Thursday, 30 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE - 30.01.2020 TIME - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 January 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक –  ३० जानेवारी २०२० दुपारी १.०० वाजता
****
दिल्लीतल्या निर्भया लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या दोषींच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी या दोषींच्या वकिलांनी केली आहे. चौघा दोषींपैकी तिघांचे अद्याप माफीचे पर्याय खुले असल्यानं, फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, अशा आशयाची याचिका दोषींच्या वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या चौघांना परवा एक फेब्रुवारीला फासावर चढवण्यात येणार आहे, त्यासाठीचं डेथ वॉरंट मृत्यूनिर्देश ही जारी करण्यात आले आहेत.
****
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे, राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं या अधिवेशनाला प्रारंभ होईल. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला नवी दिल्लीत प्रारंभ झाला आहे. काँग्रेस नेता गुलामनबी आझाद, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक नेते या बैठकीला उपस्थित आहेत.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी - हुतात्मा दिनानिमित्त आज सर्वत्र हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं. औरंगाबाद इथं, महावितरण प्रादेशिक कार्यालय तसंच महावितरण परिमंडल कार्यालयात अधिक्षक अभियंता उदयपाल गाणार, सहायक महाव्यवस्थापक चेतन वाघ यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटं मौन राखून आदरांजली अर्पण केली.

आकाशवाणी औरंगाबाद केंद्रातही केंद्र उप निदेशक जयंत कागलकर यांच्यासह सर्व विभागातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटं मौन पाळून हुतात्म्यांना अभिवादन केलं.
****
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत ४ हजार ६०० प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे बाधित झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही. राज्यात सध्या २७ प्रवाशी निरिक्षणाखाली असून त्यातील १० प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
****
एचडीएफसी बँकेला केवायसी निकषांची पूर्तता न केल्याबद्दल रिजर्व्ह बँकेनं एक कोटी रुपये दंड ठोठावला आहे. आयपीओच्या बोलीसाठी खातेधारकांनी उघडलेल्या एकोणचाळीस चालू खात्यांच्या आवश्यक तपासणीत एचडीएफसीनं हेळसांड केल्याचं २०१६-१७ या वर्षीच्या पर्यवेक्षकीय मूल्यांकनात स्पष्ट झालं. या खात्यांमधले व्यवहार, ग्राहकांच्या घोषित उत्पन्नाशी विसंगत असल्याचं, आरबीआयच्या पत्रकात म्हटलं आहे.
****
निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाचे महासचिव अरुण सिंह यांना नोटिस बजावली आहे. काँग्रेस पक्षानं त्यांच्यावर दिल्ली इथं निवडणूक काळात आचार संहितेच उल्लंघन केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. निवडणूक आयोगानं सिंह यांना उद्यापर्यंत उत्तर देण्यास सांगितलं आहे.
****
वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज औरंगाबाद इथं राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठक घेतली जात आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात होत असलेल्या या बैठकीला औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे, रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांच्यासह लोकप्रतिनिधी तसंच अधिकारी उपस्थित आहेत.
दरम्यान या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत उभारल्या जात असलेल्या ऑरिक सिटीच्या कामकाजाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
****
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधून त्याचा वापरणाऱ्या लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर  देण्यात येणाऱ्या अनुदानाचं वाटप आता तालुका स्तरावरुनच करण्यात येणार असल्याची माहिती वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिली. लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मीना यांनी सांगितलं.
****
संत ज्ञानेश्वरांनी पैठण इथं रेड्यामुखी वेद वदवल्याच्या घटनेला आज सातशे तेहेतीस वर्षं पूर्ण झाली. इसवी सन १२८७ साली वसंत पंचमीच्या दिवशी पैठणच्या नागघाटावर ही घटना घडल्याचं सांगितलं जातं. यानिमित्तानं आज पैठण इथं नागघाटावर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांचं पठण, कीर्तन, भजन आदी कार्यक्रमात नागरिक भक्तिभावानं सहभागी झाले.
****
मिरज ते पुणे मार्गावर दुहेरीकरण आणि विद्युतीकरण कामांसाठी  कोल्हापूर  ते  मुंबई मार्गावर धावणारी कोयना एक्सप्रेस ही रेल्वे गाडी २ फेब्रुवारी पर्यंत बंद राहणार आहे. तसेच इतर गाडयांचे मार्ग बदलण्यात आले असून त्या रेल्वे गाड्या दौंड, कुर्डुवाडी मार्गाने धावणार आहे.
****


No comments: