Friday, 30 June 2023

आकाशवाणी औरंगाबाद –दिनांक 30.06.2023 रोजीचे रात्री 08.00 ते 08.15 वाजताचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 30.06.2023 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.06.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 June 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० जून २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      शिक्षण ही फक्त शिकवण्याची नाही तर शिकण्याचीही प्रक्रिया-दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सांगता सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन.

·      औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर-खुलताबाद पाणी पुरवठा योजनेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन.

·      कृषीदिनानिमित्त उद्या राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन.

आणि

·      आशियायी कबड्डी स्पर्धेत इराणवर मात करत भारत अजिंक्य.

****

शिक्षण ही फक्त शिकवण्याची नाही तर शिकण्याचीही प्रक्रिया आहे, इतकी वर्षं विद्यार्थ्यांना काय शिकवायचं, यावर शैक्षणिक धोरण केंद्रित असायचं, पण आता विद्यार्थी काय शिकू इच्छित आहेत, याकडे आम्ही लक्ष वळवलं आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी समारंभाच्या सांगता कार्यक्रमात बोलत होते. केंद्र सरकारनं लागू केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी त्यांच्या इच्छेनुसार विषयांची निवड करू शकतील, असं त्यांनी सांगितलं. भारतीय विद्यापीठांना त्यांच्या भविष्यवादी धोरणं आणि निर्णयांमुळे जागतिक मान्यता मिळत आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं. २०१४ मध्ये भारताची फक्त बारा विद्यापीठं जागतिक मानांकन यादीत होती, आज त्यांची संख्या वाढून पंचेचाळीसवर पोहचली आहे, असं ते म्हणाले. देशभरात अनेक नवीन महाविद्यालयं आणि विद्यापीठं स्थापन होत असून, मागच्या काही वर्षांमध्ये देशातल्या आय आय टी, आय आय एम आणि एन आय टी सारख्या संस्थांची संख्या वाढत असल्याचं सांगत, या संस्था नव्या भारताच्या निर्मितीत आपलं योगदान देत आहेत, असं पंतप्रधान म्हणाले. दिल्ली विद्यापीठाच्या तीन विभागांच्या नव्या इमारतींची कोनशीला पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी बसवण्यात आली.

दरम्यान, पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला येण्यासाठी दिल्ली मेट्रोनं प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.

****

आपलं सरकार गतिमान सरकार असून, एका वर्षात आपल्या सरकारने पस्तीस योजनांना शासकीय मान्यता दिल्या, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ‘हर घर, नल से जल’ अभियानाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर इथे एक हजार कोटी रुपये खर्चाच्या गंगापूर-खुलताबाद पाणी पुरवठा योजनेचं भूमीपूजन आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमानंतर झालेल्या सभेत उपमुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीतल्या महत्त्वाच्या योजना आणि यशाची माहिती दिली. कोविड महामारीमध्ये मोदी सरकारनं त्वरेनं स्वदेशी लस निर्माण करून तिच्या तीन मात्रा तत्परतेनं नागरिकांना नि:शुल्क दिल्यामुळेच आपल्या देशातून कोविड हद्दपार झाला, असं उपमुख्यमंत्री म्हणाले. मोदी सरकारनं महाराष्ट्राला पंचवीस लाख घरं दिली त्यामुळे सव्वा लाख लोकांना हक्काची घरं मिळाली, याशिवाय राज्यातल्या एक्काहत्तर लाख लोकांना आरोग्य सेवा मोदी सरकार पुरवत आहे, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्तार जुलै महिन्यातच होणार असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं आहे, औरंगाबाद विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

****

केंद्र शासनानं रायगड जिल्ह्यातल्या रातवड इथे चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन १२५ कोटींचा निधी दिला असून, यातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तीनशे तेवीस कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांच्या खर्चाला राज्य शासनानंही मंजुरी दिली आहे. या प्रकल्पातून सुमारे पंचवीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

****

एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी रासायनिक उद्योगांची भूमिका महत्वाची असल्यानं शाश्वत विकासासाठी रासायनिक उद्योजकांनी हरित उद्योग उभारणीचे प्रयत्न करावेत, शासन यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. मुंबईत ‘शाश्वत भारतासाठी क्रांती’ या विषयावर आयोजित रासायनिक परिषदेत ते आज बोलत होते. नवीन उद्योगांमुळे आपली हानी होणार नाही, अशी भावना स्थानिकांच्या मनात निर्माण होण्याची गरज असल्याने उद्योजकांनी प्रदूषण विरहीत उद्योग उभारण्याचे प्रयत्न करावेत, असा आग्रह सामंत यांनी यावेळी केला.

****

१०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असं आवाहन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. ते आज जालना इथे बोलत होते. राज्यात बोगस बियाणं विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढत असून त्यासाठी कृषी विभाग कारवाई करत आहे, असं त्यांनी सांगितलं. राज्यात उद्यापासून पोलीस, महसूल, कृषी आणि ग्रामविकास हे चारही विभाग मिळून याबाबत कारवाई करणार असून, ज्या ठिकाणी बोगस बियाणं किंवा महागड्या दरात बियाणांची विक्री होईल त्याठिकाणी या चारही विभागाचे कर्मचारी बसून शासकीय दरात बियाणांची विक्री करतील, अशी माहिती सत्तार यांनी यावेळी दिली.

****

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल एक जुलै हा त्यांचा वाढदिवस राज्यात कृषिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषि विभागातर्फे कृषि दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असलेल्या या कार्यक्रमात शेतीक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा आणि राज्यस्तरीय पुरस्कार मिळवणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी कृषी शास्त्रज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्यानं होणार असून, कीटकनाशक फवारणी करताना वापरायच्या सुरक्षा किट्सचं वाटपही करण्यात येणार आहे.

****

औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही कृषीदिनानिमित्त उद्या एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रख्यात कृषीतज्ज्ञ आणि माजी कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण यांचं यावेळी व्याख्यान होणार आहे. दोन्ही अध्यासन केंद्रांच्या वतीनं कृषितंत्रज्ञान सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचं पारितोषिक वितरणही यावेळी करण्यात येणार आहे.

****

आशियायी कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारतानं अजिंक्यपद पटकावलं. अंतिम फेरीत इराणच्या संघाचा पराभव करत भारतानं हा किताब जिंकला. आतापर्यंत नऊ वेळा झालेल्या या स्पर्धेत भारतानं आठ वेळा अजिंक्यपद मिळवलं आहे.

****

भालाफेकपटू नीरज चोप्रा स्वित्झर्लंडमध्ये उद्या होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेत भाग घेणार आहे. यापूर्वी दोहामध्ये मे महिन्यात झालेल्या डायमंड लीगमध्ये नीरजनं 88 मीटर लांब भाला फेकून विजय मिळवला होता. डायमंड लीगच्या गुणतक्त्यात आठ गुण मिळवून नीरज आघाडीवर आहे.

****

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत यायचं असेल तर त्यांनी आपल्या जीवनात सकारात्मकता अंगी बाणवावी, असं प्रतिपादन उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी केलं आहे. महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयानं आयोजित केलेल्या, ‘प्रशासकीय सेवेत जाण्याचा ‘पत्रकारिता’ एक राजमार्ग’, या विषयावरच्या कार्यशाळेत त्या आज बोलत होत्या. प्रशासनात काम करत असताना जागोजागी पत्रकारितेच्या अभ्यासाचा फायदा होतो, असं त्या म्हणाल्या. लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे यांनी यावेळी बोलताना, पत्रकारितेच्या अभ्यासाचा फायदा नागरी सेवांच्या परीक्षेसाठी होतो, असं सांगत, राष्ट्रप्रेमाच्या भावनेनं आपण लष्करी सेवेमध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन विद्यार्थ्यांना केलं.

****

आकाशवाणी औरंगाबाद केंद्रातले सहायक अभियंता प्रकाश जायस्वाल आज ३८ वर्ष आणि नऊ महिन्यांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. त्यांना कार्यालयात एका छोटेखानी समारंभात निरोप देण्यात आला.

****

संत वाङगमय आणि बहुभाषा अभ्यासक मनीषा बाठे यांनी लिहिलेलं समर्थ रामदासांचं चरित्र साहित्य अकादमीकडून ‘भारतीय साहित्याचे निर्माते’ या मालिकेत प्रकाशित करण्यात आलं आहे. या मालिकेतली पुस्तकं मूळ भाषेसह अन्य वीस भाषांमध्ये अनुवादित होऊन प्रकाशित केली जात असल्यानं आता समर्थ रामदासांचं हे चरित्रही वीस भाषांमध्ये प्रसिद्ध होणार आहे.

****

आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 30.06.2023, रोजीचे सायंकाळी: 06.10, वाजताचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 30.06.2023, रोजीचे दुपारी: 03.00, वाजताचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 30.06.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 30 June 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३० जून २०२ दुपारी १.०० वा.

****

भारताची शिक्षण व्यवस्था ही भारताच्या समृद्धीची वाहक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभात ते आज बोलत होते. दिल्ली विद्यापीठासह देशातल्या अनेक संस्थांमध्ये मुलांपेक्षा मुलींचं शिक्षण घेण्याचं प्रमाण अधिक असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. २०४७ पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचं उद्दीष्ट असल्याचं पंतप्रधान म्हणाले. दिल्ली विद्यापीठाचं औद्योगिक संकुल, संगणक केंद्र यांचा कोनशिला समारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.  

दरम्यान, पंतप्रधान मेट्रोनं प्रवास करुन या सोहळ्याच्या ठिकाणी गेले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

***

जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर जिल्ह्यात अमरनाथ यात्रेशी संबंधित एका वाहनाचा अपघात होऊन पोलिस अधिक्षकासह चार जणांचा मृत्यू झाला. जम्मू - श्रीनगर महामार्गावर हे वाहन रस्त्याच्या काठावर नाल्यात पडून हा अपघात झाला.

दरम्यान, जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळीच जम्मूच्या भगवती नगर इथून अमरनाथ यात्रेकरुंची पहिली तुकडी रवाना केली. या तुकडीत तीन हजार ४०० हून अधिक भाविक आहेत. यात्रेच औपचारिक सुरवात उद्या पहलगाम आणि बालटाल तळापासून होईल.

***

तक्रार निवारण, कायदा आणि न्याय संबंधित संसदीय स्थायी समितीनं समान नागरी संहितेसंदर्भात आज एक बैठक बोलावली आहे. या विषयाबद्दल तज्ज्ञांची मतं जाणून घेण्यात येतील. भाजपाचे राज्यसभेचे खासदार सुशील मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये ३१ सदस्य आहेत.

***

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज औरंगाबाद आणि बीड जिल्हा दौऱ्यावर असून, ते औरंगाबाद विमानतळावरुन गंगापूरकडे रवाना झाले. विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, राज्य मंत्रिमंडळ विस्तार जुलै महिन्यातच होणार असल्याचं सांगितलं.

हर घर, नल से जलअभियानाअंतर्गत, औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर - खुलताबाद मधल्या गावांसाठी एक हजार ७५ कोटी रुपये निधीतून उभारण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा औपचारिक प्रारंभ फडणवीस यांच्या हस्ते आज गंगापूर इथं होणार आहे. एक हजार किलोमीटरच्या अंतराची जलवाहिनी यामध्ये टाकण्यात येणार असून, थेट जायकवाडी धरणातून गंगापूर - खुलताबाद तालुक्यातल्या गावांना नळाद्वारे पिण्याचं शुद्ध पाणी मिळणार आहे. ही योजना ८० टक्के सौर उर्जेवर चालणार असल्याची माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली.

त्यानंतर ते बीड इथं दिवंगत माजी आमदार विनायक मेटे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

***

पर्मनंट अकाउंट नंबर - ‘पॅन आणिआधार क्रमांक संलग्न करण्याची मुदत आज संपत आहे. ही प्रक्रिया आज पूर्ण न केल्यास पॅन धारकांना अनेक तांत्रिक अडचणींचा आणि आर्थिक दंडाचा सामना करावा लागू शकतो. हे संलग्निकरण न केल्यास पॅन क्रमांक उद्या एक जुलैपासून आपोआप अकार्यरत होईल, प्राप्तिकर विभागाकडून कर परतावा मिळणार असेल तर तो मिळणार नाही, प्राप्तिकर परताव्यावर व्याज लागू असेल तर ते देण्यात येणार नाही, काही प्रकरणांमध्ये अतिरिक्त करही कापला जाईल, असं प्राप्तिकर विभागानं स्पष्ट केलं आहे.

***

नाशिक जिल्ह्यातील कळवण इथं काल पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसंच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलेल्या या मेळाव्याचं उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी १५० उमेदवारांची निवड करून त्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली.

***

राज्य शासनाच्या मिशन भगीरथ प्रयास उपक्रमाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातल्या विविध तालुक्यांमध्ये गेल्या तीन महिन्यात २५० बंधारे बांधण्यात आले आहेत. हे पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात त्यात पाणी साठेल आणि पावसाळा संपल्यानंतर गावांना त्याचा उपयोग होईल, अशी माहिती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांनी दिली.

***

भालाफेकपटू नीरज चोप्रा स्वित्झर्लंडमध्ये उद्या होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेत भाग घेणार आहे. नीरजला गेल्या महिन्यात प्रशिक्षणादरम्यान स्नायूंना दुखापत झाली होती. त्यानंतर तो तंदुरुस्त झाला आहे. यापूर्वी दोहामध्ये मे महिन्यात झालेल्या डायमंड लीगमध्ये नीरजनं ८८ मीटर लांब भाला फेकून विजय मिळवला होता. डायमंड लीगच्या गुणतक्त्यात आठ गुण मिळवून नीरज आघाडीवर आहे.

***

नाशिक जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशीही पाऊस सुरू आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा या आदिवासी बहुल भागात सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला. त्यामुळे जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 

//************//

 

आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 30.06.2023, रोजीचे दुपारी: 01.00, वाजताचे मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 30.06.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेच्या पहिल्या तुकडीला नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी झेंडा दाखवला. जम्मूतल्या भगवतीनगर बेस कँपवरून या तुकडीची मार्गक्रमणा सुरू झाली आहे. कडक सुरक्षाव्यवस्थेत आणि सुरक्षा दलांच्या ताफ्यासह निघालेली ही तुकडी आज संध्याकाळी बालटाल आणि ननवान तळांवर पोहोचेल. उद्यापासून तिचा प्रवास अमरनाथच्या दिशेनं सुरु होईल.

****

दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सांगता होणार आहे. विद्यापीठाचं औद्योगिक संकुल, संगणक केंद्र यांचा कोनशिला समारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

****

केंद्र सरकारचा गेल्या नऊ वर्षांचा कालावधी गरीब कल्याणासह देशासाठी अभिमानाचा आणि सुरक्षित भारताचा असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. बिहारमधल्या लखीसरायमध्ये आयोजित जनसभेला ते काल संबोधित करत होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालच्या सरकारनं देशानं विविध क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याचं शहा म्हणाले.

****

केंद्रीय खनिज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भारतातल्या महत्वपूर्ण खनिजांची यादी  प्रसिद्ध केली. संरक्षण, कृषी, उर्जा, औषधनिर्मिती आणि टेलिकॉम अशा क्षेत्रांसाठी महत्वाच्या खनिजांची ही यादी, खाणकाम क्षेत्रातलं धोरणात्मक नियोजन आणि गुंतवणूक याबाबतीतील निर्णय घेताना मार्गदर्श ठरेल.

****

आधार कार्ड आधारित चेहरा प्रमाणीकरण व्यवहारांची संख्या यावर्षीच्या मे महिन्यात एक कोटी ६ लाखावर पोचली आहे. अशा तऱ्हेचे व्यवहार सलग दुसऱ्या महिन्यात १ कोरीच्या वर पोचले आहेत असं इलेक्‍ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान  मंत्रालयांन सांगितलं आहे. हि सुविधा ऑक्टोबर २०२१ पासून सुरु झाली होती.

****

केंद्र सरकारने युरियावर 3 वर्षांसाठी अंशदान देण्याचा तसंच ऊसाची एफआरपी वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फार मोठा लाभ होणार आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.  या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. या निर्णयाचं राज्यातल्या शेतकऱ्यांनीही स्वागत केलं आहे.

//***********//

 

Akashwani Aurangabad Urdu Bulletin Date : 30.06.2023, Time : 9.00 to 9.10 AM

आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 30.06.2023, रोजीचे सकाळी : 08.30, वाजताचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक : ३० जून २०२३ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 30 June 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३० जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      पालखी सोहळ्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र घराघरात पोहोचेल आणि स्वच्छता अभियान लोकचळवळ बनेल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास

·      उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज औरंगाबाद इथं गंगापूर-खुलताबाद पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ

·      औरंगाबाद औद्योगिक क्षेत्रात इलेक्ट्रीक स्कूटरसह नवे तीन प्रकल्प;सुमारे तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक.

·      समान नागरी कायद्याच्या संभाव्य परिणामांच्या अभ्यासासाठी काँग्रेस पक्षातर्फे समिती गठित

·      केंद्र सरकारनं महिला आरक्षणासंदर्भातला निर्णय घ्यावा-शरद पवार यांची मागणी.

आणि

·      आषाढी एकादशी तसंच बकरी ईद सर्वत्र भक्तिभावानं साजरी.

****

पंढरीची वारी आणि पालखी सोहळ्याच्या माध्यमातून घराघरात स्वच्छतेचा मूलमंत्र पोहोचेल आणि स्वच्छता अभियान लोकचळवळ बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत काल पंढरपूर इथं श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातल्या स्वच्छता दिंडी आणि ग्रामसभा दिंडीचा समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. 'शासन आपल्या दारी' योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात १८ जणांना अनुकंपा नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले.

आषाढी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपुरात आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाला देखील मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. पारंपरिक शेतीबरोबर नवनवीन, अत्याधुनिक शेतीतून उत्पादन घेतल्यास बळीराजा समृद्ध होईल. शेतकऱ्यांनी त्याच मेहनतीत दुप्पट उत्पादन देणाऱ्या वाणांची लागवड करावी. नवनवीन प्रयोगांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य येाजनेचा लाभ मिळावा यासाठी रेशन कार्डाची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आता पाच लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ते काल सोलापुरात वार्तारांशी बोलत होते.

****

शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारसोबत मिळून राज्य सरकार करत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. डीडी न्यूज या दूरदर्शनच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते काल बोलत होते. महाराष्ट्र तेजीनं आर्थिक विकासाकडे वाटचाल करत आहे, राज्य लवकरच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला, ते म्हणाले,

‘‘इस साल हम लोग हाफ ट्रेलिय्न मार्क को पार कर देंगे. हमने एक इकॉनॉमिक अॅडवायजरी कमिटी तयार की इकॉनॉमी अॅडवायजरी कमिटीके चेअरमन टाटा सन्सके जो चेअरमन है एन. चंद्राजी. उनको हमन उसका चेअरमन किया अलग अलग सेक्टर के लोग उस में लिये इस इकॉनॉमिक रोजी कमिटी ने ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी के लिए बहुत अच्छा रिपोर्ट तयार किया. अभी जिस प्रकार से आगे बढ़ रहे है इसी प्रकार से हम लोग आगे बढ़े और बहुत विशेष प्रयास नहीं भी किया. तब भी हम लोग 2031 या 32 मे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनेंगे.’’

राज्य सरकारचे नेते एकनाथ शिंदे आहेत आणि आमच्या दोघांमध्ये लोकप्रियतेच्या संदर्भात कुठलीही स्पर्धा नसल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. आपण सुपर सीएम असल्याच्या दाव्यांचं त्यांनी खंडन केलं. सरकार चालवण्यासाठी आपल्या अनुभवाचा फायदा व्हावा म्हणून ऐनवेळी  उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी होण्याचे आदेश वरिष्ठ नेत्यांनी दिले, असं फडणवीस यांनी सांगितलं. २०१९ च्या निवडणुका एकत्र लढल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी केली. त्यापूर्वी आमच्याशी चर्चा केली नाही तसंच आमचे फोनही घेतले नाहीत, असं फडणवीस यांनी सांगितलं. शिवसेना संपवण्यासाठी भाजपा कार्यरत होती असा उद्धव ठाकरे यांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. जनतेच्या मनात असलेला पक्ष टिकून राहतो, असं ते म्हणाले.

****

दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस आज औरंगाबाद आणि बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

हर घर, नल से जलअभियानाअंतर्गत, औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर - खुलताबाद तालुक्यातल्या गावांसाठी एक हजार ७५ कोटी रुपये निधीतून उभारण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा औपचारिक प्रारंभ फडणवीस यांच्या हस्ते आज गंगापूर इथं होणार आहे. सुमारे एक हजार किलोमीटर अंतराची जलवाहिनी या योजनेअंतर्गत टाकण्यात येणार असून, जायकवाडी धरणातून गंगापूर - खुलताबाद तालुक्यातल्या गावांना थेट नळाद्वारे पिण्याचं शुद्ध पाणी मिळणार आहे. ही योजना ८० टक्के सौर उर्जेवर चालणार असल्याची माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली.

या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री बीड इथं दिवंगत माजी आमदार विनायक मेटे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

****

औरंगाबाद औद्योगिक क्षेत्रात नवे तीन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. ॲथर ही कंपनी ८५० कोटी रुपयांचा इलेक्ट्रीक स्कूटर उत्पादन प्रकल्प उभारणार असून, यामुळे तीन हजार जणांना प्रत्यक्षात तर तीन हजार ५०० जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असं कराड यांनी सांगितलं.

कॉस्मो फिल्म बिडकीनमध्ये दीडशे एकर जागेवर एक हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प उभारणार  आहे. या माध्यमातून ७५० जणांना प्रत्यक्ष तर एक हजार जणांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

पिरॅमल फार्मा १४० एकर जागेवर एक हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प उभारणार असल्याचं ते म्हणाले. औरंगाबाद औद्योगिक क्षेत्रात ड्रोन क्लस्टर झोन तयार करण्यात येणार असून, त्याला गोदावरी क्लस्टर असं नावं देण्यात आलं आहे. तसंच सैन्याच्या सुरक्षा साधनांच्या निर्मीतीच्या क्लस्टरसाठी देखील केंद्र सरकार प्रयत्नरत असल्याचं कराड यांनी यावेळी सांगितलं.

****

समान नागरी कायद्याच्या संभाव्य परिणामांवर अभ्यास करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे समान नागरी अभ्यास समिती गठित करण्यात आली आहे. माजी खासदात भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीत राज्यसभा सदस्य कुमार केतकर, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री वसंत पुरके, अनिस अहमद, आदींचा समावेश आहे.

****

केंद्र सरकारनं महिलांना आरक्षण देण्यासंदर्भातला निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून, महिला आणि मुलींवरचे हल्ले वाढले आहेत आहे. मुली, महिला मोठ्या संख्येनं बेपत्ता असल्याकडे पवार यांनी लक्ष वेधलं. राज्यात जात -धर्माच्या नावावरुन दंगली सुरू आहेत, त्यांची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली. गृहमंत्र्यांनी बाकीची वक्तव्य करण्याऐवजी सुरक्षे संदर्भात खबरदारी घ्यावी, अशी टीका त्यांनी केली. येत्या १३ आणि १४ जुलै रोजी बंगळुरू इथं विरोधी पक्षांची पुढची बैठक होईल, असं पवार यांनी यावेळी सांगितलं. 

****

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाला मंत्रिपद देण्याची मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. विधान परिषदेची एक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पक्षानं योग्य वाटा मागितला असून, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, निवडणुकीत आरक्षणाची रोटेशन पद्धत बंद करण्याची मागणी आठवले यांनी केली. मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र आमच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं, असं सांगून आठवले यांनी, जातिनिहाय जनगणनेलाही पाठिंबा दिला.

****

समाजातले वृध्दाश्रम आणि अनाथाश्रम ज्या दिवशी बंद होतील तो सुदृढ समाज निर्मितीमधला सुवर्ण क्षण असेल, असं प्रतिपादन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातल्या कुंभारवळण इथल्या, दिवंगत समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन या संस्थेला काल गडकरी यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. या संस्थेला गडकरी यांनी व्यक्तिगतरित्या ११ लाख रुपयांची देणगी जाहीर केली, तसंच सरकार दरबारी या संस्थेला मदत मिळण्यासाठी आपण लागेल ती मदत करू असं आश्वासन देखील त्यांनी दिलं.

****

शाश्वत विकास ध्येयासाठी सांख्यिकीच्या कामासंदर्भात येत्या काळात अधिक धोरणात्मक नियोजन करण्याची गरज असल्याचं, नियोजन विभागाचे मुख्य सचिव सौरभ विजय यांनी म्हटलं आहे. विख्यात सांख्यिकीय शास्त्रज्ञ प्राध्यापक प्रशांतचंद्र महानलोबीस यांच्या सांख्यिकी क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल २९ जून हा त्यांचा जन्मदिन काल ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिनम्हणून साजरा करण्यात आला, यानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सांख्यिकी माहिती तयार करताना विश्लेषणात्मक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास संचालनालयामार्फत सक्षम डेटाबेस तयार होण्यास मदत होईल असं ते म्हणाले. राज्याच्या प्रगतीत सांख्यिकी संचालनालयाची भूमिका महत्त्वाची असल्याचं सौरभ विजय यांनी नमूद केलं.

****

अमरनाथ यात्रेला उद्यापासून सुरूवात होणार असून, जवळपास पंधराशे पेक्षा अधिक यात्रेकरू काल जम्मूमधल्या यात्री निवासात पोचले आहेत. बागवत नगर इथल्या तळावरुन यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला उद्या हिरवा झेंडा दाखवला जाईल. काश्मीरमधल्या गंदरबल जिल्ह्यातल्या पहलगाम आणि बालटाल इथल्या नुनवान या मार्गावरून यात्रेची सुरुवात होईल.

****

उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे दरड कोसळल्यानं बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. या मार्गावरची वाहतूक पुर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असू, रस्त्यात अडकलेल्या प्रवाशांसाठी प्रशासनानं भोजनाची व्यवस्था केली आहे. हा महामार्ग सुरु झाल्यानंतरच भाविकांनी प्रवास करण्याचं आवाहन चमोली जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

****

राज्यात आषाढी एकादशी काल मोठ्या उत्साहात भक्तिभावानं साजरी करण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं नाथमंदिरात तथा गावाबाहेरील नाथ समाधी दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाले होते.

औरंगाबाद शहरानजिक प्रतिपंढरपूर इथं शहरातल्या विविध भागातून दिंड्या आणि नागरिकांनी पायी जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे पायी दिंडीत सहभागी झाले होते.

खासदार इम्तियाज जलिल यांनी एमआयएम पक्षातर्फे पायी येणाऱ्या सर्व दिंड्या आणि वारकऱ्यांचं स्वागत केलं.

औरंगाबाद इथं इको ग्रीन फाऊंडेशननं पर्यावरण संवर्धनात काम करणाऱ्या सहयोगी संस्थांच्या सहयोगातून वृक्ष दिंडी काढली होती. हरिनामासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश यावेळी देण्यात आला.

जालना शहरासह जिल्ह्यात काल विविध मंदिरांमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. शहराचं अराध्य दैवत, प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या श्री आनंदी स्वामी महाराज मंदिरात आषाढी निमित्त गेल्या आठवड्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. काल ढोल ताशांच्या गजरात आंनदी स्वामी महाराजांची भव्य पाखली मिरवणूक काढण्यात आली.

हिंगोली जिल्ह्यात नरसी नामदेव इथं संत नामदेव महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

बुलडाणा जिल्ह्यात संतनगरी शेगाव इथं भाविकांनी संत श्री गजानन महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी देखील मोठी गर्दी केली होती.

****

ईद - उल - जुहा अर्थात बकरी ईद देखील काल ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध ठिकाणच्या इदगाह मैदान आणि मस्जिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली. काल आषाढी एकादशी असल्याने अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांनी कुर्बानी दिली नाही.

****

 

शेतीमध्ये कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचं लातूरच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रक्षा शिंदे यांनी म्हटलं आहे. कृषी संजीवनी सप्ताहाअंतर्गत चिंचोली बल्लाळनाथ इथं शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात त्या काल मार्गदर्शन करहोत्या. शंखी गोगलगाय व्यवस्थापनासाठी गावकऱ्यांनी सामूहिक व्यवस्थापन करणं गरजेचं असल्याचं त्या म्हणाल्या. सर्व पात्र शेतकऱ्यांनी पीएम-किसान योजनेंतर्गत ई-केवायसी आणि बँक खाते आधार संलग्न करून घ्यावं, जेणेकरून त्या योजनेचा लाभ मिळेल, सं शिंदे यांनी सांगितलं.    

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत शेततळे योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, सं'महाडीबीटी' अंतर्गत यांत्रिकीकरण, पीक प्रात्यक्षिक, फळबाग लागवड या बाबींचाही लाभ घ्यावा, सं आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप जाधव यांनी यावेळी केलं.

****

औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांचं ३१ जुलैपर्यंत स्थलांतर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार आजपासून महावितरण हे काम करणार आहे. त्यासाठी बिडकीन परिसरातल्या काही गावांत आज आणि येत्या रविवारी वीजपुरवठा बंद राहणार आहे. गरज भासल्यास आणखी तीन ते चार दिवस एका दिवसाआड वीज बंद राहील, या अतिमहत्त्वाच्या आणि तातडीच्या कामासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचं आवाहन महावितरणने केलं आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर कुलपती नियुक्त सदस्य म्हणून किशोर शितोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी ही नियुक्ती केली आहे. शितोळे हे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य असून, देवगिरी बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

****

दक्षिण कोरियात सुरू आशियाई कबड्डी विजेतेपद स्पर्धेत आज अंतिम लीग सामन्यात भारताचा सामना हाँगकाँग सोबत होणार आहे. काल या स्पर्धेत भारतानं इराणवर ३३-२८ असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. लीग सामन्यानंतर स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.

****

 

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या बेलमंडळ इथं काल पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तीन लाख ८१ हजार ५२० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या पथकानं बेलमंडळ इथल्या नवी आबादीतल्या एका घरावर छापा मारुन ही कारवाई केली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विनोद नरवाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

लातूर जिल्ह्यात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत मुलांची १३ आणि मुलींची १२ अशी एकूण २५ शासकीय वसतिगृहं चालवली जातात. यावर्षी या वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं होत असून, यासाठी शालेय विद्यार्थी १२ जुलै तर इयत्ता दहावी आणि बारावी नंतरच्या बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी ३१ जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतील, असं समाज कल्याण सहायक आयुक्तांनी कळवलं आहे.

****