Regional Marathi Text Bulletin,
Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 August 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०
****
· राज्याच्या विविध भागांत पावसामुळे जनजीवन विस्कळीत; वेगवेगळ्या
घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू
· हिंगोली जिल्ह्यात काही गावांचा संपर्क तुटला, तर
जालन्यातही कसूरा नदीला पूर
· यशस्वी मोहिमेनंतर अंतराळवीर शुभांशू शुक्ला उद्या भारतात परतणार
· राज्यात आज दहीहंडीचा उत्साह; दहा थर रचत ठाणे इथल्या
कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाची विश्वविक्रमाची नोंद
आणि
· छत्रपती संभाजीनगर शहरातल्या मकाई दरवाजाच्या कामाची विरोधी पक्षनेते अंबादास
दानवे यांच्याकडून पाहणी
****
राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाशी निगडीत वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा
जणांचा मृत्यू झाला.
मुंबई आणि परिसरामध्ये कालपासून सुरू असलेल्या जोरदार
पावसात दोन जणांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले.
मध्यरात्री एका घरावर दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. या पावसामुळे मुंबईत
ठिकठिकाणी पाणी साचून वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्हाभरात सकाळपासून अधून मधून
पाऊस पडत आहे. जायकवाडी धरण पट्ट्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात
झाली आहे. तसंच लासूरस्टेशन परिसरात दोन दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे लासूरगाव
इथल्या शिवना नदीला पूर आला आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातल्या कोटबाजार इथं
संततधार पावसानं काल रात्री कच्च्या मातीच्या घराची भिंत कोसळून पती-पत्नीचा
मृत्यू झाला.
बीड जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु असून, पाणीसाठ्यात वाढत होत आहे. मांजरा धरणातून आज दुपारी पाण्याचा विसर्ग सुरु
करण्यात आला. त्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला
आहे. माजलगांव तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे
काही ठिकाणी पिकं पाण्याखाली गेले असून, कपाशी सोयाबीन
पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई
द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात कामठा फाटा ते
येलकी रस्त्यावर ओढ्याला मोठा पूर आल्यानं येलकी, बेलथर, कसबे धांवडा या गावांचा संपर्क तुटला आहे. पिंपरी बुद्रुक इथल्या ओढ्याला पूर
आल्यामुळे आखाडा बाळापूर ते पिंपरी, चिखली, कान्हेगावसह पाच गावांचा संपर्क तुटला आहे. ईसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात
जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या सात दरवाज्यांतून सुमारे ११ हजार घनफूट
प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू
आहे.
लातूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस असल्यानं
धरणांमधून अतिरिक्त पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे.
जालना शहरासह जिल्ह्यात आज पहाटेपासून पावसाची संततधार सुरू
आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत आहे. बदनापूर तालुक्यातल्या बाजार गेवराई कडेगाव, वरुडी,
ढासला, पिरवाडी, सोमठाणा,
गोकुळवाडी या भागात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीपिकांचं
मोठ नुकसान झालं आहे. परतूर तालुक्यातल्या कसुरा नदीला आलेल्या पुरामुळे
परतूर-आष्टी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. घनसावंगी तालुक्यात सतत कोसळणाऱ्या
पावसामुळे तालुक्यातले नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, दैनंदिन
जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाच्या तडाख्यात ढाकेफळ इथल्या माणिकदंड दत्त मंदिर
इथला नळकांडी पूल वाहून गेला आहे, तर मांदळा धरणाची पाणीपातळी
वाढली आहे.
****
वाशिम जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसानं सोयाबीन, हळद या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. रिसोड तालुक्यातल्या वाडी रायताळ इथं
नाल्याच्या पुरामध्ये वाहून गेल्याचा एकाचा मृत्यू झाला. यवतमाळमध्ये वीज पडून
एकाचा मृत्यू झाला.
धुळे शहर आणि जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराला
पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव काठोकाठ भरला असून, आज
सकाळपासून तलावाच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहात आहे.
बुलडाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यातल्या घारोड इथं वीज पडून
एका महिलेचा मृत्यू झाला, तर दोघी जणी जखमी झाल्या.
आज दुपारी ही दुर्घटना घडली.
****
पुढच्या दोन तासात छत्रपती संभाजीनगर, जालना,
हिंगोली, नांदेड, परभणी,
बीड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज परभणी
इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान केंद्रानं वर्तवला आहे.
या काळात लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची
शक्यता आहे.
****
दरम्यान, राज्यात आजपासून २१
तारखेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. या कालावधीत
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजा
आणि गडगडाटासह अधूनमधून ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची
शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
****
माजी मंत्री आणि भाजपा नेते पद्माकर वळवी यांनी आज बुलढाणा
इथं काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री वसंत पुरके उपस्थित होते.
लवकरच नंदुरबार इथं प्रवेश सोहळ्यात वळवी यांच्या सहकाऱ्यांचाही पक्षप्रवेश होईल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं.
****
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त
आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. अनेक मान्यवरांनीही
वाजपेयी यांच्या ‘सदैव अटल’ या स्मृतिस्थळावर पुष्पांजली अर्पण केली.
****
यशस्वी अंतराळ मोहिमेनंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला
उद्या भारतात परतणार आहेत. भारतात परतल्यानंतर आपल्या मूळ गावी लखनौला
जाण्यापूर्वी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. जून महिन्यात ॲक्झिओम
फोर मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचणारे शुक्ला हे पहिले
भारतीय बनले.
****
राज्यात आज गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा उत्सात पाहायला मिळत
आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा
दिल्या आहेत.
राज्यात विविध ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे.
दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस दिसत असून, गेल्या
दोन महिन्यांपासून सराव केलेली दहीहंडी पथकं मानवी मनोरे रचत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि ठाणे इथल्या
अनेक दहीहंडी आयोजनाच्या ठिकाणी भेट देऊन गोविंदांना शुभेच्छा दिल्या. भिवंडी
इथल्या कपिल पाटील फौंडेशनच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्र्यांनी
गोविंदांना स्वत:ची काळजी घेत, उत्सव साजरा करण्याचं आवाहन
केलं. ते म्हणाले…
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
ठाण्यात प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि संस्कृती युवा
प्रतिष्ठान आयोजित संस्कृती दहीहंडी मध्ये १० थर रचत कोकण नगरचा राजा गोविंदा
पथकानं विश्वविक्रमाची नोंद केली. त्यांना २५ लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर करण्यात
आलं आहे.
मुंबईत जोगेश्वरी इथली दहीहंडी जय जवान गोविंदा पथकानं नऊ
थर लावून फोडली,
तर दादरमधली आयडियल दहीहंडी महिला गोविंदा पथकानं फोडली.
वरळी जांबोरी मैदान इथं भाजपाचे संतोष पांडे यांनी दहीहंडी उभारली आहे. ही दहीहंडी
फोडण्यासाठी पथकांनी मोठी गर्दी केली आहे. शहर आणि उपनगरांत विविध राजकीय
पक्षांच्या नेत्यांनी लाखो रुपये बक्षीस असलेल्या दहीहंड्या उभारल्या आहेत. यावेळी
विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि सेलिब्रिटींचीही रेलचेल आहे.
दरम्यान, मानखुर्द इथल्या बाल
गोविंदा पथकातल्या एका गोविंदाचा दहीहंडीचा थर रचत असताना उंचावरून खाली पडून
मृत्यू झाला. दहीहंडी दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत ३० जण जखमी
झाले असून,
१५ जणांवर उपचार सुरू आहेत. जखमी झालेल्या सर्व गोविंदांवर
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांत निःशुल्क उपचार करण्यात यावेत, असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरात गुलमंडी, क्रांती
चौक,
टीव्ही सेंटर, कॅनॉट प्लेस, कोकणवाडी तसंच गजानन मंदीरासमोर दहीहंडी आयोजित करण्यात आली असून, गोविंदा पथकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या मकाई दरवाजाच्या कामाची पाहणी
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केली. पुढील एका महिन्यात
विहित वेळेत काम पूर्ण करण्याची त्यांनी राज्य पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना
सूचना केली.
****
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या साडे सातशेव्या
जयंती निमित्ताने परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं आज पालखी काढण्यात आली.
मुख्यलेखाधिकारी प्रभाकर काळदाते यांच्या हस्ते माऊलींच्या प्रतीमेची आरती करण्यात
आली. देशमुख गल्ली इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पालखी सोहळ्याचा समारोप
झाला.
****
बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने उद्या १७ तारखेला
"नशामुक्त समाज - सुरक्षित भविष्य" या संकल्पनेखाली मॅरेथॉन स्पर्धा
आयोजित करण्यात आली आली. समाजामध्ये नशामुक्तीबाबत जनजागृती घडवून आणणं, तसंच युवकांना व्यसनमुक्त जीवनशैलीकडे प्रेरित करणं, हे
या उपक्रमाचं उद्दीष्ट आहे. या मॅरेथॉनमध्ये नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी
होऊन,
नशामुक्त समाज निर्मितीसाठी योगदान द्यावं, असं आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी केलं आहे.
****
मिलिंद विंचुरकर हौशी नाट्य कलावंत पुरस्कार उद्या छत्रपती
संभाजीनगर इथं,
चाळीसगाव इथले डॉ. मुकुंद करंबेळकर यांना प्रदान करण्यात
येणार आहे. नाट्य प्रेमींना जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला उपस्थित
राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या सिडको - हडको सर्वपक्षीय गणेश
महासंघाच्या कार्यालयाचं उद्घाटन आज पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झालं.
सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमीत्त शहरातल्या
शोभायात्रेत देखील शिरसाट सहभागी झाले होते.
****
ऑलिम्पिकपटू अंकिता ध्यानी हिनं जेरुसलेम
ग्रँडस्लॅमॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या दोन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत
सुवर्णपदक पटकावलं.
****
No comments:
Post a Comment