Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 29 February 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
· महाराष्ट्र महापालिका नगरपंचायती आणि
औद्योगिक वसाहत कायदा सुधारणा विधेयक विधान परिषदेत संमत.
· मुस्लिम समाजाला पाच टक्के शैक्षणिक
आरक्षण देणारा कायदा लवकरच - अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची घोषणा.
· नांदेड इथल्या प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे
वाङमय पुरस्कार जाहीर.
आणि
· लातूर जिल्ह्यातल्या रेणा मध्यम प्रकल्पातून
पाणी सोडण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगिती.
****
महाराष्ट्र महापालिका नगरपंचायती आणि
औद्योगिक वसाहत कायदा सुधारणा विधेयक विधान परिषदेनं काल संमत केलं. नगरविकासमंत्री
एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक मांडलं. या सुधारणेनुसार एका प्रभागातून एकापेक्षा अधिक
नगरसेवकांची निवड तसंच नगराध्यक्ष आणि महापौरांची थेट जनतेतून निवड करण्याची या कायद्यातली
तरतूद रद्द होणार आहे.
आता पूर्वीप्रमाणे एका प्रभागातून एकच
नगरसेवक निवडला जाईल. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या सुधारणेला विरोध दर्शवत,
यामुळे घोडेबाजार वाढण्याची शक्यता असल्याचं सांगितलं. ही सुधारणा म्हणजे राजकीय पक्षांचे
कार्यकर्ते तसंच नागरिकांवर अन्याय असल्याचं, दरेकर म्हणाले. मतदानानंतर हे विधेयक
बहुमतानं संमत झालं.
****
मुस्लिम समाजाला शैक्षणिक संस्थामध्ये
प्रवेशासाठी पाच टक्के आरक्षण देणारा कायदा लवकरच करुन त्याची अंमलबजावणी केली जाईल,
अशी घोषणा अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी काल विधान परिषदेत केली. आगामी
शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी या कायद्याची अंमलबजावणी केली
जाईल असं मलिक यांनी सांगितलं. यासंदर्भात सर्व बाबी तपासूनच सरकार निर्णय घेईल असं
सांगत, मागास समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका असल्याचं, मलिक यांनी स्पष्ट केलं.
****
विभागीय स्तरावर सुरु केलेल्या मुख्यमंत्री
कार्यालयाचा तालुका पातळीपर्यंत विस्तार विचाराधीन असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी म्हटलं आहे. ते काल विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर
देतांना बोलत होते. विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्याची अंमलबजावणी केली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्याची अधिक
प्रगती करतांना सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन राज्यासाठी विकास कामं करायला बांधील
असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
****
ग्रामविकास विभागामार्फत राबवण्यात
येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेला आता ‘आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना’
असं नाव देण्यात आलं आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल विधानसभेत ही घोषणा
केली. नोव्हेंबर २०१६ पासून राबवण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना
तालुकास्तरीय तसंच जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात येतात. मंत्रिमंडळ
बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून, या पुरस्कारांचे वितरण दरवर्षी आर.
आर. पाटील यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजे १६ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरावर केलं जाईल,
अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.
****
नागरिकांच्या ‘इतर मागासप्रवर्गाची
जातीनिहाय जनगणना’ या विषयावर काल विधानसभेत चर्चा झाली. नागरिकांच्या इतर मागासप्रवर्गाची
जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव विधीमंडळानं केंद्र सरकारकडे पाठवला होता. मात्र अनुसूचित
जाती -जमाती व्यतिरिक्त अन्य प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्यात येत नसल्याचं, संबंधित
विभागाकडून सांगण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ग्राहक संरक्षण मंत्री
छगन भुजबळ यांनी, याबाबत बोलताना, इतरमागास प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी,
हा मुद्दा केंद्राकडे सर्वांनी मिळून लावून धरावा, अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते
देवेंद्र फडणवीस यांनीही, यासंदर्भात एका शिष्टमंडळानं पंतप्रधानांची भेट घेऊन या मागणीचा
पाठपुरावा करावा, अशी मागणी केली.
****
विना अनुदानित शाळांना अनुदान देण्याची
मागणी तसंच शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा मुद्दा काल विधान परिषदेत
लक्षवेधीच्या रुपात मांडण्यात आला. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शिक्षक
सदस्य विक्रम काळे यांच्यासह अनेकांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. यासंदर्भात
समिती नेमण्यात आली असून या समितीची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असं शालेय शिक्षण
मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
****
मराठा आरक्षणाची सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या
घटनापीठाकडे वर्ग करावी, अशी मागणी आर आर पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी
सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडे केलेल्या अर्जात
पाटील यांनी, यासंदर्भात पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ तत्काळ गठीत करून, त्या घटनापीठाने
मराठा आरक्षणाबाबत निर्णय द्यावा अशी विनंती केली. मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवलेल्या
मराठा आरक्षणावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. राज्य सरकारने मराठा
आरक्षणाबाबत गांभीर्य दाखवून हे आरक्षण कशा प्रकारे टिकवण्यात येईल याचा खुलासा करावा,
असंही पाटील यांनी म्हटलं आहे.
****
औरंगाबाद महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी
जनसहभागातून जाहीरनामा तयार करण्यात येणार असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितलं आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं
काल पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. या निवडणुकीत
महाआघाडीबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चेनंतर निर्णय घेतला जाणार असल्याचं त्या म्हणाल्या.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचे विविध पुरस्कार
काल प्रदान करण्यात आले. कुसुमाग्रज काव्यपुरस्कार काव्यसमीक्षक डॉ.अक्षयकुमार काळे
यांना, तर कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्यपुरस्कार कवी दिनकर मनवर यांना समीक्षक
डॉ.सुधीर रसाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अकरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह,
शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
नांदेड इथल्या प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानच्या
वाङमय पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यंदा पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये ज्येष्ठ
लेखक आणि विचारवंत सुरेश द्वादशीवार, डॉ. अरुण शिंदे, रमाकांत देशपांडे आणि निर्मलकुमार
सूर्यवंशी यांचा समावेश आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन आणि पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ. सुरेश सावंत यांनी
काल नांदेड इथं ही माहिती दिली. अकरा हजार रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, असं
या पुरस्काराचं स्वरूप असून, येत्या पंधरा मार्चला नांदेड इथं एका विशेष समारंभात हे
पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
****
लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातल्या
भंडारवाडी इथल्या रेणा मध्यम प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यास जिल्हाधिकारी जी.श्रीकांत
यांनी स्थगिती दिली आहे. पाणी न सोडण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं गेल्या तीन दिवसांपासून
आंदोलन सुरु होतं. जिल्हाधिकाऱ्यांनी काल आंदोलनकर्त्यांची बैठक घेतली, त्यावेळी हा
निर्णय घेतला. नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या संयुक्त बैठकीत ऑक्टोबर महिन्यापर्यंत
पाणी पिण्यासाठी पुरेल असं नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले. संबंधित यंत्रणेनं प्रकल्पातून
होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी
यावेळी दिले.
****
परभणी इथल्या जिंतूर कृषी उत्पन्न बाजार
समिती अंतर्गत असलेलं कापूस खरेदी केंद्र तीन मार्चपर्यंत बंद राहणार आहे. बाजार समितीचे
सचिव एस.बी.काळे यांनी काल एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. केंद्रावर कापसाची
आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे, कापूस साठवण्यासाठी जागेची अडचण येत असल्याचं काऴे
यांनी या पत्रकात नमूद केलं.
****
बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यात विवाहित
महिलेवर सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयानं तीन जणांना सात वर्ष
सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सहा वर्षांपूर्वी ही घटना घडली होती.
****
औरंगाबाद इथं काल शहीद भगतसिंग हॉकर्स
युनियनच्या वतीनं महानगरपालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली. पथविक्रेता उपजीविका संरक्षण
आणि अधिनियम २०१४च्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात
आली. संघटनेच्या विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला यावेळी सादर करण्यात आलं.
****
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त काल
ठिकठिकाणच्या शाळा महाविद्यालयांमधून विज्ञान प्रदर्शनासह विविध कार्यक्रम घेण्यात
आले. थोर शास्त्रज्ञ सर सी व्ही रमण यांचं संशोधन असलेल्या रमण परिणामाच्या स्मरणार्थ
हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. या संशोधनासाठी सी व्ही रमण यांना १९३० साली नोबेल
पारितोषिकानं गौरवण्यात आलं होतं.
परभणी जिल्ह्यात पाथरी इथल्या शांताबाई
नखाते विद्यालयाच्या वतीनं काल विज्ञान प्रदर्शन घेण्यात आलं. ६० बालशास्त्रज्ञांनी
या प्रदर्शनात सहभाग घेतला. जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष भावना नखाते यांनी यावेळी
केलेल्या भाषणात, चौकस बुद्धीच्या बालकांना योग्य वातावरण तसंच संधी निर्माण करून दिल्यास
ते वैज्ञानिक बनू शकतात असं मत व्यक्त केलं.
****
नांदेड मर्चंट को - ऑपरेटीव्ह बँकेच्या
अध्यक्षपदी दिलीप कंदकुर्ते यांची बिनविरोध निवड झाली आहे. मर्चंट बँकेच्या जिल्ह्यात
आठ शाखा आहेत.
****
लातूर इथं काल शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय
बांबू प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं. मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त क्षेत्रात हवामानातल्या
बदलामुळे जे पर्यावरणात बदल होत आहेत, त्याला लढा देण्यासाठी बांबूची लागवड आवश्यक
असल्याचं मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केलं.
****
क्रिकेट
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान दुसऱ्या
कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
आहे. उपहरासाठी खेळ थांबला तेव्हा भारताच्या तेवीसाव्या षटकात दोन बाद ८४ धावा झाल्या
होत्या.
दरम्यान, ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या
महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना
श्रीलंकेसोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी साडे नऊ वाजता हा सामना सुरू होईल.
****