आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Tuesday, 30 June 2020
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.06.2020 17.50
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 June 2020
Time 17.50 to 18.00
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० जून २०२० सायंकाळी ५.५०
****
Ø
प्रधानमंत्री गरीब कल्याण
योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची पंतप्रधानांची घोषणा
Ø
औरंगाबाद शहरात दोन कोरोना विषाणूग्रस्तांचा मृत्यू;
परभणी जिल्ह्यात तीन नवे कोविडग्रस्त रुग्ण
Ø
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर
राज्यभरातल्या संतांच्या पालख्यांचं पंढरपुराकडे प्रस्थान
आणि
Ø
संपूर्ण वीज देयक एकरकमी
भरल्यास, राज्य सरकारकडून देयकात दोन टक्के सवलत
****
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला
नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आज
देशवासियांना केलेल्या संबोधनात त्यांनी ही माहिती दिली.
आगामी काळात येणाऱ्या सण उत्सवादरम्यान
देशातला एकही नागरिक उपाशी राहू नये, यासाठी पुढचे पाच महिने प्रत्येक लाभार्थ्याला
पाच किलो गहू किंवा तांदूळ आणि एक किलो चना दाळ मोफत मिळणार असल्याचं पंतप्रधानांनी
सांगितलं. एक देश एक शिधापत्रिका या योजनेचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. देशभरातल्या
८० कोटी जनतेला लाभ देणाऱ्या गरीब कल्याण अन्न योजनेवर सरकार सुमारे ९० हजार कोटी रुपये
खर्च करत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. प्रामाणिक करदाते तसंच शेतकऱ्यांच्या
योगदानामुळे ही योजना राबवणं शक्य झालं असून, या सर्वांना नमन करत असल्याचं पंतप्रधान
म्हणाले. टाळेबंदीनंतर आतापर्यंत २० कोटी महिलांच्या जनधन खात्यात ३१ हजार कोटी रुपये
जमा केले असून, ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खत्यात १८ हजार कोटी रुपये जमा केले असल्याची
माहिती पंतप्रधानांनी दिली.
बदलत्या हवामानात नागरिकांनी
प्रकृतीची अधिक काळजी घ्यावी, कोविड प्रतिबंधासाठी नियमांचं गांभीर्यानं पालन करावं,
उद्यापासून सुरू होणाऱ्या अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यातही नागरिकांनी आवश्यक खबरदारी
घ्यावी, मास्कचा वापर करावा, हात वारंवार धुवावेत, आदी सूचनाही पंतप्रधानांनी केल्या.
****
दरम्यान कोरोना विषाणूवर औषध
संशोधनासंबंधीची एक आढावा बैठक आज नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात
आली. या बैठकीत पंतप्रधानांनी या औषधासाठीची चतु:सूत्री नमूद केली. हे औषध परवडणाऱ्या
दरात असावं, सर्वांसाठी सहज उपलब्ध असावं, अतिसंवेदनशील वर्गाचा प्राधान्यानं विचार
व्हावा, आणि या औषधाचं संशोधन तसंच उत्पादन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं निश्चित कालमर्यादेत
व्हावं, हे चार मुद्दे ध्यानात ठेवून संशोधनाचं हे राष्ट्रीय कार्य करावं, असं पंतप्रधानांनी
सांगितलं आहे.
****
देशात कोविड -१९ च्या चाचणीसाठी प्रयोगशाळांच्या
संख्येत सातत्यानं वाढ केली जात असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
सध्या अशा एक हजार ४९ प्रयोगशाळा कोविडच्या चाचण्या घेत आहेत यात सातशे ६१ सरकारी तर
२८८ खाजगी प्रयोगशाळा आहेत. कोविड रोग्यांच्या परीक्षणातही गती येत असून गेल्या २४
तासात दोन लाख दहा हजार नमुन्याची चाचणी घेण्यात
आली तर देशात आतापर्यंत ८६ लाखाहून अधिक कोविड नमुन्याचं परीक्षण करण्यात आलं असल्याचं
मंत्रालयान म्हटलं
आहे.
****
औरंगाबाद शहरात दोन कोरोना विषाणूग्रस्तांचा मृत्यू
झाला आहे. यामध्ये एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ५८ वर्षीय पुरुषाचा तर
जुना बाजार भागातल्या एका ६१ वर्षीय महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात या संसर्गामुळे
२५९ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातली कोरोना विषाणू बाधितांची
संख्या पाच हजार ५३५ झाली आहे. जिल्ह्यात आज सकाळी २५२ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण
आढळले. यामध्ये औरंगाबाद महापालिका हद्दीतल्या १९१ तर ग्रामीण भागातल्या ६१ रूग्णांचा
समावेश आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातले दोन हजार ६६९ कोरोना विषाणू
बाधित रुग्ण बरे झाले असून, सध्या दोन हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात आज तीन नवे कोविडग्रस्त रुग्ण आढळले.
यापैकी परभणी शहरातल्या दोन आणि झरी इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी
दीपक मुगळीकर यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या
११५झाली आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात आज एकूण १७ नवे कोरोना बाधित रूग्ण
आढळले. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रूग्ण संख्या वाढत चालली असून उत्तर
सोलापूर तालुक्यात तिऱ्हे, मार्डी, पाकणी, बाणेगाव, या ठिकाणी कोरोना विषाणूचे रूग्ण
आढळले आहेत. त्याचबरोबर अक्कलकोट तालुक्यातल्या जेऊरवाडी आणि बोरगाव इथंही आज नव्यानं
कोरोनाबाधित रुग्ण सापडले.
जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या आता ३६१ झाली
आहे. सध्या रुग्णालयात २०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १७ जणांचा
मृत्यू झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात आज १९ कोरोनाबाधित रूग्ण आढळले.
जिल्हातल्या एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या आता ४४१ झाली आहे. आतापर्यंत १४ जण
या आजारानं मरण पावले असून सध्या १२० रुग्णावर उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
*****
उद्या
साजऱ्या होत असलेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातल्या संतांच्या पालख्यांनी
आज विविध ठिकाणांहून पंढरपुराकडे प्रस्थान केलं. संत ज्ञानेश्वर तसंच संत तुकाराम महाराजांच्या
पालख्यांनी आज पुणे जिल्ह्यातून अनुक्रमे आळंदी आणि देहू इथून प्रस्थान केलं. टाळ मृदुंगाच्या
गजरात मात्र मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत या पालख्या बसमधून पंढरपूरकडे मार्गस्थ
झाल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
संत निवृत्तीनाथांची
पालखी नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरहून आज सकाळी शिवशाही बसने रवाना झाली. टाळ
मृदूंगाच्या तालात हरिनामाचा जयघोष करत वीस वारकरी आणि निवृत्तीनाथ देवस्थानचे विश्वस्त
या वारीत सहभागी झाले आहेत.
रुक्मिणी
देवीची पालखी अमरावती जिल्ह्यातल्या कौंडिण्यपुरातून पंढरपूरकडे आज रवाना झाली. महिला
आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्य हस्ते यावेळी पालखीचं पूजन करण्यात आलं.
या पालखीला ४२५ वर्षांची परंपरा आहे.
पैठण
इथून संत एकनाथ महाराज यांच्या पादुकांची पालखी आज एस टी महामंडळाच्या वातानुकूलित
बसमधून पंढरपूरकडे रवाना झाली. गेल्या दोन तारखेला प्रस्थान केल्यानंतर नाथ महाराजांची
पालखी पैठण इथं नाथ महाराजांच्या समाधी मंदिरात विसावा घेत होती. प्रशासनाच्या निर्देशानुसार
फक्त २० वारकऱ्यांना वैद्यकीय तपासणी करून या बसमध्ये प्रवेश देण्यात आला. शासकीय अधिकारी
एस. एन. लाड आणि वायरलेस संचासह पोलीस कर्मचारीही या वारकऱ्यांसोबत राहणार आहेत, अशी
माहिती पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली.
दरम्यान,
उद्या पहाटे पंढरपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी
ठाकरे यांच्या हस्ते विट्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे.
****
संपूर्ण
वीज देयक एकरकमी भरल्यास, राज्य सरकार देयकात दोन टक्के सूट देणार असल्याचं, ऊर्जा
मंत्री नीतीन राऊत यांनी जाहीर केलं आहे. ते आज वीज देयकासंदर्भात पत्रकार परिषदेत
बोलत होते. टाळेबंदीच्या काळात मीटर रिडींग न घेता, सरासरी वीज वापराच्या आधारे वीज
देयकं देण्यात आली होती, मात्र जे लोक घरांना कुलूप लावून गावी गेले होते, त्यांच्या
घरी प्रत्यक्ष मीटर रिडींग घेऊन देयकात दुरुस्ती केल जाईल, असं राऊत यांनी सांगितलं.
वर्क फ्रॉम होम या संकल्पनेमुळेही या काळात वीज देयक अधिक आलं असल्याचं राऊत यांनी
नमूद केलं.
****
माजी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नमो ॲपवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. एका ट्वीटद्वारे
त्यांनी ही मागणी केली आहे. नागरिकांच्या खासगी बाबींच्या सुरक्षेसाठी ५९ चिनी ॲपवर
बंदी घालण्याचा निर्णय योग्य आहे, असं सांगत चव्हाण यांनी, नमो ॲपमधले २२ मुद्दे नागरिकांच्या
खासगी बाबी उघड करत असल्याचं या ट्वीटमध्ये नमूद केलं, असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
शिवसेना सदैव कोविड
रुग्णांवर उपचार करणारे सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सोबत असल्याचं, औरंगाबाद
इथल्या लोकप्रतिनिधींनी म्हटलं आहे. शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख आमदार अंबादास
दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाठ यांनी आज औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांची भेट घेतली, त्यावेळी झालेल्या
चर्चेनंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. कोवीड संबंधित घाटीतील सर्व यंत्रणा, खाटांची
स्थिती, घाटीतील सर्व औषधांची स्थिती याविषयी त्यांनी आढावा घेतला. गेल्या तीन ते साडेतीन महिन्यापासून सर्व डॉक्टर,परिचारिका
तसंच इतर कर्मचारी करत असलेल्या परिश्रमाला तोड नसून या सर्वांचं मनोधर्य उंचावणे आवश्यक
असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
केंद्र सरकारच्या दुसऱ्या
कार्यकाळातल्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज लातूर इथं
व्हर्च्युअल रॅली आभासी सभा घेण्यात आली. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या सभेला
संबोधित करताना, केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. रेल्वे बोगी प्रकल्पावर
आधारीत उद्योग याच भागात व्हावेत यासाठी रेल्वेमंत्री आणि इतर संबंधिताकडे आग्रह धरू असं आश्वासन दिलं.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या शाखेला अन्न धान्याच्या वीस
पाकिटं प्राप्त झाले आहेत. अखिल भारतीय ग्राहक
पंचायत चे देवगिरी प्रांत अध्यक्ष तसंच राज्य अन्न सुरक्षा समितीचे सदस्य संपतराव जळके
यांच्या प्रयत्नातून हे साहित्य जमा झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात ग्रामीण पेालिसांनी आज एक बालविवाह रोखला. वैजापूर तालुक्यातल्या करंजगाव
इथं अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक
अनंत कुलकर्णी आणि महिला तक्रार निवारण केंद्राचे पोलीस उप निरीक्षक अशोक जावळे यांनी
अल्पवयीन मुलीच्या आई वडिलांची भेट घेऊन, त्यांचं समुपदेशन केलं.
बालविवाहाला
प्रोत्साहन देणाऱ्यास एक लाख रुपये दंड आणि दोन वर्ष सक्त मजुरीच्या शिक्षेची तरतूद
आहे. पालकांनी अल्पवयीन मुलींचा विवाह न करता तिला उच्चतम शिक्षण घेण्यास प्रोत्साहित
करण्याचं आवाहन औरंगाबाद पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
*****
Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.06.2020....Afternoon Bulletin
Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 30
June 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० जून २०२० दुपारी १.०० वा.
****
देशातला
कोविड रूग्णांचा बरे होण्याचा दर ५९ पूर्णांक शून्य सहा शतांश टक्यांवर पोहोचला असून
आतापर्यंत तीन लाख ३४ हजार ८२२ लोक कोरोना संक्रमणातून पूर्ण बरे झाले आहेत. गेल्या
२४ तासात १३ हजार ९९ लोक या आजारानं बरे झाले आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासात देशात
१८ हजार ५२२ नव्या कोविड रूग्णांची नोंद झाली असून आता देशातली एकूण कोविड रूग्णांची
संख्या पाच लाख ६६ हजार ८४० झाली आहे. गेल्या २४ तासात ४१८ जण या आजारानं मरण पावले
असून एकूण मृतांची संख्या १६ हजार ८९३ झाली असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं
कळवलं आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातली कोरोना विषाणू बाधितांची संख्या पाच हजार ५३५ झाली आहे. जिल्ह्यात आज सकाळी
२५२ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद महापालिका हद्दीतल्या १९१
तर ग्रामीण भागातल्या ६१ रूग्णांचा समावेश आहे. शहरात काल एका खाजगी रुग्णालयात एका
५८ वर्षीय पुरुषाचा तर जुना बाजार भागातल्या एका ६१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. आतापर्यंत
जिल्ह्यात २५९जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत दोन हजार ६६९ कोरोना विषाणू बाधित
रुग्ण बरे झाले असून, सध्या दोन हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनानं
कळवलं आहे.
****
परभणी
जिल्ह्यात आज तीन नवे कोविडग्रस्त रुग्ण आढळले. यापैकी परभणी शहरातल्या दोन आणि झरी
इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ११५ झाली आहे.
****
जळगाव
जिल्ह्यात काल दिवसभरात १७० नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले. यात जळगाव शहरातले २३,
तर जिल्ह्यातल्या तालुक्यासह ग्रामीण भागातल्या १४७ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या
रुग्णांची एकूण संख्या तीन हजार ४३८ झाली आहे.
****
रत्नागिरी
जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत १९ ने भर पडली असून आता जिल्ह्याची एकूण
रुग्ण संख्या ५९९ झाली आहे. आज सापडलेल्या रुग्णांपैकी दापोली तालुक्यातल्या आडे या
एकाच गावातले १० जण असून आणखी ६ जण दापोली तालुक्यातले आहेत, इतर तीन जण रत्नागिरी
तालुक्यातले आहेत. आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ४३७ असून पंचवीस जणांचा
मृत्यू झाला आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये १२५ जण
उपचार घेत आहेत
****
राज्यात
कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, या प्रसाराला प्रतिबंध
करण्यासाठी शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत असल्याची टीका, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेश
कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे. ते उस्मानाबाद इथं बोलत होते.
रुग्णांसाठी सोयीसुविधा, पुरेशा खाटा आणि रुग्णवाहिका पुरवण्या ऐवजी मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी ३१ जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करून सर्वसामान्य जनता, मजूर
आणि गोरगरिबांवर अन्याय केल्याची टीका भोसले यांनी केली.
****
आषाढी
एकादशीचा उत्सव उद्या साजरा होत आहे. यंदा कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
फक्त मानाच्या पालख्यांना आणि मोजक्याच वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेशाला परवानगी देण्यात
आली आहे. मानाच्या पादुका आणि पालख्या आज रात्रीपर्यंत वाहनाने पंढरपूरमध्ये दाखल होणार
आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी ठाकरे यांच्याहस्ते
उद्या पहाटे पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे.
****
राज्यात
“शिवभोजन” योजनेअंतर्गत २६ जानेवारी पासून आजपर्यंत १ कोटी ८७० थाळ्यांचे वितरण झालं
आहे. गरीब जनतेसाठी ही योजना वरदान ठरत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं
आहे. राज्यात शिवभोजन योजनेची ८४८ केंद्रं कार्यरत असून ही योजना तालुकास्तरापर्यंत
राबवण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावानंतर
टाळेबंदीच्या काळात ५ रुपये थाळीप्रमाणे या योजनेतून जेवण उपलब्ध करून दिल्यानं मजूर,
स्थलांतरीत लोक, बेघर लोक तसेच बाहेर गावी अडकलेले विद्यार्थी आणि इतर सर्वच नागरिकांना
या थाळीने आधार दिल्याने, मुख्यमंत्र्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने अतिशय सुयोग्य
पद्धतीने योजनेचं सनियंत्रण आणि व्यवस्थापन केल्याबद्दल सर्व कर्मचारी-अधिकारी वर्गाचं,
तसंच शिवभोजन केंद्राच्या चालकांचं कौतुक केलं आहे.
****
कोरोना
विषाणूच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीनं मुंबईतल्या डबेवाल्यांच्या कुटुंबियांसाठी
जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. १०० डबेवाल्यांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी
१० किलो जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे.
****
पाकिस्ताननं
जम्मू काश्मीरमध्ये नौगाव सेक्टरमध्ये गोळीबार करून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. उखळी
तोफांसह इतर शस्त्रांच्या सहाय्याने पाकिस्तानकडून गोळीबार झाल्याचं, सैन्यदलाच्या
अधिकाऱ्यांनी सांगितलं. या गोळीबाराला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिल्याची माहिती
या अधिकाऱ्यांनी दिली
****
Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.06.2020....Headline Bulletin
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३० जून २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी
२५२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात १५१ पुरूष आणि १०१ महिला आहेत. आतापर्यंत
एकूण पाच हजार ५३५ कोरोनाबाधित आढळले असून दोन हजार ६६९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले
आहेत. २५९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या २६०७ रुग्णांवर उपचार सुरू
असल्याचं जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात आज १६
रूग्णांची कोरोनावर मात केली यात ८० वर्षांचे वृध्द आणि २ वर्षांच्या एका मुलीचा तसंच
अहमदनगर शहरातल्या १३ आणि संगमनेर, जामखेड तसंच अकोले तालुक्यातल्या प्रत्येकी एका
रूग्णाचा समावेश आहे सध्या १०१ रूग्णांवर उपचार सुरू असून आज सकाळी ५५ व्यक्तींचे कोरोना
अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाढे यांनी दिली.
****
मिरज इथल्या कोविड रुग्णालयात
प्लाझमा उपचार पद्धती सुरू करण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची रोग प्रतिकारक शक्ती
वाढण्यास आणि मृत्यूदर कमी होण्यास ही उपचार पद्धती उपयुक्त ठरत आहे. प्लाझमा द्यायला
तयार असणाऱ्या शंभर जणांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्याकडून मिळणारा प्लाझमा
संग्रहित करून ठेवला जाणार आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांना गरजेनुसार हा प्लाझमा
दिला जाणार आहे.
****
मुंबई इथल्या ताज हॉटेल आणि
परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. काल पाकिस्तानच्या कराची शहरातून हे
हॉटेल बाँम्बनं उडवून देण्यासंदर्भातला फोन आल्याच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा व्यवस्था
वाढवण्यात आल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं.
****
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते उद्या पहाटे तीन वाजता
विठ्ठल रुख्माईची शासकीय महापुजा केली जाणार आहे. यासाठी आज ते पंढरपूरला पोहोचणार
आहेत. यंदा कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी रद्द करण्यात
आली आहे. मानाच्या पादुका आणि पालख्या आज रात्रीपर्यंत वाहनाने पंढरपूरमध्ये दाखल होणार
आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
दुपारी चार वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयानं ट्विटर संदेशाद्वारे
ही माहिती दिली.
****
Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.06.2020....07.10
Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 30 June 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ३० जून २०२० सकाळी ७.१० मि.
****
·
टिकटॉकसह
५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.
·
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज दुपारी चार वाजता देशाला संबोधित करणार.
·
केंद्र
आणि राज्य सरकारचा टाळेबंदीची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय; कोरोना विषाणूचा
संसर्ग असलेल्या भागात कडक अंमलबजावणी करणार.
·
औरंगाबाद
जिल्ह्यात वाळूज औद्योगिक परिसरातल्या सात ग्रामपंचायतींच्या हद्दीत येत्या ४ ते १२
जुलै दरम्यान संचारबंदी लागू करण्याचा निर्णय.
·
राज्यात
पाच हजार २५७ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण, १८१ रुग्णांचा मृत्यू.
·
औरंगाबाद
जिल्ह्यात दहा रुग्णांचा मृत्यू तर २४६ नवे रुग्ण.
·
नांदेडमध्येही
एकाचा मृत्यू तर जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली आणि परभणीत रुग्णांच्या संख्येत
वाढ.
·
वीज
देयकासंबंधातल्या ग्राहकाच्या तक्रारींचं निवारण केल्याशिवाय कोणाचाही वीज पुरवठा खंडीत
न करण्याचे वीज नियामक आयोगाचे निर्देश.
आणि
·
आषाढी
एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या पहाटे सपत्निक शासकीय महापुजा.
****
लडाखमधल्या संघर्षानंतर केंद्र
सरकारनं काल टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. भारतीय सायबर गुन्हे
समन्वय केंद्रानेही अलिकडेच या धोकादायक चिनी अॅप्सवर बंदी घालण्याची सरकारला शिफारस
केली होती. सुरक्षा यंत्रणांनी सरकारला पाठवलेल्या यादीमध्ये टिक-टॉकबरोबरच युसी ब्राऊझर,
एक्झेण्डर, शेअरइट, क्लीन मास्टर, हॅलो यासारख्या अॅप्सचा समावेश आहे. सामाजिक संदेश
वहनासह, कागद पत्र साक्षांकन, खेळ, मनोरंजनात्मक चित्रफिती, ॲप देवाण घेवाण, छायांकन
आदींसाठी या ॲप्सचा वापर होतो. भारताचं सार्वभौमत्व आणि एकात्मता, देशाची सुरक्षा आणि
जनहित लक्षात घेऊन केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर
या ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याचं केंद्र सरकारनं जारी केलेल्या
पत्रकामध्ये म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
दुपारी चार वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयानं ट्विटर संदेशाद्वारे
ही माहिती दिली.
****
केंद्र आणि राज्य सरकारनं
टाळेबंदीची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग
असलेल्या भागात टाळेबंदीची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. काल केंद्र आणि राज्य सरकारनं
याबाबतचे आदेश जारी केले. या आदेशाची उद्या १ जुलैपासून अंमलबजावणी होणार आहे. केंद्र
सरकारनं टाळेबंदी हटवण्याच्या दुसऱ्या टप्प्यातले मार्गदर्शक तत्त्व जारी करताना संसंर्ग
नसलेल्या भागात मोकळीक दिली आहे. यात अनेक व्यवहार टप्प्याटप्प्यानं सुरू करण्यात येणार
असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मेट्रो रेल्वे सेवा, चित्रपट
गृह, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, सभागृह, सामुदायिक सभागृह
आदी बंदच राहणार आहेत. सामाजिक, राजकीय, मनोरंजन, क्रीडा स्पर्धा, शैक्षणिक, सांस्कृतिक
आणि धार्मिक तसंच लोकांची गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी कायम आहे. संसर्ग नसलेल्या
भागात इतर सर्व व्यवहार सुरू करण्यास परवानगी असणार आहे. रात्रीची संचारबंदीची वेळ
१० ते पहाटे पाचपर्यंत करण्यात आली आहे.
राज्य सरकारनं जारी केलेल्या
आदेशात ‘मिशन बिगीन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याच्या आदेशात संसर्ग असलेल्या आणि नसलेल्या भागांसाठी
पहिल्या टप्प्यातले बहुतांश नियम कायम ठेवले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी
संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त योग्य ती पाऊलं उचलत स्थानिक परिसरात निर्बंध
लागू करु शकतात असं राज्य सरकारनं या आदेशात म्हटलं आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनावश्यक
गोष्टींना परवानगी नाकारण्याची तसंच लोकांच्या हालचालींवर मर्यादा आणण्याची परवानगीही
त्यांना देण्यात आली आहे.
टाळेबंदीच्या या काळात सार्वजनिक,
कामाच्या ठिकाणी आणि वाहतुकीच्यावेळी चेहऱ्यावर मास्क घालणं त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी
दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचं अंतर राखणं बंधनकारक आहे. दुकानात गेल्यानंतर ग्राहकांमध्ये
योग्य अंतर राखण्याची जबाबदारी दुकानदारांवर टाकण्यात आली असून एकाचवेळी पाचपेक्षा
जास्त लोकांना दुकानात जाण्यास परवानगी असणार नाही. सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी कायम
आहे, तर लग्न आणि अंत्यविधीसाठी केवळ ५० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी कायम आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल,
विद्यापीठं, महाविद्यालयं,
शाळांची कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ई-सामग्रीचा विकास, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन
आणि निकाल जाहीर करणे आदी कामे करता येतील.
याशिवाय आंतर जिल्हा बस वाहतूक
बंद राहील, मात्र जिल्हातर्गंत बस वाहतूक प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांसह सामाजिक
अंतर आणि सुरक्षेची काळजी घेऊन सुरू राहतील, असंही या आदेशात म्हटलं आहे.
****
कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग
लक्षात घेता औरंगाबाद जिल्ह्याच्या वाळूज औद्योगिक परिसरातल्या सात ग्रामपंचायतींच्या
हद्दीत येत्या ४ ते १२ जुलै दरम्यान संचारबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला
असल्याचं जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. यावेळी
महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद उपस्थित होते.
या काळात जीवनावश्यक वस्तूंची किराणा आणि इतर दुकानेही बंद राहणार आहेत.
वाळूज म्हणजे बजाजनगर, रांजणगाव, पंढरपूर या सर्व
भागांमध्ये, इंडस्ट्रियल एरियामधे चार जुलैपासून ते १२ जुलैपर्यंत total curfew या
ठिकाणी जारी करत आहोत. Curfew दरम्यान फक्त दूध आणि मेडिकलचे source हेच फक्त open
असतील. हे आपण Mission Begin Again अंतर्गत जे industrial चक्र पुन्हा सुरू केलेलं
आहे, ते मात्र आपण या ठिकाणी थांबवू शकत नाही, ते तसंच चालू राहील. मात्र आपण ४ ते
१२ तारखेमधल्या curfew च्या अनुषंगाने सर्व उद्योगांना हे आवाहन करत आहे की जे जे उद्योग
कमीत कमी operation वर काम करू शकतात, त्यांनी तसं करावं. एक अजून महत्वाचा विषय म्हणजे
शहरातून वाळूजला जाणारी आणि वाळूजमधून शहरात होणारी movement ही ४ तारखेपासून ते १२
तारखेपर्यंत पूर्णपणे बंद राहील. कारण की हा वाळूज क्षेत्रासाठी संपूर्ण curfew आपण
संयुक्तपणे याठिकाणी जारी करत आहोत.
दरम्यान, औरंगाबाद शहरात
जनजागृती करण्याचं तसंच येत्या दहा तारखेपर्यंत परिस्थितीचं निरीक्षण करण्याचा निर्णय
घेण्यात आला. या काळात जर रुग्ण संख्या नियंत्रणात आली नाही तर त्यानंतर शहरातही आवश्यकतेनुसार
संचारबंदी लावण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
टाळेबंदीची मुदत वाढवण्यात
आल्यामुळे, राज्य सरकार येत्या ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांकडून २५ रुपये प्रति लीटर दरानं
दुध खरेदी सुरुच ठेवणार असल्याचं पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार
यांनी सांगितलं. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात
आल्याचं ते म्हणाले.
****
राज्यात काल पाच हजार २५७
नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर दिवसभरात १८१ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे
राज्यातल्या एकूण कोरोना विषाणू बाधितांची संख्या ही १ लाख ६९ हजार ८८३ इतकी झाली आहे.
राज्यात आतापर्यंत या आजारानं सात हजार ६१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात
दोन हजार ३८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ८८ हजार ९६० रुग्ण बरे झाले आहेत.
सध्या राज्यात ७३ हजार २९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल दहा
कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये उस्मानपुरा, जय भवानी नगर,
देवळाई, भावसिंगपुरा, कुंभारवाडा, सादाफ कॉलनी, शहागंज, संभाजी कॉलनी, जुना बाजार आणि
पळशी इथल्या रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात या विषाणू संसर्गामुळे मरण पावलेल्यांची
संख्या २५७ झाली आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात
काल आणखी २४६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या
पाच हजार २८३ इतकी झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रातले
१४३, तर ग्रामीण भागातले १०३ रुग्ण आहेत. तर औरंगाबाद जिल्ह्यात काल ११३ रुग्णांना
बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत दोन हजार ६६९ रुग्ण बरे झाले
असून, सध्या दोन हजार ३५७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात काल नव्याने
आणखी ६ कोरोना विषाणू बाधीत रूग्ण आढळून आले. यात छत्रपती चौक, शिवाजीनगर, देगलूर नाका,
नविन कौठा, बाफना परिसर आणि मुखेड इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात
आता एकूण बाधित रूग्णांची संख्या ३७३ झाली आहे. दरम्यान, काल एका ५३ वर्षीय पुरूषाचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या आजारामुळं मृत्यू पावलेल्या रूग्णांची एकूण
संख्या १७ झाली आहे. काल दोन रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात
आली. जिल्ह्यात आतापर्यंत २८१ रूग्ण बरे झाले आहेत.
****
जालना जिल्ह्यात काल १७ कोरोनाविषाणू
बाधित रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यात आता कोरोना विषाणू बाधितांची एकूण संख्या ५२१
झाली आहे. यापैकी ३३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत १३ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला असून, सध्या १७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
लातूर जिल्ह्यात काल आणखी
१३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. लातूर शहरातले दोन, औसा तालुक्यातले सहा,
उदगीर एक, आणि बिदर जिल्ह्यातल्या हुसनाल इथला एक रुग्ण आहे. लातूर जिल्ह्यातली एकूण
रुग्णसंख्या १७९ झाली आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल
आणखी सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये उस्मानाबाद शहरातले तीन, तुळजापूर
आणि उमरगा तालुक्यातले प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण
रुग्णसंख्या २१७ झाली आहे. त्यापैकी १६८ रुग्ण बरे झाले असून, १० जणांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात सध्या ३९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
बीड जिल्ह्यात काल पाच रूग्णांचे
अहवाल कोरोना विषाणू बाधित आले आहेत. यातील तीन रूग्ण आष्टी तालुक्यातले तर दोन रूग्ण
बीड शहरातले आहेत. यामुळे बीड जिल्ह्यातली रुग्णसंख्या आता १२१ झाली असून यापैकी १०४
रुग्ण यशस्वी उपचारानंतर घरी गेले आहेत तर तर एकूण तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
सध्या १४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात काल आणखी
चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. केंद्रा बुद्रुक इथले दोन, वसमत आणि अंधारवाडी
इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या २७० झाली आहे.
त्यापैकी २३८ रुग्ण बरे झाले असून, सध्या ३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
परभणी जिल्ह्यात काल ४ व्यक्तींचा
अहवाल कोरोना विषाणू बाधित आला आहे. यामध्ये परभणी तालुक्यातल्या झरी इथल्या ३ जणांचा
तर परभणी शहरातल्या एकाचा समावेश आहे. या दोन्ही ठिकाणांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून
घोषित करण्यात आलं आहे. काल वाढलेल्या रुग्णांमुळे परभणी जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या
११३ झाली असून यातील ९१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. तर ४ जणांचा मृत्यू झाला
आहे.
****
मुंबईत काल एक हजार २४७ नवे
कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ९२ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात काल ८३३
नवे रुग्ण, तर १२ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात आणखी १८२ रुग्ण आढळले, तर नऊ
बाधितांचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यात २३४, जळगाव १७०, सोलाप्यर ३१, तर सांगली जिल्ह्यात
काल आणखी दहा रुग्ण आढळले.
****
लातूर शहरात कोविड प्रतिबंधाचे
नियम न पाळणऱ्या ५२ जणांवर काल दंडात्मक कारवाई करण्यात आली. मास्क न वापरता फिरणारे
लोक तसंच ग्राहकांना उपाहारगृहात बसवणाऱ्या उपहारगृह चालकांचा यात समावेश आहे. नंदी स्टॉप आणि अंबाजोगाई रोड या भागात महानगरपालिका
आणि पोलिस प्रशासनानं ही कारवाई केली.
****
वीज देयक आकारणीत अधिक पारदर्शकता
आणावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचं ताबडतोब निराकरण करण्यासाठी संनियंत्रण यंत्रणा
उभारावी, असे निर्देश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं वीज कंपन्यांना दिले आहेत.
वीज ग्राहकांना जास्त रकमेची देयकं मिळत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत आयोगानं
हे निर्देश दिले आहेत. तक्रार प्राप्त झाल्यापासून एक दिवसाच्या आत त्याला प्रतिसाद
द्यावा; ज्या ग्राहकांना वीज देयक मार्च ते मे या कालावधीसाठीच्या सरासरी देयकाच्या
दुप्पट आहे, अशा ग्राहकांना देयकांचा भरणा मासिक हप्त्यांमध्ये भरण्याचा पर्याय द्यावा,
देयकासंबंधातल्या ग्राहकाच्या तक्रारींचं निवारण केल्याशिवाय कोणाचाही वीज पुरवठा खंडीत
करण्यात येऊ नये असे निर्देशही आयोगानं दिले आहेत. जर ग्राहकाचे समाधान झाले नाही तर
ग्राहकाला गाऱ्हाणे निवारण मंच आणि विद्युत लोकपाल यांच्याकडे दाद मागण्याचा पर्याय
उपलब्ध असल्याचं, आयोगानं स्पष्ट केलं आहे.
****
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते उद्या पहाटे तीन वाजता
विठ्ठल रुख्माईची शासकीय महापुजा केली जाणार आहे. यासाठी आज ते पंढरपूरला पोहोचणार
आहेत. यंदा कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी रद्द करण्यात
आली आहे. मानाच्या पादुका आणि पालख्या आज रात्रीपर्यंत वाहनाने पंढरपूरमध्ये दाखल होणार
आहेत.
दरम्यान, आषाढी वारीच्या
पार्श्वभूमीवर पंढरपूर इथं आजपासून दोन जुलैच्या
रात्री १२ वाजे पर्यंत कडक संचारबंदी
लागू करण्यात आली आहे. पंढरपूर शहर आणि १० किमी अंतरावरील गावांमध्ये ही संचारबंदी
लागू करण्यात आली आहे. अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी ही माहिती दिली. सर्वसामान्य
नागरिकांनी तसंच वारकऱ्यांनी पंढरपूरला येऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
****
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात
काल लीटरमागे अनुक्रमे पाच पैसे आणि १३ पैशांनी वाढ झाली. गेल्या तेवीस दिवसांपासून
पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.
दरम्यान, या पेट्रोल आणि
डिझेलच्या दरवाढी विरोधात कॉंग्रेस पक्षानं काल राज्यभरात आंदोलन केलं. टाळेबंदीमुळे
आर्थिक स्थिती नाजुक असलेल्या सर्वसामान्यांना पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करून दिलासा
द्यावा, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. मुंबईत पक्षाच्या कार्यालयासमोर
थोरात तसंच ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी
ते बोलत होते. थोरात यांनी पुण्यातही या आंदोलनाचं नेतृत्व केलं.
औरंगाबाद, नाशिक, सातारा,
धुळे, गडचिरोली, चंद्रपूर, सांगली तसंच परभणी, इथंही कॉंग्रेस पक्षानं आंदोलन केलं.
औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यावेळी मागण्यांचं निवेदन उपजिल्हाधिकारी रिता
मेत्रेवार यांना देण्यात आलं. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम
उस्मानी यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सातारा इथं माजी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तर धुळे इथं जिल्हा माजी मंत्री रोहिदास पाटील
यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं.
परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
निदर्शनं करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा प्रशासनाला पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं. नांदेडमध्ये
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं.
****
लातूर ते जहीराबाद राष्ट्रीय
महामार्गाच्या कामात गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नये, असे निर्देश पालकमंत्री अमित
देशमुख यांनी दिले आहेत. लातूर इथं राष्ट्रीय महामार्ग कामाच्या आढावा बैठकीत ते बोलत
होते. सुमारे ६५ किलो मीटरच्या राष्ट्रीय महामार्गापैकी ३० तीस किलोमीटर अंतराचं काम
पूर्ण झालं असून पुढील वर्षी मे पर्यंत काम पूर्ण होऊन हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला
होईल असं राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता जाधव यांनी सांगितलं.
****
परभणी शहरात मास्क न लावता
फिरणाऱ्या ११३ नागरीकांविरूद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ११ हजार ३०० रुपये
दंड वसूल करण्यात आला असल्याचं महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यात पूर्णा इथल्या
तहसील कार्यालयानं, जप्त केलेली वाळू शासनाच्या विविध घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना
स्वस्त दरात देण्याचा उपक्रम राबवला आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी
–
जप्त करण्यात आलेल्या रेतीच्या साठ्यातून घरकुल योजनेतील
लाभार्थ्यांना माफक दरात दोन बरास रेती देण्याचे कसब साधले आहे पूर्णा प्रशासनाने.
यासंदर्भात तहसीलदार वंदना म्हस्के म्हणाल्या “रमाई आणि पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल
लाभार्थ्यांकडून बांधकामासाठी रेतीची मागणी वाढू लागली. त्यानुसार पूर्णा नगर परिषद
आणि पंचायत समितीकडून लाभार्थ्यांच्या याद्या मागविण्यात आल्या. प्रतिक्षा यादीनुसार
५३ लाभार्थ्यांना प्रत्येक लाभार्थी दोन ब्रास रेती देण्यात आली.” पूर्णा महसूल प्रशासनाप्रमाणे
अन्य तालुका प्रशासनाने पुढाकार घेतल्यास घरकुल लाभार्थ्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण
होईल. आकाशवाणी बातम्यांसाठी परभणीहून विनोद कापसीकर.
****
युरिया खताची कृत्रिम टंचाई
दूर करण्याची मागणी परभणीतल्या दबाव गटानं उपजिल्हाधिकाऱ्याकडे एका निवेदनाद्वारे केली
आहे. बोगस बियांणांमुळं बियाणांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
निर्माण झालं असून यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळं कृत्रिम टंचाईबाबतची
सखोल चौकशी करून संबंधित कंपन्या आणि विक्रेत्यांविरूद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई
करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
****
उस्मानाबादसह राज्यातल्या
वाशिम, गडचिरोली आणि नंदुरबार जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार अभियान राबवण्याची
मागणी आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी केली आहे. टाळेबंदीमुळं हातचा रोजगार गेल्यानं
जिल्ह्यात आजतागायत एक लाखाहून अधिक मजूर आणि ग्रामीण नागरिकांनी स्थलांतर केले असून
रोज त्यात भर पडत आहे. जिल्ह्यात अशा नागरिकांच्या रोजगाराचा आणि चरितार्थाचा प्रश्न
गंभीर बनला असल्यानं हे अभियान राबवावं अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
****
औरंगाबाद शहरात दिव्य मराठी
या दैनिकाचे प्रकाशक, संपादक आणि पत्रकार यांच्याविरोधात दाखल गुन्ह्याचा निषेध म्हणून
उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पुतळ्याला निवेदन सादर केलं. पत्रकारांना आता
घटनाकारांनीच न्याय द्यावा, अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आली. औरंगाबाद
शहरात कोविड प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती, रुग्ण संख्या, तसंच या संसर्गामुळे
झालेले मृत्यू याबाबत या दैनिकानं वृत्त प्रकाशित केलं होतं.
****
राज्यात अनेक भागात काल जोरदार
पाऊस झाला. औरंगाबाद शहर आणि परिसरात काल संध्याकाळी आणि रात्री मुसळधार पाऊस झाला.
शहरातल्या सखल भागात पाण साचलं. जिल्ह्यातल्या फुलंब्री, गंगापूर, खुताबाद या तालुक्यांमध्येही
चांगला पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले, ओढे दुथडी भरुन वाहत आहेत.
उस्मानाबाद तालुक्यातल्या
कसबे तडवळे परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं खामसवाडी ते कसबे तडवळेदरम्यान नदीच्या पुलावरुन
पाणी वाहू लागलं. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात काल संध्याकाळी
सात वाजता मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नर्सी इथल्या गोमती नदीवरील पर्यायी पूल
वाहून गेल्यानं हिंगोली - सेनगाव संपर्क तुटल्यानं
वाहतूक ठप्प झाली आहे.
परभणी जिल्ह्यात पूर्णा,
जिंतूर, मानवतसह गंगाखेड तालुक्यात काल संध्याकाळी जोरदार पाऊस झाला.
सांगली जिल्ह्यातही काल दुपारी
जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या तासगांव, खानापूर, आटपाडी, कवठे महांकाळ तालुक्यात
हा पाऊस पडला आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मध्यरात्री मध्यम स्वरूपाचा
पाऊस झाला.
****
उस्मानाबाद जिल्हा पोलीस
कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं मुख्यमंत्री मदत निधीसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश
देण्यात आला. जिल्हाधिकारी दीपा मुंडे-मुधोळ यांच्याकडे काल हा धनादेश सुपूर्द करण्यात
आला.
****
नांदेड जिल्ह्यात सोयाबिन
बियाण्यांची उगवण न झाल्याप्रकरणी इंदूरच्या एका कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. मराठवाड्यातला हा पहिला गुन्हा नोंद झाल्याचं कृषी विभागानं सांगितलं. अनेक
शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या तक्रारीची दखल घेत वजिराबाद पोलिस ठाण्यात हा गुन्हा
नोंदवण्यात आला.
****
उस्मानाबाद इथल्या वंचित
बहुजन आघाडी शाखेच्यावतीनं तुळजापूर तालुक्यातल्या गरजू कुटुंबांना काल किराणा संचाचं
वाटप करण्यात आलं. यामध्ये दहा दिवस पुरेल अशा जीवनावश्यक वस्तुंचा समावेश आहे. टाळेबंदी
लागू झाल्यापासून सुरू असलेल्या या उपक्रमात आतापर्यंत १ हजार ७६६ गरजू कुटुंबाना हा
संच देण्यात आला आहे.
****
Subscribe to:
Posts (Atom)
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...