांपासून आपण परभणीचा अभ्यास करत आहोत, असं जानकर म्हणाले. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
रत्न आणि आभूषण परिषदेनं राज्यातली विद्यापीठं आणि महाविद्यालयांसोबत काम करावं असं, आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. त्यांच्या हस्ते काल रत्न आणि आभूषण निर्यात संवर्धन परिषदेतर्फे देण्यात येणारे पन्नासावे रत्न आणि आभूषण निर्यात पुरस्कार मुंबई इथं प्रदान करण्यात आले, त्यावेळी बैस बोलत होते.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी सोहळ्याला आज प्रारंभ झाला. मंदिर संस्थानचे अध्यक्ष संदिपान भुमरे यांच्या हस्ते नाथांच्या समाधीची अभिषेक पूजा करण्यात आली. राज्यभरातून आलेल्या शेकडो भाविकांनी गोदावरी पात्रात स्नान करून नाथांच्या समाधीचं दर्शन घेतलं. मानाच्या दिंड्यांची आज मिरवणूक काढण्यात आली. यंदाचा समाधी सोहळा नाथांचा चतु:शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सोहळा असल्याने, मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगपुरा भागातल्या नाथमंदिरातही भाविकांनी नाथांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
****
मतदान प्रक्रियेप्रति युवकांनी जागरूक व्हावं तसच त्यांनी राष्ट्राच्या विकासाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडण्यासाठी मतदान करावं, असं अवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केलं आहे. नांदेड इथल्या महात्मा गांधी मिशन- एमजीएम महाविद्यालयात काल झालेल्या स्नेहसंमेलनात त्या बोलत होत्या. मतदान शक्ती असून तो एक देशसेवेचाच एक भाग आहे, असंही करनवाल यांनी सांगितलं. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यपक शिक्षणवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
****
आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पालघर जिल्ह्यात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा बोईसर ग्रामपंचायतीचे उपसरपंच नीलम संखे यांच्या विरोधात पालघर जिल्ह्यातल्या बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आचारसंहिता सुरू असताना बोईसर ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन राजकीय भाष्य करून आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार संखे यांच्याविरोधात आली होती. त्यानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
****
वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे वाशिम शहरात आज राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर केलं. एक व्यक्ती एक मत यातून शासन कसं निर्माण होतं, याविषयी माहिती यात देण्यात आली. वाशिमचे तहसीलदार निलेश पळसकर, मंडळ अधिकारी पी.एस.पांडे यावेळी प्रमुख उपस्थिती होते.
****
लोकसभा निवडणुकीसाठी विविध परवानग्यांकरता कल्याणमध्ये एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये एक खिडकी परवानगी कक्षांतर्गत विविध परवानगी विषयक कामकाजाबाबत दूरध्वनीद्वारे संपर्कासाठी कल्याण लोकसभा मतदार संघातल्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये नियंत्रण कक्षाची निर्मिती केल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
****
महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाळीत टाकलं जात असून आपण त्यामुळं आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वेगळी भूमिका घेऊ असा इशारा, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांनी दिला आहे. धुळे इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. भारतीय जनता पक्षाकडून धुळे लोकसभा मतदारसंघासाठी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना उमदवारी देण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकर्त्यांना कार्यक्रमांमध्ये डावललं जात असल्याचा कार्यकर्त्यांनी आरोप केला असल्याचंही पाटील यावेळी म्हणाले.
****
सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनी आज काँग्रेस पक्षामधे प्रवेश केला. मुंबई इथं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि जेष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. पुर्वाश्रमीचे काँग्रेसचेच असणारे दिलीप माने हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला होता.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज विजयासाठी १६३ धावांचं आव्हान असलेल्या गुजरात टायटन्स संघानं नऊ षटकात एक बाद ७१ धावा केल्या होत्या. अहमदाबाद इथं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाला २० षटकांमध्ये आठ बाद १६२ धावा केल्या. मोहित शर्मानं तीन गडी बाद केले. स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात विशाखापट्टणम इथं सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:31.03.2024रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 31 March 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३१ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यात काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यात पीरबावडा इथं, बीड शहरासह जिल्ह्यात आष्टी तालूक्यात, हिंगोली जिल्ह्यात वसमत आणि कळमनुरी तालुक्यात बहुतांश ठिकाणी, नांदेड शहरासह जिल्ह्यात अर्धापूर तसंच हदगाव तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळं काढणीला आलेल्या ज्वारी, हरबरा, हळद पिकांसह आंबा, केळी आणि संत्रा फळबागांचं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना आज त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रपतींच्या हस्ते काल चार मान्यवरांना भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आले. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, पी व्ही नरसिंहराव, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि कृषी क्रांतीचे प्रणेते एम एस स्वामीनाथन यांना यावेळी भारत रत्न पुरस्कारानं मरणोत्तर सन्मानित करण्यात आलं.
****
आज ईस्टर संडे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ईस्टर संडे हा सण प्रेम आणि करुणेचं प्रतिक असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. तर या सणाच्या माध्यमातून करुणा, प्रेम, आणि क्षमा याचं पुनःस्मरण होत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी, हा सण, नावीन्यता आणि आशावादाचा संदेश प्रसारीत करेल तसंच या विशेष प्रसंगी नागरिकांमध्ये एकता आणि शांतता राहण्यासाठी प्रार्थना करत असल्याचं आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ईस्टर संडेनिमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथं शांतीपुरा परिसरामध्ये मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये ढोल, ताशे तसेच लेझीम पथकांच्या गजरात भाविक उत्साहात सहभागी झाले.
****
महाविकास आघाडीत वंचित समूहांना उमेदवारी देण्याबाबत कुठलाही निर्णय होत नव्हता असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये उमेदवारीच्या मुद्द्यावरु भांडण सुरू असल्याचंही ते यावेळी म्हणाले. आंबेडकर यांनी यावेळी भारतीय जनता पक्षाच्या राजकारणावरही टीका केली. ज्या मतदार संघात महायुतीचं प्राबल्य नाही तिथं उमेदवार पळवणं, पक्षांमध्ये फोडाफोडी करणं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी हात मिळवणी करणं असे प्रकार सुरु आहेत, असं ते यावेळी म्हणाले.
****
छत्रपती संभाजीनगर इथून आजपासून अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू होत असून, हैदराबाद तसंच मुंबईसाठी एक वाढीव विमान सुरू होणार आहे.नांदेडमध्येही विमान सेवेला आजपासून प्रारंभ होत आहे. नांदेड - बंगळुरू, नांदेड - दिल्ली - जालंधर ही विमानसेवा दररोज तर नांदेड - हैदराबाद आणि नांदेड -अहमदाबाद ही विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरू राहणार आहे. दरम्यान, जालंदर - दिल्लीमार्गे आज पहिले विमान दुपारी सव्वाचार वाजता नांदेड इथं पोहोचणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं म्हटलं आहे.
****
इंडियन प्रिमीयर लीग- आयपीएल अंतर्गत आज दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना गुजरात टायटंन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी क्रीडासंकूलात दुपारी साडेतीन वाजता तर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात विशाखापट्टणम इथं सायंकाळी साडेसात वाजता होईल. या स्पर्धेत काल लखनऊ इथं झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सनं पंजाब किंग्सचा २१ धावांनी पराभव केला.
****
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यात प्रौढ बीसीजी लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये पात्र लाभार्थ्यांचं एप्रिल महिन्यात सर्वेक्षण तर मे महिन्यापासून प्रत्यक्ष लसीकरण केलं जाणार आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांनी केलं आहे.
****
जळगाव जिल्ह्यात नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिकेच्या मालमत्ता कर तसंच पाणीपट्टीची वसूली ही मागील वर्षापेक्षा चारशे टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरपालिकांनी डिसेंबर पासून करवसुलीवर अधिक भर दिल्यानं, यावर्षी ५८ कोटी रुपये एवढी करवसुली झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...