Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 25 April
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २५ एप्रिल २०२३
सकाळी
७.१० मि.
****
ठळक बातम्या
· नैसर्गिक
आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे येत्या जूनपासनू ई - पंचनामे करण्याची मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांची घोषणा
· अंतिम
निर्णय होईपर्यंत औरंगाबादचं नाव न बदलण्याचे, मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारी विभागांना
निर्देश
· महाराष्ट्र
भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटना प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची राज्यपालांकडे मागणी
· तीन
अपत्य असलेल्या लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांची
केंद्र सरकारकडे मागणी
· देशाच्या
विकासासाठी परिवर्तनाची गरज असल्याचं, तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे
अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांचं मत
· पायाभूत
सुविधा आणि कुशल मनुष्यबळाअभावी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची चार महाविद्यालयांना
नोटीस
आणि
· आयपीएल
क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचा सनराईजर्स हैदराबादवर सात धावांनी विजय
सविस्तर बातम्या
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे येत्या जूनपासनू
ई - पंचनामे करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते काल मुंबईत
राज्यातले विभागीय आयुक्त तसंच जिल्हाधिकारी यांच्या एक दिवसीय परिषदेत बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांना पारदर्शक पद्धतीने
आणि तातडीने मदत मिळावी याकरता सर्वेक्षणासाठी, उपग्रह आणि ड्रोनची मदत घेऊन संगणकीय
प्रणाली वापरण्यात येणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जून महिना सुरु झाला
की वीज पडून होणारे मृत्यू तसंच तीव्र उष्णतेमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी, सर्व
विभाग आणि जिल्ह्यांमध्ये खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
या परिषदेत उष्णतेची लाट, पेजयल पुरवठा, जलयुक्त शिवार,
ई-ऑफिस, आकांक्षित शहरे आदी विषयांवर सादरीकरण तसंच चर्चा झाली. मिशन-2025 अंतर्गत
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पणही यावेळी करण्यात
आलं.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवा पाचोरा
इथल्या सभेत पंतप्रधानांचा एकेरी उल्लेखाने केलेल्या विधानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी निषेध केला आहे. ही बाळासाहेबांची संस्कृती नसल्याची भावना त्यांनी माध्यमांशी
बोलताना व्यक्त केली.…
जेव्हा एखादी व्यक्ती वैयक्तिक द्वेषाने पछाडली जाते,
आणि समोरच्याची जी लोकप्रियता आहे, यशस्वीता जी आहे, त्याची पोटदुखी जेव्हा निर्माण
होते, त्या वेळेस अशा प्रकारचं वक्तव्य काही लोकं करतात. अशा प्रकारचं वक्तव्य करणं
हे निंदाजनक आहे. ही बाळासाहेबांची संस्कृती होऊ शकत नाही. नरेंद्र मोदी साहेबांची
लोकप्रियता या देशात नाही जगात आहे. परंतु ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यांच्याकडून
जे वक्तव्य झालं त्याची मी निंदा करतो.
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानातर्फे दिला जाणारा
यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना काल प्रदान करण्यात
आला. मुंबईत झालेल्या सोहळ्यात पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, ह्रदयनाथ मंगेशकर यांच्यासह
मंगेशकर कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी गायक पंकज उदास, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेते
प्रसाद ओक, अभिनेत्री विद्या बालन, श्री सद्गुरु सेवा संघ ट्रस्ट, ग्रंथाली प्रकाशन,
यांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष
विश्वनाथ कराड यांना यावेळी विशेष पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
****
नामांतराबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत सरकारी विभागांनी
औरंगाबादचं नाव बदलू नये, असे निर्देश, मुंबई उच्च न्यायालयानं काल दिले. औरंगाबाद
आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावं बदलण्याच्या निर्णयाविरोधात, मुंबई उच्च न्यायालयात
दाखल याचिकेवर काल सुनावणी झाली. न्यायमूर्ती एस व्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती
संदीप व्ही मारणे यांच्या पीठासमोर झालेल्या या सुनावणीत, दहा जूनपर्यंत टपाल कार्यालय,
महसूल, पोलिस
ठाणे इत्यादी प्रशासकीय विभागांची नावं बदलण्याबाबत कोणताही
निर्णय घेतला जाणार नाही, असं महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी खंडपीठाला सांगितलं.
यासंदर्भात पुढची सुनावणी सात जून रोजी होणार आहे.
****
खारघर इथं झालेल्या महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्याच्या
दुर्घटनेची चौकशी करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी, शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन इथं
भेट घेतली. राज्याचे प्रमुख म्हणून आपण या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली.
यासंदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अधिक माहिती दिली.
ते म्हणाले...
अजूनही सरकारने याविषयी कोणत्याही प्रकारची भूमिका,
प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. आणि या विषयावर न्याय मागण्यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ
आज आम्ही सगळेच्या सगळी मंडळी महामहिम राज्यपाल यांची भेट घेतलेली आहे. एवढी मोठी घटना
घडल्यानंतर खरं तर आजही आकड्यांबाबत संभ्रम आहे. हे झाल्यानंतर अजूनही पोलीस स्टेशनमध्ये,
पोलीस कमिशनरेटकडे याचा किमान अपमृत्यू झाल्याचीसुद्धा नोंद आहे की नाही हा प्रश्न
आम्ही राज्यपालांना विचारलेला आहे.
दरम्यान, यासंदर्भात काँग्रेस पक्ष देखील सदोष मनुष्यवधाचा
गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्यपालांकडे करणार आहे. या कार्यक्रमात ढिसाळ नियोजनाची
जबाबदारी सुनिश्चित करुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करावा,
अशा मागणीचं निवेदन राज्यपालांना देणार असल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काल
नांदेडमध्ये सांगितलं.
****
तीन अपत्यं असलेल्या लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवावं, अशी
मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. ते बारामती
इथं एका कार्यक्रमात बोलत होते. लोकसंख्येच्या आकडेवारीत भारत जगात प्रथम क्रमांकावर
पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. दिवंगत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना
तीन अपत्ये असलेल्या लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तशी
कारवाई का झाली नाही, असा प्रश्न अनेकांना पडला असल्याचं पवार यांनी सांगितलं.
****
‘अब की बार, किसान सरकार’ अशी घोषणा देत काल तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र
समितीचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये देशाच्या विकासासाठी
परिवर्तनाची आवश्यकता असल्याचं मत व्यक्त केलं. ते काल शहरात झालेल्या जाहीर सभेत बोलत
होते. अनेक पक्षांची सरकारं आली, मात्र देशापुढच्या समस्या कायम असल्याचं राव यांनी
नमूद केलं. ते म्हणाले…
बिना परिवर्तन विकास नही
होगा भारत में। कुछ ना कुछ परिवर्तन की जरूरत है। भारत को बदलना चाहिये। जब तक हम परिवर्तीत
नही होते, हमारा किस्मत नही बदलनेवाला है। याने की एक पार्टी हार गया, दुसरा पार्टी
जीत गया ये परिवर्तन नही होता भाईयों। उच्च गुणवत्तावाली, चुनाव के दरम्यान, चुनाव
के जरीये जनता जीतती है। जनता मांगे सफलता मिलती है वो सही जीत होता है। पार्टीयां
तो कई जीताया हमने। एक गया दुसरा आया, तिसरा आया, चौथा आया। लेकिन समस्या जस मे तस।
****
राज्याच्या पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक आणि
पोलीस उपनिरीक्षक श्रेणीतल्या पदांवर राज्यातल्या अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली
असून, विविध पदावर त्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये दहशतवाद विरोधी
पथकाचे अपर पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची पदोन्नती होऊन, पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक
के एम मल्लिकार्जुन प्रसन्ना यांची, पोलिस महासंचालक कार्यालयात आस्थापना विभागात बदली
करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे.
पिंपरी चिंचवडचे पोलिस सहआयुक्त मनोज लोहिया यांची, छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त
पदी बदली करण्यात आली आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक एस एच महावरकर
यांची, नांदेड इथंच विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे.
****
पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळाअभावी, छत्रपती संभाजीनगरमधील
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं चार महाविद्यालयांना नोटीस बजावली आहे.
यामध्ये शेंद्रा इथलं वाल्मिकराव दळवी महाविद्यालय, देवळाई इथलं डॉ.ए.पी.जे.अब्दुल
कलाम महाविद्यालय, कोळवाडी इथलं गोविंदराव पाटील जिवरख महाविद्यालय, आणि सी.पी.कॉलेज
ऑफ एज्यूकेशन, या महाविद्यालयांचा समावेश आहे. या महाविद्यालयांनी आज लेखी खुलासा सादर
करण्याचे आदेश शैक्षणिक विभागानं दिले आहेत. विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा आणि कुशल
मनुष्यबळ उपलब्ध करुन देणं, ही संबंधित महाविद्यालयांची नैतिक जबाबदारी आहे. गुणवत्ता
आणि दर्जा या बाबतीत कसलीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका कुलगुरु डॉ.प्रमोद येवले
यांनी घेतली आहे.
****
रोजगार हमी योजनेचं सर्वात जास्त काम छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात झालं असून, त्यातून शेतकरी सुखी होणार असल्याचा विश्वास, रोजगार हमी आणि
फलोत्पादन मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला आहे.
काल छत्रपती संभाजीनगर इथं पंचायत राज दिनानिमित्त झालेल्या पुरस्कार वितरण सोहळा आणि
कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्ह्यातल्या विविध विकासकामांचा आढावा घेताना भुमरे यांनी,
ग्रामपंचायतींसाठी इमारत उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. ते म्हणाले…
दुसरा एक निर्णय मी घेतो
आहे. ग्रामसेवक आणि सरपंचाला गावाचा कारभार करत असतांना त्यांना एक इमारत असली पाहिजे.
भव्य इमारत जर असेल तर त्यांना काम फास्ट करता येतं. संचालकाची बैठक असेल, ग्रामसेवकाचं
ऑफिस असेल, सरपंचाचं ऑफिस असेल, उपसरपंच असेल, मी निर्णय घेतो की, जिल्ह्यात गसळ्या
ग्रामपंचायती आपल्याला जिथं जागा असेल तिथं ग्रामपंचायत इमारत नवीन घ्यायचा असा एक
निर्णय घेतो आहे.
****
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव लोकाभिमूख करण्यासाठी
सर्व सदस्यांचं योगदान मोलाचं असल्याचं, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटलं
आहे. ते काल नांदेड इथं यासंदर्भात स्थापन समितीच्या बैठकीत बोलत होते. मराठवाडा मुक्तीचा
इतिहास शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा, यादृष्टीने शालेय पातळीवर नाट्यस्पर्धा,
मान्यवर लेखकांच्या लेखांचं अभिवाचन, विशेष स्मरणिका प्रकाशन, येत्या महाराष्ट्र दिनी
राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीतासह मराठवाडा गीताचं समुहिक गायन, याबाबत या बैठकीत चर्चा
करण्यात आली.
****
हिंगोली इथल्या संत नामदेव मार्केट यार्डात काल मराठवाड्यासह
विदर्भातल्या अकोला, अमरावती, वर्धा, जळगाव जिल्ह्यातून हळदीची मोठ्या प्रमाणात आवक
झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत सोळा हजार कट्ट्यांची आवक झाल्याचं कृषी उत्पन्न बाजार
समितीकडून सांगण्यात आलं.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या
११३ शाळांमध्ये, इंटरऍक्टिव्ह बोर्ड या संकल्पनेवर आधारित शिक्षण दिलं जात आहे. यामुळे
विद्यार्थ्यांना चित्र आणि आकृत्यांच्या सहाय्याने शिकवलं जात असून, यूट्यूबवरील चित्रफितीच्या
माध्यमातून विविध विषयांमध्ये कौशल्य विकसित होत आहे. या उपक्रमाबाबत जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी अधिक माहिती दिली...
इंटरॲक्टीव्ह बोर्डचा आता एक फायदा एक आहे की आता
जुनी जी पद्धत होती चॉक आणि बोर्ड ची त्याच्यामध्ये आणखी एक पद्धत आहे इंटरॲक्टीव्ह
बोर्डची ज्याच्यामध्ये तुम्ही इंटरनेटचे सर्व साधन वापरून आणि जे शिक्षक आहेत ते पण
सर्व व्हिडिओ लेक्चर्स जे आहेत किंवा ऑडिओ इनपूटस् आहेत, त्याला सर्वांला वापरून आणि
त्यांचे जे स्वतःचे जे तज्ञ आहेत त्याला वापरून मुलांना शिकवू शकतात. इंटरॲक्टीव्ह
बोर्ड म्हणजे की मुलं शिक्षकांबरोबर आणि या इंटरनेटवर जे कंटेंट आहेत त्याच्याबरोबर
ते इंटरॲक्ट करू शकतात. आणि जास्तीत जास्त जे ज्ञान आहे म्हणजे जे पुस्तकात उपलब्ध
होत नाही, काहीतरी शंका वगैरे असतील ते इंटरॲक्टीव्ह बोर्ड मध्ये ते इंटरनेटमध्ये लगेच
शोधु शकतात आणि त्याचा अभ्यास करू शकतात.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल हैदराबाद
इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं सनराईजर्स हैदराबादवर सात धावांनी विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करत दिल्लीच्या संघानं दिलेल्या १४५ धावांच्या आव्हानाचा सामना करताना,
हैदराबादचा संघ निर्धारित षटकात १३७ धावाच करु शकला.
****
चला जाणुया नदीला या उपक्रमाअंतर्गत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र
सिंह यांनी काल नांदेड जिल्ह्यात मन्याड नदीची पाहणी केली. यावेळी त्यांनी हिप्परगा,
शेवाळा, आलूर, वझरगा, तूप शेळगाव, गळेगाव या मन्याड नदीकाठच्या ग्रामस्थांशी संवाद
साधला. येत्या दहा वर्षात नदी पुनरुज्जीवन केलं नाही, तर मन्याड नदी अनेक गावांना विस्थापित
करेल, त्यामुळे नदी अमृत वाहिनी करण्याच्या कामात गावकर्यांनी सहभागी व्हावं, असं आवाहन
राजेंद्र सिंह यांनी यावेळी केलं.
****
हवामान
राज्यात मराठवाड्यासह विदर्भात आज आणि उद्या अवकाळी पावसासह
गारपिट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात
हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
****
हिंगोली इथं सामाजिक न्याय समता पर्वाचा एक भाग म्हणून,
ऊसतोड कामगारांना काल ओळखपत्र वाटप करण्यात आलं. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त
शिवानंद मिनगिरे यांच्या मार्गदर्शनात, या कार्यक्रमात नोंदणी परिपूर्ण झालेल्या ऊसतोड
कामगारांना, प्रातिनिधिक स्वरूपात ओळखपत्र देण्यात आली.
****
शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रमातंर्गत परभणी जिल्ह्यातल्या
७५ हजार लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळेल, असं निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी
सांगितलं. ते काल परभणी इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. शासकीय योजना सुलभीकरण
अभियानाचा, शासकीय योजनांची जत्रा पहिला टप्पा असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यात सेलू - ढेंगळी पिंपळगाव - मानवत रोड दरम्यान
रेल्वे रुळ दुरुस्तीच्या कामासाठी आज पाच तास रेल्वे वाहतूक सेवा बंद ठेवण्यात येणार
आहे. त्यामुळे पुणे - नांदेड एक्सप्रेस ५० मिनिटं, मुंबई - नांदेड तपोवन एक्सप्रेस
दोन तास पाच मिनिटं, काचीगुडा - नगरसोल तीन तास दहा मिनिटं तर नगरसोल - नरसापूर एक्सप्रेस
दीड तास उशिराने धावणार आहे. उद्या धर्माबाद - मनमाड मराठवाडा एक्सप्रेस धर्माबादहून
तिच्या नियामित वेळेच्या एक तास उशिरानं सुटणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड
जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment