Thursday, 31 August 2017

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 31.08.2017_17.25

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 31.08.2017 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 31 August 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

पॅन क्रमांकाशी आधार क्रमांक जोडण्यासाठी केंद्र सरकारनं येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या जोडणीचा आजचा शेवटचा दिवस होता

****

विमुद्रीकरणानंतर काळ्या पैशासंदर्भात पंतप्रधानांची आकडेवारी दिशाभूल करणारी असल्याचं, कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी म्हटलं आहे. नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेनं जारी केलेल्या आकडेवारीनंतर कॉंग्रेसकडून ही टीका करण्यात आली आहे. ज्या काळ्या पैशाला हद्दपार करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला.तो काळा पैसा कुठे गेला, असा सवाल कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रो आज सायंकाळी दिशासूचक उपग्रह IRNSS-वन-एच चं अवकाशात प्रक्षेपण करणार आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून सायंकाळी सात वाजता पीएसएलव्ही सी ३९ या यानामार्फत हा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला जाईल.

****

खासदार आणि आमदारांविरोधातील गुन्हेगारी प्रकरणांच्या सुनावणीसाठी विशेष प्रणाली विकसित करण्याचा विचार सर्वोच्च न्यायालय करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते अश्विनी उपाध्याय यांच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं ही माहिती दिली. अशाप्रकारच्या प्रकरणांची सुनावणी सहा महिन्यांच्या आत पूर्ण करण्याच्या दिशेनंचं विचार करत असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.

****

मुंबईतील जेजे मार्गावरील भेंडीबाजार भागात आज सकाळी पाच मजली रहिवासी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या १६ झाली आहे. आतापर्यंत इमारतीच्या ढिगाऱ्याखालून ३० जणांना बाहेर काढण्यात आलं असून, उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रीय आपत्ती आणि बचाव दलाद्वारे या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

****

मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पीटलचे डॉ दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह मुंबईत कोळीवाड्यानजिक समुद्र किनाऱ्यावर सापडला आहे. परवा २९ तारखेला झालेल्या अतिवृष्टीनंतर डॉ अमरापूरकर सांडपाण्याच्या गटारातून वाहून गेले होते.

दरम्यान, परवाच्या पावसात जागोजागी पाणी तुंबण्यासाठी नागरिकांनी मुंबई महानगरपालिकेला जबाबदार धरलं आहे. २६ जुलै २००५ च्या घटनेतून महानगरपालिकेनं काहीही धडा घेतला नसल्याचं सांगताना, सामाजिक कार्यकर्ते विनोद संपत यांनी पाणी तुंबण्यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

****

नोकरीत पदोन्नतीतील आरक्षणाबाबत उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरुध्द सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारनं तातडीनं अपील करावं अशी मागणी राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीनं अहमदनगर इथं करण्यात आली आहे. आशा सेविका आणि लिंकवर्कर यांचं थकित मानधन देवून, त्यांना सेवेत सामावून घेण्याची मागणीही महासंघानं केली आहे. या मागणीचं निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना देण्यात आलं.

****

उस्मानाबाद इथं औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या महिला स्वाधार केंद्राच्या अधीक्षकासह दोन जणांविरोधात फसवणूक तसंच महिला अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. केंद्रातल्या महिला गर्भवती प्रकरण तसंच शासकीय अनुदानासाठी बनावट हजेरीपत्र तयार केल्या प्रकरणी जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी नुकत्याच झालेल्या उस्मानाबाद दौऱ्यात या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.

****

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स सीटूचं पहिलं श्रमिक साहित्य संमेलन येत्या दहा आणि अकरा सप्टेंबरला जालना इथं आयोजित करण्यात आलं आहे. संमेलनाचे निमंत्रक सुभाष थोरात यांनी ही माहिती दिली. या दोन दिवसीय संमेलनात विविध विषयांवरील परिसंवादात  नामवंत वक्ते आणि चळवळीतले नेते मार्गदर्शन करणार आहेत.ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे.

****

भारत श्रीलंका एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या शतकी खेळीच्या बळावर भारतानं ३५ षटकात  चार बाद २७४ धावा केल्या आहेत. आज नाणेफेक जिंकून भारतीय संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विराट १३१ तर रोहितनं १०४ धावा केल्या. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा मनीष पांडे पाच तर महेंद्रसिंह धोनी   धावांवर खेळत होता.

****

महाराष्ट्रातल्या तीन अंगणवाडी सेविकांना उल्लेखनीय योगदानासाठी केंद्रीय महिला बाल विकास मंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते आज राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नवी दिल्लीत एका कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातल्या पडेगाव इथल्या अंगणवाडी सेविका लताबाई वांईगडे यांचा समावेश आहे.

****


AIR News Bulletin, Aurangabad 31.08.2017 13.00

Text-AIR News Bulletin, Aurangabad 31.08.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 AUG. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑगस्ट २०१ दुपारी १.००वा.

****

मुंबईतील जेजे मार्गावरील भेंडीबाजार भागात आज सकाळी एक चार मजली रहिवासी इमारत कोसळली. या दुर्घटनेत जण ठार तर अनेक जण जखमी झाले. जखमींना जेजे रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रीय आपत्ती आणि बचाव दलाद्वारे या ठिकाणी बचावकार्य सुरू असून अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आणखी ३० ते ३५ जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या इमारतीत जवळपास १० कुटुंब राहत असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर शेजारच्या इमारतीही खाली करण्यात येत आहेत.

दरम्यान, या इमारत दुर्घटना प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेत राज्यमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. सध्या बचावकार्यावर लक्ष केंद्रीत केलं असल्याचं देसाई यांनी सांगितलं.

*****

कर्करोगावर उपचारासाठी राज्यात ठिकठिकाणी अत्याधुनिक उपचार केंद्रं उभी राहणं आवश्यक असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईतल्या सानपाडा इथं महात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयाचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या रुग्णालयात आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत उपचार केले जाणार असून दररोज एक, याप्रमाणे दरमहा तीस मुलांवर इथं मोफत उपचार होणार आहेत, ही महत्त्वाची बाब असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

*****

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लोकपाल तसंच लोकायुक्त यांची नियुक्ती करणं, तसंच स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास दिल्ली इथं आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे.

****

आधारसाठी पुरवण्यात आलेली नागरिकांची माहिती पुर्णपणे सुरक्षित आणि संरक्षित असल्याचं भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाणं म्हटलं आहे. याच्या सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचं प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडेय यांनी आकाशवाणी बोलताना सांगितलं.

****

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातल्या छोट्या धरणांमधून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात असल्यानं जायकवाडी धरण आता जवळ जवळ ७५ टक्के भरत आलं आहे. गेल्या दोन दिवसात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्यानं गेल्या २४ तासात जायकवाडी धरणात २ पूर्णांक २७ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. नगर जिल्ह्यातली भंडारदरा, निळवंडे आणि मुळा ही धरणे भरली असून नाशिक जिल्ह्यातली सर्व आठ धरणे शंभर टक्के भरली आहेत.

****

बालकांच्या न्यायिक हक्क आणि विकासासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या स्वयंसेवी संस्थांना बाल हक्क संरक्षण आयोग वेळोवेळी आवश्यक ती मदत करेल, अशी ग्वाही बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे यांनी दिली आहे. उस्मानाबाद इथं स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधीं समवेत झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. ज्या संस्था चांगल्या काम करतील त्यांच्या पाठीशी राज्य शासन राहील असं घुगे यांनी सांगितलं. ज्या बालकांना खऱ्या अर्थाने काळजी व संरक्षणाची गरज आहे, अशाही बालकांना स्वयंसेवी संस्थांमध्ये प्रवेश दिला गेला पाहिजे, अशी मागणी संस्थाचालकाच्या वतीनं करण्यात आली.

****

ठाण्याजवळ आसनगाव ते वासिंद दरम्यान दुरांतो एक्सप्रेसच्या परवा झालेल्या अपघातानंतर या मार्गावरची रेल्वेवाहतुक अद्यापही सुरळीत झालेली नाही. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयानं काही रेल्वे गाड्या अंशत: तर काही गाड्या पूर्णपणे रद्द केल्या आहेत. आज मुंबईहून सुटणारी तपोवन एक्सप्रेस, तसंच नांदेडहून सुटणारी नांदेड लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

नांदेड - श्री गंगानगर एक्स्प्रेस आज रद्द करण्यात आली असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.

****

विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत ५६ किलोग्रॅम वजनगटातील बँटमवेट प्रकाराच्या उपांत्य फेरीत भारताचा मुष्टीयोद्धा गौरव बिधूडीचा सामना अमेरिकेच्या ड्यूक रेगनशी होणार आहे. जर्मनीतील हॅम्बर्ग इथं उपांत्यपूर्व फेरीत गौरवनं कांस्य पदक निश्चित केलं आहे. गौरव उपांत्य फेरीत विजेता ठरल्यास तो या प्रतिष्ठीत स्पर्धेत रौप्य पदक पटकावणारा पहिला भारतीय मुष्टीयोद्धा ठरणार आहे.

****

भारत श्रीलंका एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना आज कोलंबो इथं होणार आहे. महेंद्रसिंह धोनीचा हा ३०० वा एकदिवसीय क्रिकेट सामना असेल. मालिकेत भारतानं तीन शून्य अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. या सामन्यात लसिथ मलिंगा श्रीलंका संघाचं नेतृत्व करणार आहे.

****


AIR News Bulletin HLB , Aurangabad 31.08.2017 10.00

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 31.08.2017 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

३१ ऑगस्ट २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

स्वित्झर्लंडच्या राष्ट्रपती डोरिस लिउथर्ड या आज भारत दौऱ्यावर आल्या आहेत. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोरिस यांच्यात आज व्यापार आणि गुंतवणूकीबाबत द्विपक्षीय चर्चा होणार आहे.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रो आज सायंकाळी दिशासूचक उपग्रह IRNSS-वन-एच चं अवकाशात प्रक्षेपण करणार आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून सायंकाळी सात वाजता पीएसएलव्ही सी ३९ या यानामार्फत हा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला जाईल.

****

मुंबईतील जेजे मार्गावरील भेंडीबाजार भागात आज सकाळी एक चार मजली रहिवाशी इमारत कोसळली. ढिगाऱ्याखालून ३ जणांना बाहेर काढण्यात आलं असून जखमींना जेजे रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बचावकार्य सुरू असून अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आणखी ३० ते ३५ जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या इमारतीत ९ कुटुंब राहत असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर शेजारच्या इमारतीही खाली करण्यात येत आहेत.

****

पैठणच्या जायकवाडी धरणात काल सायंकाळी २० हजार सहाशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू होती. धरणातला पाणी साठा ७३ टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडयात आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

****



भारत श्रीलंका एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना आज कोलंबो इथं होणार आहे.  महेंद्रसिंह धोनीचा हा ३०० वा एकदिवसीय क्रिकेट सामना असेल.

****


AIR News Urdu Bulletin, Aurangabad. Date: 31.08.2017, Time: 8.40 -8.45 AM


Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date: 31 August 2017
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۳۱ ؍اگست  .۲۰۱۷؁ء
وقت : صبح  ۴۰-۸ سے  ۴۵-۸
 آدھارت کارڈ کو لازمی قرار دیئے جانے کی معیاد میں31؍ دِسمبر تک توسیع کر دی گئی ہے۔
کل عدالت عظمیٰ میں سما عت کے دوران مرکزی حکو مت کی جانب سے یہ اطلاع دی گئی۔ اِس معاملے کی سما عت کے لیے سہ رکنی آئینی بینچ کی بجائے 5؍ رکنی آئینی بینچ تر تیب دیئے جانے کی در خواست بھی مرکزی حکو مت نے  عدالت عظمیٰ سے کی  اِس معاملے کی آئندہ سماعت اب نومبر میں ہو گی۔
 دریں اثناء قو می خصوصی شنا ختی اِدارے Unique Identification Authority  نے وضا حت کی ہے کہ آ دھار کارڈ پر درج معلو مات مکمل طور پر محفوظ ہے۔ اِس اِدارے نے بتا یا کہ آ دھار سے متعلق تمام ترحساس تفصیلات صرف اِسی اِدارے کے پاس ہی ہے جِسے افشاء نہیں کیا جا تا۔
****************************
 دیگر پسماندہ طبقات کی نان کریمی لیئر کی مرا عات تمام عوامی شعبے کی کمپنیوں ،
بیمہ کمپنیوں اور بینکوں میں کام کرنے والے ملازمین کے لیے بھی لا گو ہوںگی۔ کل وزیر اعظم نریندر مودی کی زیر صدا رت منعقدہ مرکزی کا بینہ کے اجلاس میں یہ فیصلہ کیا گیا۔ وہ کمپنیاں اور اقتصادی ادارے جن کی سا لا نہ آ مد ن8؍ لاکھ روپئے سے زیادہ ہو وہاں کام کرنے والے ملازمین اِن مرا عات کے اہل ہوں گے۔ مرکزی کابینہ نے لکژری کاروں پر عائدGST  پر سر چارج میں اضا فے کو بھی منظوری دیدی۔
****************************
 ریزرو بینک آف اِنڈیا نے کہا ہے کہ نوٹ بندی کے بعد1000؍ اور500؍ روپئے کے99؍ فیصد منسوخ شدہ کرنسی نوٹ شہریوں نے بینکوں میں جمع کراوائے۔ کل RBI کے جاری کر دہ بیان میں بتا یا گیا کہ 15؍ لاکھ 44؍ ہزار کروڑ روپئے کے 1000؍ اور500؍ روپئے کے کرنسی نوٹ بازار میں تھے جِس میں سے15؍ لاکھ28؍ ہزار کروڑ روپئے کے نوٹ ریزرو بینک کو واپس مل گئے۔ صرف16؍ ہزار
50؍ کروڑ روپئے کے منسوخ شدہ نوٹس ہی واپس موصول نہیں ہوئے۔
****************************
 شیو سینا سر براہ اُدّھو ٹھاکرے نے کہا ہے کہ ممبئی میونسپل کار پو ریشن کی جانب سے نالوں کی بہتر صفائی کیے جانے کے با عث صرف ایک ہی دن میں ممبئی کے حالات معمول پر آسکے۔ کل اخبا ری نمائندوں سے گفتگو کر تے ہوئے اُنھوں نے کہا کہ موسلا دھار بارش کے سبب ممبئی میں پیدا شدہ ہنگا می صورتحال پر میونسپل کار پو ریشن کی بہتر کار کر دگی کے ذریعے ہی قا بو پا یا جا سکا۔ تا ہم اُنھوں نے کہا کہ اِس موضوع پر کوئی سیا ست نہ کرے اور در خواست کی کہ راستوں پر پا نی جمع ہو نے سے روکنے کے لیے تکنیکی اقدا مات تجویز کیے جائیں۔ اِسی دوران ممبئی میں نظام زندگی بتدریج بہتر ہو رہا ہے اور مضا فا تی ریل سر وِس پوری طرح بحال کر دی گئی ہے۔اِس کے علا وہ فضائی خد مات بھی پو ری طرح بحال ہو چکی ہیں۔
 دریں اثناء قا نون ساز کونسل میں حزب اختلاف کے قائد دھننجئے مُنڈے نے الزام عائد کیا ہے کہ ممبئی میونسپل کار پو ریشن کی حکمراں شیو سینا اور بی جے پی زور دار بارش کے بعد ممبئی کی ابتر صورتحال کی ذمہ دار ہے۔ اُنھوںں نے مطالبہ کیا کہ نا لہ صفائی کے نام پر خرچ کیئے گئے کروڑوں روپئے کے اخرا جات کی عدالت عالیہ کے سبکدوش جج کے ذریعے تحقیقات کر وائی جائیں۔
****************************
 سوا بھیما نی شیتکری سنگٹھنا نےNDA سے علیحد گی کا اعلان کیا ہے۔ سنگٹھنا کے سر براہ راجیو شیٹّی نے کل پو نا میں منعقدہ ایک اطلا عی کانفرنس میں یہ اعلان کیا۔ قبل ازیں سنگٹھنا کی مجلس عاملہ کے اجلاس میں NDA سے کنارہ کشی کی قرار داد اتفاق رائے سے منظور کی گئی۔ سوا بھیما نی شیتکری سنگٹھنا کے قائد روی کانت توپکر4؍ سِتمبّر کو پار چہ بافی صنعتی کار پو ریشن کے چیئر مین کے عہدے سے استعفیٰ دیدیں گے۔
****************************
 پر سوں تھا نہ سے قریب دُرانتو ایکسپریس کو پیش آئے حادثے کے بعد اِس ریلوے ٹریک پر اب بھی ریلوں کی آ مد و رفت متا ثر ہو رہی ہے۔ اِس حادثے کے سبب جنوب وسطی ریلوے کے ناندیڑ ڈِویژن دفتر نے کچھ ریل گاڑیوں کو جز وی اور کچھ ٹرینوں کو پو ری طرح منسوح کر دیا ہے۔ آج ممبئی سے روانہ ہونے والی تپون ایکسپریس منسوخ کر دی گئی ہے۔ کل کی ممبئی -ناگپور نندی گرام ایکسپریس بھی منسوخ کر دی گئی تھی۔
****************************
 ناسک ضلع میں جاری موسلا دھار بارش کے سبب ضلع کے11؍ آ بی منصو بے صد فیصد بھر گئے ۔ جبکہ دیگر7؍ پُشتوں میں ذخیرہ ٔ آ ب 90؍ فیصد سے زائد ہو گیاہے۔ پال کھیڑ85 ؍ ، گنگا پور92 ؍ اور دارنا ڈیم99؍ فیصد بھر چکا ہے۔ گنگا پور ڈیم سے 4؍ ہزار گھن فٹ فی سیکنڈ اور دار نا منصو بے سے8؍ ہزار گھن فٹ فی سیکنڈ پانی کی نکا سی کی جا رہی ہے۔ اِس کے علا وہ ناندور مدّھمیشور پُشتے سے ساڑھے بارہ ہزار گھن فٹ فی سیکنڈ کی رفتار سے پانی چھوڑا جا رہا ہے۔
 اِس منا سبت سے اورنگ آ باد ضلع انتظا میہ نے ضلع کے شہر یوں کو اور ندی کے کنارے واقع قصبوں کو سیلاب کی صورتحال سے خبر دار رہنے کا اِشا رہ دیا ہے۔ پیٹھن کے جائیکواڑی ڈیم میں 20؍ ہزار گھن فٹ فی سیکنڈ کی رفتار سے پانی جمع ہو رہاہے۔ متعلقہ ذرائع نے بتا یا کہ ڈیم میں پانی کا ذخیرہ 73؍ فیصد سے زائد ہو چکا ہے۔
 ****************************
 

AIR News Bulletin, Aurangabad 31.08.2017 06.50

Text-AIR News Bulletin, Aurangabad 31.08.2017 06.50


. Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 AUG. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

                                       Language Marathi      

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** आधारपत्र सक्तीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ;  केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

** नालेसफाई व्यवस्थित केल्यानेच मुंबई एका दिवसात पूर्वपदावर -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ांचा दावा

** स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय

आणि

** नाशिक जिल्ह्यातली धरणं भरली; जायकवाडी धरणातला पाणीसाठा ७३ टक्क्यांवर

****

आधारपत्र सक्तीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. ही मुदत ३० सप्टेंबरला संपणार होती. या प्रकरणाची सुनावणी तीन सदस्याच्या घटनापीठाऐवजी पाच सदस्यीय घटनापीठासमोर घ्यावी अशी विनंतीही केंद्र सरकारने केली आहे. या प्रकरणी आता नोव्हेंबरमध्ये सुनावणी होणार आहे.

दरम्यान, आधार पत्रावर दिलेली माहिती पूर्णपणे सुरक्षित असल्याचं, भारतीय विशेष ओळख प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे. आधार संबधीची माहिती, फक्त या प्राधिकरणाकडेच आहे, ती खुली केली जात नसल्याचं प्राधिकरणानं सांगितलं आहे.

****

इतर मागासवर्गीयांच्या नॉन क्रिमीलेयर वर्गासाठीचे लाभ सार्वजनिक कंपन्या, विमा कंपन्या आणि बँकांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनाही लागू होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळानं या निर्णयाला मान्यता दिली. वार्षिक आठ लाख रुपये उत्पन्न असलेल्या अशा कंपन्या तसंच वित्तीय संस्थांमधले कर्मचारी या लाभासाठी आता पात्र असतील. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल झालेल्या बैठकीत लक्झरी कारवर वस्तू सेवा करांतर्गत अधिभार वाढवण्यासही मंजूरी दिली आहे. वस्तू आणि सेवाकर राज्य मोबदला विधेयक २०१७ मध्ये उपयुक्त सुधारणा करण्यासाठी अध्यादेश जारी करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.

****

विमुद्रीकरणानंतर एक हजार आणि पाचशे रुपये मूल्याच्या रद्द केलेल्या नोटांपैकी ९९ टक्के नोटा नागरिकांनी बँकांत जमा केल्याचं रिजर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. काल ही माहिती देण्यात आली. चलनात असलेल्या १५ लाख ४४ हजार कोटींपैकी १५ लाख २८ हजार कोटी रुपयांच्या नोटा रिजर्व्ह बँकेला परत मिळाल्या असून, फक्त १६ हजार ५० कोटी रुपयांच्या नोटा बँकेत परत आल्या नसल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

मुंबई महापालिकेनं नालेसफाई व्यवस्थित केल्यानेच मुंबई एका दिवसात पूर्वपदावर आली, असा दावा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. जोरदार पावसामुळे उद्भवलेली आपत्कालीन परिस्थिती महापालिकेनं कार्यक्षमतेने हाताळली असं सांगत, ठाकरे यांनी, या विषयाचं कोणीही राजकारण करू नये असं आवाहन केलं.  रस्त्यावर पाणी तुंबू नये यासाठी तांत्रिक उपाययोजना सुचवाव्यात, असंही ठाकरे म्हणाले. दरम्यान, मुंबईतलं जनजीवन हळुहळू पूर्वपदावर येत असून, उपनगरी रेल्वे सेवा सुरळीत होत आहे.

मुसळधार पावासामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला मुंबई महापालिकेतल्या सत्ताधारी शिवसेना आणि पहारेकरी भाजपा हेच जबाबदार असल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. नालेसफाईवर झालेल्या कोट्यवधी रूपयांच्या खर्चाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमुर्तींमार्फत चौकशी करावी अशी मागणीही मुंडे यांनी केली आहे.

****

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी काल पुण्यात वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. त्यापूर्वी संघटनेच्या कार्यकारिणी बैठकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर येत्या चार तारखेला वस्त्रद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

****

ठाण्याजवळ आसनगाव ते वासिंद दरम्यान दुरांतो एक्सप्रेसच्या परवा झालेल्या अपघातानंतर या मार्गावरची रेल्वेवाहतुक अद्यापही सुरळीत झालेली नाही. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयानं काही रेल्वे गाड्या अंशत: तर काही गाड्या पूर्णपणे रद्द केल्या आहेत. आज मुंबईहून सुटणारी तपोवन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. मुंबई नागपूर नंदीग्राम एक्सप्रेसही काल रद्द करण्यात आली. लोकमान्य टिळक टर्मिनस ते नांदेड ही गाडी काल रद्द करण्यात आली होती, त्यामुळे नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी आज रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान, नांदेड - श्री गंगानगर एक्स्प्रेस आज रद्द करण्यात आली असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.

****

नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असून जिल्ह्यातली तब्बल ११ धरणं १०० टक्के भरली असून ७ धरणातला पाणी साठा ९० टक्क्यांहून अधिक झाला आहे. पालखेड ८५, गंगापूर ९२ टक्के, तर दारणा धरण ९९ टक्के भरलं आहे. गंगापूर धरणातून चार हजार घनफूट प्रतिसेकंद तर दारणा धरणातून ८ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून साडे १२ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी पुरापासून सावधगिरी बाळगावी तसंच नदीकाठाच्या गावांनी सावधानता बाळगावी, असं आवाहन औरंगाबाद जिल्हा प्रशासनानं केलं आहे. पैठणच्या जायकवाडी धरणात काल सायंकाळी २० हजार सहाशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू होती. धरणातला पाणी साठा ७३ टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडयात आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

****

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या प्रक्रियेअंतर्गत औरंगाबाद तालुक्यातल्या १४ गावांचा अंतिम मोजणी अहवाल आगामी तीन दिवसांत प्राप्त होणार आहे. उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी ही माहिती दिली. कर्जमाफीच्या अनुषंगानं राज्य रस्ते विकास महामंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. यात शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कर्जाची रक्कम शिल्लक ठेवत, उर्वरित रक्कम संबंधितांना देऊन जमिनीचं संपादन करण्यास सांगितलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात शासनानं मंजूर केलेल्या कामांना गती देऊन विकासाचा अनुशेष भरून काढण्याची सूचना शिवसेना उपनेते आणि खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात काल आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातली विकास कामं फक्त समन्वयाअभावी रखडली असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

बालकं आणि गर्भवतींना आजारापासून संरक्षित करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात ऑक्टोबर २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत "इंटेन्सीफाईड मिशन इंद्रधनुष्य" ही विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. या मोहिमेत सर्वांनी सक्रीय सहकार्य करावं, असं आवाहन डोंगरे यांनी केलं.

****

अंबाजोगाईतल्या योगेश्वरी नूतन विद्यालयात कार्यरत सहशिक्षक डॉ. कमलाकर राऊत यांना सन २०१६ चा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. पन्नास हजार रुपये, रौप्य पदक आणि गुणवत्ता प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्ली इथं विज्ञान भवनात होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभात राऊत यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

****

बालकांच्या न्यायिक हक्क आणि विकासासाठी, बाल हक्क संरक्षण आयोग स्वयंसेवी संस्थांना वेळोवेळी आवश्यक ती मदत करेल, असं आश्वासन आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे यांनी दिलं आहे. काल उस्मानाबाद इथं, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधी समवेत झालेल्या बैठकीत काल ते बोलत होते. ज्या बालकांना खऱ्या अर्थाने काळजी तसंच संरक्षणाची गरज आहे, अशाही बालकांना स्वयंसेवी संस्थांमध्ये प्रवेश देण्याचा मागणीवर घुगे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

****

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी येत्या ७ सप्टेंबरपासून किसान सभेच्या वतीनं संघर्षयात्रा काढण्यात येणार आहे. सभेचे राज्य सरचिटणीस कॉम्रेड नामदेव गावडे आणि कॉम्रेड राम बाहेती यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.

****


Wednesday, 30 August 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 30.08.2017 17.25


आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

इतर मागासवर्गीयांच्या नॉन क्रिमीलेयर वर्गासाठीचे लाभ सार्वजनिक कंपन्या, विमा कंपन्या आणि बँकांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनाही लागू होणार आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळानं या निर्णयाला मान्यता दिली. वार्षिक आठ लाख रुपये उत्पन्न असलेले अशा कंपन्या तसंच वित्तीय संस्थांमधले कर्मचारी या लाभासाठी आता पात्र असतील. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत लक्झरी कारवर वस्तू सेवा करांतर्गत अधिभार वाढवण्यासही मंजूरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित वार्ताहर परिषदेत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली. वस्तू आणि सेवाकर राज्य मोबदला विधेयक २०१७ मध्ये उपयुक्त सुधारणा करण्यासाठी अध्यादेश जारी करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे

****

काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात नौशेरा भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. नौशेरा भागात सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबारास सुरूवात झाली. भारतीय सैन्यानं गोळीबारास चोख प्रत्युत्तर दिलं. यंदाच्या वर्षात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होण्याचं प्रमाण वाढलं असून एक ऑगस्टपासून तब्बल २८५ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे.

****

कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव विजय मुलगुंद यांच्या बंगळुरू इथल्या निवासस्थानावर आज आयकर विभागानं छापे टाकले. ऊर्जा मंत्री डी.के. शिवकुमार यांचे ते निकटवर्तीय असून गुजरात राज्यसभा निवडणूकीदरम्यान काँग्रेस खासदारांना बंगळुरू इथं थांबवण्यात त्याची प्रमुख भूमिका होती. ऊर्जामंत्री डी.के. शिवकुमार यांच्या निवास्थानांनंतर आता मुलगुंद यांच्या निवासस्थानांवर छापे टाकण्यात आले आहेत.

****



नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असून जिल्ह्यातील तब्बल ११ धरणं १०० टक्के भरली असून सात धरणातील पाणी साठा ९० टक्क्याहून अधिक झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर ९२ टक्के, पालखेड ८५, तर दारणा धरण ९९ टक्के भरलं आहे. गेल्या महिनाभरात नाशिक जिल्ह्यात सरासरी २८१ पुर्णांक ८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. गंगापूर धरणातून चार हजार घनफूट प्रतिसेकंद तर दारणा धरणातून आठ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून साडे १२ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या निंबोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाचवीच्या वर्गाचं छत कोसळून झालेल्या अपघाताची घटना ताजी असतानांच आज पहाटे श्रीगोंदा तालुक्यात घारगाव इथं जिल्हा परिषद शाळेच्या तीन वर्ग खोल्यांची इमारत कोसळली. दुर्घटना पहाटेच्या वेळी घडल्यानं, कोणीही जखमी झालं नाही. या शाळेच्या नवीन इमारतीचं काम तातडीनं सुरू करावं, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी दौंड-नगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं.

****

बालक आणि गरोदर मातांना आजारापासून संरक्षित करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात ऑक्टोबर २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत ‘इंटेन्सीफाईड मिशन इंद्रधनुष्य’ ही विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितलं. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते आज बोलत होते. या मोहिमेत सर्वांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असं आवाहन डोंगरे यांनी केलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातील विकास कामं फक्त समन्वयाअभावी रखडली असून शासनानं मंजूर केलेल्या कामांना गती देऊन विकासाचा अनुशेष भरून काढण्याची सूचना शिवसेना उपनेते आणि खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांनीही परवानग्यांअभावी मूलभूत कामं थांबवू नका, असे आदेश दिले आहेत.

****

ठाण्याजवळ आसनगाव ते वासिंद दरम्यान दुरांतो एक्सप्रेसच्या काल झालेल्या अपघातानंतर या मार्गावरची रेल्वेवाहतुक अद्यापही सुरळीत झालेली नाही. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयानं काही रेल्वे गाड्या अंशत:  तर काही गाड्या पूर्णपणे रद्द केल्या आहेत. नांदेड - मुंबई तपोवन एक्स्प्रेस आज रद्द करण्यात आली असून, उद्या मुंबईहून सुटणारी तपोवन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. जालना - दादर जनशताब्दी एक्स्प्रेस आज दादर पर्यंत न जाता नाशिक रोडपयर्यंत धावली, तिथूनच ही गाडी परतणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते नांदेड ही गाडी आज तर, नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी उद्यासाठी रद्द करण्यात आली आहे.

****

भारताचा मुष्टीयोद्धा गौरव बिधुडीनं जर्मनीतील हॅम्बर्ग इथं सुरू असलेल्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या विजयानंतर बिधुडीनं भारतासाठी एक पदक निश्चित केलं आहे.

*****




AIR News Bulletin, Aurangabad 30.08.2017 13.00

Text-AIR News Bulletin, Aurangabad 30.08.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30AUG. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० ऑगस्ट २०१ दुपारी १.००वा.

****

दुरांतो एक्सप्रेसच्या काल झालेल्या अपघातानंतर या मार्गावरची रेल्वेवाहतुक अद्यापही सुरळीत झालेली नाही. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयानं काही रेल्वे गाड्या अंशत:  तर काही गाड्या पूर्णपणे रद्द केल्या आहेत. नांदेड - मुंबई तपोवन एक्स्प्रेस आज रद्द करण्यात आली असून, उद्या मुंबईहून सुटणारी तपोवन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. जालना - दादर जनशताब्दी एक्स्प्रेस आज दादर पर्यंत न जाता मनमाड इथूनच परतणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते नांदेड ही गाडी आज तर, नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी उद्यासाठी रद्द करण्यात आली आहे.

****

काल रात्रीपासून पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानं मुंबईचं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. रेल्वेची वाहतूक हळूहळू सुरळीत होत आहे. रस्त्यावर कालपासून बंद पडलेल्या वाहनांची गर्दी असल्यानं, रस्ते वाहतूक पूर्णतः सुरु होऊ शकलेली नाही. दरम्यान, हवामान खात्यानं आजही अतिवृष्टीचा इशारा दिलेला असल्यानं, मुंबईकरांनी आजही घराबाहेर पडू नये, असं आवाहन, राज्य सरकारनं केलं आहे.

****

उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडयात आज आणि उद्या अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिला, तर  गोदावरी पात्रात अतिरिक्त पाणी सोडलं जाणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी पुरापासून सावधगिरी बाळगावी तसंच नदीकाठाच्या गावांनी सावधानता बाळगावी, असं आवाहन औरंगाबाद जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

पैठणच्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी ७१ टक्के झाली असून, धरणात २६ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे.

****

केंद्र सरकारनं आधार कार्ड बनवण्याच्या मुदतीत येत्या ३१ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. महाधिवक्ता के.के.वेणुगोपाल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारतर्फे याबाबत स्पष्टीकरण दिलं. याप्रकरणाची सुनावणी तीन ऐवजी पाच न्यायाधीशांच्या पीठाद्वारे केली जावी अशी मागणी वेणुगोपाल यांनी केली. त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आधार प्रकरणाची सुनावणी करण्याचा निर्णय न्यायालयानं घेतला आहे.

****

गेल्या एक जुलैपासून लागू करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवाकर-जीएसटीच्या माध्यमातून एका महिन्यात अपेक्षेपेक्षा अधिक महसूल जमा झाला असल्याचं अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटलं आहे. करसंकलनाचं पहिलं विवरण प्रसिद्ध करताना त्यांनी ही माहिती दिली. जेव्हा सर्व करदाते आयकर परतावा भरतील तेव्हा भरपाई शुल्क घटल्यानंतरही अपेक्षित लक्ष्यापेक्षा अधिक महसूल जमा होईल असं ते म्हणाले.

****

औरंगाबाद शहरालगतच्या २६ गावांच्या झालर क्षेत्र विकास योजनेची मागील अकरा वर्षांपासून मंदावलेली प्रक्रिया गतिमान होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात यासंबंधी दाखल याचिका मागे घेतल्यानं आता विकास आराखडा प्रसिद्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरालगतच्या १५ हजार २४५ हेक्टर जागेच्या विकासाला हिरवा कंदील मिळाला आहे. विकास आराखडा संपूर्णतः तयार असून केवळ खंडपीठाच्या आदेशामुळे जाहीर करण्यावर बंधन होतं.

****

अंबाजोगाई येथील योगेश्वरी नूतन विद्यालयातील सहशिक्षक डॉ. कमलाकर कोंडिबा राऊत यांना सन २०१६ चा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्ली इथं विज्ञान भवनात हा पुरस्कार दिला जाणार आहे. पन्नास हजार रुपये रोख,  रौप्य पदक आणि गुणवत्ता प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कमलाकर राऊत यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

****

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या प्रक्रियेअंतर्गत औरंगाबाद तालुक्यातील १४ गावांचा अंतिम मोजणी अहवाल आगामी तीन दिवसांत प्राप्त होणार असून यानंतर सप्टेंबरमध्ये रजिस्ट्रीचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शशिकांत हतगल यांनी दिली. कर्जमाफीच्या अनुषंगानं राज्य रस्ते विकास महामंडळानं नुकत्याच जिल्हाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. यात शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कर्जाची रक्कम शिल्लक ठेवत उर्वरित रक्कम संबंधितांना देत जमिनीचं संपादन करण्याचं सांगितलं आहे. यामुळे समृद्धी महामार्गाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

****

केरळ येथील प्रसिद्ध ओणम फेस्टिवल करता दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड ते एर्नाकुलम दरम्यान विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १५ डब्यांची ही विशेष गाडी नांदेड इथून परवा एक सप्टेंबरला सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि काचीगुडा, रेनिगुंटा, एरोड मार्गे एर्नाकुलम इथं २ सप्टेंबरला दुपारी २ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी एर्नाकुलम इथून ४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता सुटेल आणि नांदेड इथं ६ सप्टेंबरला सकाळी साडेसहा वाजता पोहोचेल.

****

वार्षिक हज यात्रेला आजपासून प्रारंभ होत आहे. यादरम्यान जगभरातून लाखो मुस्लिम बांधव सौदी अरेबियातील मक्काची यात्रा करतील. यंदा भारतातून एक लाख सत्तर हजारांवर भाविक हज यात्रेला गेले आहेत.

****
















Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 30.08.2017 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

३० ऑगस्ट २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

काल रात्रीपासून पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानं मुंबईचं जनजीवन संथ गतीनं पूर्वपदावर येत आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक काही अंशी सुरळीत होत असून, मध्य रेल्वेची वाहतूक मात्र अजूनही पूर्णपणे बंद आहे. परळ, सायन इथं सखल भागात अद्यापही पाणी साचलेलं असल्यामुळे रस्त्यावरची वाहतूक पूर्णतः सुरु होऊ शकलेली नाही. दरम्यान, हवामान खात्यानं आजही अतिवृष्टीचा इशारा दिलेला असल्यानं, मुंबईकरांनी आजही घराबाहेर पडू नये, असं आवाहन, राज्य सरकारनं केलं आहे.

मुंबईतली पूर परिस्थिती हाताळण्यात आपत्कालीन व्यवस्थापन विभाग पूर्णपणे अपयशी ठरला असल्याचं, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. नाले रुंदीकरण आणि सांडपाणी व्यवस्थापनावर भ्रष्टाचार न करता प्रामाणिकपणे काम केलं असतं, तर मुंबईची अशी अवस्था झाली नसती, असंही निरुपम म्हणाले. 

****

सातारा जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. धरण व्यवस्थापनानं एक सप्टेंबर पर्यंत धरणात १०३ टीएमसी पाणीसाठा ठेवण्याचं निर्धारित केलं असून, सध्या धरणात ९७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर येत्या दोन दिवसात कोयना धरण ओसंडून वाहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यात जामखेड इथं आज आणि उद्या भटके विमुक्त अधिकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज दुपारी या परिषदेचं उद्घाटन होईल, 'गुन्हेगार जमाती कायदा आणि परिणाम' या विषयावर परिषदेत चर्चासत्र होणार असून, उद्या सकाळी भटके विमुक्त अधिकार फेरी तसंच जाहीर सभा होणार असल्याचं, आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे.

*****




Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date: 30 August 2017
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۳۰  ؍اگست  .۲۰۱۷؁ء
وقت : صبح  ۴۰-۸ سے  ۴۵-۸
 آج صبح ممبئی کے شہر یوں کے لیے کچھ راحت لائی جہاں زندگی کچھ حد تک معمول کی جانب رواں دواں ہے۔ممبئی،نئی ممبئی اور تھا نے میں کل موسلا دھار بارش کی وجہ سے عام زندگی پوری طرح مفلوج رہی۔ ممبئی میں کل دِن بھر میں298؍ ملی میٹر بارش درج کی گئی جو اگست1997؁ کے بعد سے ایک ہی دن میں ہوئی بارش کا اب تک کا ریکارڈ ہے۔ اِس بارش سے کئی نشیبی علاقوں میں اور  ریلوے لائنوں پر پانی بھر گیا جس سے مضا فا تی ریلوے نظام متا ثر رہا۔ تیز با رش کا اثر ہوائی خد مات پر بھی پڑا۔ سڑ کوں پر پانی جمع ہو جانے سے ٹریفِک نظام در ہم بر ہم ہو گیا۔ ممبئی کے وِکرولی میں2؍ مکا نوں کے منہدم ہو جانے سے 3؍ افراد کی موت واقع ہو گئی۔ تھا نے میں بھی
3؍ افراد پانی میں ڈوب گئے۔ ہمارے نمائندے نے خبر دی ہے کہ اِن میں سے 2؍ لو گوں کی نعشیں بر آمد کر لی گئی ہیں۔
 اِس بیچ وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے تیز بارش سے پیدا ہوئی صورتحال کا جائزہ لیا اور انتظا میہ کو ضروری ہدا یات دیں۔
پھڑ نویس نے کہا کہ صورتحال سے نِمٹنے کے لیے ریاستی حکو مت کوشش کر رہی ہے۔ جِس میں مرکزی حکو مت کی جانب سے ہر طرح کی مدد دستیاب ہے۔ قدر تی آ فات سے نِمٹنے کے مرکزی دستّے NDRF کی ٹیمیں ممبئی پہنچ گئی ہیں۔ اِس بیچ اگلے 24؍ گھنٹوں میں ممبئی شہر اور مضا فا ت میں تیز اور وسطی مہا راشٹر اور مراٹھواڑہ میں در میا نی در جے  تا مو سلا دھار بارش ہونے کی پیشن گوئی قُلا بہ دفتر موسمیات نے کی ہے۔
****************************
 مراٹھواڑہ میں بھی کل بارش کا سلسلہ جاری رہا۔ پر بھنی ضلع کے سیلو اور جِنتور تعلقوں سے اطمینان بخش بارش کی اطلاع ہمارے نمائندے نے دی ہے۔ اِس بارش سے سیلو -پاتھری شاہراہ پر ٹریفِک کی آ مد و رفت کچھ وقت کے لیے ٹھپ رہی۔ لاتور ضلع کے بیشر تعلقوں میں بھی کل دو پہر کے بعد سے بارش کا سلسلہ جا رہا۔
 اِس بیچ اورنگ آ باد کے پیٹھن کے جائیکواڑی ڈیم کا آ بی ذخیرہ 70؍ فیصد تک جا پہنچا ہے۔ ڈیم میں کل شام تک 31؍ ہزار گھن فٹ فی سیکنڈ کے حساب سے پانی کی آ مد کا سلسلہ جا ری تھا۔ ناسک ضلع میں ہو رہی زور دار بارش سے گو دا وری ندی کی سطح آب میں اضا فے کے اندیشے کے پیش نظر ندی کنا رے آ باد گائوں کو چو کس رہنے کو کہا گیا ہے۔
****************************
 احمد نگر ضلع کے نِمبوڑی میں ضلع پریشد اسکول کی چھت گر جانے سے ہلاک ہوئے3؍ طلباء کے سر پرستوں کے لیے ریاستی حکو مت نے فی کس 5؍ لاکھ روپیوں کی امداد کا اعلان کیا ہے۔ پیر کے روز ہوئی موسلادھار بارش سے ضلع پریشد اسکول کی چھت گر پڑی تھی جِس میں پانچو یں جماعت کے 3؍ طلباء کی موت واقع ہو گئی تھی۔ حادثے میں زخمی ہونے والے طلباء کے علاج کے اخر اجات بھی ریاستی حکو مت بر داشت کرے گی۔ احمد نگر کے رابطہ وزیر رام شِندے نے اسکول کے ڈھانچے کی جانچ کے لیے Structural Auditکر نے کی ہدا یت دی ہے۔
****************************
 دسویں جماعت کے لیے ہوئےRe-examکے نتیجوں کا کل اعلان کیا گیا۔
نتیجوں کے مطا بق ریاست بھر سے24.44؍ فیصد طلباء کامیاب قرار دیئے گئے ہیں۔ ناگپور ڈِویژن میں سب سے زیادہ31؍  فیصداور کو کن ڈِویژن میں سب سے کم 13؍ فیصد طلباء کامیاب ہوئے ہیں۔  اورنگ آباد ڈِویژن سے کامیاب ہونے والے طلباء کا تنا سب 24؍ فیصد رہا۔جبکہ لاتور ڈِویژن سے26؍ فیصد طلباء کو کامیاب قرار دیا گیا۔ کامیاب ہوئے طلباء فوراً ہی گیارہویں جماعت کے لیے جا ری داخلہ جاتی عمل میں شر کت کرنے کے اہل ہو ں گے۔
****************************
 ہر یا نہ میں ڈیرہ سچّا سودا کے حا میوں کی جانب سے کی جا رہی ہنگا مہ آ رائی کی وجہ سے پیدا ہوئی امن و امان کی کشیدہ صورتحال کے پیش نظر ہنگو لی -آکولہ سے گذر نے والی ناندیڑ-امرتسر سچکھنڈ ایکسپریس آج ردّ کر دی گی ہے۔ البتّہ  اورنگ آ باد -منماڑسے گذرنے والی ناندیڑ- امرتسر سچکھنڈ ایکسپریس آج اپنے مقررہ وقت پر چلے گی۔ جنوب وسطی ریلوے کے ذرائع نے بتا یا کہ امرتسر سے ناندیڑ کے لیے آنے والی اور منماڑ-اورنگ آباد سے گذر نے والی سچکھنڈ ایکسپریس کل منسوخ کر دی گئی تھی اسلیے یہ ٹرین آج ناندیڑ لائن پر دستیاب نہیں ہو گی۔
****************************
 طِبّی تعلیم کے ریاستی وزیر گریش مہا جن نے اعلان کیا ہے کہ ہر سال29؍ اگست کو اِنسا نی اعضاء کے عطیہ جات کے دن کے طور پر منا یا جائے گا۔ اِس ضمن میں کل ممبئی  میں منعقدہ ایک قریب  میں مہا جن بول رہ تھے۔ اُنھوں نے کہا کہ انسانی اعضاء کے عطیہ دینے کے معاملے میں مہا راشٹر چھٹے نمبر سے دوسرے نمبر پر پہنچ گیا ہے۔ اُنھوں نے امید ظاہر کی کہ جلد ہی مہا راشٹر اِس معاملے میں ملک میں اوّل مقام حاصل کر لے گا۔ مراٹھواڑہ میں کئی مقا مات پر کل اعضاء کے عطیہ کر نے کے بارے میں بیداری پیدا کر نے کے مقصد سے جلوس نکالے گئے۔ اورنگ آ باد میں رکن اسمبلی اتُل ساوے کی مو جود گی میں گورنمنٹ میڈیکل کالج اور اسپتال گھاٹی سے جلوس نکا لا گیا۔
****************************
 صدر جمہوریہ رامناتھ کو وِند نے کل کھیلوں کے قو می دن کے موقع پر راشٹر پتی بھون میں ایک خصو صی تقریب میں کھیلوں کی سر کر دہ شخصیات کو راجیو گا ندھی کھیل رتن ،ارجُن اور درونا چاریہ ایوارڈ سے نوازا۔ پارہ اولمپین Devendra Jhajharia اور ہا کی کے کھلا ڑی سر دار سنگھ کو
راجیو گاندھی کھیل رتن ایوارڈ سے سر فراز کیا گیا ہے۔ ایوارڈ حاصل کرنے والوں میں کر کٹ کھلاری ہر من پریت کوَر،
پا رہ ایتھلیٹ Mariyappan Thangavelu  ،گولف کھلاڑ ی  SSP Chawrasia،پہلوان Satyawart Kadian ،
 ایتھلیٹKhushbir Kaurاور تیر انداز  وی ۔ جے۔ سُریکھا شامل ہیں۔
****************************
 کھیلوں کے قو می دن کے موقع پر کل اورنگ آ باد میں بھی مختلف تقریبات کا انعقاد کیا گیا۔ اورنگ آباد میں کل صبح کرانتی چوک سے اسکو لی طلباء کا جلوس نکا لا گیا اور ہاکی کے ما یہ ناز کھلاڑی دھیان چند کو اُنکی جینتی کے موقع پر خراج عقیدت پیش کیا گیا۔
****************************

AIR News Urdu Bulletin, Aurangabad/ Date: 30.08.2017, Time: 8.40-8.45 AM


AIR News Bulletin, Aurangabad 30.08.2017 06.50

Text-AIR News Bulletin, Aurangabad 30.08.2017 06.50




Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 AUG. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

                                       Language Marathi      

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प; मराठवाड्यातही पावसाचा जोर कायम

** दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर; राज्यभरातून २४ पूर्णांक ४४ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण 

** नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसचे नऊ डबे ठाण्याजवळ घसरले; या मार्गावरची रेल्वे वाहतुक पूर्णपणे विस्कळीत

आणि

** अवयवदानाबाबत जागृती करण्यासाठी काल सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन 

****

मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात काल मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. मुंबईत काल दिवसभरात २९८ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला, ऑगस्ट १९९७ नंतरचा एका दिवसातला पावसाचा हा उच्चांक आहे. या पावसामुळे अनेक सखल भागांसह रेल्वे मार्गावर पाणी साचल्यानं, उपनगरी रेल्वेसेवा विस्कळीत झाली, दृश्यमानता कमी असल्यानं, विमानसेवेवरही परिणाम झाला. रस्त्यावरही अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं, वाहतुकीची कोंडी झाली होती. विक्रोळीत दोन घरं कोसळल्यानं तीन जणांचा मृत्यू झाला. ठाण्यातही तीन जण पाण्यात बुडाले, यापैकी दोघांचे मृतदेह सापडल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन, आवश्यक ते निर्देश दिले. परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, केंद्र शासनामार्फत सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.  नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.

मराठवाड्यात कालही पावसाचा जोर कायम राहिला. परभणी जिल्ह्यात कालही जोरदार पाऊस झाला, सेलू, जिंतूर तालुक्यात चांगला पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या पावसामुळे सेलू पाथरी मार्गावरची वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. लातूर जिल्ह्यातही काल पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. जिल्ह्याच्या बहुतेक सर्व तालुक्यात काल दुपारनंतर पाऊस झाला. आतापर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 63 टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. उस्मानाबाद इथंही मोठा पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या पावसानं भूजल पातळीत वाढ होत असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटला असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

पैठणच्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा ७० टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणात काल सायंकाळी ३१ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू होती. नाशिक जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम असल्यानं, गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जायकवाडी धरणातली पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यात उमरी शहराला पाणी पुरवठा करणारा कुदळे मध्यम प्रकल्प काल पूर्ण क्षमतेनं भरून ओसंडून वाहत होता. सिध्देश्वर धरणातला पाणी साठा २४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या निंबोडी शाळा दुर्घटनेतल्या मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना राज्यशासनानं पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. जिल्हा परिषदेच्या या शाळेचं छत परवा अतिवृष्टीमुळे कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाचव्या वर्गातल्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत जखमी विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्यात येणार असून, शाळेचं संरचनात्मक परीक्षण करण्याचे आदेश अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले आहेत.

****

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवा संचालनालयातल्या ७३८ अस्थायी ब गट वैद्यकीय अधिकाऱ्यांचं रिक्त असलेल्या नियमित पदांवर विशेष बाब म्हणून कायमस्वरुपी एकवेळचे समावेशन करण्यास मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. सध्या आरोग्य विभागाकडे नियमित आस्थापनेवर मंजूर एक हजार ६६ पदांपैकी चारशे ४८ पदं रिक्त आहेत.

****

राज्यातल्या ग्रामपंचायतीच्या रपंचाची थेट जनतेतून निवड करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८च्या संबंधित कलमांमध्ये धारणेसह अध्यादेक्ष पुनर्रप्रस्थापित करण्यासही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 

****

दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत राज्यभरातून २४ पूर्णांक ४४ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नागपूर विभागातून सर्वाधिेक ३१ टक्के तर कोकण विभागातून सर्वात कमी १३ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. औरंगाबाद विभागातून २७ टक्के तर लातूर विभागातून २६ पूर्णांक १० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लगेचच अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसचे नऊ डबे काल सकाळी ठाण्याजवळ आसनगाव ते वासिंद दरम्यान घसरले. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही, मात्र या मार्गावरची रेल्वे वाहतुक पूर्णपणे विस्कळीत झाली. अपघातानंतर या मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्या अंशत: तर काही गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या. काही रेल्वेगाड्यांचे मार्ग वळवण्यात आले. मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस पुणे, दौंड मार्गे वळवण्यात आली, नांदेड ते मुंबई तपोवन एक्स्प्रेस काल औरंगाबाद पर्यंत तर जनशताब्दी एक्सप्रेस मनमाडपर्यंत धावली, मुंबईहून सुटणारी जनशताब्दी, नंदिग्राम आणि देवगिरी एक्स्प्रेस रद्द काल करण्यात आल्या. मुंबईहून आज सुटणारी तपोवन एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे, नागपूर मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस तसंच सिकंदराबाद मुंबई देवगिरी एक्सप्रेस काल औरंगाबाद पर्यंतच धावल्या, देवगिरी एक्सप्रेस आज औरंगाबादहून नियमित वेळेवर सिकंदराबादकडे प्रस्थान करेल. मुंबई मार्गावरची रेल्वे वाहतुक सुरळीत होण्यासाठी किमान एका दिवसाचा अवधी लागेल, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान हरियाणात डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांच्या आंदोलनानंतर उद्भवलेल्या कायदा आणि सुरक्षेच्या समस्येमुळे हिंगोली अकोला मार्गे जाणारी नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज रद्द करण्यात आली आहे, मात्र औरंगाबाद, मनमाड मार्गे धावणारी नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आज आपल्या नियमित वेळेवर धावणार आहे. अमृतसर हून नांदेड कडे येणारी मनमाड औरंगाबाद मार्गे धावणारी सचखंड एक्सप्रेस काल रद्द करण्यात आल्यानं, ही गाडी आज नांदेडमार्गावर धावणार नसल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

*****

२९ ऑगस्ट हा दिवस अवयवदान दिवस म्हणून साजरा करण्यात येईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केली आहे. ते काल मुंबईत या अनुषंगानं आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अवयवदानात महाराष्ट्रानं देशात सहाव्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली असून, लवकरच राज्य पहिल्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.

मराठवाड्यात अनेक ठिकाणी काल संदेश फेरी काढून अवयवदानाबाबत जागृती करण्यात आली. औरंगाबाद इथं आमदार अतुल सावे यांच्या उपस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटी इथून या फेरीला प्रारंभ झाला. या अनुषंगानं जालना इथंही संदेश फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी या फेरीला हिरवा झेंडा दाखवला.

लातूर इथंही या निमित्त संदेश फेरी काढण्यात आली. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसह शालेय विद्यार्थी या संदेश फेरीत सहभागी झाले होते.

नांदेड इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी या फेरीला हिरवा झेंडा दाखवला. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी या फेरीत पथनाट्याच्या माध्यमातून अवयवदानाबाबत जागृती केली.

****

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त काल सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबाद इथं सकाळी क्रांती चौकातून शालेय विद्यार्थ्यांनी अभिवादन फेरी काढून हॉकीपटू ध्यानचंद यांना जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली.

****

गणपती पाठोपाठ काल सायंकाळी घरोघरी ज्येष्ठा गौरींचं आगमन झालं. पारंपरिक पद्धतीनुसार घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींची स्थापना झाली. काल दुपारनंतर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं, गौरी पुजनासाठी खरेदी करणाऱ्या भाविकांची तारांबळ उडाली. आज ज्येष्ठा गौरीपूजन. घराघरात उत्सवाच्या वातावरणात गौरींच्या महाप्रसादाची तयारी सुरू आहे.

****

औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघ महानंदनं दुधाच्या विक्री दरात प्रतिलीटर चार रुपयांनी कपात केली आहे. परवा एक सप्टेंबरपासून महानंद दूध ४० रुपये प्रतिलीटर दरानं मिळणार आहे. सणासुदीच्या दिवसात दुधाची मागणी पाहता, दरकपात केल्याचं, दूधसंघाकडून सांगण्यात आलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात मुरूम आष्टा कासार रस्त्यावर दोन  दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन जण जागीच ठार तर एक जण जखमी झाला. काल दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद नजीक काल खासगी प्रवासी जीप आणि दोन दुचाकीच्या अपघातात तीन जण ठार तर आठ जण जखमी झाले, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

****