आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Friday, 28 February 2025
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.02.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
· राज्य सरकारच्या ५०० सेवा व्हाटसअपच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करून दिल्या
जाणार
· आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक
निवासांमध्ये महिलांना मिळणार ५० टक्के सवलत
· स्वारगेट बस स्थानकातल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला पुणे पोलिसांकडून
अटक
· राष्ट्रीय विज्ञान दिन विविध कार्यक्रमांनी साजरा
आणि
· रणजी करंडक स्पर्धेत विदर्भाची केरळवर आघाडी, तर-चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये
अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलियादरम्यान लढत
****
राज्य सरकारच्या पाचशे सेवा व्हाटसअपच्या
माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी आज ही माहिती दिली. व्हाटसअप सेवांसाठी मेटा कंपनीसोबत करार करण्यात आल्याचं
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबई टेक वीक २०२५ मध्ये गव्हर्निंग द फ्युचर : एआय अँड
पब्लिक पॉलिसी या विषयावर मुख्यमंत्र्यांनी आपले विचार मांडले. ग्रामीण भागातील नागरिकही
मोठ्या प्रमाणावर व्हाटस अपचा वापर करतात. त्यामुळे सरकारी सेवा उपलब्ध करुन देत सेवांचे
एका अर्थाने लोकशाहीकरण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
व्हॉटस्ॲप गव्हर्नन्स हा
कॉन्सेप्ट आणलेला आहे. म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉटस्अपच्या माध्यमातनं
आपल्याला मिळू शकतील. मागच्या काळामध्ये मुंबई मेट्रोचं तिकीट जेव्हा व्हॉटस्ॲपवर
आणलं, आमच्या लक्षात आलं की पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लोकं व्हॉटस्ॲप वर तिकीट
खरेदी करतायत. आणि म्हणूनच व्हॉटस्ॲप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे. पाचशे सर्विसेस
यापुढे लोकांना व्हॉटस्ॲपच्या माध्यमातनं अव्हेल करता येतील.
एनपीसीआय या जगातील सर्वात मोठ्या युपीआय
पेमेंट गेटवे कंपनीचं जागतिक मुख्यालय मुंबईत सुरु केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक
जमीन कंपनीला हस्तांतरीत केले जाणार असून, यासंबंधीची कागदपत्रं आज कंपनीला
सोपविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
एन पी सी आय ज्यांनी यु पी
आय तयार केलेलं आहे, जगातला सगळ्यात मोठा टेक्नॉलॉजीकल गेट वे, हा जो भारतामध्ये तयार
झाला, ऐंशी देशांनी ज्याची सेवा घेतलेली आहे, अशा एन पी सी आय चं ग्लोबल हेड क्वार्टर
हे मुंबईमध्ये तयार करण्याकरता आज आम्ही त्यांना जागेचे कागदपत्रं हँडओव्हर केलेले
आहेत. मुंबईकरता टेक्नॉलॉजी हब म्हणून ही सर्वात मोठी अनाउंसमेंट आहे की एन पी सी आयचं
ग्लोबल ऑफिस हे आता मुंबईमध्ये येत आहे.
****
आगामी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र
पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांना ५० टक्के सवलत देण्यात येणार
आहे. १ ते ८ मार्च २०२५ या कालावधीत एमटीडीसीकडून विविध पर्यटन उपक्रम देखील राबविण्यात
येणार आहेत. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज ही माहिती दिली. एमटीडीसीनं महिलांसाठी
समर्पित ‘आई’ हे महिला केंद्रित पर्यटन
धोरण अंमलात आणलं आहे.
****
पुणे लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला
रात्री उशीरा पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा खटला जलद गती न्यायालयात चालवला जाईल, अशी
माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत
होते. शिरुर तालुक्यातील गुणाट गावात आरोपी दत्ता गाडे याला पकडण्यास मदत करणाऱ्या
गावकऱ्यांचे आयुक्तांनी आभार मानले.
यामध्ये स्पेशल काऊंसिलरची
नियुक्ती होणार आहे. आणि फास्ट ट्रॅकमध्ये या केसला आम्ही पुढे घेऊन जाऊन आरोपीला सजा
होईल यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. ड्रोनच्या सहाय्याने दिशा जी दिसून आली,
त्याच्या अनुषंगाने त्याला अटक करण्यात आली. फायनल ज्यांचे ट्रीगर इन्फॉर्मेशन होती,
त्यांना एक लाखाचे बक्षीस देणार आहे.
दरम्यान, याप्रकरणी आरोपीला फाशीची
शिक्षा होण्यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करत असल्याचं अध्यक्ष रुपाली पाटील चाकणकर
यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राज्य महिला आयोगाची आज पुणे जिल्हाधिकारी
कार्यालयात प्रशासन,
पोलीस, शहर वाहतूक संचालक आणि आगार प्रमुखांच्या
उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.
****
राष्ट्रीय विज्ञान दिन आज साजरा करण्यात
आला. प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी ‘रामन इफेक्ट’ चा शोध लावल्याच्या
स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय
विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विज्ञान आणि ज्ञान मिळून प्रत्येक समस्येचं
निराकरण शक्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. मुंबई इथं आज TIFR, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात यानिमित्त विविध प्रयोग, प्रदर्शनं, प्रयोगांची
प्रात्यक्षिकं,
खेळ,
कोडी, प्रश्नमंजूषा, अशा
विविध सत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती संभाजीनगर इथं अनंत भालेराव विद्यामंदिरात
माध्यमिक आणि प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांची प्रात्यक्षिकं
केली होती.
****
महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात
करवाई करण्यासाठी राज्य सरकार लवकरच कायद्यात बदल करणार आहे, अशी
माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे
पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली आहे. ते आज लातूर जिल्ह्यातील अहमदपूर
इथं पत्रकारांशी बोलत होते. काही जण केवळ प्रसिद्धीसाठी महापुरुषांवर वक्तव्य करत असल्याचं, भोसले
म्हणाले.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या एक दिवसाच्या
मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या भेटीदरम्यान, ते के. पी. बी. हिंदुजा महाविद्यालयाच्या
वार्षिक दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
****
बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या
शेतकऱ्यांना धरणातील गाळ घेवून जाण्यासाठी अवनी अॅपच्या माध्यमातून प्रतीहेक्टरी १७
हजार रुपये अनुदान मिळणार आहे, त्यामुळे गाळमुक्त धरण योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी
घ्यावा, असं आवाहन आमदार विजयसिंह पंडित यांनी केलं आहे. गेवराई इथं गाळमुक्त धरण योजनेच्या
माहीतीसाठी आज चर्चा सत्र घेण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. गाळमुक्त
धरण योजना अधिक सक्षमपणे राबवण्यासाठी कृती आराखडा तयार करून अंतिम मान्यतेसाठी तातडीने
पाठवण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केल्या.
****
धाराशिव शहरालगत असलेलं हातलाई मंदिर परिसर, तलाव
आणि धाराशिव लेणी यांचा एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात तुळजापूरचे आमदार
राणाजगजीतसिंह पाटील यांची आज धाराशिव इथं बैठक झाली. हातलाई परिसरातल्या तलावात लेझर
शो तसच रंगीत कारंजे,
नागरिकांसाठी वाकिंग ट्रॅक, बालकांसाठी खेळणी, ज्येष्ठ
नागरिकांसासाठी आरोग्य विषयक सुविधांसह पर्यटन दृष्ट्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी
विविध सोयी सुविधा देण्यात याव्यात, असा निर्णय घेण्यात आला. यावेळी
पर्यटन जनजागृती संस्था तसच धाराशिव शहरातील पर्यटन प्रेमींची उपस्थिती होती.
****
अल्पसंख्याक समाजासाठी असणाऱ्या योजनांचा
लाभ अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक पात्र व्यक्तीला देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा
सूचना जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केल्या. आज
परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी
गांधी यांच्या हस्ते आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन करण्यात
आलं.
****
बीड जिल्हा रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षण
केंद्रात ‘बालरोग तज्ञ परिचारिका’ अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. बीडचे आमदार संदीप
क्षीरसागर यांनी आज ही माहिती दिली. सध्या राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत २०
विध्यार्थी क्षमता असलेला ‘पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पेडियाट्रिक नर्सिंग’ हा अभ्यासक्रम
केवळ मुंबई इथं जे.जे.रुग्णालय परिचर्या प्रक्षिशण केंद्रात उपलब्ध होता.
****
वारकरी संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता
मिळावी, अशी अपेक्षा पंडित यादवराज फड यांनी व्यक्त केली आहे.
बीड जिल्ह्यात श्रीक्षेत्र चाकरवाडी इथं १७ वं अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन घेण्यात
आलं,
यावेळी ते बोलत होते. दोन दिवसीय संमेलनात राज्यातील संगीत क्षेत्रातील
दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली, अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली.
****
नागपूर इथं सुरु असलेल्या रणजी करंडक क्रिकेट
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, आज तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेंव्हा केरळच्या
पहिल्या डावात सर्वबाद ३४२ धावा झाल्या. विदर्भानं पहिल्या डावात ३७९ धावा केल्या आहेत, त्यामुळे विदर्भाला ३७ धावांची आघाडी मिळाली आहे.
****
चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत
अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजचा सामना होत आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेल्या अफगाणिस्तान संघानं निर्धारीत ५० षटकांत सर्वबाद २७३ धावा केल्या आहेत. अफगाणिस्ताननं इंग्लंडचा पराभव
केल्यानंतर ब गटात उपांत्यफेरीसाठी चूरस निर्माण झाली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूरचे
ज्येष्ठ विधिज्ञ,
स्वातंत्र्यसैनिक जयकृष्ण काशिनाथ भालेराव यांचं २६ फेब्रुवारी
रोजी वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९६ वर्षांचे होते. नांदुर-मधमेश्वर प्रकल्पाच्या
उभारणीसाठी त्यांनी पाटपाणी संघर्ष कृती समिती स्थापन करून मोठं जनआंदोलन उभारलं होतं.
विनोबा भावेंची भूदान चळवळ आणि हैदराबाद मुक्तिसंग्रामात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
वैजापूर नगर परिषदेचं उपाध्यक्षपद आणि वकील संघाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं.
दैनिक मराठवाडाचे संपादक,
स्वातंत्र्यसेनानी दिवगंत अनंत भालेराव यांचे ते धाकटे बंधू
होत.
****
बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या मोरेवाडी
इथं मृद आणि जलसंधारण विभागांतर्गत बांधण्यात आलेल्या
साठवण तलावाचं आज आमदार सुरेश धस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. मोरेवाडी ग्रामस्थांचा
अनेक दिवसांचा प्रश्न मार्गी लागला असून, या तलावामुळे परिसरातील
अनेक शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे, अशी माहीती यावेळी आमदार
धस यांनी दिली.
****
महिला बचत गटांसाठी स्वतंत्र बँक असावी, अशी
अपेक्षा जालना तालुक्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली. जालना शहरातल्या कल्याणराव
घोगरे क्रीडा संकुलात महिला बचत गटांसाठीच्या जानकी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आज ते बोलत होते.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.02.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 28 February 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रीय विज्ञान दिन आज साजरा
होत आहे. प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी ‘रामन इफेक्ट’ चा शोध लावल्याच्या
स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. या अभूतपूर्व शोधासाठी सर रामन यांना १९३०
मध्ये नोबेल परितोषिकांनं सन्मानित करण्यात आलं होतं. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त
देशभरात विविध वैज्ञानिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. विज्ञानाचं महत्त्व आणि त्याचा
वापर लोकांपर्यंत पोहोचवणं हा या दिवसाचा उद्देश आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान
मंत्री डॉ. जितेंद्र सिंह नवी दिल्लीत आज होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिन सोहळ्याला
उपस्थित राहणार आहेत. जागतिक नेतृत्वासाठी भारतीय युवकांना नवोन्मेश आणि विज्ञानात
सक्षम करणं ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय
विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विज्ञान आणि ज्ञान मिळून प्रत्येक समस्येचं
निराकरण शक्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. नागरीकांनी विज्ञान आणि नवोन्मेषाला चालना
द्यावी आणि विकसित भारताच्या निर्माणात विज्ञानाचा उपयोग करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी
केलं आहे.
****
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री
पियुष गोयल यांनी आज युरोपियन व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयोगाचे आयुक्त मारोस सेफकोविक
यांच्याशी चर्चा केली. उभय नेत्यात झालेल्या या चर्चेदरम्यान भारत-युरोपीय युनियनमधे
मुक्त व्यापार करार, व्यापार
आणि तंत्रज्ञान परिषदेवरच्या प्रगतीवर चर्चा झाली, अशी माहीती
गोयल यांनी सामाजिक माध्यमावरुन दिली आहे. येणाऱ्या काळात युरोपियन युनियन आणि भारत
विश्वासार्ह भागीदार म्हणून व्यापार आणि गुंतवणूक संबंध वाढवण्यासाठी काम करतील,
अशी आशा गोयल यांनी व्यक्त केली.
****
पुणे लैंगिक अत्याचार प्रकरण जलद
गती न्यायालयात चालवले जाईल, अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. ते
आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते. रात्री उशिरा आरोपीला अटक केल्यानंतर पुरावे गोळा
करण्याचं काम सुरू आहे, असं अमितेश कुमार म्हणाले. शिरुर तालुक्यातील
गुणाट गावात आरोपी दत्ता गाडे याला पकडण्यास मदत करणाऱ्या गावकऱ्यांचं आयुक्तांनी कौतुक
केलं. पुणे शहरात पथदिव्यांची संख्या वाढवण्यात येईल, असं त्यांनी
सांगितलं.
दरम्यान, याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी
राज्य महिला आयोग पाठपुरावा करत असल्याचं अध्यक्ष रुपाली पाटील चाकणकर यांनी समाजमाध्यमावरील
संदेशात म्हटलं आहे. राज्य महिला आयोगाची आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन,
पोलीस, शहर वाहतूक संचालक आणि आगार प्रमुखांच्या
उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
****
वेव्ह्ज परिषदेच्या निमित्तानं केंद्र
सरकारनं खादीच्या वापरासंदर्भात एका स्पर्धेचं आयोजन केलं आहे. खादीला जागतिक पातळीवर
फॅशनमध्ये महत्त्वाचं स्थान मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा आहे. डिजिटल, प्रिंट, व्हिड़ीओ
आणि इतर प्रायोगिक माध्यमांमध्ये खादीचा प्रयोग करण्याचं आव्हान यात असून, या स्पर्धेसाठी १५ मार्च पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.
****
नांदेड इथं आजपासून दोन दिवसीय ग्रंथोत्सवाला
सुरुवात झाली. सकाळी ग्रंथदिंडीने या उत्सवाला सुरुवात करण्यात आली. पुस्तकांची अनेक
दालनं उभारण्यात आले असून, विविध
कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं आहे.
****
वाडा संस्कृतीची खऱ्या अर्थाने ओळख
करून देणारं पहिलं गावगाडा साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यातल्या तादलापूर इथं परवा रविवारी
होणार आहे. गांधीवादी साहित्यिक मॅक्सवेल लोपीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या
संमेलनाचं उद्घाटन, प्राध्यापक
डॉक्टर साहेब खंदारे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संमेलनाचे आयोजक राजेसाहेब
कदम यांनी दिली आहे.
****
लातूर कलामंच आणि विलासराव देशमुख
फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परवा रविवारी प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक अमोल
पालेकर यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे. अमोल पालेकर यांचे 'ऐवज - एक स्मृतिबंध' हे आत्मकथनपर पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. या निमित्ताने अमोल पालेकर
यांची मुलाखत होणार आहे.
****
महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी
प्रतिष्ठानच्या वतीने परवा रविवार छत्रपती संभाजीनगर शहरात महास्वछता अभियान राबवण्यात
येणार आहे. सकाळी साडे नऊ ते साडे आकरा या वेळेत शहरातील बस स्थानकं, रेल्वे स्थानक, शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी ही मोहीम राबवण्यात
येईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या मोहिमेत नागरिकांनी
मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असं आवाहन डॉ. नानासाहेब धर्माधिकारी
प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलं आहे.
****
शेअर बाजारतली घसरण सुरुच आहे. आज
सकाळच्या सत्रात निर्देशांकात एक हजार अंकांनी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्स
सुरुवातीला ५०० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. मात्र, १००० अंकांनी घसरला आहे. याबरोबरच सेन्सेक्स
आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी घसरण नोंदवली. बाजार सुरु होताच सेन्सेक्स एक
हजार ०९ अंकांनी घसरून ७३ हजार ६०२ वर होता आणि निफ्टी ३१६ अंकांनी घसरून २२ हजार २२८
अंकांवर होता.
****
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत
आज अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये
दुपारी अडीच वाजता हा सामना सुरू होईल. अफगाणिस्तानं इंग्लंडचा पराभव केल्यामुळं ब
गटात उपांत्यफेरीसाठी चूरस निर्माण झाली आहे.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.02.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 28 February 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
राष्ट्रीय विज्ञान दिन आज साजरा होत
आहे. प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी ‘रामन इफेक्ट’ चा शोध लावल्याच्या
स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. या अभूतपूर्व शोधासाठी सर रामन यांना १९३०
मध्ये नोबेल परितोषिकांनं सन्मानित करण्यात आलं होतं. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान
मंत्री डॉ. जितेंद्र सिंह नवी दिल्लीत आज होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिन सोहळ्याला
उपस्थित राहणार आहेत. जागतिक नेतृत्वासाठी भारतीय युवकांना नवोन्मेश आणि विज्ञानात
सक्षम करणं ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय
विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विज्ञान आणि ज्ञान मिळून प्रत्येक समस्येचं
निराकरण शक्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. नागरीकांनी विज्ञान आणि नवोन्मेषाला चालना
द्यावी आणि विकसित भारताच्या निर्माणात विज्ञानाचा उपयोग करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी
केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली
काल नवी दिल्लीत आयुष क्षेत्राची आढावा बैठक घेण्यात आली. या क्षेत्रानं प्रतिबंधात्मक
आरोग्य सेवेला चालना देण्यात त्याचबरोबर
औषधी वनस्पती लागवडीच्या माध्यमातून ग्रामीण
अर्थव्यवस्थेच्या वाढीत योगदान दिलं आहे, त्यामुळे जगातल्या पारंपरिक औषध पद्धतींमधला अग्रणी म्हणून
भारताचं स्थान आणखी उंचावल्याचं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं.
****
नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक
वाढवण्यासाठी केंद्र शासन सकारात्मक असल्याचं, केंद्रीय ऊर्जा राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटलं
आहे. मुंबईत काल वीज वितरण कंपन्यांच्या आर्थिक
सक्षमता आणि संबंधित विषयाबाबत मंत्रीगट समितीच्या दुसऱ्या बैठकीत ते काल बोलत होते. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक
वाढवणं, विद्युत ऊर्जा बॅटरी संचय प्रणालीसाठी
निर्णय घेणं, स्मार्ट मीटर बसवणं तसंच
केंद्र शासनाच्या नियंत्रणातल्या अन्य विषयांवर प्राधान्यक्रम ठरवून कालबद्ध उपाययोजना
करण्यात येतील, असं नाईक यांनी सांगितलं.
उदयसारखी योजना केंद्र सरकारने पुन्हा आणावी तसंच वित्त पुरवठा व्याजदर कमी असावेत, व्याजमुक्त बाँड्स जारी करण्याची
परवानगी द्यावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवेळी दिल्या. महावितरणची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी
राज्य शासन उपाययोजना करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
राज्य शासनाने आपल्या इलेक्ट्रिक
वाहन धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी आता इलेक्ट्रिक
ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटरचा समावेश या धोरणात
करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी आवश्यक असलेल्या या ई वाहनांचा
उपयोग करणं सोपं होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग
आणि दक्षिण कोरियाच्या एच एस ह्युसंग अँडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशन कंपनी यांच्या
दरम्यान एक हजार ७४० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार काल करण्यात आला. कंपनीने ही गुंतवणूक नागपूरच्या
बुटीबोरी इथं ॲडव्हान्स्ड मटेरियल्स उत्पादन क्षेत्रात केली असून, यामुळे ४०० स्थानिक रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात
आली.
****
वनहक्क कायद्याची कालबद्धपणे अंमलबजावणी
करण्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक वन हक्कांचे प्रलंबित दावे तातडीनं निकाली काढण्याचे
निर्देश राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत राजभवनात वनहक्क
कायदा, २००६ च्या अंमलबजावणीच्या आढावा बैठकीत बोलत होते. वन हक्क लाभार्थ्यांची
आधारकार्ड जोडणी, प्रधानमंत्री किसान सन्मान
योजनेत नोंदणी आदी कामंही विशेष शिबिर घेऊन पूर्ण करण्याचे निर्देश राज्यपालांनी यावेळी
दिले.
****
गडचिरोली जिल्ह्यात दोन जहाल नक्षलवाद्यांनी
काल जिल्हा पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलापुढे आत्मसमर्पण केलं. कांता उर्फ कांतक्का
उर्फ मांडी गालू पल्लो, आणि सुरेश उर्फ वारलू
ईरपा मज्जी अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्यावर एकूण १८ लाख रुपयांचं बक्षीस शासनानं
जाहीर केलं होतं.
****
धनगर समाजातल्या नेत्यांनी 'एस.टी.' प्रवर्गात आरक्षण मागण्यापेक्षा सध्या
अस्तित्वात असलेलं ओबीसी आरक्षण अगोदर टिकवण्याचा सल्ला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी
राज्यातल्या धनगर नेत्यांना दिला आहे. ते लातूर इथं पत्रकारांशी बोलत होते. राज्य सरकारने
बांठिया आयोगाच्या शिफारशी मान्य केल्या तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
****
जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या लातूर इथल्या कार्यालयाचं उद्घाटन
काल महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी
कार्यालयात महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. राज्य शासनामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या
सर्वांगिण विकासासाठी राबवण्यात येणार्या विविध योजनांचा लाभ समाजातल्या अल्पसंख्याक
घटकांपर्यंत पोहचवून त्यांच्या विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
****
विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे
यांची निवड झाल्याबद्दल लातूरच्या लोकमाता अहिल्या प्रतिष्ठान आणि समस्त धनगर समाजाच्या
वतीने लातूरमध्ये काल त्यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.
****
Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 28 فروری 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10
Regional Urdu Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.02.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 28 February 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
तीर्थराज प्रयाग सर्वांना एकता आणि समरसतेची प्रेरणा देत
असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
·
प्रशासनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करण्याची मुख्यमंत्र्यांची
सूचना, १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा घेतला आढावा
·
बसस्थानकं आणि आगारांचे सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे
परिवहन मंत्र्यांचे निर्देश
·
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधी
मिळवण्यासाठी प्रयत्न करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रशासनाला सूचना
आणि
·
मराठी भाषा गौरव दिन विविध कार्यक्रमांनी साजरा
****
तीर्थराज
प्रयाग आपल्याला एकता आणि समरसतेची प्रेरणा देत असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. उत्तरप्रदेशात प्रयागराज इथल्या महाकुंभाच्या सांगतेच्या
पार्श्वभूमीवर लिहिलेल्या लेखात पंतप्रधानांनी ही बाब नमूद केली. संपूर्ण जगात अशा
विराट आयोजनाची तुलना नसल्याचं सांगत, कुंभमेळ्याचं हे नियोजन
व्यवस्थापन क्षेत्रातल्या व्यावसायिकांसाठीही कुतुहलाचा विषय असल्याचं त्यांनी म्हटलं
आहे. या महाकुंभातून देशवासियांनी भारताच्या विराट सामर्थ्याचं जगाला दर्शन घडवलं असून,
याच आत्मविश्वासातून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी मार्गक्रमण
करण्याचं आवाहन त्यांनी केलं. तरुण पिढीचा कुंभमेळ्यातला सहभाग हा समाधानकारक असल्याची
भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली.
****
लोकाभिमुखता, गतिशीलता
आणि पारदर्शकता या सुप्रशासनामध्ये अतिशय महत्त्वाच्या बाबी असून, सुप्रशासन राबवताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. शासनाने निर्देशित
केल्याप्रमाणे १०० दिवसांच्या आराखड्यानुसार होत असलेल्या कामांचा काल आढावा घेताना
ते बोलत होते. विविध विभाग आणि पातळीवर उत्कृष्ट काम करत असलेल्या १५ विभागांच्या कामांचं
सादरीकरण यावेळी करण्यात आलं. मंत्रालयापासून गाव पातळीपर्यंत विविध कार्यालयांमधल्या
सर्व अधिकाऱ्यांनी नागरिकांना सेवा सुविधांचा लाभ सुलभतेने मिळवून देण्यासाठी तसंच
त्यांचं समाधान होईल यासाठी प्रयत्न करावेत, असं फडणवीस यांनी
सांगितलं.
****
राज्यातल्या
अकृषी विद्यापीठांमधल्या अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेला शासनाने मान्यता दिली आहे.
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. निवड प्रक्रियेत
अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता येण्यासाठी यापुढे नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार
असून, शैक्षणिक क्रेडेन्शियल तसंच उमेदवारांची मुलाखतीमधली कामगिरी गृहीत
धरण्यात येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
पुण्यात
स्वारगेट बसस्थानकातल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे
पोलिसांनी शिरुर तालुक्यातून अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
दरम्यान, या घटनेच्या
पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात एस.टी महामंडळाची काल परिवहन मंत्री
प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत बैठक झाली. राज्यातल्या सर्वच बसस्थानक आणि आगारांचं
तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसंच एसटी आरटीओ
परिसरातल्या भंगार वाहनांची १५ एप्रिलपूर्वी विल्हेवाट लावावी, एसटी महामंडळाच्या सर्व बसमध्ये CCTV लावावेत,
तसंच बसस्थानकावर महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याच्या सूचनाही
त्यांनी यावेळी दिल्या. महिलांनी कोणतीही शंका न बाळगता एसटीतून प्रवास करावा,
असं आवाहन सरनाईक यांनी केलं. ते म्हणाले...
‘‘लाडक्या
बहिणींना माझी परिवहन मंत्री म्हणून विनंती आहे, आपला प्रवास ज्या पद्धतीनं तुम्हाला
पूर्वीच्या माध्यमातून करत होतात, तसाच करा. पूर्ण सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभं
आहे. जर आमच्या परिवहन विभागामध्ये आय पी एस अधिकाऱ्यांची नेमणूक झाली तर सुरक्षिततेच्या
दृष्टीकोनातनं पोलिसांच्या माध्यमातून सगळी सुरक्षित यंत्रणा कार्यान्वित होईल. एस
टी डेपो मध्ये आमच्या एस टी महामंडळाच्या जागेमध्ये ज्या ज्या ठिकाणी बसेस नव्हे तर
ज्या गाड्या आर टी ओ नं जप्त केलेल्या आहेत, त्याचं सुद्धा पूर्णपणे पंधरा एप्रिलच्या
आत पूर्णपणे विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेण्यात आला.’’
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात लासूर स्टेशन इथं दोन आठवड्यापूर्वी झालेल्या अत्याचार आणि निर्घृण
हत्येबाबत कठोर पावलं उचलण्याचे, तसंच दोषींवर कठोर शासन करण्याचे निर्देश,
महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी
दिले आहेत. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रशासकीय दिरंगाई
प्रकरणी कारवाईचा इशाराही मेश्राम यांनी दिला. ते म्हणाले,
‘‘शोषित
बांधवांना विनंती करतो की त्यांनी कोणत्याही पद्धतीच्या शोषणाला बळी न पडता, त्यांच्याविरूध्द
जो काही अन्याय होत असेल, त्याच्याविरूद्ध आवाज आपला बळकट करावा. समाजानी आणि प्रशासनातल्या
अधिकाऱ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं व्हावं. आणि जर प्रशासन आपल्या कामामध्ये दिरंगाई
किंवा कुचराई दाखवत असेल, तर आयोग त्यांच्यावर भविष्यकाळामध्ये
कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी कटीबद्ध आहे.’’
****
परभणी इथं
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, एका आरोपीला
तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी तपास सुरळीतपणे सुरू असल्याची
माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी दिली. या घटनेच्या निषेधार्थ काल परभणी
शहरात सकल मातंग समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
****
बीड जिल्ह्यातल्या
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीडच्या विशेष मोक्का न्यायालयात सीआयडीने
दीड हजार पानी दोषारोप पत्र दाखल केलं आहे. संतोष देशमुख यांची गेल्या नऊ डिसेंबर रोजी
अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती.
****
मराठवाड्यातला
दुष्काळ संपवण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महत्त्वाचा असून, त्यासाठी
केंद्र शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पाणी पुरवठा आणि स्वच्छता
विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. शिंदे यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.
आर पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा केली.
राज्यातल्या प्रत्येक गावाला स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पुरवठा, शाश्वत स्वच्छता यासोबतच ‘हर घर जल’ योजनेद्वारे १०० टक्के घरगुती नळ जोडणीचं
उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले.
****
मराठी भाषा
गौरव दिन काल सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
मराठी भाषेच्या
गौरवार्थ तसंच भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना काल
मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री
उदय सामंत यावेळी उपस्थित होते. यावेळी २०२४ चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ
साहित्यिक दिवंगत रा रं बोराडे यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या कन्या प्रेरणा
दळवी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नामवंत प्रकाशन संस्थेसाठी श्री. पु. भागवत पुरस्कार
पुण्याच्या ज्योत्स्ना प्रकाशनला, डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक
पुरस्कार डॉ. रमेश सुर्यवंशी यांना, तर मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन
पुरस्कार भीमाबाई जोंधळे यांना प्रदान करण्यात आला.
नाशिक जिल्ह्याच्या
निफाड तालुक्यात शिरवाडे वणी हे ज्येष्ठ साहित्यिक वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज
यांचं गाव आता कवितांचं गाव म्हणून ओळखलं जाणार आहे. काल शिरवाडे-वणी इथं झालेल्या
कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली.
भाषा गौरव
दिनी छत्रपती संभाजीनगर इथं काल कविसंमेलनं घेण्यात आलं. मराठवाडा
साहित्य परिषद तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झालेल्या या संमेलनात
अनेक कवींनी आपल्या रचना सादर केल्या.
****
सिंधुदुर्ग
जिल्ह्यातल्या कुडाळ इथलं बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या संयुक्त
विद्यमानं दिला जाणारा आरती प्रभू पुरस्कार, यंदा प्रसिद्ध नाटककार प्रशांत दळवी यांना
जाहीर झाला आहे. २१ हजार रूपये, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असं
या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
धाराशिव
जिल्ह्यात लोहारा तालुक्यातल्या माकणी इथल्या प्रहार दिव्यांग उत्पादक गटाने २०१५ पासून
सुरू केलेल्या बचत गटाच्या माध्यमातून एलईडी बल्ब निर्मितीचा व्यवसाय सुरू केला आहे.
उमेद अभियानाच्या कर्मचाऱ्यांनी व्यवसाय करण्यासंदर्भात त्यांना प्रोत्साहन दिलं. दिव्यांगत्वावर
मात करत आत्मनिर्भर होत आलं, याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं. या
बचत गटाचे सदस्य महंमद अली अत्तार यांनी याबाबत अधिक माहिती दिली,
बाईट
– महंमद अली अत्तार
****
लातूर जिल्ह्यात
अहमदपूर तालुक्यातल्या विविध विकासकामांचं भूमिपूजन काल पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे
भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं.
अहमदपूर इथल्या तालुका पशुचिकित्सालय इमारतीचं भूमिपूजन आणि रस्ते विकास कामांचा यात
समावेश आहे.
****
हिंगोली
जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यात येहळेगाव-सोळंके इथं युवकांनी जलजीवन मिशन अंतर्गत
बांधण्यात आलेल्या कोरड्या जलकुंभावर चढून आंदोलन केलं. गावात पाणी पुरवठा होत नसल्याबद्दल
जिल्हा प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीची कुठलीही दखल घेतली गेली नसल्यानं, हे आंदोलन
करण्यात आलं.
****
लातूरचं
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त
काल गौरीशंकर मंदिरापासून सिद्धेश्वर मंदिरापर्यंत मानाच्या काठ्याची मिरवणूक काढण्यात
आली. अश्व पथक, लेझीम पथक, मुला-मुलींचं स्वतंत्र काठी पथक
आणि विविध देखाव्यांचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं.
****
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...