Sunday, 31 December 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 31.12.2017 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 December 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

सेवा हमी कायद्यानं जनतेला मालक बनवलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज नांदेड जिल्ह्यात कंधार तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. जनतेची कामं विहित मुदतीत झाली नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची तरतूद या कायद्यात असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...

 तुमच्या कामाचा निपटारा जर झाला नाही.तर तुम्ही एक तक्रार करायची तुमची पहिली तक्रार केल्या बरोबर जो अधिकारी आहे त्याला पाचशे रूपयांचा दंड.दुसरी तक्रार केली तर पाच हजार रूपयांचा दंड.आणि वारंवार एखादा अधिकारी अशा प्रकारे लोकांच्या कामाला वेळेमध्ये निपटारा करत नसेल तर अशा अधिकाऱ्याला घरचा रस्ता दाखवण्याची देखील व्यवस्था या कायद्याच्या माध्यमातून झाली.त्यामुळे या कायद्याने जनतेला मालक बनवलं आहे. आणि प्रशासनाला उत्तरदायित्व देऊन खऱ्या अर्थानं तुमचं नौकर बनवलं आहे.

शीख धर्मियांचे दहावे गुरू गोविंदसिंह यांची तीनशे एक्कावन्नावी जयंती प्रकाशपर्व निमित्तानं सचखंड गुरूद्वारा परिसरात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून मुख्यमंत्री दुपारच्या सुमारास मुंबईकडे रवाना झाले.

****

मुंबईतल्या कमला मील अग्निकांड प्रकरणातल्या आरोपींना मदत केल्याच्या कारणावरून पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. राकेश संघवी आणि आदित्य संघवी, अशी या दोघांची नावं असून, संबंधित पबमालकाला आश्रय दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

दरम्यान, नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमात सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्यास, तत्काळ कारवाईचा इशारा पोलिस विभागानं हॉटेलमालक तसंच मेजवानी आयोजकांना दिला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी ३० हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.



नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह राज्यभरात जोरदार तयारी सुरू आहे. सर्वत्र हर्षोल्हासाचं वातावरण आहे. कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांसह पर्यटकांनी महाबळेश्वर, पाचगणी तसंच गोव्यातही मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी राज्यातल्या जनतेला नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी २०१८ हे वर्ष नागरिकांना सुख, समाधान आणि भरभराटीचं जावो, तसंच आपलं राज्य प्रगतीच्या वाटेवर सातत्यानं अग्रेसर राहो, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला औरंगाबादसह मराठवाड्यात सर्वच ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद इथं आज विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्या आठ जणांवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली आहे. यावेळी विदेशी मद्यासह काही साहित्य ताब्यात घेण्यात आलं. सिडको एन तीन परिसरातल्या एका हॉटेलमध्ये अवैध मद्य विक्री करण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्यानंतर संबंधित हॉटेलवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.

****

शाकंभरी नवरात्रोत्सवात आज पाचव्या दिवशी श्री क्षेत्र तुळजापूर इथं तुळजाभवानी मातेची भवानी तलवार अलंकार महापूजा बांधण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांनी अर्पण केलेले दागिने देवीला घालण्यात आले.

****

भंडारा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी नागझिरा परिसरातल्या पिटेझरी या गावालगत नक्षली बॅनर लावले आहेत. यावर वेगवेगळ्या घोषणा लिहून त्यांनी नागझिरा बंदची हाक दिली आहे. यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागझिरा परिसर पोलिसांनी नक्षलमुक्त केला होता, मात्र आता परत अशा प्रकारचे बॅनर लागल्यामुळे, ते कुठल्या नक्षली गटानं लावले, याचा तपास पोलिस करत आहेत.

****

जम्मू काश्मीरमधल्या पूलवामा जिल्ह्यात लथेपोरा परिसरात केन्द्रीय राखीव पोलिस दलाच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्मा जवानांची संख्या चार झाली आहे. गंभीर जखमी झालेल्या तीन जवानांचा उपचारादरम्यामृत्यू झाला. या चकमकीत आणखी तीन जवान जखमी झाले, तर एक दहशतवादी ठार झाला. आज पहाटे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. ही चकमक अद्यापही सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यानं आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यावेळी झालेल्या गोळीबारात एका भारतीय जवानाला वीरमरण आलं.    

//*******//

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 31.12. 2017 17.25

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 31.12.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 December 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३ डिसेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****

आगामी स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगानं दिल्लीत युवकांच्या अभिरूप संसदेचं आयोजन करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रम श्रृंखलेच्या आजच्या ३९ व्या भागात देशवासियांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी या अभिरूप संसदेत देशभरातल्या प्रत्येक जिल्ह्यातून १८ ते २५ वर्ष वयोगटातून एक तरूण प्रतिनिधी निवडून द्यावा, आणि नवभारताच्या निर्माणासाठी आवश्यक मुद्यांवर या संसदेत चर्चा घडवून आणावी, असं आवाहन केलं. २१ व्या शतकात जन्मलेल्या आणि नव्या वर्षात मतदानास पात्र होणाऱ्या तरुणांचं अभिनंदन करताना, पंतप्रधानांनी, सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी मतहे सर्वात प्रभावी साधन असल्याचं म्हटलं. उत्साह, सकारात्मकता, नवभारत, स्वच्छता, आदी मुद्यांवर पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भर दिला.

केरळच्या शबरीमला मंदिरात सुरू करण्यात आलेल्या ‘पुण्यम पुन्कवाणम’ या स्वच्छता उपक्रमाचा उल्लेख करून, पंतप्रधानांनी महात्मा गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीपर्यंत स्वच्छ भारताचं स्वप्न साकारण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. चार जानेवारीपासून सुरू होणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणाबाबतही त्यांनी माहिती दिली. स्वच्छ शहरांच्या क्रमवारीत आपल्या शहरानं वरचा क्रमांक मिळवावा, यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

मुस्लिम महिलांना हज-यात्रेला जाण्यासाठी महरम अर्थात पुरुष नातेवाईकाची सोबत बंधनकारक करणारा ७० वर्ष जुना नियम अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयानं रद्द केल्यामुळे यंदा सुमारे तेराशे मुस्लीम महिलांनी हजयात्रेसाठी अर्ज केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. या महिलांना लॉटरीपद्धत वगळून हजयात्रेची परवानगी द्यावी, असंही पंतप्रधान म्हणाले.

येत्या प्रजासत्ताक दिनी, सर्व दहा आसियान देशांचे नेते प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सूर्याच्या उत्तरायणात प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर देशभरात साजऱ्या होणाऱ्या संक्रांत, लोहडी, बिहू, पोंगल आदी सणांनिमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

प्रसिद्ध तमिळ अभिनेते रजनीकांत हे राजकारणात येणार असून, त्यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. चेन्नई इथं ते आज वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातल्या विधानसभेच्या सर्व २३४ जागांवर त्यांचा पक्ष निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्षाची घोषणा केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि प्रगती हे आपल्या पक्षाचं घोषवाक्य असेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

जम्मू काशमीरमधरल्या पूलवामा जिल्ह्यात लथेपोरा परिसरात केन्द्रीय राखीव पोलिस दलाच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या गोळीबारात एक जवान हुतात्मा, तर दोन जवान जखमी झाले. हुतात्मा जवानाचं नाव सैफुद्दीन गनई असं असून, ते श्रीनगरमधल्या नौगाम इथले रहीवासी होते. दहशवाद्यांनी आज पहाटे छावणीत शिरुन अंदाधुंद गोळीबार केला. अजूनही दोन दहशतवादी या भागात असून, विशेष कमांडो पथक घटनास्थळी दाखल झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पाकिस्तानातली दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अफवांवर आळा घालण्यासाठी पूलवामा जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. नौशेरा भागातही पाकिस्ताननं सीमेपलिकडून केलेल्या गोळीबारात एक जवान हुतात्मा झाल्याचं वृत्त आहे

****

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन प्रक्रियेला जालना जिल्ह्यात गती मिळत आहे. जालना आणि बदनापूर तालुक्यातल्या नऊ शेतकऱ्यांच्या आठ हेक्टर ६६ गुंठे जमीन खरेदीची प्रक्रिया काल पूर्ण करण्यात आली. जिल्ह्यातल्या २५ गावांमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी चारशे चाळीस हेक्टर जमिनीचं संपादन केलं जाणार असून, आजपर्यंत ३४ टक्के जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती, रस्ते विकास महामंडळाच्या शिबीर कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

****

लातूर इथं आज ग्रीन लातूर रन लातूर मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. खासदार सुनील गायकवाड, पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. परभणी, अहमदनगर, कोल्हापुर, वाशीम, नांदेड या जिल्ह्यातले धावपटू या स्पर्धेत विजयी झाले. हरित लातूरसाठी जनजागृती, हा या मॅरेथॉनचा उद्देश असल्याचं संयोजक अजय गोजमगुंडे यांनी सांगितलं.

****

रियाध इथं काल झालेल्या जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यानं कांस्य पदक पटकावलं. दोन दिवसांपूर्वी झालेल्या जलद प्रकारात विश्वनाथननं सुर्वणपदक पटकावलं होतं. सामन्याच्या अखेरच्या दिवशी नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन यानं १६ गुणांनी सामना जिंकला.

//********//


Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date: 31 December 2017
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  31؍دسمبر  ۲۰۱۷؁ء
وقت : صبح  ۴۰-۸ سے  ۴۵-۸
 فلم سرٹیفکیشن کے مرکزی بورڈ نے کچھ تبدیلیوں کے ساتھ سنجے لیلابھنسالی کی فلم ’پدماوتی ‘کومنظوری دینے کافیصلہ کیاہے۔جمعرات کوسینسر بورڈ کی جائزہ کمیٹی کی میٹنگ کے بعدیہ فیصلہ کیاگیا۔اس فلم کوUA سرٹیفکیٹ دیاگیاہے۔
 فلم سرٹیفکیشن کے مرکزی بورڈ نے ایک بیان میںکہا ہے کہ مطلوبہ بدیلیاں کیے جانے اوراس کی حتمی شکل پیش کئے جانے کے بعد ضابطوں کے مطابق سرٹیفکیٹ جاری کیاجائے گا۔
 ہمارے نامہ نگارنے بتایا ہے کہ سرٹیفکیشن بورڈ نے فلم کے ٹائٹل میںتبدیلی کے ساتھ ساتھ تقریباً 26؍ مناظر ہٹائے جانے کے لئے کہاہے۔
****************************
 مہاراشٹر میںکملاملس کمپائونڈ میںآگ لگنے کے واقعے میں14؍افرادکی موت ہونے کے ایک دن بعدممبئی عظمیٰ میونسپل کارپوریشن نے غیر قانونی تعمیرات کی بناء پرریستوران اورایک Pub کے خلاف تین نئی ایف آئی آردرج کی ہیں۔
 Pub کے دوساتھی مالکان کے خلاف لُک آئوٹ نوٹس جاری کیے گئے ہیں۔ممبئی کے میونسپل کارپوریشن نے غیر قانونی ریستوران کے خلاف اپنی کاروائی شروع کردی ہے اورغیر قانونی تعمیرات کومنہدم کرناشروع کردیاہے۔
****************************
 پانی کی پیداواراورانتظام بیش بہا ہے۔یہ بات وسنت رائو نائیک مراٹھواڑہ زرعی یونیورسٹی کے وائس چانسلرڈاکٹر بی ۔وینکٹیشورلونے کہی ہے۔ پربھنی میںمنعقد18؍ویں ریاستی آبپاشی کانفرنس کی افتتاحی تقریب سے وہ کل مخاطب تھے۔پانی کی پیداواریہ نیا تصوّر تمام ملک میں شروع ہوگیاہے۔ پنجاب رائو زرعی یونیورسٹی کے وائس چانسلر ڈاکٹر وی ایم بھالے اس موقع پرموجودتھے۔زرعی، آبپاشی، صنعت وغیرہ شعبوں میںنمایاں کارکردگی انجام دینے والے افرادکااس موقع پرخیرمقدم کیاگیا۔آج کانفرنس کااختتام عمل میںآئے گا۔
****************************
 وزیراعلیٰ دیویندرپھڑنویس آج ناندیڑکے دورے پرتشریف لارہے ہیں۔صبح دس بجے کے قریب وزیراعلیٰ بذریعہ طیارہ ناندیڑ آئیںگے۔ قندھارتحصیل آفس کی نئی عمارت کاافتتاح وزیراعلیٰ کے ہاتھوں عمل میںآئے گا۔گروگوویند سنگھ کی جینتی کے سلسلے میںناندیڑ کے سچکھنڈ گرودوارے کے احاطے میںمنعقدپروگرام میںوزیراعلیٰ موجودرہیںگے۔
****************************
 وزیراعظم نریندرمودی آج صبح 11؍بجے آکاشوانی پرمن کی بات پروگرام میںسامعین کے ساتھ تبادلہ خیال کریںگے۔ من کی بات پروگرام کا یہ 39؍واں ایڈیشن آکاشوانی اوردوردرشن کے تمام نیٹ ورک پرنشرکیاجائے گا۔یہ پروگرام وزیراعظم کے دفتر اوروزارت اطلاعات ونشریات کے You Tube چینلوں اوردوردرشن نیوزپربھی دستیاب ہوگا۔آکاشوانی ،ہندی نشریہ کے فوراً بعدیہ پروگرام علاقائی زبانوں میںبھی نشر کرے گا۔علاقائی زبانوں میںیہ پروگرام رات بجے 8؍بجے دوبارہ نشرکیاجائے گا۔
****************************
 مشہورگلوکارہ آشالتاکرل گیکرکل صبح اورنگ آبادمیںطویل علالت کے باعث چل بسی۔وہ 75؍برس کی تھیں۔ اُنہوںنے پنڈت بھیم سین جوشی،پنڈت سامتاپرسادسمیت موسیقی کے شعبے کے کئی اہم شخصیتوں کے ساتھ ملک وبیرون ملک کئی پروگرامس میںگلوکاری کے جوہردیکھائے تھے۔
 ان کے جسدِخاکی پرکل اورنگ آباد میںآخری رسومات اداکردی گئی۔
****************************
 ناندیڑ۔واگھیلامیونسپل کارپوریشن کے اسٹینڈنگ کمیٹی کے چیئرمین کے عہدے پرکانگریس پارٹی کے شمیم عبداللہ کوبلامقابلہ منتخب کرلیاگیاہے۔ خواتین بہبوداطفال کمیٹی کے چیئرمین کے طورپرکانگریس کی سنگیتا توپے کراورڈپٹی چیئرمین کے عہدے پرالکاشہانے کومنتخب کیاگیاہے۔اسٹینڈنگ کمیٹی کے 16؍میںسے 15؍ کانگریس کے نمائندے اوربھارتیہ جنتاپارٹی کاایک نمائندہ اس طرح 16؍نمائندے اس سے قبل ہی بلامقابلہ منتخب قراردئیے گئے ہے۔
****************************
 فصلوں کوپانی دینے کے لئے کسان قطرہ قطرہ آبپاشی طریقہ کارکازیادہ سے زیادہ استعمال کریں۔ ایسی اپیل قانون سازاسمبلی کے صدر ہری بھائو باگڑے نے کی ہے۔وہ کل اورنگ آبادضلع کے پھلمبری میںایک سنگِ بنیادتقریب سے مخاطب تھے۔
****************************
 اورنگ آبادشہرکواسمارٹ شہر بنانے کے نظریہ سے شہ کے زنگ آلودبرقی تاروں اوربرقی ٹرانسفارمرس کوتبدیل کرنے کے لئے مرکزی حکومت سے ایک ہزارکروڑروپیوں کامطالبہ کیاگیاہے۔رکن پارلیمنٹ چندرکانت کھیرے نے یہ بات کہی۔وہ کل ضلعی سطح کی میٹنگ سے مخاطب تھے۔
****************************
 

31.12.2017_8.40_8.45_AM_URDU.mp3


AIR News Bulletin, Aurangabad 31.12.2017....06.50

Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.12.2017 - 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 December 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ डिसेंबर २०१७ सकाळी .५० मि.

****

·      ‘पद्मावती’ चित्रपटाचं नाव बदलून, ‘पद्मावत’ करण्याच्या सूचनेसह चित्रपट प्रदर्शनास केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची मंजुरी.

·      मुंबईतल्या कमला मिल अग्निकांड प्रकरणी तीन जणांविरुद्ध नोटीस.

·      वाल्मीच्या लाचखोर महासंचालक आणि सहसंचालकाला चार जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी.

आणि

·      प्रसिद्ध गायिका आशालता करलगीकर यांचं दीर्घ आजारानं निधन.

****

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ, अर्थात सेंसॉर बोर्डानं ‘पद्मावती’ चित्रपटाला, काही बदलांसह मान्यता दिली असून 'युए' प्रमाणपत्रं जारी केलं आहे. चित्रपटाचं ‘पद्मावती’ हे नाव बदलून, ते ‘पद्मावत’ करण्याचा एक बदल मंडळानं सुचवला आहे. मलिक मुहम्मद जयसी यानं सोळाव्या शतकात लिहिलेल्या, ‘पद्मावत’ या महाकाव्यावर हा चित्रपट आधारलेला असल्याचा दावा, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी केला होता. त्या अनुषंगानं हा बदल, मंडळानं सुचवला आहे. हा चित्रपट सती प्रथेचं उदात्तीकरण करत नाही, अशी टीप चित्रपटाच्या श्रेयनामावलीत दाखवावी, घुमर या गाण्यात आवश्यक ते बदल करावेत, असंही मंडळानं सूचवलं आहे. या चित्रपटामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सेंसॉर बोर्डानं एका विशेष समितीची स्थापना केली होती. त्या समितीनं पाच बदल सूचवले आहेत.

****

मुंबईतल्या लोअर परळ भागात कमला मिल अग्निकांड प्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन जणांविरुद्ध नोटीस जारी केली आहे. आग लागलेल्या पबचे मालक हृतेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मनका अशी या तिघांची नावं असून, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेमध्ये ११ महिलांसह १४ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण होरपळून जखमी झाले आहेत.

दरम्यान, या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं धडक कारवाई सुरु केली आहे. अंधेरी, जुहू भागातल्या हॉटेलांवर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू असल्याचं वृत्त आहे.

****

पाण्याची उत्पादकता आणि व्यवस्थापन अमूल्य असल्याचं प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.बी.व्यंकटेश्वरलू यांनी केलं आहे. परभणी इथं आयोजित १८ व्या राज्य सिंचन परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. पाण्याची उत्पादकता ही नवीन संकल्पना जगभर रूढ झाली असल्याचं ते म्हणाले. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्ही.एम.भाले यावेळी उपस्थित होते. कृषी, सिंचन, उद्योग आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. या परिषदेचा आज समारोप होत आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी दहा वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचं नांदेड इथं आगमन होईल. कंधार तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असून, गुरु गोविंदसिंह यांच्या जयंतीनिमित्त नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वारा परिसरात आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३९ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था-वाल्मीचे महासंचालक, हरीभाऊ गोसावी आणि सहसंचालक राजेंद्र क्षीरसागर या दोघांना जिल्हा सत्र न्यायाधीशांनी चार जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वाल्मीच्या एका प्राध्यापकाकडून दहा लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली आहे.

****

प्रसिद्ध गायिका आशालता करलगीकर यांचं काल काल पहाटे औरंगाबाद इथं दीर्घ आजारानं निधन झालं, त्या ७५ वर्षांच्या होत्या. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मुळच्या विजापूरच्या असलेल्या आशाताई विवाहानंतर औरंगाबाद इथं स्थायिक झाल्या होत्या. त्यांनी पंडित भीमसेन जोशी, पंडित सामता प्रसाद यांच्यासह संगीत क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांसह देशविदेशात अनेक कार्यक्रमातून गायन सादर केलं. पंडित नाथराव नेरळकर यांच्यासोबत त्यांनी केलेल्या गझलांच्या मैफली गानरसिकांमध्ये विशेष लोकप्रिय होत्या. तेलगू चित्रपटांसाठी त्यांनी उमेदीच्या काळात पार्श्वगायनही केलं आहे. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी आशालता यांच्या गायकीनं प्रभावित होऊन, त्यांना ‘आंध्रलता’ ही पदवी दिली होती. यासह इतरही विविध पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिव देहावर काल औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंरी नवरात्रोत्सवात काल जलयात्रा साजरी झाली. डोक्यावर तीर्थातल्या पाण्याने भरलेले जलकुंभ घेऊन शेकडो महिला शिवाजीपुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरपुतळा यामार्गावरून भवानीरोडवरून देवीच्या मंदिराकडे वाजत गाजत ही जलयात्रा गेली. जलकुंभातल्या पाण्यानं गाभाऱ्यासह मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला.

****

अमृत अभियानाअंतर्गत लातूर शहरांतल्या हरित पट्ट्यांचा विकास केला जाणार असून, त्यासाठी मागवण्यात आलेल्या निविदांना स्थायी समितीच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी दिली. ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. हरित पट्ट्यांच्या विकासासाठी असलेला निधी खर्च करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर असल्यानं, मनपा प्रशासनानं अत्यंत घाईने स्थायी समिती सभेत हा विषय मांडला. प्रशासनानं घाई गडबडीत असे ठराव मांडणं योग्य नसल्याचं गोविंदपूरकर यांनी सांगितलं.

****

नांदेड - वाघाळा महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे शम्मीम अब्दुल्ला यांची बिनविरोध निवड झाली आहे. महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या संगीता तुपेकर तर उपसभापतीपदी अलका शहाणे यांची निवड झाली आहे. स्थायी समितीत १६ पैकी १५ काँग्रेसचे तर एक भाजपचा सदस्य यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.

****

औरंगाबाद इथं सनदी लेखापाल संस्थेच्या वतीनं आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचं काल आमदार अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. येणारा काळ हा आर्थिक साधनांचा असल्याचं मत उद्योजक डी.बी.सोनी यांनी यावेळी व्यक्त केलं. विमुद्रीकरण, आणि कारखान्यांची जागतिक स्तरावरील गुंतवणूक, यामुळे सनदी लेखापालांच्या व्यवसायाला उभारी येत असून, या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सिल्लोड तालुक्यातले हुतात्मा जवान संदीप जाधव यांच्या कुटुंबीयांना ५१ हजार रूपयांचा धनादेश यावेळी देण्यात आला.

****

नववर्षाचं स्वागत व्यसनमुक्त वातावरणात व्हावं, यासाठी काल बीड इथं व्यसनमुक्ती संदेश फेरी काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून निघालेल्या या संदेश फेरीत शालेय विद्यार्थी तसंच इतर सामाजिक संघटनांनी या फेरीत सहभाग घेतला. सामाजिक न्याय भवन परिसरात विसर्जित झालेल्या या संदेश फेरीला आमदार विनायक मेटे यांनी संबोधित केलं.

****

औरंगाबाद इथं येत्या ५ ते ८ जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आणि कृषी परिषद ‘महाॲग्रो २०१८’चं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात मराठवाड्यासह राज्यभरातल्या शेती आणि शेतीपूरक उद्योगांमध्ये गतिशीलता निर्माण करण्यासाठी, शेतकऱ्यांना नव तंत्रज्ञान, नवं वाण, नव्या योजना समजावून सांगण्यात येणार असल्याची माहिती, मुख्य समन्वयक विधीज्ञ वसंत देशमुख यांनी वार्ताहर परिषदेत दिली. औरंगाबाद इथल्या स्टेशन रोडवरील अयोध्या नगरीत हे प्रदर्शन भरणार आहे.

****

औरंगाबाद शहराला स्मार्ट शहराच्या दृष्टीकोनातून शहरातल्या जीर्ण झालेल्या विद्युत तारा आणि विद्युत वाहिन्या बदलण्यासाठी केंद्र सरकारकडे एक हजार कोटी रुपयांची मागणी करणार असल्याचं, खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं. ते काल जिल्हास्तरीय विद्युतीकरण समितीच्या बैठकीत बोलत होते.

****

पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना ठिबक संचाचा जास्तीत जास्त वापर करावा, असं आवाहन, विधान सभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री इथं बंद नलिका कालवा वितरण प्रणालीचं भूमीपूजन करताना ते काल बोलत होते.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या करमाड पोलिस ठाण्याचा सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरखनाथ शेळके आणि हेड कॉन्सटेबल शेख रहीम या दोघांना काल २५ हजार रूपये लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहात पकडलं. गुन्ह्यात जप्त केलेली वाळूची गाडी सोडवण्यासाठी आणि गाडी पुढे नियमित चालू देण्यासाठी या दोघांनी लाचेची मागणी केली होती.

****

Saturday, 30 December 2017

AIR News Bulletin, Aurangabad 30.12.2017....17.25

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.12.2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 December 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठीच्या मोहिमेमध्ये कृतीशील सहभाग घेण्याचं आवाहन केलं आहे. आज बंगळुरूमध्ये कर्नाटक राष्ट्रीय शिक्षण समाज संस्थेचा शतकोत्सव समारंभ आणि अदम्य चेतना सेवा उत्सव २०१८च्या उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते.

****

मुंबईतल्या लोअर परळ भागात कमला मिल्स परिसरात काल झालेल्या अग्निकांड प्रकरणी मुंबई पोलिसांनी आज तीन जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली आहे. ज्या पबमध्ये आग लागली होती, त्याचे मालक हृतेश सांघवी, जिगर सांघवी आणि अभिजीत मनका यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं धडक कारवाई सुरु केली आहे. या पथकानं रघुवंशी मिल मधल्या अतिक्रमणांवर कारवाई केली. त्याचबरोबर मुंबईत अंधेरी, जुहू भागातल्या हॉटेलांवर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू असल्याचं वृत्त आहे. या दुर्घटनेमध्ये काल ११ महिलांसह १४ जणांचा मृत्यू झाला.

****

आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या पहिल्या मसुद्याचं उद्या प्रकाशन करण्यात येणार आहे. हा मसुदा अनेक संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार असून नागरिक एस एम एसद्वारेही मसुद्यामध्ये त्यांची नावं आहेत आहे की हे जाणून घेऊ शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीमध्ये ही नोंदणी अद्ययावत करण्यात येत असून याद्वारे आसाममध्ये राहत असलेल्या अवैध नागरिकांचा शोध घेण्यात येणार आहे.

****

उत्तर प्रदेशात लखनौमध्ये शुक्रवारी रात्री एका मदरशामधून सहा ते एकोणीस वयोगटातल्या ओलिस ठेवलेल्या ५२ मुलींची सुटका करण्यात आली आहे. तसंच या मदरशाचा व्यवस्थापक मोहम्मद तय्यब झिया यास या मुलींच्या शोषणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हा मदरसा या मुलींसाठी वसतीगृह म्हणून वापरण्यात येत होता.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३९ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

औरंगाबाद इथं सनदी लेखापाल संस्थेच्या वतीनं आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचं उद्घाटन आज औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांच्या हस्ते झालं. येणारा काळ हा आर्थिक साधनांचा असल्याचं मत उद्योजक डी.बी सोनी यांनी यावेळी व्यक्त केलं. विमुद्रीकरण, बीट कॉईन आणि कारखान्यांची जागतिक स्तरावरील गुंतवणूक यामुळे सनदी लेखापालांच्या व्यवसायाला उभारी येत असून, या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी निर्माण झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सनदी लेखापाल अनिल भंडारी यांनी हे क्षेत्र सार्वजनिक विश्वस्त संस्था असून मूल्य आणि सचोटीचं संगोपन या माध्यमातून होत असल्याचं म्हटलं. सिल्लोड तालुक्यातले शहीद जवान संदीप जाधव यांच्या कुटुंबीयांना ५१ हजार रूपयांचा धनादेश यावेळी देण्यात आला.

****

प्रसिद्ध गायिका आंध्रलता आशालता करलगीकर यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. काल मध्यरात्री त्यांचं दीर्घ आजरानं निधन झालं, त्या ७५ वर्षांच्या होत्या.

****

‘अमृत अभियाना’अंतर्गत लातूर शहरांतल्या हरित पट्ट्यांचा विकास केला जाणार असून, त्यासाठी मागवण्यात आलेल्या निविदांना स्थायी समितीच्या कालच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आल्याची माहिती, स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी दिली. ते आज लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. हरित पट्ट्यांच्या विकासासाठी असलेला निधी खर्च करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर असल्यानं, मनपा प्रशासनानं अत्यंत घाईनं स्थायी समिती सभागृहात हा विषय मांडला. त्यामुळे समितीच्या सदस्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धती बद्दल नाराजी व्यक्त केली. या सभेत बोलतांना गोविंदपूरकर यांनी, मनपा प्रशासनाने घाई गडबडीत स्थायी समितीसमोर असे ठराव मांडणं योग्य नसल्याचं सांगितलं.

****

नांदेड - वाघाळा महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे शम्मीम अब्दुल्ला यांची आज बिनविरोध निवड झाली. महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या संगीता तुपेकर आणि उपसभापतीपदी अलका शहाणे यांची निवड झाली आहे. स्थायी समितीत १६ पैकी १५ काँग्रेसचे तर एक भाजपचा सदस्य यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.

****

औरंगाबाद इथं येत्या ५ ते ८ जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आणि कृषी परिषद ‘महाॲग्रो २०१८’चं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात मराठवाड्यासह राज्यभरातल्या शेती आणि शेतीपूरक उद्योगांमध्ये गतिशीलता निर्माण करण्यासाठी, शेतकऱ्यांना नव तंत्रज्ञान, नवं वाण, नव्या योजना समजावून सांगण्यात येणार असल्याची माहिती, मुख्य समन्वयक विधीज्ञ वसंत देशमुख यांनी वार्ताहर परिषदेत दिली. औरंगाबाद इथल्या स्टेशन रोडवरील अयोध्या नगरीत हे प्रदर्शन भरणार आहे.

****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.12.2017_13.00.

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.12.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 December 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३०   डिसेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****

केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर - जी एस टी अंतर्गत विक्रीचे अंतिम जी एस टी विवरण म्हणजेच जी एस टी आर - एक भरण्यासाठीची मुदत १० जानेवारीपर्यंत वाढवली आहे. ज्या व्यावसायिकांची आर्थिक उलाढाल दीड कोटी रुपयांपर्यंत आहे, त्यांना जुलै ते सप्टेंबर २०१७ या कालावधीमधला जी एस टी आर - एक भरणं आवश्यक आहे. यापूर्वी ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती.

****

सरकारनं भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण - ट्राय कडून, एफएम रेडिओ वाहिन्यांप्रमाणे दूरदर्शन वाहिन्यांच्या लिलावासाठी सूचना मागितल्या आहेत. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ही माहिती दिली. दूरदर्शन वाहिन्यांच्या लिलावामुळे महसुलात वाढ होईल आणि व्यवहारात पारदर्शकता राहील, असं ते म्हणाले.

****

पाकिस्तानमधल्या पॅलेस्टाईनच्या राजदूतानं २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार हाफीज सईद याच्याबरोबर रावळपिंडीमध्ये एकाच व्यासपीठावर उपस्थिती लावल्याबद्दल भारतानं पॅलेस्टाईनवर टीका केली आहे. भारत नवी दिल्लीमध्ये पॅलेस्टाईनच्या राजदुताबरोबर याबाबत आपला तीव्र निषेध नोंदवणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं आहे.

****

केंद्रीय अन्वेषण विभाग - सी बी आयनं नवी दिल्लीमध्ये एका मानवी तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. तसंच २०१६ मध्ये २३ किशोरवयीन मुलांची रग्बी प्रशिक्षण शिबीराच्या नावाखाली फ्रान्समध्ये तस्करी करण्याच्या आरोपाखाली तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. हे आरोपी दिल्ली, फरिदाबाद इथले रहिवासी असून, त्यांच्याविरोधात गुन्हेगारी कट रचणं, मानवी तस्करी, फसवणूक आणि खोटे कागदपत्रं बनवणं आदी आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

****

रेल्वेमध्ये एकूण एक लाख २० हजार रिक्त जागांपैकी येत्या सहा ते नऊ महिन्यांमध्ये ५० टक्के जागा भरल्या जाणार असल्याचं रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी राज्यसभेमध्ये एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं. या जागा भरण्यासाठी साधारणत: एक वर्षाचा कालावधी लागतो; मात्र रेल्वे मंत्रालय याबाबत जलदगतीनं काम करत सहा ते नऊ महिन्यांमध्येच या जागा भरेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. तसंच रेल्वेरुळ आणि अंतर्गत उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

****

केंद्र सरकारनं चालू आर्थिक वर्षात उज्ज्वला योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी २४ कोटी रुपयांहून अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. लोकसभेत महिला आणि बालविकास राज्यमंत्री डॉ.विरेंद्र कुमार यांनी एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. उज्ज्वला योजनेअंतर्गत मुलांची तस्करी, त्यांचं शारिरीक शोषण आदींना आळा घालून त्यांचा बचाव, पुनर्वसन, आणि संबंधित मुलांची मायदेशी रवानगी इत्यादींना महत्व देण्यात आलं आहे.

****

हिमाचल प्रदेशमध्ये नवनियुक्त मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी मंत्रीमंडळामधल्या मंत्र्यांना खातेवाटप केलं आहे. गृह मंत्रालय, वित्त, सामान्य प्रशासन, नियोजन, कार्मिक आणि इतर महत्वाची खाती त्यांनी स्वत:कडेच ठेवली आहेत. मोहिंदरसिंग ठाकूर यांना जलसिंचन आणि आरोग्य, किशन कपूर यांना अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार, सुरेश भारद्वाज यांना संसदीय व्यवहार मंत्रालय, तर रामलाल मरकंडा यांना कृषी मंत्रालय देण्यात आलं आहे. एकमेव महिला मंत्री असलेल्या सरवीन चौधरी यांना नागरी विकास, शहर नियोजन आणि गृहनिर्माण ही खाती देण्यात आली आहेत.

****

भ्रष्टाचाराच्या  आरोपांमुळे अखेर नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. आज सकाळी सहकार खात्यानं ही कारवाई करतानाच विभागीय सह निबंधकांनी या बँकेचा कार्यभार स्वीकारला. बँकिंग नियामक कायद्याखाली भारतीय रिझर्व्ह बँकेनं ही कारवाई केली. बँकेच्या संचालक मंडळातल्या आजी-माजी अध्यक्षांसह एकूण १७ जणांवर नोकर भरतीमध्ये अनियमीतता यासह अन्य अनेक आरोपांखाली दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या सर्वांवर आठ कोटी रुपयांच्या अनियमित कारभाराची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

****

तिरुवनंतपुरम इथं सुरु असलेल्या राष्ट्रीय नेमबाज स्पर्धेत जीतू रायनं पुरुषांच्या ५० मीटर पिस्टल प्रकारात विजेतेपद पटकावलं. अंतिम फेरीत जीतूनं ओंकार सिंगचा पराभव केला. पुरुषांच्या संघिक स्पर्धेतही जीतू राय, जय सिंग आणि ओमप्रकाश मीथेरवाल यांच्या संघानं सुवर्ण पदक पटकावलं. देशभरातून चार हजार ८०० महिला आणि पुरुष नेमबाज या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

****

राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, अनेक ठिकाणी तापमानात लक्षणीय घट झाली आहे. काल सर्वात कमी किमान तापमान गोंदिया इथं सात पूर्णांक पाच दशांश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. उद्यापर्यंत राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

*****




AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.12.2017_11.00AM.

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.12.2017 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३०   डिसेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****



प्रसिद्ध गायिका आशालता करलगीकर यांचं औरंगाबाद इथं मध्यरात्री दीर्घ आजारानं निधन झालं, त्या ७५ वर्षांच्या होत्या. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्या मधुर आवाजामुळे त्यांना ‘आंध्रलता’ ही पदवी दिली होती. मुळच्या विजापूरच्या असलेल्या आशाताई लग्नानंतर औरंगाबाद इथे स्थायिक झाल्या होत्या. मराठवाड्याचे नामवंत गायक पंडित नाथराव नेरलकर यांच्यासोबत आशाताईंचे देशभरात गझल गायनाचे कार्यक्रम लोकप्रिय झाले. त्यांनी अनेक तेलगु चित्रपटांमध्ये पार्श्वगायनही केलं आहे. त्यांच्या पार्थिव देहावर आज औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

आपल्या देशाला विकासाकडे वाटचाल करण्याची संधी उपलब्ध असून, ते करताना शिक्षण क्षेत्राचं योगदान फार महत्वाचं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईतील एका शैक्षणिक संस्थेच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात ते काल बोलत होते. जो देश आपल्याकडील लोकसंख्येचं रुपांतरण कुशल मनुष्यबळात करतो, तो देश विकासाकडे वाटचाल करतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची आणि सामाजिकतेची जाणीव निर्माण होईल, याचाही शिक्षणामध्ये समावेश वाढवला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ३१ डिसेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३९ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो येत्या दहा जानेवारीला ३१ उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. यामध्ये अमेरिका आणि फिनलंडसह इतर देशांच्या २८ नॅनो आणि मायक्रो उपग्रहांसह भारताच्या कार्टोसॅट दोन श्रृंखलेतल्या तिसऱ्या उपग्रहाचा समावेश आहे. आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा इथं सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएसलव्ही सी ४० या यानामार्फत हे प्रक्षेपण होणार आहे.

*****




Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date: 30 December 2017
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  30؍دسمبر  ۲۰۱۷؁ء
وقت : صبح  ۴۰-۸ سے  ۴۵-۸
 ممبئی کی کملامل میں آتشزدگی کے معاملے میں ممبئی میونسپل کارپوریشن کے پانچ افسران کواپنے کام میںلاپرواہی برتنے پرمعطل کردیاگیاہے۔ وزیراعلیٰ دیویندرپھڑنویس نے کل مل کے احاطے کادورہ کرکے حالات کاجائزہ لیا۔وزیراعلیٰ نے اس معاملے کی جانچ کرکے خاطیوں کے خلاف سخت کاروائی کرنے کاحکم ممبئی میونسپل کمشنرکودیاہے۔پھڑنویس نے اس واقعہ پراظہارافسوس کرتے ہوئے مہلوکین کے افرادخاندان کی تعزیت بھی کی۔دریں اثناء بی جے پی رکن پارلیمنٹ کبرٹ سومیّا نے مل کے احاطے میںہوٹلیں چلانے کی اجازت دینے والے افسران کی تحقیقات کا مطالبہ کیا۔ اسی طرح ممبئی کانگریس صدرسنجے نروپم نے سوال کیا کہ اتنی کم جگہ میں50؍ہوٹلوں کی اجازت کیسے دی گئی؟
 اسمبلی کے حزب اختلاف رہنمارادھاکرشن ویکھے پاٹل نے کہا کہ یہ واقعہ میونسپل کارپوریشن کی بدعنوانیوں کی دلالت کرتاہے۔انہوںنے مطالبہ کیا کہ کارپوریشن کی بدعنوانیوں کی تحقیقات سی بی آئی کے ذریعہ کروائی جائے۔جناب پاٹل نے کہا کہ متعلقہ ہوٹل میںکی گئی غیرقانونی تعمیرات کی تحریری شکایت ممبئی میونسپل کارپوریشن کوکی گئی تھی۔
 جمعرات کی نصف شب کولگی اس مہیب آگ میں14؍افرادہلاک ہوگئے جبکہ کئی افرادجھلس گئے ہیں۔گورنرسی ودیا ساگررائونے اس واقعہ پر گہرے دکھ کااظہارکیا۔انہوںنے اپنے تعزیتی پیغام میں کہا کہ وہ اس نازک وقت میںمتاثرہ کنبوں کے ساتھ ہیں۔
****************************
 ریاست کے ایک ہزار314 اسکول بند کئے جانے کے فیصلے سے متعلق قومی انسانی کمیشن کی نوٹس کا4؍ہفتوں کے اندرجواب دیا جائے گا۔ یہ بات ریاستی وزیرتعلیم ونودتائوڑے نے کہی ہے۔انہوںنے کہا کہ کمیشن کے روبرواس ضمن میں تفصیلی وضاحت پیش کی جائے گی۔وہ کل ممبئی میں ایک پریس کانفرنس سے مخاطب تھے۔انہوںنے مزیدکہاکہ بہوجن سماج کے طلبہ کومعیاری تعلیم کے مواقع فراہم کرنے کے لئے حکومت نے یہ فیصلہ کیا ہے۔
****************************
 وزیراعظم نریندرمودی کل 31؍دسمبرکوآکاشوانی پراپنے ماہانہ پروگرام من کی بات کے ذریعے عوام سے رابطہ کرے گے۔اس سلسلہ کایہ31؍ واں پروگرام رہے گا۔آکاشوانی اوردوردرشن کے سبھی چینلس پرصبح 11؍بجے اس پروگرام کونشرکیاجائے گا۔
****************************
 لوک سبھا میںمنظور کئے گئے تین طلاق بل کوراجیہ سبھا میںبآسانی منظورکروانے کے لئے پارلیمانی امورکے وزیراننت کمارنے سبھی جماعتوں سے تعاون کی اپیل کی ہے۔وہ کل پارلیمنٹ کے احاطے میںاخبارنویسوں سے گفتگوکررہے تھے۔انہوںنے کہاکہ اس معاملے میںحکومت سبھی سیاسی پارٹیوں کے رابطے میںہے۔
****************************
 دیوالیہ پن ترمیمی بل 2017؍ کل لوک سبھا میںمنظورکرلیاگیا۔قرض کی ادائیگی میںٹال مٹول کرنے والوں کی اقساط میں قرض کی ادائیگی کی سہولت ختم کرنا،اسی طرح قرض سے متعلق جائیدادکی فروخت پرامتناع کی تجاویز اس بل میںشامل ہیں۔اس بل پربحث کاجواب دیتے ہوئے وزیر خزانہ ارون جیٹلی نے کانگریس کے اس دعوے کومستردکردیاکہ این ڈی اے دورحکومت میںبینکوں میںقرض کی شکل میں پھنسی ہوئی رقم میں اضافہ ہواہے۔
****************************
 چھتیس گڑھ کے بستر علاقے میںکل سلامتی دستوں نے 12؍ نکسلائٹس کوگرفتارکیا۔سلامتی دستوں کی مشترکہ تلاشی مہم کے دوران سکما ضلع میں یہ گرفتاریاں عمل میںآئی۔
****************************
 بھارتی خلائی تحقیقی ادارہ ،اسروآئندہ 10؍جنوری کو31؍ مصنوعی سیارچے خلاء میں داغے گا۔جن میںامریکہ اورفن لینڈ سمیت دیگر ممالک کے 28؍ نینواورمائکروسیارچے شامل ہیں۔بھارت کے کارٹوسیٹ 2؍ سلسلہ کاتیسراسیارچہ بھی ان میں شامل ہیں۔آندھراپردیش کے سری ہری کوٹا کے ستیش دھون خلائی مرکزسے یہ سیارچے PSLV-C40 خلائی گاڑی کے ذریعے خلاء میں داغے جائیںگے۔
****************************
 نیتی آیوگ کے اٹل انوویشن مشن کے تحت شروع کئے گئے اٹل ٹنکرنگ لیب کے اس پروجیکٹ کے دوسرے مرحلے میںریاست کے 116؍ اسکولوں کوشامل کیاگیاہے۔نیتی آیوگ نے حال ہی میںاس ضمن میں جاری کردہ ایک بیان میںکہاہے کہ اسکولی طلبہ کی سوچ کوشکل دینے کی غرض سے یہ پروجیکٹ شروع کیاگیاہے۔ اس کے تحت طلبہ کی ریاضی ،سائنس اورٹیکنالوجی مضامین میںدلچسپی بڑھانے اورصلاحیتوں میںاضافے کے لئے اسکولوں میںیہ لیب شروع کئے جارہے ہیں۔مراٹھواڑہ کے لاتورضلع کے 4؍ عثمان آباد2؍ بیڑ، جالنہ ،ناندیڑاورہنگولی اضلاع کاایک ایک اسکول میں تجربہ گاہیں شروع کی جائے گی۔
****************************
 اورنگ آباد کے واٹر اینڈلینڈ مینجمنٹ انسٹی ٹیوٹ ،والمی کے دواعلیٰ افسران کوکل دس لاکھ روپئے رشوت لیتے ہوئے گرفتارکیاگیا۔ڈائریکٹر جنرل ہری بھائو گوساوی اور اسسٹنٹ ڈائریکٹر راجندرشرساگران دونوں افسران نے ایک ملازم پرمعطّلی کی کاروائی کرنے کے لئے رشوت کامطالبہ کیا تھا۔متعلقہ ملازم کی شکایت پرکاروائی کرتے ہوئے کل انسدادبدعنوانی دستے نے دونوں افسران کورنگے ہاتھوں گرفتارکرلیا۔
****************************

30.12.2017_8.40_8.45_AM_URDU.mp3


AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.12.2017_06.50AM

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.12.2017 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 December 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३०  डिसेंबर २०१७ सकाळी .५० मि.

****



Ø मुंबईतल्या कमला मिल अग्निकांड प्रकरणी महापालिकेचे पाच अधिकारी निष्काळजीपणाबद्दल निलंबित; घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Ø दिवाळखोरी संहिता दुरुस्ती विधेयक २०१७ काल लोकसभेत मंजूर

Ø अटल टिंकरिंग लॅब’ योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात ११६ शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा उभारणार; मराठवाड्यातल्या दहा शाळांचा समावेश

आणि

Ø वाल्मीच्या दोन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना दहा लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक

****

मुंबईतल्या कमला मिल अग्निकांड प्रकरणात मुंबई महापालिकेच्या पाच अधिकाऱ्यांना निष्काळजीपणाबद्दल निलंबित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल या परिसराची पाहणी करून, आढावा घेतला. या घटनेप्रकरणी सखोल चौकशी करून, १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे, तसंच दोषींवर कठोर कारवाईचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त करत, मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं.



दरम्यान, भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी, या इमारतीत हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी दिलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली, तर मिलच्या कमी जागेत ५० हॉटेल्सना परवानगी कशी दिली, असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही घटना म्हणजे मुंबई महापालिकेचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला आहे. महापालिकेच्या भ्रष्टाचाराची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. संबंधित हॉटेलमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामाबद्दल मुंबई महापालिकेकडे लेखी तक्रारसुद्धा करण्यात आली होती, असं त्यांनी सांगितलं.



गुरुवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या या अग्निकांडात १४ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण होरपळल्याचं वृत्त आहे.

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पीडित कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

राज्यातल्या एक हजार ३१४ शाळा बंद करण्याच्या मुद्यावरुन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं पाठवलेल्या नोटीसीला चार आठवड्यात उत्तर देणार असून, आयोगासमोर आपली बाजू स्पष्ट आणि सविस्तरपणे मांडणार असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आहे. ते मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.  बहुजन समाजाच्या मुला-मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे, यादृष्टीने घेतलेला हा निर्णय असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ३१ डिसेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३९ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

दिवाळखोरी संहिता दुरुस्ती विधेयक २०१७ काल लोकसभेत संमत करण्यात आलं. हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाऱ्यांना टप्प्याटप्प्यानं कर्ज परतफेड करण्याच्या योजनेत समाविष्ट न करण्याची, तसंच कर्ज असलेली संपत्ती विकण्यास मनाई करण्याची तरतूदही या विधेयकात आहे. या विधेयकाच्या चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी, रालोआ सरकारच्या काळात बँकांच्या अनुत्पादीत मालमत्तेत वाढ झाल्याचा काँग्रेसचा आरोप फेटाळून लावला.

****

लोकसभेत संमत झालेलं तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत सहज संमत व्हावं यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा देण्याचं आवाहन संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी केलं आहे. ते काल संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. या संदर्भात सरकार सर्व राजकीय पक्षांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

नागरीकांनी आभासी चलनाचा वापर करु नये, असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. आभासी चलन हे कायदेशीर चलन नाही, तसंच ते सुरक्षित नसल्याचंही मंत्रालयानं सांगितलं आहे. बीट कॉईन किंवा अन्य आभासी चलनामुळे आर्थिक नुकसानाचा धोका संभवतो, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

छत्तीसगडमध्ये बस्तर विभागात सुरक्षा दलांनी काल १२ नक्षलवाद्यांना अटक केली. सुरक्षा दलांच्या संयुक्त शोधमोहिमेदरम्यान सुकमा जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो येत्या दहा जानेवारीला ३१ उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. यामध्ये अमेरिका आणि फिनलंडसह इतर देशांच्या २८ नॅनो आणि मायक्रो उपग्रहांसह भारताचा कार्टोसॅट दोन श्रृंखलेतल्या तिसऱ्या उपग्रहाचा समावेश आहे. आंध्रप्रदेशात श्री हरिकोटा इथं सतीश धवन अंतराळ केंद्रातून  पीएसएसलव्ही सी ४० या यानामार्फत हे प्रक्षेपण होणार आहे.

****

नीति आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या 'अटल टिंकरिंग लॅब' या अभिनव योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या ११६ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. नीति आयोगानं नुकतीच यासंबंधीची घोषणा केली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या नव्या संकल्पनांना आकार देऊन त्यांच्यातील कौशल्य विकसित करणं हा या योजनेचा उद्देश आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील नव्या संकल्पना रुजवणं आणि कौशल्य विकसित करण्यासाठी या शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा निर्माण करण्यात येत आहेत. मराठवाड्यातल्या दहा शाळांमध्ये अशा प्रयोगशाळा उभारल्या जाणार असून, लातूर जिल्ह्यातल्या चार, उस्मानाबाद दोन, तसंच बीड, जालना, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका शाळेचा समावेश आहे.

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा स्वातंत्र्यसैनिक वि वा देसाई देशपांडे पुरस्कार यंदा औरंगाबादच्या वेद प्रतिष्ठान या संस्थेस जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह आणि अकरा हजार रुपये रोख असं या पुरस्कारचं स्वरूप आहे. येत्या तीन जानेवारीला औरंगाबाद इथं गोविंदभाई ललित कला अकादमीत हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाईल.

****

जालना इथल्या फकिरा सेवाभावी संस्थेच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा ‘वेणुताई भाले राज्यस्तरीय मुद्रा साहित्य पुरस्कार’ पुणे जिल्ह्यातल्या दौंड इथल्या कवयित्री कल्पना दुधाळ यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचं हे सहावं वर्ष असून, येत्या एक जानेवारीला जालना इथं या पुरस्कारचं वितरण होणार आहे.

****

औरंगाबाद इथल्या जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी च्या दोन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना काल दहा लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. महासंचालक हरिभाऊ गोसावी आणि सह संचालक राजेंद्र क्षीरसागर अशी या दोघा अधिकाऱ्यांची नावं असून, त्यांनी एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई न करण्यासाठी लाच मागितली होती. संबंधिताच्या तक्रारीवरून काल वाल्मी इथं संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यालयात सापळा रचून दोन्ही अधिकाऱ्यांना अटक केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात तेर इथं झालेल्या बाराव्या राज्यस्तरीय नौकायन स्पर्धेत कोल्हापूर संघानं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. तेरणा मध्यम प्रकल्पात झालेल्या या स्पर्धेत वरिष्ठ गटात कोल्हापूर संघ, कनिष्ठ गटात सांगली संघ तर बाल गटात नाशिक संघ विजेता ठरला. काल स्पर्धेच्या समारोपानंतर विजेते संघांना तसंच स्पर्धकांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली.

****

राज्यघटनेसंदर्भात कथित आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या निषेधार्थ काल नांदेड इथं काँग्रेसच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. पाकिस्तानात अटकेत असलेले नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना अपमानकारक वागणूक दिल्याप्रकरणी पाकिस्तानचाही यावेळी निषेध करण्यात आला.

लातूर इथं गांधी चौकात तसंच जालना इथं वतीनं गांधीचमन चौकात आंदोलन करून, काँग्रेस पक्षाच्या वतीनं हेगडे यांचा निषेध करण्यात आला.

****

लातूर इथं काल भारतीय जनता पक्षाच्यावतीनं शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता संदेश फेरी काढण्यात आली. प्रत्येक लातूरकरानी स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावं तसंच नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी स्वच्छता अँप डाऊनलोड करुन आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असं आवाहन यावेळी करण्यात आलं.

****

राज्याचा महिला आणि बाल विकास विभाग तसंच बीड जिल्हा माहिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीनं आयोजित जिल्हास्तरीय बाल महोत्सव काल बीड इथं पार पडला. राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्या डॉ. शालिनी कराड यांच्या हस्ते बाल महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. या बाल महोत्सवात विविध मैदानी खेळांसह निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसंच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या स्पर्धेमधील विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आलं.

****

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातल्या संत ज्ञानेश्वर विद्यालयात कर्मयोगी शहाजी पाटील विद्यार्थी महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवातल्या विविध उपक्रमात विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले आहेत.

*****