आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Friday, 31 January 2025
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.01.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 31 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
· केंद्र सरकारच्या दशकभराच्या कार्यकाळातून विकसित भारताच्या वाटचालीला नवी ऊर्जा
मिळाल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन;संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला
प्रारंभ
· आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर; सकल घरेलु उत्पादन दरात सहा पूर्णांक आठ
टक्के वाढीचा अंदाज
· देवस्थानांची व्हीआयपी दर्शन व्यवस्था मनमानी स्वरूपाची असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं
निरीक्षण
· तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते उद्घाटन
आणि
· १९ वर्षाखालील महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा पराभव करत
भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल
****
केंद्र सरकारच्या गेल्या दशकभराच्या कार्यकाळातून
विकसित भारताच्या वाटचालीला नवी ऊर्जा दिल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
यांनी केलं आहे. आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं
प्रारंभ झाला,
त्यावेळी बोलतांना राष्ट्रपतींनी विकसित भारत संकल्पनेत लोकसहभागाचं
अधिक महत्त्व असल्याचं सांगितलं, त्या म्हणाल्या –
मेरी सरकार के एक दशक के कार्यकाल ने विकसित भारत की यात्रा को नई ऊर्जा दी
है। विकसित भारत के विजन में जनभागीदारी का सामूहिक सामर्थ्य है। देश की आर्थिक उन्नति का रोडमैप है। डिजिटल क्रांति के रूप में टेक्नॉलाजी की ताकत है। और आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर का आधार है। मेरी सरकार के प्रयासों के बल पर भारत, दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनने जा रहा है। सरकार ने सेवा, सुशासन,
समृद्धि और स्वाभिमान, इन प्रमुख सिद्धांतों को गवर्नेंस के केंद्र में रखा है। सरकार reform, perform और transform
के अपने संकल्प को तेज गति से आगे बढ़ा रही है।
इस्रोचं शंभरावं
उपग्रह प्रक्षेपण,
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला चालना देणारा इंडिया ए आय’ कार्यक्रम, दळणवळण
आणि इतर पायाभूत सुविधा,
मराठीसह विविध भाषांना अभिजात दर्जा, स्टार्टअप
योजना, लखपती दिदी योजना,
अन्नपूर्णा योजना तसंच केंद्र सरकारच्या इतर समाजाभिमुख योजनांकडे
राष्ट्रपतींनी आपल्या भाषणातून लक्ष वेधलं. देशाच्या विकासाचा लाभ समाजातल्या अखेरच्या
घटकापर्यंत पोहोचतो,
तेव्हाच विकास सार्थक ठरत असल्याचं
राष्ट्रपतींनी नमूद केलं. त्या म्हणाल्या –
जब देश के विकास का लाभ अंतिम पायदान पर खड़े व्यक्ति को भी मिलने लगता है तभी
विकास सार्थक होता है। गरीब को गरिमापूर्ण जीवन मिलने से उसमें जो सशक्तिकरण का
भाव पैदा होता है, वो गरीबी से लड़ने में उसकी
मदद करता है। अनेक योजनाओं ने गरीब को ये भरोसा दिया है कि वो सम्मान के साथ जी
सकते हैं। ऐसे ही प्रयासों की वजह से देश के 25 करोड़ लोग गरीबी को परास्त करके आज अपने जीवन में आगे बढ़ रहे हैं। इन्होंने
नियो मिडिल क्लास का एक ऐसा समूह तैयार किया है, जो भारत की ग्रोथ को नई ऊर्जा से भर रहा है।
दरम्यान, राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून
देशाच्या प्रगतीचं सर्वसमावेशक चित्र स्पष्ट होत असल्याचं, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या अभिभाषणातून युवकांच्या समग्र विकासाबाबत भारताचा
दृष्टिकोन दिसून येत असल्याचं, पंतप्रधानांनी सामाजिक संपर्क माध्यमावरच्या
संदेशात म्हटलं आहे.
काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधी यांनी
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर प्रतिक्रिया देतांना, त्या फार थकल्याचं तसंच
त्यांना बोलणं कठीण जात असल्याची टिप्पणी केली, राष्ट्रपती भवनाकडून गांधी यांच्या
या टिप्पणीचं खंडन करण्यात आलं आहे. अशी टीका ही राष्ट्रपती पदाच्या मर्यादेचा भंग
करत असल्यानं,
गांधी यांची ही टिप्पणी राष्ट्रपती भवनानं अस्वीकार केल्याचं, पीटीआयच्या
वृत्तात म्हटलं आहे.
उपेक्षित घटक, महिला
आणि शेतकऱ्यांवर बोलण्याने कधीही थकवा येऊ शकत नाही, असं राष्ट्रपतींचं ठाम
मत आहे, भारतीय भाषांमधल्या म्हणी तसंच वाक्प्रचाराबाबत काँग्रेस नेते अनभिज्ञ असल्यानं, त्यांच्याकडून
अशी टिप्पणी आली असावी,
असंही राष्ट्रपती भवनाकडून जारी पत्रकात नमूद असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
राष्ट्रपतींच्या अभिभषणानंतर संसदेच्या दोन्ही
सदनांत कामकाजाला प्रारंभ झाला. लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माजी पंतप्रधान दिवंगत
डॉ मनमोहन सिंग,
ओमप्रकाश चौटाला आणि तीन माजी खासदारांना आदरांजली वाहिली. त्यानंतर
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सदनात सादर केला.
त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
राज्यसभेतही दिवंगत संसद सदस्यांना आदरांजली
अर्पण करण्यात आली. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल राज्यसभेत सादर करण्यात आला आणि
सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
२०२५ या आर्थिक वर्षात भारताच्या सकल घरेलू
उत्पादनात सहा पूर्णांक चार दशांश टक्के वृद्धी होण्याचा तर २०२६ च्या आर्थिक वर्षात
ही वृद्धी सहा पूर्णांक तीन ते सहा पूर्णांक आठ दशांश टक्के इतकी राहण्याचा अंदाज आर्थिक
सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२५च्या शेवटच्या तिमाहीत अन्नधान्याच्या
किमती कमी होण्याची शक्यता या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे. २०१७-१८ मध्ये सहा
टक्क्यांवर असलेला बेरोजगारीचा दर कमी होऊन, २०२३-२४ या वर्षामध्ये तो तीन
पूर्णांक दोन टक्क्यांवर आल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.
दरम्यान, अर्थमंत्री उद्या आगामी
वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील, या अर्थसंकल्पावर सोमवारी चर्चेची शक्यता
आहे.
****
देशातल्या मंदिरांमधलं व्हीआयपी दर्शन, अर्थात
महत्त्वाच्या व्यक्तींसाठी देवदर्शनाची वेगळी सुविधा मनमानी स्वरूपाची असल्याचं निरीक्षण
सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. अशा व्यवस्थेला आव्हान देणारी याचिका मात्र सर्वोच्च
न्यायालयानं फेटाळून लावली. याचिकेतल्या मुद्यांशी सहमत
असलो तरी याप्रकरणी कोणताही निर्णय अथवा निर्देश देऊ शकत नसल्याचं सांगत, सरन्यायाधीश
संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं, या प्रकरणी सरकारी यंत्रणांनी
लक्ष घालावं,
असंही म्हटलं आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मराठी भाषेला
राजमान्यता देण्याची सुरुवात केली, त्या मराठी भाषेची परंपरा टिकवण्यासाठी
आपण या संमेलनाच्या माध्यमातून साद घालत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी म्हटलं आहे. पुणे इथं तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. या सोहळ्यात प्रसिद्ध मराठी
साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक तसंच ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे
अध्यक्ष रवींद्र शोभणे यांचा सत्कार करण्यात आला. कौशल्य विकास आणि उद्योगजकता विकास
मंत्रालयाच्या सिद्ध या संकेतस्थळाचं उद्घाटन आणि लोकार्पण यावेळी करण्यात आलं.
पुस्तकं आणि पुस्तकांचे निर्माते यांचा महाकुंभमेळा
या संमेलनात भरला असल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं.
तर, मराठी विश्व संमेलन आता परदेशातही व्हावं, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित
पवार यांनी व्यक्त केली.
****
उत्तराखंड इथं सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज १० मीटर एअर पिस्तुल
प्रकारात पुरुष गटात महाराष्ट्राच्या पार्थ माने यानं सुवर्ण तर रुद्रांक्ष पाटीलनं
रौप्य पदक मिळवलं आहे. या स्पर्धेत ५ सुवर्ण, १२ रौप्य आणि ८ कांस्य
पदकांसह एकूण २५ पदकांची कमाई करत महाराष्ट्र पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
****
भारत आणि इंग्लड यांच्यातल्या टी ट्वेंटी
क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज पुण्यात होणार आहे. संध्याकाळी सात वाजता हा सामना
सुरू होईल. मालिकेत भारत दोन एकने आघाडीवर आहे.
****
१९ वर्षाखालील महिलांच्या टी-२० विश्वचषक
क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं इंग्लंडचा नऊ विकेट राखून पराभव केला. इंग्लंडनं दिलेलं
११४ धावांचं आव्हान भारतीय संघानं पंधराव्या षटकांत साध्य केलं. २१ धावांत तीन बळी
घेणारी पारुनिका सिसोदिया प्लेयर ऑफ द मॅच ठरली. या विजयामुळे भारतीय संघ अंतिम फेरीत
पोहोचला असून,
दोन फेब्रुवारीला होणाऱ्या अंतिम
सामन्यात भारताची लढत दक्षिण आफ्रिका संघासोबत होणार आहे.
****
रस्ता सुरक्षा अभियानामुळे गेल्या वर्षभरात
अपघातांच्या संख्येत घट झाल्याचं, छत्रपती संभाजीनगर इथल्या महामार्ग
सुरक्षा पथकाच्या पोलिस अधीक्षक रुपाली दरेकर यांनी सांगितलं आहे. आकाशवाणीशी बोलतांना
त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली –
सदर अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये
वाहतूक नियमांच्या अनुषंगाने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
१४ महामार्ग पोलीस केंद्रांच्या हद्दीमध्ये वाहनचालकांसाठी व नागरिकांसाठी आरोग्य तपासणी
तसेच नेत्र तपासणी शिबीरांगचे आयोजन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात महामार्गांवर
होणाऱ्या अपघातांमध्ये २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये दहा पॉईंट तीस टक्क्यांनी घट झालेली
आहे.
****
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात
बिबट्याची सफारी सुरु होणार आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य
मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी आज ही घोषणा केली. बोरिवलीच्या
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. या उद्यानातील दोन
सिंह शेलार यांनी वर्षभरासाठी दत्तक घेतले.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.01.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 31 January 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
देशाचा विकास आणि नागरिकांच्या कल्याणासाठी आपलं सरकार अभूतपूर्व वेगानं काम करत असल्याचं प्रतिपादन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. संसदेच्या आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्या संसदेला संबोधित करत होत्या.
यावेळी सरकारच्या, सर्व क्षेत्रांतल्या विविध विकास योजनांचा उल्लेख करत, प्रधानमंत्री आवास योजनेचा कालावधी वाढवून, देशातल्या अजून तीन कोटी कुटुंबांना नवी घरं बांधून देण्याचा निर्णय झाल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं. युवकांचं शिक्षण आणि रोजगारनिर्मिती याकडे सरकार विशेष लक्ष देत असल्याचं सांगत, देशातल्या आघाडीच्या पाचशे कंपन्यांमधून एक कोटी युवकांना इंटर्नशिप्स देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एक देश एक निवडणूक, महिला सक्षमीकरण, ई - गव्हर्नन्स, विमान वाहतूक क्षेत्रातली प्रगती, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचा अवलंब आदी विषयांवर राष्ट्रपतींनी भाष्य केलं.
प्रयागराज इथं महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केलं.
दरम्यान, आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज संसदेच्या सदनासमोर सादर करण्यात येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
****
अधिवेशनापूर्वी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, या अधिवेशनात अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याचं सांगितलं. २०४७ मध्ये स्वातंत्र्याची शंभर वर्षं पूर्ण करताना भारत विकसित देश झालेला असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वर्षीच्या अर्थसंकल्पामुळे देशात ऊर्जा आणि आकांक्षांचा संचार होईल, असं सांगत पंतप्रधानांनी, देशाला विकसित राष्ट्र बनण्यात संसदेच्या सगळ्या सदस्यांनी आपापलं योगदान द्यावं, असं आवाहन केलं.
****
पुणे इथं आज तिसर्या विश्व मराठी संमलेनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम सुरु असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे यावेळी उपस्थित आहेत.
ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना यावेळी विश्व मराठी संमेलनाचा साहित्यभूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
तत्पूर्वी, बालगंधर्व रंगमंदिरापासून फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध परिसंवाद, कवी संमेलन, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वरसंध्या, आदी कार्यक्रम होणार आहेत.
****
राज्यात रब्बी हंगामात सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक म्हणजे ११७ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे खरीप हंगामातल्या पिकांप्रमाणेच रब्बी हंगामातल्या धान्य उत्पादनातही वाढ होणार असल्याचा कृषी आयुक्तालयाचा प्राथमिक अंदाज आहे. रब्बी हंगामात हरभरा हे प्रमुख पीक झालं असून, त्याखालोखाल गहू, मका या पिकांचा पेराही सरासरीपेक्षा अधिक झाला आहे. खरीप हंगामात झालेला मुबलक पाऊस, धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा, भूगर्भातील चांगली पाणी पातळी यामुळे पेरणी क्षेत्रात भरीव वाढ झाली असं पुणे कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत परराज्यातल्या लाभार्थ्यांनी बोगस लॉगिन आयडी तयार करून तब्बल एक हजार १७१ अर्ज दाखल केले असल्याचं समोर आलं आहे. हे भामटे उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थान मधले असल्याचं पोलीस, महसूल आणि महिला बाल विकास विभागाने केलेल्या तपासात आढळलं आहे. संबंधित अर्जदारांचा लाभ थांबवण्यात आला आहे. यातले २२ अर्ज सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातून खोट्या कागदपत्रांच्या आधारे भरल्याचं आढळलं असून, त्याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
लातूर इथं प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचं उद्घाटन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झालं. दिव्याशा केंद्र सुरु झाल्यामुळे जिल्ह्यातल्या दिव्यांग बांधवांना आवश्यक सहायक उपकरणे देण्याची कार्यवाही नियमितपणे सुरु राहणार असल्याचं भोसले यावेळी म्हणाले.
****
१९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान उपांत्य फेरीचा सामना होत आहे. इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
****
Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 31 جنوری 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10
Regional Urdu Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.01.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 31 January 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
• संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ, आर्थिक सर्वेक्षण अहवाल होणार सादर
• महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित असल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण
• बीडसह बहुतांश ठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठका संपन्न, बीड ते मुंबई रेल्वे सुरू करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सूतोवाच
• छत्रपती संभाजीनगर इथं जी बी एस आजाराचे पाच संशयित रुग्ण, नागरिकांनी खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
आणि
• राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत २३ पदकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाची सुरुवात होईल. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेच्या सदनासमोर सादर करण्यात येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर सोमवारी दोन्ही सभागृहात चर्चा होईल. अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत असेल तर दुसरा टप्पा दहा मार्च ते चार एप्रिल पर्यंत चालणार आहे.
दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. बैठकीला ३६ विविध पक्षांचे मिळून ५२ खासदार उपस्थित होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्याच्या दृष्टीने सहकार्याचं आवाहन यावेळी सरकारतर्फे करण्यात आलं.
****
वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीने आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे काल सादर केला. या विधेयकासंबंधी १४ सुधारणा समितीने स्वीकारल्या आहेत.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब पदासाठीच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित असून, उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन, आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी केलं आहे. त्या काल नवी मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. येत्या रविवारी दोन फेब्रुवारीला 'महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४' होणार आहे. त्याची प्रश्नपत्रिका उमेदवारांना उपलब्ध करून देण्याचं आमिष दाखवून पैशाची मागणी केली जात असल्याचं वृत्त, पुण्याच्या एका दैनिकात प्रसिद्ध झाल्यानंतर, खरात यांनी हा खुलासा केला, त्या म्हणाल्या,
“या परिक्षेकरता जवळपास दोन लाख ८६ हजार इतके उमेदवार बसलेले आहेत. सगळी व्यवस्था अतिशय चोख आहे, प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या सुरक्षित आहेत. आणि कोणतीही पश्नपत्रिका लिक झालेली नाही.’’
दरम्यान, याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
****
फेब्रुवारी-मार्च मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा इशारा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिला आहे. तसंच परीक्षा केंद्रावर ज्या शाळांमधले विद्यार्थी परीक्षा देत आहेत, त्या शाळेतल्या शिक्षक, कर्मचाऱ्यांची नियुक्त न करण्याचा निर्णय राज्य मंडळानं घेतला होता. त्याला संस्थाचालक, शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे हा निर्णय बदलण्यात आला आहे. ज्या परीक्षा केंद्रावर मागच्या पाच वर्षांत गैरप्रकार झाले होते त्या शाळांना मात्र हाच निर्णय लागू असेल, असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.
****
बीड ते मुंबई रेल्वे सुरू करण्याचं सुतोवाच उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते काल बीड इथं नियोजन समितीच्या बैठकीनंतर पक्ष कार्यकर्त्यांशी बोलत होते. सर्वांसाठी शिस्तपालन आवश्यक असून, चुकीचं काम केल्यास नियमानुसार कारवाई होणारच, असं पवार यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले...
‘‘चांगल वागा मी तुमच्या मागे पूर्ण ताकत उभी करीन पण चुकीचं वागलात तर कारवाई केली जाईल. जे नियम आहेत, त्या पद्धतीने कलमं लावली जातील. सातत्य राहिलं तर मकोका पण लावला जाईल. जेवढी आपण नीट शिस्त लावू, तेवढा तुमचा फायदा होणार आहे. तुम्ही चुकीचे पायंडे बंद केले, उद्योगपती इथ येऊन गुंतवणूक करणार आहे. तुमच्याकडे काही साईट विलमींगच्या चांगल्या आहेत. सोलरपॅनल बसवण्याच्या चांगल्या आहेत. आमचा प्रयत्न आहे की मुंबई, बीड रेल्वे पण सुरु करता येते का? का तर तुमचा मुंबईशी पण,पुण्याशी पण संपर्क कसा राहील.
दरम्यान, नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यात एकूण आराखड्यातल्या ५३६ कोटी ४४ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. नगरपालिका तसंच सार्वजनिक बांधकाम विभागांनी शहर स्वच्छतेकडे लक्ष द्यावं, सर्व तालुक्यांनी विकासाबाबत परस्परात सकारात्मक स्पर्धा करण्याचं आवाहन पवार यांनी केलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. जिल्ह्यात होऊ घातलेली औद्योगिक गुंतवणूक, त्यानिमित्ताने रोजगार, व्यवसायासाठी येणाऱ्या लोकांची संख्या, होणारा विस्तार लक्षात घेऊन, जिल्ह्याच्या विकासाचं नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी सन २०२५-२६ साठी तयार करण्यात आलेल्या एक हजार ३५४ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आल्याचं शिरसाट यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्हा वार्षिक योजनेच्या ७०३ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखडयास काल जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली. पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या आराखड्यात भरीव वाढ करण्याची शिफारस राज्यस्तरीय बैठकीत करण्यात येईल, असं आश्वासन सावे यांनी दिलं.
****
लातूर इथंही काल पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत ४९० कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला. गुणवत्तापूर्ण कामातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणार असल्याचं, पालकमंत्री यावेळी म्हणाले.
****
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल सहाव्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलं, मात्र, मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण मराठा समाज मुंबईत धडकेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी इथं बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, तसंच जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आदींनी काल जरांगे यांची भेट घेवून चर्चा केली. त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून, काही मागण्यांवर शासन सकारात्मक असल्याचं आमदार धस यांनी सांगितलं. जरांगे यांनी, सगेसोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी, मराठा युवकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणं, मुंबई-हैद्राबाद-सातारा गॅझेटनुसार मराठा समाजाला ओबीसींचे दाखले देणं, आदी मागण्यांचा पुनरुच्चार करत, राज्य सरकारला पुन्हा दोन महिन्यांची मुदत दिली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं गुईलेन बॅरे सिंड्रोम-जी बी एसचे पाच संशयित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये बुलडाणा तसंच जालना इथल्या रुग्णांचा समावेश आहे. या पाच रुग्णांपैकी दोन रुग्णांची प्रकृती सुधारल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली, तर तीन रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या आजाराबाबत नागरिकांनी घेण्याच्या खबरदारीबाबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी माहिती दिली...
“जे काही पेशन्ट आपल्याकडे डिटेक्ट झालेले आहेत, त्यापैकी दोन पेशन्ट डिस्चार्ज झालेले आहेत. काही जास्त चिंता करण्याचा विषय नाहीये. यामध्ये काळजी घ्यायची म्हणजे, वेळोवेळी हात धुणे, दूषित पाणी पिण्यात येऊ नये, शिळं अन्न खाण्यात येऊ नये, आणि फिवर वगैरे, चार पाच दिवसांपेक्षा जास्त लूज मोशन्स वगैरे असेल, आणि विकनेस जाणवत असला, तरी तत्काळ डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार घेऊ नये.’’
****
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ‘जीवन-साधना गौरव’ पुरस्कार, कृषीभूषण सूर्यकांत देशमुख यांना काल प्रदान करण्यात आला. मानवस्त्र, ग्रंथ, विद्यापीठ स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि २५ हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत २३ पदकांसह महाराष्ट्राने तिसरा क्रमांक पटकावला आहे. यामध्ये चार सुवर्ण, ११ रौप्य आणि आठ कास्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत ट्रायथलॉन प्रकारात महाराष्ट्राने सहा पदकांची कमाई केली. महिलांच्या ४०० मीटर पोहण्याच्या स्पर्धेत मेडले प्रकारात राज्याच्या सानवी देशवाल हिने सुवर्णपदक पटकावलं.
****
बीडचे अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहेत. येत्या दोन फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश लागू असतील.
****
प्रशासनाने पारदर्शिता आणि दायित्व समजून नागरिकांना सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना प्रधान सचिव तथा नांदेड जिल्ह्याच्या पालक सचिव राधिका रस्तोगी यांनी केलं आहे. शंभर दिवसांचा कृती आराखडा, जिल्हा सुशासन निर्देशांक, यासह विविध विभागांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. कार्यालयीन स्वच्छता आणि सोयी सुविधा, क्षेत्रीय भेटी, ई - सुविधांमध्ये वाढ, याकडे लक्ष वेधण्याचे त्यांनी निर्देश दिले.
****
Thursday, 30 January 2025
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.01.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
• अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व पक्षांकडून सहकार्याचं केंद्र सरकारचं आवाहन.
• वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात संयुक्त संसदीय समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांना सादर.
• बीड ते मुंबई रेल्वे सुरू करण्याचं उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांचं सूतोवाच.
• मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित-मात्र मुंबईत आंदोलनाचा इशारा.
आणि
• स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ‘जीवन-साधना गौरव’ कृषीभूषण सूर्यकांत देशमुख यांना प्रदान.
****
अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व पक्षांकडून सहकार्याचं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. उद्यापासून सुरू होत असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने आज सर्वपक्षीय बैठक घेतली, या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव, बिजू जनता दलाचे सस्मित पात्रा, द्रमुकचे टी आर बालू यांच्यासह विविध पक्षांचे खासदार त्यात सहभागी झाले.
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होईल. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल सदनासमोर सादर करण्यात येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या शनिवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर सोमवारी दोन्ही सभागृहात चर्चा होईल. अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत असेल तर दुसरा टप्पा दहा मार्च ते चार एप्रिल पर्यंत चालणार आहे.
****
वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीने आज आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर केला. या विधेयकासंबंधी १४ सुधारणा समितीने स्वीकारल्या आहेत.
****
नवी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होणं ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. हे भव्य संमेलन होत असून ते यशस्वी व्हावं, अशा शुभेच्छाही फडणवीस यांनी दिल्या.
****
राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत चालू बांधकाम प्रकल्पांना गती देऊन, निर्धारित वेळेत गुणवत्तापूर्ण काम करण्याची सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. मुंबईत मंत्रालयात यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. राज्यातील विविध नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासंदर्भात त्यांनी यावेळी आढावा घेतला.
****
बीड ते मुंबई रेल्वे सुरू करण्याचं सुतोवाच उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते आज बीड इथं नियोजन समितीच्या बैठकीनंतर पक्ष कार्यकर्त्यांशी बोलत होते. सर्वांसाठी शिस्तपालन आवश्यक असून, चुकीचं काम केल्यास नियमानुसार कारवाई होणारच, असं पवार यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले...
चांगल वागा मी तुमच्या मागे पूर्ण ताकत उभी करीन पण चुकीचं वागलात तर कारवाई केली जाईल. जे नियम आहेत, त्या पद्धतीने कलमं लावली जातील. सातत्य राहिलं तर मकोका पण लावला जाईल. जेवढी आपण नीट शिस्त लावू, तेवढा तुमचा फायदा होणार आहे. तुम्ही चुकीचे पायंडे बंद केले, उद्योगपती इथ येऊन गुंतवणूक करणार आहे. तुमच्याकडे काही साईट विंडमीलच्या चांगल्या आहेत. सोलरपॅनल बसवण्याच्या चांगल्या आहेत. आमचा प्रयत्न आहे की मुंबई, बीड रेल्वे पण सुरु करता येते का? का तर तुमचा मुंबईशी पण,पुण्याशी पण संपर्क कसा राहील.
दरम्यान, नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यात एकूण आराखड्यातील ५३६ कोटी ४४ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. नगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांनी शहर स्वच्छतेकडे लक्ष द्यावं, सर्व तालुक्यांनी विकासाबाबत परस्परात सकारात्मक स्पर्धा करण्याचं आवाहनही पवार यांनी केलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. जिल्ह्यात होऊ घातलेली औद्योगिक गुंतवणूक, त्यानिमित्ताने रोजगार, व्यवसायासाठी येणाऱ्या लोकांची संख्या, होणारा विस्तार लक्षात घेऊन जिल्ह्याच्या विकासाचं नियोजन तयार करण्याचे निर्देश शिरसाट यांनी दिले. यावेळी सन २०२५-२६ साठी तयार करण्यात आलेल्या एक हजार ३५४ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली.
दरम्यान, लोकसंख्येनुसार जिल्ह्यातील तालुक्यांना सम- समान निधी मंजूर करावा आणि निधी मंजूर करतांना तालुक्यांमध्ये असमान भूमिका ठेवू नये, अशी सूचना विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या बैठकीत केली.
****
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज सहाव्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलं, मात्र, मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण समाज मुंबईत धडकेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. आज जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी इथं बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, तसंच जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आदींनी जरांगे यांची भेट घेवून चर्चा केली. जरांगे यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर काही मागण्यांवर शासन सकारात्मक असल्याचं आमदार धस यांनी सांगितलं.
जरांगे यांनी, सगेसोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी, मराठा युवकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणं, मुंबई-हैद्राबाद-सातारा गॅझेटनुसार मराठा समाजाला ओबीसींचे दाखले देणं, आदी मागण्यांचा पुनरुच्चार करत, राज्य सरकारला पुन्हा दोन महिन्यांची मुदत दिली, मात्र या मुदतीतही मागण्या मान्य न झाल्यास, मुंबईकडे कूच करणार, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना आज देश आदरांजली वाहत आहे. गांधीजींची पुण्यतिथी आज देशभर हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येते. नवी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधीस्थळी सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गांधीजींच्या समाधीवर पुष्पचक्र वाहून अभिवादन केलं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनीही समाधीस्थळावर पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख तसंच संरक्षणदल प्रमुखही यावेळी उपस्थित होते.
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी महात्मा गांधी यांच्या सत्त्याहत्तराव्या बलिदान दिनानिमित्त आज मुंबईतल्या मणीभवन इथं भेट दिली. महात्मा गांधींजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांनी प्रार्थनासभेत भाग घेतला. आकाशवाणी मुंबईच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही आज हुतात्मा दिनानिमित्त महात्मा गांधी तसंच देशासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
****
हिंगोली इथं आज महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाअंतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती पर विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढली. जिल्ह्यात आजपासून ते १५ फेब्रुवारी पर्यंत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ‘जीवन-साधना गौरव’ शेतीनिष्ठ शेतकरी कृषीभूषण सूर्यकांत देशमुख यांना आज प्रदान करण्यात आला. मानवस्त्र, ग्रंथ, विद्यापीठ स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि २५ हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. विद्यापीठाने देशमुख यांना या पुरस्काराने सन्मानित करून समस्त शेतकऱ्यांचा आणि शेतात कष्ट करणाऱ्यांचा सन्मान केला, अशी भावना बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली.
****
पाचव्या आवृत्तीचं हेरगिरी करणारं विमान भारतात तयार होत आहे. यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान आणि सुटे भाग तयार करण्याचं काम सध्या सुरू असल्याची माहिती, संरक्षण संशोधन आणि विकास विभाग-डीआरडीओचे अध्यक्ष समीर कामत यांनी दिली आहे. डीआरडीओ आणि इंडियन सोसायटी ऑफ ॲडव्हान्स मटेरियल अँड प्रोसेस इंजिनिअरिंग या संस्थेच्या वतीने आज पुण्यात नवीन तंत्रज्ञान आणि सुटे भाग यावर आधारित राष्ट्रीय परिसंवादात कामत बोलत होते. बुलेट प्रूफ जॅकेट निर्मिती हा पण देशासाठी महत्त्वाचा विषय आहे. या साठी लागणारा कच्चा माल हा परदेशातून आयात करावा लागतो. त्यासाठी आवश्यक सूत आणि कापडाची निर्मिती देशांतर्गत होणं गरजेचं असल्याचं मत कामत यांनी व्यक्त केलं.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतल्या वरळी इथं पदाधिकारी मेळाव्यात मार्गदर्शन केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आतापर्यंत केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजे. असं आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केल.
****
बीडचे अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहेत. आज रात्री १२ वाजेपासून ते २ फेब्रुवारी २०२५च्या रात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश लागू असतील.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.01.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 30 January 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आज शहीद दिन म्हणून पाळण्यात येत आहे. देशभरातून महात्मा गांधीजींना तसंच देशासाठी प्राणांची आहुती देणार्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली जात आहे. नवी दिल्लीत राजघाट या महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळी प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, तिनही सेना दलांचे प्रमुख यांनी राजघाट इथं महात्मा गांधीजींना आदरांजली अर्पण केली.
पंतप्रधान मोदी यांनी गांधीजींना सामाजिक संदेशाच्या माध्यमातून अभिवादन केलं आहे. गांधीजींचे आदर्श देशवासियांना विकसित भारत निर्माण करण्यासाठी प्रेरणा देतात, असं त्यांनी म्हटलं आहे. शहीद दिनानिमित्त पंतप्रधानांनी, देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेल्या शूर वीरांना आदरांजली अर्पण केली आहे.
****
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त दक्षिण मुंबईतल्या महात्मा गांधी स्मारक असलेल्या ‘मणिभवन’ला भेट दिली. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली आणि प्रार्थना सभेत सहभाग घेतला. यावेळी बोलताना त्यांनी, सर्वांना जात, पंथ आणि धर्म यांच्या मतभेदापलीकडे जाण्याचे आवाहन केलं. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा आणि सदाचाराच्या विचारांचं पालन करावं, असं ते म्हणाले.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या ३१ तारखेपासून सुरु होणार असून, शनिवारी एक फेब्रुवारीला, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील.
****
वक्फ सुधारणा विधेयकाच्या मसुद्याचा आणि सुधारित विधेयकाचा अहवाल संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपुर्द केला. संयुक्त संसदीय समितीनं वक्फ सुधारणा विधेयकाच्या मसुद्याला आणि सुधारित विधेयकाला बहुमतानं मान्यता दिली आहे.
****
उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौर्यावर असून, जिल्हा नियोजन समितीची बैठक त्यांच्या उपस्थितीत होत आहे. तत्पूर्वी बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असून, चांगल्या कामाची स्पर्धा करा, कोणत्याही प्रकारचे वेडे वाकडे प्रकार सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते.
****
तिसरं विश्व मराठी संमलेन उद्यापासून पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात सुरु होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या सकाळी अकरा वाजता संमेलनाचं उद्धाटन होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरापासून फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत शोभायात्रेनंतर, उद्घाटन समारंभ होईल. तीन दिवस चालणार्या या संमेलनात विविध परिसंवाद, कवी संमेलन, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वरसंध्या, आदी कार्यक्रम होणार आहेत.
****
हिंगोली इथं आज महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाअंतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती पर विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. शहरातल्या गांधी चौकातून काढण्यात आलेल्या या रॅलीला जिल्हा रुग्णालयाचे डॉ. मंगेश टेहरे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. आजपासून ते १५ फेब्रुवारी पर्यंत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्व घरकुल लाभार्थ्यांना आपल्या हक्काचं घर मिळवून देण्याच्या दृष्टीनं यंत्रणेनं काम करावं, यातही जमीन नसलेल्या बेघरांना घरकुल योजनेंतर्गत प्राधान्यानं लाभ द्यावा, अशा सूचना ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्याला वीस लाख घरकुल निर्मितीचे उद्दिष्ट मिळाल्याचं सांगत, सर्व पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलांना मान्यता देऊन घरकुल बांधकाम तत्परतेनं सुरू करावं, असे निर्देश त्यांनी दिले.
****
वीजबिलाच्या थकबाकीसाठी खंडित केलेला वीजपुरवठा परस्पर जोडल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर परिमंडलातल्या सात जणांवर महावितरणतर्फे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनधिकृतपणे वीजपुरवठा जोडल्यास प्राणांतिक अपघाताचाही धोका असल्यामुळेसुद्धा वीजपुरवठा अनधिकृतरीत्या जोडू नये, असं आवाहन महावितरणने केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्याला नवीन पंचवीस बसेस मिळाल्या आहेत.त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाला या जिल्ह्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. या बसेस अत्याधुनिक सोयींनी युक्त असून सुलभ आणि आरामदायी आसनं आणि आधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज आहेत. इंधन कार्यक्षमतेवर भर देऊन या बसेस पर्यावरणपूरकही बनवण्यात आल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.01.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 30 January 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आज शहीद दिन म्हणून पाळण्यात येत आहे. देशभरातून महात्मा गांधीजींना तसंच देशासाठी प्राणांची आहुती देणार्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली जात आहे. नवी दिल्लीत राजघाट या महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळी प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीजींना आदरांजली वाहिली आहे. गांधीजींचे आदर्श देशवासियांना विकसित भारत निर्माण करण्यासाठी प्रेरणा देतात, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. शहीद दिनानिमित्त पंतप्रधानांनी, देशासाठी आपल्या प्रणांचं बलिदान दिलेल्या शूर वीरांना आदरांजली अर्पण केली आहे.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या ३१ तारखेपासून सुरु होणार असून, शनिवारी एक फेब्रुवारीला, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील.
****
उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौर्यावर असून, जिल्हा नियोजन समितीची बैठक त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. तत्पूर्वी बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असून, चांगल्या कामाची स्पर्धा करा, कोणत्याही प्रकारचे वेडे वाकडे प्रकार सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते.
****
येत्या दोन वर्षात म्हाडाच्या माध्यमातून राज्यात सुमारे एक लाख घरांच्या उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील आणि यासाठी राज्याचं गृहनिर्माण धोरण देखील लवकरच जाहीर करण्यात येईल, असं आश्वासन, उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पी एम आर डी ए सह सोलापूर जिल्ह्यातल्या विविध गृहनिर्माण योजनेतल्या तीन हजार ६६२ सदनिकांच्या विक्रीकरता संगणकीय सोडत काल एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. नव्या धोरणानुसार सर्वसामान्य नागरिक, काम करणाऱ्या महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ठिकठिकाणी वसतिगृहं उभारली जातील, असं त्यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्राला दिलेलं धान्य वितरणाचं लक्ष्य वाढवून आठ कोटी २० लाख टन करण्याची विनंती राज्य सरकारनं केंद्राकडे केली आहे. गेल्या दशकात वाढलेल्या लोकसंख्येनुसार हे लक्ष्य वाढवून देण्याबाबत राज्य शासनानं २०२१ साली केंद्र सरकारला प्रस्ताव दिलेला आहे. त्याला मान्यता द्यावी, अशी विनंती अन्न, नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी काल केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे केली आहे. अन्न धान्य वितरण प्रणाली सुरळित करणं, ऑनलाईन वितरण प्रणालीतल्या समस्या दूर करणं, शिधा पत्रिका व्यवस्थापन प्रणाली संपूर्णत: सुरळीत चालू ठेवणं, अन्न महामंडळाशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रानं पुढाकार घ्यावा, आदी मागण्या मुंडे यांनी केल्या. या सर्व यंत्रणा आणि राज्य सरकार यांच्यात लवकरच बैठक घेऊन मार्ग काढण्याची ग्वाही प्रल्हाद जोशी यांनी दिली.
****
राज्यातल्या गुइलेन बॅरे सिंड्रोम - जीबीएस आजाराची रुग्णसंख्या १२७ वर पोहोचली असून, आणखी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. पुण्यात या आजाराची रुग्णसंख्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नेमलेल्या उच्चस्तरीय पथकानं काल परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच, ससून सर्वोपचार रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबत बैठक घेतली. केंद्रीय पथकानं काल सिंहगड रस्ता परिसरातील पाण्याचा स्रोतांची पाहणी केली. या पथकानं रुग्णसंख्या वाढण्याच्या नेमक्या कारणांचा शोध सुरू केला आहे.
सांगली जिल्ह्यात जीबीएस आजाराचे पाच संशयित रुग्ण तर एक रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यात आढळून आला आहे.
****
मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी इथं सुरू केलेल्या उपोषणाची शासन दखल घेत नसल्याचा आरोप करत, लातूरमध्ये मराठा समाजाच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयापुढे घोषणाबाजी करण्यात आली. पुढच्या दोन दिवसात शासनानं या उपोषणाची दखल घेतली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
****
धुळे महापालिकेच्या कर वसुली पथकानं काल शहरातल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या इमारतीवर जप्तीची कारवाई केली. ही जागा राजवाडे संशोधन मंडळाच्या मालकीची असून सुमारे ८५ लाख रुपये मालमत्ता कर थकल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
****
अहिल्यानगर मधल्या वाडिया पार्क मैदानावर महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं उद्घाटन काल पोपटराव पवार यांच्या हस्ते झालं. गादी आणि माती गटातील कुस्त्यांना काल सकाळी प्रारंभ झाला. या स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी २० मल्ल सहभागी झाले आहेत.
****
Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 30 جنوری 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10
Regional Urdu Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...