आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Thursday, 31 July 2025
Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 31 July 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ जूलै २०२५ सायंकाळी ६.१०
****
· ५७४ किलोमीटर लांबीच्या चार बहुमार्गिका रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची
मंजुरी,
छत्रपती संभाजीनगर - परभणी दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचा
समावेश
· भारतीय वस्तूंवर अमेरिकनं जाहीर केलेल्या कर आकारणीच्या परिणामांची तपासणी करत
असल्याची सरकारची माहिती
· मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व सात आरोपींची ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता
· छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतल्या सर्व मालमत्तांना शास्ती से आझादी योजना
लागू करण्याचा निर्णय
आणि
· जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यावर; जलपूजनानंतर
विसर्गाला सुरुवात
****
केंद्रीय मंत्रिमंडळाने ५७४ किलोमीटर लांबीचे चार बहुमार्गिका
रेल्वे प्रकल्प मंजूर केले आहेत. हे प्रकल्प महाराष्ट्र, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा
आणि झारखंडमधल्या १३ जिल्ह्यांमध्ये राबवले जाणार आहेत. या प्रकल्पांची एकूण अंदाजित
किंमत सुमारे ११ हजार १६९ कोटी रुपये असून, हे
प्रकल्प २०२८-२९ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री
अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली.
यामध्ये छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यान रेल्वेमार्गाच्या
दुहेरी करणाला मंजुरी दिली आहे. यामुळे मराठवाड्याची दिल्ली, मुंबई आणि दक्षिण भारताशी जलद कनेक्टिव्हिटी सुनिश्चित होईल. जालना ड्राय पोर्ट, दिनागाव आणि दौलताबाद गुड्स शेडशी देखील थेट जोडणी स्थापित केली जाईल, असं वैष्णव यांनी सांगितलं.
बाईट – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव
याशिवाय इटारसी - नागपूर दरम्यान सुमारे साडे पाच हजार कोटी
रुपये खर्च करुन चौथा रेल्वे मार्ग उभारण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यामुळे
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला थेट फायदा होईल. या प्रकल्पांच्या बांधकामादरम्यान सुमारे
दोन लाखाच्या वर थेट रोजगार उपलब्ध होणार आहेत.
प्रधानमंत्री कृषी संपदा योजनेसाठी सुमारे साडे सहा हजार कोटी
रुपये आणि ‘नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ला दोन हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णयही केंद्रीय
मंत्रीमंडळानं आज घेतला.
****
सरकार भारतीय वस्तूंवर अमेरिकनं जाहीर केलेल्या २५ टक्के कर
आकारणीच्या परिणामांची तपासणी करत असल्याचं, केंद्रीय
वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. आज लोकसभेत यासंदर्भात निवेदन
देताना ते म्हणाले –
बाईट - केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री
पियुष गोयल
भारत आता जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे
आणि काही वर्षांतच देश जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्था
इस्रोनं निसार या कृत्रिम अपर्चर रडार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल आज संसदेच्या
दोन्ही सभागृहात इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन करण्यात आलं.
****
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व सात आरोपींची आज विशेष एनआयए
न्यायालयाने ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. सुमारे १७ वर्षे चाललेल्या या
प्रदीर्घ खटल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला. आरोपींमध्ये माजी भाजपा खासदार प्रज्ञा
सिंह ठाकूर,
लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त
मेजर रमेश उपाध्याय यांचा समावेश आहे. सरकारी वकिलांनी कोणताही ठोस पुरावा सादर न केल्यामुळे
सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करत असल्याचं विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी आपल्या
निकालात नमूद केलं.
२००८ मध्ये नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं हा बॉम्बस्फोट झाला
होता. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जण जखमी
झाले होते.
या प्रकरणातल्या १२ आरोपींपैकी ३ जणांची यापूर्वीच निर्दोष सुटका
झाली होती. तर दोन आरोपींवर फक्त शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत खटला चालवला जाईल, असं न्यायालयानं आज स्पष्ट केलं.
****
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालाचं भारतीय जनता पक्षानं
स्वागत केलं आहे. या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवाद कधीच भगवा
नव्हता आणि नसेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. न्यायाला
उशीर झाला हे खरं असलं तरी सत्य कधीच पराभूत होत नाही, अशी
प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर मालेगाव प्रकरणातलं सत्य बाहेर
आलं असून आता काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी भाजप नेते
चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
****
काँग्रेस पक्ष नेहमीच दहशतवादाच्या विरोधात असून, दहशतवाद्याला शिक्षा
झालीच पाहिजे, असं, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन
सपकाळ यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर ते
माध्यमांशी बोलत होते. मुंबई रेल्वे स्फोटाच्या निकालावर राज्य सरकार सर्वोच्च
न्यायालयात गेलं, तसं
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावरही होईल का हे सरकारने स्पष्ट करावं, असं सपकाळ म्हणाले.
****
महसूल विभागाच्या सेवा, योजनांची
माहिती आणि प्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी महसूल सप्ताहामध्ये अधिकाधिक नागरिकांना सहभागी
करुन घ्यावं,
असं अवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे. उद्या
एक ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या महसूल सप्ताहानिमित्त राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल
छत्रपती संभाजीनगर विभागातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधून
त्यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागातल्या
जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल सप्ताहानिमित्त राबवण्यात येणाऱ्या नाविण्यपूर्ण उपक्रमाबाबत
माहिती दिली.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं शास्ती से आझादी योजना महानगरपालिका
हद्दीतल्या सर्व मालमत्तांना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या एक ऑगस्टपासून
ते १५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण थकबाकी एकरकमी भरणाऱ्या महानगरपालिका हद्दितल्या सर्व मालमत्तांना
९५ टक्के शास्ती माफी लागू होणार आहे. शास्ती माफीसाठी महानगरपालिकेनं लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटना सर्वांचं मत लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचं, यासंदर्भात जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
****
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
संघटनात्मक बांधणीसाठी पक्षाच्या प्रत्येक माजी खासदार आणि आमदाराने पक्षाच्या संघटनात्मक
रचनेतील एक -एक मंडल दत्तक घ्यावं, असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलं आहे. ते आज मुंबईत प्रदेश कार्यालयात झालेल्या
बैठकीत बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची
रणनीती आखण्यात येत असून, या बैठकीत संघटनात्मक स्थितीचा
जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला.
****
राष्ट्रीय सेविका समितीच्या चौथ्या मुख्य संचालिका प्रमिल मेढे
यांचं आज निधन झालं, त्या ९७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या इच्छेनुसार
त्यांचा पार्थिव देह उद्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था - एम्सला दान करण्यात येणार
आहे. राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी भरीव कार्य
केलं. १९७८ पासून कार्यवाहिका म्हणून, तर २००३ ते २००६ या काळात
प्रमुख संचालक पद त्यांनी भूषवलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी प्रमीला ताई यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
नीती आयोगाच्या वतीने जुलै ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबवलेल्या
संपूर्णता अभियानात आकांक्षित किनवट तालुक्याने ६ निर्देशांकांपैकी ४ निर्देशांक शंभर
टक्के पूर्ण करत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीसाठी राज्य शासनाच्यावतीने
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा नागपूर इथं
दोन ऑगस्ट रोजी सन्मान करण्यात येणार आहे.
****
परभणी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं आज परभणी जिल्ह्यातल्या
कातनेश्वर इथं कापूस उत्पादन वाढीचं नव तंत्रज्ञान आणि आणि गळ फांदी ओळख, या विषयावर शेती कार्यशाळा घेण्यात आली. कापसाच्या झाडाची वाढ, उंची,
खत आणि फवारणी याविषयी यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं.
****
पंढरपूरच्या आषाढी वारीच्या समारोपानंतर शेगाव इथली संत श्री
गजानन महाराजांची पालखी आज शेगावमध्ये परतली. खामगाव ते शेगाव अशा १८ किलोमीटर प्रवासात
सुमारे एक लाख भाविक या दिंडीत सहभागी झाले होते. जागोजागी नागरिकांनी या दिंडीचं उत्साहात
स्वागत केलं.
****
तेंडुलकर-अँडरसन कसोटी मालिकेतला पाचवा आणि शेवटच्या सामना आज
ओव्हल मैदानावर सुरु झाला. इंग्लंडचा कर्णधार ऑलि पोपनं नाणेफेक जिंकत भारतीय संघाला
फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पावसामुळे उपहारासाठी खेळ लवकर थांबवण्यात आला, त्यावेळी भारताच्या दोन बाद ७२ धावा झाल्या होत्या. कर्णधार शुभमन गिल १५, तर साई सुदर्शन २५ धावांवर खेळत आहेत.
****
पैठण इथल्या जायकवाडी प्रकल्पावरील नाथसागर इथं आज जलसंपदा मंत्री
डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं. धरणातला पाणीसाठी ९२ टक्क्यांच्यावर
पोहोचला आहे. धरणातून नऊ हजार ४३२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरु करण्यात आला
असून,
प्रशासनानं नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा
दिला आहे.
****
Wednesday, 30 July 2025
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.07.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 30
July 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जूलै २०२५ दुपारी १.०० वा.
****
दहशतवादी कारवायांची सूत्रधार आणि अल कायदा या दहशतवादी
संघटनेशी संबंधित असलेल्या शमा परवीन या महिला दहशतवाद्याला आज बंगळूरुमधून अटक करण्यात
आली. गुजरात दहशतवाद विरोधी पथकानं ही कारवाई केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादी
विचारधारा पसरवण्याचा तिच्यावर आरोप आहे. गेल्या आठवड्यात देखील अल कायदा चे तीन दहशतवादी
पकडण्यात आले होते.
****
जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रणरेषेवर घुसखोरीचा प्रयत्न
भारतीय लष्कराने आज हाणून पाडला. पूँछ सेक्टरमध्ये नियंत्रणरेषा ओलांडण्याचा प्रयत्न
करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना लष्कराने ठार केलं. लष्कराच्या गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या
अचूक माहितीनंतर ही तात्काळ कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरुन शस्त्र देखील जप्त करण्यात
आले.
****
राज्यसभेत आज ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेला पुन्हा सुरुवात
झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी चर्चेला सुरुवात करताना, दहशतवादी तळ उध्वस्त करणं, हाच ऑपरेशन सिंदूरचा उद्देश होता, असं सांगितलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने विविध कारवायांच्या
माध्यमातून दिलेल्या प्रत्यूत्तराबाबत त्यांनी माहिती दिली.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या रेल्वे स्थानकानजिक अपघातानंतर
मदतीसाठी कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी काही उपाययोजना करण्यासंदर्भात छत्रपती संभाजीनगरचे
खासदार संदीपान भुमरे यांनी आज लोकसभेत विचारणा केली. यावर उत्तर देताना रेल्वेमंत्री
अश्विनी वैष्णव यांनी, कवच ही ऑटोमॅटिक ट्रेन
प्रोटेक्शन सिस्टिम, ज्यामुळे रेल्वे अपघाताला
आळा घालता येईल, याबद्दल माहिती दिली. महिला प्रवाशांची
सुरक्षा, धावत्या गाडीत प्रवाशांना उपचार
करण्यासाठी तत्काळ मदत, आदी मुद्दे देखील भुमरे यांनी उपस्थित केले. रेल्वे प्रवाशांच्या
सुरक्षेसाठी आणि त्यांना मदत देण्यासाठी डेटा सेंटर, ऑप्टिकल फायबर, यासारख्या डिजिटल पद्धतींचा उपयोग रेल्वे मंत्रालय करत असल्याचं
वैष्णव यांनी सांगितलं.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरो आणि अमेरिकेच्या नासा
यांचा संयुक्त उपक्रम असलेला नासा - इसरो सिंथेटिक अपर्चर रडार म्हणजे निसार या उपग्रहाचं
आज सायंकाळी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण होणार आहे. काल
दुपारी दोन वाजेपासून त्याची उलटगणना सुरु झाली. या उपग्रहाच्या माध्यमातून दर बारा
दिवसांनी संपूर्ण पृथ्वीचं निरिक्षण करण्यात येणार असून, हवामान बदल संशोधन आणि आपत्ती प्रतिसादासाठी उच्च प्रतीच्या
प्रतिमा मिळणार आहेत. सेंटीमीटर पातळीवर अचूकतेसह पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदलांचा
मागोवा घेण्यासाठी यामध्ये नासाचे एल - बँड आणि इसरोचे एस - बँड रडार आहेत.
****
सात ऑगस्ट हा दिवस शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करण्याचा
निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त
हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. डॉ. स्वामिनाथन यांच्या
स्मृतिप्रित्यर्थ राज्यातल्या सर्व कृषी विद्यापीठांमध्ये डॉ. एम एस स्वामिनाथन बायो
- हॅपिनेस सेंटर ची स्थापना करण्याचा निर्णय घेतल्याचंही कोकाटे यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बिडकीन इथं जिल्हा परिषद
शाळेची इमारत बांधण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर्स प्रायवेट लिमिटेड
यांच्यात काल सामंजस्य करार झाला. टोयोटा किर्लोस्कर या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व
निधीतून हे बांधकाम होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत आणि
टोयोटा किर्लोस्कर कंपनीच्या वतीने संचालक सुदीप दळवी यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी उपस्थित होते. जिल्हा प्रशासन आणि कंपनी मिळून विविध
क्षेत्रात सहकार्य करुन जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान देऊ असा विश्वास यावेळी दोन्ही
बाजूंनी व्यक्त करण्यात आला. टोयोटा किर्लोस्कर कंपनीच्या या सामाजिक उपक्रमातून ग्रामिण
भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सेवा उपलब्ध होतील, असं अंकीत यावेळी म्हणाले.
****
परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथं आज
छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिर घेण्यात आलं. याअंतर्गत शासनाच्या
विविध योजनांची माहिती नागरीकांपर्यंत पोहोचवण्यात येते. नागरीकांनी या योजनांचा लाभ
घेण्याचं आवाहन तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी यावेळी केलं. तहसील कार्यालयामार्फत
दिल्या जाणाऱ्या रहिवाशी, उत्पन्न आणि जातीचे दाखले, शिधा पत्रिका वाटप या सुविधांची माहिती नायब तहसीलदार प्रशांत
थारकर यांनी दिली.
****
लातूर जिल्ह्यातल्या औसा शहरात गेल्या काही दिवसांपासून
चोरीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. शहरातल्या उंबडगा रोड वरील भाग्यप्रभू नगरात हातात
कोयते, कुऱ्हाड आदी धारदार शस्त्रांसह सहा
जणांची चड्डी बनियन गॅंग फिरत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. या गॅंगला
लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिक करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी इथले व्यापारी महादेव मुंडे यांच्या
हत्या प्रकरणातल्या आरोपींना लवकरात लवकर पकडावं आणि मुंडे कुटुंबियांना न्याय द्यावा, या मागणीसाठी येत्या एक तारखेला बीड जिल्हा सकल मराठा
समाजाच्या वतीने सर्व धर्मीय आणि सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.07.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 30 July 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जूलै २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरो
आणि अमेरिकेच्या नासा यांचा संयुक्त उपक्रम असलेला नासा - इसरो सिंथेटिक अपर्चर रडार
म्हणजे निसार या उपग्रहाचं आज सायंकाळी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून
प्रक्षेपण होणार आहे. काल दुपारी दोन वाजेपासून त्याची उलटगणना सुरु झाली. या उपग्रहाच्या
माध्यमातून दर बारा दिवसांनी संपूर्ण पृथ्वीचं निरिक्षण करण्यात येणार असून, हवामान बदल संशोधन आणि आपत्ती प्रतिसादासाठी
उच्च प्रतीच्या प्रतिमा मिळणार आहेत. सेंटीमीटर पातळीवर अचूकतेसह पृथ्वीच्या पृष्ठभागावरील
बदलांचा मागोवा घेण्यासाठी यामध्ये नासाचे एल - बँड आणि इसरोचे एस - बँड रडार आहेत.
****
संरक्षण, संशोधन आणि विकास संस्था - डीआरडीओने
स्वदेशी बनावटीच्या 'प्रलय' क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी
घेतली. भारताच्या संरक्षण शक्तीला अधिक बळकट करण्यासाठी बनवलेलं 'प्रलय' हे जमिनीवरून जमिनीवर
मारा करणारं, लक्ष्यावर जलद आणि अचूकपणे
मारा करण्यास सक्षम असलेलं जलद प्रतिक्रिया देणारं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे.
****
येत्या एक ऑगस्टपासून युपीआयद्वारे
व्यवहार करण्यापूर्वी ज्यांना पैसे पाठवायचे आहे त्यांच्या बँकेचं नावंही दिसणार आहे.
त्यामुळे योग्य व्यक्तीला किंवा दुकानदाराला पैसे पाठवले जात आहेत याची खात्री होईल.
तसंच प्रत्येक व्यवहार झाल्यावर खात्यातली रक्कमही दिसणार आहे. याशिवाय अनेक नवीन अटी
लागू करण्याचा निर्णय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशननं घेतला आहे. त्यानुसार प्रलंबित असलेल्या
व्यवहारांची माहिती दिवसातून केवळ तीन वेळा पाहता येईल. याशिवाय युपीआय अॅपमधून दिवसाला
जास्तीत जास्त ५० वेळा खात्यातली रक्कम तपासता येईल. युपीआयच्या माध्यमातून ऑटो पे
चे व्यवहार यापुढे केवळ ठराविक वेळांमध्येच होतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सात ऑगस्ट हा दिवस शाश्वत शेती दिन
म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या
जन्मशताब्दीनिमित्त हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी
दिली. डॉ. स्वामिनाथन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राज्यातल्या सर्व कृषी विद्यापीठांमध्ये
डॉ. एम एस स्वामिनाथन बायो - हॅपिनेस सेंटर ची स्थापना करण्याचा निर्णय घेतल्याचंही
कोकाटे यांनी सांगितलं.
****
येत्या तीन ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यात
अवयवदान चळवळ राबववण्याचे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. ते
काल मुंबईत याबाबतच्या राज्यस्तरीय बैठकीत बोलत होते. या चळवळीत अवयवदानाबाबत सकारात्मक
मत परिवर्तन करून याविषयीची भीती कमी करावी, तसंच येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात अवयव दात्यांचा
सत्कार करण्याच्या सूचनाही त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहे.
****
मराठवाड्यात गेल्या जानेवारी ते जून
या सहा महिन्यांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जवळपास साडे तीन हजार रुग्णांना लाभ
झाला आहे. या रुग्णांना साडे पाच कोटी रुपयांहून अधिक निधीची वैद्यकीय मदत करण्यात
आली आहे. या योजनेमुळे आरोग्य शिबिर, रक्त संकलन आदी उपक्रम
प्रभावीपणे राबवणं सहज शक्य होत असल्याचं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष
प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातल्या
सर्व टपाल कार्यालयांमध्ये येत्या चार ऑगस्टपासून प्रगत टपाल तंत्रज्ञान प्रणाली कार्यान्वित
होणार आहे. या प्रणालीच्या अंमलबजावणीपूर्वी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पार पाडण्यासाठी, शनिवार दोन ऑगस्ट रोजी नियोजित देखभाल कार्य केलं जाणार
असल्यानं दोन्ही जिल्ह्यातल्या कोणत्याही कार्यालयात टपाल व्यवहार सेवा उपलब्ध होणार
नाही, असं टपाल कार्यालयातर्फे कळवण्यात
आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या
सार्वजनिक गणेश, दुर्गा उत्सव मंडळांना
कायमस्वरूपी नोंदणी करण्याचं आवाहन धर्मादाय सहआयुक्त रा. स. पावसकर यांनी केलं आहे.
दरवर्षी मोठ्या संख्येने मंडळांकडून वर्गणी संकलनासाठी परवानगी मिळवण्यासाठी अर्ज येतात.
मात्र, जर मंडळांनी संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत
नोंदणी केली असेल, तर त्यांना वारंवार परवानगी
घेण्याची गरज भासणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
****
सैन्यात करिअर करण्यासाठी ध्येय निश्चिती, शिस्त, आत्मविश्वास, वेळेचं नियोजन, यासह इतर अनेक गोष्टी पाळण्याची गरज
असल्याचं, लेफ्टनंट कर्नल संतोष मोहिते यांनी
सांगितलं. परभणी इथं श्री शिवाजी महाविद्यालयातल्या एनसीसी विभागाच्या वतीने कारगिल
विजय दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. सैन्यामध्ये मुलींना विशेष
संधी उपलब्ध झाल्या आहेत त्याचा फायदा विद्यार्थिनींनी घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं.
****
बीड शहरातले अंकुशनगर आणि धानोरा
मार्ग हे दोन मुख्य रस्ते दुरुस्त करावे या मागणीसाठी काल नागरिकांनी लोटांगण आंदोलन
केलं. आमदार संदीप क्षीरसागर यानी आंदोलकांची भेट घेऊन, येत्या चार ऑगस्टला जिल्हाधिकार्यालयात बैठक घेऊन या रस्त्यांचा
प्रश्न मिटवण्याचं आश्वासन दिलं.
****
Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 30 جولائی 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10
Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.07.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 30 July 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जुलै २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सैन्यदलानं सामर्थ्य सिद्ध
केल्याचं पंतप्रधानांचं लोकसभेत प्रतिपादन
·
युद्धबंदीच्या मुद्यावरुन विरोधी पक्षांची सरकारवर टीका, युद्धबंदीसाठी
तिसऱ्या देशानं मध्यस्थी केली नसल्याचं पंतप्रधानांचं स्पष्टीकरण
·
ऑपरेशन महादेवमध्ये पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवादी ठार, अमित शहा
यांची माहिती
·
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या
स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
·
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय आणि पारदर्शी
वातावरणात पार पाडाव्यात-राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश
आणि
·
जायकवाडी धरणात सुमारे ८९ टक्के पाणीसाठा
****
ऑपरेशन
सिंदूरमध्ये सैन्यदलानं अचूक लक्ष्यभेद करून आपलं सामर्थ्य सिद्ध केल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेला उत्तर देताना,
हे ऑपरेशन सुरू असून, पाकिस्तानने दुस्साहस केल्यास,
भारत सडेतोड उत्तर देईल, असा सज्जड इशारा दिला.
या कारवाईत भारताने दहशतवादी तळ उध्वस्त केल्यानंतर पाकिस्तान सरकार दहशतवाद्यांसोबत
उभं राहिलं, त्यावर भारतीय सैन्याने दिलेलं उत्तर पुढची अनेक
दशकं पाकिस्तान विसरू शकणार नाही, असं त्यांनी नमूद केलं. सैन्यदलाच्या
या कारवाईला जगभरातून समर्थन मिळाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
भारताने
केलेली ही कारवाई विस्तारासाठी नसल्याचं, आपण पहिल्या दिवसापासून सांगत आहोत,
त्यामुळे आपण युद्ध थांबवलं, मात्र यामध्ये कोणीही
मध्यस्थी केलेली नसल्याचं मोदी यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले...
बाईट
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
दहशतवादाबाबत
आपल्या सरकारचं झिरो टॉलरन्स धोरण असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं
आहे. ते काल लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेत बोलत होते. ऑपरेशन महादेव अंतर्गत
काश्मीरमध्ये मारले गेलेले तीन दहशतवादी, पहलगाम हल्ल्यात सामील असल्याचे ठोस पुरावे
तपास यंत्रणांकडे असल्याचं त्यांनी सांगितलं,
बाईट
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
विरोधी
पक्षनेते राहुल गांधी यांनी यावेळी बोलतांना, युद्ध थांबवण्याच्या सरकारच्या निर्णयावर
टीका केली. ते म्हणाले...
बाईट
- विरोधी पक्षनेते राहुल गांधी
**
राज्यसभेत
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ऑपरेशन सिंदूरविषयी चर्चेला सुरुवात केली. मल्लिकार्जुन
खरगे यांनी चर्चेत सहभाग घेत, पाकिस्तानची अवस्था वाईट असतांनाही युद्धविरामावर
सहमती का झाली, याबाबतही सरकारने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.
****
राज्यात
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या
आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या अंतर्गत एकंदर एक हजार ९०२ पुरस्कार देण्यात
येणार आहेत.
ग्रामीण
भागातल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी
उमेद अभियानांतर्गत १० जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्यास, तसंच ई-नाम
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन करण्यासाठी कृषी
उत्पन्न पणन विकास आणि विनियमन अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यासही
मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
****
राज्यातल्या
महापालिका रुग्णालयांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महिलांसाठी कर्करोग तपासणीची
मोहीम राबवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात
झालेल्या बैठकीत ते बोलत होते. महिलांमध्ये स्तनाचा तसंच गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत
जागृती वाढावी आणि उपचारापेक्षा प्रतिबंधावर भर देण्यासाठी ही तपासणी मोहिम घेण्याचे
निर्देश त्यांनी दिले.
****
महसूल विभागाने
कृत्रिम वाळू धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती निश्चित केली असून, याबाबतचा
शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार, सार्वजनिक तसंच
खाजगी जमिनींवर एम-सँड युनिट्स सुरू करण्यासाठी माहिती एकत्रित करुन 'महाखनिज' प्रणालीवर लिलावासाठी योग्य जमिनींची माहिती
देण्यात येईल. पाच एकरांपर्यंतच्या क्षेत्रासाठी लिलाव प्रक्रिया राबवली जाणार आहे.
पर्यावरणाचं रक्षण आणि संरक्षण या दृष्टीकोनातून वाळूला पर्याय देणं आवश्यक होतं,
असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय
व्याघ्र दिन काल साजरा झाला. देशामध्ये व्याघ्र संवर्धनात महाराष्ट्राने सर्वोत्कृष्ट
काम केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं. व्याघ्र दिनानिमित्त
वाईल्ड ताडोबा या माहितीपटाच्या ट्रेलरचं प्रकाशन तसंच एशियाटिक बिग कॅट सोसायटी नॅशनल
अवॉर्ड २०२५ या कार्यक्रमात दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री काल
बोलत होते. ते म्हणाले...
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
महाराष्ट्र
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी -बारावी पुरवणी परीक्षेचा
ऑनलाईन निकाल काल जाहीर करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचं पुनर्मूल्यांकन
करायचं असेल त्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असं मंडळातर्फे सांगण्यात
आलं आहे.
****
राज्यातल्या
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पाडाव्यात
असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर
इथं विभागीय आयुक्त कार्यालयात सर्व जिल्ह्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या निवडणुकांमध्ये
एक जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार असून, याप्रमाणे
मतदान केंद्राची संख्या असावी, अशा सूचना वाघमारे यांनी दिल्या.
****
राष्ट्रीय
कृषी विकास योजना कॅफेटेरियाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात १५ ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी
प्रयोगशाळा स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे. प्रयोगशाळेसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या
आणि इच्छुकांनी आठ ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत, असं आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी
दत्तकुमार कळसाईत यांनी केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातले
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांनी काल आपल्या समर्थकांसह भारतीय
जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी वरपुडकर आणि
त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत केलं.
दरम्यान, महाराष्ट्र
प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष तथा जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी
प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला
आहे. आपल्या वैयक्तिक अडचणींमुळे आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जालना
दौऱ्यावर आलेले प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी याबाबत बोलताना, भाजपकडे
सक्षम नेतृत्व नसल्याने कॉँग्रेसच्या नेत्यांना तसंच कार्यकर्त्यांना आमीष दाखवून भाजपात
घेतलं जात असल्याची टीका केली.
****
रासायनिक
खतांच्या सर्व किरकोळ विक्रेत्यांना अनुदानित रासायनिक खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे
करणं बंधनकारक असल्याचं, कृषी विभागाने सांगितलं आहे. याबाबतच्या सूचना जारी करण्यात आल्या
असून, ई-पॉस प्रणालीवरील खत साठा आणि प्रत्यक्ष गोदामातला साठा
यामध्ये कोणतीही तफावत असू नये, असं यात नमूद करण्यात आलं आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथलं जायकवाडी धरण सुमारे ८९ टक्के भरलं आहे. धरणात काल
सायंकाळी २३ हजार २७३ दशलक्ष घनफूट प्रति सेकंद वेगाने पाण्याची आवक सुरु होती, त्यामुळे
धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्याची शक्यता असल्याने, गोदाकाठावरील
गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...