Thursday, 26 April 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 26.04.2018 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 April 2018

Time 6.50AM to 7.00AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ एप्रिल २०१ सकाळी .५० मि.

****

§   राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असावा - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी

§   जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचा मार्ग मोकळा; येत्या आठ मे पूर्वी बदल्यांचे आदेश -ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा

§   लैंगिक अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम याला आजन्म कारावास तर दोघा सहकाऱ्यांना प्रत्येकी २० वर्ष कारावास

आणि

§   नांदेड जिल्हा पोलीस भरती गैरप्रकार प्रकरणी बारा जणांना अटक

****

राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असावा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल अहमदनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडली असून, शिवसेनेच्या मंत्र्यांना त्यांचे अधिकार वापरू दिले जात नाहीत, अशी टीकाही ठाकरे यांनी केली. केडगाव दुहेरी हत्याकांडातल्या मयत शिवसैनिकांच्या कुटुंबियांची ठाकरे यांनी काल भेट घेतली. शिवसेनेने या दोन्ही कुटुंबांची जबाबदारी घेतली असून त्यांना आर्थिक मदतही देण्यात आली असल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. या हत्याकांडातल्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि या खटल्यासाठी सरकारनं विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, आदी मागण्याही ठाकरे यांनी केल्या आहेत.

****

दरम्यान, केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर शहरात निर्माण झालेल्या कायदा-सुव्यवस्थेची स्थिती हाताळताना, पोलिसखात्याला अशोभनीय वर्तन करत, कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून, अहमदनगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यातल्या चार पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी हे आदेश जारी केले.

****

राज्यातल्या ३९८ तालुक्यांपैकी आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातल्या पाच, जळगाव जिल्ह्यातले दोन आणि वाशिम जिल्ह्यातल्या एका तालुक्याचा समावेश आहे. पाणी टंचाई आणि पिकांचं नुकसान या निकषांच्या आधारे या भागात मध्यम तीव्रतेचा दुष्काळ जाहीर झाला आहे.

****

जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदली धोरणाला मुंबई उच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या आठ मे पूर्वी बदल्यांचे आदेश जारी होतील, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. त्या काल मुंबईत शिक्षक संघटनासोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होत्या. बदल्यांच्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे यामध्ये होणारे राजकीय हस्तक्षेप आणि गैरप्रकार थांबणार असून, बदली प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. बदलीसाठी ऑनलाईन अर्ज करताना शिक्षकांना २० पर्याय द्यावे लागणार आहेत, जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्यांचे आदेश मे महिन्यातच देण्याबाबत सरकार प्रयत्नशील असल्याचं, मुंडे यांनी सांगितलं. या बदल्यांमध्ये दुर्गम भागातले शिक्षक, घरापासून बरीच वर्ष दूर असलेले शिक्षक, माजी सैनिक आणि त्यांच्या पत्नी, दिव्यांग महिला, तसंच दुर्धर आजारांच्या रुग्णांना प्राधान्य दिलं जाणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.

****

स्टार्ट अपच्या माध्यमातून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही नवीन उद्योजक निर्माण करण्यात येणार असल्याचं, कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत महाराष्ट्र स्टार्ट अप सप्ताहाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. नवीन संकल्पना आणि नवीन तंत्रज्ञानावर आधारित क्षेत्रातल्या नवीन उद्योजकांनी आपले अर्ज २५ ते ३१ मे पर्यंत महाराष्ट्र राज्य नाविन्यता संस्थेकडे पाठवावेत, असं आवाहन यावेळी करण्यात आलं. स्टार्ट अप धोरण या पुस्तिकेचं प्रकाशन निलंगेकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.

****

राज्य सरकारनं गेल्या वर्षी खरेदी केलेल्या तीन हजार कोटी रुपयांच्या तुरीपैकी ९५ टक्के तुरीची डाळ तयार करणं अद्याप बाकी आहे. त्यामुळे सुमारे एक हजार कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं, अशी माहिती पणन विभागाच्या अधिकाऱ्यानं काल पीटीआयशी बोलतांना दिली. तुरीच्या साठवणुकीला कालमर्यादा असल्यानं, खराब झालेली तूर फेकून द्यावी लागेल, असंही या अधिकाऱ्यानं सांगितलं. गेल्या हंगामात तुरीचं मोठं उत्पादन झाल्यामुळे सरकारनं ६७ लाख ७४ हजार क्विंटल तूर खरेदी केली होती.

****

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. आता ही किंमत याआधीच्या प्रति क्विंटल साडे तीन हजार रुपयांवरून तीन हजार सातशे रुपये, इतकी करण्यात आली आहे. राष्ट्रीय बांबू अभियानाच्या केंद्र पुरस्कृत योजनेलाही या समितीनं मान्यता दिली आहे. या योजनेमुळे बांबू उत्पादक शेतकरी तसंच बांबूक्षेत्राशी संबंधित कामगार आणि हस्तकलाकार यांना लाभ होणार आहे.

****

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या रविवारी आणि सोमवारी केलेल्या नक्षलविरोधी कारवाईत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या आता ३९ झाली आहे. काल पोलिसांना इंद्रावती नदीत आणखी दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर.  डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम याला जोधपूरच्या विशेष अनुसूचित जाती जमाती न्यायालयानं आजन्म कारावास आणि एक लाख रुपये दंड सुनावला आहे. पाच वर्षापूर्वी आपल्या आश्रमात एका किशोरवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आसाराम याला ही शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात आसाराम याला मदत करणारे, शिल्पी आणि शरद या दोघा दोषींना न्यायालयानं, प्रत्येकी वीस वर्षं कारावासाची शिक्षा सुनावली, तर, प्रकाश आणि शिवा या दोघांची मुक्तता केली.

****

नांदेड जिल्हा पोलीस भरतीत गैरप्रकार झाल्याचं उघड झालं असून, याप्रकरणी बारा जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लेखी परीक्षेत उमेदवारांनी जाणूनबुजून कोऱ्या ठेवलेल्या उत्तरपत्रिका, संगणक परिचालकांमार्फत सोडवून घेतल्याचं, निदर्शनास आलं, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

****

परभणी जिल्ह्यातले तीन पोलिस अधिकारी आणि दहा कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळालं आहे. या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना येत्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनी, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात येणार आहे.

औरंगाबाद इथंही दोन अधिकाऱ्यांसह २३ पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर झालं असून, येत्या महाराष्ट्र दिनी त्यांना ते प्रदान केलं जाणार आहे.

****

जिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते, तिथे हुकमशाही लागू असते, असं मत, प्रसिद्ध साहित्यिक डॉ.ऋषीकेश कांबळे यांनी व्यक्त केलं आहे. राज्य शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल कांबळे यांचा, काल औरंगाबाद इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं सत्कार करण्यात आला, या सत्काराला उत्तर देताना कांबळे बोलत होते. डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी कांबळे यांच्या साहित्यावर भाष्य केलं, विचारवंत हा नेहमी व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं काम करतो. ऋषीकेश कांबळे यांचं साहित्य हे नेहमीच व्यवस्थेसमोर प्रश्न उपस्थित करत असल्याचं मत काळुंखे यांनी यावेळी व्यक्त केलं. 

****

जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या मायपाटोदा गावाचा ग्रामसेवक नागरे याच्याविरोधात सात हजार रुपये लाच मागितल्याबद्दल जालन्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदारानं खरेदी केलेल्या भूखंडाची नोंदणी करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

परभणी जिल्ह्यातल्या झोडगाव ग्राम पंचायतीच्या महिला सरपंचांच्या पतीला लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं, काल दोन हजार रुपयांची लाच घेताना, रंगेहाथ पकडलं. बळीराम डुकरे असं त्याचं नाव असून, महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत मंजूर झालेल्या धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी त्यानं लाचेची मागणी केली होती.

****

औरंगाबाद इथं येत्या ३० एप्रिल रोजी राबवण्यात येणाऱ्या महास्वच्छता अभियानात प्रत्येक व्यक्तीनं सामाजिक जबाबदारी स्वीकारून सहभागी व्हावं, असं आवाहन विभागीय आयुक्त डॉक्टर पुरूषोत्तम भापकर यांनी केलं आहे. काल सायंकाळपर्यंत शहरातला ४६० मेट्रीक टन कचरा उचलला असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

सोलापूर विभागात मध्य रेल्वेनं हाती घेतलेल्या कामामुळे काही रेल्वे गाड्या २५ एप्रिल ते २७ मे दरम्यान पूर्णत: तर काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये निझामाबाद पुणे निझामाबाद, निझामाबाद पंढरपूर निझामाबाद, नांदेड दौंड नांदेड, या गाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी संबंधित रेल्वे स्थानकांवर संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

औरंगाबादमध्ये काल इंडियन मेडिकल असोशिएशनच्या वतीनं शहरात सायकल फेरी काढूननो हॉर्न डे’ पाळण्यात आला. वाहन धारकांमध्ये ध्वनी प्रदूणाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, हा या फेरीचा उद्देश होता.

//*********//

No comments: