Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 28 August 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ ऑगस्ट २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी
जपानला रवाना होणार आहेत. पंधराव्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत ते सहभागी होणार
आहेत. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यासोबत ही त्यांची पहिलीच शिखर बैठक असेल.
संरक्षण, व्यापार, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि नवकल्पना यावर या
बैठकीत चर्चा होईल. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी ३१ तारखेला चीनला जाणार
असून, शांघाय सहकार्य परिषदेत सहभागी होणार
आहेत.
****
प्रधानमंत्री जन धन योजनेला आज ११
वर्षे पूर्ण होत आहेत. जगातल्या सर्वात मोठ्या आर्थिक समावेशक उपक्रमांपैकी एक अशा
या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१४ या दिवशी केली होती.
प्रधानमंत्री जन धन योजना ही व्यापक आर्थिक समावेशकतेसाठी एक राष्ट्रीय अभियान असून, देशातल्या सर्व कुटुंबांना बँकिंग
सेवा प्रदान करण्यासाठी त्यात एकात्मिक दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत
५६ कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली असून, बँकिंग सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या आहेत.
****
जम्मू-काश्मीरमध्ये वैष्णोदेवी मंदिर
मार्गावर कटरा परिसरात भूस्खलनात मरण पावलेल्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये तर जखमींना
प्रत्येकी ५० हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर झाली आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी
काल कटरा रुग्णालयात जखमींशी संवाद साधल्यानंतर ही घोषणा केली. या दुर्घटनेत जवळपास
३० जणांचा मृत्यू झाला असून, मदत आणि बचावकार्य काल
सायंकाळपर्यंत सुरू होतं.
****
भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर
अतिरिक्त शुल्क लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयानंतर भारतानं ४० इतर देशांमध्ये भारतीय
वस्तूंचा प्रचार-प्रसार करायचा निर्णय घेतला आहे. ब्रिटन, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया, कॅनडा, तुर्किये, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांचा यात
समावेश आहे. या देशांमध्ये व्यापार मेळावे, खरेदीदार-विक्रेते यांच्या बैठका, विभिन्न उद्योगांवर लक्ष केंद्रित
करणाऱ्या मोहिमा राबवल्या जाणार आहेत.
****
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं
देशभरातल्या शाळांना पाच ते १५ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी आधार अनिवार्य बायोमेट्रिक
माहिती वेळेत ताजी करण्यास सांगितलं आहे.
प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी यासंदर्भात सर्व राज्यं आणि
केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या माहिती संकलनासाठी शिबिरं आयोजित
करण्याची विनंती केली. प्राधिकरण आणि शालेय शिक्षण विभागाच्या या संयुक्त उपक्रमाद्वारे
देशभरातल्या १७ कोटी बालकांची बायोमेट्रिक्स माहिती ताजी करणं सोपं होईल अशी अपेक्षा
आहे.
****
राज्यात उत्साहात सुरू झालेल्या गणेशोत्सवात
आज दीड दिवसांच्या गणपतींना भक्तीभावाने निरोप दिला जाणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर महानगरपालिका क्षेत्रात विसर्जनासाठी कृत्रिम
तलावांची सोय करण्यात आली असून, नागरिकांना तिथेच विसर्जन
करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
चंद्रपूर जिल्ह्यातल्या ३८४ गावांनी
‘एक गाव एक गणपती’ उपक्रमाला प्रतिसाद देत समाजात एकोप्याचा संदेश दिला आहे. हा उपक्रम
तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून राबवण्यात येत असून, सामाजिक सलोखा प्रस्थापित करणं आणि पर्यावरणपूरक उत्सव
साजरा करणं हा यामागचा उद्देश आहे.
जळगाव जिल्ह्यात १६० गावांमध्ये 'एक गाव, एक गणपती' हा उपक्रम राबवला जात आहे. गेल्या
अनेक वर्षांपासून ही परंपरा जोपासणाऱ्या गावांनी यंदाही हा उपक्रम कायम राखला आहे.
यावर्ष डीजेमुक्त उत्सव साजरा करण्याचं
आवाहन पोलिसांनी केलं आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या विरारमध्ये चार
मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यु झाला. महानगरपालिका आणि एनडीआरएफ
ची दोन पथकं ढिगाऱ्याखालून नागरिकांना शोधण्याच्या कामात गुंतली होती. या इमारतीचा
मागील भाग खाली असलेल्या चाळीवर कोसळून ही दुर्घटना घडली. ती चाळ पूणपणे उध्वस्त झाली
आहे. या इमारतीमधील ५० पैकी अंदाजे १२ सदनिका कोसळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर विद्यापीठाचे पहिले अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कार काल जाहीर झाले. यंदाच्या या
पहिल्याच पुरस्कारासाठी डॉ. आनंद चव्हाण, संतोष खेंडे, श्रीकांत शेटे, अजित संगवे, शरणबसवेश्वर वांगी यांची निवड केल्याचं कुलगुरू डॉ. प्रकाश
महानवर यांनी सांगितलं. उद्या विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात हे पुरस्कार समारंभपूर्वक
प्रदान केले जाणार आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. धरणात सध्या ४९ हजार ४२६
घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, १८ दरवाजातून ३७ हजार ७२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी
गोदावरी नदीपात्रात सोडलं जात आहे.
****
कझाकस्तान इथं सुरू असलेल्या आशियाई
अजिंक्यपद स्पर्धेत, महिलांमधे ५० मीटर थ्री
पोझिशन सांघिक प्रकारात सिफ्त कौर शर्मा, आशी चौक्सी, आणि अंजुम मौदगिल यांनी सुवर्णपदक पटकावलं.
****
No comments:
Post a Comment