Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 29
July 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जूलै २०२५ दुपारी १.०० वा.
****
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी तिन्ही दहशतवाद्यांना
ठार मारण्यात भारतीय यंत्रणांना यश आल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत
सांगितलं. ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेला ते
उत्तर देत होते. याबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले,
बाईट- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने राबवलेल्या
या ऑपरेशन महादेव मध्ये दोन जणांना अटक करण्यात आल्याचंही शहा यांनी सांगितलं. दहशतवादी हल्ला झाला, त्याठिकाणाहून जप्त केलेल्या काडतुसांच्या आधारे हे दहशतवादी
सापडले असून, त्यांच्या घरच्यांकडून मृतदेहांची
ओळख पटवल्याचंही त्यांनी सांगितलं. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने केलेल्या प्रत्येक कारवाईबद्दल
शहा यांनी सविस्तर माहिती दिली.
**
गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि
अन्नधान्याचं उत्पादन वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली
सरकारने सहा उपाययोजना केल्या असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री
शिवराज सिंह चौहान यांनी आज लोकसभेत सांगितलं. २०१३-१४ मध्ये अन्नधान्याचं उत्पादन २४६ दशलक्ष टन होतं ते
आता ३५३ दशलक्ष झालं आहे तर डाळींचं
उत्पादन १६ दशलक्ष टन होतं, ते आता २५ दशलक्ष टनांपेक्षा जास्त झाल्याचं चौहान यांनी सांगितलं. यामध्ये
उत्पादन वाढवणं, खर्च कमी करणं, नुकसान भरपाई देणं आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य
किंमत या उपाययोजनांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.
**
विविध मागण्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं
कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं. आजचं कामकाज सुरु झाल्यावर उपसभापती हरिवंश यांनी शुन्यकाळ सुरु
ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र विरोधकांनी बिहारमधल्या मतदार याद्यांचा पुनरिक्षणाचा
मुद्दा उपस्थित करत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यासह इतर विषयांवर विरोधकांनी दिलेले स्थगन प्रस्तावही उपसभापतींनी
फेटाळून लावले. त्यामुळे गदारोळ वाढत गेल्यानं सदनाचं
कामकाज स्थगित झालं. राज्यसभेत दुपारनंतर
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु होण्याची अपेक्षा आहे.
तत्पूर्वी, संसदेच्या दोन्ही सदनात आज फिडे विश्वचषक विजेती दिव्या देशमुखचं
अभिनंदन करण्यात आलं.
****
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आज साजरा केला जात आहे.
दरवर्षी २९ जुलै रोजी हा दिवस जागतिक स्तरावर वाघांच्या नैसर्गिक अधिवासांचं जतन
करण्यासाठी आणि जगभरातल्या संवर्धन प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी साजरा केला
जातो. यानिमित्त नवी दिल्लीत आज केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली
कार्यक्रम घेण्यात आला. देशात अकरा नवीन व्याघ्र प्रकल्पांची भर पडली असून, २०१४ मध्ये प्रकल्पांची संख्या ४७ होती, ती आता ५८ झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. वाघांचे अधिवास वाचवणं, स्थानिक समुदायांना सक्षम करणं आणि जैवविविधतेचा उत्सव
साजरा करण्यावर भर देणाऱ्या विविध उपक्रमांची यावेळी घोषणा करण्यात आली.
वाघ हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे; वाघांचं संरक्षण म्हणजे निसर्गाचं संतुलन टिकवणं आणि जीवनाचं
खऱ्या अर्थानं रक्षण करणं असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं
आहे.
**
जागतिक व्याघ्र दिनानिमित्त सांगली जिल्ह्यात चांदोली
जंगल परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. चांदोली इथला सह्याद्री राखीव व्याघ्र
प्रकल्प आणि आरोळा इथल्या गांधी सेवा धाम विद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं हा
उपक्रम घेण्यात आला. यावेळी झाडांचं आणि वाघांचं महत्व या विषयी विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन करण्यात आलं.
****
नागपंचमीचा सण आज साजरा होत आहे. वारुळांची पूजा, सर्पमित्रांकडून जनजागृती, आणि सापांविषयीच्या गैरसमजांवर प्रबोधन आदी विविध कार्यक्रम
यानिमित्त होत असतात.
****
मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ हातखंबा गावात
एलपीजी गॅसचा टँकर उलटल्यानं या मार्गावरची वाहतुक बंद करण्यात आली आहे. टँकर
पुलाखाली उलटल्यानंतर वायुगळती सुरु झाल्यानं नजीकच्या गावातल्या नागरिकांना
खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं. पहाटे साडे तीन वाजेच्या
सुमारास बचाव पथकाला वायुगळती थांबवण्यात यश आलं. अपघातग्रस्त टँकरचा चालक जखमी झाला असून कुठलीही जीवितहानी
झाली नसल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितलं.
****
धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातल्या दभाषी फाटा इथं
आज सकाळी शिंदखेडा-शिरपूर या एसटी बसला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने
झालेल्या अपघातात एका आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर २२ प्रवासी जखमी झाले. त्यांना शिरपूरच्या कॉटेज रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, ३ ते ४ जणांची प्रकृती गंभीर असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment