Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 August 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०
****
· गुजरातमध्ये इलेक्ट्रिक वाहन बॅटरी निर्मिती प्रकल्प-‘ई वितारा’चं पंतप्रधानांच्या
हस्ते उद्घाटन;
मेक इन इंडियाच्या प्रवासात एक नवा अध्याय जोडल्याचं पंतप्रधानांचं
प्रतिपादन
· कामगारविषयक कायद्यांमधे सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता तयार करण्याच्या
प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
· नांदेड ते मुंबई वंदे भारत रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
हिरवा झेंडा
· मनोज जरांगे पाटील यांना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईत निदर्शनं करण्यास न्यायालयाकडून
मनाई
आणि
· उद्या गणेश चतुर्थी-गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या
****
भारताच्या मेक इन इंडियाच्या प्रवासात आज एक नवा अध्याय जोडला
जात असून मेक फॉर वर्ल्डच्या दिशेनं ही मोठी झेप आहे, असं
प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधल्या हंसलपूर इथं मेड इन
इंडिया बॅटरी इलेक्ट्रिक वाहनं - ‘ई वितारा’चं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. ही वाहनं युरोप आणि जपानसारख्या प्रमुख बाजारपेठांसह शंभराहून
अधिक देशांमध्ये निर्यात होणार आहेत. येत्या काळात सर्व क्षेत्रात देशाला प्रगती करायची
आहे. आजच्या प्रयत्नामुळे २०४७ चं विकसित भारताचं ध्येय नवी उंची गाठेल, या ध्येय साध्ययेत जपान हा भारताचा विश्वासार्ह मित्र असेल आणि भारत-जपान संबंधांना
यामुळे नवा पैलू मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त
केला,
ते म्हणाले.
बाईट - पंतप्रधान
नरेंद्र मोदी
गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी
सुझुकी मोटार प्रकल्पालाही भेट दिली. पंतप्रधानांच्या उपस्थितीत हंसलपूर इथं हायब्रिड
बॅटरी इलेक्ट्रोड्सच्या स्थानिक उत्पादनाचाही प्रारंभ झाला. तोशिबा, सुझुकी आणि डेन्सो यांचा हा संयुक्त उपक्रम आहे.
****
राज्यातल्या कामगारविषयक कायद्यांमधे सुधारणा करुन महाराष्ट्र
कामगार संहिता नियम तयार करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीत, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती संवर्गातल्या लाभार्थ्यांना ओळखपत्रं, प्रमाणपत्रं तसंच विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची कार्यपद्धती प्रभावीरित्या
राबवण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. नागपूर - गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्गालाही
राज्य सरकारनं आज मान्यता दिली. या महामार्गासाठी वेगळं महामंडळ स्थापन केलं जाणार
आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमांमध्ये सुधारणा, बीड जिल्ह्यातल्या आष्टीमध्ये न्यायालय स्थापन करण्यासाठी खर्चाला मान्यता, बीड जिल्ह्यातल्या तीन बंधाऱ्यांचा विस्तार यासारखे निर्णयही आजच्या बैठकीत झाले.
****
नांदेड ते मुंबई वंदे भारत रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी आज दूरस्थ पद्धतीने हिरवा झेंडा दाखवला. वंदे भारत एक्स्प्रेसमुळे नांदेड शहर
हे राजधानी मुंबईच्या अधिक जवळ आलं असून यामुळे मराठवाड्याच्या समृद्धीचं दार उघडल्याचं
मुख्यमंत्री म्हणाले.
या गाडीचा मराठवाड्यातल्या प्रमुख जिल्ह्यांना लाभ होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. खासदार अजित गोपछडे
यांनी यावेळी बोलतांना नांदेड ते मुंबई विशेष रेल्वे सुरू करण्यासाठीही प्रयत्न करू
असं सांगितलं.
या गाडीचे डबे आठ वरून २० पर्यंत वाढवण्यात आले आहेत, यामुळे या रेल्वेची प्रवासी वाहतुक क्षमता ५०० वरून एक हजार ४४० पर्यंत वाढली आहे.
मुंबई ते नांदेड हे ६१० किलोमीटरचं अंतर ही रेल्वे साडे नऊ तासात कापणार आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं एक हजार १५० खाटांचं सुसज्ज
शासकीय रुग्णालय उभारण्यात यावं, तसंच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण
वैद्यकीय महाविद्यालयाचं काम दर्जेदार करावं अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
दिल्या आहेत. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाबाबत पवार
यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक झाली, त्यावेळी
ते बोलत होते. महाविद्यालयाच्या आधीच सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांचा समावेश
करून नवीन योजना तयार करावी, नवीन रुग्णालयात आधुनिक सुविधा, सुपर स्पेशालिटी सेवा यांचा समावेश असावा, अशा
सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.
****
मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना पूर्वपरवानगीशिवाय
मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शनं करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. उच्च
न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मार्ने यांच्या पीठाने
दिलेल्या आदेशानुसार, अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शहरातील प्रमुख
ठिकाणी कोणत्याही आंदोलनास परवानगी दिली जाणार नाही. मात्र, जरांगे यांना निदर्शनासाठी खारघर किंवा नवी मुंबईत जागा उपलब्ध करून देण्याचा पर्याय
महाराष्ट्र सरकारसाठी खुला असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
****
भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीला उद्या राज्यभरात
गणरायाचं आगमन होत आहे. सर्वत्र गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. यंदा गणेशोत्सवाला
राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानं या उत्सवाची सांस्कृतिक ओळख आता आणखी दृढ होणार
आहे. आकर्षक गणेश मूर्ती, सजावट आणि विविधरंगी विद्युत
रोषणाईचं साहित्य, पूजा साहित्य, फुलं, आणि विविध प्रकारच्या आकर्षक मखरांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. गणरायाच्या
आगमनापासून ते विसर्जनापर्यंत उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी ठिकठिकाणचं स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
शेतकरी बांधवांवर ओढवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातल्या
परळी वैजनाथ इथं आमदार धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचा गणेशोत्सव
यंदा साध्या पद्धतीने साजरा होणार आहे.
परभणी इथल्या श्री शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक
गणेश मूर्ती तयार केल्या. मातीपासून बनविलेल्या गणेश मूर्तीमध्ये झाडांच्या बिया टाकल्यामुळे, घरातील कुंडीतही या मूर्तीचे विसर्जन करता येईल आणि त्यापासून झाडं मिळतील, पर्यावरण वाचवा पृथ्वी वाचवा या घोषवाक्याला साजेशा या मूर्ती असल्याचं प्राचार्य
डॉ.बाळासहेब जाधव यांनी सांगितलं.
****
यंदाचा बी. रघुनाथ पुरस्कार लेखक प्रसाद कुमठेकर यांच्या ‘इतर गोष्टी’या कथासंग्रहाला जाहीर झाला
आहे. ज्येष्ठ साहित्यिक बी.रघुनाथ यांच्या स्मृतीदिनी येत्या ७ सप्टेंबरला छत्रपती
संभाजीनगर इथं कुमठेकर यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात क्रीडा दिनाचं आयोजन करण्यात येणार
आहे. तीन दिवस चालणाऱ्या या आयोजनात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी
दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
बाईट - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
क्रीडा भारती तसंच ऑलिंम्पिक संघटनेच्या वतीने येत्या शुक्रवारी
छत्रपती संभाजीनगर इथं ५५० राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात
येणार आहे. तापडिया नाट्य मंदिरात हा सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती ऑलिंम्पिक
संघटनेचे छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी दिली आहे.
****
कृष्णा पूर नियंत्रण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मराठवाड्याच्या
हक्काचे १६ पूर्णांक ६६ दशलक्ष घनमीटरपेक्षा अधिक पाणी मिळेल असा विश्वास आमदार पाटील
राणाजगजित सिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते आज धाराशिव इथं बोलत होते. जागतिक
बँकेच्या सहकार्याने राज्य सरकार या प्रकल्पावर काम करत असून त्यासंदर्भातला सर्वेक्षण
अहवाल प्राप्त झाल्याचं त्यांनी सांगितलं.
****
शेतकरी हितास्तव पर्यावरण विभागाने कृत्रिम फुलांच्या वापरावर
बंदी घालण्याची मागणी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कृत्रिम फुलांच्या वापरामुळे फुल शेती धोक्यात येत
आहे,
विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक
कार्यक्रमांमध्ये कृत्रिम फुलांचा वापर मोठा
प्रमाणावर होत असल्याने त्याचा पर्यावरणावर आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर
मोठा परिणाम होत असल्याचं भरणे यांनी पत्रात नमूद केलं आहे.
****
जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या सभागृहात महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी
श्रीमती मित्तल यांनी उपविभागीय अधिकारी यांनी दरमहा किमान दोन तर तहसीलदारांनी दरमहा
चार क्षेत्रभेटी घेण्याच्या सूचना दिल्या.
****
हवामान
मराठवाड्यात हिंगोली तसंच नांदेड जिल्ह्यात आज आणि उद्या तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत परवा, यलो अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवार तसंच शुक्रवारीही मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाचा जलसाठा आता ९८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
धरणात २७ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने
पाण्याची आवक होत असून, १८
हजार ८८४ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग करण्यात येत आहे.
****
No comments:
Post a Comment