आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Thursday, 30 September 2021
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 September 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 30 September 2021
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक - ३० सप्टेंबर
२०२१ सायंकाळी ६.१०
****
गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी
जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध
राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा
धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही
काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही
कोविड-१९ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना
बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी
आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या
राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· देशाला
आरोग्य क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपाय योजले जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांचं प्रतिपादन.
· सरकार
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करणार - महसूल राज्य मंत्री अब्दूल सत्तार यांची
माहिती.
· नांदेड
जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
आणि
· नुकसानग्रस्त
शेतकऱ्यांना मदत देण्याची विविध पक्ष, संघटनांची मागणी.
****
स्वच्छ भारत अभियान, आयुष्मान भारत योजना
आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत लोककल्याणासाठी आणि देशाला आरोग्य क्षेत्रात
स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक उपाय योजले जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे. राजस्थानमधल्या जयपूर पेट्रो केमिकल तंत्रज्ञान संस्थेचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या
हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशभरात तीन टप्प्यांत
एकशे सत्तावन्न नवी वैद्यकीय महाविद्यालयं स्थापन केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
या क्षेत्राकडे दिलेलं लक्ष आणि सुरु करण्यात आलेल्या योजना यांचे परिणाम आता दिसू
लागले आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
****
सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत
करणार असून आगामी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती राज्याचे
महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. ते आज नंदुरबार जिल्ह्यात पत्रकारांशी
बोलत होते. मराठवाड्यात वीस लाख हेक्टर वरील पिकाच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज असल्याचं
त्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
शासनाच्या
नियमाप्रमाणे जे काही मदत करता येईल, ती सर्व मदत सरकार करणार आहे. काही पैसे केंद्र
सरकार कडून येणं बाकी आहेत, पन्नास हजार कोटी त्याच्यामधील ३२ हजार कोटी रुपये हे जीएसटीचे
आहेत. आणि हे एकदा राज्यात आले तर निश्चित किंवा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्जही
घेण्याची परिस्थिती आली तर कर्जही घेवू परंतू हवालदिल झालेला शेतकरी याला महाराष्ट्र
सरकारच्या वतीने नेते निर्णय घेतील आणि किती हेक्टरने द्यायचे आहे नुकसान त्याची घोषणा
येणाऱ्या कॅबिनेट पर्यंत होईल.
****
नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसात कुठेही
पावसाची नोंद झाली नसली तरी जायकवाडी, येलदरी, सिध्देश्वर आदी धरणांमधून पाण्याचा मोठ्या
प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. विष्णुपुरी प्रकल्पातून विसर्ग करण्यात येत आहे.
हा विसर्ग शहरातून वाहणार असल्यानं जुन्या पुलावरलं पाणी धोक्याच्या पातळीपर्यंत वाढण्याची
शक्यता आहे. शहरातल्या नदीकाठच्या सर्व नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याची आवश्यकता
आहे. उर्ध्व मानार प्रकल्प आणि निम्न मानार प्रकल्पही १०० टक्के भरलं असून तिथं अतिवृष्टी
झाल्यानं पाणी नदीत सोडण्यात येत आहे. गोदावरी, पैनगंगा, पुर्णा, मानार नदीकाठच्या
गावातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन नांदेड पाटबंधारे
विभागाचे अधीक्षक अभियंता बी. के. शेटे यांनी केलं आहे.
****
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झाल्याच्या
पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि
विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर या भागाचा दोन दिवसांचा दौरा करणार
आहेत. दरेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****
गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाड्यात झालेल्या
शेतीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे, एकरी ५० हजार रुपये मदत जाहीर करावी आणि
ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चातर्फे करण्यात
आली आहे. मोर्चाचे प्रदेश महामंत्री जालिंदर शेंडगे यांच्यासह एका शिष्टमंडळानं याबाबतचं
निवेदन आज विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना सादर केलं.
****
परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन
हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या
संतप्त कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान,
शासनातर्फे राज्यातल्या प्रत्येक नुकसानग्रस्त घराला आणि शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयांची
तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी उस्मानाबाद इथं जनता दल धर्मनिरपेक्षचे प्रदेश
कार्याध्यक्ष रेवण भोसले यांनी केली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या
पार्श्वभूमीवर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक अशा यंत्रणेद्वारे थेट शेतकऱ्यांच्या
बांधावर जाऊन पिक नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी आमदार अंबादास दानवे
यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे
केली आहे. शेतकरी तांत्रिक अडचणींमुळे नुकसानभरपाई संबंधी योजनांच्या लाभांपासून वंचित
राहू शकतो, अशी शक्यताही त्यांनी या निवेदनात व्यक्त केली आहे.
****
जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे
जिल्ह्यातल्या सुमारे तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या दोन लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्रावरील
पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे
करण्याचं काम महसूल आणि कृषी विभागानं सुरू केल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी भास्कर
रणदिवे यांनी दिली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या
येलदरी जलाशयाची सर्व दारं आज दुपारी पूर्णतः बंद करण्यात आली असून त्यामुळे पूर्णा
नदीस आलेला पूर हळूहळू ओसरेल असं चित्र दिसत आहे. खडकपूर्णा प्रकल्पातून येलदरी जलाशयात
मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु होती मात्र आज सकाळपासून खडकपूर्णेतून पाण्याची
आवक कमी झाल्यानंतर पाटबंधारे खात्यानं सर्व दरवाजे बंद केलेत.केवळ विद्युत प्रकल्पास
शहात्तर पूर्णांक शेहेचाळीस घनफूट प्रतीसेंकद वेगानं पाणी सोडण्यात येत असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
//********//
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.09.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 September 2021
Time 1.00 to 1.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० सप्टेंबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
मराठवाड्यात
आज सलग दुसऱ्या दिवशी पावसानं उघडीप दिली आहे, मात्र अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग
सुरु असल्याचं पूर परिस्थिती कायम आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाच्या १८ दरवाजांतून २८ हजार २९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं
पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
नांदेड
जिल्ह्यातल्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या १५ दरवाजांतून दोन लाख ६२ हजार २०६ घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून,
सखल भागात पाणी साचलं आहे.
****
परभणी
जिल्ह्यात पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी आणि सिद्धेश्वर या दोन्ही जलाशयातून
पूर्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पूर्णा
नदीला मोठा पूर आला आहे. परभणी ते वसमत या राष्ट्रीय महामार्गावरील रहाटी इथल्या पूर्णा
नदीच्या पुलावरून या पुराचं पाणी वाहत आहे. त्यामुळे रहाटी वरील पुलावरील वाहतूक पूर्णतः
ठप्प झाली. या पुलाजवळ बांधकाम विभाग, महसूल आणि पोलीस प्रशासनाने दोन्ही बाजुंनी अडथळे
उभारून रस्ता बंद केल्यामुळे परभणी ते नांदेड आणि परभणी ते हिंगोली कडील वाहतूक ठप्प
झाली आहे.
धुळे जिल्ह्यातल्या
अक्कलपाडा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु असल्यामुळे धुळे शहरातून
वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर आला आहे.
****
बीड जिल्ह्यात
झालेल्या अतिवृष्टीत सहा लाख ६५ हजार ९१० शेतकऱ्यांचं पाच लाख २४ हजार २१२ हेक्टर वरील
पिकांचं नुकसान झालं आहे. या बरोबरच जिल्ह्यात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे.
तीनशेच्या जवळपास घराची तर जवळपास दोन हजार झोपड्यांचं नुकसान झालं आहे. ५७ लहानमोठी
पूलं वाहून गेली, तर ३२ तलाव फुटले आहेत.
दरम्यान,
दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने अंबाजोगाई तालुक्यास सर्वाधिक फटका बसला आहे.
या तालुक्यातल्या देवळा आणि आपेगाव या गावात पाणी शिरल्यानं ग्रामस्थांना जिल्हा परिषद
शाळेत स्थलांतरित करण्यात आलं आहे.
****
मराठवाडा,
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक उध्वस्त झालं असून, शेतकरी
संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन प्रत्येक नुकसानग्रस्त
घराला आणि शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयांची तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी, जनता दल
सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते रेवण भोसले यांनी केली आहे. ते
आज उस्मानाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राला मोठा फटका
बसला असल्यामुळे ओला दुष्काळही तातडीने जाहीर करावा, असंही भोसले यांनी म्हटलं आहे.
****
देशव्यापी
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ८८ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात ७५ लाख
३४ हजार ३०६ नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या ८८ कोटी ३४ लाख ७०
हजार ५७८ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या २३ हजार ५२९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३११ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी ३७ लाख ३९
हजार ९८० झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ४८ हजार ६२ रुग्णांचा मृत्यू झाला
आहे. काल २८ हजार ७१८ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी ३० लाख १४ हजार ८९८
रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ७७ हजार २० रुग्णांवर उपचार सुरु
आहेत.
****
राज्यातल्या
रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील खड्ड्यांच्या दुरुस्ती
आणि उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. रस्त्यांसाठी दिलेल्या निधीचा विनियोग
व्यवस्थित झाला नाही, कामचुकारपणा केल्याचं निदर्शनास आलं, तर संबंधित कंत्राटदाराची
गय केली जाणार नाही. या रस्त्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यावर आहे, त्यालाही जबाबदार
धरून तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना यावेळी दिले. संपूर्ण
रस्त्यांची कामे ही दर्जेदार झाली पाहिजेत, त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा
वापर करा, रस्त्यांच्या कामात गुणवत्तेवर सर्वोच्च भर देण्याबरोबरच रस्त्यांच्या कामासाठी
कृती आराखडा तयार करावा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या देगलूर राखीव विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक येत्या ३० ऑक्टोबर रोजी
होत आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर ४११ मतदान केंद्रावर आरोग्य सेवकाची नेमणूक करण्यात
आली असून, योग्य खबरदारी घेत असल्याची माहिती, जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांनी दिली.
पोटनिवडणुकीच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. मतदानासाठी येणाऱ्या
प्रत्येक मतदाराचं थर्मल स्कॅनिंग, तपासणी करुन त्यांना मतदान करण्यास अनुमती देण्यात
येईल. कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन सर्वांसाठी बंधनकारक असेल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी
सांगितलं.
****
Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.09.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३० सप्टेंबर २०२१ सकाळी ११.००
वाजता
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जयपूर पेट्रो केमिकल तंत्रज्ञान संस्थेचं उद्घाटन होणार
आहे. दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान राजस्थानातल्या
बासावाडा, सिरोही, हनुमानगड आणि दौसा इथल्या चार प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयांची
पायाभरणी देखील करणार आहेत. दुर्गम आणि मागास भागाचा प्राधान्यानं विकास करण्याच्या
केंद्र सरकारच्या योजनेनुसार ही वैद्यकीय महाविद्यालयं उभारण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत
देशभरात तीन टप्प्यात १५७ नवीन वैद्यकीय महाविद्यालयं स्थापन केली जाणार आहेत.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ३८ वी प्रगती बैठक पार पडली. या बैठकीत आठ
प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये रेल्वे खात्याचे चार ऊर्जा खात्याच्या
दोन तसंच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि नागरी हवाई महामार्ग मंत्रालयाच्या
प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश होता. महाराष्ट्रासह ओडिशा, आंध्र प्रदेश, बिहार,
झारखंड, मध्य प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये सुरू असलेल्या या सर्व प्रकल्पांचा
मिळून खर्च सुमारे ५० हजार कोटी रुपये इतका आहे.
****
परभणी
जिल्ह्यात पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी आणि सिद्धेश्वर या दोन्ही जलाशयातून
पूर्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पूर्णा
नदीला मोठा पूर आला आहे. परभणी ते वसमत या राष्ट्रीय महामार्गावरील रहाटी इथल्या पूर्णा
नदीच्या पुलावरून या पुराचं पाणी वाहत आहे. त्यामुळे रहाटी वरील पुलावरील वाहतूक पूर्णतः
ठप्प झाली, ती आज सकाळी कायम होती. या पुलाजवळ बांधकाम विभाग, महसूल आणि पोलीस प्रशासनाने
दोन्ही बाजुंनी अडथळे उभारून रस्ता पूर्णतः बंद केला आहे. त्यामुळे परभणी ते नांदेड,
परभणी ते हिंगोली कडील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.
****
नागरी
हवाई वाहतूक महासंचालनालयाने आंतरराष्ट्रीय सामान्य प्रवासी उड्डाणांवरची बंदी येत्या
३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. मालवाहतूक करणाऱ्या उड्डाणांना तसंच महासंचालनालयाने
विशेष परवानगी दिलेल्या उड्डाणांना ही बंदी लागू नसेल, असं यासंदर्भातल्या परिपत्रकात
म्हटलं आहे.
****
TEXT: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.09.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 September 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ३० सप्टेंबर २०२१
सकाळी
७.१०
मि.
****
गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता
नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप
कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित
अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ
धुवा. तरीही कोविड-19 ची लक्षणं आढळली तर लगेच
विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे
इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११-
२३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य
स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी
मदत करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश, नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश, ओला दुष्काळ जाहीर करण्याची
लोकप्रतिनिधींची मागणी
·
पैठणच्या
जायकवाडी जलाशयात पाण्याची मोठी आवक, धरणाचे सर्व २७ दरवाजे उघडले
·
राज्यात मुसळधार पावसामुळे एमएच सीईटी आणि इतर अभ्यासक्रमांच्या
प्रवेश परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी नऊ आणि १० ऑक्टोबरला पुन्हा परीक्षा घेणार
·
शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या पंतप्रधान पोषण आहार योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
आणि
·
राज्यात तीन हजार, १८७ नवे कोविड बाधित रुग्ण; मराठवाड्यात तीन जणांचा मृत्यू तर १२२ बाधित
****
मराठवाड्यात
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी प्रशासनाला दिले आहेत. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्र्यांनी
काल मदत आणि पुनर्वसन विभागाकडून घेतला, तसंच त्यांनी जिल्ह्यांचे पालकमंत्री, आणि
विभागीय आयुक्तांशी संवाद साधला. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना
प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी, लोकांचं स्थलांतर व्यवस्थित व्हावं, असं
ते म्हणाले. या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनानं नागरिकांच्या बचाव कार्यावर लक्ष द्यावं,
तसंच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. महसूल आणि कृषी
विभागानं नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करण्यांचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
****
नाशिक
शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचा जोर काल दुपारनंतर कमी झाला. त्यामुळे गंगापूर,
नांदूर मधमेश्वरसह नाशिक जिल्ह्यातल्या अन्य धरणांमधून होणारा विसर्ग, काल दुपारनंतर
कमी झाला. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ
यांनी, काल गोदावरी नदीच्या पुराची पाहणी केली.
जायकवाडी
धरणाच्या नाथसागर जलाशयात मोठ्या प्रमाणात पाणी दाखल होत आहे. त्यामुळे काल रात्री
धरणाचे सर्व २७ दरवाजे उघडण्यात आले असून, जवळपास एक लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी
गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणाचा पाणीसाठा सायंकाळी साडे ९८ टक्क्यांवर
पोहोचला होता. नदी काठच्या गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या लासूर इथं ढेकू नदीच्या पुरात ५२ लोक आणि काही जनावरं
अडकले होते, अग्निशमन दलाच्या पथकानं त्यांची सुटका केली.
****
लातूर
जिल्ह्यात शिवनी इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्या १३ जणांची आपत्ती प्रतिसाद दलाच्या
पथकानं सुखरुप सुटका केली.
****
बुलडाणा
जिल्ह्यातलं पेनटाकळी धरण भरल्यानं धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
यामुळे हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात पैनगंगा नदीकाठावरील गावांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती
निर्माण झाली असून, नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भ
मराठवाडा सीमेवरील ईसापूर धरणाचे १२ दरवाजे उघडल्यानंतर पैनगंगा नदीला पूर आला आहे.
हिंगोली
जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या देवजना परिसरात कयाधू नदीच्या महापुरानं शेतांना
वेढा घातला आहे. शेतात आखाड्यावर अडकलेल्या नागरिकांना काल सकाळी बाहेर काढण्यात आलं.
जिल्ह्यातल्या सिध्देश्वर धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले असून, एक लाख घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात करण्यात येत आहे.
****
नांदेड
जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातल्या रुई धानोरा परिसरात कयाधू नदीला पूर आला असून, पुलावरून
पाणी वाहत असल्यानं, हदगाव ते निवघा मार्ग काल पूर्णपणे बंद झाला होता. हदगाव आगाराची
निवघा गावाकडे जात असलेली बस रूईचे सरपंच अमोल कदम, पोलीस पाटील सुभाष पवार आणि अन्य
लोकांनी पुलावरून न जाऊ देता हदगावकडे परत पाठवली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
डॉक्टर
शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे १५ दरवाजे उघडण्यात आले असून, दोन लाख ५९ घनफूट
प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीला पूर आला
आहे. पुराचे पाणी नांदेड शहरातील सखल भागात पाणी शिरलं आहे. या भागातल्या नागरिकांना
राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपातील १७ निवारा केंद्र उभारण्यात आले आहेत. या केंद्रात
मागील दोन दिवसात ९०० लोक स्थलांतरित झाले आहेत.
****
शेतकऱ्यांना
प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी, गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर
गुट्टे यांनी केली आहे. या मागणीचं मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेलं निवेदन, त्यांनी
जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. आगामी १५ दिवसात नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे
करून, गंगाखेड विधानसभा मतदारसंघ तसंच परभणी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ
जाहीर करावा, अशी मागणी गुट्टे यांनी निवेदनात केली आहे.
जिंतूर-सेलू
विधानसभा मतदार संघाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनीही, परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ
जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ सरसकट मदत जमा करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री
यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार
डॉ.राहुल पाटील यांनीही काल परभणी तालुक्यातल्या धार, मांगणगाव, राहाटी, नांदगाव, दुरडी,
समसापुर आदी गावांना भेटी देऊन, पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. या नुकसानीचे
सरसकट पंचनामे करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना केली असल्याची
माहिती आमदार पाटील यांनी दिली.
****
मराठवाडा
पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनीही मराठवाड्यात त्वरित ओला दुष्काळ जाहीर
करून, शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. या मागणीचं निवेदन
आमदार चव्हाण यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे
सादर केलं.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली आहे.
या मागणीचं निवेदन काल पालकमंत्री शंकरराव गडाख यांना सादर करण्यात आलं.
दरम्यान,
गडाख यांनी काल उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यातल्या गावांना भेट देऊन पाहणी केली. शेतकरी
आणि नुकसानग्रस्तांशी संवाद साधून, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याची ग्वाही
दिली.
****
खरीप
हंगाम २०२१ अंतर्गत पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या
पिकाच्या क्षेत्राची पूर्वसूचना देण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स ॲपवरती छायाचित्रासह तक्रार
नोंदवणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी तक्रार नोंदवताना योग्य ती खबरदारी
घेऊन नुकसानग्रस्त क्षेत्राची तक्रार विमा कंपनीकडे नोंदवावी, असं आवाहन परभणी जिल्हा
प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
****
राज्यात
मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत,
अशा विद्यार्थ्यांच्या एमएच सीईटी आणि इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा, नऊ आणि
१० ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहेत. पीसीएम आणि पीसीबी
या दोन्ही ग्रुपच्या पात्र उमेदवारांना, उद्या एक ऑक्टोबर ते तीन ऑक्टोबर या कालावधीत,
ईमेल तसंच एसएमएसद्वारे अधिक सूचना देण्यात येतील. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री
उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली. विद्यार्थ्यांनी
परीक्षा शुल्क यापूर्वी भरलेलं असल्यामुळे त्यांची निशुल्क नोंदणी करुन घेण्यात येईल,
नोंदणी केलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रांच्या उपलब्धतेनुसार केंद्र तसंच नव्याने
प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.
****
शालेय
विद्यार्थ्यांसाठीच्या पंतप्रधान पोषण आहार योजनेला पुढच्या पाच वर्षांसाठी केंद्रीय
मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. या योजनेचा देशभरातल्या ११ लाख २० हजार शाळांमधल्या,
११ कोटी ८० लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. या पूर्वी माध्यान्ह भोजन योजना या
नावानं चालवल्या जात असलेल्या या योजनेत, पहिली ते आठवीपर्यंतच्या शासकीय तसंच अनुदानित
शाळांमधल्या विद्यार्थ्यांना लाभ होत होता, आता या योजनेची व्याप्ती वाढवून, सरकारी
तसंच सरकारी अनुदान प्राप्त बालवाड्यांमधल्या बालकांनाही या योजनेत समाविष्ट करण्याचा
प्रस्ताव, सरकारच्या विचाराधीन असल्याचं, अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री पियुष गोयल
यांनी सांगितलं.
****
राज्यात
काल तीन हजार, १८७ नवे
कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या ६५ लाख, ४७ हजार, ७९३ झाली आहे. काल ४९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या
रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३९ हजार
११ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक
१२ शतांश टक्के झाला आहे. काल तीन हजार २५३ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६३ लाख ६८ हजार ५३० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून,
कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक २६ शतांश टक्के
झाला आहे. राज्यात सध्या ३६ हजार, ६७५
रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल १२२ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृतांमध्ये जालना, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी
एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात काल ३४ नवे रुग्ण
आढळले. बीड ३२, लातूर १६, नांदेड तीन,
परभणी दोन, तर जालना जिल्ह्यात एक रुग्ण आढळला. हिंगोली
जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.
****
तुळजापूरच्या
श्री तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेला कालपासून प्रारंभ
झाला. आता येत्या सात ऑक्टोबरला घटस्थापनेच्या दिवशी तुळजाभवानी देवी सिंहासनारूढ होऊन,
देवीच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ होईल.
****
राज्यातलं वाढतं प्रदुषण रोखण्यासाठी नागरिकांनी जास्तीत-जास्त
इलेक्ट्रिक वाहनं घ्यावीत, असं आवाहन राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
यांनी केलं आहे. ते काल पिंपरी-चिंचवड इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्य सरकारनं
इलेक्ट्रिक वाहन धोरण आणलेलं आहे. कंपन्यांमध्ये या वाहनांचं उत्पादन कशा पद्धतीने
केलं जातं, उत्पादन क्षमता किती आहे, याची माहिती घेत आहोत. इलेक्ट्रिक वाहनं बाजारात
आल्यानंतर किती लोकांना ही वाहनं वापरण्यासाठी प्रोत्साहित करु शकू, किती लोक इलेक्ट्रिक
वाहनं घेऊ शकतील. याची चाचपणी केली जात असल्याचं, ठाकरे यांनी सांगितलं.
****
लातूर इथं जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयमार्फत क्रीडा नैपुण्य
चाचण्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या चार ते सात ऑक्टोबर या कालावधीत या चाचण्या
जिल्हा क्रीडा संकूल,लातूर इथं घेतल्या जाणार आहेत.
****
हवामान -
गुलाब
चक्रीवादळानंतर तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आता वायव्य दिशेनं पुढे सरकलं असून,
ते गुजरातच्या जवळ आहे. येत्या २४ तासात हे कमी दाबाचं क्षेत्र अजून तीव्र होऊन, त्याचं
चक्रीवादाळामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. हे निर्माण होणारं चक्रीवादळ भारतीय
किनारपट्टीपासून दूर जाणार आहे. मात्र याच्या प्रभावामुळे कोकणात, मराठवाडा, तसेच मध्य
महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
Wednesday, 29 September 2021
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 September 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 29 September 2021
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ सप्टेंबर
२०२१ सायंकाळी ६.१०
****
गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी
जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध
राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा
धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही
काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही
कोविड-19ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना
बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी
आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या
राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· मराठवाड्यात
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश.
· जायकवाडी
धरणातून ६६ हजार तर सिद्धेश्वर धरणातून एक लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग.
· नागरिकांनी
जास्तीत-जास्त इलेक्ट्रिक वाहनं घ्यावीत - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं आवाहन.
आणि
· मराठवाड्यात
त्वरित ओला दुष्काळ जाहीर करण्याची लोकप्रतिनिधींची मागणी.
****
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या
शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला
दिले आहेत. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला,
तसंच मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांनी याबाबत
चर्चा केली. त्यानंतर मुख्य सचिव सीताराम कुंटे तसंच मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान
सचिव असीमकुमार गुप्ता यांना मुख्यमंत्र्यांनी याबाबत सूचना केल्या. मुख्यमंत्र्यांनी
विभागीय आयुक्तांशी देखील चर्चा केली असून या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनानं बचाव कार्यावर
लक्ष द्यावं तसंच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
****
नाशिक शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचा
जोर कमी झाला आहे. त्यामुळे गंगापूर, नांदूर मधमेश्वरसह जिल्ह्यातल्या अन्य धरणांमधून
होणारा विसर्ग आज दुपारनंतर कमी झाला आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज गोदावरी नदीच्या पुराची पाहणी केली. आज दुपारी
बारा वाजेपर्यंत गंगापूर धरणातून साडे १० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीपात्रात
पाणी सोडलं जात होतं. दारणा धरणातून ५ हजार ८०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं तसंच इतरही
लहान मोठ्या धरणांमधूनही कमी अधिक प्रमाणात गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
त्यामुळे नांदूर-मधमेश्वर धरणातून सुमारे ४५ हजार ८२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी
औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाच्या दिशेने प्रवाहित झालं आहे.
जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयात सध्या
एक लाख १२ हजार ३५२ घनफूट प्रति सेकंद वेगानं पाणी दाखल होत आहे. धरणाचे वक्रकार १८
दरवाजे दीड फूट उघडून ६६ हजार २४ घनफूट प्रती सेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात
सोडण्यात येत आहे. धरणाचा पाणीसाठा सध्या जवळपास ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. पाण्याची
आवक लक्षात घेत विसर्ग अजून वाढू शकतो. त्यामुळे नदी काठच्या गावातील नागरिकांना सावधानतेचा
इशारा प्रशासनाने दिला आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यातील पेनटाकळी धरण भरल्यानं
धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यातील
पैनगंगा नदीकाठावरील गावांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नदीकाठावरील
गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या सिध्देश्वर धरणाचे
१२ दरवाजे उघडण्यात आले असून एक लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग पूर्णा
नदीपात्रात करण्यात येत आहे. यामुळे पूर्णा नदीचं पाणी औरंगाबाद-नांदेड रस्त्यावरुन
वाहत असल्यानं हा मार्ग आज दुपारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. औंढा तालुक्यातील
२८ गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
भारतातील प्रमुख बेदाणा उत्पादनात सांगली
जिल्ह्याचा समावेश आहे. राज्यातील एकूण बेदाणा उत्पादनापैकी ८० टक्के उत्पादन सांगली
जिल्ह्यात होतं. सांगलीची द्राक्षे आणि हळद ही राष्ट्रीय स्तरावरची सांगलीची ओळख असल्यानं
या दोन्ही पिकांना भौगोलिक मानांकन प्राप्त झालं आहे. जी.आय. मानांकनात शेतकऱ्यांची
नोंदणी वाढावी, निर्यातक्षम बेदाण्याची टक्केवारी वाढवावी, अशी अपेक्षा जिल्हा अधिक्षक
कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी
आणि पणन विभागामार्फत घेण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.
****
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक
श्रीनिवास रेड्डी यांचा निलंबन कालावधी तीन महिन्यांनी वाढवण्यात आला आहे. उद्या त्यांचा
निलंबन कालावधी संपणार होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन अधिकारी दीपाली चव्हाण
यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मे महिन्यात आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी
दीपाली यांनी रेड्डी यांच्या नावानं चार पानी
पत्र लिहिलं होतं.
****
राज्यातलं वाढतं प्रदुषण रोखण्यासाठी नागरिकांनी
जास्तीत-जास्त इलेक्ट्रिक वाहनं घ्यावीत, असं आवाहन राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री
आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. ते आज पिंपरी-चिंचवड इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते.
राज्य सरकारनं इलेक्ट्रिक वाहन धोरण आणलेलं आहे. कंपन्यांमध्ये या वाहनांचं उत्पादन
कशा पद्धतीने केलं जातं, उत्पादन क्षमता किती आहे, याची माहिती घेत आहोत. इलेक्ट्रिक
वाहनं बाजारात आल्यानंतर किती लोकांना ही वाहनं वापरण्यासाठी प्रोत्साहित करु शकू,
किती लोक इलेक्ट्रिक वाहनं घेऊ शकतील. याची चाचपणी केली जात असल्याचं, पर्यावरण मंत्री
ठाकरे यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये
नुकसान भरपाई देण्याची मागणी गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केली आहे. या
मागणीचं मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेलं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं.
आगामी १५ दिवसात नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करून गंगाखेड विधानसभा मतदारसंघ
तसंच परभणी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदार
गुट्टे यांनी निवेदनात केली आहे.
जिंतूर-सेलू विधानसभा मतदार संघाच्या आमदार
मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या
खात्यात तत्काळ सरसकट मदत जमा करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे
केली आहे.
****
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश
चव्हाण यांनीही मराठवाड्यात त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक
मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे. या मागणीचं निवेदन आमदार चव्हाण यांनी, मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केलं आहे.
****
अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी प्रमाणपत्रं
काढण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास
प्रकल्प, औरंगाबाद कार्यालयातंर्गत, औरंगाबादसह जालना, लातूर, बीड या चार जिल्ह्यांचा
समावेश असून लाभार्थ्यांसाठी न्युक्लीअस बजेट योजनेतंर्गत जात प्रमाणपत्र काढणे, आधारकार्ड
काढणे, शिधा पत्रिका काढण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
//********//
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...