Friday, 31 January 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.01.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 January 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ जानेवारी २०२० सायंकाळी ६.००
****
आगामी आर्थिक वर्षात विकासाचा दर साडे सहा टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालात वर्तवण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या दोन्ही सदनांसमोर सादर केला, या अहवालात आगामी आर्थिक वर्षात विकासाचा दर सध्याच्या पाच टक्क्यांच्या तुलनेत सहा ते साडे सहा टक्के राहील. खातेधारकांचा विश्वास संपादित करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या प्रशासकीय कामकाजात सुधारणा तसंच करभरणा, मालमत्ता नोंदणी, नवीन व्यवसाय उभारणी आदी व्यवहार अधिकाधिक सुलभ करण्याची आवश्यकता या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून मांडण्यात आली आहे.
****
काँग्रेस पक्षानं राष्ट्रपतींच्या आजच्या अभिभाषणावर टीका केली आहे. या अभिभाषणात महागाई, बेरोजगारी आणि सर्वसामान्यांच्या समस्यांचा उल्लेख केला नाही, असं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे. भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी मात्र, राष्ट्रपतींनी आपल्या भाषणातून राजकीय आणि वैचारिक चौकटीपलिकडे जाऊन देश बळकट करण्यासाठी आवाहन केलं, या शब्दात या अभिभाषणाबद्दल समाधान व्यक्त केलं.
****
कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सध्या राज्यात नऊ जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. यापैकी नांदेडला १, मुंबईला ३, तर पुण्यामध्ये पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आतापर्यंत मुंबई विमानतळावर ४ हजार ८४६ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे बाधित झालेला एकही रुग्ण राज्यात आढळून आलेला नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे
****
समान काम - समान वेतन, कामाची निर्धारित वेळ, निवृत्तीवेतन आदी मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीनं दोन दिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. याअंतर्गत राष्ट्रीयकृत बँक, ओल्ड जनरेशनच्या खासगी बँक आणि विभागीय ग्रामीण बँकेच्या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी आज ठिकठिकाणी निदर्शनं केली. औरंगाबाद शहरातल्या अदालत रस्त्यावरील महाराष्ट्र बँकेसमोर निदर्शनं करण्यात आली. संघटनांनी पुकारलेल्या या दोन दिवसीय या संपात जिल्ह्यातले तीन हजाराहून अधिक अधिकारी कर्मचारी सहभागी झाले असल्याचं बँक संघटनेचे सचिव देविदास तुळजापूरकर यांनी सांगितलं.
लातूर इथंही अधिकारी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शाखेसमोर धरणे आंदोलन केलं. या आंदोलनाला कॉंग्रेस तसंच शेकापच्या नेत्यांनी पाठिंबा दिला. हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी अधिकारी या संपात सहभागी झाले आहेत.
****
मराठवाडा वाटरग्रीड योजना तांत्रिक कारण देत, रद्द केल्यास, संपूर्ण मराठवाड्यात तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला आहे. ते आज जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते. पाणीप्रश्नावर राजकारण न करता आता तरी मराठवाड्यावर अन्याय करू नये, असं लोणीकर म्हणाले. मराठवाड्यातल्या सर्व नेत्यांनी राजकीय भूमिका बाजूला ठेवून या योजनेच्या कामासाठी एकत्र यावे, असं आवाहन लोणीकर यांनी यावेळी केलं. योजना रद्द केल्यास न्यायालयीन लढा उभारण्याची आपली तयारी असल्याचं लोणीकर यांनी सांगितलं आहे.
****
मराठवाड्यातल्या विविध विषयांवर विचारमंथन करून उपाय योजना करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची परवा रविवारी दोन फेब्रुवारीला औरंगाबाद इथं बैठक बोलावली असल्याची माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. इतर विभागांच्या तुलनेत मराठवाड्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले.
****
न्यूझीलँडसोबत सुरू असलेल्या टी ट्वेंटी मालिकेतला चौथ्या सामन्यात भारतानं सुपर ओव्हर जिंकून विजय मिळवला. भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत आठ बाद एकशे पासष्ट धावा केल्या. न्यूझीलँड संघानेही निर्धारित षटकात सात बाद एकशे पासष्ट धावा केल्यानं, सुपर ओव्हर खेळवण्यात आली. न्यूझीलँड संघानं या ओव्हरमध्ये एक बाद तेरा धावा केल्या, भारतीय संघानं एक बाद चौदा धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केलं. सामन्याच्या अखेरच्या षटकांत प्रभावी गोलंदाजी करून यजमान संघाचे चार गडी तंबूत पाठवणारा शार्दुल ठाकूर सामनावीर ठरला. मालिकेतला तिसरा सामनाही भारतानं सुपर ओव्हरमध्ये जिंकला होता. आजच्या विजयानंतर भारतानं चार शून्य अशी विजयी आघाडी घेतली असून मालिकेतला पाचवा सामना परवा रविवारी दोन फेब्रुवारीला होणार आहे.
****

आकाशवाणी औरंगाबाद दि.31.01.2020 संध्याकाळी 06.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE - 31.01.2020 TIME - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 January 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक –  ३१ जानेवारी २०२० दुपारी १.०० वाजता
****
केंद्र सरकारला मिळालेला जनादेश नवभारताच्या निर्माणासाठी असल्याचं, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे, ते आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ करताना, दोन्ही सदनांच्या संयुक्त सभेला संबोधित करत होते. इज ऑफ डुईंग बिजनेसमुळे जगभरात भारताच्या मानांकनात ७९ अंकांची सुधारणा झाल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं. नागरिकत्व सुधारणा कायदा, आणि जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यासह केंद्र सरकारच्या अनेक निर्णयांचा राष्ट्रपतींनी आढावा घेतला. राष्ट्रपतींनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचा उल्लेख करताच, विरोधी पक्षांच्या खासदारांनी याविरोधात घोषणाबाजी केली.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर संसदेच्या दोन्ही सदनांच्या कामकाजाला आजपासून प्रारंभ झाला. लोकसभेत नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सदनासमोर सादर केला. त्यानंतर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनाची कारवाई उद्या सकाळपर्यंत स्थगित केली.
****
या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून आगामी दशकाची भक्कम पायाभरणी होईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते. समाजातल्या दुर्बल घटकांच्या सशक्तीकरणावर केंद्र सरकार भर देत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. अधिवेशन काळात संसदेच्या दोन्ही सदनात विविध मुद्यांवर सकारात्मक चर्चेची अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
****
महाराष्ट्र सरकार लवकरच ३५४ सरकारी शाळांमधे एसपीसी अर्थात छात्र पोलीस उपक्रम सुरु करणार आहे. या कार्यक्रमातंर्गत सरकारी शाळांमधल्या इयत्ता आठवी आणि नववीच्या निवडक विद्यार्थ्यांना कम्युनिटी पोलिसिंग, रस्ते सुरक्षा, महिला आणि बालकांची सुरक्षा, भ्रष्टाचार प्रतिबंधक उपाययोजना, तसंच आपत्ती व्यवस्थापन इत्यादी बाबींचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
****
औरंगाबाद जालना मार्गावर आज पहाटे झालेल्या अपघातात चार जण ठार तर नऊ जण जखमी झाले. नाशिक जिल्ह्यातून देवदर्शनाला गेलेल भाविक जालन्याकडे परतत असताना, त्यांची जीप, औरंगाबाद हून जालन्याकडे जाताना करमाड इथं रस्त्यावर उभ्या ट्रकवर मागून धडकल्यानं हा अपघात झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद इथल्या संत एकनाथ रंग मंदिराच्या दुरुस्तीसाठी सात कोटी त्रेसष्ट लाख रुपये निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीचं पत्र आमदार अंबादास दानवे यांनी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना सादर केलं आहे. गेल्या सुमारे दीड वर्षांपेक्षा अधिक काळापासून हे नाट्यगृह दुरुस्तीकामासाठी बंद आहे. एकूण दुरुस्तीसाठी नऊ कोटी त्रेसष्ट लाख रुपये निधी आवश्यक असताना, यापूर्वी दोन कोटी रुपये निधी प्राप्त झाला, त्यातून काही काम झालं आहे, काम पूर्ण करण्यासाठी उर्वरित निधी देण्यात यावा, असं आमदार दानवे यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
चीनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या, रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या तीनही मुली सुखरुप असून त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली नसल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं. या तिघींपैकी एका मुलीशी थेट संपर्क साधला असता ही माहिती मिळाल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे चीनमधल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधून या तिघींना लवकरात लवकर भारतात आणण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचं जिल्ह्याधिकारी म्हणाले.
दरम्यान, हा विषाणू चीनमधून जगभरात पसरण्याची शक्यता लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेनं आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. यात चीनवर अविश्वास व्यक्त करण्याचा विचार नसून परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुरेसे सक्षम नसलेल्या इतर देशांना मदत करण्याचा हेतू आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. या विषाणूचा उद्रेक टाळण्यासाठी जलद उपाययोजना केल्याबद्दल त्यांनी चीन सरकारचं कौतुक केलं.
****
भारतीय हॉकीपटू कर्णधार राणी रामपाल हिला वर्ल्ड ॲथलीट ऑफ दी इयर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळणारी ती पहिली हॉकीपटू आहे. जागतिक क्रीडा संस्थेनं क्रीडा प्रेमींच्या मतदानानंतर राणीची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
****
भारत आणि न्यूझीलॅँड यांच्यातला चौथा ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट सामना आज वेलिंग्टन इथं खेळला जात आहे. न्यूझीलॅँड संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारताचा सलामीवीर संजू सॅमसन आठ धावा करून तंबूत परतला. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दोन षटकांत एक बाद सोळा धावा झाल्या होत्या. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतानं तीन-शून्य अशी विजयी आघाडी घेतलेली आहे.
****

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक – 31.01.2020 दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE - 31.01.2020 TIME - 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३१ जानेवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद थोड्याच वेळात संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात दोन्ही सदनांच्या संयुक्त सभेला संबोधित करतील. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर करतील. २०२०- २१ वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत उद्या सादर केला जाईल. दोन टप्प्यात होणाऱ्या या अधिवेशनाचा पहिला टप्पा अकरा फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, दुसरा टप्पा दोन मार्च ते तीन एप्रिलपर्यंत चालणार आहे.

दरम्यान, या अधिवेशनाला प्रारंभ होण्यापूर्वी काँग्रेससह बहुतांश विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज संसद भवन परिसरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शनं केली. या कायद्याला विरोध करणाऱ्या घोषणा लिहिलेले फलक हातात घेऊन अनेक खासदार या निदर्शनात सहभागी झाले.
****
निवृत्तीवेतनधारकांचा हयातीचा दाखला यापुढे बँकांनी संबंधितांच्या घरून संकलित करण्याचे निर्देश केंद्र सरकाने दिले आहेत. निवृत्तीवेतनधारकांचा बँकेपर्यंत येण्याचा त्रास वाचावा, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या सेवेसाठी साठ रुपशे शुल्क आकारलं जाणार आहे. निवृत्तीवेतन सुरू ठेवण्यासाठी संबंधितांना दरवर्षी हयातीचा दाखला बँकेत सादर करावा लागतो
****
यवतमाळ जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर प्रतिनिधी निवडून देण्यासाठी आज पोटनिवडणूक होत आहे. जिल्ह्यात सात मतदान केंद्रावर यासाठी मतदान घेतले जात असून, ४८९ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपा या दोन पक्षांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होत आहे.
****
परभणी इथं हजरत सय्यद शाह तुराबूल हक्क साहेब यांचा ऊर्स आजपासून सुरू होत आहे. मनोरंजनाच्या विविध साहित्यांसह मीना बाजार, विविध मिठाईची दुकानं या परिसरात उभारण्यात आली आहेत. या ऊसला राज्याच्या अनेक जिल्ह्यांसह परराज्यातून ही मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात.
****
भारत आणि न्यूझीलॅँड यांच्यातला चौथा ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट सामना आज वेलिंग्टन इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडेबारा वाजता हा सामना सुरू होईल. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतानं तीन-शून्य अशी विजयी आघाडी घेतलेली आहे.
****


आकाशवाणी औरंगाबाद दिनांक – 31.01.2020 सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Akashwani Aurangabad Urdu News Bulletin 8.40 AM 31-01-2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 31.01.2020 TIME - 7.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 January 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक३१ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** संसदेच्या अधिवेशनाला आजपासून प्रारंभ; आज आर्थिक सर्वेक्षण तर उद्या अर्थसंकल्प सादर होणार
** मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या व्यवहार्यतेची फेरतपासणी करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार
** मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्याच्या वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी
** समान काम- समान वेतनासह विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांचा आज आणि उद्या संप
आणि
** ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं निधन
**
****
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाला प्रारंभ होईल. आज सकाळी अकरा वाजता, संसदेच्या दोन्ही सदनांच्या संयुक्त सभेला राष्ट्रपती संबोधित करतील. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण अहवाल  संसदेत सादर करतील. उद्या २०२०- २१ वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला जाईल.
या अधिवेशनात विविध ४५ विधेयकं संसेदत मांडली जाणार असल्याचं, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं.
दोन टप्प्यात होणाऱ्या या अधिवेशनाचा पहिला टप्पा अकरा फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, दुसरा टप्पा दोन मार्च ते तीन एप्रिलपर्यंत चालणार आहे.
****
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अयोग्य असल्याचं तज्ज्ञांचं मत असून या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेची फेरतपासणी केली जाणार असल्याचं राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. पवार यांनी काल औरंगाबाद इथं मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या बैठका घेऊन, आगामी आर्थिक वर्षाच्या प्रारुप आराखड्यांना मंजूरी दिली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. जनतेचा पैसा वाया न जाता तो योग्य ठिकाणी उपयोगात आला पाहिजे. असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. ते म्हणाले……

तज्ञ अधिकाऱ्यांनी सांगितलं ही योजना पुन्हा एकदा तपासायची गरज आहे, कारण ही योजना वायबल नाहीये जी काही वीज लागेल त्या विजेचे बिल काही हजार कोटी रुपये दरवर्षी त्या ठिकाणी येणारे असा एक मतप्रवाह आहे, त्याकरता थोडासा मी माहिती घेऊन आम्हाला वाटलं की बाबा हे खरोखरीच शंभर टक्के यशस्वी तर पुढे पण जायला आमची काही कुणाची ना नाही.

राज्यात नवीन जिल्हा निर्मितीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्याच्या वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्याला काल पवार यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या घेतलेल्या बैठकीत मंजुरी दिली.
औरंगाबाद शहरासाठी पाणी पुरवठ्या संदर्भातली योजना, महाराष्ट्र जल प्राधिकरणाचा ९० टक्के हिस्सा आणि मनपाचा १० टक्के हिस्सा अशा स्वरूपात राबवणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.
औरंगाबाद जिल्ह्याच्या ३२५ कोटी ५० लाख रुपयांच्या, जालना जिल्ह्याच्या २३५ कोटी रुपये, बीडच्या ३०० कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला काल उपमुख्यमंत्री पवार यांनी मान्यता दिली.
लातूर जिल्ह्यासाठीच्या आगामी आर्थिक वर्षाच्या एकशे त्र्याण्णव कोटी २६ लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यात अर्थमंत्र्यांनी ४६ कोटी ७४ लाख रुपयांची वाढ करून २४० कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता दिली. नांदेड जिल्हा वार्षिक योजनेसाठी अर्थमंत्र्यांनी ३१५ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याची मागणी मंजूर केली. परभणीच्या २६२ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याला उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.  उस्मानाबाद जिल्ह्याच्या समस्यांबाबत शासन संवेदनशील असल्याचं सांगत उपमुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्याला १०० कोटी रूपये अतिरिक्त मंजूर केले. जिल्ह्यानं १२५ कोटी रूपयांची अतिरिक्त मागणी केली होती.
या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात उभारल्या जात असलेल्या ऑरिक सिटीची पाहणी केली. ऑरिकच्या एकूण परिसराचं नकाशाद्वारे त्यांनी निरीक्षण केलं. वीज, रस्ते, पाणी व्यवस्थापन, शालेय, आरोग्य आदी सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. ऑरिकमध्ये येणाऱ्या कंपन्यांसाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ इथंच निर्माण करण्यावर भर देऊन मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
****
कृषी वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात आणि उद्योजकता वाढीसाठी नवीन ऊर्जा धोरण तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यात शेतकऱ्यांकडे असलेली थकबाकी कमी होण्यासाठी निश्चित धोरण तयार करण्याचे निर्देश राऊत यांनी यावेळी दिले
****
समान काम- समान वेतन, कामाची निर्धारित वेळ, निवृत्तीवेतन आदी मागण्यांसाठी  बँक कर्मचाऱ्यांनी आज आणि उद्या संप पुकारला आहे. यामुळे आजपासून  सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
औरंगाबाद महापालिकेच्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी तीन फेब्रुवारीला वॉर्डांचे आरक्षण सोडत काढण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. चार फेब्रुवारीला प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिध्द केली जाणार असून, ११ फेब्रुवारीपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना स्वीकारण्यात येणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं काल काढलेल्या आदेशात म्हटलं आहे.
****
महिलांच्या हक्क आणि प्रगतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ८४ वर्षांच्या होत्या. सुरुवातीच्या काळात त्यांनी पुणे आकाशवाणीवर दोन वर्षे कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून नोकरी केली. त्यानंतर काही काळ त्यांनी स्त्री या मासिकात सहायक संपादक म्हणून काम केलं. १९८९ मध्ये मिळून साऱ्याजणी हे मासिक  त्यांनी सुरू केलं. या मासिकाद्वारे स्त्रियांचे विश्व उलगडत विद्या बाळ यांनी महिलांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडत प्रबोधन केलं. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
औरंगाबाद शहरातल्या हज हाऊसचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अल्पसंख्याक विकास आणि औकाफ, मंत्री नवाब मलिक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. काल हज हाऊस संदर्भात मलिक यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीनं कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं देण्यात येणारा कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अक्षयकुमार काळे यांना जाहीर झाला आहे.
कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्य पुरस्कार नांदेडचे कवी डॉ. दिनकर मनवर यांना दिला जाणार असल्याचं परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी काल जाहीर केलं.
****
भारत आणि न्यूझिलंड यांच्यातला चौथा ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट सामना आज वेलिंग्टन इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडेबारा वाजता हा सामना सुरू होईल. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारत तीन-शून्य अशा फरकानं आघाडीवर आहे.
****
परभणी इथं हजरत सय्यद शाह तुराबूल हक्क साहेब यांचा उरूस आजपासून सुरू होत आहे. मनोरंजनाच्या विविध साहित्यांसह मीना बाजार, विविध मिठाईची दुकानं उभारण्यात आली आहेत. या उरूसाला राज्य आणि परराज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात.
****
बीड जिल्ह्यात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडण्यासाठी ६ फेब्रुवारीला विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. असं टपाल खात्याच्या बीड विभागाचे डाक अधिक्षकांनी कळवलं आहे.  या खात्याचा उपयोग पिक विमा योजना, कृषी सन्मान योजना, मातृत्व वंदना योजना, रोजगार हमी योजना, निराधार योजना तसंच विद्यार्थ्यांना शिष्यवृतीसाठी आणि इतर योजनांसाठी करता येईल. 
****
संत ज्ञानेश्वरांनी पैठण इथं रेड्यामुखी वेद वदवल्याच्या घटनेला काल सातशे तेहेतीस वर्षं पूर्ण झाली. इसवी सन १२८७ साली वसंत पंचमीच्या दिवशी पैठणच्या नागघाटावर ही घटना घडल्याचं सांगितलं जातं. यानिमित्तानं काल पैठण इथं नागघाटावर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांचं पठण, कीर्तन, भजन आदी कार्यक्रमात नागरिक भक्तिभावानं सहभागी झाले.
****
कुष्ठरोग निवारण दिन आणि महात्मा गांधी यांची पुण्यतिथी यानिमित्तानं काल परभणी इथं संदेश फेरी काढण्यात आली. आरोग्य सेवा सहाय्यक संचालक कार्यालयामार्फत काढण्यात आलेल्या या संदेश फेरीत शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
हिंगोली शहरात पीक विम्याचा प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीक विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली. या कार्यालयात पीक विम्याबाबत चौकशी करायला गेले असतांना, कोणीही अधिकारी न भेटल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
****



आकाशवाणी औरंगाबाद दिनांक – 31.01.2020 सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Thursday, 30 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.01.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 January 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जानेवारी २०२० सायंकाळी ६.००
****

 मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अयोग्य असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे, असं राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. पवार यांनी औरंगाबाद इथं मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या बैठका घेऊन, आगामी आर्थिक वर्षाच्या प्रारुप आराखड्यांना मंजूरी दिली, त्यानंतर ते बोलत होते. वॉटर ग्रीड संदर्भातला निर्णय नंतर घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. औरंगाबाद शहरासाठी पाणी पुरवठ्या संदर्भातली योजना, महाराष्ट्र जल प्राधिकरणाचा ९० टक्के हिस्सा आणि मनपाचा १० टक्के हिस्सा अशा स्वरूपात राबवणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.

 लातूर जिल्ह्यासाठी आगामी आर्थिक वर्षाच्या एकशे त्र्याण्णव कोटी २६ लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यात अर्थमंत्र्यांनी ४६ कोटी ७४ लाख रुपयांची वाढ करून २४० कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याला मान्यता दिली. लातूर जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या उपक्रमांचं पवार यांनी कौतुक केलं.

 नांदेड जिल्हा वार्षिक योजनेसाठी अर्थमंत्र्यांनी ३१५ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याची मागणी मंजूर केली. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची पॉवर पॉईंट सादरणीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.

       परभणी जिल्हा वार्षिक योजनेच्या २६२ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याला उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. जिल्हा प्रशासनानं  १४१ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी वित्तमंत्र्यांकडे केली होती, त्यापैकी वित्तमंत्र्यांनी ४४ कोटी २८ लाख रुपये वाढ मंजूर केली.

 या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात उभारल्या जात असलेल्या ऑरिक सिटीची पाहणी केली. ऑरिकच्या एकूण परिसराचं नकाशाद्वारे त्यांनी निरीक्षण केलं. वीज, रस्ते, पाणी व्यवस्थापन, शालेय, आरोग्य आदी सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. ऑरिकमध्ये येणाऱ्या कंपन्यांसाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ इथे निर्माण करण्यावर भर देन मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
****

  कृषी वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात आणि उद्योजकता वाढीसाठी नवीन ऊर्जा धोरण तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत यासंदर्भाझालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्याशेतकरी वर्गाकडे असलेली थकबाकी कमी होण्यासाठी निश्चित धोरण तयार करण्याचे निर्देश राऊत यांनी यावेळी दिले
****

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या निधनानं नारीशक्तीचा बुलंद आवाज हरवला असून स्त्रीवादी चळवळीचं मोठं नुकसान झालं असल्याची शोकभावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साहित्यिक, कृतिशील संपादक, स्त्री हक्क चळवळीतील अग्रणी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं, स्त्री सक्षमीकरण चळवळीतलं त्यांच योगदान सदैव स्मरणात राहील, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

 विद्या बाळ यांच्या रूपानं स्त्री- पुरुष समानतेसाठी अखेरच्या श्वासापर्यंत झटलेल्या एका पर्वाची आज अखेर झाली, अशा शब्दात राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 विद्या बाळ यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं, त्यांच्या निधनानं समाजाच्या सर्वच थरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
****

       इंडिया पोस्ट पेमेंट बैंक ही टपाल विभागाची महत्त्वाकांक्षी योजना जनतेला समर्पित झालेला उपक्रम असून, कॅशलेस व्यवहार हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं टपाल विभागाचे अहमदनगर इथले वरिष्ठ अधीक्षक जे टी भोसले यांनी म्हटलं आहे, ते आज अहमदनगर इथं पत्रकारांशी बोलत होते. या योजनेचा पुढचा टप्पा म्हणून, आधार संबंधित पेमेंट सिस्टम - ए ई पी एस ला सुरुवात झाल्याची माहिती  भोसले यांनी दिली. या सेवेसाठी ग्राहकाचं राष्ट्रीयकृत बँकेत बचत खातं असणं तसंच हे खातं आधार कार्डशी संलग्न असणं आवश्यक आहे. याद्वारे ग्राहकाला टपाल कार्यालयातून कमाल दहा हजार रुपये तर  पोस्टमनमार्फत कमाल पाच हजार रुपये काढता येतील. या अभिनव उपक्रमामुळे ग्रामीण भागातल्या जनतेचा बँकेपर्यत जाण्याचा त्रास वाचणार असल्याचं, भोसले यांनी सांगितलं.
****

 कुष्ठरोग निवारण दिन आणि महात्मा गांधी यांची पुण्यतिथी यानिमित्तानं आज परभणी इथं संदेश फेरी काढण्यात आली. आरोग्य सेवा सहाय्यक संचालक कार्यालयामार्फत काढण्यात आलेल्या या संदेश फेरीत शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
*****
***

Audio - आकाशवाणी औरंगाबाद – दि.30.01.2020 रोजीचे सायंकाळी 06.00 वाजेचे मराठी बात...

आकाशवाणी औरंगाबाद – दि.30.01.2020 सोलापूर जिल्हा वार्तापत्र

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE - 30.01.2020 TIME - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 January 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक –  ३० जानेवारी २०२० दुपारी १.०० वाजता
****
दिल्लीतल्या निर्भया लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या दोषींच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी या दोषींच्या वकिलांनी केली आहे. चौघा दोषींपैकी तिघांचे अद्याप माफीचे पर्याय खुले असल्यानं, फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, अशा आशयाची याचिका दोषींच्या वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या चौघांना परवा एक फेब्रुवारीला फासावर चढवण्यात येणार आहे, त्यासाठीचं डेथ वॉरंट मृत्यूनिर्देश ही जारी करण्यात आले आहेत.
****
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे, राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं या अधिवेशनाला प्रारंभ होईल. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला नवी दिल्लीत प्रारंभ झाला आहे. काँग्रेस नेता गुलामनबी आझाद, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक नेते या बैठकीला उपस्थित आहेत.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी - हुतात्मा दिनानिमित्त आज सर्वत्र हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं. औरंगाबाद इथं, महावितरण प्रादेशिक कार्यालय तसंच महावितरण परिमंडल कार्यालयात अधिक्षक अभियंता उदयपाल गाणार, सहायक महाव्यवस्थापक चेतन वाघ यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटं मौन राखून आदरांजली अर्पण केली.

आकाशवाणी औरंगाबाद केंद्रातही केंद्र उप निदेशक जयंत कागलकर यांच्यासह सर्व विभागातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटं मौन पाळून हुतात्म्यांना अभिवादन केलं.
****
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत ४ हजार ६०० प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे बाधित झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही. राज्यात सध्या २७ प्रवाशी निरिक्षणाखाली असून त्यातील १० प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
****
एचडीएफसी बँकेला केवायसी निकषांची पूर्तता न केल्याबद्दल रिजर्व्ह बँकेनं एक कोटी रुपये दंड ठोठावला आहे. आयपीओच्या बोलीसाठी खातेधारकांनी उघडलेल्या एकोणचाळीस चालू खात्यांच्या आवश्यक तपासणीत एचडीएफसीनं हेळसांड केल्याचं २०१६-१७ या वर्षीच्या पर्यवेक्षकीय मूल्यांकनात स्पष्ट झालं. या खात्यांमधले व्यवहार, ग्राहकांच्या घोषित उत्पन्नाशी विसंगत असल्याचं, आरबीआयच्या पत्रकात म्हटलं आहे.
****
निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाचे महासचिव अरुण सिंह यांना नोटिस बजावली आहे. काँग्रेस पक्षानं त्यांच्यावर दिल्ली इथं निवडणूक काळात आचार संहितेच उल्लंघन केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. निवडणूक आयोगानं सिंह यांना उद्यापर्यंत उत्तर देण्यास सांगितलं आहे.
****
वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज औरंगाबाद इथं राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठक घेतली जात आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात होत असलेल्या या बैठकीला औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे, रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांच्यासह लोकप्रतिनिधी तसंच अधिकारी उपस्थित आहेत.
दरम्यान या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत उभारल्या जात असलेल्या ऑरिक सिटीच्या कामकाजाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
****
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधून त्याचा वापरणाऱ्या लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर  देण्यात येणाऱ्या अनुदानाचं वाटप आता तालुका स्तरावरुनच करण्यात येणार असल्याची माहिती वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिली. लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मीना यांनी सांगितलं.
****
संत ज्ञानेश्वरांनी पैठण इथं रेड्यामुखी वेद वदवल्याच्या घटनेला आज सातशे तेहेतीस वर्षं पूर्ण झाली. इसवी सन १२८७ साली वसंत पंचमीच्या दिवशी पैठणच्या नागघाटावर ही घटना घडल्याचं सांगितलं जातं. यानिमित्तानं आज पैठण इथं नागघाटावर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांचं पठण, कीर्तन, भजन आदी कार्यक्रमात नागरिक भक्तिभावानं सहभागी झाले.
****
मिरज ते पुणे मार्गावर दुहेरीकरण आणि विद्युतीकरण कामांसाठी  कोल्हापूर  ते  मुंबई मार्गावर धावणारी कोयना एक्सप्रेस ही रेल्वे गाडी २ फेब्रुवारी पर्यंत बंद राहणार आहे. तसेच इतर गाडयांचे मार्ग बदलण्यात आले असून त्या रेल्वे गाड्या दौंड, कुर्डुवाडी मार्गाने धावणार आहे.
****


AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE - 30.01.2020 TIME - 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३० जानेवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७२ व्या स्मृतीदिनानिमित्त आज कृतज्ञ राष्ट्र त्यांना आदरांजली अर्पण करत आहे. आजचा दिवस हुतात्मा दिवस म्हणूनही पाळला जातो. दिल्लीत राजघाट इथं गांधीजींच्या समाधी स्थळी सर्वधर्म प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह,काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी याठिकाणी गांधीजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.
****
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच आज पुण्यात खाजगी रुग्णालयात निधन झालं. त्या ८४ वर्षांच्या होत्या. मिळून साऱ्याजणी या मासिकाच्या त्या संपादक असलेल्या विद्या बाळ यांनी महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिलं आहे.
****
उपमुख्यमंत्री अजित पवार आज औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. पवार यांच्या उपस्थितीत २०२०-२१ या आर्थिक वर्षाचं नियोजन करण्यासाठी राज्यस्तरीय बैठक होणार आहे. मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांचा सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारूप आराखडा या बैठकीत अंतिम केला जाईल. संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, अन्य लोकप्रतिनिधी तसंच प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील.
दरम्यान, पवार यांनी आज सकाळी ऑरिक सिटीतल्या कामकाजाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचे पालक मंत्री सुभाष देसाई, जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे उपस्थित होते.
****
राज्यातील नाशिक इथं थंडीचा कडाका वाढला असून आज ७ पूर्णांक ९ अंश सेल्सिअस तर निफाड इथं ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यात काल पासून थंडीत वाढ झाली आहे. ही थंडी रब्बी हंगामातील पीकांसाठी उपयुक्त ठरत असल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****


आकाशवाणी औरंगाबाद दिनांक – 30.01.2020 सकाळी 11.02 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 30 January 2020
Time: 8:40 to 8:45 am
آکاشوانی ‘  اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۳۰  ؍ جنوری  ۲۰۲۰ئ؁
وَقت :  ۴۰:۸۔ ۴۵:۸

 مہاراشٹر کابینہ نے گرام پنچایت کے لیے چنے گئے اراکین میں سے سر پنچ کو منتحب کرنے کے فیصلے کو کل منظوری دی۔ اب تک سر پنچ کو سیدھے عوام سے چنا جا تا تھا۔ ریاستی کابینہ کے کل ہوئے اجلاس میں گرام پنچایت سے سر پنچ چننے کے فیصلے کو قا نونی شکل دینے کے لیے آرڈیننس جا ری کر نے کا بھی فیصلہ لیا گیا۔ ساتھ ہی کا بینہ نے مہاراشٹر گرام پنچا یت قا نون میں جزوی طور پر اصلاح کرنے کو بھی منظوری دی۔ دیہی تر قیات کے وزیر حسن مُشرف نے کہا کہ اِس فیصلے سے سر پنچ اور دیگر اراکین میں تال میل بڑھے گا جس سے گرام پنچایتوں کا کام کاج مزید تیز اور آسان ہو سکے گا۔حسن مُشرِف نے مزید کہا  کہ اب تک سر پنچوں کو سیدھے عوام  سے منتخب کر نے کے منفی اثرات سامنے آئے ہیں جو گائوں کی تر قی پر اثر انداز ہو تے رہے۔ اُنھوں نے کہا کہ یہ دیکھا گیا ہے کہ گرام پنچا یتوں میں سر پنچ اور اراکین کے نظر یات کا ٹکرائو ہو نے لگا تھا جس کے بعد گرام پنچا یت اراکین میں سے ہی سر پنچ کو چننے کا فیصلہ لیا گیا ہے۔
 دوسری جانب ریاستی حکو مت کے فیصلے سے غیر مطمئین سر پنچ پریشد کے صدر دتاّ کا کڑے نے اِس فیصلے سے نا اتفاقی کا اظہار کیا ہے۔ کا کڑے نے مطا لبہ کیا  کہ حکو مت سیدھے عوام سے سرپنچ چننے کو منسوخ کر نے کے فیصلے پر دو بارہ غور کرے۔
اِس فیصلے کے خلاف سر پنچ پریشد نے احمد نگر ضلعے کے شیو گائوں میں تحصیل دفتر پر کل جلوس نکا لا جس کے بعد کا کڑے نے یہ بات کہی۔ اُنھوں نے کہا کہ اِس بارے میں ایک کمیٹی تشکیل دی جائے جو عوام کی رائے حاصل کرے۔ کاکڑے نے انتباہ دیا کہ اگر ریاستی حکو مت اِس فیصلے کو منسوخ نہیں کر تی ہے تو ریاست بھر میں شدید احتجاج کیا جائے گا۔

***** ***** *****

 شہر یت تر میمی قانون ‘CAA  اور مردم شماری کے قو می رجسٹر‘   NPR قوانین کے خلاف بہو جن کرانتی مورچہ اور دیگر مزدور تنظیموں کی جانب سے کل منا ئے گئے بھارت بند کا مہاراشٹر میں ملا جلا اثر دیکھا گیا۔ اورنگ آ باد شہر میں کچھ حصوں میں دکا نیں بند رہیں  جبکہ دیگر حصوں میں کارو بار حسبِ معمول جاری رہے۔ کچھ علاقوں میں دکا نیں بند کر وانے پر بضد ہجوم اور کارو باریوں کے بیچ بحث بھی ہوئی جس کے بعد علا قے میں تنائو پیدا ہو گیا تھا۔
 دوسری جانب خلد آ باد کا ہفتہ واری بازار کل نہیں لگا یا گیا۔ اجنٹہ چوراہے پر بھی کل جلوس نکا لا گیا۔سلوڑ‘ بِڑکن‘ کر ماڑ اور شیکٹہ میں بھی بند کا ملا جلا اثر دیکھا گیا۔

***** ***** *****

 ناندیڑ میں دکانداروں نے بھارت بند میں شریک ہونے سے انکار کر تے ہوئے اپنے کا رو بار جاری رکھے۔ ہنگولی میں بھی کچھ دکانیں بند رہیں لیکن انکاکاروبار ی سر گر میوں پر کوئی اثر نہیں پڑا۔ پر بھنی ضلعے کے سیلو ‘ گنگا کھیڑ تعلقے میں بھی بند کا کوئی اثر نہیں دیکھا گیا جبکہ پر بھنی ضلعے میں بند کا ملا جلا اثر رہا۔ آکاشوانی کے لاتور کے نمائندے نے بتا یا کہ لاتور ضلعے میں بھارت بند کا کوئی خاص اثر نہیں دیکھا گیا۔
 اِس بیچ دھو لیہ اور ایوت محل شہر وں میں بھارت بند نے پُر تشدد رُخ اختیار کر لیا۔ دھو لیہ میں مظاہرین نے کئی گاڑیوں پر پتھرائو کیا اور کچھ گاڑیوں کو آگ کے حوالے کر دیا۔ ایوت محل میں مظا ہرین کی جانب سے  پتھرائو کے بعد ماحول میں تنائو پیدا ہو گیا تھا۔ اورتاجراور مظاہرین آمنے سامنے آگئے تھے۔ بعد میں پولس نے لاٹھی چارج کر کے حا لات پر قا بو پا یا۔ سانگلی ضلعے کے مِرَج میں بھی بھارت بند کے دوران گاڑیوں کو نقصان پہنچا نے والے دو نو جوانوں کو پولس نے حراست میں  لیا۔ ممبئی میں بھی کانجو مارگ ریلوے اسٹیشن پر احتجاج کر رہے قریب سو مظاہرین کو بھی پولس نے حراست میں لیا۔

***** ***** ***** 

 مہاراشٹر حکو مت کی جانب سے دیے جانے والا گان سمراگنی لتا منگیشکر انعام کے لیے معروف خاتون موسیقار اُوشا کھنہّ کے نام کا اعلان کیا گیا ہے۔ یہ انعام پانچ لاکھ روپئے نقد‘ سپاس نا مہ اور توصیفی سند پر مشتمل ہے۔ ثقا فتی امور کے وزیر امِت دیشمکھ کے ہاتھوں کل ممبئی میں اُوشا کھنہّکوگان سمراگنی لتا منگیشکر انعام دیا جائے گا۔ مرد موسیقاروں کی بالا دستی والی ہندی فلم انڈسٹری میں اُوشا کھنہّنے خاتون موسیقار کی حیثیت سے اپنی نما یاں پہچان بنا ئی ہے۔ اُنھوں نے بِن پھیرے ہم تیرے‘ لال بنگلہ‘ سبق‘ ہوَس‘ ہم ہندوستا نی ‘ آپ تو ایسے نہ تھے اور آئو پیا ر کریں جیسی کئی فلموں میں موسیقی دی ہے۔

***** ***** *****

 نائب وزیر اعلیٰ اجیت پوار آج اورنگ آباد میں ضلع سا لا نہ منصوبہ بندی2020-21؁ء  کی ریاستی سطح کی میٹنگ کریں گے۔ اِس میٹنگ میں مراٹھواڑہ کے سبھی ضلعوں کی سا لا نہ منصوبہ بندی کے خا کے کو حتمی شکل دی جائے گی۔ متعلقہ ضلعوں کے رابطہ وزرائ‘ عوامی نما ئندے اور اعلیٰ افسران آج اِس میٹنگ میں شر کت کریں گے۔

***** ***** *****

 ناسک ضلعے کے دیو لہ کے قریب منگل کے روز بس اور آپے رکشہ کے در میان ہوئے حادثے میں مر نے والوں کی تعداد بڑھ کر26؍ ہو گئی ہے۔ حادثے کے دوران بس اور آ پے رکشہ دو نوں قریب واقع کنویں میں جا گرے تھے۔
 وزیر اعظم نریندر مودی نے بھی اِس واقعے پر گہرے رنج و غم کا اظہار کیا ہے۔ اپنے ٹوئیٹر پیغا م میں مودی نے مرنے والوں کے افرادِ خاندان کے ساتھ ہمدر دی کا اظہار کیا ہے۔ اِس دوران ٹرانسپورٹ کے ریاستی وزیر انیل پرب نے کل مالیگائوں میں میڈیا سے گفتگو کر تے ہوئے کہا کہ انسانی غلطیوں اور تکنیکی خرابیوں سے ہونے والے حادثوں کی روک تھام کے لیے ایس ٹی کار پو ریشن جلد ہی ضروری اقدامات کرے گی۔ پر ب نے اعلان کیا کہ حادثے کے دوران جانے گنوا نے والے بس مسا فروں کے افرادِ خاندان کو  فی کس دس لاکھ اور رکشے میں سوار مسافروں کے افرادِ خاندان کو فی کس دو لاکھ روپیوں کی مدد  دی جائے گی۔

***** ***** *****


 بھارت اور نیوزی لینڈ کے در میان کل ہیمِلٹن میں کھیلے گئے تیسرےT-20؍ مقابلے میں بھارت نے سو پر اوور جیت کر میچ اپنے نام کر لیا۔  میزبان نیوزی لینڈ نے ٹاس جیت کر بھارت کو پہلّے بلّے بازی کرنے کی دعوت دی اور بھارت نے نیوزی لینڈ کے سامنے179؍ رنوں کا نشا نہ رکھا۔
 دوسری جانب نشا نے کا پیچھا کر تے ہوئے نیوزی لینڈ کی ٹیم بھی179؍ رن بنا کر آئوٹ ہو گئی۔ اس کے بعد میچ سو پر اوور کے دلچسپ مر حلے میں داخل ہو گیا۔ سو پر اوور کے دوران پہلے بلّے بازی کر تے ہوئے نیوزی لینڈ نے سترہ رن بنا ئے ۔ جواب میں روہِت شر ما کے دو چھکوں کی بدو لت بھارت نے اٹھا رہ رن بنا کر مقابلہ اپنے نام کر لیا۔ پانچ T-20؍ مقابلوں کی سیریز کے تین مقابلے جیت کر بھارت نے سیریز میں تین ۔صفر کی بر تری حاصل کر لی ہے۔ سیریز کا اگلا مقابلہ کل ویلِنگٹن کھیلا جائے گا۔

***** ***** *****

AIR News Urdu Bulletin, Aurangabad. Date : 30.01.2020, Time : 8.40 - 8....

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 30.01.2020 TIME - 7.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 January 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक३० जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंचांची निवड करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
** गर्भपातासाठीची मुदत पाच महिन्यावरून सहा महिने करण्याची तरतूद असलेल्या सुधारित वैद्यकीय गर्भधारणा निरस्तीकरण विधेयकाला केंद्र सरकारची मान्यता
**  ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर
** नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी कायद्याविरोधातल्या भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद
आणि
**  न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा सुपरओव्हरमध्ये विजय; पाच सामन्याची मालिकाही जिंकली
****
सरपंचांची निवड थेट जनतेतून न करता, निवडून आलेल्या सदस्यांमधूनच करण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळानं काल शिक्कामोर्तब केलं. यासाठी संबंधित कायद्यामध्ये सुधारणा करण्याकरता अध्यादेश काढण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत घेण्यात आला. याचबरोबर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामधल्या काही कलमांमध्ये सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
या निर्णयामुळे सरपंच आणि सदस्य यांच्यामध्ये सुसंवाद वाढून ग्रामपंचायतींचं कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होईल, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
सध्या सुरु असलेल्या सरपंचांच्या थेट निवडीच्या पद्धतीमुळे त्याचा विपरीत परिणाम गावाच्या विकास कामावर झाल्याचं दिसून येत असून. सरपंच एका विचाराचे  आणि सदस्य दुसऱ्या विचाराचे असे चित्र अनेक ग्रामपंचायतींमध्ये दिसत असल्याचं मुश्रीफ म्हणाले. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले. विद्यापीठ आणि महाविद्यालयातल्या पीएच डी धारक प्राध्यापकांना १ जानेवारी १९९६ पासून दोन आगाऊ वेतनवाढी देण्यासही मंत्रीमंडळानं काल मान्यता दिली.
दरम्यान, थेट जनतेतून सरपंच निवड प्रक्रिया रद्द करण्याच्या निर्णयाचा सरकारने फेरविचार करावा, असं सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे यांनी म्हटलं आहे. थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय राज्य सरकारनं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, या निर्णयाविरोधात सरपंच परिषदेनं काल अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव इथं तहसील कार्यालयावर मोर्चा काढला, त्यानंतर काकडे बोलत होते. यासंदर्भात राज्य पातळीवर एक समिती नियुक्त करून अभ्यास करावा, जनमत घ्यावं, असं काकडे यांनी म्हटलं आहे. निर्णय रद्द न केल्यास, राज्यभरात तीव्र आंदोलनाचा इशारा काकडे यांनी दिला आहे
****
गर्भपातासाठीची मुदत पाच महिन्यावरून सहा महिने करण्याची तरतूद असलेल्या सुधारित वैद्यकीय गर्भधारणा निरस्तीकरण -मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नेंसी विधेयक २०२० या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळानं काल मंजुरी दिली. हे नवे विधेयक येत्या संसदेच्या अधिवेशनात मांडले जाणार आहे. यामध्ये गर्भपातासाठीची मुदत २० आठवड्यांवरून वाढवत २४ आठवडे करण्यात आली आहे. यामुळे देशातल्या माता मृत्यूदरात घट होण्यास मदत मदत होणार आहे, असं मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं.
****
ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि ५ लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप असून सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्या मुंबईत उषा खन्ना यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरुष संगीतकारांचं वर्चस्व असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीत संगीत दिग्दर्शक म्हणून यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या उषा खन्ना यांनी बिन फेरे हम तेरे, लाल बंगला, सबक, हवस, हम हिंदुस्थानी, आप तो ऐसे ना थे, साजन बिना सुहागन, साजन की सहेली, अनोखा बंधन, शबनम, सौतन, आओ प्यार करे यासारख्या अनेक चित्रपटांना संगीत दिलं आहे. 
****
नागरिकत्व सुधारणा कायदा तसंच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या कायद्यांना विरोध करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा, काही कामगार संघटना तसंच सामाजिक संघटनांच्या वतीनं पुकारलेल्या भारत बंद ला काल राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

औरंगाबाद शहरातल्या काही भागांमध्ये दुकाने बंद करण्यासाठी फिरत असलेल्या जमावाला व्यापाऱ्यांनी विरोध केला असता काही काळ तणाव निर्माण झाला होता. जिल्ह्यातल्या खुलताबाद शहरातला आठवडी बाजार भरला नाही, अजिंठा चौफुली इथं मोर्चा काढण्यात आला. तर, सिल्लोड, बिडकीन, करमाड, शेकटा परिसरात बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला.

नांदेड शहरातल्या व्यापाऱ्यांनी बंद पाळण्यास नकार देत आपली व्यावसायिक प्रतिष्ठानं सुरू ठेवली. हिंगोलीतही किरकोळ दुकानं बंद होती, मात्र त्याचा बाजारपेठेवर परिणाम जाणवला नाही. परभणी जिल्ह्यात सेलू गंगाखेड तालुक्यात बंदला काहीही प्रतिसाद मिळाला नाही, उर्वरित जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद दिसून आला. लातूर इथंही बंदला प्रतिसाद दिसून आला नसल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
यवतमाळ तसंच धुळे शहरात मात्र बंदला हिंसक वळण लागलं, धुळ्यात आंदोलकांनी अनेक वाहनांवर दगडफेक केली तर काही वाहनं पेटवून दिली.
यवतमाळ इथं आंदोलकांनी दगडफेक केल्यामुळे वातावरण चिघळलं, व्यापारी आणि आंदोलक आमने सामने आल्याने दोन्ही गटात वाद झाला. पोलिसांना लाठीमार करून, परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.
सांगली जिल्ह्यात मिरज इथही बंदला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी ऑटो रिक्षांच्या काचा फोडून रिक्षा वाहतूक बंद पाडली. वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांपैकीकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
कोल्हापूर, सातारा, नाशिक तसंच ठाणे जिल्ह्यातही बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र उपनगरी रेल्वेसेवा काही अंशी विस्कळीत झाली. मुंबईत कांजूरमार्ग इथं रेल्वेमार्गावर आंदोलन करणाऱ्या सुमारे शंभर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
लातूर इथं कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन नियमित वर्गांना सुरुवात केल्यावरच सर्व समस्या सोडवल्या जातील, असं वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे  कुलगुरु डॉ अशोक ढवण यांनी स्पष्ट सांगितलं आहे. कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बदली करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थी विद्यार्थिनींनी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. काल कुलगुरु डॉ ढवण यांनी लातूर इथं विद्यार्थ्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेतल्यावर समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं. मात्र मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे.
****
औरंगाबाद इथं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ चं नियोजन करण्यासाठी राज्यस्तरीय बैठक होणार आहे. मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांचा सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारूप आराखडा या बैठकीत अंतिम केला जाईल. संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, अन्य लोकप्रतिनिधी तसंच प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील.
****
बीड इथं काल नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलतांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र  आव्हाड यांनी संविधानानं देश चालवण्याच आवाहन केलं ज्यामुळं देशातल्या सर्व सामान्य नागरिकांना सन्मानानं जगता येईल असं मत व्यक्त केलं. आंदोलनाच्या अध्यक्ष स्थानी माजी न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील हे होते.
****
न्यूझीलंड इथं झालेल्या तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं सुपरओव्हर जिंकून विजय पटकावला. काल झालेल्या या सामन्यात भारतीय संघानं केलेल्या एकशे एकोणऐंशी धावांशी न्यूझीलंडच्या संघानं बरोबरी केली. त्यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने सतरा धावा केल्या, रोहित शर्माच्या दोन षटकारांच्या बळावर भारतानं अठरा धावा करून, सुपर ओव्हर आणि सामनाही जिंकला. पाच सामन्यांच्या या मालिकेत तीन सामने जिंकून भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतला पुढचा सामना उद्या वेलिंग्टन इथं होणार आहे.
****
महाविद्यालयीन शिक्षणात गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच कौशल्य विकास प्रशिक्षणाचा अंतर्भाव केल्यास शहराकडे धाव घेणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबतील, असं राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान - ‘रुसाचे ज्येष्ठ सल्लागार डॉ. प्रमोद पाब्रेकर यांनी म्हटलं आहे. हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं नारायणराव वाघमारे महाविद्यालयात डॉ. पाब्रेकर यांच्या हस्ते आज पदवी प्रदान समारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण भागातली गुणवत्ता तंत्रशुद्ध पद्धतीने विकसित होण्यावर डॉ पाब्रेकर यांनी यावेळी भर दिला.
****
ग्रंथालय चळवळ तसंच शिक्षण क्षेत्रातले ज्येष्ठ कार्यकर्ते अनंतराव चाटे यांचं काल बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं निधन झालं, ते ६६ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून आजारी असलेले चाटे यांच्यावर अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं, त्यांच्या पार्थिव देहावर वरवटी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
वाळूनं भरलेला हायवा ट्रक सोडण्यासाठी एक लाख रूपयांची लाच घेताना गेवराईचे नायब तहसीलदार प्रल्हाद लोखंडेसह खाजगी व्यक्ती माजीद शेखला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल रंगेहाथ पकडलं. गेवराई पोलिस ठाण्यात लोखंडे आणि माजीद शेख विरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
नाशिक जिल्ह्यात देवळानजिकच्या अपघातातल्या मृतांची संख्या २६ झाली आहे. बस आणि ॲपे रिक्षामध्ये टक्कर झाल्यानंतर ही दोन्ही वाहने एका विहिरीत पडली होती. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून दुःख व्यक्त केलं आहे. मानवी चुका तसंच तांत्रिक दोषांमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांचे होणारे अपघात  रोखण्यासाठी लवकरच आवश्यक त्या सुधारणा करण्यात येईल असं आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी  काल मालेगाव इथं वार्ताहरांशी बोलताना दिलं. अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख आणि रिक्षामधल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये खास बाब म्हणून मदत देण्याची घोषणाही परब यांनी यावेळी केली.
****