आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Monday, 30 June 2025
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin,
Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 June 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० जून २०२५ सायंकाळी ६.१०
****
· विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात-५७ हजार ५०९ कोटी रुपयांच्या पुरवणी
सादर
· शालेय शिक्षणात भाषेच्या मुद्यावरून महाविकास आघाडीची घोषणाबाजी
· एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या
प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय
· पंढरपूर इथं आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर व्हीआयपी दर्शन सेवेवर निर्बंध लागू
आणि
· महावितरणच्या गो-ग्रीन योजनेचा छत्रपती संभाजीनगर विभागात पाच लाखांचा टप्पा
पार
****
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत
सुरुवात झाली. विधान भवनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
सिंहासनाधिष्ठित पुतळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे,
आणि अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच, मुख्यमंत्र्यांनी नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ यांचा सदनाला परिचय करून दिला.
त्यानंतर विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. दोन्ही सभागृहांनी संमत
केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष
राहुल नार्वेकर यांनी केली. सदस्य अमित साटम, किशोर
पाटील,
सुलभा खोडके, चेतन तुपे, नितीन देशमुख, संजय मेश्राम, अभिजित
पाटील,
समीर कुनावार आणि समाधान आवताडे यांची तालिका सदस्य म्हणून
नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर विविध खात्याच्या मंत्र्यांनी विविध शासकीय
विधेयकं सभागृहासमोर ठेवली.
दिवंगत डॉ. जयंत नारळीकर, मार्क्सवादी
कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते लहानू कोम, सामाजिक
कार्यकर्त्या डॉ. श्रध्दा टापरे आणि माजी आमदार रोहिदास देशमुख यांच्या निधनाबद्दल
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव मांडला त्यानंतर सभागृहाचं
कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
विधान परिषदेत अरुणकाका जगताप आणि डॉ.रामदास आंबटकर यांच्या
निधनाबाबत सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी शोकप्रस्ताव मांडला. शोकप्रस्ताव
संमत झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त आणि नियोजनमंत्री अजित
पवार यांनी ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळात सादर
केल्या. हा निधी प्रामुख्याने रस्तेविकास, मेट्रो
सेवा आणि सिंचनासारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी, सिंहस्थ
कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणी, महात्मा ज्योतीराव
फुले आरोग्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच दुर्बल, वंचित
समाजघटकांच्या विकासासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे.
****
महाराष्ट्राच्या जनतेला आणि भारतीय संविधानाला उत्तरदायी
असल्याचं,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत
पत्रकारांशी बोलतांना, मुख्यमंत्र्यांनी ही बाब स्पष्ट केली.
ते म्हणाले...
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
****
विधीमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विरोधी
पक्षाच्या सदस्यांनी भाषेच्या मुद्द्यावरून विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी
केली. त्यानंतर या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केलं.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार, जितेंद्र
आव्हाड यांच्यासह इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.
****
मातृभाषेवरचं प्रेम हे पक्षाच्या पलिकडे असायला हव, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं
आहे. ते आज मुंबई इथं माध्यमांशी बोलत होते. राज्य सरकारने नरेंद्र जाधव यांच्या
अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे, शिक्षणाच्या समितीवर
अर्थतज्ज्ञाची नियुक्ती करुन सरकार थट्टा करत असल्याची टीका ठाकरे यांनी केली. ते
म्हणाले...
बाईट – माजी मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे
****
वरिष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार यांची आज राज्याचे मुख्य
सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. राजेश कुमार सध्या महसूल नोंदणी आणि मुद्रांक
शुल्क तसंच वनविभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. विद्यमान मुख्य सचिव
सुजाता सौनिक या आज सेवानिवृत्त होत आहेत, राजेश
कुमार यांनी सुजाता सौनिक यांच्याकडून पदभार स्वीकारला.
****
राज्य मार्ग परिवहन- एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या
प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत देण्याचा
निर्णय परिवहन महामंडळाने घेतला आहे. प्रवाशांना प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर, एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर, तसंच ॲपवर आगाऊ आरक्षण करता
येईल. दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांचा गर्दीचा काळ सोडता वर्षभर ही योजना सुरू
राहील. मात्र,
कोणत्याही सवलतीचा लाभ न घेणाऱ्या प्रवाशांनाच या योजनेचा
फायदा घेता येईल. तसंच जादा बससाठी ही सवलत लागू नसेल, असं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
बीड शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार
प्रकरणी आय पी एस दर्जाच्या अनुभवी महिला पोलिस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालच्या
विशेष तपास पथकाद्वारे स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी
मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. मुंडे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट
घेतली. यासंदर्भात पोलिस महासंचालकांनी विचार करून योग्य निर्णय घेण्याची सूचना
केल्याचं,
मुख्यमंत्र्यांनी
माध्यमांना सांगितलं.
****
पंढरपूर आषाढी वारी निमित्त पांडूरंगाच्या दर्शनासाठी
येणारे सर्वसामान्य वारकरी आणि भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी
व्हीआयपी दर्शन सेवेला जिल्हा प्रशासनाच्या वतीने काही अंशी प्रतिबंध घालण्यात आला
आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्हीआयपी दर्शनाबाबत काही सक्त सूचना
केल्या असून यामध्ये, मंदिरापर्यंत व्हीआयपींच्या गाड्यांना
प्रतिबंध घातला आहे, याशिवाय महापूजेदरम्यान मोजक्याच
लोकांना गाभाऱ्यात सोडण्यात येणार आहे, असं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, आषाढी वारी सोहळ्यासाठी
आळंदीहून पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज सोलापूर
जिल्ह्यातल्या धर्मपुरी इथं दाखल झाली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीचं
स्वागत करून माऊलीच्या पादुकांचं मनोभावे दर्शन घेतलं. लोकप्रतिनिधींसह प्रशासनातील
अधिकाऱ्यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा आज सोलापूर जिल्ह्यात
बिटरगाव मुक्कामावर दाखल होत आहे. या पालखी सोहळ्यातलं चौथं रिंगण उद्या कव्हेदंड
इथं साजरं होणार आहे.
****
बीड इथं वेठबिगारी, मानव
तस्करी आणि नालसा योजना यासंदर्भात कार्यशाळा पार पडली. प्रमुख जिल्हा आणि सत्र
न्यायाधीश तसंच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आनंद यावलकर यांच्या हस्ते
या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. न्यायमूर्ती यावलकर यांनी यावेळी केलेल्या भाषणात
वेठबिगारी सारख्या प्रथा संपुष्टात आणण्याची गरज व्यक्त करत, प्राधिकरणाने स्पेशल सेलच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात २८ वेठबिगारांची
मुक्तता केल्याचं, तसंच त्यांच्या पुनर्वसनाचं काम सुरू
असल्याची माहिती दिली.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर इथे कार्यरत सहायक अभियंता
अरुणसिंह ठाकूर आज सुमारे ३६ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. ठाकूर यांनी या
प्रदीर्घ कालावधीत मुंबई, दमण तसंच छत्रपती संभाजीनगर
इथं सेवा दिली आहे. ठाकूर यांच्यासह प्रकाश वेळंजकर तसंच विजय सोनवणे हे
कर्मचारीही आज आकाशवाणीच्या सेवेतून निवृत्त झाले, छत्रपती
संभाजीनगर केंद्रात झालेल्या छोटेखानी समारंभात या सर्वांना निरोप देण्यात आला.
****
लातूर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून अमोल तांबे
यांनी पदभार स्वीकारला. नव्या पोलीस अधीक्षकांचं पोलीस प्रशासनाकडून स्वागत
करण्यात आलं. मावळते पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अमोल तांबे यांचं पुष्पगुच्छ
देऊन स्वागत केलं.
****
वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करत केवळ 'इमेल'
आणि 'लघुसंदेश अर्थात-एसएमएस' या पर्यायांची निवड करणाऱ्या ग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेमध्ये ५
लाखांचा टप्पा गाठला आहे. महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर विभागाकडून ही माहिती
देण्यात आली. या योजनेत सहभागी ग्राहकांना वीज देयकात प्रति महिना १० रुपये सूट
देण्यात येते. या सर्व ५ लाख ३ हजार ७९५ वीजग्राहकांना, वार्षिक
६ कोटी ४ लाख ५५ हजार रुपयांचा एकूण लाभ होत आहे.
****
नाशिक इथं एका बांधकामस्थळावर खोदलेल्या खड्ड्यात बुडून
तिघा अल्पवयीन शाळकरी मित्रांचा मृत्यू झाला. आज सकाळी त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर
परीसरातल्या नागरीकांनी संबंधीत विकासकाच्या विरोधात कारवाईसाठी रास्ता रोको
आंदोलन केलं. दरम्यान, संबंधित विकासकाविरोधात गुन्हा दाखल
झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धुळे तालुक्यातील आर्वी गावाजवळ नाकाबंदी करीत धुळे तालुका
पोलिसांनी आतिक रफिक शेख नामक इसमाला गावठी पिस्तुलासह रंगेहाथ पकडून ३७ हजाराचा
मुद्देमाल हस्तगत केला. हा इसम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर इथला
रहिवासी आहे.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.06.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 30 June 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०२५ दुपारी १.०० वा.
****
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला
आजपासून मुंबईत सुरुवात झाली. विधानभवनात आगमन होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांनी प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित
पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. याप्रसंगी मंत्रिमंडळातील इतर सदस्य तसच
विधिमंडळातील सदस्यांची उपस्थिती होती. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेचे
सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सदिच्छा भेट घेत
त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
आजच्या पहिल्या दिवशी विधानसभेच्या
कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला मंत्र्यांचा
परिचय करून दिला. त्यानंतर विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. अर्थमंत्री
अजित पवार यांनी पुरवणी मागण्या सभागृहासमोर ठेवल्या. दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या
विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर
यांनी केली. सदस्य अमित साटम, किशोर पाटील, सुलभा खोडके, चेतन तुपे, नितीन देशमुख, संजय
मेश्राम, अभिजित पाटील, समीर कुनावार आणि
समाधान आवताडे यांची तालिका सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर विविध खात्याच्या
मंत्र्यांनी विविध शासकीय विधेयकं सभागृहासमोर ठेवली.
विख्यात खगोलशास्त्रज्ञ दिवंगत डॉ.
जयंत नारळीकर, मार्क्सवादी
कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते लहानू कोम, समाजसेविका डॉ. श्रध्दा
टापरे आणि माजी आमदार रोहिदास देशमुख यांच्या निधनाबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
यांनी शोकप्रस्ताव मांडला आणि सर्व सदस्यांनी दोन मिनिटं स्तब्ध राहून तो संमत केला.
त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
विधानपरिषदेतही शोकप्रस्ताव संमत
झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त
व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या
आज विधिमंडळात सादर केल्या. हा निधी प्रामुख्याने राज्यात रस्ते, मेट्रो, सिंचन योजनांसारख्या
पायाभूत प्रकल्पांसाठी, सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन आणि अंमलबजावणी,
महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना, संजय गांधी
निराधार अनुदान योजना, मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच
दुर्बल, वंचित समाजघटकांच्या विकासासाठी उपयोगात आणण्यात येणार
आहे.
****
विधीमंडळ कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी
विरोधी पक्षाच्या सदस्यांनी भाषेच्या मुद्द्यावरून विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी
केली. त्यानंतर या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केलं.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार
आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित
पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.
****
पशुंची सेवा ही आपली नैतिक जबाबदारी
असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातल्या रायबरेली
इथं भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती बोलत होत्या.
पशुवैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांनी आपल्या प्रशिक्षण आणि उद्दिष्टांप्रती निष्ठावान
राहवं, पशूंना
योग्य वेळी वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी ग्रामीण भागात आरोग्य मेळाव्याचं आयोजन करण्यात
यावं, असं आवाहनही राष्ट्रपतींनी केलं, त्या म्हणाल्या...
बाईट - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
****
वरिष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार
यांची आज राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. राजेश कुमार सध्या महसूल
नोंदणी आणि मुद्रांक शुल्क तसच वनविभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान
मुख्य सचिव सुजाता सौनिक या आज सेवानिवृत्त होत असल्यानं कुमार यांची नियुक्ती करण्यात
आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
आषाढी वारी सोहळ्यासाठी आळंदीहून
पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज सोलापूर जिल्ह्यातल्या
धर्मपुरी इथं दाखल झाली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीचं स्वागत करून माऊलीच्या
पादुकांचं मनोभावे दर्शन घेतलं. लोकप्रतिनिधींसह प्रशासनातील अधिकाऱ्यांची याप्रसंगी
उपस्थिती होती.
****
मुसळधार पावसामुळं तात्पुरती स्थगित
केलेली चार धाम यात्रा आज पुन्हा सुरु झाली. दरम्यान, यात्रा मार्गावरच्या वाहनांच्या हालचालींवर
नियंत्रण ठेवण्याचे निर्देश जिल्हा दंडाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून
सुरू असलेल्या सततच्या पावसामुळं प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. डोंगराळ
भागात भूस्खलनामुळं शंभरहून अधिक मार्ग बंद झाले आहेत. गंगोत्री आणि यमुनोत्री राष्ट्रीय
महामार्गांसह अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं आज उत्तराखंडच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.06.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 30 June 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
कैलास मानसरोवर यात्रा आजपासून
सुरू होत आहे. यंदा सिक्कीममधील नाथुला खिंड आणि उत्तराखंडमधील लिपुलेख खिंड मार्गे
आयोजित केली जात असलेली ही यात्रा ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. यात्रेकरूंची सुरक्षा
आणि इतर महत्त्वाच्या बाबींसंदर्भात सिक्कीम सरकारनं पायाभूत सुविधांसह इतर व्यवस्थापन
केलं आहे. २०२० मध्ये कोविड प्रादुर्भावामुळे ही यात्रा स्थगित करण्यात आली होती.
****
राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन
आजपासून मुंबईत सुरु होत आहे. येत्या १८ जुलैपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात
एकूण १२ विधेयकं सादर होणार असून असून प्रलंबित असलेलं एक विधेयक आणि संयुक्त समितीकडील
एक विधेयकावर देखील चर्चा होईल. त्याचबरोबर सहा अध्यादेश पटलावर ठेवले जातील.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी काल पत्रकार
परिषदेत या अधिवेशनातल्या कामकाजाबाबत माहिती दिली. शालेय शिक्षणात तिसरी भाषा समावेशासंदर्भात
शिफारशी करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची घोषणा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. या समितीचा अहवाल येईपर्यंत तृतीय भाषा संदर्भातले
दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या
हप्त्यासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी यावेळी दिली. पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर आजपासून हा निधी
जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
****
नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३६ वा वर्धापन दिन उद्या १ जुलै रोजी साजरा होत आहे.
प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ तथा भारतीय अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर
यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठ मुख्यालयात आयोजित या सोहळ्यात विद्यापीठाचे संस्थापक
कुलगुरू दिवंगत राम ताकवले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण, विविध क्षेत्रातील पाच मान्यवरांना ‘यश जीवनगौरव’ पुरस्कार, पाच माजी कुलगुरुंचा सत्कार सोहळा, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार तसंच सर्वाधिक नोंदणी असलेले विभागीय केंद्र यांचा
सन्मान या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
अहमदाबाद विमान अपघाताची, विमान अपघात अन्वेषण संस्था सर्वंकष चौकशी करेल, असं नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं
आहे. काल पुण्यात एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या अपघातामागे
घातपाताची शक्यता सध्यातरी आढळून आलेली नाही, असं मोहोळ यांनी स्पष्ट केलं.
****
शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाची
अंमलबजावणी करताना बाधित शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. या पार्श्वभूमीवर
'मित्र'चे उपाध्यक्ष आमदार
राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातल्या १९ गावांतील शेतकऱ्यांसोबत सविस्तर
संवाद साधला. या महामार्गासाठी सध्या सुरू असलेली जमिनीची मोजणी अतिरिक्त जिल्हाधिकारी
यांच्या आदेशानुसार तात्काळ थांबवण्यात आली असून, शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय महायुती शासन कोणताही पुढील निर्णय घेणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही राणा जगजीतसिंह पाटील यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं जामा
मशिदीच्या परिसरात काल भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आलं. बुढी लेन सोशल ग्रूपच्या वतीने
घेण्यात आलेल्या या शिबीरात सुमारे सातशे नागरिकांनी रक्तदान केलं. शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय रुग्णालय घाटीच्या रक्तपेढीनं रक्त संकलन केलं. रुग्णालयाचे अधिष्ठाता
डॉ शिवाजी सुक्रे यांनी या शिबीराला भेट देऊन रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या.
****
रेल्वे सुटण्याच्या आठ तास आधी
टप्प्याटप्प्याने आरक्षण यादी तयार करण्याची अंमलबजावणी सुरू करण्याचे निर्देश रेल्वे
मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे विभागाला दिले आहेत. या निर्णयामुळे प्रतीक्षा
यादीतील तिकिटं असलेल्या प्रवाशांची अनिश्चितता कमी होईल तसेच प्रतीक्षा यादीतील तिकिटे
निश्चित न झाल्यास प्रवाशांना पर्यायी प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी अधिक वेळ मिळेल.
दुपारी २ वाजण्यापूर्वी सुटणाऱ्या गाड्यांसाठी, आदल्या दिवशी रात्री ९ वाजता यादी तयार करण्यात यावी, असं वैष्णव यांनी म्हटलं आहे. दरम्यान, नवी आरक्षण प्रणाली प्रति मिनिट एक लाख पन्नास हजारांहून अधिक
रेल्वे तिकिटं तयार करण्यास सक्षम आहे. या वर्षाच्या अखेरीस नवीन प्रवासी आरक्षण प्रणाली
तयार होईल, तसेच तिकीट तपासणी क्षमता प्रति मिनिट चार लाखांवरून
चाळीस लाखांपर्यंत वाढेल, असं रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे.
****
टेनिस जगतातल्या प्रतिष्ठित
विम्बल्डन स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. १३ जुलैपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत
विद्यमान विजेता कार्लोस अल्कराज, नोवाक जोकोविच, या खेळाडूंसह चार भारतीय टेनिसपटू सहभागी होत आहे. यामध्ये रोहन
बोपण्णा, युकी भांबरी, ऋत्विक बोलिपल्ली, आणि श्रीराम बालाजी यांचा समावेश आहे. हे सर्वजण
आपापल्या परदेशी जोडीदारांसोबत पुरुष दुहेरीत खेळणार आहेत.
****
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर
आणि जालना जिल्ह्यासाठी हवामान विभागानं आज तर नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांसाठी पुढील तीन दिवस यलो अलर्ट जारी
केला आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत तीन जुलै पर्यंत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम
स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 30 جون 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10
Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.06.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 30 June 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
लोकसहभागाच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ
शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन-छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातल्या पाटोदा ग्रामपंचायतीचा मन की बात मधून गौरव
·
विधिमंडळाचं आजपासून पावसाळी अधिवेशन-त्रिभाषा सूत्राचा
शासननिर्णय रद्द
·
बीड इथं विद्यार्थीनीच्या लैंगिक छळ प्रकरणी दोन फरार
शिक्षकांना अटक
·
अमेरिकी खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा आयुष शेट्टी
अजिंक्य तर तन्वी शर्माला उपविजेतेपद
आणि
·
मराठवाड्यात पुढचे तीन दिवस हवामान विभागाचा यलो अलर्ट
****
लोकसहभागाच्या
बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रम
मालिकेच्या १२३ व्या भागात बोलत होते.
आणीबाणीच्या
आठवणींसह आंतरराष्ट्रीय योग दिन, टॅकोमा या डोळ्यांच्या आजाराचं निर्मुलन,
दीर्घ काळानंतर सुरू झालेली कैलास मानसरोवर यात्रा, जुलैमध्ये सुरू होणारी अमरनाथ यात्रा, आगामी श्रावण महिना,
भगवान जगन्नाथ रथयात्रा, आंतरराष्ट्रीय अंतराळ
स्थानकात पोहोचलेले पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आदी मुद्द्यांचा पंतप्रधानांनी
उल्लेख केला.
भगवान बुद्धांचे
पवित्र अवशेष विविध देशातल्या जनतेच्या दर्शनासाठी पाठवण्यात आले असून याबद्दल अनेक
देशातून आभाराचे संदेश आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. सर्वांनी आपापल्या राज्यातल्या
बौद्ध स्थळांना भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं.
पुणे जिल्ह्याच्या
जुन्नर तालुक्यातले रहिवासी रमेश खरमाळे हे वन संवर्धनासाठी करत असलेल्या कार्याची
पंतप्रधानांनी माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाटोदा या आदर्श गावाचा
पंतप्रधानांनी गौरवाने उल्लेख केला. ते म्हणाले..
बाईट
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधानांनी
मन की बात कार्यक्रमात पाटोदा ग्रामपंचायतीचा गौरव केल्याबद्दल गावच्या सरपंच जयश्री
किशोर दिवेकर यांनी त्यांचे आभार मानले. त्या म्हणाल्या...
बाईट
- सरपंच जयश्री दिवेकर
गावचे उपसरपंच
कपिंद्र पेरे पाटील यांनी लोकसहभागातून आपल्या गावाचा मन की बातमध्ये पंतप्रधानांनी
समावेश केल्यावा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले...
बाईट
- उपसरपंच कपिंद्र पेरे
****
नागपूर
इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या
असून विधी क्षेत्रासाठी प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी विद्यापीठाची आहे, असं प्रतिपादन
सरन्यायाधीश आणि या विद्यापीठाचे कुलपती भूषण गवई यांनी केलं आहे. सरन्यायाधीशांच्या
हस्ते विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं काल उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री
देवेंद्र फडवणीस यांनी यावेळी बोलतांना, छत्रपती संभाजीनगर इथं राष्ट्रीय विधी
विद्यापीठ उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून मुंबई विद्यापीठाच्या उभारणीसाठी
जागेची निवड करण्यात आल्याची माहिती दिली.
****
राज्य विधिमंडळाचं
पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु होत आहे. येत्या १८ जुलैपर्यंत हे अधिवेशन चालणार
आहे. या अधिवेशनात एकूण १२ विधेयकं सादर होणार असून सहा अध्यादेश पटलावर ठेवले जाणार
आहेत.
दरम्यान, शालेय शिक्षणात
तिसरी भाषेसंदर्भात शिफारशी करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन
करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला
झालेल्या चहापानानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. या समितीचा अहवाल येईपर्यंत तृतीय
भाषा संदर्भातले दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तत्कालीन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदी आणि इंग्रजी या भाषा पहिल्या वर्गापासून लागू
करण्याबाबतचा अहवाल स्वीकारून त्यावर अंमलबजावणीचा निर्णय घेतला होता, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं. आपल्या सरकारने मात्र मराठी भाषा सक्तीची करून
हिंदी ही ऐच्छिक भाषा म्हणून ठेवली असल्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. ते
म्हणाले...
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अधिवेशनच्या
पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानावर महाविकास आघाडीनं बहिष्कार टाकला. भ्रष्टाचार, मराठीवर अन्याय,
हिंदीची सक्ती, शक्तिपीठ महामार्गाला विरोध इत्यादी
मुद्द्यांवर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी
केली. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत विरोधकांची भूमिका
पत्रकार परिषदेत स्पष्ट करतांना, हे सर्व मुद्दे अधिवेशनात उपस्थित
करणार असल्याचं सांगितलं.
****
दरम्यान, उद्धव बाळासाहेब
ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हिंदी विषयाच्या मुद्द्यावर या संदर्भातल्या सरकारच्या
आदेशाची काल अनेक ठिकाणी होळी केली. बीड तसंच हिंगोली इथं याबाबत शासन निर्णयाची होळी
करून आंदोलन करण्यात आलं.
****
बीड इथं
विद्यार्थीनीचा लैंगिक छळ प्रकरणी दोन फरार शिक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. मांजरसुंबा
इथून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणी २६ जून रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून
दोन्ही शिक्षक फरार झाले होते.
दरम्यान, या प्रकरणी
विशेष तपास पथक-एसआयटी मार्फत चौकशीची मागणी पावसाळी अधिवेशनात करणार असल्याचं,
आमदार धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. ते काल बीड इथं वार्ताहरांशी बोलत
होते.
****
मराठा आरक्षण
आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी इथं मराठा
समाजबांधवांची राज्यव्यापी बैठक घेतली. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या
२९ ऑगस्टला मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली.
****
अहिल्यानगर
पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला जेरबंद केलं आहे. २०० तसंच ५०० रुपये दर्शनी
मूल्याच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या तीन आरोपींना प्रथम पोलिस पथकाने सापळा लावून अटक
केली. त्यांच्या ताब्यातून दोन लाख रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा जप्त करण्यात
आला. आरोपी हे टेंभूर्णी इथं बनावट नोटा तयार करत असल्याची माहिती चौकशीत समोर आली, त्यानंतर
पोलिसांनी टेंभुर्णी इथं छापा टाकून ६६ लाख रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा आणि
इतर साहित्य जप्त केलं.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं महापालिकेची अतिक्रमण हटाओ मोहीम कालही सुरू होती. या मोहिमेत काल जालना
रस्त्यावरची सुमारे साडे सहाशे अतिक्रमणं काढण्यात आली.
****
परभणी जिल्ह्यात
गंगाखेड इथं तालुका न्यायालयाच्या नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीची आमदार डॉ.रत्नाकर
गुट्टे यांनी काल पाहाणी केली. हे काम गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित वेळेत पूर्ण होईल, याकडे विशेष
लक्ष देण्याची सूचना गुट्टे यांनी केली.
****
संतश्रेष्ठ
ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने काल फलटण इथून प्रस्थान करत बरड पालखीतळावर
रात्री मुक्काम केला. जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण काल
इंदापूर इथं पार पडलं. तर संत एकनाथ महाराज यांचा पालखी सोहळा आज परंडा इथून सोलापूर
जिल्ह्यात बिटरगाव इथं पोहोचणार आहे.
दरम्यान, जालना इथल्या
प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या आनंदी स्वामी महाराजांच्या यात्रा उत्सवास कालपासून
सुरुवात झाली.
****
छत्रपती
संभाजीनगर आकाशवाणीतले अधिकारी तसंच नैमित्तिक उद्घोषकांचा स्नेहमेळावा काल पार पडला.
सातारा परिसरात आद्येश्वरी उपासना गृहात झालेल्या या मेळाव्यात सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसह
उपस्थित सर्वांनी आकाशवाणीतल्या आठवणींना उजाळा दिला.
****
भारताचा
बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीनं अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं आहे.
या स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम फेरीत आयुषने कॅनडाच्या ब्रायन यांग याला २१-१८, २१-१३ असं
सरळ दोन सेट्समध्ये पराभूत करत इतिहास घडवला.
महिला एकेरीत
मात्र भारताच्या तन्वी शर्माला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं, काल झालेल्या
अंतिम फेरीत तन्वीला चीनच्या बेईवेन झांग हिच्याकडून ११-२१, २१-१६,
१०-२१ असा पराभव स्वीकारावा लागला.
****
मराठवाड्यात
छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यासाठी हवामान विभागानं आज तर नांदेड, हिंगोली आणि
परभणी जिल्ह्यांसाठी पुढील तीन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत
तीन जुलै पर्यंत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं काल साई टेकडी परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला. वनविभागाने
उपलब्ध करून दिलेल्या रोपट्याचं, सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाच्या
राष्ट्रीय छात्र सेना तसंच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी रोपण केलं.
****
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...