Saturday, 25 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.01.2020 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२५ जानेवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****

 नोवेल कोरोना या विषाणूचा भारतात संसर्ग होऊ नये, यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून आतापर्यंत ९६ विमानांमधून आलेल्या २० हजार ८४४ प्रवाशांची तपासणी केली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. भारतातल्या कोणालाही या विषाणूचा संसर्ग झालेला नाही. मात्र, तीन संशयित रुग्णांना देखरेखीखाली ठेवलं आहे, अशी माहिती देखील आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.  या विषाणुचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीनं प्रवासासाठी जारी केलेली मार्गदर्शक सूचना आता बारा विमानतळांना लागू केली असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****

 काश्मीर खोऱ्यात पोस्टपेड आणि प्रीपेड २ जी मोबाईल इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर प्रशासनानं मान्यता दिलेल्या ३०१ संकेतस्थळांसाठी या मोबाईल सेवेचा वापर करता येईल. काश्मीर प्रशासनानं दिलेल्या आदेशानंतर एक आठवड्याच्या आतच मोबाईल इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत.
****

तालुका आणि जिल्हा पातळीवरच्या प्रमुख आदर्श गावांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तसंच  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचं नाव या योजनेला देण्यात येणार आहे. या संदर्भातला प्रस्ताव लवकरच राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी सरकारनं आता तालुका पातळीवर वीस लाख रुपये आणि जिल्हा पातळीवर पन्नास लाख रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
****

 उस्मानाबाद तालुक्यातल्या तेर इथले अमरसिंह बाजीराव पाटील यांचं वयाच्या ५० व्या  वर्षी अल्पशा आजारामुळं  पुणे इथं काल निधन झालं. त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून तसेच तेरचे सरपंच आणि तेर इथल्या विविध कार्यकारी सेवा संस्थांचे संचालक म्हणून काम केलं. आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास तेर इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
*****
***

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 16 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...