आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Sunday, 30 April 2023
TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.04.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० एप्रिल २०२३ सायंकाळी
६.१०
****
·
मन की बात हा, मी पासून आम्हीपर्यंतचा प्रवास-शंभराव्या भागात
पंतप्रधानांचं प्रतिपादन.
·
मन की बातच्या शंभराव्या भागाचं ठिकठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमातून
श्रवण.
·
भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या सहा तर दहा जणांची
सुखरुप सुटका.
आणि
·
उद्या महाराष्ट्रदिनी, राज्यभरात आपला दवाखाना तसंच, शहरी आरोग्यवर्धिनी
केंद्रांचं उद्घाटन.
****
मन की बात हा, मी पासून आम्हीपर्यंतचा प्रवास असल्याचं, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवरच्या, मन की बात, या कार्यक्रम मालिकेच्या
शंभराव्या भागातून, देशवासियांना संबोधित करत होते. मन की बातने आपल्याला सर्वसामान्य
नागरिकांशी संपर्काचा एक मार्ग दिला, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. मन की बातच्या,
आतापर्यंतच्या भागात संवाद साधलेल्या काही नागरिकांशी, पंतप्रधानांनी या भागातही संवाद
साधत, सेल्फी विथ डॉटर, स्वच्छ भारत अभियान, हर घर तिरंगा, आदी विषयांवर चर्चा केली.
नागरिकांनी या कार्यक्रमात सुचवलेले अनेक विषय, लोकचळवळ झाल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष
वेधलं. मन की बातने शंभर भागांचा टप्पा गाठणं, हे श्रेय केवळ नागरिकांचं असल्याचं पंतप्रधान
म्हणाले. युनेस्को चे महासंचालक औद्रे ऑजुले, यांनी मन की बातच्या शंभराव्या भागासाठी
पाठवलेला, शुभेच्छा संदेशही यावेळी ऐकवण्यात आला.
मन की बातच्या प्रत्येक भागाचं ध्ननिमुद्रण करणारे, प्रादेशिक
भाषांमध्ये अनुवाद करणारे, तसंच प्रत्येक भागाचं प्रक्षेपण करणाऱ्या, प्रसारभारतीच्या
अधिकारी तसंच कर्मचारी वर्गाचं, पंतप्रधानांनी कौतुक केलं.
****
देशभरात ठिकठिकाणी सार्वजनिक स्वरुपात, लोकांनी मोठ्या संख्येनं
मन की बातचा, आजचा शंभरावा भाग ऐकला. मुंबईत विलेपार्ले इथं केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री
अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मन की
बातचा शंभरावा भाग ऐकला.
स्वामी विवेकानंद यांनी, अमेरिकेत शिकागो इथल्या, विश्वधर्म
संमेलनातल्या भाषणातून, जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता; त्याचप्रमाणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, असे गौरवोद्गार,
राज्यपाल रमेश बैस यांनी काढले. मुंबईत राजभवनात झालेल्या, मन की बात सार्वजनिक श्रवण
कार्यक्रमात, राज्यपाल बोलत होते. या कार्यक्रमात हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव
पवार, ‘डिक्की’चे संस्थापक मिलिंद कांबळे, राज्यातले पद्म पुरस्कार विजेते, ‘मन की
बात’ कार्यक्रमांमध्ये, पंतप्रधानांनी उल्लेख केलेले राज्यभरातील युवक, विद्यार्थी
तसंच नागरिक हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते.
भाजपचे विधान परिषदेचे गटनेते, आमदार प्रवीण दरेकर यांनी मुंबईत
कांदिवली इथे, घरकाम करणाऱ्या महिलांसोबत, पंतप्रधानांचे विचार ऐकले.
मुंबई सेंट्रल स्थानकावर, राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात
लोढा यांनी, हमाल बांधवांसोबत, मन की बात कार्यक्रमाचं प्रसारण ऎकलं.
छत्रपती संभाजीनगर इथं, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं, तीनशे
एक्कावन्न ठिकाणी, हा शंभरावा भाग सार्वजनिकरित्या ऐकण्यात आला. केंद्रीय अर्थराज्यमंत्री,
डॉ भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर, यावेळी उपस्थित होते. सहकारमंत्री अतुल सावे
यांनी, पूर्वांचल वसतीगृह इथं हा शंभरावा भाग ऐकला. गरवारे कम्युनिटी सेंटर इथं, अनेक
नागरिकांनी, मन की बातचा शंभरावा भाग सामुहिकपणे ऐकला.
जालना शहरात, गोपीकिशननगर आणि मुक्तेश्वरद्वार सभागृहात, मन
की बात कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात आलं. या कार्यक्रमास, केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री
रावसाहेब दानवे, उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान, मनमोकळेपणाने आपल्याशी संवाद साधतात,
ही भावना या कार्यक्रमाच्या माध्यमातून, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाल्याचं,
दानवे म्हणाले. या निमित्ताने घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतल्या विजेत्यांना, दानवे
यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं. चित्रकार अरविंद देशपांडे यांच्या, बेटी
बचाओ, शिक्षण, पर्यावरण आदी विषयांवर भरवण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनालाही दानवे यांनी
भेट दिली.
धाराशिव इथे, आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी, आकाशवाणी केंद्रात
उपस्थित राहून मन की बातचा शंभरावा भाग ऐकला.
अंबाजोगाई इथं, खोलेश्वर माध्यमिक शाळेत, आमदार नमिता मुंदडा,
भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या उपस्थितीत, मन की बातचा शंभरावा भाग ऐकण्यात
आला.
****
केंद्रीय
सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हरियाणात कर्नाल इथल्या शासकीय विश्राम
गृहावर मन की बातचा शंभरावा भाग ऐकला. हा उपक्रम देशवासीयांना प्रेरणा देणारा असल्याचं
मत आठवले यांनी व्यक्त केलं.
****
दरम्यान, मन की बातचे १०० भाग प्रसारित झाल्याबद्दल, मायक्रोसॉफ्टचे
सहसंस्थापक बिल गेट्स यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या. मन की
बात कार्यक्रमात स्वच्छता, आरोग्य, महिलांचं आर्थिक सक्षमीकरण, यासारख्या सातत्यानं
विकास लक्ष्यांशी निगडीत मुद्यांवर, कार्य करण्यासाठी, समाजाला प्रेरणा मिळाल्याचं,
गेट्स यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे.
बांग्लादेश, श्रीलंका, संयुक्त अरब अमीरात, आदी देशांमध्येही,
मन की बातचा शंभरावा भाग, सामुहिकरित्या ऐकण्यात आला.
****
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त, आज सर्वत्र
त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी, ट्विट संदेशाच्या माध्यमातून तुकडोजी महाराजांना अभिवादन केलं. पर्यटन
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी, मंत्रालयात, तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार
अर्पण करून, आदरांजली वाहिली.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत
यांनी, तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला, पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं
****
राज्यातल्या विविध कारागृहातून, कोविड काळात पॅरोल सुटीवर सोडलेले,
४०६ कैदी फरार झाले आहेत. कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, चार हजार दोनशे कैद्यांना,
आपत्कालीन पॅरोलवर, तुरुंगातून सोडण्यात आलं होतं. मात्र यापैकी ४०६ कैदी, कोविड प्रादुर्भाव
ओसरल्यावरही, तुरुंगात परतलेले नाहीत. यापैकी साडे तीनशे कैद्यांविरोधात, गुन्हे नोंदवण्यात
आले असून, त्यांचा कसून शोध घेतला जात असल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या, आता सहा झाली असून,
दहा जणांची सुखरुप सुटका केल्याची माहिती, पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली. या
दुर्घटनेस जबाबदार असलेल्या, तसंच प्रथमदर्शनी हलगर्जीजणा करणाऱ्या, इंद्रपाल पाटील
या बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याचंही, पोलिसांनी
सांगितलं. दरम्यान, घटनास्थळी अद्यापही ढिगारा उपसण्याचं काम, आणि बचावकार्य सुरु असल्याची
माहिती, जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
****
पंजाबमध्ये लुधियाना जवळ, एका टँकरमधून अमोनिया वायूची गळती
होऊन, अकरा नागरिकांचा मृत्यू झाला, तर सुमारे २०० हून अधिक लोकांची प्रकृती बिघडली
आहे. हा टँकर एका उड्डाणपुलावर धडकल्यानंतर, ही वायूगळती सुरू झाली. या भागात बचावकार्य
सुरू असून, रुग्णांवर लुधियानातल्या रुग्णालयांमध्ये, उपचार करण्यात येत आहेत.
****
राज्यात उद्या एक मे रोजी, महाराष्ट्रदिनी, मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांच्या हस्ते, ऑनलाईन पद्धतीने आपला दवाखाना तसंच, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचं
उद्घाटन होणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या, पाच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब
ठाकरे आपला दवाखाना, तसंच १२ आरोग्यवर्धिनी केंद्रांचा समावेश आहे.
****
हैद्राबाद मुक्तीसंग्रामात, बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचं स्मरण
करून, नव्या पिढीला मुक्तीसंग्रामाच्या लढ्याची माहिती व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र
प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने, उद्या १ मे रोजी मराठवाड्यात, विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे. उद्या सर्व जिल्ह्यात ध्वजारोहणानंतर, प्रभात फेरी काढून, मुक्तीसंग्राम
लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांना, अभिवादन करण्यात येणार आहे.
****
महाविकास आघाडीच्या वतीने उद्या १ मे रोजी मुंबईत वज्रमूठ सभा
होणार आहे. मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच बीकेसी मैदानाबर सायंकाळी साडेपाच
वाजता ही सभा होणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी महाविकास आघाडीच्या पुढाकाराने महाविकास
आघाडीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवासैनिक ह्या नियोजनात सहभागी झाल्याचं
या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे
त्यांचे तातडीने पंचनामे करून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश
महाजन यांनी धुळे जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत
झाली पाहिजे, ही शासनाची भूमिका असल्याचं, महाजन यांनी म्हटलं आहे.
****
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक : ३० एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.
Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date : 30 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३० एप्रिल
२०२३ दुपारी १.०० वा.
****
मन
की बात हा मी पासून आम्हीपर्यंतचा प्रवास असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. ते आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेच्या शंभराव्या भागातून देशवासियांना
संबोधित करत होते. मन की बातने आपल्याला सर्वसामान्य नागरिकांशी संपर्काचा एक मार्ग
दिला, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. मन की बातच्या आतापर्यंतच्या भागात संवाद साधलेल्या
काही नागरिकांशी पंतप्रधानांनी या भागातही संवाद साधत, सेल्फी विथ डॉटर, स्वच्छ भारत
अभियान, हर घर तिरंगा, आदी विषयांवर चर्चा केली. नागरिकांनी या कार्यक्रमात सुचवलेले
अनेक विषय लोकचळवळ झाल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. मन की बातने शंभर भागांचा टप्पा
गाठणं, हे श्रेय केवळ नागरिकांचं असल्याचं पंतप्रधान म्हणाले. युनेस्को चे महासंचालक
औद्रे ऑजुले यांनी मन की बातच्या शंभराव्या भागासाठी पाठवलेला शुभेच्छा संदेशही यावेळी
ऐकवण्यात आला.
मन
की बातच्या प्रत्येक भागाचं ध्ननिमुद्रण करणारे, प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करणारे,
तसंच प्रत्येक भागाचं प्रक्षेपण करणाऱ्या प्रसारभारतीच्या अधिकारी तसंच कर्मचारी वर्गाचं
पंतप्रधानांनी कौतुक केलं.
****
देशभरात
ठिकठिकाणी सार्वजनिक स्वरुपात लोकांनी मोठ्या संख्येनं मन की बातचा आजचा शंभरावा भाग
ऐकला. मुंबईत विलेपार्ले इथं केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मन की बातचा शंभरावा भाग ऐकला.
भाजपचे
विधानपरिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी मुंबईत कांदिवली इथे घरकाम करणाऱ्या
महिलांसोबत उपस्थित राहून पंतप्रधानांचे विचार ऐकले.
छत्रपती
संभाजीनगर इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शहरात अनेक ठिकाणी या शंभराव्या भागाचं
सार्वजनिकरित्या श्रवण करण्यात आलं. सहकारमंत्री अतुल सावे यांनी पूर्वांचल वसतीगृह
इथं हा शंभरावा भाग ऐकला.
धाराशिव
इथे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी आकाशवाणी केंद्रात उपस्थित राहून मन की बातचा
शंभरावा भाग ऐकला.
****
दरम्यान मन की बातचे १०० भाग प्रसारित झाल्याबद्दल, मायक्रोसॉफ्टचे
सहसंस्थापक बिल गेट्स यांनी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या. मन की बात कार्यक्रमात स्वच्छता, आरोग्य, महिलांचं
आर्थिक सक्षमीकरण यासारख्या सातत्यानं विकास लक्ष्यांशी निगडीत मुद्द्यांवर कार्य करण्यासाठी
समाजाला प्रेरणा मिळाली असल्याचं गेट्स यांनी आपल्या यासंदर्भातल्या ट्वीट संदेशात
म्हटलं आहे.
****
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या
जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून तुकडोजी
महाराजांना अभिवादन केलं. पर्यटन
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज, मंत्रालयात तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित
होते.
****
राज्यातील
विविध विद्यापीठातून दरवर्षी हजारो युवक पदवी घेऊन बाहेर पडतात. या युवकांनी भरड धान्याच्या
शेती कडे वळावं. तसंच त्यावर आधारित स्टार्टअप सुरू केल्यास मोठ्या प्रमाणात उत्पन्न
मिळेल, असा विश्वास राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केला आहे. भारतीय अन्न सुरक्षा
आणि मानके प्राधिकरणच्या वतीनं आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त मुंबईत इट राईट
मिलेट मेळाव्याचं उद्घाटन राज्यपाल बैस यांच्या हस्ते झालं त्यावेळी काल ते बोलत होते.
लहान शेतकऱ्यांना भरडधान्याच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळावं, यासाठी अनुदान देण्याची
तसंच उत्पादित झालेल्या मालावर प्रक्रिया, पॅकेजिंग आणि त्याच्या विक्रीची व्यवस्था
करण्याची आवश्यकता असल्याचं राज्यपाल म्हणाले.
महाराष्ट्रात तृणधान्य, भरडधान्य महोत्सवाचं आयोजन व्हावं, अशी अपेक्षाही राज्यपालांनी
यावेळी व्यक्त केली.
****
छत्तीसगढच्या
नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात दोन नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. या नक्षलवाद्यांना
पकडून देणाऱ्यास एक लाख रुपयांचं बक्षीस सरकारनं जाहीर केलं होतं.
****
इंडियन
प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात
सामना होणार आहे. दुपारी साडे ३ वाजता चेन्नई इथल्या एम ए चिदंबरम मैदानावर हा सामना
होईल. या स्पर्धेतला अन्य सामना सायंकाळी साडे सात वाजता मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांदरम्यान खेळला जाईल.
****
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक : ३० एप्रिल २०२३ सकाळी ७.१० मि.
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 30 April
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३० एप्रिल २०२३
सकाळी
७.१० मि.
****
· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज आकाशवाणीवरच्या मन की बात मधून देशवासियांशी
संवाद, शंभराव्या भागानिमित्त
देशभरात विविध ठिकाणी हजारो कार्यक्रमांचं आयोजन
· खरीप हंगामात बियाणं, खतं, किटकनाशकाचं काटेकोर
नियोजन करण्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश
· जालना- छत्रपती संभाजी नगर दरम्यान स्क्रॅप पार्क तयार करण्याचा प्रस्ताव- केंद्रीय
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे
· राज्यभरात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत मतदारांचा संमिश्र कौल
· राज्यात अनेक ठिकाणी सलग चौथ्या दिवशी अवकाळी पाऊस, पिकांचं
मोठं नुकसान
आणि
· आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्सची
सात गडी राखून तर सनरायझर्स हैदराबाद संघाची नऊ
धावांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. ‘मन
की बात’च्या या
शंभराव्या भागानिमित्त देशभरात विविध ठिकाणी हजारो
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यात सर्व राज्यभवनांमधे मुख्य कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात होणार असून त्यात पद्म
पुरस्कार विजेते, सामाजिक
कार्यकर्ते, चित्रपट क्षेत्रातले
मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम
प्रसारित होईल.
दरम्यान, माहिती आणि प्रसारण मंत्री
अनुरागसिंह ठाकूर यांनी, नागरिकांना
मन की बात ऐकताना छायाचित्र काढून, ते
नमो ॲपवर अपलोड करण्याचं आवाहन केलं आहे. प्रत्येक नागरिक जास्तीत जास्त २५
छायाचित्रं अपलोड करू शकणार आहे.
मन की बातच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचं आवाहन केंद्रीय मंत्री
पियुष गोयल यांनी केलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी ‘मन
की बात या कार्यक्रमातून जनसंवाद, जनसहभागाचा
अनोखा प्रयोग केल्याचं, गोयल
यांनी म्हटलं आहे.
****
मुंबईत राजभवनावर राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम होणार
आहे. यात पद्म पुरस्कार विजेते, मन
की बात मध्ये पंतप्रधानांनी उल्लेख केलेले मान्यवर, कला आणि चित्रपट क्षेत्रातले व्यक्ती सहभागी होणार आहेत.
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा विलेपार्ले इथल्या तर केंद्रीय वाणिज्य मंत्री
पियूष गोयल कांदिवली इथं होणाऱ्या मन की बातच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
मुंबई भाजपानं मुंबई आणि उपनगरात पाच हजाराहून अधिक ठिकाणी मन की बात च्या थेट
प्रक्षेपणाचं आयोजन केलं आहे.
जालना जिल्ह्यात एक हजार ठिकाणी या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणाचं आयोजन
करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल
जालना इथं वार्ताहरांशी बोलताना
दिली. विदेशातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाची
लोकप्रियता वाढत असून या कार्यक्रमाच्या शंभराव्या भागाच्या प्रसरणाचा विश्व
विक्रम नोंदवला जाणार असल्याचं ते म्हणाले. जालना शहरासह मंठा, परतूर, भोकरदन, जाफ्राबाद इथल्या केंद्रांवर या मन की बात कार्यक्रमाच्या
थेट प्रसारणाचे आयोजन करण्यात आलं आहे. नागरिकांनी हा कार्यक्रम आवर्जुन ऐकावा असं
आवाहनही केंद्रीय मंत्री दानवे यांनी केलं आहे.
****
उद्या महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांना मुंबईत
मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
मुंबई वन, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड
वापरणाऱ्या, या श्रेणीतील हजारो
प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि
एमएमआरडीए यांच्यातर्फे महाराष्ट्र दिनाची ही भेट असून ज्येष्ठ नागरिक, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना
मुंबई-वन पासवर ही सवलत मिळणार आहे.
****
आगामी खरीप हंगामात बियाणं, खतं, किटकनाशकं आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध राहतील यादृष्टिनं
काटेकोर नियोजन करावं, तसंच
गुणनियंत्रण विभागानं दक्ष राहून बोगस बियाणे, खतांची विक्री होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे निर्देश कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. मराठवाडा विभागातील
आठही जिल्ह्यांतील खरीप नियोजनाचा कृषिमंत्री
अब्दुल सत्तार यांनी काल आढावा घेतला. सद्यस्थितीत सुरू असलेल्या अवकाळी
पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अचूक पंचनामे करुन तातडीनं शासनास अहवाल सादर करावा
अशा सूचनाही त्यांनी या आढावा बैठकीत दिल्या.
बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना कृषीमंत्री सत्तार यांनी पावसाचं मोजमाप
करण्यासाठी राज्यात दहा हजार ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रं बसवण्यात येणार असल्याचं
सांगितलं. सध्या राज्यात फक्त बाविसशे प्रर्जन्यमापक यंत्र असल्याचं ते म्हणाले.
यामुळे अतिवृष्टी झालेल्या भागात नुकसानीचे पंचनामे करण्यास मदत होईल, असं त्यांनी सांगितलं.
****
येत्या एक आणि दोन जून २०२३ रोजी रायगडावर तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक
सोहळा राज्यशासनाकडून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक
जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, राज्यातल्या प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे प्रयोग आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार
असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. या सोहळ्याच्या नियोजनाबाबत
काल मुंबईत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी
मुख्यमंत्री बोलत होते. आग्रा इथं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्राची
निर्मिती करण्यात येणार आहे, राज्यात
अकृषक विद्यापीठस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र सुरु करण्यात येणार
आहे. रायगडावर होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सर्वांनी उत्साहाने सहभागी होण्याचं
आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं. सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी
भोजन, पाणी, मंडप, आरोग्य
सुविधा यांची चोख व्यवस्था प्रशासनाने करावी असे निर्देश रायगड जिल्हाधिकाऱ्यांना
मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
****
व्यवसायाच्या दृष्टीनं भारत हा संधींचं माहेरघर असल्याचं, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी
म्हटलं आहे. ते काल मुंबईत 'भारताची
साद' या विषयावरच्या परिषदेत
बोलत होते. देशाची अर्थव्यवस्था खुली आणि पारदर्शक आहे, तसंच मुक्त व्यापार करारांमधे देशहिताचं रक्षण व्हावं, यादृष्टीनं आपलं मंत्रालय सजग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
याच परिषदेतल्या एका सत्रात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन
गडकरी यांनी मार्गदर्शन केलं. पी एम गतीशक्ती नॅशनल मास्टर प्लान हा राष्ट्रीय
कृती आराखडा म्हणजे सरकारनं उचललेलं मोठं पाऊल असून यामुळे देशातील मालवाहतुकीवर
होणारा खर्च कमी होईल, असा
विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जर्दोश यांनी रेल्वे क्षेत्रात
राबवण्यात येत असलेल्या रेल्वे प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध
असल्याची माहिती दिली.
****
राज्य सरकारकडून पाच स्क्रॅप पार्क तयार करण्याचं नियोजन असून त्यापैकी एक पार्क
जालना- छत्रपती संभाजी नगर दरम्यान मंजूर करुन घेण्याचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आहे.
मराठवाड्यातील स्टील व्यावसायिकांतर्फे आयोजित स्टील आणि धातु पुनर्वापरावरील परिषदेत
जालना इथे काल ते बोलत होते.
स्टील उद्योगाला, कच्चा आणि उत्पादित केलेल्या मालाचा दळणवळणाचा सध्या सुमारे १७
टक्के येत असलेला खर्च आठ टक्क्यांवर आणण्यासाठी तसंच स्टील उद्योगाची वाढ आणि आर्थिक
विकास सुलभ करण्यासाठी स्क्रॅप पार्कचं नियोजन करण्यात येत असल्याचं मंत्री दानवे यांनी
यावेळी सांगितलं.
****
राज्यभरात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत मतदारांनी
संमिश्र कौल दिला आहे. छत्रपती संभाजीनगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमदार
हरिभाऊ बागडे आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या पॅनलनं वर्चस्व राखत १५ पैकी
११ जागांवर विजय मिळवला. डॉक्टर कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास
आघाडीच्या पॅनलला ४ जागांवर समाधान मानावं लागलं.
वैजापूर बाजार समितीवरही भाजप शिवसेना गटानं विजय मिळवला. आमदार रमेश बोरनारे
यांच्या नेतृत्चात, भाजप
शिंदे गटाच्या या पॅनलनं, या
बाजार समितीत दहा जागांवर विजय मिळवला, तर महाविकास आघाडीला पाच जागांवर समाधान मानावं लागलं.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीवर धनंजय मुंडे यांच्या
नेतृत्वातल्या योगेश्वरी शेतकरी विकास पॅनलनं १८ पैकी १५ जागा जिंकल्या, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीतही धनंजय मुंडे यांच्या
नेतृत्वाखालील वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलचा विजय झाला आहे.
गेवराई इथं माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस
पुरस्कृत पॅनलनं तसंच वडवणी इथं आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी
आणि महाविकास आघाडीनं सर्व १८ जागा जिंकल्या आहेत.
बीड कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वात
महाविकास आघाडीनं १८ पैकी १५ जागांवर विजय मिळवला.
आष्टी इथली निवडणूक याआधीच बिनविरोध झालेली असून, इथं आमदार सुरेश धस गटाचे ११, राष्ट्रवादी
काँग्रेसचे तीन, भीमराव धोंडे गटाचे तीन तर
शिवसेनेचा एक उमेदवार विजयी झाला आहे.
केज बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपला १४ जागांवर विजय मिळाला आहे.
****
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेना, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस
आणि भाजपाच्या संत नामदेव विकास पॅनलनं १०
जागांवर विजय मिळवला आहे. शेतकरी विकास पॅनलला ६ जागांवर विजय मिळवता आला.
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यातील ताडकळस बाजार समितीच्या निवडणुकीत
भारतीय जनता पक्षाच्या पॅनलनं सर्वाधिक नऊ जागांवर विजय मिळवला, तर सत्तारुढ काँग्रेसनं सहा आणि, राष्ट्रवादी काँग्रेसनं तीन जागांवर विजय मिळवला आहे. बोरी कृषी उत्पन्न बाजार
समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद
बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखालील तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनलनं १२ जागांवर विजय
मिळवला. जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतही बोर्डीकर गटानं १८ पैकी १४
जागांवर विजय मिळवला आहे.
नांदेड जिल्ह्यात भोकर, कुंटूर, हिमायतनगर, नायगाव
या बाजार समित्यांवर काँग्रेस पक्षानं विजय मिळवला. हिमायतनगर बाजार समितीत १८
पैकी १८, कुंटूर इथं सर्वच्या सर्व
१७ जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला. तर भोकर बाजार समितीत काँग्रेसच्या नेतृत्वात
महाविकास आघाडीनं १८ पैकी १५ जागा जिंकल्या.
लातूर जिल्ह्यात चार पैकी, लातूर
आणि उदगीर या दोन बाजार समितीवर महाविकास आघाडीनं तर चाकूर आणि औसा बाजार समितीवर
भाजपनं विजय मिळवला.
धाराशिव
जिल्ह्यात धाराशिव, भूम आणि तुळजापूर बाजार समित्यांमध्ये भाजपला बहुमत मिळालं
तर परंडा, उमरगा. मुरुम, कळंब आणि वाशी या पाच बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीनं
विजय मिळवला आहे. भूम बाजार समितीत, महायुतीला
१७, तुळजापूरमध्ये १४ जागांवर
विजय मिळाला. उमरगा बाजार समितीत महाविकास आघाडीला ११, मुरुम इथे १५, कळंब
इथे ११ तर वाशी इथं १२ जागांवर विजय मिळाला.
****
राज्यात काल अनेक ठिकाणी सलग चौथ्या दिवशी अवकाळी पाऊस झाला. मराठवाड्यातल्या
छत्रपती संभाजीनगर सह लातूर, परभणी, बीड, नांदेड
जिल्ह्यात काल जोरदार पाऊस पडला. लातूर जिल्ह्यात एका व्यक्तीचा अंगावर वीज
पडून तर एका व्यक्तीचा पुरात वाहझ मृत्यु
झाला. लातूर जिल्ह्यात अंगावर वीज पडून सात जनावरंही दगावली.
जालना जिल्ह्यातही काल मुसळधार पाऊस झाला. भोकरदन तालुक्यात शेतातली पिकं
पाण्याखाली गेली असून पारध इथल्या रायघोळ नदीला पूर आला आहे. जाफ्राबाद, तळेगाव परिसरातही काल जोरदार पाऊस झाला आहे.
बीड जिल्ह्यात केज तालुक्यात तांबवा, जानेगाव, सारणी, आनंदगाव परिसरातल्या फळबागांना प्रचंड गारपिटीसह वादळाचा
फटका बसला. परभणी जिल्ह्यात गंगाखेड, पूर्णा, पालम, सेलू, मानवत, जिंतूर, पाथरी
आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. नांदेड शहर आणि परिसरातही किनवट, अर्धापूर, मालेगावसह
विष्णुपुरी परिसरात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे
आंबा, मोसंबी, टरबूज आदी फळपिकांसह इतर रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं
आहे.
****
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून
योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन
यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि
गारपिटीनंतर जिल्ह्यातील सुमारे ३६ हजार पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्यांसाठी ३० कोटी ५२
लाख १२ हजार रुपये निधी शासनाकडे मागितला आहे. याला शासन निर्णयान्वये मंजुरीही
देण्यात आली असून, बाधित
शेतकऱ्यांना नव्याने विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे मदत वाटप
करण्याची कार्यवाही चालू असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
****
इंडियन प्रीमिअर लीग - आयपीएल
क्रिकेट स्पर्धेत काल कोलकाता इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता
नाईट रायडर्सवर सात गडी राखून विजय मिळवला. कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी करत सात
बाद एकशे एकोणाएंशी धावा केल्या. गुजरात संघाने हे आव्हान तीन गडी गमावत, अठराव्या षटकांत साध्य केलं.
या स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात, सनरायझर्स हैदराबाद संघानं दिल्ली
कॅपिटल्स वर ९ धावांनी विजय मिळवला. प्रथम
फलंदाजी करत हैदराबाद सनरायझर्स नं २० षटकात ६ बाद १९७ धावा केल्या. या लक्ष्याचा
पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ निर्धारित २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात
१८८ धावा करु शकला.
****
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...