Tuesday, 24 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.04.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४ एप्रिल २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशात मांडला इथं राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त ग्राम स्वराज अभियानाचा प्रारंभ करतील. पंचायत राज संस्थांमध्ये ई प्रशासन रुजवण्याच्या दृष्टीनं प्रशिक्षण आणि  पायाभूत सुविधा, देण्यावर या योजनेचा भर आहे.   या कार्यक्रमातच पंतप्रधान देशभरातल्या पंचायत राज प्रतिनिधींना उद्देशून भाषण करणार आहेत. 

****



 जम्मू काश्मीर मधल्या पुलवामा जिल्ह्यात लाम जंगल परिसरात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. आज सकाळी ही चकमक सुरु झाली. या भागात दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची शक्यता असून, दोन्ही बाजुंनी मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु असल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 ज्या वसतिगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या दोन तृतीयांश असेल, अशा वसतिगृहातला प्रत्येक विद्यार्थी दर महिन्याला १५ किलो धान्य अनुदानित दरानं मिळण्यासाठी पात्र असेल, असं केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं आहे. ते काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. 

****



 महावितरण कंपनीनं राज्यात काल दिवसभरात २३ हजार ७०० मेगावॅट एवढ्या विक्रमी विजेचा पुरवठा केला आहे. वीज यंत्रणेचं मोठया प्रमाणात सक्षमीकरण आणि आधुनिकीकरण तसंच या यंत्रणेच्या देखभाल आणि दुरुस्तीची कामं नियमितपणे केल्यामुळे हा पुरवठा करणं शक्य झाल्याचं महावितरण कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

****



  कठुआ, उन्नाव इथल्या अत्याचार प्रकरणातल्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यात काल निदर्शनं करण्यात आली. वसमत तहसील कार्यालयावर काल सर्वपक्षीय मोर्चा तर आखाडा बाळापूर इथं जातीय मेणबत्ती मोर्चा काढून पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं.

*****

***

No comments: