आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७ जानेवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय
जनता पक्षाच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात औरंगाबादमध्ये
विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज एक दिवसाचं लाक्षणिक
उपोषण केलं जात आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर,
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, यांच्यासह अन्य नेते
या उपोषणात सहभागी होणार असल्याचं प्रदेश सरचिटणीस
आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितलं.
****
राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल सांस्कृतिक कार्य
मंत्री अमित देशमुख आणि संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे या दोघांचा काल लातूर
इथं भव्य नागरी सत्कार करण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री
बाळासाहेब थोरात या सत्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दोन्ही मंत्र्यांना
मानपत्र देऊन, त्यांचा गौरव करण्यात आला. घटक पक्षातल्या सर्व नेत्यांनी लातूरच्या
पाणी प्रश्नाकडे सकारात्मक पद्धतीनं पाहिलं तर हा प्रश्न निश्चित सुटेल आता आशावाद,
अमित देशमुख यांनी व्यक्त केला.
****
नांदेडच्या शांभवीज फाऊंडेशनचा नांदेड वैभव पुरस्कार
पुण्याच्या बबन जोगदंड यांना काल नांदेड इथं सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जोगदंड हे पुण्यात यशदा
संस्थेत प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यावेळी सिने अभिनेते सचिन खेडेकर आणि ज्येष्ठ नाटककार पद्मश्री वामन
केंद्रे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
****
वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन आज
सांगली इथं होत आहे. समाजातला हा घटक आजही उपेक्षित असून त्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी
आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी अधिवेशनाच्या निमित्ताने पुढे आली आहे.
****
चीनमध्ये संसर्ग झालेल्या कोरोना विषाणूचा एक रुग्ण नेपाळमध्ये
आढळला आहे. या पाश्वर्भूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून, बिहार राज्याच्या लगत असलेल्या
नेपाळच्या सीमांवर तपास अधिक कडक करण्यात आला आहे. विमानतळांवरवही सतर्कता बाळगण्याचे
आदेश देण्यात आले आहेत.
****
No comments:
Post a Comment