Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 January 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ जानेवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
२०१६-१७ मध्ये सकल राष्ट्रीय
उत्पन्नाचा दर ७ पूर्णांक एक दशांश राहण्याचा अंदाज यंदाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात वर्तवण्यात आला आहे.
संसदेच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपतींचं अभिभाषण
झाल्यानंतर, २०१७ साठीचा आर्थिक सर्वेक्षण
अहवाल लोकसभेत सादर करण्यात आला. येत्या आर्थिक वर्षात विकास
दर पावणे सात ते साडे सात टक्क्यांच्या दरम्यान असेल, असं या
अहवालात म्हटलं आहे. दरम्यान, हा अहवाल सादर झाल्यानंतर लोकसभेचं
कामकाज उद्या सकाळपर्यंत स्थगित झालं. उद्या २०१७-१८ चा अर्थसंकल्प संसदेत सादर होणार आहे.
****
रोजगार निर्मितीमध्ये सरकार पूर्णपणे
अपयशी ठरलं असल्याचं, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. संसद परिसरात
ते वार्ताहरांशी बोलत होते. तरूणांसाठी रोजगार उपलब्ध करून देणं हा सध्या देशाला भेडसावणारा
सर्वात मोठा प्रश्न असल्याचं सांगत, राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली. संसदेच्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज पहिल्या दिवशी राष्ट्रपतींनी केलेल्या अभिभाषणात फक्त
सरकारनं राबवलेल्या विविध योजना, धोरणांचा आढावा घेतला, असंही ते म्हणाले.
****
'एच-वन बी' व्हिसावर नियंत्रण आणणारं
विधेयक अमेरिकी प्रतिनिधींच्या सभागृहात सादर करण्यात आलं असून हे विधेयक मंजूर झाल्यास
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागू शकतो. या
विधेयकातल्या तरतुदींनुसार माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना 'एच-वन बी'
व्हिसाधारकांचा पगार दुपटीनं वाढवून १ लाख ३० हजार डॉलर्स करावा लागेल. अमेरिकी नागरिकांपेक्षा
स्वस्त दरात माहिती तंत्रज्ञांनांना नियुक्त करणाऱ्या अमेरिकी कंपन्यांसाठी हा बदल
तोट्याचा ठरू शकतो, भारतातल्या माहिती तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांवरही याचा परिणाम होण्याची
शक्यता याबाबतच्या वृत्तात वर्तवण्यात आली आहे.
****
राष्ट्रीय आपत्ती निवारण दल-एनडीआरएफचा
आज बारावा वर्धापन दिन. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या
आहेत. एनडीआरएफनं आपत्तीच्या वेळेस केलेलं काम अतिशय स्तुत्य असल्याचं त्यांनी ट्विटरवरच्या
संदेशात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्रातली किमान दोन विद्यापीठं ही जगातील
सर्वोत्कृष्ट १०० विद्यापीठांच्या यादीत
येण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्नरत आहोत, असं राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे. राज्यपालांच्या गेल्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा मागोवा घेणाऱ्या ‘इन द सर्व्हिस
ऑफ द पीपल’ या कॉफीटेबल
पुस्तकाचं प्रकाशन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते
आज मुंबईत राजभवनात झालं, त्यावेळी ते बोलत
होते.
राज्यपालांनी विशेषाधिकारांचा प्रभावी वापर करुन
राज्याच्या विकासात विशेषत: आदिवासींच्या हितासाठी मोठं योगदान दिलं, असं पाटील यावेळी म्हणाल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती
रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी
उपस्थित होते
****
स्वाध्याय परिवाराचे प्रणेते दिवंगत पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या पत्नी निर्मला आठवले यांचं काल सोमवारी सायंकाळी ठाणे इथं तत्त्वज्ञान विद्यापीठातील राहत्या घरी निधन झालं. त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव
देहावर उद्या सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार होणार
आहेत. निर्मला आठवले यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त
केलं आहे.
****
गणेशजयंती उत्सव आज सर्वत्र साजरा होत आहे. या निमित्तानं ठिकठिकाणच्या गणेशमंदिरांमध्ये गणेशयाग, अथर्वशीर्ष पठणासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं.
औरंगाबादसह अनेक ठिकाणच्या गणेशमंदिरांमध्ये भाविकांनी आज सकाळपासून
दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
****
मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आज मराठा समाजाच्या वतीनं
राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे राज्यभरात मुख्य मार्गांवरची
वाहतूक काही अंशी विस्कळीत झाली.
औरंगाबाद इथं शहरातल्या सर्व प्रमुख चौकांसह जिल्ह्यातही आंदोलन
करण्यात आलं. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्यबळाचा वापर करावा लागला.
लातूर इथं शहरात प्रवेश करणाऱ्या चार मार्गासह शहरातल्या प्रमुख चौकांमध्ये आंदोलन
करण्यात आलं. परभणी
इथं आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
नांदेड
इथं एसटी बससह काही वाहनांवर दगडफेक करण्यात आली, तर एक दुचाकी पेटवून दिल्याचं वृत्त
आहे.
****
नांदेड इथून सुटणारी नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस उद्या
रद्द करण्यात आली आहे. उत्तर भारतात पसरलेल्या धुक्यामुळे अमृतसरहून नांदेडला येणारी
गाडी नियमित वेळेपेक्षा खूप उशीरा धावत असल्यामुळे उद्या ही गाडी नांदेडहून सुटणार
नाही.
दरम्यान, परळीमार्गे जाणारी नांदेड ते पुणे त्रिसाप्ताहिक
रेल्वे उद्यापासून पनवेलपर्यंत धावणार आहे.
****