Sunday, 31 August 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 31 August 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑगस्ट २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेली विविध प्रकारची आयात शुल्कं फेडरल न्यायालयाकडून रद्दबातल

·      शांघाय सहकार्य संघटनेच्या २५ व्या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये दाखल

·      मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची हैदराबाद गॅझेटसह काही गोष्टींना तत्त्वतः मान्यता

·      आज ज्येष्ठा कनिष्ठा गौरी आगमन- सजावटीसह विविध साहित्याने बाजारपेठा सजल्या

आणि

·      बीड जिल्ह्यात भरधाव कंटेनरच्या धडकेत सहा पादचारी भाविकांचा मृत्यू

****

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेली विविध प्रकारची आयात शुल्कं बेकायदेशीर असल्याचं सांगत फेडरल न्यायालयाने ते रद्दबातल ठरवली आहेत. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी ट्रम्प सरकारला १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिलेली असून तोपर्यंत हे शुल्क लागू असेल, असं व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई यांनी सांगितलं.

****

शांघाय सहकार्य संघटनेची २५ वी शिखर परिषद आजपासून चीनमधे तिएनजीन इथं सुरू होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत संघटनेच्या मागच्या २५ वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल तसंच पुढच्या दहा वर्षांसाठी धोरण आखलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानहून चीनमध्ये दाखल झाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी अकरा वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे.

****

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेत चांगल्या वाढीची नोंद झाली आहे.

जीडीपीत झालेली ही वाढ उल्लेखनीय असल्याचं केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. तर, सुधारणा आणि लवचिकतेच्या बळावर आपल्या अर्थव्यवस्थेनं वेग घेतल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. देशभरातल्या अर्थतज्ज्ञांनीही याबाबत समाधान व्यक्त केलं आहे. आर्थिक विश्लेषक उदय तारदाळकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले..

बाईट - उदय तारदाळकर

****

तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीला शासनानं ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. सदर समितीला २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील सर्व तरतूदी लागू राहतील, असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं असल्याचंही शिरसाट यांनी सांगितलं.

****

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मंत्रिमंडळानं हैदराबाद गॅझेटसह काही गोष्टींना तत्त्वतः मान्यता दिली आहे. मराठा आरक्षण विषयक समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी काल मुंबईत आझाद मैदानात उपोषणाला बसलेले नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली, त्यादरम्यान ही माहिती दिली. राज्यभरातून कुणबी प्रमाणपत्रासाठी ५८ लाख अर्ज प्राप्त झाले असून यापैकी दहा लाख जणांना कुणबी प्रमाणपत्र दिलं आहे. यासंदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून..

बाईट - आकाशवाणी प्रतिनिधी

मराठा आरक्षण प्रश्नावर संवैधानिक चौकटीत राहून तोडगा काढू असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तामिळनाडूमधे आरक्षणाची मर्यादा ७२ टक्के असल्याकडे लक्ष वेधत, आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज व्यक्त केली.

पवार यांच्या या मतावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. शरद पवार आज ही सूचना करत आहेत, मात्र ते दहा वर्षे सत्तेत होते, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

****

ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आरक्षणप्रकरणी नागपुरात उपोषण पुकारलं आहे. आपलं उपोषण ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी असून मराठा आरक्षणाची पूर्तता करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी लेखी हमी सरकारकडून मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असं तायवाडे यांनी म्हटलं आहे.

****

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल मुंबईत 'लालबागच्या राजा'चं सहकुटुंब दर्शन घेतलं. शहा यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी स्थापन गणेशाचं दर्शन घेतलं.

केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काल पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतींचं दर्शन घेतलं.

****

ज्येष्ठा कनिष्ठा गौरी अर्थात महालक्ष्म्यांचं आज घरोघरी आगमन होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याच्या तयारीसाठी घरोघरी महिला वर्गाची लगबग सुरू झाली आहे. गौरीचे मुखवटे, साड्या, दागदागिने, मखर, तसंच सजावटीच्या साहित्याने आणि हे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत झालेल्या गर्दीने शहरातले रस्ते फुलून गेले आहेत.

****

बीड जिल्ह्यात भरधाव कंटेनरच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पेंडगाव फाटा इथं काल सकाळी ही घटना घडली. हे सर्वजण पेंडगावला दर्शनासाठी जात होते. या घटनेबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत.

****

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरात त्या बोलत होत्या.

****

छत्रपती संभाजीनगर इथं होली क्रॉस इंग्लिश हायस्कूलला संस्कृत अनुरागी शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. संस्कृत प्रतिष्ठान संस्थेतर्फे दिला जाणारा डॉ. चंपालाल देसरडा संस्कृत अनुरागी शाळा पुरस्कार या शाळेच्या शाळेच्या मुख्याध्यापक सिस्टर सिंथिया फर्नांडिस, शाळेचे संस्कृत शिक्षक गिरीश जोशी आणि अनिरुद्ध महाजन यांना प्रदान करण्यात आला.

****

हिंगोली जिल्हात आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांच्या निवडीसाठी काल ९६ पूर्णांक ९२ टक्के एवढं मतदान झालं. आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे.

****

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानाचे तातडीने पंचनामे पूर्ण करुन सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे तसंच आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.

दरम्यान, मांजरा धरणाचे सर्व दरवाजे काल दुपारनंतर बंद करण्यात आले. धारूर तालुक्यात वाण नदीच्या पुरात वाहून गेलेले अनिल लोखंडे यांचा मृतदेह काल सकाळी सापडला. २७ तारखेला अनिल लोखंडे पुराच्या पाण्यात वाहून गेले होते.

****

लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सुमारे एक लाख ४७ हजार ५९३ हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील साडे पाचशे गावं बाधित झाली असून ४०६ घरांची पडझड झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून शासनाच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने बहुतांश धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे.

****

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे तसंच माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी ग्रामीण भागातील अनेक गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान, जिल्ह्यातील माळाकोळी इथल्या फुलमळा तलावाला काल भगदाड पडलं. त्यामुळे तलावाखालील शेतजमिनीचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात पीक विम्याच्या अनुषंगाने मूग तसंच उडीद पिकांचे पीक कापणी प्रयोग सुरू करण्यात आले आहेत. या माध्यमातून विमा नुकसान भरपाई निश्चित केली जाते, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी त्याकडे सतर्कतेने लक्ष देण्याचं आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान, सीना कोळेगाव प्रकल्पाच्या १० दरवाजांमधून १५ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात २२ हजार २८४ दशलक्ष घनमीटर प्रतिसेकंद या वेगाने पाण्याची आवक सुरु असून गोदापात्रात नऊ हजार ४०० दशलक्ष घनफूट प्रति सेकंद या वेगाने विसर्ग सुरु आहे.

****

हवामान

पश्चिम महाराष्ट्र, खानदेश तसंच मराठवाड्याचा काही भाग वगळता राज्यात आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच परभणी जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

****

No comments: