Friday, 29 August 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 29 August 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ ऑगस्ट २०२ सकाळी.०० वाजता

****

मराठवाड्यातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असून, पुरस्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, धरणांमधुनही विसर्ग सुरु आहे.

नांदेडमध्ये विष्णुपुरी प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत. आज पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे नांदेड शहर जलमय झालं असून, बहुतांश भागाला पुराचा फटका बसला आहे. अनेक घरात पुराचं पाणी शिरलं आहे.

दरम्यान, गोदावरी पात्रातील पाण्याचा विसर्ग व्हावा यासाठी तेलंगणातल्या पोचमपाड धरणाचे दरवाजे उघडण्याबाबत तेलंगणा मधल्या यंत्रणेशी संपर्कात आहेत. त्याचवेळी मांजरा नदीचा पूर कमी करण्यासाठी निजामसागर धरणातून होणारा विसर्ग कमी करावा यासाठीही प्रयत्न केले जात असल्याचं नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितलं.

**

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत, औंढा, कळमनुरी तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या सर्व शाळांना आज सुटी जाहिर करण्यात आल्याची माहिती, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी दिली. कळमनुरी तालुक्यातल्या जवळा पांचाळ परिसरात ढगफुटी सदस्य पाऊस झाला असून, अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरलं आहे.

**

धाराशिव शहर आणि परिसरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. तुळजापूर तालुक्यातल्या सावरगाव परिसरात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला. कोणताही शेतकरी पंचनामे पासून वंचित राहणार नाही याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल झाले असून, त्यांच्या उपोषणाला सुरुवात झाली आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात आंदोलक दाखल झाले आहेत. आझाद मैदानाच्या बाहेर तसंच पालिका मुख्यालयाचा परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी झाली आहे. यासह अनेक मार्ग गर्दीमुळे बंद झाले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राष्ट्रीय क्रीडा दिन आज साजरा होत आहे. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. ध्यानचंद यांनी १९२५ ते १९४९ या काळात भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि १९२८, १९३२ आणि १९३६ मध्ये भारताला तीन ऑलिंपिक सुवर्णपदकं मिळवून दिली.

शांतीपूर्ण आणि सर्वसमावेशक समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी खेळ, ही यंदाची या दिवसाची संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशातल्या क्रीडा क्षेत्रात क्रांतिकारी बदल होत आहेत, ज्यामध्ये तरुण प्रतिभेला प्रोत्साहन देण्यापासून ते जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यापर्यंतचे कार्यक्रम राबवले जात असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागातर्फे आज पुण्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रीडा स्‍पर्धेतल्या पदक विजेत्‍यांना गौरवण्यात येणार आहे.

क्रीडा दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या ॲथलीट्सचा सत्कार केला जाणार आहे. आज दुपारनंतर राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण-साईच्या परिसरात हा कार्यक्रम होणार आहे.

****

१५ व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी जपानला पोहोचले. जपानमधल्या भारतीय समुदायाकडून पंतप्रधानांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं.

****

वर्धा जिल्ह्यातल्या पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पत्रादेवी दरम्यानच्या शक्तीपीठ महामार्गाच्या पवनार ते सांगली या आखणीला; आणि त्यासाठीच्या भूसंपादनाला राज्य सरकारनं प्रशासकीय मान्यता दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं काल यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला. यात मूळ मंजूर आखणीपैकी कोल्हापूर जिल्ह्यातल्या आखणीची यापूर्वी काढलेली अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या आखणीचे सर्व उपलब्ध आणि संभाव्य पर्याय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला देण्यात आले आहेत. या पर्यायांबाबत कोल्हापुरातले मंत्री आणि लोकप्रतिनिधीशी चर्चा करुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत.

****

जालना जिल्ह्यात राजुर-टेंभुर्णी रोडवरील गाडेगव्हाण फाटा इथं आज पहाटे एक भरधाव कार रस्त्यालगतच्या विहिरीत पडल्याची घटना घडली. पोलीस प्रशासनाचे स्थानिकांकडून मदत कार्य सुरू असून, आतापर्यंत एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. कारमध्ये नेमके किती जण होते, याची माहिती अद्याप समोर आली नसून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघात ग्रस्त कारच्या धडकेत रस्त्यावर पायी जाणारे देळेगवान इथले नागरीक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जालना इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

****

No comments: