Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 August 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०
****
· राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस-मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद
· लातूर तसंच नांदेड जिल्ह्यातल्या अनेक धरणांतून विसर्ग सुरू-नागरिकांचं सुरक्षित
स्थलांतर
· मराठा आरक्षणासंदर्भात दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करणार-मुख्यमंत्र्यांची ग्वाही
· राज्यभरात दीड दिवसांच्या गणरायाचं विसर्जन
आणि
· ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक बाळ कर्वे यांचं वार्धक्यानं निधन
****
मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात आज मुसळधार पाऊस सुरू
असून,
अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. नद्या नाल्यांना पूर आले असून, प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यात वाण नदीच्या पुलावरून जाणारी
रिक्षा पुराच्या पाण्यात वाहून गेली. आडस-अंबाजोगाई रस्त्यावरील अवरगाव जवळ काल रात्री
ही दुर्घटना घडली, यात वाहून गेलेले नितीन कांबळे यांचा मृतदेह
आज सकाळी सापडला असून, अनिल लोखंडे यांचा शोध घेण्यासाठी बीडहून
विशेष शोधपथक दाखल झालं आहे. नदीला पूर आला की, सतत
पुलावरुन पाणी वाहून हा रस्ता बंद पडतो. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या पुलांची उंची
वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, कुठल्याही नदीनाल्यास पूर आला
असेल तर पाण्यात जाण्याचं अनाठायी धाडस करू नये, असं
आवाहन तहसीलदार सुरेश पाळवदे यांनी केलं आहे.
लातूर जिल्ह्यात ६० पैकी २९ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असून
तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजेभोसले यांनी
प्रशासनाला केल्या आहेत. पालकमंत्र्यांनी आज पूरस्थितीचा दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा
घेतला.
दरम्यान, लातूर शहरासह बीड जिल्ह्यातील
केज,
अंबाजोगाई तर धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या
मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून, मांजरा
नदीपात्रात पाच हजार २४१ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
रेणापूर तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्प, औसा तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्प तसंच माकणी इथल्या निम्न तेरणा प्रकल्पातून
पाण्याचा मोठा विसर्ग केला जात आहे. परिणामी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने
दिला आहे. चाकूर तालुक्यात वडवळ नागनाथ इथं ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. गावातील अनेक
घरात पावसाचे पाणी शिरून संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या १७ महसूल मंडळात आज अतिवृष्टीची नोंद झाली.
देगलूर तालुक्यातील दोन हजार २३६ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. राज्य
आपत्ती प्रतिसाद दल-एसडीआरएफची एक तुकडीही देगलूर तालुक्यात तैनात करण्यात आली आहे.
मुखेड तसंच लोहा तालुक्यातल्या काही गावामध्येही पाणी शिरलं आहे. लेंडी प्रकल्प बाधित
हसनाळ,
बोरगाव या गावांमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे. विष्णुपुरी
प्रकल्पाचे तीन दरवाजे तर उर्ध्व मानार धरणाचे सात दरवाजे उघडले आहेत. दक्षिण मध्य
रेल्वेच्या हैदराबाद विभागात काही ठिकाणी रेल्वे मार्गावर पाणी वाहत असल्यामुळे काही
गाड्यांच्या मार्गात बदल झाला असून, काही गाड्या रद्द तर काही गाड्या
आंशिक रद्द करण्यात आल्या आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरून माजी
मंत्री माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात स्थापन समितीने बेटमोगरा, कारला,
मांजरम, मांजरम वाडी तसंच नायगाव इथं
पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे
पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पूरग्रस्तांना तातडीने मदत पुरवण्यासंदर्भात त्यांनी
जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या तसंच सर्व शेतकरी तसंच गावकऱ्यांना सुरक्षित
स्थळी राहून खबरदारी घेण्याचं आवाहन केलं.
धाराशिव जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यात
आतापर्यंत ४७५ पूर्णांक आठ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू
आहे. जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
धरणात सध्या ४९ हजार ४२६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, धरणाच्या १८ दरवाजातून ४७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदापात्रात सोडलं
जात आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे आज सकाळी
जिल्ह्यातल्या धरणातून सुरू असलेला विसर्ग कमी करण्यात आला. यामुळे गोदावरीच्या पाणीपातळीतही
घट झाली आहे. जिल्ह्यात आज दिवसभर ढगाळ वातावरण असून पावसाने उघडीप दिली आहे.
****
दरम्यान, राज्यात आज कोकण तसंच मराठवाड्याच्या
काही भागात ऑरेंज अलर्ट तर उर्वरित राज्यात यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात परभणी, नांदेड,
लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर छत्रपती संभाजीनगर, जालना,
बीड आणि हिंगोली जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
लातूर आणि धाराशिव वगळता उर्वरित मराठवाड्याला उद्यासाठीही यलो
दिलेला असून,
पुणे अहिल्यानगर तसंच कोल्हापूर जिल्ह्यात घाट परिसराला उद्या
ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
****
पालघर जिल्ह्यात विरार इथं इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या
१७ झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या
कुटुंबांना पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या
दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
विरार इथल्या रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील
भाग मंगळवारी रात्री चाळीवर कोसळला. अपघातग्रस्त इमारतीमध्ये ५० सदनिका होत्या. वसई-विरार
महानगरपालिका,
अग्निशामक दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्या
मदत आणि बचाव कार्य करत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मराठा आरक्षणासंदर्भात राज्यशासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार
करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज मुंबईत बोलत
होते. कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असं
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेवर ठाम असून
कोणत्याही समाजाचं आरक्षण कमी केलं जाणार नाही असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांनी स्पष्ट केलं. ते आज नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. काँग्रेसने आरक्षणाबाबत
भूमिका स्पष्ट करावी, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने मराठा समाजाला
आरक्षणाबाबत दिलेलं आश्वासन पाळावं, असं आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्रात
तसंच राज्यात भाजप प्रणीत सरकार आहे, त्यामुळे दिल्लीत जाऊन
आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, असं सपकाळ यांनी म्हटलं
आहे.
****
मराठा आरक्षण मोर्चासाठी मुंबईकडे निघालेल्या समर्थकांसह मनोज
जरांगे पाटील आज शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले.
आझाद मैदानावर फक्त एक दिवसासाठी आंदोलनाची परवानगी मान्य नसून ओबीसी कोट्यातून मराठा
आरक्षणाच्या मागणीच्या समर्थनार्थ बेमुदत उपोषणाचा इशारा जरांगे पाटील यांनी दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
प्रधानमंत्री जन धन योजनेला आज ११ वर्षे पूर्ण होत आहेत. जगातल्या
सर्वात मोठ्या आर्थिक समावेशक उपक्रमांपैकी एक अशा या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१४ या दिवशी केली होती.
दरम्यान, पंतप्रधान येत्या ३१ तारखेला
आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा
हा १२५वा भाग असेल.
****
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
संकल्पनेतून राज्यभरात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ ही मोहिम राबवली जात आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत
गणेश मंडळांच्या मंडपांमध्ये किंवा जवळपास उभारण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये गणेशभक्त
आणि स्थानिक नागरिक यांची मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे. शिबिरांच्या माध्यमातून
नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती तसंच, तपासणी दरम्यान आजार आढळणाऱ्या रुग्णांना पुढील उपचार मोफत उपलब्ध करून दिले जात
आहेत.
****
राज्यभरात दीड दिवसांच्या गणपतीचं आज विसर्जन झालं. घरोघरी काल
विराजमान झालेल्या गणरायाला भक्तांनी वाजतगाजत निरोप दिला. मुंबईत समुद्रकिनाऱ्यांसह
अनेक ठिकाणी व्यवस्था केलेल्या कृत्रीम तलावांवर भाविकांनी गणपती विसर्जनासाठी गर्दी
केल्याचं दिसून आलं.
****
विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या संतनगरी शेगाव इथं
संत गजानन महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. गुरुवार
दिनांक २८ ऑगस्ट १९१० रोजी गजानन महाराज समाधीस्थ झाले होते. तब्बल ११५ वर्षानंतर हा
योग जुळून आल्याने यंदाच्या या उत्सवाला भाविकांच्या दृष्टीने वेगळं महत्त्व आहे. दर्शनासाठी
येणाऱ्या भक्तांसाठी समाधी मंदीर आज रात्रभर खुले राहणार आहे.
****
ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक बाळ कर्वे यांचं आज सकाळी मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. ते ८७ वर्षांचे
होते. चिमणराव गुंड्याभाऊ मालिकेत त्यांनी वठवलेली गुंड्याभाऊंची भूमिका रसिकांच्या
स्मरणात आहे. बन्या बापू, लपंडाव, सुंदरा सातारकर, चटक चांदणी अशा चित्रपटांमधून तर रथचक्र, तांदूळ निवडता निवडता, आई रिटायर होते, कुसुम मनोहर लेले, शांतता कोर्ट चालू आहे, सूर्याची पिल्ले अशा नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. महाश्वेता, प्रपंच,
‘वहिनीसाहेब’, ‘उंच माझा झोका’ या मालिकांमधूनही त्यांनी संस्मरणीय भूमिका केल्या होत्या. सई परांजपे दिग्दर्शित
कथा या हिंदी सिनेमातही कर्वे यांनी काम केलं होतं.
****
No comments:
Post a Comment