Friday, 31 May 2019

31 05 2019 20 00

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.05.2019 20.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 May 2019
Time 20.00 to 20.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मे २०१९ सायंकाळी २०.००
****
नवीन केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या पहिल्या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा निधी योजनेअंतर्गतच्या पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेत वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. या योजनेत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी दोन हजार रूपयांची शिष्यवृत्ती वाढवून ती आता अडीच हजार रूपये तर विद्याथीनींची शिष्यवृत्ती सवा दोन हजार रूपयांवरून तीन हजार रूपये करण्यात आली आहे. नक्षली आणि दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या राज्य पोलिस दलांच्या पाल्यांनाही आता या शिष्यवृत्ती योजनेत सामावून घेण्यात आलं आहे. दरवर्षी राज्य पोलीस दलातल्या ५०० विद्यार्थांना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे.   
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाचं आज खातेवाटप जाहीर करण्यात आलं. यामध्ये मोदी यांच्याकडे कार्मिक मंत्रालय, नागरी तक्रार आणि निवृत्ती, आण्विक ऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग ही खाती आहेत. कॅबिनेट मंत्री राजनाथ सिंह यांना संरक्षण,  अमित शाह यांना  गृहमंत्री तर निर्मला सीतारामण यांना अर्थ आणि कंपनी व्यवहार खाते देण्यात आलं आहे. नितीन गडकरी यांना परिवहन आणि महामार्ग तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग ही खाती देण्यात आली आहेत. रामविलास पासवान यांना अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण, नरेंद्र सिंग तोमर हे कृषी आणि शेतकरी कल्याण तसंच ग्रामीण विकास आणि पंचायत राज, रवीशंकर प्रसाद हे कायदा, दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान ही खाती संभाळणार आहेत. स्मृती ईराणी यांच्याकडे महिला आणि बाल कल्याण तसंच वस्त्रोद्योग, प्रकाश जावडेकर यांच्याकडे माहिती आणि प्रसारण तसंच वन आणि पर्यावरण, पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग, अरविंद सावंत यांच्याकडे अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम या खात्यांचा पदभार देण्यात आला आहे. राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे ग्राहक संरक्षण तसंच अन्न आणि नागरी पुरवठा, रामदास आठवले हे सामाजिक न्याय आणि सबलीकरण, संजय धोत्रे हे मनुष्यबळ विकास, दळणवळण, माहिती आणि तंत्रज्ञान ही खाती संभाळणार आहेत.
खातेवाटप झाल्यानंतर बहुतांशी मंत्र्यांनी आपापल्या खात्याचा पदभार स्वीकारला आहे.
****
केंद्र सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या १७ जून ते २६ जुलैदरम्यान होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात नियमित अर्थसंकल्प सादर केला जाईल, एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं आज ही माहिती दिली.
****
जंगलवाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नात महाराष्ट्र देशात अव्वल असून जलयुक्त सोबतच वनयुक्त शिवार ही संकल्पना त्यासाठी उपयुक्त ठरली आहे, अशी माहिती राज्याचे अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाशिक इथं वार्ताहरांशी बोलतांना आज दिली. राज्य शासनाच्यावतीनं यंदा वन महोत्सवाअंतर्गत ३३ कोटी झाडे लावण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात वाघांची संख्या वाढत असून चार वर्षांपूर्वी राज्यात २०४ वाघ होते, परंतु आता २५० मोठे वाघ असून बछड्यांची संख्याही वाढल्याचं मुनगंटीवार यांनी यावेळी नमूद केलं.
****
जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त आजपासून ३० जूनपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अमोल गिते यांनी औरंगाबाद इथल्या जिल्हा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात दिली. डॉ. एस. व्ही.  कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी तंबाखूच्या दुष्परिणामांवर पथनाट्य सादर करण्यात आलं.
****
जालना औद्योगिक वसाहतीमधल्या भक्ती ऑईल मील या कंपनीच्या गोदामाला आज सकाळी आग लागली. आगीच्या या घटनेत गोदामात मोठ्या प्रमाणात साठवलेलं कुकुट पालन उद्योगासाठी वापरण्यात येणारं कोंबडी खाद्य आणि बारदान्यानं पेट घेतला. जालना, औरंगाबाद आणि  परतूर इथल्या अग्निशमन दलासह खासगी टँकर आग विझवण्यासाठी बोलावण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 
                                 ****

कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघात ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या लोकसभा मतदारसंघात झालेलं एकूण मतदान बारा लाख ४५ हजार ७९७ इतकं होतं. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीमध्ये बारा लाख ४६ हजार २५६ मतं आढळली, म्हणजेच या मतदारसंघात ४५९ मतं जास्तीची आढळल्याचा आरोप पराभूत खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
****
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज नॉटिंगहम इथं झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं पाकिस्तानवर सात गडी राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करताना २२ व्या षटकांत ११० धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजच्या संघान चौदाव्या षटकातच तीन गडी गमावून हे आवाहन पूर्ण केलं.
या स्पर्धेत उद्या न्युझीलंड आणि श्रीलंका तसंच अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सामने होणार आहेत.
****
निम्न दुधना प्रकल्पातून उद्या दुपारी चार वाजता पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे निम्न दुधना प्रकल्प ते परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहराजवळच्या कोल्हापूर बंधाऱ्यापर्यंत निम्न दुधना नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये तसंच ज्यांनी आपली जनावरं किंवा साहित्य नदीपात्रात ठेवली असतील ती त्वरीत काढून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
****

आकाशवाणी औरंगाबाद – 31.05.2019 रोजीचे रात्री 08.00 वाजेचे मराठी बातमीपत्र.

31 05 2019 18 00

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.05.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 May 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मे २०१९ सायंकाळी ६.००
****
नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची नवी दिल्लीत पहिली बैठक होत आहे. राष्ट्रीय संरक्षण निधी अंतर्गत शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा पहिला निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. देशाचं संरक्षण करणाऱ्यांना हा निर्णय समर्पित करण्यात आला आहे. तत्पुर्वी, आज दुपारी सतराव्या लोकसभेच्या मंत्रीमंडळाचं खातेवाटप करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कार्मिक मंत्रालय, नागरी तक्रार आणि निवृत्ती, आण्विक ऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग ही खाती आहेत. कॅबिनेट मंत्री राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्री, अमित शाह यांना  गृहमंत्री तसंच  नितीन गडकरी यांना परिवहन आणि महामार्ग तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग ही खाती देण्यात आली आहेत. निर्मला सीतारमण या अर्थ आणि कंपनी व्यवहार, रामविलास पासवान हे अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण, नरेंद्र सिंग तोमर हे कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास आणि पंचायत राज, तसंच रवि शंकर प्रसाद हे कायदा, दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान ही खाती संभाळणार आहेत. स्मृती ईराणी यांच्याकडे महिला आणि बाल कल्याण तसंच वस्त्रोद्योग, प्रकाश जावडेकर यांच्याकडे माहिती आणि प्रसारण तसंच पर्यावरण, पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग, अरविंद सावंत यांच्याकडे अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम या खात्यांचा पदभार देण्यात आला आहे. राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे ग्राहक संरक्षण तसंच अन्न आणि नागरी पुरवठा, रामदास आठवले हे सामाजिक न्याय आणि सबलीकरण, संजय धोत्रे हे मनुष्यबळविकास, दळणवळण, माहिती आणि तंत्रज्ञान ही खाती संभाळणार आहेत.
****
आज अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी त्यांच्या २९४ व्या जयंती निमीत्त विविध मान्यवरांनी त्यांना अभिवादन केलं. माजी मंत्री गणपतराव देशमुख  यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी झालेल्या समारंभात खासदार छत्रपती संभाजीराजे, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे प्रमुख उपस्थित होते. अहिल्याबाई होळकर यांनी सर्व जाती धर्माना घेऊन काम केलं. त्या महामाता होत्या. त्यांचा आदर्श पुढं चालू ठेवून काम करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं.
दरम्यान, पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी आपल्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन केलं. यावेळी पशूपालन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
*****
जंगलवाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नात महाराष्ट्र देशात अव्वल असून जलयुक्त सोबतच वनयुक्त शिवार ही संकल्पना त्यासाठी उपयुक्त ठरली आहे, अशी माहिती राज्याचे अर्थ – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाशिक इथं पत्रकार परिषदेत आज दिली. राज्य शासनाच्या वतीनं यंदा वनमहोत्सवाअंतर्गत ३३ कोटी झाडे लावण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात वाघांची संख्या वाढत असून चार वर्षांपूर्वी राज्यात २०४ वाघ होते परंतु आता २५० मोठे वाघ असून बछड्यांची संख्याही वाढल्याचं मुनगंटीवार यांनी यावेळी नमुद केलं.
****
विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. राज्याच्या इतर भागातही तापमान सरासरीपेक्षा जास्तच आहे. औरंगाबादमध्ये काल ४२ पूर्णांक तीन अंश सेल्सीअस तर उस्मानाबादमध्ये ४३ पूर्णांक नऊ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात आज आणि उद्या काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.  
****
ज्येष्ठ पत्रकार, भाषांतरकार तसंच लेखक डॉ. राम अग्रवाल यांची संसदेतील राज्यसभेत मराठी भाषांतर सल्लागार पदी नियुक्ती झाली आहे. भारताचे राष्ट्रपती एम. वेंकाय्या नायडू यांच्या उपस्थितीत, राज्यसभेचे महासचिव देश दिपक वर्मा यांच्या हस्ते डॉ. राम अग्रवाल यांना बालयोगी सभागृहात झालेल्या समारंभात नियुक्ती बद्दल सन्मान पत्र प्रदान करण्यात आलं.
****
जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त आजपासून ३० जूनपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अमोल गिते यांनी औरंगाबाद इथल्या जिल्हा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात दिली. डॉ. एस. व्ही.  कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी तंबाखूच्या दुष्परिणामांवर पथनाट्य सादर करण्यात आलं.
****
जालना औद्योगिक वसाहतीमधल्या भक्ती ऑईल मील या कंपनीच्या गोदामाला आज सकाळी आग लागली. आगीच्या या घटनेत गोदामात मोठ्या प्रमाणात साठवलेलं कुकुट पालन उद्योगासाठी वापरण्यात येणारं कोंबडी खाद्य आणि बारदान्यानं पेट घेतला. जालना, औरंगाबाद आणि  परतूर इथल्या अग्निशमन दलासह खासगी टँकर आग विझवण्यासाठी बोलावण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

आकाशवाणी औरंगाबाद – दि.31.05.2019 रोजीचे सायंकाळी 06.00 वाजेचे मराठी बात...

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 31.05.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 May 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मे २०१९ दुपारी .०० वा.
****
नव्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा खातेवाटप जाहीर झाला आहे. राजनाथ सिंह यांना संरक्षण, अमित शाह यांना गृह आणि नितीन गडकरी यांना परिवहन मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे. मंत्रिमंडळाची पहिली बैठकही आज संध्याकाळी होणार आहे. या बैठकीत संसदेचं कामकाज किती तारखेला सुरू होणार हे निश्चित केलं जाईल. संसदेच्या आगामी सत्रात लोकसभेतील नवीन सदस्यांचा शपथविधी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या काही दिवसांमध्ये सुरक्षा, संसदीय कामकाज आणि राजनैतिक बाबी या सारख्या अन्य मंत्रिमंडळ समित्यांबाबत निर्णय घेणार असल्याचंही वृत्त आहे.                                 
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधानांची काल किर्गिजस्तानचे राष्ट्रपती सूरोनबे जीनबेकोफ यांच्याशी राष्ट्रपती भवनात द्विपक्षीय बैठक झाली होती. किर्गिजस्तानचे राष्ट्रपती शंघाय सहकार्य संघटनेचे अध्यक्ष या नात्यानं कालच्या शपथविधी समारंभाला उपस्थित होते. पंतप्रधान आज नवी दिल्लीत बांग्लादेशचे राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हामिद, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविन्द कुमार जगनॉथ यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली आणि भूटानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांच्याबरोबरही द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
                                       ****
जम्मू - काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत आज एक दहशतवादी  ठार झाला. सुरक्षा दलांनी शोपीया जिल्ह्यात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याच्या माहितीवरून शोध मोहीम हाती घेतली असता उडालेल्या चकमकीत हा दहशतवादी मारला गेल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
****
या वर्षात भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर सात पूर्णांक एक टक्के राहील असं उद्योजक आणि व्यावसायिकांची प्रमुख संघटना फिक्कीनं केलेल्या सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे. फिक्कीनं चालू म्हणजेच मे महिन्यात उद्योग-व्यवसाय, बँकींग आणि वित्तीय संस्था क्षेत्रांशी संबंधीत असलेल्या अर्थतज्ञांमध्ये हे सर्वेक्षण केलं होतं. या वर्षात चलन फुगवट्याचा दर सामान्य राहील, असंही या अहवालात म्हटलं आहे.
****
मेट्रो-दोन ए आणि मेट्रो-सात रेल्वे सेवा २०२० च्या पूर्वार्धात चालू केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबई, नागपूर आणि पुण्यातल्या मेट्रो प्रकल्प, नवी मुंबई विमानतळ, सिंचन योजना, सी-लिंक प्रकल्प राज्यातल्या रेल्वे प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मेट्रो-दोन आणि मेट्रो-सात मार्ग चालू करण्याची मुदत वाढवण्याचे निर्देश दिले तसंच मुंबईतले अन्य मेट्रो प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
****
कोल्हापूर जिल्हयातल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघात ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या लोकसभा मतदारसंघात झालेलं एकूण मतदान बारा लाख ४५ हजार ७९७ इतकं होतं. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीमध्ये बारा लाख ४६ हजार २५६ मतं आढळली, म्हणजेच या मतदारसंघात ४५९ मतं जास्तीची आढळल्याचा आरोप पराभूत खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहितीही त्यांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. देशातलं सर्वाधिक ४८ अंश सेल्सीअस तापमान काल चंद्रपुरात नोंदवलं गेलं. राज्याच्या इतर भागातही तापमान सरासरीपेक्षा जास्तच आहे.  औरंगाबादमध्ये काल ४२ पूर्णांक एक अंश सेल्सीअस तर उस्मानाबादमध्ये ४३ पूर्णांक पाच अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात आज आणि उद्या काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.  
****
जर्मनीत सुरू असलेल्या आय एस एस एफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतानं पाच सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकलं आहे. या स्पर्धेत भारत पदकांच्या मालिकेत पहिल्या स्थानावर आहे. महिलांच्या दहा मीटर रायफल प्रकारात अपूर्वी चंदेला तर पंचवीस मीटर रायफल प्रकारात राही सरनोबत हीनं सुवर्णपदक पटकावलं. पुरूषांच्या दहा मीटर रायफल प्रकरात सौरभ चौधरीनं तर मिश्र गटात दहा मीटर रायफल प्रकारात अंजुम मुदगल आणि दिव्यांग सिंह पवार यांनी सुवर्ण पदक पटकावलं. तर पुरूषांच्या दहा मीटर रायफल प्रकारात मनुभोकर आणि सौरभ चौधरी या जोडीनं सुवर्ण पदक जिंकलं आहे. 

************

आकाशवाणी औरंगाबाद दुपारी एक वाजेचे मराठी बातमीपत्र दि.31.05.2019

आकाशवाणी औरंगाबाद सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र दि.31.05....

31 05 2019 8 40 8 45 AM

31 05 2019 8 40 8 45 AM

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 31.05.2019 7.10


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 May 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१  मे २०१ सकाळी ७.१० मि.
****
** नरेंद्र मोदी यांनी घेतली सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ; कॅबिनेट आणि राज्यमंत्री म्हणून प्रत्येकी २४ तर नऊ जण स्वतंत्र खात्याचे राज्यमंत्री
** राज्यातल्या सात जणांना मंत्रीपदं; मराठवाड्यातून जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांना संधी
** पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी आर्थिक मागास प्रवर्गासाठीचं १० टक्के आरक्षण लागू करण्यास सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
आणि
** विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर १०४ धावांनी विजय मिळवत यजमान इंग्लंडची विजयी सलामी
****
नरेंद्र मोदी यांनी काल सायंकाळी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नवी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना एका शानदार सोहळ्यात पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मोदी यांच्याबरोबरच २४ जणांनी कॅबिनेट मंत्री म्हणून, नऊ जणांनी स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री म्हणून तर २४ जणांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यामध्ये ४५ जण लोकसभेचे तर १३ जण राज्यसभेचे सदस्य आहेत. महाराष्ट्रातल्या सात खासदारांना मंत्रीमंडळात स्थान मिळालं असून यामध्ये चार कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. शिवसेनेचे अरविंद सावंत, अकोल्याचे संजय धोत्रे यांचा नव्याने मंत्रीमंडळात समावेश झाला आहे, तर मराठवाड्यातून जालन्याचे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना संधी मिळाली आहे. 
मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काल राजनाथ सिंग, अमित शहा, नितीन गडकरी, डी. व्ही. सदानंद गौडा, निर्मला सीतारमण, रामविलास पासवान, नरेंद्र सिंग तोमर, रवीशंकर प्रसाद, हरसिमरत कौर बादल, थावरचंद गेहलोत, माजी परराष्ट्र सचिव सुब्रह्मण्यम जयशंकर, डॉ. रमेश पोखरियाल निशंक, अर्जुन मुंडा, स्मृती इराणी, डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, मुक्तार अब्बास नक्वी, प्रल्हाद जोशी, डॉ. महेंद्रनाथ पांडे, अरविंद सावंत, गिरीराज सिंह, गजेंद्रसिंग शेखावत या २४ जणांनी शपथ घेतली. 
स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री म्हणून संतोषकुमार गंगवार, राव इंद्रजित सिंग, श्रीपाद नाईक, डॉ. जितेंद्रसिंग, किरण रिजीजू, प्रल्हादसिंग पटेल, आर. के. सिंग, हरदीपसिंग पुरी, मनसुख मांडवीय यांनी शपथ घेतली. तर राज्यमंत्री म्हणून फग्गनसिंह कुलस्ते, अश्विनीकुमार चौबे, अर्जुन राम मेघवाल, व्ही. के. सिंग, कृष्णपाल गुर्जर,  रावसाहेब दानवे, गंगापूरम किशन रेड्डी, पुरूषोत्तम रूपाला, रामदास आठवले, साध्वी निरंजन ज्योती, बाबूल सुप्रियो, संजिवकुमार बलियान, संजय धोत्रे, अनुरागसिंग ठाकूर, अंगाडी सुरेश चन्नबसप्पा, नित्यानंद राय, रतनलाल कटारिया, व्ही. मुरलीधरन, रेणुका सिंग सरूता, सोम प्रकाश, रामेश्वर तेली, प्रतापचंद्र सारंगी, कैलास चौधरी आणि देबश्री चौधरी यांनी शपथ घेतली.
****
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी आर्थिक मागास प्रवर्गासाठीचं १० टक्के आरक्षण लागू करण्यास सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. वैद्यकीय परिषदेनं अधिकच्या जागा निर्माण केल्या नसून, आहे त्या जागेत १० टक्के खुल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती अनिरूद्ध बोस यांच्या पीठानं म्हटलं आहे. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ही नोव्हेंबर २०१८ साली सुरू झाली असून, दहा टक्के आर्थिक मागास आरक्षणासंदर्भातील घटना दुरूस्ती ही जानेवारी २०१९ मध्ये झाली आहे, त्यामुळे हे आरक्षण लागू करता येणार नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
चालू वर्षात आरक्षण लागू करण्यासाठी अतिरिक्त जागा वाढवण्याची गरज आहे. जो पर्यंत भारतीय वैद्यकिय परिषद जागा निर्माण करत नाही, तो पर्यत सध्याच्या उपलब्ध जागांसाठी आरक्षण देता येणार नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी सद्य राजकीय परिस्थितीवर सुमारे एक तास चर्चा झाली. काँग्रेस अध्यक्षपदावरुन दूर होण्याचा राहूल गांधींचा निश्चय असल्याच्या पार्श्र्वभूमीवर त्यांनी या पदावर कायम राहावं, असं पवार यांनी त्यांना सूचवल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटलं आहे. पवार यांची भेट घेतल्यानंतर गांधी यांनी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहनसिंग यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
दरम्यान, कोणत्याही वृत्तवाहिनीवर चर्चा किंवा वादविवाद कार्यक्रमासाठी आपले प्रवक्ते न पाठवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एका संदेशात ही माहिती दिली.
****
लोकसभा निवडणुकीतल्या अपयशाची कारणं शोधण्यासाठी काँग्रेसनं दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून तिचा अहवाल प्राप्त झाल्यावर काँग्रेसच्या सर्व पातळ्यांवर मोठे बदल होण्याची शक्यता असल्याचं पक्ष सूत्रांनी काल दिल्लीत सांगितलं. येत्या १० दिवसात समिती अहवाल सादर करेल असं समितीचे सदस्य योगानंद शास्त्री यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
मुंबईतल्या नायर रुग्णालयातल्या डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तडवी कुटुंबीयांनी काल वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या प्रवक्त्यानं दिली आहे.
****
तंबाखुमुक्त शाळा अभियानात नागरिकांनी सक्रीय सहभाग घ्यावा असं आवाहन, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केलं आहे. जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. राज्य शासन आणि सलाम मुंबई फाउंडेशन संयुक्तरित्या सुदृढ महाराष्ट्र बनविण्याचं कार्य कत असल्याची माहिती बडोले यांनी दिली. शाळांच्या परिसरात मिळणारा पेन हुक्का बंद करण्याचे काम राज्य शासन करीत असून, भविष्यात संपूर्ण शाळा या तंबाखूमुक्त करण्यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या ज्या कर्मचाऱ्यांना नवीन राष्ट्रीय आणि परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन  योजना लागू आहे, त्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकित रक्कम येत्या पाच वर्षात समान हप्त्यात देण्याचा शासन आदेश काल जारी करण्यात आला. येत्या एक जुलैला या थकबाकीचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे.
****
क्रिकेट -
इंग्लंडमध्ये सुरु झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कालचा दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा पहिला सामना १०४ धावांनी जिंकत यजमान इंग्लंडनं विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडनं निर्धारित ५० षटकात आठ बाद ३११ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ चाळीसाव्या षटकात सर्वबाद झाला. हा संघ केवळ २०७ धावाच करु शकला. ७९ चेंडूत ८९ धावा करणाऱ्या इंग्लंडच्या बेन स्टोन्सला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
या स्पर्धेत आज नॉटिंगहॅम इथं वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे.
****
बीड जिल्ह्यात पाणी पुरवठा करण्यासाठी बारामतीच्या ॲग्रीकल्चरल ट्रस्टनं २१ टँकर्स उपलब्ध करून दिले आहेत, या टँकर्सचं लोकार्पण विधानसभेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या हस्ते काल झालं. या टँकर्सद्वारे जिल्ह्यातल्या १०० गावांना पाणी पुरवठा केला जाणार आहे. जिल्ह्यातल्या पाणी टंचाई निवारणासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यानुसार हे टँकर्स पुरवण्यात आले असून आणखी नऊ टँकर्स लवकरच उपल्ब्ध करुन दिले जाणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातल्या रेणुका साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची  २०१८-१९ या वर्षाच्या रास्त आणि किफायतशीर दराची चारशे एकोणपन्नास लाख रुपयांहून अधिक थकबाकी असल्यानं, कारखान्याच्या दोन गोदामांना काल टाळं ठोकण्यात आलं. या थकबाकीसंदर्भात कारखान्याला चार मे रोजी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, या नोटिसला कारखान्याकडून प्रतिसाद न आल्यामुळे उपविभागीय अधिकारी व्ही.एल. कोळी यांनी काल ही कारवाई केली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वाळूज पोलिस ठाण्यातला जमादार अशोक जगधने याला पाच हजार रूपयांची लाच घेतल्या प्रकरणी वैजापूर इथल्या अतिरिक्त सत्र न्यायालयानं दोन वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अपघाताचा गुन्हा दाखल न करता जप्त वाहन परत करण्यासाठी वाहनधारकाकडून जगधने यानं ही लाच मागितली होती. ३१ जानेवारी २०११ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा रचून जगधने याला अटक केली होती. 
//**********//









आकाशवाणी औरंगाबाद सकाळी सात वाजून दहा मिनिटांचे मराठी बातमीपत्र दि.31.05...

Thursday, 30 May 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.05.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 May 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मे २०१९ सायंकाळी ६.००
****

नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी आज सलग दुस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना आणि मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. हा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता होणार आहे. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर लगेच दुस-यांदा निवड होणारे मोदी हे पहिलेच भाजप नेते आहेत. विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष, प्रधानमंत्री आणि विशेष दूत या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. बिमस्टेक राष्ट्रांच्या सदस्यांना देखील या सोहळ्याचं निमंत्रण आहे. बांग्लादेश, श्रीलंका, किर्गीज प्रजासत्ताक आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष, मॉरिशस, नेपाळ, आणि भूतानचे प्रधानमंत्री तसंच थायलंडचे विशेष दूत आदी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबरोबरच विविध राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, गुजरात भाजपचे अध्यक्ष जितू वाघानी यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना मंत्रिमंडळातील समावेशाबद्दल एका संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
****
नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याचं, आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून थेट प्रसारण केलं जाणार आहे. याशिवाय सोहळ्याआधी, संध्याकाळी साडेसहा वाजता एक विशेष कार्यक्रमही प्रसारीत केला जाणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या राजधानी आणि देशभरातल्या एफ. एम. रेनबो वाहिन्यांवर ऐकता येईल. शपथविधी सोहळ्याचं थेट प्रसारण संध्याकाळी सहा वाजून ५५ मिनीटांपासून सुरु होईल.
****
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी सध्याच्या राजकीय परिस्थीतीवर सुमारे एक तास चर्चा झाली. काँग्रेस अध्यक्षपदावरुन दूर होण्याचा राहूल गांधींचा निश्चय असल्याच्या पार्श्र्वभूमीवर त्यांनी या पदावर कायम राहावं, असं पवार यांनी त्यांना सूचवल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, कोणत्याही वृत्तवाहिनीवर चर्चा किंवा वादविवाद कार्यक्रमासाठी आपले प्रवक्ते न पाठवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. काँग्रेस प्रवक्‍ता रणदीप सुरजेवाला यांनी एका संदेशात ही माहिती दिली.
****
जम्मु काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. बारामुल्ला जिल्ह्यातल्या सोपोर भागात सुरक्षा दलांची शोध मोहीम सूरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला असता ही चकमक उडाली. दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटायची असून चकमकीच्या ठिकाणी शस्त्रास्त्र जप्त करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यानं दिली आहे.   
****
मुंबईतल्या नायर रुग्णालयातल्या डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तडवी कुटुंबीयांनी आज वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या प्रवक्त्यानं दिली आहे.
****
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील खुल्या गटातील दहा टक्के आर्थिक मागासवर्गाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारनं जनतेची फसवणूक केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केली आहे. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात नापास झालं, असं राष्ट्रवादी कॉंग्रस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशसाठी राज्य सरकारनं या संदर्भात काढलेल्या आदेशावर आज सर्वोच्च न्यायालयानं निर्बंध घातल्याच्या पार्श्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ही प्रतिक्रीया दिली आहे.
****
मराठवाड्यातील काही भागांत तसंच मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेदरम्यान बाहेर पडणं टाळावं, असं आवाहनही हवामान खात्यानं केलं आहे. 
****
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची इथं एका व्यक्तीचा उष्माघातानं मृत्यु झाल्याचं वृत्त आहे. मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटन्यासाठी फिरताना उन लागल्यानं झालेल्या उष्माघातामुळं विजय बोरकर या ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मुंबई इथं झालेल्या ३१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शनच्या `सोयरे सकळ` या नाटकाला सात लाख ५० हजार रुपयांचं प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयानं केली आहे.
****

आकाशवाणी औरंगाबाद – दि.30.05.2019 रोजीचे सायंकाळी 06.00 वाजेचे मराठी बात...

आकाशवाणी औरंगाबाद – दि.30.05.2019 रोजीचे सायंकाळी 06.00 वाजेचे मराठी बात...

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 30.05.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 May 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मे २०१९ दुपारी .०० वा.
****
देशाची सुरक्षितता हाच आपला प्राथमिक उद्देश असून, आपलं सरकार हे देशाच्या एकता आणि अखंडतेबाबत कोणतीही तडजोड करणार नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कर्तव्य बजावतांना देशासाठी शहीद झालेल्यांबद्दल देशाला त्यांचा सदैव अभिमान असल्याचं पंतप्रधानांनी आज सकाळी दिल्लीतल्या राष्ट्रीय शहीद स्मारकाला श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर एका संदेशात नमुद केलं आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमीत शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मंत्रीमंडळाच्या स्थापने संदर्भात दीड तास चर्चा केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी सात वाजता दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद मोदी यांच्यासह काही सदस्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट या महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याच बरोबर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळी जाऊन नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी बांग्लादेशचे राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हामिद यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं. याशिवाय म्यानमार, भूतान, किर्गिजस्तान, नेपाळ, थायलंडच्या राष्ट्रप्रमुखांचं आज आगमन होणार आहे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री आणि राज्यपालांनाही आजच्या समारोहाला आमंत्रित करण्यात आलं आहे.
****
नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याचं, आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून थेट प्रसारण केलं जाणार आहे. याशिवाय सोहळ्याआधी, संध्याकाळी साडेसहा वाजता एक विशेष कार्यक्रमही प्रसारीत केला जाणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या राजधानी आणि देशभरातल्या एफ. एम. रेनबो वाहिन्यांवर ऐकता येतील. शपथविधी सोहळ्याचं थेट प्रसारण संध्याकाळी सहा वाजून ५५ मिनीटांपासून सुरु होईल. त्यामुळे आज संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र
संध्याकाळी सहा वाजून १५ मिनिटांनी प्रसारित होईल. आणि आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र शपथविधी सोहळ्याचं प्रसारण संपल्यानंतर प्रसारित होईल.
****
आर्थीक गैरव्यव्हार आणि विदेशातील बेहीशोबी मालमत्ता खरेदी प्रकरणी व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा आज दिल्ली इथं सक्तवसूली संचालनालयासमोर चौकशीसाठी हजर झाले आहेत. याबाबत चौकशी अधीकाऱ्यांसमोर उपस्थित राहण्यासंदर्भात त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. आर्थीक गैरव्यव्हार प्रतिबंधक कायद्याखाली त्यांची चौकशी केली जात आहे.
****
विविध क्षेत्रांत वैशिष्ट्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्काराची निवड प्रक्रिया गृह मंत्रालयानं सुरु केली आहे. पुरस्कार प्राप्त विजेत्यांच्या नावाची घोषणा पुढच्या वर्षी २६ जानेवारीला, प्रजासत्ताक दिनी करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी नामांकन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे. या पुरस्कारांसाठी नामांकनं आणि शिफारशी केवळ www.padmaawards.gov.in या पद्म पोर्टलवर ऑनलाईन स्वीकारण्यात येतील अशी माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे.
****
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी राज्य सरकारनं काढलेल्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयानं निर्बंध घातले आहेत. महाराष्ट्रातल्या खुल्या वर्गातल्या आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना २०१९-२० या वर्षासाठी दहा टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमुर्ती रंजन गोगोई आणि न्यायमुर्ती अनिरूद्ध बोस यांच्या सुट्टीच्या पीठानं म्हटलं आहे की, वैद्यकीय परिषदेनं अधिकच्या जागा निर्माण केल्या नसून आहे त्या जागेत १० टक्के खुल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ही विद्यार्थ्यांना २०१८ साली सुरू झाली असून, दहा टक्के आर्थीक मागास आरक्षणा संदर्भातील घटना दुरूस्ती ही जानेवारी २०१९ मध्ये झाली आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे. 
****
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात तापमानात मोठी वाढ झाली असून राज्यात चंद्रपूर इथं सर्वाधिक ४७ पुर्णांक आठ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची काल नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं ४६ पुर्णांक एक अंश सेल्सीअस इतकं तर त्याखालोखाल बीड  इथं ४४ पुर्णांक दोन  अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नांदेड इथं  ४४ पुर्णांक पाच अंश सेल्सीअस,  उस्मानाबाद इथं  ४३ पुर्णांक ४ अंश सेल्सीअस तर औरंगाबाद इथं ४२ अंश सेल्सीअस इतक्या तापमानाची नोंद काल झाली आहे. मराठवाड्यातील काही भागांत तसंच मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेदरम्यान बाहेर पडणं टाळावं, असं आवाहनही हवामान खात्यानं केलं आहे. 
************







आकाशवाणी औरंगाबाद दुपारी एक वाजेचे मराठी बातमीपत्र दि.30.05.2019

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 30.05.2019 11.00


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३० मे २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी सात वाजता दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद मोदी यांच्यासह काही सदस्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. दरम्यान, आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट या महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याच बरोबर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपयी यांच्या समाधीस्थळी जाऊन नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याचं बरोबर नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शहीद स्मारकावर जाऊन शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.  
शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी बांग्लादेशचे राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हामिद यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं. याशिवाय म्यानमार, भूतान, किर्गिजस्तान, नेपाळ, थायलंडच्या राष्ट्रप्रमुखांचं आज आगमन होणार आहे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री आणि राज्यपालांनाही आजच्या समारोहाला आमंत्रित करण्यात आलं आहे.
****
महाराष्ट्रातून शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे शिवसेनेच्या गोटातून मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे, दरम्यान नवीन खासदारांना हंगामी लोकसभा अध्यक्ष, जेष्ठ संसद सदस्य संतोष गंगवार हे शपथ देणार असल्याचं वृत्त आहे.
****
वाय एस आर कॉंग्रस पक्षाचे अध्यक्ष वाय एस जगन मोहन रेड्डी हे आज आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, राज्यपाल ई एस एल नरसिहंन हे त्यांना दुपारी बारा वाजून तेवीस मीनिटांनी विजयवाडा इथं पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.जगन रेड्डी हे आंध्रप्रदेशच्या विभाजनानंतर दुसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
****
दिव्यांग व्यक्तींना सरकारी नोकरीत चार टक्के आरक्षण लागू करण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं काल जारी केला. आतापर्यंत दिव्यांग व्यक्तींसाठी तीन टक्के आरक्षण लागू होतं. आरक्षण देण्यासाठी १,२६, ५१ आणि ७६ क्रमांकाची बिंदू नामावली निश्चित करण्यात आली आहे. यानिर्णयाचा बेरोजगार दिव्यांग व्यक्तींना लाभ होईल, असं महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी सांगितलं.  दरम्यान, राज्यात दिव्यांग धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांग हक्क आयोगाची स्थापना केली जाणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी काल मुंबईत दिली. दिव्यांगांसाठी गठित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सल्लागार मंडळाची बैठक काल झाली, त्यावेळी ते बोलत होते. दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगिण विकासाच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय विभागानं नव्यानं धोरण निश्चित केलं आहे, यात दिव्यांगांना शिक्षण, उत्तम आरोग्य, रोजगार आणि कौशल्य विकास साधण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात तापमानात मोठी वाढ झाली असून राज्यात चंद्रपूर इथं सर्वाधीक ४७ पुर्णांक आठ अंश सेल्सीअस इतक्या तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात  परभणी इथं ४६ पुर्णांक एक अंश सेल्सीअस इतकं तर त्याखालोखाल बीड  इथं ४४ पुर्णांक दोन  अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली. नांदेड इथं  ४४ पुर्णांक पाच अंश सेल्सीअस,  उस्मानाबाद इथं  ४३ पुर्णांक ४ अंश सेल्सीअस तर औरंगाबाद  ४२ अंश सेल्सीअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील काही भागांत तसंच मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.
****
बाराव्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. इंग्लंडच्या राजघराण्याच्या उपस्थित काल पार पडलेल्या शानदार सोहळ्यानं या स्पर्धेला सुरूवात झाली. इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यामध्ये आज लंडन इथं पहिला सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरु होईल. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना पाच जून रोजी दक्षिण अफ्रिकेविरुध्द होणार आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लोककवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्राचं उद्धाटन काल जेष्ठ विचारवंत डॉ. सागर जाधव यांच्या हस्ते झालं. यावेळी जाधव यांनी वामनदादांच्या कार्याचा गौरव करत महापुरूषांवर भाष्य करणारे वामनदादा हे  एकमेव महाकवी  असल्याचं सांगितलं. डॉ. आंबेडकरांचे तत्वज्ञान गीतांमधून सांगण्यासाठी वामनदादा यांनी आयुष्य झिजवलं असल्याचं जाधव यांनी सांगितलं.
****
जालना जिल्ह्यातल्या अंबड-वडीगोद्री मार्गावरील झिरपी फाट्यावर काल सायंकाळी भरधाव ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले तीन जण जागीच ठार झाले. मृत सर्वजण बदापूर इथले रहिवासी आहेत. गेवराई तालुक्यातल्या माळी पिंपळगाव इथं लग्नासाठी ते जात होते.
//************//

आकाशवाणी औरंगाबाद सकाळी अकरा वाजेचे मराठी बातमीपत्र दि.30.05.2019

30 05 2019 8 40 8 45 AM

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 30.05.2019 7.10


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 May 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३०  मे २०१ सकाळी ७.१० मि.
****

§   पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी सात वाजता दुसऱ्यांदा घेणार पंतप्रधान पदाची शपथ
§   राज्याच्या चार लाख चोवीस हजार एकोणतीस कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याला मंजुरी
§   दिव्यांग व्यक्तींना सरकारी नोकरीत चार टक्के आरक्षण लागू करण्याचा शासन आदेश जारी
§   गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांची नियुक्ती
आणि
§   १२व्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला इंग्लंडमध्ये शानदार सुरुवात; इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात आज पहिला सामना
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी सात वाजता दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद मोदी यांच्यासह काही सदस्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. बिमस्टेक देशांचे सर्व प्रमुख या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली. या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी बांग्लादेशचे राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल हामिद यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं. याशिवाय म्यानमार, भूतान, किर्गिजस्तान, नेपाळ, थायलंडच्या राष्ट्रप्रमुखांचं आज आगमन होणार आहे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री आणि राज्यपालांनाही आजच्या समारोहाला आमंत्रित करण्यात आलं आहे.
****
राज्याच्या चार लाख चोवीस हजार एकोणतीस कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याला काल मंजुरी देण्यात आली. राज्यस्तरीय बॅंकर्स समितीची काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. गेल्या वर्षी पीक कर्जाच्या उद्द‍िष्टाच्या केवळ चोपन्न टक्केच कर्जं वितरीत झाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणं अपेक्ष‍ित आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
केंद्र शासनाच्या मुद्रा बॅंक, प्रधानमंत्री जनधन योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना यासारख्या योजनांच्या पत पुरवठ्यात वाढ करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह विविध विभाग आणि बँकांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
****
दिव्यांग व्यक्तींना सरकारी नोकरीत चार टक्के आरक्षण लागू करण्याचा शासन आदेश  राज्य सरकारनं काल जारी केला. आतापर्यंत दिव्यांग व्यक्तींसाठी तीन टक्के आरक्षण लागू होतं. आरक्षण देण्यासाठी एक, २६, ५१ आणि ७६ क्रमांकाची बिंदू नामावली निश्चित करण्यात आली आहे. यानिर्णयाचा बेरोजगार दिव्यांग व्यक्तींना लाभ होईन, असं महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यात दिव्यांग धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांग हक्क आयोगाची स्थापना केली जाणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी काल मुंबईत दिली. दिव्यांगांसाठी गठित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सल्लागार मंडळाची बैठक काल झाली, त्यावेळी  ते बोलत होते. दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगिण विकासाच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय विभागानं नव्यानं धोरण निश्चित केलं आहे, यात दिव्यांगांना शिक्षण, उत्तम आरोग्य, रोजगार आणि कौशल्य विकास साधण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन ४५ मिनिटे चर्चा केली. काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर मनसेला आघाडीत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुकीतल्या पराभवानंतर काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीची मंथन बैठक झाली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीत मनसेला बरोबर घ्यावं असा सूर महाआघाडीच्या नेत्यांचा होता.
****
राज्यात आतापर्यंत तीनशे चौऱ्याहत्तर तंबाखूमुक्ती केंद्रांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. येत्या शुक्रवारी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा होत आहे, यापार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ते काल  बोलत होते. राज्यातल्या आठशे चार आरोग्य संस्था आणि दोन हजार सातशे पंचावन्न शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
औषध निर्माण शास्त्राशी संबंधित डॉक्टर ऑफ फार्मसी- ‘फार्म डी’ची पदवी प्राप्त करणाऱ्यांना नावाआधी 'डॉक्टर' शब्दप्रयोग करण्यास भारतीय वैद्यकीय संघटना- आयएमएनं विरोध केला आहे. भारतीय औषधी परिषद- फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियानं या पदवीधारकांना नावाआधी डॉक्टर शब्दप्रयोग करण्यास परवानगी दिली आहे. या संदर्भात आयएमएनं केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय परिषदेला एक पत्र लिहिलं आहे. औषध निर्माण शास्त्रज्ञ हा कायम औषधनिर्माण शास्त्रज्ञच राहतो, तो डॉक्टर हे नाव लावू शकणार नाही अस आयएमएनं या पत्रात नमूद केलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
औरंगाबादच्या गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एक वर्षासाठी ही नियुक्ती असेल. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लोककवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्राचं उद्धाटन काल जेष्ठ विचारवंत डॉ. सागर जाधव यांच्या हस्ते झालं. यावेळी जाधव यांनी वामनदादांच्या कार्याचा गौरव करत महापुरूषांवर भाष्य करणारे वामनदादा हे एकमेव महाकवी असल्याचं सांगितलं. डॉ.आंबेडकरांचे तत्वज्ञान गीतांमधून सांगण्यासाठी वामनदादा यांनी आयुष्य झिजवलं असल्याचं जाधव यांनी सांगितलं.
****
मुलींचं भवितव्य शिक्षणाच्या माध्यमातून घडवावं असं मत मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांनी व्यक्त केलं आहे. लातूर इथं श्रीमती गुणवंतीबेन ठक्कर सेवाभावी संस्थेचा यंदाचा राष्ट्रीय न्यायगौरव पुरस्कार देसाई यांना प्रदान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. स्त्रियांच्या शिक्षणाबरोबरच त्यांची सुरक्षा, आरोग्य यावरही लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ५१ हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र असं स्वरुप असलेल्या या पुरस्काराची रक्कम देसाई यांनी हासेगाव इथल्या एचआयव्ही बाधित मुलांचा सांभाळ करणाऱ्या सेवालयाला सुपूर्द केली.
****
१२व्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. इंग्लंडच्या राजघराण्याच्या उपस्थित काल पार पडलेल्या शानदार सोहळ्यानं या स्पर्धेला सुरूवात झाली. इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यामध्ये आज लंडन इथं पहिला सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरु होईल. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना पाच जून रोजी दक्षिण अफ्रिकेविरुध्द होणार आहे.
****
पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. सचिन घायाळ कंपनीनं हा कारखाना भाडेतत्वावर घेतला असून कंपनीनं नुकत्याच संपलेल्या गाळप हंगामात शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर दर - एफआरपीचे पाच कोटी ४५ हजार रूपये दिलेले नाहीत, या देयकासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची दखल घेऊन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जप्तीचे आदेश जारी केले आहेत.
****
औरंगाबाद महानगरपालिकेत विरोधी पक्षनेतेपदी अखिल भारतीय मजलीस ए इत्तेहादुल मुस्लीमीन - एमआयएमच्या नगसेविका सरिता बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षानं बोर्डे यांच्या नियुक्तिची शिफारस केली होती. आचार संहिता संपताच काल महापौर नंदकुमार घोडेले यांनी त्यांच्या नियुक्तीचं पत्र माहापालिका आयुक्त डॉ. विनायक निपुण यांना पाठवलं आहे.
****
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाथरी शाखेअंतर्गत येणाऱ्या गावांतल्या शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदानाचा दुसरा हप्ता त्वरीत द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसनं दिला आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या अंबड - वडीगोद्री मार्गावरील झिरपी फाट्यावर काल सायंकाळी भरधाव ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले तीन जण जागीच ठार झाले. मृत सर्वजण बदापूर इथले रहिवासी आहेत. गेवराई तालुक्यातल्या माळी पिंपळगाव इथं ते लग्नासाठी जात होते.
****
औरंगाबाद शहरातल्या ज्युबिली पार्क इथं भरधाव वेगानं जाणाऱ्या एका पाण्याच्या टँकरनं दुचाकीवर जात असलेल्या एका महिलेला पाठीमागून धडक दिल्यानं दुचाकीवरील महिला ठार झाली. ज्योती सोनवणे असं या महिलेचं नाव असून मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता ही घटना घडली.
****
सोन्याचे दागिने बनवण्यासाठी सराफाने दिलेले पाच लाख २० हजार ३५८ रूपये किमतीचं सोनं घेऊन एक परप्रांतीय कारागीर पसार झाल्याचा प्रकार औरंगाबाद इथं घडला. हा कारागीर पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी विविध प्रकाराचे सोन्याचे दागिने बनवण्यासाठी रमेश रेवणकर या सोनारानं या कारागिराला सोनं दिलं होतं. त्यानं आठ दहा दिवसात दागिने बनवून देतो असं म्हणून सोनं घेऊन पलायन केलं.
//**************//