Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 AUG. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.
****
·
गणेशोत्सवाला सर्वत्र उत्साहात
प्रारंभ
·
पंजाब तसंच हरियाणात उद्भवलेल्या तणावामुळे अनेक
रेल्वेगाड्या रद्द
·
ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहित
करण्यासाठी शिक्षण संस्थांनी कार्य करावं - ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर गंगाधर पानतावणे
यांचं आवाहन
आणि
·
पी.व्ही. सिंधूची जागतिक
बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यफेरीत धडक
****
गणेशोत्सवाला
काल सर्वत्र भक्तीभावानं उत्साहात प्रारंभ झाला.घरोघरी पार्थिव गणेशाची स्थापना केल्यानंतर
दुपारनंतर सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींची ढोल ताशाच्या गजरात स्थापना झाली.औरंगाबाद
इथं जिल्हा गणेश महासंघ उत्सव समितीच्या गणेशमूर्तीची स्थापना खासदार चंद्रकांत खैरे
यांच्या हस्ते करण्यात आली. लोकसहभागातून विविध उपक्रम राबविणाऱ्या औरंगाबाद गणेश महासंघाच्या
वतीनं येत्या पाच सप्टेंबर पर्यंत गणेशोत्सव काळात विविध स्पर्धा तसंच जनजागृती कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे.
जालना इथं गणेश महासंघाच्या
कार्यालयाचं उदघाटन तसंच गणेश मूर्तीची स्थापना राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता
मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे हस्ते करण्यात आली. नगराध्यक्षा
संगीता गोरंट्याल यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
परभणी इथं मनपा आयुक्त राहुल
रेखावार यांच्या हस्ते परभणी फेस्टीवल मध्ये गणेश स्थापना करण्यात आली.गणेशस्थापनेच्या
वेळी पावसाचं आगमन झाल्यानं, भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.लातूर जिल्ह्यात यंदा डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न होत
आहे.काल गणेश स्थापनेच्या मिरवणुकीत ढोल ताशा सोबतच हलकीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत
असल्याचं दिसून आलं.जिल्ह्यात उदगीर, देवणी भागात गणेश स्थापनेच्यावेळी पावसानं हजेरी
लावली.लातूर इथं नागरिकांकडून मातीच्या गणेश मूर्तींना चांगली मागणी दिसून आल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं.
उस्मानाबाद शहर परिसरातही
पावसाच्या हलक्या सरीत गणरायाचं आगमन झालं.सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी
वाजत गाजत मिरवणुका काढून गणेश मुर्तींची स्थापना केली.बीड इथंही काल पाऊस झाला, या
पावसातही गणेश भक्तांचा उत्साह पहायला मिळाला, नांदेड जिल्ह्यात सर्वच ठिकाणी उत्साहात
पारंपरिक पद्धतीनं गणेश स्थापना करण्यात आली.सुमारे एक हजार सार्वजनिक गणेश मंडळांनी
गणेशमूर्तींची स्थापना केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल
महात्मा गांधी मालिकेतल्या २०० तसंच ५० रुपये मूल्याच्या नव्या नोटा चलनात आणल्या.
गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असलेल्या या नोटा बँकेच्या ठराविक कार्यालयांमध्ये
आणि काही बँकांमध्ये उपलब्ध होणार आहेत, या नोटांचा पुरवठा लवकरच वाढवणार असल्याचं,
पटेल यांनी सांगितलं. २०० रुपये मुल्याच्या गडद पिवळ्या रंगाच्या या नोटेवर देशाच्या
सांस्कृतिक वारशाचं प्रतीक असलेल्या सांची स्तुपाचं चित्र आहे.
****
देशात रोजगाराच्या
संधी उपलब्ध होण्यासाठी समुद्र किनारपट्टीवर ‘कोस्टल एम्लॉयमेंट झोन’ तयार करण्याचा
सल्ला निती आयोगानं सरकारला दिला आहे. या झोनमध्ये दहा हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध
करुन देणाऱ्या कंपन्यांना तीन वर्ष आणि वीस हजार नोकऱ्यांची संधी देणाऱ्या कंपन्यांना
सहा वर्षापर्यंत वस्तू आणि सेवाकरामध्ये सवलत देण्यात यावी, तसंच पाच वर्षापर्यंत कॉर्पोरेट
करापासूनही सूट देण्यात यावी असंही आयोगानं सुचवलं आहे.
****
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख
बाबा राम रहीम गुरमीत सिंग याच्यावर एका लैंगिक अत्याचार प्रकरणात १५ वर्षानंतर आरोप
सिद्ध झाले आहेत. हरियाणात पंचकुला इथं केंद्रीय गुन्हे अन्वेषण - सीबीआय न्यायालयानं
काल हा निर्णय दिला. हा निर्णय जाहीर होताच, डेरा समर्थकांनी हरियाणासह पंजाब तसंच
दिल्लीत अनेक ठिकाणी उग्र निदर्शनं केली.अनेक ठिकाणी निदर्शनांना हिंसक वळण लागलं.या
मध्ये २९ जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे शंभरावर लोक जखमी झाले.हिंसाचार करणाऱ्या जवळपास
साडे पाचशे जणांना अटक करून शस्त्रं तसंच दारुगोळा जप्त केल्याचं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे. डेरा सच्चा सौदाची संपत्ती जप्त करून, या हिंसाचारात झालेलं सार्वजनिक
मालमत्तेचं नुकसान भरून काढण्याचे निर्देश पंजाब हरियाणा उच्च न्यायालयानं दिले आहेत.
पंजाब
तसंच हरियाणात उद्भवलेल्या या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंडळानं ४४५ रेल्वेगाड्या
रद्द केल्या.यामध्ये नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेस आणि
नांदेड उना हिमाचल नांदलगम एक्सप्रेस या रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. शिर्डी इथून निघणारी
साईनाथ शिर्डी-कालका एक्सप्रेससह मनमाड - भुसावळकडून दिल्लीकडे जाणाऱ्या अनेक गाड्या
सुरक्षेच्या दृष्टीनं रद्द केल्याचं रेल्वेच्या सूत्रांनी सांगितलं.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३५वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व
वाहिन्यांवरुन सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्यात सुमारे पंधरा हजार नागरी सहकारी पतसंस्थेतल्या एक लाख रुपयांपर्यंतच्या
ठेवींना संरक्षण देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचं, सहकार मंत्री सुभाष
देशमुख यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात यासंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते.या पतसंस्थांमध्ये
सुमारे २५ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत, सहकार विकास महामंडळामार्फत या ठेवींना
संरक्षण देण्यासाठी पतसंस्थांनीही तयारी दर्शवली आहे.
****
ग्रामीण
भागात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं
असून, विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी शिक्षण संस्थांनी कार्य
करण्याचं आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी केलं आहे. लोकसभेचे
माजी सदस्य बाबुराव काळे यांच्या ९२ व्या जयंत्तीनिमित्त काल औरंगाबाद इथं जवाहरलाल
नेहरू महाविद्यालयात आयोजित ‘आधुनिक महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात खाजगी संस्थांचं
योगदान’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. शिक्षणाचं मोठ्या प्रमाणात व्यावसायिकरण
झालं आहे.तरी शिक्षणाचा मुळ स्त्रोत कुठेही क्षीण झाला नसल्याचं पानतावणे म्हणाले.
विधान सभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या चर्चासत्राचं उद्धाटन झालं, सद्यस्थितीत
विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता वाढवण्याची गरज असून, हे उद्दिष्ट समोर ठेऊन शिक्षण
संस्थांनी कार्य करणं आवश्यक असल्याचं बागडे म्हणाले.
****
बॅटमिंटनपटू पी.व्ही.सिंधूनं जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यफेरीत
धडक देत आपलं पदक निश्चित केलं आहे.काल झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात सिंधूनं चीनच्या
सून यू हिच्यावर २१-१४, २१-९ असा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला.पुरुष एकेरीत किदाम्बी
श्रीकांत याचं आव्हान मात्र काल संपुष्टात आलं.उपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतचा १४-२१,
१८-२१ असा पराभव झाला.
****
यवतमाळ
जिल्ह्यात उमरखेड हदगाव मार्गावर पैनगंगा नदीत चारचाकी कोसळून, तीन जणांचा मृत्यू झाला.विदर्भ
आणि मराठवाड्याच्या सीमेवर मार्लेगाव इथं काल सकाळी पैनगंगा
नदीच्या पुलावर एका ट्रकने या कारला धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली.मृतांमध्ये
परभणी इथं वजन मापे विभागात कार्यरत निरीक्षक ज्ञानेश्वर गोटे, त्यांच्या पत्नी रत्ना
गोटे आणि वाहनचालक यांचा समावेश आहे.
****
नांदेड जिल्ह्यात देगलूर इथले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गंगाराम शेळके यांचं काल
निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते.काल सायंकाळी देगलूर इथं त्यांच्या पार्थिव देहावर
अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
लातूर जिल्ह्यातला लष्करी जवान रामनाथ हाके याचं पश्चिम बंगाल मध्ये सिलीगुडी इथं
कर्तव्य बजावत निधन झालं.रामनाथ यांचा पार्थिवदेह आज विमानानं पुणे इथं आणला जाणार
असून, उद्या सकाळी मष्णेरवाडी या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
जैन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी बीड इथं जैन समाजातर्फे
करण्यात आली आहे.यासंदर्भात काल उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. राऊत यांनी
परवा गुरुवारी मुंबई इथं पत्रकार परिषदेत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.
****
No comments:
Post a Comment