Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 28 August 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ ऑगस्ट
२०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
पीएम स्वनिधी योजनेचं पुनर्गठन करून योजनेला २०३० पर्यंत मुदतवाढ देण्यास केंद्रीय
मंत्रिमंडळाची मंजुरी
·
जागतिक बाजारपेठेत अव्वल राहण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध-मुख्यमंत्र्यांची ग्वाही
·
मराठा आरक्षणाबाबत सरकारसोबत चर्चेला मनोज जरांगे पाटील यांची सशर्त संमती
·
गणेशोत्सवाला सर्वत्र उत्साहात प्रारंभ
आणि
·
लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस- छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यासाठी
आज यलो अलर्ट जारी
****
पीएम
स्वनिधी अर्थात पंतप्रधान पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजनेचं पुनर्गठन करून या योजनेला
३१ मार्च २०३० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. काल नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय
मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ५० लाख नवीन लाभार्थ्यांसह एक कोटी
१५ लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचं उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं
आहे. पुनर्गठीत योजनेअंतर्गत कर्जाचा पहिला हप्ता दहा हजार रुपयावरून १५ हजार रुपये, तर दुसरा हप्ता २० हजार
रुपयांवरून २५ हजार रुपये करण्यात आला आहे. तिसरा ५० हजार रुपयांचा हप्ता कायम ठेवण्यात
आला आहे. या योजनेसाठी ७ हजार ३३२ कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. योजनेची
व्याप्ती टप्प्याटप्प्याने वाढवली जाणार असून, या लाभार्थ्यांमध्ये डिजिटल व्यवहारांना
चालना देण्यासाठी एक हजार सहाशे रुपये कॅशबॅक रोख परतावा प्रोत्साहन देण्यालाही मंत्रिमंडळाने
काल मान्यता दिली.
****
छत्तीसगड
राज्याचा सीमावर्ती भाग असलेल्या भामरागड तालुक्यातल्या कोपर्शी गावानजीकच्या जंगलात
काल पोलिसांशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. मृतांमध्ये एक पुरुष आणि तीन
महिलांचा समावेश आहे.
दरम्यान, छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात
काल ३० नक्षलवाद्यांनी पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण
केलं. त्यांच्यापैकी २० जणांवर एकंदर ८१ लाख रुपयांचं बक्षीस होतं.
****
जागतिक
बाजारपेठेतल्या स्पर्धेत अव्वल राहण्यासाठी तसंच वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापार वाढवण्याकरता
ज्या ज्या सुधारणा आवश्यक आहेत, त्या करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी ही बाब नमूद
केली.
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
मराठा
आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी
सशर्त परवानगी दिली आहे. जरांगे यांना फक्त एका दिवसासाठी आणि जास्तीत जास्त पाच हजार
आंदोलकांसह आझाद मैदानावर सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा दरम्यान आंदोलन करता येईल, असं मुंबई पोलिसांनी कळवलं
आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या
शिष्टमंडळासोबत चर्चा करण्याची तयारी जरांगे यांनी दाखवली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे
पाटील यांनी आपल्याला दूरध्वनीवरून चर्चेसाठी आमंत्रण दिल्याचं सांगत, ही चर्चा सर्वांसमोर करण्याची
अट त्यांनी ठेवली. हे आंदोलन शांततेत होईल, असंही त्यांनी आश्वस्त केलं.
जरांगे
पाटील यांच्या नेतृत्वात काल हा मोर्चा जालना जिल्ह्यातल्या आंतरवली सराटी इथून मुंबईकडे
रवाना झाला. मराठवाड्यातले नागरिक या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत.
****
राष्ट्रीय
नेत्रदान पंधरवाडा येत्या आठ सप्टेंबरपर्यंत पाळला जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा
परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी ही माहिती दिली. या पंधरवड्यात
आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्वयंसेवी संस्था आणि शासकीय
यंत्रणांच्या माध्यमातून जनजागृतीपर माहिती अभियान चालवलं जात आहे.
****
गणेशोत्सवाला
काल सर्वत्र मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. घरोघरी सकाळच्या सुमारास गणेशाची विधीवत
प्रतिष्ठापना झाली, दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांनी ढोल ताशाच्या निनादात मिरवणुका
काढून गणरायांची मंडपात स्थापना केली.
राज्यपाल
सी.पी. राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवनात गणरायाची प्रतिष्ठापना करून देशवासियांना
गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आपल्या शासकीय निवासस्थानी गणेशाची स्थापना केली. राज्यावरच्या
संकटांचं निवारण करण्याची प्रार्थना आपण गणरायाकडे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
ते म्हणाले...
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती
संभाजीनगरचं ग्रामदैवत श्री संस्थान गणपती मंदिरात गणरायाची स्थापना करून गणेशोत्सवाला
प्रारंभ झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, दुग्धविकास मंत्री अतुल
सावे, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्यासह
अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नांदेड
जिल्ह्यात देगलूर इथं पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली. पेठ अमरापूर
गल्लीत कोरलेपवार कुटुंबीयांनी हाताने तयार केलेल्या मातीच्या मूर्ती घरोघरी विराजमान
होत आहेत. गेल्या शंभराहून अधिक वर्षापासून जोपासल्या जात असलेल्या या परंपरेबाबत अधिक
माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर...
बाईट – अनुरोग पोवळे,
नांदेड
बीड
जिल्ह्यात यंदा एक हजार ७६२ सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणेश स्थापना झाली आहे. गेल्या
वर्षी २८८ गावांत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यात आली होती, यंदा या संख्येत आणखी वाढ
होण्याची शक्यता आहे.
लातूर
शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी गणरायाचं मोठ्या जल्लोषात आणि ढोलताशांच्या गजरात स्वागत
करण्यात आलं. गणेश मूर्ती घेण्यासाठी लहान मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. यंदा चांगला
पाऊस झाल्याने नागरिकांमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.
धाराशिव
जिल्ह्यात उमरगा इथल्या शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयात पुस्तक वाचणाऱ्या
गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या
हस्ते काल या गणेशाची आरती करण्यात आली. वाचनालयाचे संस्थापक शीतल चव्हाण यांनी या
संकल्पनेबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले…
बाईट – शीतल चव्हाण
हिंगोली
शहरासह जिल्ह्यात भर पावसात गणेशाचं उत्साहात स्वागत झालं. काल सकाळपासूनच सर्वसामान्य
नागरिकांसह सार्वजनिक मंडळांची गणपती मूर्ती नेण्यासाठी लगबग सुरू होती. नवसाला पावणारा
गणपती अशी ओळख असलेल्या चिंतामणी गणपतीची शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
****
जालना
जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यात राणी उंचेगाव इथल्या ग्रामीण गृहनिर्माण विभागाच्या
कंत्राटी अभियंत्याला ३० हजार रुपये लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ
अटक केली. विलास कनोजे असं या अभियंत्याचं नाव असून, प्रधानमंत्री आवास योजनेच्या चाळीस
लाभार्थ्यांना योजनेचा दुसरा हप्ता देण्यासाठी त्याने ४० हजार रुपये लाच मागितली होती.
****
हॉकीपटू
मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त
कालपासून छत्रपती संभाजीनगर इथल्या एमजीएम विद्यापीठात आंतरशालेय तसंच आंतर महाविद्यालयीन
दोन दिवसीय स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये जलतरण, बुद्धिबळ, तसंच नेमबाजी स्पर्धेचा
समावेश आहे.
****
लातूर
शहरासह जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यात
पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मांजरा प्रकल्प क्षेत्रातही मोठा पाऊस झाल्याने
धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून, पाच हजार २४१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं
पाण्याचा विसर्ग सुरु आहे. रेणापूर मध्यम प्रकल्प ८७ टक्के भरला असून, पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या
मुसळधार पावसामुळे धरण कोणत्याही क्षणी पूर्ण भरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या
जायकवाडी धरणाचा जलसाठा सुमारे ९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणात ३७ हजार ७२७ दशलक्ष
घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक असून, धरणाचे १८ दरवाजे दोन फुटाने उघडून
३७ हजार ७२८ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग करण्यात येत आहे.
****
हवामान
मराठवाड्यात
बहुतांश जिल्ह्यांसाठी आजपासून दोन दिवस हवामान विभागानं पावसाचा यलो अलर्ट जारी केला
आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी आज
यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment