Thursday, 26 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 June 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ जून २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह अ‍ॅक्सिओम-फोर क्रू ला घेऊन स्पेसएक्स ड्रॅगन यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचलं, शुक्ला हे अंतराळ स्थानकात पोहोचलेले पहिले भारतीय

·      राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जून रोजी मुंबईत सुरु होणार

·      राज्यात आतापर्यंत २३ टक्के पेरण्या पूर्ण

आणि

·      संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सातारा जिल्ह्यात प्रवेश, तर संत श्री गजानन महाराजांची पालखी धाराशिव शहरात दाखल

****

भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह अ‍ॅक्सिओम-फोर क्रू ला घेऊन स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयान आज दुपारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचलं. शुभांशू शुक्ला हे अंतराळ स्थानकात पोहोचलेले पहिले भारतीय आहेत.

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी, शुभांशू शुक्ला आणि अ‍ॅक्सिओम-फोर मिशन टीमचं, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर यशस्वीरित्या डॉकिंग केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. मोहिमेचे महत्त्वाचे भाग, विशेषतः जीवशास्त्राशी संबंधित, कोणत्याही अधिवासाची क्षमता, सूक्ष्म-गुरुत्वाकर्षण आणि अंतराळातील मानवी शरीरविज्ञानावर होणारे विविध परिणाम यांचा शोध घेण्याचं काम भारतावर सोपवण्यात आलं असून, याचा जगभरातल्या भविष्यातल्या सर्व मोहिमांवर महत्त्वपूर्ण परिणाम होईल, असं सिंग म्हणाले

बाईट – जितेंद्र सिंग, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री

****

गेल्या ११ वर्षांत सेवा आणि सुशासनाच्या माध्यमातून अनुभवलेली प्रगती यापूर्वी कधी झाली नव्हती, असं प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी केलं. सरकारच्या ११ वर्षाच्या कार्यकाळानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं सक्षमीकरण करण्यात येत असल्याचं पाटील म्हणाले

बाईट - केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील

****

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या ३० जून ते १८ जुलै या कालावधीत मुंबईत होणार आहे. विधानभवनात आज झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह इतर खात्याचे मंत्री आणि विधीमंडळ सदस्य यावेळी उपस्थित होते.

****

राज्यात आतापर्यंत २३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच दिवशी १९ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. राज्यात ३३ लाख ५९ हजार ८१ हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या आहेत. सर्वाधिक पेरण्या पुणे विभागात, तर सर्वात कमी पेरण्या कोकण विभागात झाल्या असल्याचं, कृषी विभागाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झालं.

यंदा खरीप हंगामात ऊस वगळून राज्यात २३ पूर्णांक २७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. विभागनिहाय पेरण्यांमध्ये कोकणात १६ हजार ७९ हेक्टर, नाशिक - पाच लाख नऊ हजार १११ हेक्टर, पुणे - चार लाख ५१ हजार ५०७ हेक्टर, कोल्हापूर - एक लाख ६८ हजार ५६८ हेक्टर, छत्रपती संभाजीनगर - सहा लाख ५७ हजार १९९ हेक्टर, लातूर - नऊ लाख चार हजार २०२ हेक्टर, अमरावती - पाच लाख ६१ हजार ८८० हेक्टर आणि नागपूर विभागात ९० हजार ५३५ हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या आहेत.

****

राज्यात प्रथमच वीजग्राहकांना दरकपात मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातल्या घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाचही वर्षात कपात करण्याचा आदेश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं काल दिला, त्यावर मुख्यमंत्री बोलत होते. येत्या एक जुलैपासून सुधारित दर लागू होतील, असं त्यांनी सांगितलं. पहिल्या वर्षी १० टक्के दर कपात होणार असून, १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ७० टक्के ग्राहकांना सर्वाधिक फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

दरम्यान, ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचा मुख्यमंत्र्यांनी आज आढावा घेतला. राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प रखडणार नाही, याची दक्षता घेत पुढील तीन वर्षात प्रकल्प पूर्ण करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

****

राज्यातल्या बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दलालांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी घेतला आहे. राज्यातल्या विविध भागातून लोकप्रतिनिधी आणि बांधकाम कामगारांकडून तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर, तसंच नोंदणी, कीट वाटप आणि अन्य बाबतीत गैरप्रकार होत असल्याचं निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला. गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी आता प्रत्येक विभाग, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यालय प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र जिल्हास्तरीय दक्षता पथक गठीत करण्यात येणार आहे.

****

राज्यात करोनाचे आणखी ३० नवीन रुग्ण आढळले आहेत. सातारा जिल्ह्यात एक तर नागपूरमध्ये दोघांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. एक जानेवारी २०२५ पासून राज्यात आतापर्यंत दोन हजार ४२५ करोनाचे रुग्ण आढळले असून, ३६ जणांचा मृत्यू झाला. जून महिन्यात ५३२ करोनाचे रुग्ण आढल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली.

****

अहमदाबादमध्ये अलीकडेच झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघाताचा घटनाक्रम समजावा आणि अपघातामागचं कारण स्पष्ट व्हावं यासाठी विमानाच्या ब्लॅकबॉक्समधली माहिती डाऊनलोड केली आहे. विमानाच्या पुढच्या भागातल्या ब्लॅक बॉक्समधून क्रॅश प्रोटेक्शन मॉड्युल सुरक्षितपणे मिळालं असून, दिल्लीतल्या विमान अपघात तपास विभागाच्या प्रयोगशाळेत त्याचं विश्लेषण सुरू झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं आज सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. “माऊली माऊली” च्या गजरात पालखीचं जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आलं. यावेळी दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यापूर्वी माऊलींच्या पादुकांना निरा नदी पात्रात पारंपरिक पद्धतीने स्नान घालण्यात आलं. पालखी आज लोणंद इथं मुक्लामी असेल.

संत श्री गजानन महाराजांची पालखी आज धाराशिव शहरात पोहोचली. पालखीच्या स्वागतासाठी शहरात भाविकांनी रस्त्यावर फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. आजच्या धाराशिवच्या मुक्कामानंतर पालखी उद्या तुळजापूर मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणीबाणीतील अनुभवांवर आधारित 'इमर्जन्सी डायरीज: इयर्स दॅट फोर्ज्ड अ लिडर' या पुस्तकाचं प्रकाशन आज सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते झालं. आणीबाणी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिगत राहून केलेलं काम, बंदी घालण्यात आलेल्या साहित्याचं वाटप आणि जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न याची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

****

थोर समाजसुधारक, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी राजर्षी शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन केलं. मंत्रालयातही मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

****

छत्रपती संभाजीनगर इथं राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सकाळी समता दिंडी काढण्यात आली. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी हिरवा झेंडा दाखवून या दींडीची सुरुवात केली. या दिंडीत शहरातल्या विविध शाळांचे ६५० विद्यार्थी सहभागी झाले होते.

नांदेड इथंही सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्यावतीने समता दिंडी काढण्यात आली.

परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

हिंगोलीत अवैध मद्य वाहतुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्विकारतांना एका पोलिस हवालदारासह होमगार्डला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. दोघांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

****

हवामान

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्हाभरात आज पावसाची संततधार सुरु आहे. जालना जिल्ह्यातही शहरासह आज सकाळपासून सूर्यदर्शन झालं नाही. जिल्ह्यातल्या सर्वच भागात पहाटेपासून पावसाची संततधार सुरूच असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 18 دسمبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 18 December-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خب...