Monday, 31 July 2017

AIR News Bulletin, Aurangabad 31.07.2017....17.25

Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.07.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 31 July 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

प्राप्तीकर विवरणपत्र भरण्याची मुदत पाच ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. ऑनलाईन विवरणपत्र दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती, मात्र मुदत वाढवून देण्याच्या मागणीमुळे, आता आयकरदात्यांना ई फायलिंगद्वारे पाच ऑगस्टपर्यंत विवरणपत्र भरता येणार आहे. आतापर्यंत दोन कोटींपेक्षा अधिक विवरणपत्र ऑनलाईन पद्धतीनं विभागाकडे दाखल झाली आहेत.

****

भारतीय स्टेट बँकेनं बचत खात्यावरच्या व्याज दरात अर्ध्या टक्क्यानं कपात केली आहे. बचत खात्यावर एक कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर आता तीन पूर्णांक पाच टक्के दरानं व्याज मिळणार आहे. मात्र एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेवर चार टक्के व्याजदर कायम असेल, त्यात काहीही बदल होणार नाही, असं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

****

तृतीयपंथी समुदायाला शिक्षण आणि रोजगारात आरक्षण देण्याबाबत सरकार विचार करेल, असं आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलं आहे. ते आज हैदराबाद इथं बोलत होते. वंचित आणि मागास घटकांना न्याय देण्यासाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले.

****

लोकसभेत आज जमावाकडून होणाऱ्या हिंसाचार तसंच हत्येच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अशा वाढत्या घटनांकडे लक्ष वेधत, या घटना देशाच्या अखंडतेसाठी एकात्मतेसाठी धोकादायक असल्याचं नमूद केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रात झालेल्या अशा घटनांविरोधात तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी सोशल मीडियावरून खातरजमा न करता पसरवल्या जाणाऱ्या माहितीमुळे असे प्रकार होत असल्याकडे लक्ष वेधलं. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान, भाजपचे हुक्मदेव यादव, तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय, बिजू जनता दलाचे तथागत सत्पथी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मोहम्मद सलीम, यांच्यासह अनेक सदस्यांनी अशा घटनांचा निषेध करत, ठोस कारवाईची मागणी केली.

****

पीक विमा योजनेकरता आज सायंकाळपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. मुदतवाढ न मिळाल्यास, तातडीने केंद्र सरकारकडे या संदर्भात पाठपुरावा करण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं. पीक विमा योजनेसाठी हप्ता भरण्याची ३१ जुलै ही शेवटची तारीख असली तरी, तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटींमुळे अद्याप अनेक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता आलं नसल्यानं, या योजनेचा हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ मिळवून द्यावी, अशी मागणी विधानसभेत विरोधी पक्षांनी लावून धरली.

विधान सभेच्या कामकाजाला सुरुवात होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला. शेतकऱ्यांना जर विमा हप्ता भरता आला नाही, तर सरकारनं त्यांना विम्याची रक्कम द्यावी अशी मागणी पवार यांनी केली. विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भातल्या तांत्रिक अडचणींकडे लक्ष वेधलं.

शिवसेना आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी या या योजनेची मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी केली, तर राष्ट्रवादीचे सदस्य दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणी सरकारनं आज संध्याकाळ पर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. या मुद्यावर शेकापचे गणपतराव देशमुख, सुभाष साबणे आदी आमदारांनी आपली भूमिका मांडली.

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी यासंदर्भात केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आला असून, त्यावर आजच निकाल अपेक्षित असल्याचं सांगितलं. या योजनेतले काही निकष बदलण्याची मागणी केंद्र सरकारला केली जाईल, तसंच शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्याची जबाबदारी राज्य सरकार घेईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यातल्या एका शेतकऱ्याचा पीकविमा हप्ता भरण्यासाठी रांगेत उभं असताना मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून तत्काळ पाच लाख रुपयांची मदत केली जाईल, अशी घोषणा फुंडकर यांनी केली. 

****

विधान परिषदेतही पीक विमा योजनेच्या मुदतवाढीवरुन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. मागच्या वर्षीच्या तुलनेत मराठवाडा, विदर्भात कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज आहे, त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत वाढवली नाही, तर सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही, असं ते म्हणाले. या मुद्यावरुन सभागृहाचं कामकाज दोनदा तहकूब झालं.

पीक विमा योजनेची मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यास केंद्र सरकारनं सकारात्मकता दर्शवली असल्याचं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सदनाला सांगितलं.

****

औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येत्या आठ तारखेला रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. एका आघाडीच्या मोबाईल कंपनीकडून हा मेळावा घेण्यात येत असून, माहिती तंत्रज्ञान तसंच संगणक शास्त्र या विषयात पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. येत्या १० ऑगस्ट रोजीही जवळपास पंधरा कंपन्यांचे प्रतिनिधी विद्यापीठात रोजगार मेळावा घेणार आहेत.

****

AIR News Bulletin, Aurangabad 31.07.2017 13.00.mp3

Text-AIR News Bulletin, Aurangabad 31.07.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 July 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जुलै २०१ दुपारी .००वा.

****

देशभरात कामगार विमा रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची आठ हजार पदं भरण्याचे निर्देश दिले असून, त्यासाठी परीक्षेसह आवश्यक कार्यवाही सुरू केल्याचं, केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी सांगितलं आहे. आज लोकसभेत प्रश्नकाळात या संदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी असंघटीत कामगारांची सामाजिक सुरक्षा आणि कामगार विमा रुग्णालयांचा तर नंदुरबारच्या खासदार हीना गावित यांनी कामगारांसाठी सुरक्षित वातावरणाचा मुद्दा उपस्थित केला.

शून्यकाळात काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी देशात वाढता हिंसाचार, तसंच हत्येच्या घटनांची निंदा केली. गोरक्षेच्या नावाखाली देशभरात झालेल्या हत्येच्या घटनांकडे खरगे यांनी लक्ष वेधलं. भाजपशासित राज्यात सुरू असलेल्या या घटना लोकशाहीसह देशाच्या एकात्मतेसाठी धोकादायक असल्याचं, खरगे यांनी सांगितलं.

राज्यसभेत आजही गुजरातमधल्या काँग्रेस आमदारांच्या मुद्यावरून विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. विरोधी सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोर हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केल्यानं, उपसभापती पी जे कुरियन यांनी सदनाचं कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित केलं.

कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर माजीद मेमन यांनी दार्जिलिंगमध्ये सुरू असलेल्या निदर्शनामुळे चहा उद्योगावर होणाऱ्या परिणामांकडे तर जया बच्चन यांनी विमुद्रीकरण आणि रोखरहित व्यवहारांमुळे होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधलं. बसवराज पाटील यांनी वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय सामाईक प्रवेश पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांना येत असलेल्या अडचणींकडे लक्ष वेधलं.

****

भारत आणि पाकिस्तान आज वॉशिंग्टन इथं सिंधु जल कराराअंतर्गत हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पावर चर्चा करणार आहेत. केंद्रीय जलसंधारण सचिव अमरजी सिंह हे भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहेत. पाकिस्ताननं जम्मू काश्मीरमधल्या दोन्ही प्रकल्पाच्या आराखड्यावर चिंता व्यक्त करत विश्व बँकेसोबत संपर्क साधला होता.

****

जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून काल रात्रीच्या सुमारास शस्त्रसंधीचं उल्लंघन करभारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याला भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आलं.

****

सरकार पुढच्या वर्षापासून हॅपेटाटस ची लस मोफत उपलब्ध करुन देणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे. शिमला इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. यासाठी अर्थसंकल्पात अडीच हजार कोटी रुपयांची योजना तयार करत असल्याचं ते म्हणाले. सरकारनं आरोग्य क्षेत्रात अनेक नवनवीन योजना सुरु केल्या असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

वस्तू आणि सेवा कर प्रणाली अंतर्गत देशभरातून १२ लाखांहून अधिक व्यापा-यांनी नव्या नोंदणीसाठी अर्ज केले असल्याची माहिती महसूल सचिव हसमुख अधिया यांनी दिली आहे. यापैकी १० लाख व्यापाऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले असून, उर्वरित दोन लाख अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. उद्योगपती, व्यापाऱ्यांना वस्तू आणि सेवा कर प्रणाली अंतर्गत नोंदणी करण्यासाठी ३० जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती.

****

प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांऐवजी सायकलच्या वापराला प्रोत्साहन देण्याकरता औरंगाबाद, लातूरसह राज्यातल्या दहा शहरात पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ‘सायकलसह रस्ते’ - स्ट्रीट्‌स विथ सायकल ट्रॅक हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. याकरता वाहतूक विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे.  सायकल चालवण्यासाठी सुरक्षित विशेष मार्ग उपलब्ध झाल्यास रस्त्यांवरची वाहनांची गर्दी कमी होईल तसंच प्रदूषणही कमी होईल अशी अपेक्षा या प्रकल्पाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं ८० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. गंगाखेड शहरातल्या एका गोदामात गुटखा असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

जायकवाडी धरणातला पाणीसाठा ४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणातला जिवंत पाणी साठा एक हजार ४२ दशलक्ष घनमीटर वर पोहोचला आहे. धरणात सध्या तेरा हजार ६६६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे.

****

भारत आणि मलेशियाच्या महिला फुटबॉल संघात आज क्वालालांपूर इथं मैत्रीपूर्ण सामना होणार आहे. संध्याकाळी सव्वा सहा वाजता हा सामना सुरु होईल. प्रशिक्षक पदी मेमॉल रॉकी यांची नियुक्ती झाल्यानंतरचा हा पहिलाच सामना आहे. भारतीय संघ उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****


AIR News Bulletin, Aurangabad HLB 31.07.2017 10.00.MP3

Text-AIR News Bulletin, Aurangabad 31.07.2017 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

३१ जुलै २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

ज्येष्ठ धृपद गायक उस्ताद सईदउद्दीन डागर यांचं काल रात्री पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. जयपूर इथं बाबा बहराम खां डागर यांच्या निवासस्थानाजवळ दर्गा परिसरात त्यांचा दफनविधी होणार आहे. स्वामी हरिदासजी यांच्यापासूनची परंपरा असलेल्या डागर घराण्याच्या विसाव्या पिढीतले ते गायक होते. त्यांच्या संगीत साधनेबद्दल पंडित जानोरीकर पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

****

प्राप्तीकर विवरणपत्र भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ही मुदत कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नसल्याचं प्राप्तीकर विभागाच्या सत्रांनी म्हटलं आहे. आतापर्यंत दोन कोटींपेक्षा अधिक विवरणपत्र ऑनलाईन पद्धतीनं विभागाकडे दाखल झाली आहेत. ई फायलिंग करताना विभागाच्या संकेतस्थळाबाबत किरकोळ अडचणी निर्माण झाल्याच्या काही तक्रारी होत्या, मात्र त्या तातडीनं सोडवण्यात आल्याचं विभागानं म्हटलं आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या धार्मिक स्थळं निष्काषित करण्यात येणाऱ्या कारवाईच्या विरोधात शिवसेना न्यायालयात जाणार असल्याचं खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं आहे. ते औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. धार्मिक स्थळावर होणारी कारवाई ही चुकीच्या पद्धतीनं, कुठलीही पूर्वकल्पना न देता आणि चुकीचे निकष लावून होत असल्याचं ते म्हणाले. या निर्णयास आव्हान देऊन पुनर्विलोकन याचिका आणि हस्तक्षेप याचिका आज मुंबई उच्च न्यायालय खंडपीठात दाखल करणार असल्याचं खैरे यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद शहरातल्या चिकलठाणा भागात महानगरपालिकेची जलवाहिनी फोडून पाण्याची चोरी करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिकलठाणा भागातल्या चौधरी कॉलनीत महापालिकेची परवानगी न घेता मुख्य जलवाहिनी फोडून नळजोडणी घेण्यात आली असल्याचं पाणी पुरवठा विभागाच्या लक्षात आलं, या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात सबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नडनजीक पाझर तलावात बुडून दोन मुलांचा काल मृत्यु झाला. कन्नड जवळच्या हिवरखेडा गौताळा इथल्या पाझर तलावात ही मुलं पोहण्यासाठी गेली होती.

****


AIR News Urdu Bulletin, Aurangabad. Date: 31.07.2017, Time: 8.40-8.45 AM


Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date: 31 July 2017
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۳۱ ؍جولائی  ۲۰۱۷؁ء
وقت : صبح  ۴۰-۸ سے  ۴۵-۸

 وزیر اعظم نریندر مودی نے عوام سے اپیل کی ہے کہ وہ سال2017؁ء کو عزائم کا سال بنائیں۔ 70؍ ویں یوم آزا دی سے پہلے وزیر اعظم نے بھارت چھوڑو تحریک کا ذکر کر تے ہوئے کہا کہ عوام بھر پور عزائم کے ساتھ آئندہ19؍ اگست سے گند گی، غریبی ،بدعنوا نی، فرقہ پرستی اور دہشت گردی سے پاک بھا رت کی تعمیر کے لیے انتھک جد و جہد کریں۔ وہ کل آکاشوا نی سے نشر ہونے والے ما ہا نہ سلسلے وار پروگرام ’’من کی بات ‘‘کے ذریعے عوام سے مخا طب تھے۔ جناب مو دی نے کہا کہ اِس سال یوم آزادی یوم عہد کے طور پر منا یا جا نا چا ہیے۔
****************************
 بازار میں منا سب قیمت ملنے تک کسا نوں کو اُن کی پیدا وار کی ذخیرہ اندوزی کے لیے حکو مت نے محکمۂ ریل کی مدد سے ملک بھر میں Cold Storage کی تعمیر کا فیصلہ کیا ہے۔ یہ بات وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے کہی ہے۔ کل نا سک ضلع کے مقام لا سل گائوں میں محکمۂ ریل اور لاسل گائوں کو آپریٹیو مار کیٹِنگ فیڈریشن کے اِشتراک سے ایک کثیر مقصدی سرد ذخیرہ خانہ یعنیCold Storage  کا
سنگ بنیاد رکھا گیا۔ اِس موقع پر وزیر ریل سُریش پر بھو سمیت کئی نامور شخصیات موجود تھیں۔ وزیر اعلیٰ نے اِس موقع پر اپنی مخا طبت میں کہا کہ ملک بھر میں اِس طرح کے227؍ سرد ذخیرہ خانے تعمیر کیئے جائینگے۔ جِس میں سے52؍ ذخیرہ خانے مہا راشٹر میں قائم کیئے جائینگے۔ 52؍ میں سے 25؍ ذخترہ خانوں کی تعمیر جلد از جلد مکمل کیئے جانے کا تیقن بھی وزیر اعلیٰ نے دیا۔
****************************
 شِرڈی ریلوے اسٹیشن پر کل وزیر ریل سُریش پر بھو کے ہاتھوں مختلف نئے پراجیکٹس کا افتتاح عمل میں آیا۔ اِس کے علا وہ کل وزیر ریل کے ہاتھوں سائی نگر شِر ڈی تا ممبئی سُپر فاسٹ ٹرین کا بھی افتتاح عمل میں آیا۔ اِس موقع پر مملکتی وزیر دفاع ڈاکٹر سُبھاش بھامرے ، روز گار ضما نت اِسکیم اور سیا حت کے ریاستی وزیر جئے کمار  راول کے علا وہ دیگرنامور شخصیات بھی مو جود تھیں۔ جناب پر بھو نے اِس موقع پر اپنے خیا لات کا اظہار کر تے ہوئے کہا کہ مہا راشٹر میں ریلوے کے تقریباً26؍ ہزار کرو ڑ روپیوں کے پرا جیکٹس پر کام جا ری ہے۔ اُنہوں نے مزید کہا کہ شِر ڈی میں بڑی تعداد میں سائی بابا کے در شن کے لیے عقیدتمند آتے ہیں اُن سبھی کی سہو لت کی خا طر شِر ڈی اسٹیشن پر مزید سہو لیات کی فراہمی کے لیے حکو مت اقدا مات کر ے گی۔
****************************
 آج فصل بیمہ کی ادائیگی کی آخری تاریخ ہے۔ لہٰذا بینکوں میں کسا نوں کی بھیڑ لگ سکتی ہے۔ اِس پس منظر میں زر عی افسران اور ملا زمین آج دِن بھر بینکوں میں مو جود رہیں اور کسا نوں کی رہنمائی کریں۔ یہ ہدا یت ایگریکلچر کمِشنر سُنیل کیندریکر نے دی ہے۔ اُنہوں نے بینک انتظا میہ سے بھی در خواست کی ہے کہ وہ کسا نوں کی سہو لت کے لیے آج زائد کھِڑ کیوں کا انتظام کریں۔ کل اتوار کی تعطیل کے با وجود بینکوں میں کام کاج جاری تھا۔ کل بھی بیشتر کسا نوں نے اپنی بیمہ قسطیں ادا کی۔
 اِسی طرح مختلف مقا مات پر بینک عملے کی کمی کے باعث کسا ن کل اپنے بیمہ کی رقو مات نہیں بھر سکے۔ بیڑ ضلع کے مقام پر لی میں بینک کا وقت ختم ہو جانے کے با عث قطاروں میں کھڑے کسا نوں نے پتھرائو شروع کر دیا جِس کے نتیجے میں ایک خا تون کسا ن سمیت 2؍ افراد زخمی ہوئے ہیں۔ ناندیڑ میں کل رات ہی سے کسا نوں نے بینکوں کے سامنے قطا ریں بنا نی شروع کر دی تھی۔ جالنہ ضلع میں بھی ہجوم کے آپس میں ٹکرائو کو روکنے کے لیے پو لس کو لاٹھی چارج کر نا پڑی۔ پر بھنی میں بھی فصل بیمہ ادائیگی کے دوران پولس کے جوان تعینات کیئے گئے تھے۔
 دریں اثناء کانگریس کی ریاستی اکائی کے صدر اشوک چو ہان نے مطالبہ کیا ہے کہ فصل بیمہ کی ادائیگی کی مدت میں تو سیع کی جائے ۔
****************************
 وزیر زراعت پانڈو رنگ پھُنڈ کر نے کہا کہ فصل بیمہ کی ادائیگی کے لیے مدت میں توسیع کے لیے مرکزی حکو مت کو تجویز روانہ کی گئی ہے۔ اِسی طرح اورنگ آباد میں چیف سیکریٹری سُمِت ملِک نے صحیفہ نگاروں سے بات چیت کے دوران کہا کہ بیمہ کی ادائیگی کی مدّت میں توسیع پر حکو مت سنجید گی سے غور کر رہی ہے۔
****************************
 اِنکم ٹیکس ریٹرن داخل کر نے کا بھی آج آخری دِن ہے۔ اِس پس منظر میں کل سے محکمۂ اِنکم ٹیکس نے ’’آئیکر سیتو ایپ‘‘ شروع کیا ہے۔ اِس ایپ کی مدد سے ٹیکس دہندگان اپنے ٹیکس ریٹرن بھر سکے گے۔ اِ س کے علا وہ نئے پین کارڈ کے لیے در خواست دہی اور پین کارڈس کو
 آ دھار سے مر بو ط کر نے کے لیے بھی اِس ایپ سے مدد ملے گی۔ گو گل اِسٹور سے یہ ایپ حاصل کیا جا سکتا ہے۔ اِس کے علا وہ اِس ایپ کو حاصل کر نے کے لیے73 06 52 52 52 ؍ اِس نمبر پر Missed Call بھی دیا جا سکتا ہے۔ اِسی طرح محکمۂ ٹیکس کی جانب سے یہ وضا حت بھی کی گئی ہے کہ I-T Return ؍ کے ا دخال کی مدّت میں کسی قسم کی توسیع نہیں کی جا ئے گی۔
****************************
 جائیکواڑی ڈیم کے بالائی حصّے میں بڑے پیما نے پر تا لاب تعمیر کر دیئے گئے ہیں۔ جِس کے سبب یہ ڈیم گذشتہ 41؍ برسوں میں صرف 4؍ مرتبہ مکمّل بھر سکا۔ لہٰذا مراٹھواڑہ کو اُس کے حق کا پانی فراہم کر نے کے لیے حکو مت ہائی کورٹ میں ازسرِ نو حلف نامہ داخل کرے۔ یہ بات ماہر آبY.R.Jadhavنے کل اورنگ آباد میں جائیکواڑی آ بی کانفرنس کے موقع پر کہی۔ اِس موقع پر جناب Jadhav کی کتاب ’’جائیکواڑی چے پانی: نِیایا لین نِکال آنی پُڈھے‘‘ اِس کتاب کا اجراء بھی عمل میں آیا۔ اِس کانفرنس میں مختلف ماہرین نے اپنے خیا لات کااظہار کیا۔
****************************

AIR News Bulletin, Aurangabad 31.07.2017 06.50.mp3

Text-AIR News Bulletin, Aurangabad 31.07.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 July 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.

****

ठळक बातम्या



** २०१७ संकल्प वर्ष बनवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

** शेतमालाची साठवणूक करण्यासाठी रेल्वे विभागाच्या मदतीनं शीतगृहांची साखळी; राज्यात ५२ शीतगृह उभारणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

**  पीक विमा भरण्याचा आजचा शेवटचा, कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिवसभर बँकेत थांबण्याचे कृषी आयुक्तांचे आदेश

** आयकर विवरण पत्र भरण्याचाही आजचा शेवटचा दिवस

आणि

**  मराठवाड्याला हक्काचं पाणी देण्यासाठी राज्य शासनानं उच्च न्यायालयात नव्यानं शपथपत्र दाखल करण्याचं जलतज्ञ या. रा. जाधव यांचं आवाहन  

****

आता सविस्तर बातम्या



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१७ हे वर्ष संकल्प वर्ष बनवण्याचं आवाहन केलं आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रातीचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑगस्ट महिन्यात अस्वच्छता- भारत छोडो, गरीबी - भारत छोडो, भ्रष्टाचार- भारत  छोडो, दहशतवाद - भारत छोडो, जातीयवाद - भारत छोडो, संप्रदायवाद - भारत  छोडो, असे संकल्प करण्याचं आवाहन जनतेला केलं आहे.

मन की बात या आकाशवाणीवरून प्रसारीत होणाऱ्या कार्यक्रमात काल ते बोलत होते. देशाला  आज 'करेंगे या मरेंगे' या घोषणेची नव्हे तर नव्या भारताच्या संकल्पाशी जोडून घेण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. यासाठी येत्या ९ ऑगस्टला क्रांती दिनी संकल्पापासून त्याच्या सिद्धतेपर्यंतचं महाअभियान चालवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. सामाजिक अर्थशास्त्राचं महत्त्व विशद करत पंतप्रधान मोदी यांनी येत्या रक्षाबंधनाच्या सणाला घरगुती तयार करण्यात आलेल्या राख्यांची तर गणेशोत्सवात पर्यावरणस्नेही गणपती  खरेदी करण्याचं आवाहन केलं. यामुळे देशातल्या शेकडो लोकांना रोजगार मिळतो, त्यांचं कुटुंब यावर चालतं असं ते म्हणाले.

****

बाजारात योग्य दर मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करता यावी, तोपर्यंत शेतमालाची साठवणूक करण्यासाठी सरकारनं रेल्वे विभागाच्या मदतीनं देशभरात शीतगृहांची साखळी निर्माण करण्याचं ठरवलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव इथं भारतीय रेल्वे आणि लासलगाव विभाग सहकारी खरेदी विक्री संघाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय शीतगृहाच्या भूमिपूजनप्रसंगी काल ते बोलत होते. यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. देशात अशा प्रकारचे २२७ शीतगृह उभारण्यात येणार असून त्यापैकी ५२ शीतगृह महाराष्ट्रात उभारली जाणार असल्याचं ते म्हणाले. या ५२ शीतगृहांपैकी २५ शीतगृह लवकरात लवकर बांधून पूर्ण होतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

नाशिक इथल्या मेळा बस स्थानकाचं विमान तळाच्या धर्तीवर बस पोर्टमध्ये रूपांतर करण्यात येणार असून त्याचंही भूमिपूजन काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. नाशिकच्या या बसपोर्टच्या धर्तीवर राज्यातल्या प्रत्येक शहरात असं बसपोर्ट उभारण्यात येईल, असं त्यांनी यावेळी जाहीर केलं.

****

शिर्डी रेल्वे स्थानकावर विविध उपक्रमांचं उद्घाटन तसंच ‍साईनगर शिर्डी ते मुंबई साप्ताहिक अतिजलद गाडीचा शुभारंभ रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते काल करण्यात आला. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे रोजगार हमी योजना आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात रेल्वेच्या विकासासाठी एक लाख, २६ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं काम सुरू असल्याचं प्रभू यांनी यावेळी सांगितलं. देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येत असतात, त्यांच्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून शिर्डी इथं अनेक सोई सुविधांच्या उभारणीवर भर देण्यात येत असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

पीकविमा भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यानं बँकेत शेतकऱ्यांची मोठी गर्दी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिवसभर बँकेत थांबण्याचे आदेश कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांना पीक विमा भरण सुलभ व्हावं यासाठी बँकांनीही जास्तीत जास्त खिडक्या सुरू करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

दरम्यान, काल सुटी असूनही पिक विमा भरण्यासाठी बँकांचं कामकाज सुरू होतं. शेतकऱ्यांनीही पिक विमा भरण्याकरता बँकांमध्ये गर्दी केली होती. अनेक ठिकाणी बँकांची यंत्रणा कमी पडल्यामुळे शेतकरी विमा भरू शकले नाहीत. बीड जिल्ह्यातल्या परळी इथं बँकेच्या कामकाजाची वेळ संपल्यामुळे रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांनी बँकेवर दगडफेक केली. यामध्ये एका महिला शेतकऱ्यांसह दोन जण जखमी झाले. नांदेड जिल्ह्यात पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रीच बँकेसमोर रांगा लावल्या होत्या. जालना जिल्ह्यातही जामखेड इथं पिक विमा भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांमध्ये धक्काबुक्कीची घटना घडल्यानंतर पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला. परभणीत जिल्ह्यात पोलिस बंदोबस्तात पिक विमा बँकांमध्ये शेतकऱ्यांनी भरला.

विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे.

कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विम्याचा हप्ता भरण्यासाठी मुदत वाढ देण्याकरता केंद्र सरकारकडे परवानगी मागितली असल्याचं बुलडाणा इथं बोलतांना सांगितलं. मुख्य सचिव सुमित मलिक यांनी औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना पिक विमा भरण्याची मुदत वाढवण्याबाबत गांभिर्यानं विचार केला जात असल्याचं सांगितलं.

****

आयकर विवरण पत्र सादर करण्याचीही आजची शेवटची तारीख असून या पार्श्वभूमीवर आयकर विभागानं` ‘आयकर सेतू ॲप’ काल सुरू केलं. या ॲपच्या मदतीनं आयकर विवरण पत्र सादर करणं, पॅनकार्डसाठी अर्ज, पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्न करणे आणि उद्गमस्थानी झालेल्या कर कपातीची माहिती मिळू शकेल. गुगल स्टोअरवरून हे ॲप प्राप्त करता येऊ शकेल किंवा या ॲपची लिंक मिळवण्यासाठी ७३०६५२५२५२ या क्रमांकावर मिस्ड कॉल करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

दरम्यान, आयकर विवरण पत्र भरण्यास मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव नसल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागानं स्पष्ट केलं  आहे.

****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात धरणं बांधली गेल्यामुळे गेल्या ४१ वर्षात हे धरण फक्त चार वेळाच भरलं, कायद्याची अंमलबजावणी झाल्यास मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळेल यासाठी राज्य शासनानं उच्च न्यायालयात नव्यानं शपथपत्र दाखल करावं  असं आवाहन जलतज्ञ या. रा. जाधव यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं काल घेण्यात आलेल्या जायकवाडी पाणी परिषदेत ते बोलत होते.

या परिषदेत जाधव यांनी लिहीलेल्या ‘जायकवाडीचे पाणी: न्यायालयीन निकाल आणि पुढे’ या ग्रंथाचं प्रकाशनही करण्यात आलं. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर ज्येष्ठ विचारवंतांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. परिषदेला  विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, डॉक्टर भुजंगराव कुलकर्णी, कमलकीशोर कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, काल नाशिक इथं एका कार्यक्रमात बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

खानदेश आणि मराठवाडा ‘सुजलाम सुफलाम करण्यासाठी पार आणि दमणगंगा खोऱ्यातून गोदावरी नदीच्या खोऱ्यात पाणी आणण्याचा सरकारचा प्रस्ताव असल्याचं सांगितलं. यामुळे नाशिकसह मराठवाड्यातला पाण्याचा वाद संपुष्टात येईल.

****

राज्य परीवहन महामंडळानं श्रमिक तास कमी केल्याच्या निषेधार्थ काल औरंगाबाद मधल्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेतल्या कामगारांनी कार्यशाळेसमोर निदर्शनं केली. यावेळी कामगारांनी महामंडळाच्या परिपत्रकाची होळी करत जोरदार घोषणाबाजी केली.  राज्यातल्या दापोडी, औरंगाबाद आणि नागपूर मध्यवर्ती कार्यशाळेतल्या कामगारांचे २०० श्रमिक तास कमी करण्याचे परीपत्रक महामंडळाच्यावतीनं नुकतेच जारी करण्यात आले आहे. एका तज्ञ समितीनं या श्रमिकांचे तास कमी करण्याची शिफारस केली आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिरातले सर्व लिलाव यापुढे ऑनलाइन पद्धतीनं केले जाणार आहेत. यासाठी तुळजापूर मंदिर संस्थानातल्या सर्व कर्मचाऱ्यांना उस्मानाबादच्या राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्राच्या वतीनं प्रशिक्षण देण्यात आलं. राज्य सरकारनं एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त राखीव किंमतीच्या लिलावासाठी ई- लिलाव प्रणालीचा वापर एक जानेवारी २०१५ पासून बंधनकारक केला आहे.
****

Sunday, 30 July 2017

AIR News Bulletin, Aurangabad 30.07.2017....17.25

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.07.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 30 July 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

प्रत्येक क्षेत्रात मुली देशाचं नाव उज्वल करत असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ‘मन की बात’ या कार्यक्रमात ते आज बोलत होते. महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आपल्या संघाला विश्वचषक जिंकता आला नसला तरी, त्या अपयशाचं ओझं नागरिकांनी आपल्या खांद्यावर घेतलं, ही समाधानाची बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं. आता येणारा सणावारांचा काळ गरीब आणि कामकरी वर्गाच्या आर्थिक लाभासाठी कारणीभूत ठरावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नवभारताच्या निर्मितीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करत व्हिडिओ, ब्लॉग्ज, पोस्टस्‌सह नवनव्या संकल्पना तरुणांनी आणाव्यात असं आवाहन त्यांनी केलं. राष्ट्र निर्मितीसाठी आपल्याला कुठे पोहचायचं आहे आणि त्यात आपलं काय योगदान असू शकतं याचा विचार करावा असं पंतप्रधानांनी सांगितलं.

****

मालकाला संयुक्तिक आणि न्याय्य कारणासाठी अनेकदा भाडेकरुकडून आपल्या जागेचा ताबा हवा असतो. त्यावेळी अशा प्रकरणांना खटल्याच्या कोणत्याही टप्प्यावर न्यायालयांनी सुनावणीसाठी प्राधान्य दिलं पाहिजे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. या मुद्यावरुन मालक आणि भाडेकरुमध्ये होणाऱ्या वादाची प्रकरणं वेगानं निकाली काढली जावीत हा भाडेनियंत्रण कायद्याचा मूळ उद्देश असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. अशा खटल्यांचा निकाल लावण्याकडे न्यायालयं पुरेसं लक्ष देतील अशी आशा न्यायमूर्ती सप्रे आणि भानुमती यांच्या पीठानं व्यक्त केली.

****

आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना कुटुंबीय किंवा समाज घटकांकडून अनेकदा त्रास दिला जातो. त्यांना वाळीत टाकलं जातं, जात पंचायतीकडून अवैधरित्या शिक्षा केली जाते, प्रसंगी मारहाण अथवा हत्याही केली जाते. या पार्श्वभूमीवर अशा जोडप्यांना संरक्षण देण्यासाठी तसंच त्यांना विरोध करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी नवा कायदा येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात संसदेत एक विधेयक सादर करण्यात आलं आहे. वैयक्तिक स्वातंत्र्य आणि विवाहासाठी जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य सुरक्षित असणं हा मूलभूत अधिकारांचा भाग असल्याचं मत, हे विधेयक सादर करणारे वाय एस आर काँग्रेस पक्षाचे खासदार व्ही.विजयसाई रेड्डी यांनी म्हटलं आहे.

****

केंद्र सरकारनं सर्व खासगी दूरचित्रवाहिन्या आणि रेडिओ केंद्रांना सरकारचा लसीकरण कार्यक्रम - मिशन इंद्रधनुषचा प्रचार-प्रसार करण्यास सांगितलं आहे. सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून खासगी वाहिन्यांनीही लसीकरणाच्या मोहीमेत सहभाग नोंदवावा असं सरकारनं म्हटलं आहे. केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयानं यासंदर्भातलं पत्र सर्व खासगी दूरचित्रवाहिन्या आणि रेडिओ केंद्रांना लिहिलं आहे.

****

गुजरातमधल्या काही भागात आजही मुसळधार पाऊस सुरु असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. बनासकांठा जिल्ह्याला पूराचा सर्वात जास्त फटका बसला असून, मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आज याठिकाणी भेट दिली. पूरग्रस्त भागात २० लाखांपेक्षा अधिक अन्न पाकीटं वाटण्यात आली आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, लष्कर आणि नौदलाच्या मदतीनं बचावकार्य सुरु आहे.

राजस्थान मध्येही काही भागात पूर परिस्थिती कायम आहे. ओडीशा आणि आसाम मध्येही मुसळधार पाऊस सुरु असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे.

****

रेल्वेच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केलं आहे. शिर्डी रेल्वे स्थानकात विविध विकासकामांचा प्रारंभ आज प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ‍साईनगर शिर्डी ते मुंबई साप्ताहिक रेल्वे सेवेचा आरंभही प्रभू यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. देशात रेल्वेच्या विकासाला गती देण्याबरोबरच महाराष्ट्रात रेल्वेच्या विकासासाठी एक लाख ३६ हजार कोटी रुपयांचे विविध प्रकल्प सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात रेल्वेचं जाळं वाढवण्यावर भर देणार असल्याचं प्रभू म्हणाले.

****

औरंगाबाद विभागात सुरु असलेल्या सरकारच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी आणि यासंबंधीच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांनी दिले आहेत. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात विविध विकासकामांची आणि योजानांची आढावा बैठक आज मलिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यावेळी उपस्थित होते. मराठवाड्यात सुरु असलेल्या विविध विकासकामांना गती द्यावी असं मलिक यांनी सांगितलं. यावेळी प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, स्वच्छ महाराष्ट्र अभियान यासारख्या योजनांचा आढावा मलिक यांनी घेतला.

****

AIR News Bulletin, Aurangabad 30072017 13.00.mp3

Text-AIR News Bulletin, Aurangabad 30.07.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 July 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जुलै २०१ दुपारी .००वा.

****

अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतीचं होणारं मोठं नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे पीक विमा दावे त्वरित मंजूर होण्यासाठी विमा कंपन्यांना अधिक कार्यतत्पर करण्याची योजना तयार केली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाच्या ३४व्या भागात ते आज बोलत होते.

देशात लागू करण्यात आलेला वस्तू आणि सेवा कर कायदा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम करत असल्याचं ते म्हणाले. ही केवळ एक कर सुधारणा नसून, प्रामाणिक संस्कृतीला बळ देणारी आणि सामाजिक सुधारणा करणारी गोष्ट असल्याचं ते म्हणाले.

असहकार आंदोलन आणि भारत छोडो आंदोलनाचा प्रारंभ तसंच देशाची स्वातंत्र्यप्राप्ती, अशा महत्वाच्या ऐतिहासिक घटना ऑगस्ट महिन्यात घडल्यानं हा क्रांतीचा महिना असून, यंदाच्या स्वातंत्र्यदिनी प्रत्येक भारतीयानं एक एक संकल्प करावा आणि २०२२ साली साजरा होणाऱ्या ७५व्या स्वातंत्र्यदिनापर्यंत तो पूर्ण करावा, असं आवाहन त्यांनी केलं.

यंदा आपण भारत छोडो आंदोलनाचं ७५वं वर्ष साजरं करणार आहोत, असं सांगत, भारत छोडो हा नारा डॉ. युसुफ मेहर अली यांनी दिल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. यानिमित्त नरेंद्र मोदी ॲप वर तरुणांसाठी भारत छोडो प्रश्नमंजुषा आयोजित केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या भाषणात कोणते मुद्दे समाविष्ट असावेत याबद्दलची सूचना पाठवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

ऑगस्ट महिन्यापासून भारतात अनेक सण सुरु होतात, त्यामुळे हा आनंदाचा काळ असतो, मात्र आपले सण सामाजिक सुधारणेचं माध्यम बनावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सर्वांनी मातीच्या गणेश मूर्ती आणाव्यात आणि गणेश उत्सव साजरा करताना सामाजिक एकता, जागरुकता आणि संस्कार रुजवण्याच्या दृष्टीनं लोकमान्य टिळकांचे याबाबतचे विचार पुढे न्यावे, असंही पंतप्रधान म्हणाले.

****

दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय धोका असल्यानं कोणत्याही देशानं त्याचा माध्यम म्हणून, तसंच आपल्या राष्ट्रीय रणनीतीसाठी वापर करु नये, असं प्रतिपादन संयुक्त राष्ट्र संघातले भारताचे राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी केलं आहे. `यूएन ग्लोबल काऊंटर टेरेरिजम स्ट्रॅटेजी’ या विषयावरील चर्चेत ते बोलत होते. दहशतवादाचा माध्यम म्हणून वापर केला जाऊ नये, यासाठी त्या देशांवर दबाव निर्माण करण्याचं धोरण अधिक तीव्र केलं पाहिजे, असं ते म्हणाले.

****

जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातल्या तहाब इथं दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. काल रात्रीपासून जवानांनी या भागात शोधमोहीम सुरु केली होती. आज पहाटे दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला, त्यानंतर ही चकमक झाली.

****

राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था - आय टी आय मध्ये ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरु करण्यात आली असून, पुढच्या वर्षापासून या अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. मुंबई इथं झालेल्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या शिकाऊ उमेदवारी कायद्यात सुधारणा करण्यात आली असून, राज्यातल्या युवकांना जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थी म्हणून संधी मिळवून देण्यात महाराष्ट्रानं आघाडी घेतली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांच्या पुढाकारातून राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं आधुनिकीकरण होत असल्याची बाब कौतुकास्पद असल्याचं राजीव प्रताप रुडी यावेळी म्हणाले.

****

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस खात्यानं तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं कामाचा दर्जा आणि कार्यक्षमता वाढवावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबई इथं राज्याच्या पोलीस मुख्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परिषदेत ते बोलत होते.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिरातले सर्व लिलाव यापुढे ऑनलाइन पद्धतीनं केले जाणार आहेत. यासाठी तुळजापूर मंदिर संस्थानातल्या सर्व कर्मचाऱ्यांना उस्मानाबादच्या राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्राच्या वतीनं प्रशिक्षण देण्यात आलं. राज्य सरकारनं एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त राखीव किंमतीच्या लिलावासाठी ई- लिलाव प्रणालीचा वापर एक जानेवारी २०१५ पासून बंधनकारक केला आहे.

****

जायकवाडी धरणातला पाणीसाठा ४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणातला जिवंत पाणी साठा ९८३ दशलक्ष घनमीटर वर पोहोचला आहे. धरणात सध्या ४० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे.

सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणात सध्या ८२ पूर्णांक ५४ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा झाला आहे.

****

AIR News Bulletin, Aurangabad HLB 30.07.2017 10.00.MP3

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 30.07.2017 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

३० जुलै २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबई इथं राजभवनात ‘मन की बात - अ सोशल रिव्हॉल्यूशन ऑन रेडिओ’ या पुस्तकाचं प्रकाशन केलं. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यावेळी उपस्थित होते. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांशी संवाद साधतात. त्या कार्यक्रमाचे २३ भाग लिखित स्वरुपात यात समाविष्ट करण्यात आले आहेत. पंतप्रधानांचे विचार आणि दृष्टीकोन समाजवून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले.

****

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३४वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. कार्यक्रमाच्या हिंदी प्रसारणानंतर लगेच प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारण करण्यात येईल.

****

महाविद्यालयातल्या प्राध्यापकांना पदोन्नतीसाठी संशोधन बंधनकारक असण्याची अट शिथील करण्याबाबत विचार सुरु असल्याचं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. उच्च शिक्षणासंदर्भात नवी दिल्ली इथं आयोजित एका राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. या प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी संशोधन कार्याऐवजी विद्यार्थ्यांसमवेत अधिकाधिक सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचा निकष लावला जाईल, असं ते म्हणाले. मात्र विद्यापीठात कार्यरत प्राध्यापकांना पदोन्नतीसाठी संशोधन अनिवार्य असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

****

प्रतिभूती आणि विनियामक मंडळ – सेबी लवकरच भांडवल बाजारासह अन्य संलग्न संस्थांमधील तंत्रज्ञान आणि तत्सम यंत्रणांचा सखोल आढावा घेणार आहे. सायबर हल्ल्यांचा सामना करणं आणि गोपनीय माहिती उघड होण्यापासून रोखणं यासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सायबर हल्ल्याबाबत येणाऱ्या धमक्यांवर सतत लक्ष ठेवण्याची सूचना सेबीनं केली आहे. कोणत्याही तांत्रिक समस्येबाबत तात्काळ माहिती देऊन ती सोडवणं आवश्यक असल्याचंही सेबीनं म्हटलं आहे.

****


Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date: 30 July 2017
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:   30؍جولائی  ۲۰۱۷؁ء
وقت : صبح  ۴۰-۸ سے  ۴۵-۸
 کِسانوں کی کارکردگی میںاضافہ کرنے کے لئے قرض معافی کافیصلہ لیناضروری ہے۔یہ بات سابق مرکزی وَزیرزراعت رکن پارلیمنٹ شرد پوارنے کہی ہے۔پوارکے پارلیمانی اُمورکے پچاس سال مکمل ہونے پرکل اورنگ آبادمیںاُن کاشہری استقبال کیاگیا۔اس استقبالیہ تقریب سے وہ مخاطب تھے۔مرکزی وَزیرٹرانسپورٹ نتن گڈکری ، سابق گورنرشیوراج پاٹل چاکورکرکے ہاتھوں پوارکوسپاسنامہ اوریادگاری نشانی دے کرخیرمقدم کیاگیا۔ نتن گڈکری نے اس موقع پراپنی مخاطبت میںپوارکے کام کاج کی ستائش کی ۔
شیوراج پاٹل چاکورکرسمیت خواتین وبہبوداطفال وَزیرپنکجامنڈے ، بھارتیہ جنتاپارٹی کے ریاستی صدررائوصاحب دانوے، کانگریس ریاستی صدر رکن پارلیمنٹ اشوک چوہان،راشٹروادی کانگریس پارٹی کے ریاستی صدرسُنیل تٹکرے ، قانون سازکونسل میںحزب مخالف رہنمادھننجے منڈے ، رکن پارلیمنٹ چندرکانت کھیرے نے اس موقع پرخطاب کیا۔
 دیوگیری کالج کے احاطے میںہوئے اس پروگرام سے قبل اس احاطے میںقائم کئے گئے شاردابائی پوارلڑکیوں کے ہاسٹل کاافتتاح پوارکے ہاتھوں عمل میںآیا۔اس ہاسٹل میںچارسوطالبات کی رہائش کاتمام جدیدسہولتوں کے ساتھ انتظام کیاگیاہے۔
****************************
 وَزیراعظم نریندرمودی آج آکاشوانی سے نشرہونے والے ’’من کی بات‘‘ اس پروگرام کے تحت عوام سے خطاب کریںگے۔اس سیریز کایہ 34؍واں حصّہ ہے۔آکاشوانی اوردُوردرشن کے تمام چینلس پرصبح گیارہ بجے اس پروگرام کونشرکیاجائے گا۔
****************************
 وَزیراعظم فصل بیمہ اسکیم میںکسانوں کوشامل کرنے کے لئے آج ریاست کے دیہی اورنیم شہری علاقوں کے بینکس کھلے رہیںگے۔اس کے ساتھ ہی بینکوں نے قرض دارکسانوں کے لئے ای کے وائے سی کی شرط فی الحال ختم کرکے آف لائن درخواستیں قبول کرناشروع کردیاہے۔اس اسکیم میں شامل ہونے سے کوئی بھی محروم نہیںرہے گااس کاخیال رکھاجارہاہے۔یہ بات وَزیراعلیٰ دیویندرپھڑنویس نے کہی۔وزیراعظم فصل بیمہ اسکیم میں خریف ہنگام کے لئے شامل ہونے کاکل کاآخری دن ہے۔اب تک تقریباً چارلاکھ کسان اس اسکیم میںشامل ہوگئے ہیں۔
****************************
 آئندہ ہنگام میںسویابین کوضمانتی نرخ سے خریداجائے گا۔ اس کی اطلاع مہاراشٹر زرعی کمیشن کے صدرپاشاہ پٹیل نے دی۔وہ کل لاتور میں صحافتی کانفرنس سے مخاطب تھے۔سویابین کے نرخ مستحکم رہیں اس کے لئے مرکزی حکومت کے سطح پرکوشش جاری ہیں۔یہ بات پاشاہ پٹیل نے کہی۔
****************************
 اورنگ آبادمیونسپل کارپوریشن کے کارپوریٹرشیخ ضمیر احمدقادری کے چھپربندذات کے سرٹیفکیٹ کوذات جانچ کمیٹی نے غیرقانونی قراردیاہے۔ شہر کے عارف کالونی ،پرگتی کالونی سے دیگرپچھڑے ہوئے ذاتوں کے لئے مختص وارڈسے وہ منتخب ہوئے تھے۔اُن کے سیاسی حریف اُمیدوارواحدعلی نے اُن کے ذات سرٹیفکیٹ کوچیلنج کیاتھا۔ہائی کورٹ نے قادری کے ذات سرٹیفکیٹ کی جانچ کرنے کاحکم ذات جانچ کمیٹی کودیاتھا۔
****************************
 ہندوستان۔سری لنکاکے درمیان جاری سری لنکاکے گال میںہوئے پہلے کرکٹ ٹیسٹ میچ میںہندوستان نے 304؍ رنوں سے فتح حاصل کی۔ کل مقابلے کے چوتھے دن بھارت نے 3؍ وکٹس پر240؍رن بناکراپنی دوسری باری ختم کرنے کااعلان کردیا۔ تاہم پہلی اننگز میں بنائے  600؍ رنز کی بنیادپرہندوستان نے سری لنکاکے سامنے کامیابی حاصل کرنے کے لئے 550؍رنزکانشانہ رکھا۔سری لنکاکی پوری ٹیم 245؍رنزپرآئوٹ ہوگئی۔ رویندرجڈیجہ اورروی چندراشوین نے تین ،تین وکٹس حاصل کئے۔
 محمدشمی اوراُومیش یادونے ایک ایک وکٹ حاصل کی۔پہلی اننگ میں190؍ رنزبنانے والے شیکھردھون مین آف دی میچ قراردئیے گئے۔ اسی کے ساتھ ہندوستان نے تین مقابلوں کی اس سیزیز میںایک صفر سے سبقت حاصل کرلی ہے۔دوسرامقابلہ تین اگست سے سری لنکاکے مقام کولمبومیںکھیلاجائے گا۔
****************************
 اورنگ آبادشہرمیںغیرقانونی مذہبی مقامات منہدم کرنے کاکام کل بھی جاری تھا۔پنڈلک نگرعلاقے میںایک مندراوردیگرچندمذہبی مقامات کے غیرقانونی قبضہ جات کل ہٹائے گئے۔اس بیچ میونسپل کارپوریشن کی کل ہوئی عام میٹنگ میںمذہبی مقامات ہٹانے کے ہائی کورٹ کے فیصلے کوسپریم کورٹ میںچیلنج کرنے کامطالبہ کارپوریٹرس نے کیا۔اس پرسینئرماہرقانون سے مشورہ کرکے فیصلہ کرنے کاحکم میئربھگوان گھڑاموڑے نے انتظامیہ کودیا۔
****************************

30.07.2017_8.40_8.45_AM_URDU.mp3


AIR News Bulletin, Aurangabad 30.07.2017 06.50.mp3

Text-AIR News Bulletin, Aurangabad 30.07.2017 06.50

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 July 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.
****
ठळक बातम्या

** शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय आवश्यक - खासदार शरद पवार
** प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी आज बँका सुरू राहणार
** सोयाबीन हमी भावानं खरेदी केलं जाणार- कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल
आणि
** श्रीलंकेविरूद्धचा पहिला कसोटी क्रिकेट सामना भारतानं ३०४ धावांनी जिंकला
****
आता सविस्तर बातम्या

शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेणं आवश्यक असल्याचं माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभुषण खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल काल औरंगाबाद इथं त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला, या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते पवार यांना मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणात पवार यांनी विनायकराव पाटील यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे विधानसभा निवडणुकीची सर्वप्रथम उमेदवारी मिळाल्याचा कृतज्ञतापूर्ण उल्लेख केला.
****
भारत चीन आणि भूतान सीमेवर डोकलाम भागात निर्माण झालेला प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं ठोस निर्णय घेणं आवश्यक असल्याचं पवार यांनी यावेळी नमूद केलं. किल्लारी भूकंप, विद्यापीठ नामविस्तार, यासह मराठवाड्यातल्या विविध आठवणींना पवार यांनी यावेळी उजाळा दिला.
नितीन गडकरी यांनी यावेळी केलेल्या भाषणात, पवार यांनी आपल्या कामातून पदांची प्रतिष्ठा वाढवली, प्रवाहाविरोधात जाऊन सक्षम नेतृत्व तयार करून ते टिकवलं, असं मत व्यक्त केलं. विकासाचं लोकाभिमुख राजकारण केल्यामुळे पवार हे गरीब शेतकऱ्यांपासून श्रीमंत उद्योजकापर्यंत लोकप्रिय नेते असल्याचं गडकरी म्हणाले. शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासह महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार चंद्रकांत खैरे यांची समयोचित भाषणं यावेळी झाली. देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमापूर्वी या परिसरात उभारण्यात आलेल्या शारदाबाई पवार मुलींच्या वसतीगृहाच्या कोनशीलेचं अनावरण पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. या वसतीगृहात चारशे मुलींच्या निवासाच्या सर्व  आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३४वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी आज राज्यातल्या ग्रामीण आणि निमशहरी भागातल्या बँका सुरू राहणार आहेत. याबरोबरच बँकांनी कर्जदार शेतकऱ्यांसाठी ई-केवायसीची अट तात्पुरती बाजूला ठेवून ऑफलाईन अर्ज स्विकारण्यास सुरूवात केली आहे. या योजनेत सहभागापासून कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगामासाठी सहभागी होण्यासाठी उद्याची  अंतिम मुदत असून  आतापर्यंत सुमारे चार लाख शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे.
****
मराठवाडा आणि खान्देशला जोडणाऱ्या औरंगाबाद - सिल्लोड - अजिंठा - जळगाव या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं एका वर्षात पूर्ण केलं जाईल, अस केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं.
औरंगाबाद -सिल्लोड-जळगाव राष्ट्रीय महामार्ग या सिमेंट रस्त्याच्या कामाच्या कोनशीलेचं अनावरण गडकरी यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातल्या वाटूर फाटा इथं शेगाव ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा शुभारंभही गडकरी यांच्या हस्ते काल करण्यात आला. हा पालखी मार्ग २ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत आहे, मराठवाड्यातल्या रस्ते विकासासाठी ६५ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
येत्या हंगामात सोयाबीन हमी भावानं खरेदी केलं जाणार असल्याची माहिती कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे. ते काल लातूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सोयाबीनचा भाव स्थिर राहावा यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर आतापासूनच प्रयत्न सुरु असल्याचं ते म्हणाले. सोयाबिनला चांगला भाव देण्यासाठी खाद्य तेलावर आयात शुल्क वाढवण्यात येणार आहे, आयात शुल्क आणि ग्राहकांना मिळणारा दर याचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
भारत- श्रीलंका यांच्यातील श्रीलंकेतल्या गॉल इथं झालेला पहिला कसोटी क्रिकेट सामना भारतानं ३०४ धावांनी जिंकला. काल सामन्याच्या चौथ्या दिवशी सुरुवातीला भारतानं आपला दुसरा डाव २४० धावांवर घोषित केला, मात्र पहिल्या डावात केलेल्या ६०० धावांच्या बळावर भारतानं श्रीलंकेसमोर सामना जिंकण्यासाठी ५५० धावांचं लक्ष्य ठेवलं. श्रीलंकेचा संघ २४५ धावात सर्वबाद झाला. रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी तीन, तर मोहम्मद शमी आणि उमेश यादवनं प्रत्येकी एक बळी घेतला. पहिल्या डावात १९० धावा करणारा शिखर धवन सामनावीर ठरला. यासोबतच भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत एक शून्यनं आघाडी मिळवली असून दुसरा सामना तीन ऑगस्टपासून श्रीलंकेतल्या कोलंबो इथं खेळला जाईल. 
****
औरंगाबाद महानगरपालिकेचे नगरसेवक शेख जमीर अहमद कादरी यांचं विमुक्त जाती प्रवर्गातलं छप्परबंद जातीचं प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं अवैध ठरवलं आहे. शहरातल्या आरेफ कॉलनी- प्रगती कॉलनी या इतर मागावर्गीयांसाठी आरक्षित वॉर्डातून ते निवडून आले होते. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार वाहेद अली यांनी त्यांच्या जात प्रमाणपत्राला आव्हान दिलं होतं. उच्च न्यायालयानं कादरी यांच्या जात प्रमाणपत्राच्या तपासणीचे निर्देश जात पडताळणी समितीला दिले होते.
****
औरंगाबाद शहरातल्या अनधिकृत धार्मिक स्थळ पाडण्याचं काम कालही सुरूच होतं. पुंडलिकनगर भागातलं एक मंदिर आणि अन्य काही धार्मिक स्थळाचं अतिक्रमण काल हटवण्यात आलं.
दरम्यान, महापालिकेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत धार्मिक स्थळ हटवण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची मागणी नगरसेवकांनी केली, यावर ज्येष्ठ विधीज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घेण्याचे निर्देय महापौर भगवान घडामोडे यांनी प्रशासनाला दिले.
****
लातूर इथल्या मध्यवर्ती अशा गंजगोलाई परिसरात काल महापालिकेतर्फे अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्यात आली. महापालिका हद्दीतील अतिक्रमणांची मनपा आयुक्त-जिल्हाधिकारी, जी.श्रीकांत यानी याआधीच पाहणी केली होती. तसंच या मोहिमेबाबत मागील तीन दिवस या परिसरा भोंग्याव्‍दारे सूचनाही देण्‍यात आली. त्यानुसार अतिक्रमणातील जागा मोकळी करून देण्यास संबंधितांनी सुरूवात केली होती. ज्यांनी अतिक्रमण काढलं नाही त्यांचं काल अतिक्रमण काढण्यात आलं.
****
नांदेड ते मुंबई विमानसेवा सुरु करण्याची मागणी खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. याबाबत चव्हाण यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजु यांना निवेदन दिलं आहे. उडान या केंद्र सरकारच्या  योजने अंतर्गत गेल्या एप्रिल महिन्यात नांदेड- हैद्राबाद विमानसेवा सुरु झाली, त्याचवेळी मुंबईसाठीही  अशी सेवा  सुरु करण्याची घोषणा करण्यात आली होती. या सेवेचा लाभ नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, वाशिम, यवतमाळ आणि निझामबाद जिल्ह्यातल्या नागरिकांना मिळू शकेल, असं या निवेदनात म्हटलं आहे.
****
बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांना काल औरंगाबाद शहरात प्रवेश करण्यास पोलिसांनी मनाई केल्यामुळे विमानतळावरूनचे दिल्लीला माघारी जावं लागलं. वेरूळ - अजिंठा लेणी पाहण्यासाठी त्या काल औरंगाबादमध्ये आल्या होत्या. मजलिस ए इत्तेहादुल मुस्लमीन - एम.आय.एम.च्या कार्यकर्त्यांनी विमानतळासह त्यांच्या प्रवेशाला विरोध केला. विमानतळावर या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
****
जिल्‍हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब मुदतीत सादर न केलेल्‍या नांदेड जिल्ह्यातल्या १४४ उमेदवारांना पुढील पाच वर्षासाठी अपात्र  ठरवण्‍यात आलं आहे. नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काल ही माहिती दिली.
****