Thursday, 23 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.01.2020 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२३ जानेवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत महाराष्ट्र नव निर्माण सेनेचं अधिवेशन सुरू झालं आहे. भगव्या रंगाचा आणि शिवकालीन शिवमुद्रा असलेल्या पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते यावेळी झालं. आज तीन सत्रांत मनसेचं हे अधिवेशन होत आहे.
****

 राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात हेलीपॅड तयार करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागानं घेतला आहे. यातील पहिल्या टप्यात नांदेड जिल्ह्यातल्या पाच तालूक्यांना प्राधान्य देण्याच्या सुचना जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या माहूर, किनवट, देगलूर, भोकर आणि मुखेड या पाच तालुक्यांत हेलीपॅड तयार करण्याचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आले आहेत.
****

 पाच वर्षात नोकरभरती न झाल्यामुळे शासनावर कामाचा ताण पडला असल्यानं राज्यातील रिकाम्या जागांवर सरकारनं कर्मचारी भरती सुरू केली असल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथं उपजिल्हा रुग्णालय उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. येत्या काही दिवसांत या संदर्भातील जाहिराती प्रसिद्ध करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. आरोग्य खात्यात वीस हजार कर्मचारी कमी असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.
****

 लातूर जिल्ह्याच्या शिरुर अनंतपाळ तालुक्यात उजेड इथल्या गांधी बाबा यात्रेला आजपासून ग्रामस्वच्छता अभियानानं सुरुवात होणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ भरणाऱ्या या यात्रेचं यंदाचं अडुसष्टावं वर्ष आहे. पशुरोग निदान आणि उपचार शिबीर, रक्तदान शिबीर यांसह सांस्कृतिक कार्यक्रमाचं यात्रेदरम्यान आयोजन करण्यात आलं आहे.
****

 रायगड जिल्ह्यातल्या सुधागड जांभुळपाडा इथल्या अनघाई किल्ल्यावरून पडल्यामुळे कृष्णा मनोहर पार्टे या तरूण गिर्यारोहकाचा मृत्यू झाला आहे. कृष्णा पार्टे अनघाई किल्ल्यावर चढाई करताना काल दुपारी पाय घसरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाला होता.
*****
***

No comments: