Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 28
August 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ ऑगस्ट २०२५ दुपारी १.०० वा.
****
प्रधानमंत्री जन धन योजनेला आज ११ वर्षे पूर्ण होत आहेत.
जगातल्या सर्वात मोठ्या आर्थिक समावेशक उपक्रमांपैकी एक अशा या योजनेची घोषणा पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१४ या दिवशी केली होती. प्रधानमंत्री जन धन योजना ही
व्यापक आर्थिक समावेशकतेसाठी एक राष्ट्रीय अभियान असून, देशातल्या सर्व कुटुंबांना बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी त्यात
एकात्मिक दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण किंवा निमशहरी भागात
६७ टक्के खाती उघडण्यात आली असून, महिलांच्या मालकीची ५६ टक्के खाती आहेत. या योजनेनं दूरवरच्या
भागात राहणाऱ्या वंचितांना औपचारिक वित्तीय क्षेत्रात आणलं आहे.
ही योजना केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात सर्वात यशस्वी
आर्थिक समावेशन उपक्रमांपैकी एक असल्याचं, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी जपानला रवाना होणार
आहेत. पंधराव्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत. जपानचे पंतप्रधान
शिगेरू इशिबा यांच्यासोबत ही त्यांची पहिलीच शिखर बैठक असेल. संरक्षण, व्यापार, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि नवकल्पना यावर या बैठकीत चर्चा होईल. दौऱ्याच्या
दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी ३१ तारखेला चीनला जाणार असून, शांघाय सहकार्य परिषदेत सहभागी होतील.
****
दरम्यान, पंतप्रधान मोदी येत्या ३१ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात
या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा १२५वा भाग असेल.
****
कापसाच्या गाठींवरच्या आयात शुल्कात दिलेली सूट ३० सप्टेंबर
ते ३१ डिसेंबर पर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. वस्त्रोद्योगात कापसाची
उपलब्धता वाढवण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी सरकारने कापसाच्या
गाठींवरच्या आयात शुल्कात १९ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत सूट दिली होती.
****
छत्तीसगढमल्या नारायणपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवर
सुरक्षा बलांसोबत झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी मारले गेले. जवळपास आठ तास ही चकमक
सुरु होती. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली.
****
राज्यात उत्साहात सुरू झालेल्या गणेशोत्सवात आज दीड दिवसांच्या
गणपतींना भक्तीभावाने निरोप दिला जाणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर महानगरपालिका क्षेत्रात विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची
सोय करण्यात आली असून, नागरिकांना तिथेच विसर्जन
करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे
****
मराठवाड्यातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला.
लातूर जिल्ह्यात आज सकाळपर्यंत जोरदार पाऊस पडल्यानं पाणीसाठ्यात
वाढ झाली आहे. रेणापूर प्रकल्पात येणारी आवक लक्षात घेऊन आज सकाळी प्रकल्पाचे चार दरवाजे
उघडण्यात आले असून, एक हजार ११७ घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठावरच्या गावातल्या नागरीकांनी सावधानता
बाळगण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
मांजरा प्रकल्प क्षेत्रातही मोठा पाऊस झाल्याने धरणाचे
सहा दरवाजे उघडण्यात आले असून, पाच हजार २४१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु
आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरु
आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४७५ पूर्णांक आठ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस झाला आहे. सर्वाधिक
५७४ पूर्णांक चार मिलिमीटर पावसाची नोंद वाशी तालुक्यात झाली आहे.
जालना जिल्ह्यातही काल रात्री बहुतांश भागात पाऊस झाला.
परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस असून, नदी - नाल्यांना पूर आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा
९९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. धरणात सध्या ४९ हजार ४२६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची
आवक सुरु असून, १८ दरवाजातून ३७ हजार ७२८ घनफूट
प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडलं जात आहे.
****
नांदेड शहरासह जिल्ह्यातही मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला.
अनेक नदी नाल्यांना पाणी आलं असून, अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे. मुखेड रोड बंद झाला असून, दळणवळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. देगलूर तालुक्यात
झालेल्या जोरदार पावसामुळे निजामसागर जलाशयातून पाणी सोडण्यात येत आहे.
दरम्यान, या मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे नांदेड
- हैदराबाद रेल्वे मार्ग बंद झाला आहे. काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून, काहींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. काचिगुडा-नगरसोल
आणि काचिगुडा-पूर्णा या गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई-लिंगमपल्ली देवगिरी
एक्सप्रेस नांदेडहून काझिपेट, सिकंदराबादमार्गे वळवण्यात आली आहे. अमरावती -तिरुपती आणि नारखेड-काचिगुडा
या रेल्वेगाड्यांच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे.
****
ग्रँड बुद्धीबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय ग्रँडमास्टर
आर प्रज्ञानंदा यानं आपलं स्थान निश्चित केलं आहे. सिंकफिल्ड चषक स्पर्धेत उपविजेतेपद
मिळाल्यामुळे तो यासाठी पात्र ठरला.
****
No comments:
Post a Comment