Tuesday, 23 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 23 JUNE 2020 TIME - 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 June 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ जून २०२० सकाळी ७.१० मि.
****
** चिनी कंपन्यांसोबत केलेले सामंजस्य करार तुर्तास जैसे थे ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय
** मंगल कार्यालय, लॉन, आणि सभागृहात लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यास राज्य सरकारची मान्यता
** राज्यात आणखी तीन हजार ७२१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण, दिवसभरात ११३ रुग्णांचा मृत्यू
** औरंगाबादमध्येही ११ रुग्णांचा मृत्यू तर १२६ नवे रुग्ण
** उस्मानाबादमध्येही एका महिलेचा मृत्यू तर जालना, नांदेड, आणि बीड जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत वाढ
** सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची कोरोना विषाणू मुक्त झाल्यानं ब्रिच कँडी रुग्णालयातून सुटी
** पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग सोळाव्या दिवशी वाढ
** आणि
** कर्जमाफी आणि पीक कर्जाचं शेतकऱ्यांना वाटप करण्याच्या मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाचं राज्यभर आंदोलन
****
राज्य सरकारनं चिनी कंपन्यांसोबत केलेले सामंजस्य करार तुर्तास जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ते रद्द केले नसल्याचं उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. हेंगली, पी एम आय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीन चिनी कंपन्यांसोबत राज्य सरकारनं १५ जून रोजी हे सामंजस्य करार केले होते. एकूण पाच हजार २० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र शासनाकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहण्यात येईल, असं देसाई यांनी सांगितलं.
****
मंगल कार्यालय, लॉन, सभागृह याठिकाणी लग्न समारंभ करण्यास राज्य सरकारनं सशर्त परवानगी दिली आहे. ५० लोकांच्या उपस्थितीतच हे कार्य पार पाडता येईल, असं शासनानं जारी केलेल्या निर्णयात स्पष्ट केलं आहे. यापूर्वी फक्त घरातच विवाह सोहळे करण्यास परवानगी होती, मात्र घराच्या परिसरात ५० लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ साजरे करण्यास अडचण होत असून इतर ठिकाणी यास परवानगी देण्याची मागणी होत होती. त्यानुसार खुले लॉन, विना वातानुकुलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह याठिकाणी ५० लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पाडण्यास परवानगी देण्यात आली.
****
राज्यात काल आणखी तीन हजार ७२१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातली एकूण रुग्णांची संख्या एक लाख ३५ हजार ७९६ इतकी झाली आहे. काल दिवसभरात ११३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या आजारानं सहा हजार २८३ जण मरण पावले आहेत. काल दिवसभरात एक हजार ९६२ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत एकूण ६७ हजार ७०६ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या राज्यात ६१ हजार ७९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल उपचारादरम्यान ११ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आठ आणि खाजगी रुग्णालयातल्या तीन जणांचा समावेश आहे. रोशनगेट, गारखेडा, कैसर कॉलनी, पुंडलिकनगर, राजा बाजार, उत्तमनगर, कोहिनूर कॉलनी, हर्सुल, पैठणगेट, आणि सिडको एन नाईनमधले हे रुग्ण होते. मृत पावलेल्या रुग्णांमध्ये सिल्लोडमधल्या एका ५५ वर्षाच्या रुग्णाचा समावेश आहे. मृतात चार महिलांचा समावेश आहे. यामुळे या आजारानं जिल्ह्यात मृत पावलेल्या रुग्णांची संख्या आता २०२ झाली आहे.
दरम्यान, काल औरंगाबाद जिल्ह्यात आणखी १२६ नवे रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या तीन हजार ६५६ एवढी झाली आहे. यापैकी दोन हजार ४६ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, सध्या एक हजार ४०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये ८३ रुग्ण हे औरंगाबाद शहरातले आहेत. ग्रामीण भागात वाळूज, बजाजनगर आणि पंढरपूरमधल्या विविध कॉलन्यांमध्ये २६ रुग्ण, गंगापूरच्या शिवाजीनगर भागात चार, भवानीनगर भागात आणि तालुक्यातल्या गाजगावला प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. औरंगाबाद तालुक्यात करमाडला तीन, मांडकीला दोन आणि पळशीला एक तसंच वैजापूर तालुक्यातल्या पालखेड आणि पैठण शहरातल्या  दारुसलाम मोहल्ल्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
****
उस्मानाबादमध्ये उपचारादरम्यान, एका ५५ वर्षीय कोरोना विषाणू बाधित महिलेचा काल मृत्यू झाला. ही महिला तुळजापूर तालुक्यातल्या माळूंब्रा इथली रहिवासी होती, काही दिवसांपूर्वी ती मुंबईहून आली होती, तिला रक्तदाब आणि  मधुमेहाचा त्रास होता अशी माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी चार नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या १८३ झाली आहे. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला, तर १३६ रुग्ण बरे झाले. सध्या ४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
जालना जिल्ह्यात काल आणखी २३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये टेंभूर्णी इथं नऊ, इंदेवाडी, मंगल बाजार, वाल्मिक नगर, संभाजीनगर इथं प्रत्येकी दोन, रामनगर, हकिम मोहल्ला, नाथ बाबा गल्ली, राज्य राखीव पोलिस दल तसंच अंबड आणि भोकरदन इथल्या प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ३८४ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २४८ रुग्ण बरे झाले आहेत. तर ११ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला.
दरम्यान, जालना शहरात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांसाठी जनता संचारबंदी लागू करण्यात आली होती. संचारबंदीची ही मुदत संपल्यानंतर काल पुन्हा शहरातल्या रस्त्यांवर लोकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
****
नांदेड जिल्ह्यात काल कोरोना विषाणू बाधेचे बारा नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता ३१७ झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांपैकी आठ रुग्ण नांदेड शहरातल्या वेगवेगळ्या भागातले आहेत. तर उर्वरित रुग्णांमध्ये नांदेड तालुक्यात पिंपळगाव इथल्या अनुक्रमे १८ आणि ३८ वर्षे वयाच्या दोन महिला, कंधार तालुक्यातल्या चिखल भोसी इथली ४५ वर्षे आणि लोहा तालुक्यातल्या रिसनगाव इथल्या १९ वर्षे वयाच्या महिलेचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातून काल १९ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यात सध्या ६५ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १४ रूग्णांचा या आजारानं मृत्यू झाला असून, २३८ रुग्ण बरे झाले आहेत.
****
बीड शहरात काल एकाच कुटुंबातले चार नवे रुग्ण आढळून आले. शहरातल्या  छोटी राज गल्ली परिसरातलं हे कुटुंब असून बाधितांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि एका १० वर्षीय बालकाचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आल्याची  माहिती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत ११६ जणांना बाधा झाली असून  ८२  हून अधिक जणांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे, सध्या ३२ जणांवर उपचार सुरू असल्याचं थोरात यांनी सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्यात अकरा कोरोना बाधित रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात एकूण २४० जण बाधित असून यापैकी  दोनशे तेवीस रुग्ण बरे झाले आहेत, आता केवळ १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, काल दिवसभरात जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती, आरोग्य विभागानं दिली आहे.
****
मुंबईत काल एक हजार १२८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर २० जणांचा मृत्यू झाला, पुणे जिल्ह्यात २१२ नवे रुग्ण, तर आठ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात १०८ नवे रुग्ण आढळले, तर दहा जणांचा मृत्यू झाला. सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात काल आणखी प्रत्येकी २७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. जळगाव ८१, नंदुरबार, पाच तर भंडारा जिल्ह्यात दोन रुग्णांची वाढ झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल १३, तर धुळे जिल्ह्यात १२ रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
****
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना काल ब्रिच कँडी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. कोरोना विषाणुची लागण झाल्यामुळे त्यांना १२ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि प्रार्थनेमुळे आपला दुसरा अहवाल नकारात्मक आला असल्याचं त्यांनी रुग्णालयातून बाहेर पडताना सांगितलं. रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर आपण आपल्या गावी जात असल्याचं मुंडे म्हणाले. मुंडे यांच्यासोबत त्यांचे खाजगी सचिव, दोन चालक आणि एक अंगरक्षक यांचेही अहवाल नकारात्मक आले आहेत, त्यामुळे त्यांनाही काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
****
जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढत असून ही चिंतेची बाब असल्याचं पालकमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. जालना इथं यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. जिल्ह्यात एकाही कोरोना विषाणू बाधिताचा मत्यू होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
****
तुळजाभवानी मंदिरासह राज्यातल्या सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळं येत्या एक जुलै पासून उघडण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी केली आहे. उद्योगांप्रमाणच  तीर्थक्षेत्र लाखो लोकांचं उपजीविकेचं साधन आहे. केंद्र सरकारनं गेल्या आठ जूनला अनलॉक-एकच्या दुसऱ्या टप्प्यात अटी शर्थींसह सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळं उघडण्याची परवानगी दिली. मात्र राज्यातली प्रार्थनास्थळं अद्याप बंद आहेत. कोरोनाविषयक सुरक्षात्मक उपाययोजनांसह ही प्रार्थनास्थळं उघडण्यास परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
****
पेट्रोल आणि डिझेलचे दर काल सलग सोळाव्या दिवशी वाढले. पेट्रोलच्या दरामधे ३३ पैसे तर डिझेलच्या दरामधे ५८ पैसे प्रतिलीटर वाढ झाली आहे. कालच्या या दरवाढीनंतर गेल्या सोळा दिवसांत पेट्रोलच्या किंमतीत लीटरमागे आठ रुपये ३० पैसे, तर डिझेलच्या किमतीत लीटरमागे नऊ रुपये ४६ पैसे वाढ झाली आहे.
****
राज्य उच्च आणि माध्यमिक शिक्षण मंडळाच्या, दहावी आणि बारावीच्या  परीक्षांचे  निकाल येत्या जुलै महिन्यात जाहीर केले जातील, असं, मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासमवेत झालेल्या आभासी बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. बारावीचे निकाल १५ जुलै पर्यंत तर दहावीचे निकाल जुलै अखेरपर्यंत लावले जातील, असं त्या म्हणाल्या. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन शिक्षण पध्दतीचा आढावा घेतला. गुगल मीट तसंच जीओ टिव्हीच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्गांची पाहणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.
****
टाळेबंदीमुळे पुढे ढकललेल्या दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ- सीबीएसई आज आपला निर्णय, सर्वोच्च न्यायालयाला कळवणार आहे. काही पालकांनी मंडळाकडे, १ ते १५ जुलै दरम्यान होणाऱ्या या परीक्षा रद्द करण्याची आणि विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन, तसच प्रात्यक्षिक परीक्षांच्या सरासरीच्या आधारावर गुण देण्याची मागणी केली होती. या मागणी संदर्भात विचार करून आपला निर्णय कळवू असं मंडळानं सर्वोच्च न्यायालयाला गेल्या आठवड्यात सांगितलं होतं.
****
उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या विविध विद्या शाखांच्या सामायिक प्रवेश परीक्षा -सीईटी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी तसंच पालकांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं, त्यांनी सांगितलं. या सीईटीच्या तारखा नव्यानं जाहीर करण्यात येतील, असं सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.
****
शेतकरी कर्जमाफी आणि पीक कर्ज या दोन मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षानं काल राज्यभरात आंदोलन केलं. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातून या आंदोलनाचं नेतृत्व केलं. मोसमी पाऊस दाखल झाला आहे, पेरण्या संपत आल्या आहेत, मात्र तरीही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याकडे पाटील यांनी लक्ष वेधलं. प्रति हेक्टर २५ हजार ते ५० हजार रुपये भरपाई दिली जात असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात येतं, प्रत्यक्षात मात्र काहीही मदत मिळालेली नसल्याचा दावा पाटील यांनी केला. ७० टक्के शेतकऱ्यांचं सुमारे ११ हजार कोटी रुपये कर्ज अजूनही थकीत असल्यानं, बँका नव्यानं पीक कर्ज देत नसल्याचं पाटील यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारनं तत्काळ योग्य निर्णय घ्यावा, असं आवाहन पाटील यांनी केलं.
औरंगाबाद, बीड, लातूर, परभणी तसंच नांदेड इथं भाजप कार्यकर्त्यांनी या मागण्यांसाठी आंदोलन केलं.
औरंगाबाद इथं पीक कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ राज्य सरकार विरोधात भाजपच्या औरंगाबाद ग्रामीण शाखेच्या वतीनं जिल्ह्यात विविध ठिकाणी निदर्शनं करण्यात आली.
नांदेड शहरात तसंच जिल्ह्यात मुदखेड इथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून नव्याने पीककर्ज वाटप करण्याची मागणी यावेळी करण्यात आली
बीड जिल्ह्यात परळी इथं भाजप कार्यकर्त्यांनी बँकांबाहेर निदर्शने केली. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड इथं राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं. दरम्यान मंत्री भुसे यांनी मंत्रालयातल्या सचिवांशी तत्काळ संपर्क साधून पीक विमा कंपनीच्या नियुक्ती बाबत निर्देश दिले असून इतर मागण्यांबाबत लवकरच कार्यवाही करू असं आश्वासन दिलं आहे.
परभणी इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निदर्शन करुन राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पीक कर्ज वाटप आणि कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी त्वरीत करावी या मागणीचे निवेदन देण्यात आलं.
****
लातूर इथं शेतकरी संघटनेनं लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा राज्यातल्या आघाडी सरकारनं केली होती. मात्र हे अनुदान मिळत नसल्यानं १ जुलै रोजी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोरे यांनी दिला आहे.
****
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज अद्याप माफ झालेले नाही अशा शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देण्याचे निर्देश बँकांना दिले असल्याचं कृषीमंत्री दादा भुसे यांनी काल बीड इथं सांगितलं. ते म्हणाले -

त्याच्यामध्ये Schedule कार्यक्रम कडून कार्यक्रम ठरवून देण्यात आलेला होता जानेवारी महिन्यापासून तर मार्च महिन्याच्या पर्यंत त्याचा आढावा घेतला आणि त्याची अंमलबजावणी मार्च -एप्रिल महिन्यापासून केली जाईल आपण बघितले असेल मार्च महिन्याच्या लॉकडाउनच्या पूर्वी ३० लाख शेतकरी या योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत त्याच्या पैकी १९ लाख शेतकरी बांधवांना १२ हजार कोटी रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेल्या उर्वरित आहेत ११ लाख शेतकरी बांधव आणि साधारत: ८ ते ९ हजार कोटी रुपये कोरोना आणि लॉकडाउन संपला प्राधान्य प्रमाणे पण पैसे वर्ग केले जातील परंतु तोपर्यंत या सर्व शेतकरी बांधवांना पिक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे अशा प्रकारचे निर्देश आणि शासन निर्णय महाराष्ट्र सरकारने काढलेला आहे
****
युरिया खताचा मोठ्या प्रमाणात साठा असतानाही शेतकऱ्यांना देण्यास नकार देणाऱ्या औरंगाबाद शहरातल्या जाधववाडीतल्या नवभारत फर्टीलायझर दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी ही माहिती दिली. कृषी मंत्री दादा भुसे यांनी रविवारी स्टिंग ऑपरेशन करुन या दुकानातला प्रकार उघडकीस आणला होता.
****
पंढरपूर इथल्या विठ्ठल आणि रूक्मिणीच्या मूर्तींवर वज्रलेप करण्याची मान्यता न्याय आणि विधी खात्यानं दिली आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीनं मूर्ती संवर्धनासाठी वज्रलेप करण्याची मागणी केली होती. आज आणि उद्या मूर्तींना वज्रलेप केला जाणार आहे.
****
राज्यातल्या विविध शासकीय कार्यालयामध्ये पद भरतीत दिव्यांग अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असं आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिलं आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी काम करणाऱ्या संवेदना संस्था तसेच सक्षम संघटनेच्या शिष्टमंडळानं देशमुख यांची भेट घेतली, यावेळी सरकारी नोकरीतला दिव्यांगांचा अनुशेष भरावा यासह दिव्यांग प्रवर्गाच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. त्यावेळी देशमुख यांनी हे आश्वासन दिलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यातल्या वडगाव एक्की इथं खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी अशोक सोपान कदम या शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे बैल अथवा ट्रॅक्टर वापरण शक्य नसल्यानं या शेतकऱ्यानं आपल्या दिव्यांग मुलगा आणि पत्नीच्या सहाय्यानं पेरणी केल्याचं कळल्यानंतर खासदार श्रृंगारे यांनी मदत केली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात बोगस बियाणांसंदर्भात तक्रारी येत असून कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करावेत, तसंच संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी जिल्हा कृषी अधिक्षक अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसंच शेतकऱ्यांना खत टंचाई भासणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री गायकवाड यांनी दिल्या आहेत.
****
परभणी जिल्ह्यात पुर्णा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांमार्फत तात्काळ कर्ज उपलब्ध  करुन द्यावं अन्यथा उद्यापासून सर्व बँकांसमोर आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षानं दिला आहे. खरीप पिकासाठी अद्याप कर्ज न मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याचं पक्षाचे तालुकाध्यक्ष अनंता पारवे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
परभणीचे ज्येष्ठ विधीज्ञ, साहित्यिक तथा रंगकर्मी रमेश कोठीखाने यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. त्यांचे झाकली मूठ, संचित, सांजवेळ, रेषा आणि रेघा हे कथासंग्रह तर शेषपर्व हा काव्यसंग्रह प्रसिध्द आहे. आकाशवाणीच्या औरंगाबाद-परभणी केंद्रावरून त्यांचे विविध कार्यक्रम प्रसारीत झालेले आहेत. आज सकाळी १० वाजता परभणीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा कारागृहातल्या ४३ कैद्यांना तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. कारागृहातल्या २७४ कैद्यांना सोडण्यासाठी जिल्हा विधीसेवा प्राधिकरणानं न्यायालयात अर्ज दाखल केले होते, त्यापैकी ४३ जणांना तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आल्याची माहिती प्राधिकरणाचे सदस्य सचिव शरद देशपांडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातल्या किने यल्लादेवी या गावात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी तातडीनं गावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांना तसंच प्रशासनाला दक्षता राखण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनानं प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक पुरवठा करावा असे निर्देशही बनसोडे यांनी दिले.
****
परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीकडून मोबाईलवर संदेश आल्यावरच आपला कापूस विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आणावा असं आवाहन जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केलं आहे. एसएमएस किंवा मोबाईलवरून संदेश न आलेल्या शेतकऱ्यांना टोकन दिलं जाणार नाही तसंच पणन महासंघामार्फत त्यांचा कापूसही खरेदी केला जाणार नाही, असं या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
परभणी इथं भारतीय रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या जिल्हा शाखेतर्फे चीन हल्ल्याचा निषेध करण्यात आला. या हल्ल्याचं सरकारनं चोख उत्तर द्यावं, चीनी वस्तूंवर बहिष्कार घालावा, पुण्यातल्या तळेगाव इथं चीनच्या सहकार्यानं उभारला जाणारा प्रकल्प रद्द करावा, टिक टॉक ॲपवर बंदी घालावी आदी मागण्यांचं निवेदन यावेळी पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.
****
परभणी जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी नांमाकित कंपन्यांचं पेरलेलं सोयाबीनचं बियाणं उगवलच नसल्यानं प्रशासनाला तक्रारींची निवेदन देण्यात आली आहेत. संबंधिताविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनांमध्ये करण्यात आली आहे. बियाणं उगवलं नसल्यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. यामुळे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याचीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, प्रहार जनशक्ती संघटनेनंही शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बनावट बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या मागणीचं निवेदन काल जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे.
****
महावितरण कंपनीच्या परभणी इथल्या मानव संसाधन विभागातला उपव्यवस्थापक प्रकाश टाक याला दोन हजार रुपयांची स्वीकारताना अटक करण्यात आली. महावितरणच्या एका सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंत्याला सेवानिवृत्तीनंतर मिळणार्या रकमेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
जालना जिल्ह्यात घनसावंगी पोलिस ठाण्याचे हवालदार गोरखनाथ मदन यांना तीन हजार रुपयांची लाच घेतांना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहाथ पकडलं. एका व्यक्तिवर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी संबंधिताकडून त्यानं ही लाच मागितली होती.
****


No comments: