Monday, 30 April 2018

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 30.04.2018_17.25

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.04.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 April 2018

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० एप्रिल २०१ दुपारी १.०० वा.

*****



 ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत आयुष्मान भारत दिवस आज साजरा केला जात आहे. देशातल्या ग्रामीण भागात आरोग्य शिबीरं आयोजित करुन त्यात आयुष्मान भारत योजनेची माहिती त्यात दिली जात आहे. राष्ट्रीय आरोग्य संरक्षण मिशनबाबत जनजागृती करण्यासाठी ग्रामसभाही घेतल्या जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.   

****



 जम्मू काश्मीर मधल्या पुलवामा इथं सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे. या भागात दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी आज सकाळी शोधमोहीम सुरु केली. त्यानंतर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. ही चकमक अद्यापही सुरु असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 मुंबई पुणे महामार्गावर पनवेल नजीक आज सकाळी कार आणि टेम्पोच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, नादुरुस्त कारला धक्का मारत असताना टेम्पोनं धडक दिल्यानं, हा अपघात झाला. अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातानंतर महामार्गावरची वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

****

 शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि आत्महत्येच्या विचारातून परावृत्त करण्यासाठी उद्या एक मे पासून मराठवाडा तसंच पश्चिम विदर्भातल्या जिल्ह्यांमधून शेतकरी सन्मान यात्रा काढण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. मंत्रालयात प्रवेश करून आत्महत्या करणारे धुळे जिल्ह्यातले शेतकरी धर्मा पाटील यांच्या विखरण गावातून या सन्मान यात्रेला प्रारंभ होणार असून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शिरढोण इथं या शेतकरी सन्मान यात्रेचा नऊ मे रोजी समारोप होणार असल्याची माहिती खासदार शेट्टी यांनी यावेळी दिली.

****



 औरंगाबाद जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात सात लाख अकरा हजार हेक्टर म्हणजेच सुमारे शंभर टक्के क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. यापैकी दोन लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य, तीन लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी, २३ हजार हेक्टर क्षेत्रावर तेलबिया, तर ६० हजार हेक्टर क्षेत्रावर कडधान्यांची पेरणी प्रस्तावित असल्याचं, कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

****



 औरंगाबाद महापालिकेच्या वतीनं आज शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी औरंगपूरा इथल्या महात्मा ज्योतिबा फुले चौकातून या अभियानाला सुरुवात केली. शहरातल्या नऊ प्रभागात प्रभाग सभापती, नगरसेवक, वॉर्ड अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी हे अभियान राबवत आहेत. नागरिकांनी स्वच्छतेबरोबरच कचरा वर्गीकरण करण्याचं आवाहन भापकर यांनी केलं आहे.

****



 उत्तराखंडमधल्या बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले. केदारनाथ मंदिराचे दरवाजे काल उघडण्यात आले असून, उत्तराखंड सरकारनं केदारनाथ, बद्रिनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारधाम यात्रेसाठी विशेष सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

****

 संवैधानिक पदाचा आदर राखला गेला पाहिजे आणि त्यांच्या औचित्याबद्दल प्रश्न उपस्थित करता कामा नये, असं मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं आहे. भारत-चीन संबंध योग्य मार्गावर असून, चीननं यासाठी संपूर्ण सहकार्याचं आश्वासन दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. काश्मीरमध्ये केली जात असलेली लष्करी कारवाई योग्य असून, सरकार त्यात खंड पडू देणार नाही, असंही ते म्हणाले.

****



 दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला, कविंदर शर्मा यांच्यासह आठ जणांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. कविंदर शर्मा यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद सोपवलं जाणार आहे.

****



 देशभरात टपाल खात्यांतर्गत पेमेंट बँकांच्या ६५० शाखा पुढच्या महिन्यापर्यंत कार्यरत होतील, असं केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितलं आहे. ते भोपाळ इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. पेमेंट बँकांच्या प्रणाली एकीकरणाचं काम पूर्ण झालं असून, भारतीय रिझर्व बँकेनं अनिवार्य केलेल्या प्रक्रिया येत्या आठवड्याभरात पूर्ण होतील, असं ते म्हणाले. टपाल विभागाच्या पेमेंट बँका सुरू झाल्यानं दीड लाखाहून अधिक टपाल कार्यालयांच्या माध्यमातून लोकांना बँकांच्या सेवेचा लाभ घेता येईल असं त्यांनी सांगितलं.

