आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Sunday, 31 October 2021
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 October 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 31 October 2021
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२१
सायंकाळी ६.१०
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १०० कोटींचा टप्पा
पार केला आहे. हे उद्दीष्ट गाठण्यामध्ये योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना 'आकाशवाणीचा सलाम'. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीच्या दोन्ही
मात्रा वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत
करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात आणि चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड - 19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या
राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी
संपर्क करू शकता.
****
** राज्यातल्या विद्यापीठांमध्ये
पुढच्या वर्षापासून जलविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार
** सरदार वल्लभभाई पटेल
जयंती तसंच माजी पंतप्रधान इंदिरा
गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त सर्वत्र अभिवादन
** प्रसिद्ध व्हायोलिनवादक संगीतकार
प्रभाकर जोग यांच्या पार्थिव देहावर पुण्यात अंत्यसंस्कार
आणि
** पेट्रोल-डिझेल तसंच गॅस दरवाढीविरोधात युवासेनेचं राज्यभर आंदोलन
****
राज्यातल्या विद्यापीठांमध्ये
पुढच्या वर्षापासून जलविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे उच्च आणि
तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत ही घोषणा केली. रत्नागिरी जिल्हा
जलसाक्षरता समिती, हिरवळ प्रतिष्ठान आणि यशदाच्या वतीनं घेण्यात आलेल्या जलकार्यशाळेच्या
उद्घाटन समारंभात ते बोलत होते. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागामार्फत राज्यभरात जलसाक्षरता
आणि जलशक्ती अभियान राबवण्यात येईल, असंही सामंत यांनी सांगितलं. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह
यांनी यावेळी केलेल्या भाषणात हवामान बदल आणि पाण्याचं विज्ञान समजून घेण्याची गरज
व्यक्त केली. शेतीला पाण्याशी जोडलं जाईल अशी व्यवस्था केली पाहिजे. राज्यात पाण्याच्या
दक्षतेविषयी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याची सूचनाही राजेंद्रसिंह यांनी केली.
****
लोहपुरुष
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना
अभिवादन केलं. मुंबईत वर्षा या शासकीय निवासस्थानी
मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. सरदार पटेल यांनी
स्वतंत्र भारताला एका सुत्रात गुंफण्यासाठी अद्वितीय असा मुत्सद्दीपणा दाखवला. आज
आपण राष्ट्रीय एकता दिवस साजरा करताना बलशाली, समृद्ध भारत निर्माण
करण्याची प्रतिज्ञा घेऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना विनम्र अभिवादन करूया, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
माजी पंतप्रधान इंदिरा
गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केलं. इंदिराजींनी आधुनिक
भारताच्या उभारणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. देशाचा सर्वांगीण विकास हा त्यांचा
ध्यास होता. त्यांचा हा ध्यास पूर्ण करण्याचा आणि एकात्म, बलशाली राष्ट्र उभारणीचा
आपण संकल्प करूया, असं आवाहन ठाकरे यांनी केलं आहे. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय संकल्प दिवस आज पाळण्यात येत
आहे.
सरदार पटेल जयंती आणि
इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त औरंगाबादसह सर्वत्रच जिल्हाधिकारी कार्यालयात
त्यांच्या प्रतिमांला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
प्रसिद्ध व्हायोलिनवादक संगीतकार
प्रभाकर जोग यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जोग यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. संगीतकार, संगीत संयोजक आणि
व्हायोलिन वादक म्हणून गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले जोग यांनी जावई
माझा भला, थांब लक्ष्मी कुंकू लावते, सतीचे वाण, दाम करी काम, भैरु पैलवान की जय, सतीची
पुण्याई, जावयाची जात, कैवारी, चांदणे शिंपीत जा, अशा अनेक चित्रपटांतल्या गाण्यांना
संगीतबद्ध केलं. याशिवाय जोग यांचं संगीत असलेली अनेक भावगीतं तसंच भक्तीगीतंही लोकप्रिय
आहेत. संगीतकार
सुधीर फडके यांचे सहाय्यक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं. ‘गीतरामायणा’तील गाण्यांना जोग
यांच्या व्हायोलिनचे सूर लाभले. गाणारं व्हायोलीन या नावानं जोग यांनी देशविदेशात
अनेक कार्यक्रम सादर केले. आकाशवाणी तसंच दूरदर्शनसाठीही जोग यांनी अनेक कार्यक्रम संगीतबद्ध
केले.
राज्य सरकारतर्फे दिला जाणारा
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, सूरसिंगार पुरस्कार, अखिल भारतीय मराठी चित्रपट
महामंडळाचा चित्रकर्मी, गदिमा पुरस्कार, पुण्याच्या भारत गायन
समाजातर्फे दिला जाणारा वसुंधरा पंडित आदी पुरस्कारांनं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.
जोग यांच्या निधनानं, व्हायोलिनला
गायला लावणारा, त्यातून आर्त आणि हळव्या भावना व्यक्त करण्याची किमया साधणारा संगीत
क्षेत्रातील एक सच्चा साधक आपण गमावला, या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोग
यांना श्रद्धांजली अर्पण केली. तर सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी जोग यांना
श्रद्धांजली अर्पण करतांना, व्हायोलिनचा जादूगार’ हरपला अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त
केल्या.
****
युवा सेनेच्या वतीने आज राज्यभर पेट्रोल-डिझेल
यासह गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद इथं युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे
यांच्या नेतृत्वात निघालेल्या सायकल फेरीत शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. इंधन
दरवाढीच्या निषेधात यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
परभणी जिल्ह्यातल्या
सोनपेठ इथं युवा सेनेच्या वतीने आज सायकल फेरी काढून आंदोलन करण्यात
आलं. खासदार संजय जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख दीपक बारहाते यांच्या नेतृत्वाखाली
युवा सेनेने सायकल रॅली काढून आपला रोष व्यक्त केला.
वाशिम, यवतमाळ, सोलापूर आणि धुळे इथंही
युवा सेनेच्या वतीन आंदोलन करण्यात आलं.
****
गावाचा विकास करण्यासाठी स्वच्छ
पाणी, परिसर स्वच्छता, फळझाडांची लागवड, शिक्षण आणि वृद्धांचा सन्मान या पंचसूत्रीचा
अवलंब करण्याचं आवाहन, औरंगाबाद जिल्ह्यातल्या आदर्श गाव पाटोदाचे राष्ट्रपती पुरस्कार
विजेते सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केलं आहे. आझादी का अमृत महोत्सवअंतर्गत परभणी
इथं ‘आमचं गाव आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत एक दिवशीय कार्यशाळेत पेरे पाटील बोलत
होते. शौचालयांच्या नियमित वापर करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर जळकोट
भागातील रस्ते खराब झाले असून, या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश राज्याचे
सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत. उदगीर जळकोट तालुक्यातल्या
विविध विकास कामासंदर्भात लातूर इथं झालेल्या बैठकीत बनसोडे बोलत होते. सार्वजनिक बांधकाम
विभागामार्फत सुरू असलेल्या बांधकामांचा आढावाही बनसोडे यांनी घेतला. ही कामं दर्जेदार
आणि गुणवत्तापूर्ण तसंच विहीत मुदतीत पूर्ण करण्यात यावीत अशा सूचना राज्यमंत्री बनसोडे
यांनी दिल्या.
****
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.10.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 October 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
भारताच्या
राज्यघटनेत विहित केलेल्या आदर्शांची भारतीय सशस्त्र दलांनी काळजीपूर्वक देखभाल केली
आहे, असं सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत यांनी म्हटलं आहे. देशानं गेल्या काही वर्षांत
जी आर्थिक प्रगती पाहिली आहे, त्याचं श्रेय या दलांनी सीमेवर आणि अंतर्गतरित्या निर्माण
केलेल्या शांततापूर्ण वातावरणाला दिलं जाऊ शकतं असं त्यांनी स्पष्ट केलं. ‘राष्ट्र
उभारणीत भारतीय सशस्त्र दलांची भूमिका’ या विषयावर आकाशवाणीतर्फे आयोजित सरदार पटेल
वार्षिक स्मृती व्याख्यानात ते नवी दिल्ली इथं बोलत होते. ‘हर काम देश के नाम’ या भावनेनं
या दलांनी आपलं ध्येय पूर्ण केलं आहे, असे कौतुकोद्गार रावत यांनी यावेळी काढले.
सरदार पटेल
यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हे व्याख्यान आज आकाशवाणीवर रात्री साडे नऊ वाजता तर दूरदर्शन
राष्ट्रीय वाहिनीवर दहा वाजता प्रसारित होणार आहे. पटेल स्मृती व्याख्यानाची १९५५ पासून
आकाशवाणीची वार्षिक परंपरा आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन
केलं आहे. यानिमित्त जाहिर दृकश्राव्य संदेशात सरदार पटेलांच्या प्रेरणेतूनच भारत सीमाबाह्य
आणि अंतर्गत आव्हानांचा सामना करण्यास सक्षम बनला असल्याचं मोदी यांनी नमूद केलं आहे.
देशहिताला सर्वोच्च मानणाऱ्या पटेल यांचं शक्तीशाली, सर्वसमावेशक, संवेदनशील, सतर्क
आणि सभ्य भारत विकसित करण्याचा मानस होता, असं पंतप्रधान म्हणाले. या अनुषंगानं समाजात
विकसित लोकतंत्रामुळेच ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या विचाराला बळकटी मिळाल्याचं मोदी म्हणाले.
****
जम्मू-काश्मीरच्या
नौशेरा-सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ काल झालेल्या भूसुरुंग स्फोटात एक अधिकारी
आणि एक जवान शहीद झाले तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत. नियंत्रण रेषेजवळ गस्त घालत
असताना हा स्फोट झाला, जखमींना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोघांची
प्रकृती गंभीर आहे. लेफ्टनंट ऋषी कुमार आणि शिपाई मनजीत बहादूर अशी शहिदांची नावं असून
लेफ्टनंट ऋषी कुमार हे बिहारमधील बेगुसरायचे तर शिपाई मनजीत सिंग सिरवेवाला हे पंजाबमधील
भटिंडा येथील रहिवासी आहेत.
****
पेट्रोल-डिझेलच्या
किमतीत आज सलग पाचव्या दिवशी वाढ झाली. पेट्रोल आणि डिझेल दोन्हीही आज प्रति लिटर ३५
पैशांनी महागलं आहे. कच्च्या तेलाच्या मागणी आणि पुरवठ्यात वाढत असलेल्या अंतरामुळे
सध्या इंधनाच्या दरात वाढ होत आहे. या दरवाढीमुळे आता औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर
११५ रुपये ९४ पैसे तर डिझेलचा दर १०५ रूपये ३५ पैसे झाला आहे. परभणीत पेट्रोलचा दर
११८ रूपये २५ पैसे तर डिझेलचा दर १०७ रूपये ५८ पैसे प्रतिलिटर इतका झाला आहे.
दरम्यान,
इंधन दरवाढीच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी युवासेनेकडून सायकल रॅली आणि बैलगाडी मोर्चा
काढत निषेध करण्यात आला. औरंगाबाद, मुंबई, ठाणे, कोल्हापूर तसंच सोलापूर जिल्ह्यात
अशा प्रकारचा निषेध करण्यात आला.
****
प्रख्यात
व्हायोलिनवादक संगीतकार प्रभाकर जोग यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं. ते ८९ वर्षांचे
होते. संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक म्हणून गेल्या ६० वर्षांहून अधिक
काळ ते कार्यरत होते. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटाच्या संगीतात त्यांचं बहूमूल्य
योगदान आहे. संगीतकार सुधीर फडके यांचे सहाय्यक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं.
‘गीतरामायणा’तील गाण्यांना जोग यांच्या व्हायोलिनचे सूर लाभले आहेत. राज्य सरकारतर्फे
दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, सूरसिंगार पुरस्कार, अखिल भारतीय मराठी
चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी, गदिमा पुरस्कार, पुण्याच्या भारत गायन समाजातर्फे दिला
जाणारा वसुंधरा पंडित आदी पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.
****
भारतीय रिझर्व्ह
बँकेनं आता पाच कोटी रूपयांपेक्षा कमी कर्ज घेणाऱ्या कर्जदारांसाठी चालू खात्यावरचे
निर्बंध आणखी शिथिल केले आहेत. संबंधितांना निर्बंधांशिवाय चालू खाते तसंच कॅश क्रेडिट
आणि ओव्हरड्राफ्टच्या सुविधा उपलब्ध होतील. येत्या एका महिन्याच्या आत हे बदल अमलात
आणायला बँकाना सांगण्यात आलं आहे. अशा खातेदारांची कर्जाची रक्कम जर पाच कोटींहून अधिक
झाली तर त्यांना ते बँकेला कळवावं लागणार असून बँक तसं घोषणापत्रच लिहून घेईल. पाच
कोटींच्या वरील कर्जदारांना मात्र ज्या बँकेत त्यांनी कॅश क्रेडिट किंवा ओव्हर ड्राफ्टची
सुविधा घेतली असेल अशा बँकेत चालू खातं उघडावं लागणार आहे.
****
टी-२० क्रिकेट
जागतिक स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. प्रारंभीच्या लढतीत पाकिस्तानविरुद्ध
पराभव पत्करावा लागल्यानं उपांत्य फेरीत प्रवेसासाठी भारताला या सामन्यात विजय मिळवणं
आवश्यक आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडचीही अशीच स्थिती आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार होण्याची
शक्यता आहे.
****
पर्यटन अथवा
इतर कारणांसाठी परदेशात जाऊ इच्छिणारे नागरिक तसंच शासकीय आणि खासगी आस्थापनेवर कार्यरत
कर्मचाऱ्यांना कोविशील्ड लशीची दुसरी मात्रा, ८४ ऐवजी २८ दिवसानंतरच घेता येणार आहे.
मुंबई महापालिका प्रशासनानं यासंदर्भात सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. शासकीय आणि खासगी
आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना लस घेताना वैध ओळखपत्र सादर करणं आवश्यक असेल.
****
Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.10.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३१ ऑक्टोबर
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रीय एकता दिवस आज देशभरात साजरा केला जात आहे.भारताचे पहिले गृहमंत्री
सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४६वी जयंती. त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं हा दिवस साजरा करण्यात येतो. राष्ट्रपती रामनथ कोविंद यांनी
आज दिल्ली इथं पटेल चौकातील सरदार पटेलांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करत अभिवादन केलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या ट्वीटर संदेशात सरदार पटेल यांनी इच्छाशक्ती,
सशक्त नेतृत्व आणि असिम देशभक्तीच्या जोरावर वैविध्यपूर्ण देशाला एकसंध ठेवत एक राष्ट्र
म्हणून प्रस्थापित केल्याचं सांगितलं.
गुजरात मधल्या केवडीया इथं सुप्रसिध्द ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या सरदार
पटेलांच्या भव्य पुतळ्याच्या ठिकाणी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या प्रमुख
उपस्थितीत पोलिस दलातर्फे विशेष संचलन तसंच सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात
आलं.
****
देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत आता १०६ कोटींहून अधिक संख्येचा
टप्पा यशस्वीरीत्या पार झाला आहे. आतापर्यंत १०६ कोटी, सात लाख ३९ हजार लसींच्या मात्रा
देशभरात देण्यात आल्या आहेत. त्यात काल दिवसभरात ६१ लाख ९९ हजारांहून अधिक जणांचं लसीकरण
झालं.
****
द्रुतगती महामार्गांवर होणाऱ्या अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठीच्या
रस्ता मापक- रोड मार्किंग यंत्राचं उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी
यांच्या हस्ते काल दिल्ली इथं झालं. गडकरी यांच्या ‘प्रगती का हायवे’ या अभियानाला
हे यंत्र समर्पित असून यंत्राला प्रगती - एन. जी. अर्थात नितिन गडकरी यांचंच नाव देण्यात
आलं आहे. नागपूरमध्ये विकसित हे यंत्र स्वयंचलित पद्धतीनं चार तासांपर्यंत रस्तेविषयक
मापन-नोंद घेऊ शकतं त्याद्वारे अपघातांवर आळा घालण्यास मदत होत असल्याचं यंत्राच्या
निर्मात्या उद्योजिका मनीषा नखाते यांनी सांगितलं आहे.
****
लातूर महापालिकेतर्फे शहर स्वच्छता-कचरा वर्गीकरणासाठी घेतलेल्या स्पर्धेचा
निकाल जाहीर झाला आहे. घरातला ओला, सुका तसंच घातक कचरा नियमितपणे वेगवेगळा करून देणारे
शहराच्या चार प्रभागातले ८७ नागरिक या स्पर्धेत विजेते ठरले. सर्व विजेत्यांना महापौर
विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते बक्षीस म्हणून चांदीची नाणी देण्यात आली.
****
TEXT: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.10.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 October 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१
ऑक्टोबर
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ही उद्दीष्टपूर्ती
करण्यामध्ये योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना आकाशवाणीचा सलाम. कोरोना
विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच,
आणि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा,
सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती
आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०-
२६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ६३ पूर्णांक ९४ टक्के मतदान,
मंगळवारी मतमोजणी.
·
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय
एकता दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमाचं आयोजन, माजी पंतप्रधान इंदिरा गांधीनाही पुण्यतिथिनिमित्त
आदरांजली.
·
राज्यात एक हजार १३० नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात
दोन जणांचा मृत्यू तर ५२ बाधित.
·
महाविकास आघाडी सरकार मुस्लीम आरक्षणाच्या मुद्यावरून अल्पसंख्याकांची
दिशाभूल करत असल्याचा एमआयएम पक्षाचे प्रमुख खासदार असदउद्दीन ओवैसी यांचा आरोप.
·
औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत
संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवी आणि पद्वव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १५
नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ.
आणि
·
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत-न्युझीलंड यांच्यात
सामना.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल ६३ पूर्णांक ९४ टक्के मतदान नोंदवलं
गेलं. मतदानादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नाही, शांततेत मतदान पार पडलं. काँग्रेसचे
जितेश अंतापूरकर, भारतीय जनता पक्षाचे सुभाष साबणे, वंचित बहुजन विकास आघाडीचे उत्तम
इंगोले, जनता दल धर्मनिरपेक्षचे विवेक केरूरकर यांच्यासह एकूण बारा उमेदवारांचं राजकीय
भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. मतमोजणी परवा मंगळवारी होणार आहे.
दरम्यान,
१४ राज्यात विधानसभेच्या ३० जागांसाठी, तसंच मध्य प्रदेशातल्या खांडवा, हिमाचल प्रदेशातील
मंडी तसंच दादरा आणि नगर हवेली या तीन लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठीही काल
मतदान झालं.
****
देशाचे
पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज सर्वत्र राष्ट्रीय एकता दिवस म्हणून
साजरी केली जात आहे. यानिमित्तानं देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
गुजरातमध्ये अहमदाबाद इथं ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या सरदार पटेलांच्या भव्य पुतळ्याच्या
परिसरात विशेष संचलनचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमाला
हजर राहणार आहेत.
आकाशवाणीच्या
सरदार पटेल स्मृती व्याख्यानमालेतलं यंदाचं पुष्प संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत
गुंफणार आहेत. ‘राष्ट्र निर्मितीत भारतीय सेनादलांचं योगदान’ हा त्यांच्या व्याख्यानाचा
विषय आहे. आज रात्री साडेनऊ वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून या व्याख्यानाचं
प्रसारण होणार आहे.
माहिती
आणि प्रसारण मंत्रालयाचा चित्रपट विभागही ‘आजादी का अमृत महोत्सवा’चा एक भाग म्हणून
सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर आधारित जीवनपट दाखवून, आदरांजली वाहणार आहे. विभागाचं
संकेतस्थळ आणि युट्यूब वाहिनीवर आज हा माहितीपट प्रसारित केला जाईल.
माजी
पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभर आदरांजली वाहिली
जात आहे. यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
राज्य
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२२ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत
प्रमाणपत्र अर्थात दहावी तसंच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीच्या परीक्षेसाठी
विद्यार्थ्यांना २२ नोव्हेंबर पासून खासगीरित्या अर्ज क्रमांक १७ भरता येणार आहेत.
या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
यांनी केलं आहे. दहावी तसंच बारावीच्या विद्यार्थ्यांनी संबंधित संकेतस्थळावर २२ नोव्हेंबर
ते ६ डिसेंबर या कालावधीत अर्ज करणं अपेक्षित आहे.
****
अभिनेता
शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काल
जामीनावर सुटका झाली. अंमली पदार्थ प्रकरणी आर्यन गेल्या २६ दिवसांपासून अटकेत होता.
अभिनेत्री जुही चावला हिनं आर्यनसाठी जामीन दिला. आर्यन काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास
तुरुंगातून सुटल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान,
अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या पश्चिम विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी काल मुंबईत
राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली. जात पडताळणी
बाबत आपल्यावर होत असलेल्या आरोपांच्या संदर्भात बाजू मांडण्यासाठी हलदर यांची भेट
घेतल्याचं, वानखेडे यांनी सांगितलं. वानखेडे यांनी या भेटीत आपल्याकडे, त्यांचं जात
प्रमाणपत्र, तसंच नोकरीच्या वेळी सादर केलेली विविध कागदपत्र सुपूर्द केली, अशी माहिती
हलदर यांनी दिली.
****
येत्या
दोन वर्षात ग्रामीण स्वयंसहाय्यता गटांच्या अडीच कोटी महिलांना उपजिविकेसाठी मदत करणार
असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. या गटाच्या महिलांना प्रतिवर्षी एक लाख रुपये उत्पन्न
मिळवण्यास सक्षम करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं, ग्रामीण विकास मंत्रालयानं म्हटलं
आहे. या योजनेत ७० लाख बचत गटांच्या ७ कोटी ७० लाख महिलांचा समावेश झाला असल्याची माहिती
मंत्रालयानं दिली आहे.
****
मॅट्रिकोत्तर
शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, इतर मागासवर्गीय-ओबीसी, भटक्या आणि विमुक्त जाती-व्हीजेएनटी,
विशेष मागासवर्गीय-एसबीसी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी, २९२ कोटी ८१ लाख ८५ हजार
रुपये राज्य शासनानं मंजूर केले आहेत. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार
यांनी ही माहिती दिली. ही रक्कम महाडीबिटी प्रणालीद्वारे वितरित केली जाणार आहे. यापूर्वी
सप्टेंबरमध्ये ४३६ कोटी रुपये रक्कम वितरित करण्यात आले होते.
****
राज्यात
काल एक हजार १३० नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या ६६ लाख नऊ हजार, ९०६ झाली आहे. काल २६ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४० हजार
१९६ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल दोन हजार
१४८ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६४ लाख ४९ हजार १८६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून
मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ५७ शतांश टक्के झाला आहे. राज्यात
सध्या १६ हजार ९०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात
काल ५२ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
यात औरंगाबाद जिल्ह्यातील एक महिला आणि लातूर जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद
आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी १३ नवे रुग्ण आढळले. लातूर ११, बीड आठ, नांदेड
पाच, तर जालना आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळला. परभणी जिल्ह्यात
काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
महाविकास
आघाडी सरकार मुस्लीम आरक्षणाच्या मुद्यावरून अल्पसंख्याकांची दिशाभूल करत असल्याचा
आरोप एमआयएम पक्षाचे प्रमुख खासदार असदउद्दीन ओवैसी यांनी केला आहे. ते काल औरंगाबाद
जिल्ह्यात खुलताबाद इथं पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह बहुतांश
पक्षांनी मुस्लीमांचा वोट बँक म्हणून वापर केला, राजकारणातल्या संधी मात्र नाकारल्या,
असं मत त्यांनी व्यक्त केलं. खासदार इम्तियाज जलील यावेळी उपस्थित होते. मुस्लीम आरक्षणासाठी
मुंबईपर्यंत दुचाकी तिरंगा यात्रा काढण्याची घोषणा खासदार जलील यांनी यावेळी केली.
****
औरंगाबादच्या
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत असलेल्या विविध विभागांसह संलग्नित
महाविद्यालयांमध्ये पदवी आणि पद्वव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत
मुदतवाढ देण्यात आली आहे.
कुलगुरु
डॉक्टर प्रमोद येवले यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सध्या प्रवेश प्रक्रिया
सुरु असून थेट प्रवेश प्रक्रियाही राबवण्यात आली आहे, मात्र काही जागा अजूनही रिक्त
आहेत. बारावी नंतर अभियांत्रिकीसह अन्य तांत्रिक शाखांच्या प्रवेशासाठीच्या परीक्षेचा
निकाल उशिरा लागल्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
जालना
जिल्ह्यात शहागड इथल्या बुलढाणा नागरी सहकारी पतसंस्थेवर दरोडा टाकणाऱ्या तीन संशयितांमधल्या
दोघांना जालना पोलिसांनी बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथून काल ताब्यात घेतलं. मुकीद उर्फ
मुस्तफा कासम आणि संदीप बबन सोळंके, अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावं असून, त्यांच्या
अन्य एका साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी दिली.
संशयितांकडून बँकेतून लुटून नेलेल्या मुद्देमालापैकी साडेनऊ लाख रुपयांची रोकड आणि
तारण ठेवलेलं तीन कोटी ४२ लाख रुपयांचं सोनं हस्तगत करण्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं.
बुलडाणा अर्बन बँकेत गुरुवारी हा सशस्त्र दरोडा पडला होता.
****
‘आझादी
का अमृत महोत्सवां’तर्गत वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या
वतीने काल वर्धा शहरातून भव्य सायकल फेरी काढण्यात आली. पर्यावरण आणि आरोग्य संवर्धनाचा
संदेश देत काढण्यात आलेल्या फेरीत दीडशेहून अधिक सायकलस्वार सहभागी झाले. या सायकल
फेरीचं ठिकठिकाणी विविध सामाजिक आणि शैक्षणिक संघटनाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं.
या सायकल फेरीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याचा संदेश देण्यात आला.
****
जालना
इथल्या उर्मी संस्थेच्या वतीनं देण्यात येणारे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.
यावर्षी मुंबई इथल्या कवयित्री शिल्पा देशपांडे, मुंबई इथले प्रसिध्द शिल्पकार सुनील
देवरे, कऱ्हाड इथल्या कवयित्री विजया पाटील आणि औरंगाबाद इथले चित्रकार सुशील देवरे
यांना जाहीर झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा.जयराम खेडेकर यांनी काल वार्ताहरांशी
बोलताना दिली. पंचवीस हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं
स्वरुप आहे. संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त येत्या नऊ नोव्हेंबर रोजी या पुरस्कारांचं
वितरण होणार असल्याचं उर्मी संस्थेचे सचिव सुभाष कोळकर यांनी सांगितलं.
****
डिजिटल
शिक्षण ही काळाची गरज असल्याचं, बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे.
त्या काल अंबाजोगाई इथं खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात अटल टिंकरिंग लॅबचं उद्घाटन केल्यानंतर
बोलत होत्या. विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता आणि कल्पनाशक्ती यांची वाढ व्हावी आणि आधुनिक
तंत्र हाताळण्याची त्यांना सवय व्हावी, हा अटल टिंकरिंग लॅब उभारण्यामागचा उद्देश असल्याचं,
खासदार मुंडे यांनी सांगितलं. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा खासदार मुंडे यांच्या
हस्ते सत्कार करण्यात आला.
****
टी-ट्वेंटी
विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत-न्युझीलंड यांच्यातला प्राथमिक फेरी -सुपर १२ अंतर्गत
सामना होणार आहे. यापूर्वी भारतानं पाकिस्तानसोबत झालेला सामना गमावला आहे. त्यामुळे
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. संयुक्त अरब
अमिरातीत दुबई इथं होणारा हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता
सुरु होईल.
****
औरंगाबाद
इथल्या हर्सुल मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन
तसंच विक्री केंद्राचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
कारागृहातल्या बंदीजनांनी विणलेल्या साड्या, सतरंज्या, चादरी, टॉवेल, तयार केलेले लाकडी
झोपाळे, चप्पल स्टँड, बैलगाडी आदी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
****
औरंगाबाद
शहरालगतची गुंठेवारी बांधकामं नियमित करण्याच्या प्रक्रियेला सहा महिन्यांची मुदतवाढ
देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचं आमदार, शिवसेना
जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. गुंठेवारीबाबत
राजकीय पक्षांच्या विविध भूमिका असून संबंधित मालमत्ताधारकांमध्येही अस्वस्थतेचं वातावरण
आहे. याबाबत महापालिका प्रशासन संबंधीतांसोबत येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत चर्चा करुन
पुढील निर्णय घेणार आहे.
****
Saturday, 30 October 2021
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 October 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 30 October 2021
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० ऑक्टोबर २०२१
सायंकाळी ६.१०
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १०० कोटींचा टप्पा
पार केला आहे. हे उद्दीष्ट गाठण्यामध्ये योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना 'आकाशवाणीचा सलाम'. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीच्या दोन्ही
मात्रा वेळेवर घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत
करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात आणि चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड - 19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या
राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी
संपर्क करू शकता.
****
** देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी
सायंकाळी
पाच वाजेपर्यंत
६० पूर्णांक ६० टक्के मतदान
** अतिवृष्टीग्रस्तांना अल्प मदतीच्या निषेधार्थ भाजपचं १ नोव्हेंबरला काळ्या
फिती लावून आंदोलन
** शहागड इथल्या बुलडाणा अर्बन
बँकेत दरोडा टाकणाऱ्या तिघा संशयितांपैकी दोघांना अटक
आणि
** फ्रेंच खुल्या बॅटमिंटन
स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूचं आव्हान संपुष्टात
****
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर
विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६० पूर्णांक ६० टक्के मतदान झालं. काँग्रेसचे जितेश अंतापूरकर, भाजपचे सुभाष साबणे, वंचित बहुजन
आघाडीचे उत्तम इंगोले, जनता दल धर्मनिरपेक्षचे विवेक केरूरकर यांच्यासह एकूण बारा उमेदवारांचं
राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. मतमोजणी येत्या मंगळवारी होणार आहे. दरम्यान,
१४ राज्यात विधानसभेच्या ३०
जागांसाठी, तसंच मध्य प्रदेशातल्या
खांडवा, हिमाचल प्रदेशातील मंडी
तसंच दादरा आणि नगर हवेली या तीन लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान
झालं.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च
माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२२ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र
अर्थात दहावी तसंच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीच्या परीक्षेसाठी
विद्यार्थ्यांना २२ नोव्हेंबर पासून खासगीरित्या अर्ज क्रमांक १७ भरता येणार आहे.
या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं
आहे. दहावी
तसंच बारावीच्या विद्यार्थ्यांनी संबंधित संकेतस्थळावर २२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या
कालावधीत अर्ज करणं अपेक्षित आहे.
****
अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज जामीनावर सुटका झाली. अंमली पदार्थ प्रकरणी आर्यन गेल्या २६ दिवसांपासून अटकेत होता. अभिनेत्री जुही चावला हिनें आर्यनसाठी जामीन दिला. आर्यन आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास तुरुंगातून सुटल्याचं सूत्रांनी सांगितलं.
****
येत्या दोन वर्षात
ग्रामीण स्वयंसहाय्यता गटांच्या अडीच कोटी महिलांना उपजिविकेसाठी मदत करणार असल्याचं सरकारनं
म्हटलं आहे. या गटाच्या महिलांना प्रतिवर्षी एक लाख रुपये उत्पन्न मिळवण्यास सक्षम करण्याचे प्रयत्न केले जात
असल्याचं, ग्रामीण विकास
मंत्रालयानं म्हटलं आहे. या योजनेत ७० लाख बचत गटांच्या ७ कोटी ७० लाख महिलांचा समावेश असल्याची माहिती
मंत्रालयानं दिली आहे.
****
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अल्प मदत देणाऱ्या
ठाकरे सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाचे १ लाख कार्यकर्ते परवा १ नोव्हेंबरला
काळ्या फिती लावून आंदोलन करणार असल्याची माहिती पक्षाचे मुंबई प्रदेश मुख्य प्रवक्ते
केशव उपाध्ये यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. गेल्या दोन वर्षांपासून
वादळं, अतिवृष्टी, नापिकीमुळे भरडल्या गेलेल्या शेतकऱ्याच्या हातात सरकारी मदतीचा एक
पैसादेखील पडलेला नसल्याने राज्यातील शेतकंऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी
केला. शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन केलं जाईल, अशी माहिती त्यांनी
दिली.
****
जालना जिल्ह्यातल्या शहागड इथल्या बुलडाणा अर्बन
बँकेत दरोडा टाकणाऱ्या तीन संशयितांमधल्या दोघांना जालना पोलिसांनी बीड जिल्ह्यातल्या
गेवराई इथून आज ताब्यात घेतलं. मुकीद उर्फ मुस्तफा कासम आणि संदीप बबन सोळंके, अशी
ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावं असून, त्यांच्या अन्य एका साथीदाराचा शोध सुरू असल्याची
माहिती पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी दिली. संशयितांकडून बँकेतून लुटून नेलेल्या
मुद्देमालातील साडेनऊ लाख रुपये रोख आणि तारण ठेवलेले तीन कोटी ४२ लाख रुपयांचे सोने
जप्त करण्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं. बुलडाणा अर्बन बँकेत परवा गुरुवारी सायंकाळी
हा सशस्त्र दरोडा पडला होता.
****
आझादी का अमृत महोत्सवा अंतर्गत वर्धा इथल्या
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या वतीने आज वर्धा शहरातून भव्य
सायकल फेरी काढण्यात आली. पर्यावरण आणि आरोग्य संवर्धनाचा संदेश देत काढण्यात आलेल्या
फेरीत दीडशेहून अधिक सायकलस्वार सहभागी झाले. या सायकल फेरीचं ठिकठिकाणी विविध सामाजिक
आणि शैक्षणिक संघटनाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. फेरीच्या मार्गावरील महापुरुषांच्या
पुतळ्यांना माला अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. या सायकल फेरीच्या माध्यमातून पर्यावरण
संवर्धन आणि आरोग्याचा संदेश देण्यात आला.
****
फ्रेंच खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या
उपांत्य फेरीत भारताच्या पी व्ही सिंधूचं आव्हान संपुष्टात आलं आहे. जपानच्या साकाया
ताकाहाशीने सिंधूचा पराभव केला. सामन्यात पहिला सेट २१ - १८ असा जिंकून सिंधूनं आघाडी
घेतली होती, मात्र ताकाहाशीने पुढचे दोन्ही सेट २१-१६, २१-१२ असे जिंकत विजय मिळवला.
****
जालना
इथल्या उर्मी संस्थेच्यावतीनं देण्यात येणारे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.
यावर्षी मुंबई इथल्या कवयित्री शिल्पा देशपांडे, मुंबई इथले प्रसिध्द शिल्पकार सुनील
देवरे, कऱ्हाड इथल्या कवयित्री विजया पाटील आणि औरंगाबाद इथले चित्रकार सुशील देवरे
यांना जाहीर झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. जयराम खेडेकर यांनी आज वार्ताहरांशी
बोलताना दिली. पंचवीस हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं
स्वरुप आहे. संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त येत्या नऊ नोव्हेंबर रोजी कोठारी इंटनॅशनल स्कूलमध्ये
प्राचार्य डॉ. संध्या दुधगावकर, कवीवर्य फ.मु. शिंदे यांच्या हस्ते या पुरस्कारांचं
वितरण होणार असल्याचं उर्मी संस्थेचे सचिव सुभाष कोळकर यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद इथल्या हर्सुल मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी
तयार केलेल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन तसंच कारागृह विक्री केंद्राचं जिल्हाधिकारी
सुनील चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. कारागृहातल्या बंदीजनांनी तयार केलेल्या
साड्या, सतरंज्या, चादरी, टॉवेल, तयार केलेले लाकडी झोपाळे, चप्पल स्टँड, बैलगाडी आदी
वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
****
दिवाळीनिमित्त नाशिक
जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या ८ नोव्हेंबरपर्यंत दहा दिवस बंद राहणार
आहेत. या कालावधीत कोणत्याही
प्रकारचे लिलाव होणार नाहीत.
****
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...