****



 भारताच्या प्रज्ञेश गुणेश्वरननं चीनमधे अॅनींग इथं झालेल्या टेनिस एटीपी चॅलेंजर स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. या स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात प्रज्ञेशनं इजिप्तच्या मोहम्मद सफवतचा पाच - सात, सहा - तीन, सहा - एक असा पराभव केला. अठ्ठावीस वर्षाच्या प्रज्ञेशला २१ हजार ६०० अमेरिकी डॉलर्सचं बक्षीस मिळालं आहे.

*****

***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.04.2018_11.00AM.

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.04.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० एप्रिल २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 बुद्ध पौर्णिमा आज देशभरात विविध कार्यक्रमांनी साजरी होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. गौतम बुद्धांनी दिलेला शांती, अहिंसा आणि प्रेमाचा संदेश लोकांना इतरांसाठी काम करण्याला प्रवृत्त करेल असं राष्ट्रपती आपल्या संदेशात म्हणाले. भगवान बुद्ध हे करुणा, सेवा आणि त्यागाचं प्रतीक होते असं सांगून पंतप्रधानांनी, देशातली महत्त्वपूर्ण बौद्ध स्थळं दक्षिण पूर्व आशियाला जोडण्यासाठी भारत बुद्धिस्ट पर्यटनाची रुपरेखा विकसित करत असल्याचं सांगितलं.



 औरंगाबाद शहरातल्या बुध्द लेणीवर पहाटे महापरित्राण पठण करण्यात आलं. सायंकाळी पाच वाजता क्रांतीचौकातून भिक्खू संघाच्या नेतृत्वात मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती प्रज्ञा प्रसार धम्म संस्कार केंद्राचे अध्यक्ष भदंत विशुध्दानंद बोधी महाथेरो यांनी दिली आहे.

****



 दक्षिण मध्य रेल्वे विभागानं नांदेड रेल्वे स्थानकावर काल प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर तिकीट तपासणी केली. या मोहीमेत २७८ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ५८ हजार रुपये दंड वसुली करण्यात आली. शिवाय रेल्वेमधली स्वच्छता, खाद्य तसंच पेयपदार्थ  आणि त्यांच्या किमती, पाण्याची उपलब्धता, दिवे तसंच पंख्यांची स्थिती, आदी तपासण्याही रेल्वे विभागानं काल केल्या.

****



 अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी १५ पथकं स्थापन करण्यात आली असून, यामध्ये १५ अधिकारी आणि ७५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसंच जामखेड साठी अतिरिक्त १० अधिकारी आणि २०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

****



 बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यात अकोला इथं विहिरीवर पोहायला गेलेल्या दोन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. काल दुपारी ही घडना घडली. मरण पावलेली ही मुलं चुलत भावंडं होती.

*****

***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.04.2018_06.50AM.

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.04.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 April 2018

Time 6.50AM to 7.00AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३०  एप्रिल २०१ सकाळी .५० मि.

*****



Ø उन्हाळी सुट्ट्यांतल्या ‘स्वच्छ भारत ग्रीष्मकालीन इंटर्नशीप २०१८’ या प्रशिक्षण उपक्रमात सहभागी होण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं युवकांना आवाहन

Ø राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार जयंत पाटील यांची निवड

Ø लिंगायत धर्माच्या संवैधानिक मान्यतेशिवाय आंदोलन थांबणार नाही- डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज

Ø औरंगाबाद महानगरपालिकेच्या बैठकीत गोंधळ करणारे चार नगरसेवक एक दिवसासाठी निलंबित

आणि

Ø तथागत गौतम बुध्द यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन

*****



 ‘स्वच्छ भारत ग्रीष्मकालीन इंटर्नशीप २०१८’ या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रशिक्षणासाठी सरकारनं सुरू केलेल्या उपक्रमात देशातल्या युवकांनी सहभागी व्हावं,  असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमात ते काल बोलत होते. या मालिकेचा ४३वा भाग काल प्रसारित झाला. केंद्र सरकारच्या क्रीडा, मनुष्यबळ विकास आणि पेयजल या मंत्रालयांनी मिळून हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमातल्या सर्वोत्तम प्रशिक्षकाला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातील, तसंच यात सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला स्वच्छ भारत मिशनद्वारे एक प्रशस्तीपत्र आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दोन पत गुण दिले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. माय जी ओ व्ही ओपन फोरमवर या इंटर्नशीपसाठी नोंदणी करता येणार असून, जास्तीत जास्त तरुणांनी यात सहभागी होऊन, स्वच्छतेचं आंदोलन यशस्वी करावं, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.



बुद्ध पौर्णिमा हा दिवस भगवान बुद्धांचं स्मरण करत त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करुन त्यांचं अनुकरण करण्याच्या जबाबदारीची आठवण करुन देत असल्याचं सांगून पंतप्रधानांनी बुद्ध पौर्णिमा, तसंच आगामी रमजान महिन्यानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

****

 किडींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईपोटी राज्य सरकारनं अकराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कृषी विभागाचे मुख्य सचिव बिजय कुमार यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. नुकसान भरपाईची रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं सुमारे ३४ लाख हेक्टरवरील कपाशीचं नुकसान झाल्याचं, सरकारनं केलेल्या सर्वेक्षणात समोर आलं आहे.

****



 ग्रामसभा रद्द करण्याचा किंवा त्यांची संख्या कमी करण्याचा कोणताही निर्णय शासनानं घेतलेला नसल्याचं ग्रामविकास विभागानं स्पष्ट केलं आहे. गावात सौहार्दाचं वातावरण कायम ठेवण्याच्या दृष्टीनं ग्रामसभांच्या फक्त तारखा बदलण्यात आल्या असून, ज्या गावांमध्ये सामंजस्याचं वातावरण आहे, ती गावं एक मे रोजीच ग्रामसभा घेऊ शकतात, असं विभागानं म्हटलं आहे.

****



राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार जयंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. काल पुण्यात प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रदेश उपाध्यक्षपदी नवाब मलिक यांची, सरचिटणीस पदावर शिवाजी गर्जे यांची तर खजिनदारपदी हेमंत टकले यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली.



 कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी विधान परीषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या सर्व जागा लढवल्या जाणार असून लातूर- उस्मानाबाद -बीडची जागाही लढवण्याचा आपला आग्रह असल्याचं सांगितलं. मित्र पक्षानं रडीचा डाव न खेळता सरळ व्यावहारीक भूमिका घेण्याचं आवाहन केलं.

****



 पाणी फॉऊडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत राज्यातल्या सहभागी गावांना भारतीय जैन संघटनेच्यावतीनं तीन हजार जेसीबी आणि पोकलेन यंत्र देण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. या स्पर्धेत मराठवाड्यातल्या वीस तालुक्यांमधल्या गावांमध्ये श्रमदानाचं काम सुरू असून सुमारे ६५० जेसीबी आणि पोकलेन यंत्राद्वारे त्यांची कठीण काम पूर्ण करण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्या एक मे रोजी राज्यातल्या या सहभागी गावांमध्ये महाश्रमदानाचं अयोजन करण्यात आलं असून यामध्ये शहरातले सुमारे दोन लाख नागरिक गावांमध्ये जाऊन श्रमदान करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****



 परभणी - हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून शिवसेनेनं अकोल्याचे आ़मदार गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र विप्लव बाजोरिया यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा एबी फॉर्म पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाजोरिया यांना दिला असल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

*****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****



 जायकवाडी धरणातून सिंचनासाठी पाणी देतांना ते जलवाहिनीतून देणं आवश्यक असल्यातं मत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केलं आहे. दि इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर आणि सिंचन सहयोग यांच्या वतीनं काल औरंगाबाद इथं घेण्यात आलेल्या 'सिंचन आणि समन्यायी पाणी वाटप जायकवाडी प्रकल्प' या परिसंवादाचं उद्घाटन बागडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. फुलंब्री धरणातलं पाणी शेतकऱ्यांना जलवाहिनीद्वारे देण्यात येणार असून, या कामाच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत हे पाणी देण्यात येणार असून त्यांनी ठिबक सिंचनाद्वारे हे पाणी वापराचयं आहे, असं बागडे यांनी सांगितलं.

****

     

 तीन राज्यात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये लिंगायत धर्माच्या संवैधानिक मान्यतेस विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांना आपला समाज सत्तास्थानी विराजमान होऊ देणार नाही, असा इशारा  राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी काल लातूर इथं पत्रकारांशी बोलतांना  दिला. संपूर्ण देशातल्या  लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देण्यात यावी आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी लिंगायत धर्मियांची लोकशाही मार्गानं  आंदोलनं  चालू आहेत. देशपातळीवर चालणारं हे आंदोलन  धर्म मान्यतेशिवाय थांबणार नाही असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं . 

****



 औरंगाबाद महानगरपालिकेच्या चार नगरसेवकांना महापौर नंदकुमार घोडेले यांनी, एका दिवसासाठी निलंबित केलं आहे. स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांना काल मनपाच्या बैठकीत अंदाजपत्रक सादर करण्यास विरोध करणाऱ्या या तीन नगरसेवकांनी अंदाजपत्रकाच्या प्रती फाडून, त्या सभापती आणि महापौरांच्या अंगावर भिरकावल्या. त्यानंतर महापौरांनी ही कारवाई केली. या गोंधळानंतरही स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी सभागृहात एक हजार ४७५ कोटी ८७ लाख ३० हजार रूपयांचा अर्थसंकल्प जाहिर केला.

****



 २७ फेब्रुवारी २०१७ च्या प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणात दुरुस्ती करण्यात यावी या आणि इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं काल औरंगाबाद इथं प्राथमिक शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. शासनाच्या या बदलीच्या धोरणामुळे जवळपास दोन लाख शिक्षक विस्थापित होत असून त्यामुळे शासन निर्णयातल्या उणिवा दूर कराव्यात अन्यथा आगामी काळात, जेलभरो, रस्ता रोको अशी आंदोलनं करण्याचा इशारा शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी यावेळी दिला.

****

 तथागत गौतम बुध्द यांची जयंती आज उत्साहात साजरी होत आहे. औरंगाबाद शहरातल्या बुध्द लेणीवर पहाटे महापरित्राण पाठाचं वाचन करण्यात आलं. सायंकाळी पाच वाजता  क्रांतीचौकातून भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती प्रज्ञा प्रसार धम्म संस्कार केंद्राचे अध्यक्ष भदंत विशुध्दानंद बोधी महाथेरो यांनी दिली आहे. अखिल भारतीय बौध्द महासभेच्या वतीने सिद्धार्थ उद्यानामध्ये तथागत गौतम बुध्द यांच्या ध्यानस्थ मूर्तीला सकाळी आठ वाजता वंदन करण्यात येणार आहे.

****

 पंढरपूर - शेगाव पालखी राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी तोडलेल्या झाडांच्या लिलावातून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. जालन्याचे  पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली.

*****

*** 

Sunday, 29 April 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 29.04.2018 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 April 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

किडींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईपोटी राज्य सरकारनं अकराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कृषी विभागाचे मुख्य सचिव बिजय कुमार यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. नुकसान भरपाईची रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं सुमारे ३४ लाख हेक्टरवरील कपाशीचं नुकसान झाल्याचं, सरकारनं केलेल्या सर्वेक्षणात समोर आलं आहे.

****

झोपडपट्टीधारक ज्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत, त्यांना मालकी हक्काचे पट्टे  देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. नागपूर इथं आज झोपडपट्टी वासियांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. शहरातल्या झोपडपट्टीधारकांना एक लक्ष मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.

****

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त येत्या एक मे रोजी मुंबईत शिवाजी पार्कवर राष्ट्रध्वज वंदन आणि संचलन होणार आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालिम आज करण्यात आली. यावेळी राजशिष्टाचार विभाग, पोलिस दल यांच्यासह विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी या संचलनात सहभागी झाले होते.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार जयंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. आज पुण्यात प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रदेश सरचिटणीस पदावर शिवाजी गर्जे यांची तर खजिनदारपदी हेमंत टकले यांची निवड करण्यात आली आहे. 

****

परभणी - हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदार संघातून शिवसेनेनं अकोल्याचे आ़मदार गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र विप्लव बाजोरिया यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा एबी फॉर्म पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाजोरिया यांना दिला असल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

****

बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा नजिक आज कार आणि ट्रकचा अपघात होऊन दोन जण ठार तर पाच जण जखमी झाले. धुळ्याहून अकोल्याला जाणाऱ्या कारला समोरुन येणाऱ्या ट्रकने धडक दिल्यानं, हा अपघात झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.  

****

जायकवाडी धरणातून सिंचनासाठी पाणी देतांना ते जलवाहिनीतून देणं आवश्यक असल्यातं मत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केलं आहे. दि इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर आणि सिंचन सहयोग यांच्या वतीनं आज औरंगाबाद इथं आयोजित 'सिंचन आणि समन्यायी पाणी वाटप जायकवाडी प्रकल्प' या परिसंवादाचं उद्घाटन बागडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. फुलंब्री धरणातलं पाणी शेतकऱ्यांना जलवाहिनीद्वारे देण्यात येणार असून, या कामाच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत हे पाणी देण्यात येणार असून त्यांनी ठिबक सिंचनाद्वारे हे पाणी वापराचयं आहे, असं बागडे यांनी सांगितलं.

****

पंढरपूर शेगाव पालखी राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी तोडलेल्या झाडांच्या लिलावातून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. जालन्याचे  पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली. या महामार्गामुळे उद्योगधंदे, व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन, या भागाच्या विकासाला चालना मिळेल, परिणामी, परतूर तसंच मंठा तालुक्याचा कायापालट होईल, असा विश्वास लोणीकर यांनी व्यक्त केला.

****

औरंगाबाद महानगरपालिकेच्या तीन नगरसेवकांचं पद महापौर नंदकुमार घोडेले यांनी, एका दिवसासाठी निलंबित केलं आहे. स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांना आज मनपाच्या बैठकीत अंदाजपत्रक सादर करण्यास विरोध करणाऱ्या या तीन नगरसेवकांनी अंदाजपत्रकाच्या प्रती फाडून, त्या सभापती आणि महापौरांच्या अंगावर भिरकावल्या. त्यानंतर महापौरांनी ही कारवाई केली. या गोंधळानंतरही स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी सभागृहात एक हजार ४७५ कोटी ८७ लाख ३० हजार रूपयांचा अर्थसंकल्प सादर केला.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरातल्या ऐतिहासिक अवशेषांची ओळख करून घेण्यासाठी आज औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला होता. इतिहास तज्ज्ञ डॉ. दुलारी कुरेशी, रफत कुरेशी, डॉ. बिना सेंगर, आणि पुरातत्त्व विभागाचे डॉ. शिवाकांत वाजपेयी यांनी तत्कालीन मराठा आणि मुघल राजकारण आणि स्थापत्याबद्दल माहिती दिली. इतिहासप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते.

****

सर्बिया इथं झालेल्या ५६ व्या बेलग्रेड आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुमित संगवान, निकहत झरीन, आणि हिमांशू शर्मा यांनी सुवर्ण पदक पटकावली आहेत. आता पर्यंत भारताच्या खात्यात तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि पाच कांस्य पदकं जमा झाली आहेत.

//************//

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.04.2018_13.00.

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.04.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 April 2018

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ एप्रिल २०१ दुपारी १.०० वा.

****



जलसंवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमात ते आज बोलत होते. या मालिकेचा ४३वा भाग आज प्रसारित झाला. आपल्या पूर्वजांनी जलसंधारणासाठी अनेक उपाययोजना केल्या, आपण त्या आत्मसात करुन पाणी वाचवलं पाहिजे, असं ते म्हणाले. मनरेगाच्या माध्यमातूनही जलसंधारण मोठ्या प्रमाणात झाल्याचं त्यांनी नमूद केलं.



 सरकारनं तरुणांसाठी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये इंटर्नशीप करण्यासाठी ‘स्वच्छ भारत ग्रीष्मकालीन इंटर्नशीप २०१८’ हा उपक्रम सुरु केला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. सरकारच्या क्रीडा, मनुष्यबळ विकास, पेयजल या मंत्रालयांनी मिळून हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमातल्या सर्वोत्तम प्रशिक्षकाला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातील, तसंच यात सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला स्वच्छ भारत मिशनद्वारे एक प्रशस्तीपत्र आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दोन क्रेडीट पॉईंट दिले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. माय जी ओ व्ही ओपन फोरमवर या इंटर्नशीपसाठी नोंदणी करता येणार असून, जास्तीत जास्त तरुणांनी यात सहभागी होऊन, स्वच्छतेचं आंदोलन यशस्वी करावं, असं आवाहन पंतप्रधानांनी या वेळी केलं.



 राष्ट्रकुल स्पर्धेत खेळाडूंनी केलेल्या कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी, त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.   

 फिट इंडिया सारख्या चळवळी आपल्यासाठी आपल्या देशासाठी महत्त्वपूर्ण असून,योग हा त्यात सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचं त्यांनी नमूद केलं. 



 बुद्ध पौर्णिमा हा दिवस भगवान बुद्धांचं स्मरण करत त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करुन त्यांचं अनुकरण करण्याच्या जबाबदारीची आठवण करुन देत असल्याचं सांगून पंतप्रधानांनी बुद्ध पौर्णिमा, तसंच आगामी रमजान महिन्यानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. वीस वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात झालेल्या पोखरण अणु चाचणीचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.

****



 नवी दिल्ली इथं आज काँग्रेस पक्षातर्फे जनआक्रोश सभेच आयोजन करण्यात आलं आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी यावेळी विविध मुद्यांवरून सरकारवर टीका केली.

****



 उत्तराखंडमधल्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले. भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे. उत्तराखंडात गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिराचे दरवाजे यापुर्वीच उघडण्यात आले, तर बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उद्या उघडण्यात येणार आहेत. यंदाच्या यात्रेत वैद्यकीय उपचारासह विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

****



 अडॉप्ट अ हेरीटेज: 'आपली परंपरा-आपली ओळख' योजना ही पर्यटन मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण तसंच राज्य सरकार यांचा एकत्रित उपक्रम असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. सुसज्ज पर्यटनाला प्रोत्साहन देणं आणि याबाबत सहकार्य कायम ठेवणं हे या योजनेमागचं मुख्य उद्दीष्टं असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलं. या योजनेत सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या, खाजगी कंपन्या आणि उद्योग विश्वाचे प्रतिनिधी तसंच सर्वसामान्यांना पारंपारिक स्थळे आणि पर्यटन, अधिक सुलभ बनवण्यासाठीची जबाबदारी घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. 

****



 ग्रामसभा रद्द करण्याचा किंवा त्यांची संख्या कमी करण्याचा कोणताही निर्णय शासनानं घेतलेला नसल्याचं ग्रामविकास विभागानं स्पष्ट केलं आहे. गावात सौहार्दाचं वातावरण कायम ठेवण्याच्या दृष्टीनं ग्रामसभांच्या फक्त तारखा बदलण्यात आल्या असून, ज्या गावांमध्ये सामंजस्याचं वातावरण आहे ती गावं एक मे रोजीच ग्रामसभा घेऊ शकतात, असं विभागानं म्हटलं आहे.

****



 बुलडाणा जिल्हयातल्या खामगाव जवळ खाजगी बस उलटून झालेल्या अपघात एकाचा मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले. आज पहाटे हा अपघात झाला. जखमींना खामगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****



 राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष योगेश राळेभात आणि कार्यकर्ते राकेश राळेभात यांची काल अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. जामखेड इथं काल सायंकाळी  बाजार समितीच्या आवारात ही घटना घडली. राजकीय फलक लावण्यावरून गेल्या वर्षी झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची तक्रार मयत योगेश यांच्या भावानं दिली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जामखेड बंदची हाक दिली आहे. या प्रकरणी गोविंद दत्ता गायकवाड याच्यासह इतर ४ ते ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



 अहमदनगर इथं केडगाव भागात शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची नुकतीच हत्या झाली होती.

*****

***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.04.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 April 2018

Time 6.50AM to 7.00AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९  एप्रिल २०१ सकाळी .५० मि.

*****

Ø मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या दुष्काळ प्रवण भागातले आठ मोठे आणि ८३ छोटे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारची साडे तेरा हजार कोटी रूपयांची आर्थिक मदत

Ø कृषी क्षेत्रात उत्पादकता आणि उत्पादन वाढवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणं आवश्यक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ø जालना शहरातल्या प्रस्तावित रसायनशास्त्र शिक्षण संस्थेचं येत्या चार मे रोजी उद्घाटन

आणि

Ø आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीत सायना नेहवाल तर पुरुष एकेरीत एच एस प्रणॉय यांना कांस्यपदक

*****



 मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातल्या दुष्काळ प्रवण भागात सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारनं  सहाय्य करणार आहे. यामध्ये आठ मोठ्या आणि ८३ छोट्या प्रकल्पांचा समावेश आहे. केंद्रीय जलसंपदा मंत्रालयानं काल याबाबत जारी केलेल्या पत्रकात या प्रस्तावाला मान्यता दिल्याचं म्हटलं आहे. सुमारे १३ हजार ६५१ कोटी रुपये अंदाजे खर्चाच्या या प्रकल्पांमुळे तीन लाख ७७ हजार हेक्टरवरचं क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. छोटे प्रकल्प येत्या दोन वर्षांत तर मोठे प्रकल्प २०२२-२३ पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारला भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी बँक - नाबार्डच्या माध्यमातून कर्ज उभारणी करून, आपला वाटा उचलता येणार आहे.

****



 कृषी क्षेत्रात उत्पादकता आणि उत्पादन वाढवण्यासाठी उपलब्ध प्रगत तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहचवणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल नागपूर इथं, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत वसंतराव नाईक स्मृती सभागृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. शेतकऱ्यांसाठी शासन विविध योजना राबवत असून, या योजना आणि नव तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचणं आणि त्याचा शेतात वापर केल्यास निश्चितच उत्पादकता वाढून कृषी क्षेत्रातल्या उत्पदनात भर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****



 देशाची अर्थव्यवस्था २०१८ -१९ या चालू आर्थिक वर्षात किमान साडेसात टक्के दरानं वाटचाल करेल, असं नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. काल, मुंबई इथं आयोजित आर्थिक परिषदेत ते बोलत होते. गुंतवणुकीतली वाढ आणि क्षमतेचा पुरेपूर उपयोग, यामुळे हा विकास दर गाठणं शक्य होईल, असं ते म्हणाले. सध्या आर्थिक वातावरण अनुकूल-सकारात्मक असून चलनफुगवटाही नियंत्रणात असल्याचं, कुमार यांनी सांगितलं.



 दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी,  राज्याचं नवं उद्योग धोरण सप्टेंबर २०१८ मध्ये अंमलात येणार असल्याची माहिती दिली. राज्य शासनानं उद्योग वाढीला चालना देण्यासाठी राबवलेल्या विविध धोरणांमुळे जगातील गुंतवणुकदारांनी महाराष्ट्राला पहिली पसंती दिल्याचं सांगून उद्योगक्षेत्रात महिलांची भागिदारी वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं देसाई म्हणाले.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४३ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. त्यानंतर लगेचच या कार्यक्रमाचा मराठीत केलेला अनुवाद प्रसारीत होईल. रात्री आठ वाजता या अनुवादाचं पुर्नप्रसारण केलं जाईल.

****



 नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड, देवळा, उमराणे, येवला, आणि मालेगाव या पाच बाजार समित्यांना बरखास्तीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या बाजार समिती आवारात काही महिन्यात झालेल्या कांदा लिलावात २० व्यापाऱ्यांनी कांदा घेतला पण शेतकऱ्यांना रक्कम देण्यात आली नसल्याची तक्रार आहे. नाशिक इथं पणन मंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत या बाजार समित्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार उप जिल्हानिबंधकांनी या नोटीसा बजावल्या असून ११ मे पर्यंत त्यांना बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत.

****



 भारताच्या जीवन शैलीचं दर्शन शास्त्रीय नृत्यातून दिसून येतं तसंच देशाच्या विविध प्रांतांमधल्या नृत्यकलांनी संबंधीत भाषा-संस्कृतीची जोपासना करत ती पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचवली असं मत प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं काल महागामी गुरुकुलातर्फे  आयोजित दोन दिवसीय नृत्य विषयक चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन गोपालकृष्णन  यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. आज या महोत्सवात नृत्य विषयक परिसंवाद आणि चार चित्रपटही दाखवण्यात येणार आहेत.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 जालना शहरात उभारण्यात येत असलेल्या रसायनशास्त्र शिक्षण संस्थेचं येत्या चार मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जालना इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. जालना शहरात सिरसवाडी परिसरात २०० एकर जमिनीवर ही संस्था उभारण्यात येत असून, यासाठी सरकारनं ३९३ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या शैक्षणिक वर्षात या संस्थेत रसायन तंत्रज्ञान अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु  होणार आहे.   

****



 औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय-घाटीत निवासी डॉक्टरांनी गेल्या तीन दिवसापासून पुकारलेला संप काल मागे घेतला. रूग्णांच्या नातेवाईकांनी माराहाण केल्याच्या कारणावरून हा संप पुकारण्यात आला होता. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षाविषयक आणि अन्य मागण्यांसदर्भात घाटी प्रशासनानं संबंधित समित्यांनां ठोस पावलं उचलण्याचे आदेश दिल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांनी दिली.



 दरम्यान, घाटीचा बाह्य रूग्ण विभाग १ मे या दिवशी महाराष्ट्र दिनानिमित्त बंद राहणार आहे, मात्र ३० एप्रिल रोजी बुद्ध पौर्णिमेची सार्वजनिक सुटी असली तरीही तो चालू राहील, असं प्रशासनानं कळवलं आहे.

****



 लातूर इथं मोफत  कृत्रिम हस्तरोपण शिबीर घेण्यात आलं. शंभराहून अधिक रुग्णांनी या शिबीरात सहभाग नोंदवला. लातूरचं  विवेकानंद रुग्णालय, भारत विकास परिषद आणि महाराष्ट्र आरोग्य मंडळ, रोटरी क्लब डाऊन टाऊन पुणे यांच्या वतीनं हे शिबीर आयोजित करण्यात आलं. रोटरी इंटरनॅशनलचे माजी प्रांतपाल विजय राठी यांनी यावेळी केलेल्या भाषणात, या उपक्रमाचं  कौतुक करत, अन्य संस्थांनीही या उपक्रमाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन केलं.

****



 आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत  महिला एकेरीत  सायना नेहवाल आणि पुरुष एकेरीत एच एस प्रणॉय यांना कांस्यपदकावर समाधान मानावं लागणार आहे. या स्पर्धेत काल या दोघांनाही उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. सायनाचा चीनी तैपेईची ताई झु यिंगनं २५-२७, १९-२१ असा सलग दोन सेटमध्ये पराभव केला. तर चीनच्या चेन लाँगनं प्रणॉयचा २१-१६, २१-१८ असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला.

****



 उन्हाळी सुट्यांमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड पनवेल नांदेड या विशेष रेल्वेच्या आगामी तीन महिन्यांत २६ फेऱ्या वाढवल्या आहेत. यामध्ये नांदेडहून प्रत्येक शनिवारी सुटणाऱ्या रेल्वेच्या १३ फेऱ्या आणि पनवेलहून प्रत्येक रविवारी सुटणाऱ्या  रेल्वेच्या १३ फेऱ्या वाढवण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीनं देण्यात आली.

****



 हिंगोलीच्या जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीनं दिला जाणारा यावर्षीचा युवा पुरस्कार, सद्भाव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार भारतीया यांना जाहीर झाला आहे.

 युवा वर्गासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. येत्या एक मे रोजी या पुरस्काराचं वितरण होणार आहे. पन्नास हजार रुपये, स्मृतिचिन्ह, आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****



 परभणी जिल्ह्यात मानवत शहरातले अवैध धंदे बंद करून, गावगुंडांना आवर घालावा, अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळानं स्थानिक पोलिस प्रशासनाकडे केली आहे. काल या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं, या शिष्टमंडळामध्ये आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांचा समावेश होता.

****



 औरंगाबाद जिल्ह्यातल्या आदर्श ग्राम पाटोदा इथं येत्या दोन मे रोजी दुसऱ्या भूमिजन साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषदेच्या वतीनं आयोजित या संमेलनलाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक रा.रं बोराडे हे असतील. या संमेलनात विविध परिसंवाद, कथाकथन आणि कविसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****



 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरातल्या ऐतिहासिक अवशेषांची ओळख होण्यासाठी औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे आज हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी सात वाजता विद्यापीठ परिसरातल्या ऍथलेटिक्स मैदानापासून या वॉकला सुरूवात होईल.

*****

***